‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ ….

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Jan 2015 - 3:50 pm

पूर्वप्रकाशित

कविवर्य भा.रा. तांबे यांच्या अनेक सुश्राव्य कविता-गाण्यांपैकी 'घन तमी शुक्र बघ राज्य करी' हे स्वरांचे प्रचंड चढउतार असलेलं गाणं लतादीदींचं फार प्रिय आहे. हे गाणे लतादीदींचे प्रिय असण्यामागे अजून एक महत्वाचे कारण आहे. दीदी पं. दीनानाथांबरोबरच आणखी दोन व्यक्तींना गुरू मानतात. एक भालजी पेंढारकर आणि दुसरे मास्टर विनायक. मास्टर विनायकांबद्दल दीदी खुप आदराने बोलतात...

त्या सांगतात....

"वाचनाचा नाद मला कोल्हापूरला अक्कामुळे म्हणजेच इंदिरा या मावसबहिणेमुळे लागला. ती लेखिका होती. ती शरदचंद्र चटर्जी वाचायची. तिने मला पुस्तके आणून दिली. मी मुंबईला आले त्या वेळी विनायकरावांनी हिदी काव्याची पुस्तके दिली. भा. रा. तांबेंचं पुस्तक त्यांनीच मला दिलं. त्यांचं आवडतं गाणं होतं, 'घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ तरी...' ते गाणं त्यांनी मला शिकवलं. 'उठा उठा हो सकळीक' ही चाल त्यांचीच. त्यांनी माझ्यासाठी लेखराज शर्मा म्हणून कवी असलेल्या शिक्षकांची शिकवणी लावली. ते मला हिदी शिकवायला यायचे. त्यांच्यामुळे मी हिदीतील अनेक पुस्तके वाचली. प्रेमचंदांची सर्व पुस्तकं वाचली. त्यांनी मला दिनकर, मैथिली शरण, बच्चन, नरेंद्र शर्मा आदी कवींची पुस्तकं आणून दिली. मास्टर विनायकांमुळे मला काव्याची आवड लागली."

या गाण्यातील 'घन तमी शुक्र बघ राज्य करी' या ओळीतल्या ’राज्य’ या शब्दाची जागा घेताना लतादीदी जी कमाल करतात त्यावरून लक्षात येते की एकहाती एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची कमाल कशी जमली असेल त्यांना! हे गाणं संगीतबद्ध करताना बाळासाहेब नक्की कुठल्या दैवी मनोवस्थेत होते ते त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या चालीने, त्यांच्या संगीताने या गाण्याला अगदी उच्चपदावर, धृवपदावर नेवून बसवलेले आहे.

असो, मी बहुदा आठवी-नववीत असताना माझ्या आईमुळे गाण्याचं वेड लागलं. अतिशय गोड गळा लाभलेली माझी आई, सतत काही ना काही गुणगुणत असते. पण तिचा देव-देव किंवा धर्म याकडे फारसा ओढा नाही. त्यामुळे लहानपणी भजने, भक्तीगीते वगैरे फारशी कानावर पडली नाहीत. तिच्या तोंडून आमच्या कानावर पडायची ती लताबाई, आशाबाई यांनी गायलेली हिंदी चित्रपटगीते. त्यातही आशाबाई तिच्या फ़ेव्हरीट. कदाचित माझ्या ’आशा प्रेमाचा’ वारसा तिच्याकडूनच आलेला असावा. पण लताबाईंची गाणी सुद्धा त्यावेळी तिच्या ओठावर असतच. त्यातच हे गाणे नेहमी असायचे.

"घन तमी शुक्र बघ राज्य करी...."

आई गाणं शिकलेली नाही, पण यातला ’राज्य'चा उच्चार करताना ती नकळत अशी काही हरकत घ्यायची की आपोआप लक्ष वेधलं जायचं. एके दिवशी मी तिला विचारलंच ’घनतमी’ म्हणजे काय? त्यावर ती म्हणाली...

"घनतमी नाही, ते घन तमी असे आहे. घन म्हणजे दाट, घनदाट, निबिड (अरण्य) या अर्थाने आणि तम म्हणजे ’काळोख’ ! घनदाट,, निबिड अगदी डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा अंधार ! "

त्यानंतर मी या गाण्यातील शब्दार्थाच्या वाटेला फ़ारसा गेलो नाही. जे सांगितलं तेच डोक्यावरून गेलं होतं. पण हे गाणं मात्र आवडायला लागलं होतं. खरं सांगायचं तर अगदी परवा-परवा पर्यंत , म्हणजे काही दिवसांपूर्वी माझी धाकटी बहीण दक्षिणाने ’ घन तमीचं रसग्रहण करशील का?’ असे विचारेपर्यंत मी या गाण्याचा कधी खोलवर जावून विचारच केला नव्हता. त्या दिवशी दक्षीशी बोलणे झाल्यानंतर एकदा निवांतपणे हे गाणं पूर्ण ऐकलं, लक्ष देवून ऐकलं आणि .......

तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की अरे हे गाणं आपल्याला बर्‍याचदा भेटत असतं रोजच्या आयुष्यात..

आरतीप्रभू एका कवितेत म्हणतात..

तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो.

त्या ओळी वाचताना मी थबकतो आणि मग हेच जरा वेगळ्या शब्दात सांगणारे माझे सन्मित्र श्री. चारुदत्त कुलकर्णी यांची आठवण मला होते. अज्ञात या नावाने काव्यलेखन करणारे चारुदत्त उर्फ सी.एल. आपल्या एका कवितेत अगदी सहजपणे मनाची घालमेल, आर्तता व्यक्त करुन जातात...

आर्त आहे अंतरीचे जाहलो व्याकूळ मी
भावना लंघून गेल्या प्रीतओल्या संगमी
सावल्या बेधुंद झाल्या कुंद छाया घनतमी
समजले उमजे परी ना प्राण माझे संभ्रमी

आता जसजशी कविता समजायला लागलीय (आता कुठे सागरातला एखादा दुसरा थेंब हाती लागायला सुरुवात झालीये) तेव्हा भा.रा. तांब्यांच्या 'घन तमी' ची जादू तीव्रतेने जाणवायला लागलेली आहे. मी आशाबाईंच्या गाण्याचा वेड्यासारखा चाहता असलो तरी लतादीदींच्या आवाजाचा भक्त सुद्धा आहे. खरंतर गाणं असो किंवा साधं बोलणं, लतादीदींचा स्वर आर्त, म्हणजे हृदयाच्या गाभ्यालाच हात घालणारा असतो. त्यांच्या स्वरात ही जादू असल्यामुळेच आजवर लतादीदींचा आवाज आणि त्या आवाजातील गाण्यांना चिरंतनाचा स्पर्श झालेला आहे. लतादीदींच्या आवाजातला शांत-सात्त्विक भाव म्हणजे थेट ज्ञानेश्वरीतल्या शांतरसाशी नातं सांगणारा आणि ज्ञानेश्वरी म्हणजे शांतरसाचं आगर. त्यामुळेच एके ठिकाणी अदभुत रसाची चुणूक दिसताच ज्ञानेश्वर म्हणतात- 'शांताचेया घरा, अद्भुत आला आहे पाहुणोरा' म्हणजे शांत रसाच्या घरी अद्भुतरस पाहुणा आला आहे. लतादीदींचा आवाज क्षणोक्षणी याची चुणूक देत राहतो जेव्हा त्या गातात...

"घन तमी ....."

असो... थोडंसं भा.रा. तांब्यांच्या या कवितेकडे वळुयात ?

इथे "घन तमी" हा शब्द एक प्रतिक म्हणून आलेला आहे. नैराष्याचे, खिन्नतेचे, हतबलतेचे काळेभोर ढग आयुष्यात बर्‍याचदा जगण्याची वाट अडवून उभे होतात. कधी-कधी एखाद्या आप्त स्वकियाचा मृत्युदेखील या उदासिनतेला कारणीभूत ठरु शकतो. तर कधी स्वतःच्याच मृत्युची चाहूल लागल्याने 'जन पळभर म्हणतील...." अशी मनाची अवस्था झालेली असते. माझ्यामागे जग मला विसरणार तर नाही ना? ही भीती त्यात असते. अशा निराश, विरक्त होत चाललेल्या मनाला कविराज साद घालतात...

घनतमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

इथे तांब्यांच्या रसिकतेला मनापासून दाद द्यावीशी वाटते. ते आपल्या कवितेतील उपमा, रुपके नेहमीच खुप सुचकतेने, रसिकतेने निवडतात, वापरतात. इथेच पाहा ना, "घन तमी 'शुक्र' बघ 'राज्य' करी " ! शुक्राची चांदणी ही चंद्राच्या खालोखाल सर्वाधिक प्रकाशमान असल्याने काळोख्या रात्रीच्या वेळी चंद्राच्या अनुपस्थितीत तीच आकाशातल्या अंधुक प्रकाश देणा-या तारकांच्या जगावर राज्य करतांना दिसते. शुक्राच्या चांदणीचे वैशिष्ठ्य हे आहे की शुक्र हा ग्रहसुद्धा सूर्याच्या एक दोन घरे मागे पुढे चालत असतो, पहाटेच्या वेळी शुक्राचा तारा उगवला तर लवकरच सूर्योदय होणार असल्याची तो वर्दी देतो आणि रात्री तो मावळतांना दिसला तर झोपायची वेळ झाल्याचे दाखवतो. शुक्र हा ग्रह मध्यरात्री किंवा माथ्यावर आलेला कधीच दिसणार नाही.

‘काळोखातसुद्धा तो 'शुक्र' कसा ‘राज्य’ करतोय’ या ओळीतील ‘राज्य’ हा शब्द खूप काही सांगून जातो. केवळ एका समर्पक शब्दात प्रतिकूलतेतही चमकत राहण्याचा डौल आहे, तोरा आहे. हे भा.रा. तांब्यांचं वैशिष्ठ्य आहे. एकाच शब्दात अनेक गोष्टी साधायचं.

ये बाहेरी अंडे फोडूनी
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढूनी
रे मार भरारी जरा वरी

ये बाहेरी 'अंडे' फोडूनी ..! यातील ‘अंडे’ या शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक असा की, तुझ्या मनाने आलेल्या नैराष्यातून नकारात्मक विचारांचा जो एक गंडकोष निर्माण केलाय, तो फोडून तू बाहेर ये. दुसरा अर्थ जरा तत्वज्ञानाच्या मार्गाने जाणारा आहे. ‘अंडे’ म्हणजे देह, तनू, काया , ज्यात ते ‘आत्मा’रुपी सत्य, सत्त्व वसलेले आहे. ‘मी’ म्हणजेच माझे शरीर ही ओळख पक्की झालेली असली की मृत्यूचे भय निर्माण होते.

माझे 'अस्तित्व' माझ्या शरीरावर अवलंबून नाही या मुलभूत सत्याचा एकदा बोध झाला की मृत्युची भीती आपोआपच नाहीशी होते.

या संदर्भात ओशोंच्या कुठल्यातरी पुस्तकात एक छान गोष्ट वाचली होती. समुद्रात एक लाट, वाहताना तिच्या लक्षात येते की प्रत्येक लाट किनाऱ्यावर जाऊन फुटतेय. पुढे येऊन ठेपलेला आपला ‘अंत’ पाहून ती लाट घाबरते. घाबरून तिने तिचा वेग मंद केला. शेजारून दुसरी लाट जात होती. तिने या लाटेला तिच्या उदास होण्याचं कारण विचारलं. या लाटेने खरं कारण सांगितलं. दुसरी लाट फेसाळत हसली. म्हणाली, ‘तू जोवर स्वतःला ‘लाट’ समजत आहेस, तोवर तुला फुटून नाश पावण्याचं भय वाटत राहील. स्वतःला लाट समजू नकोस, स्वतःला ‘सागर’ समज. तू आत्ता फुटून जाशील. पुन्हा तुझी एक लाट तयार होईल. ती देखील कधीतरी फुटेल. पण तरीही तू या समुद्राचाच एक भाग बनून राहशील.’

एका निराळ्या संदर्भात आचार्य रजनीश म्हणाले होते, ‘जे स्वतःला ‘सागराची लाट’ समजतात ते पृथ्वीवर जन्म घेत राहतात. ज्यांनी स्वतःला ‘सागर’ मानलं ते इथे परत आले नाहीत. ते मुक्त झाले !’

फुल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल गळे, बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

प्रत्येक ओळ कशी सहजपणे आयुष्याच्या सार्थकतेवर भाष्य करतेय पाहा. पण मुळात आयुष्याची सार्थकता कशात असते हो? की खरोखर असं काही असतं तरी का? 'जो आला तो जाणारच' हे एकमेव त्रिकालाबाधित सत्य आहे. मृत्यू हेच अंतीम सत्य, तीच जीवनाची सार्थकता ! साधी-साधी उदाहरणे दिली आहेत तांब्यांनी. पहिल्या ओळीतल्या "रे खिन्न मना" ची ती उदासी कशातून आली असेल हे इथे स्पष्ट होते. हे कडवं नीट वाचलं तर इथे नाशाचा, मृत्यूचा उल्लेख प्रथम येतोय. फुलाच्या नष्ट होण्यात फळाचा जन्म दडलेला असतो हा निसर्गनियम आहे. एखादा वटवृक्ष डौलाने झूलत येणार्‍या-जाणार्‍या पांथस्थाला शीतल छाया देत असतो. पण केव्हा जेव्हा त्याचं 'बीज' रुजतं, जमीनीत मिसळून जावून नष्ट होतं , तेव्हा त्यातून नवा अंकुर जन्माला येतो, ज्याचं कालौघात एखाद्या डेरेदार वृक्षात रुपांतर होतं. ज्योतीच्या उजळून निघण्यासाठी तेलाचे जळणे अत्यावश्यक असते. किती साध्या, आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरणांच्या साह्याने कविराज मृत्यूची गुढ संकल्पना विषद करताहेत पाहा. मुळात आपण मृत्यूची उगाचच भीती बाळगतो. मृत्यू हा विनाश नाहीये मित्रांनो. आत्मारुपी उर्जेचे एका स्वरुपातून दुसर्‍या स्वरूपात स्थित्यंतर म्हणजे मृत्यू. उर्जेचे अमरत्व टिकवण्यासाठी निसर्ग घडवून आणत असलेली एक सर्वसामान्य प्रक्रिया म्हणजे मृत्यू. निसर्गात अशा घटना सर्रास घडत असतात. नवी पालवी फुटण्यापुर्वी झाडावरचं जुनं जीर्ण पान गळून पडतं. त्याच्यासाठी कधी कुणी दहा दिवसाचं सुतक ठेवतं का? प्रियेच्या आवेगाने वाहत आलेली नदी समुद्रात विसर्जीत होणे हे तीचे मरणच असते पण म्हणून त्यासाठी निसर्ग दोन मिनीटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहतो का?

तसंच मानवी जीवनाचे सुद्धा आहे. 'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय' हेच सत्य. मग त्या नश्वर आयुष्याबद्दल अकारण आसक्ती आणि जगण्याला नवा आयाम प्राप्त करून देणार्‍या मृत्यूबद्दल अनासक्ती, किंबहुना भीती कशासाठी? मृत्यू हीच खरी चिरंतनता नव्हे का?

आता शेवटचे कडवे. या कवितेतील शेवटचे कडवे म्हणजे मृत्युविषयक तत्त्वज्ञानाचा कळस आहे. कविवर्य तांबे या ओळींमध्ये मृत्युला एका विलक्षण उंचीवर नेवून ठेवतात.

मना, वृथा का भिशी मरणा ? दार सुखाचे हे हरीकरुणा !
आई पाहे वाट रे मना | पसरुनी बाहू, कवळण्या उरी

शब्द न शब्द जणु काही हिर्‍या-मोत्यांचे जडजवाहिर आहे. कविवर्य स्वतःलाच समजावतात – ‘ का घाबरतोस इतका मृत्यूला ? मृत्यू हे अमृताचे दार आहे. आत ‘आई’ तुझी वाट पाहत उभी आहे; तुला कुशीत घ्यायला !’ केवढी सुंदर कल्पना आहे. 'हरिकरुणा' , मृत्यूला 'हरिकरुणेची उपमा देणारे कविराज इथे कविच्या भुमिकेतून बाहेर पडतात कधी आणि तत्त्वचिंतकाच्या भुमिकेत शिरतात कधी हे आपल्याही लक्षात येत नाही. साक्षात मृत्यूला 'सुखाच्या दरवाजाची' उपमा. खरंच आहे ना. भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांपासून मुक्त करत, निराकार, निर्विकार समाधानाचे, आनंदाचे सोपानच तर असते मृत्यू. त्याला काय भ्यायचे, खरेतर दोन्ही बाहू पसरून त्या दारापलीकडे उभ्या असलेल्या 'मुक्तीरुपी' मातेकडे आनंदाने जायला हवे.

हे गाणे इथे ऐकता येइल..

http://youtu.be/LOq10jldGOU

[youtube=http://youtu.be/LOq10jldGOU]

मला अशा वेळी 'ये दुनीया मेरे बाबूलका घर...." म्हणणारा साहिर आठवल्याशिवाय राहवत नाही. अशा वेळी मला काकाचा ’आनंद’ आठवायला लागतो.., मृत्यूपंथाला लागलेल्या पण मनापासून मृत्यूच्या स्वागताला तयार असलेल्या ’आनंद’च्या मुखातून ’गुलजार’ सांगून जातात...

"मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको !"

ग्वाल्हेरचे राजकवि म्हणून ओळखले गेलेल्या कविवर्य भा. रा. तांबेंच्या कवितांमधून मृत्यू सदैव अशी देखणी रुपे, जगावेगळी रुपके घेवून भेटत राहतो. "नववधू प्रिया मी बावरते.." सारखी नितांतसुंदर कविता वाचताना आपल्याला कुठे माहीत असतं की ही कविता ’मृत्यूवर भाष्य करते म्हणून ? याच कवितेच्या शेवटच्या ओळी उधृत करून कविवर्यांना मानाचा मुजरा करतो.

शेवटी मृत्यू हेच एकमेव सत्य हे स्पष्ट करताना आपल्या ’नववधू...’ या कवितेतून कविवर्य भा. रा. तांबे सांगतात.

अता तुच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळे पळभर मात्र ! खरे घर ते !

आज भा.रा. तांब्याचे नावही नव्या पिढीतील किती जणांना माहीती नसेल. पण त्यांची कविता अमर आहे. त्यांचे शब्द चिरंतन आहेत.

संदर्भ : आंतरजालावरील काही ब्लॉगवर विखुरलेली माहिती आणि कुठल्याश्या वाहिनीवर एका मुलाखतीत बाळासाहेब मंगेशकरांनी सांगितलेल्या या गाण्यासंदर्भातील काही आठवणी.

विशाल कुलकर्णी
११/१२/२०१४

संगीतआस्वादलेख

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

3 Jan 2015 - 3:53 pm | विशाल कुलकर्णी

आंतरजालावरील त्या ब्लॉगचे नाव काही आठवत नाही आता, पण कुणीतरी निलेश म्हणून ब्लॉगर होते. अतिशय सुंदर ब्लॉग होता तो. पुन्हा सापडलाच नाही :(

सस्नेह's picture

3 Jan 2015 - 4:25 pm | सस्नेह

तरल भाव-रस-ग्रहण !
'घन तमी' मनात दीदींच्या टाॅप टेन मधे आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jan 2015 - 5:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__!!

अजया's picture

3 Jan 2015 - 5:16 pm | अजया

अतिशय सुंदर रसग्रहण!

बोका-ए-आझम's picture

3 Jan 2015 - 5:30 pm | बोका-ए-आझम

मृत्यूला सुंदर बनवावं तर राजकवी तांब्यांनीच. सर्वात ग्रेट गोष्ट ही की मृत्यूविषयी बोलताना ते कधीही वैफल्यग्रस्त होत नाहीत. घनतमी चमकणा-या शुक्रासारखी (जो सौंदर्य आणि कलासक्तीचा, पर्यायाने जीवनेच्छा दर्शवणारा ग्रह आहे), त्यांची कविता या अटळ सत्याचाही दिलदारपणे स्वीकार करते.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2015 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा

कविवर्य भा.रा.तांबे ऐकायला मिळाले,ही माझ्यावर असलेली आकाशवाणी(रेडिओ)ची कृपा आहे. (अश्या कविंच्या कविता, शिक्षणात/शाळेत सामोर्‍या येणार्‍या असल्या ,तरी शिकविणारा त्या कुळीचा असला..तर मनाला लाभणार! हा भारतीय योगायोग किती कविंची दानं इद्यार्थ्यांच्या नशिबात चिकटवणार? हे एक शैक्षणिक दुर्दैवच!) नाहितर अत्ताच्या जमान्यात अश्या माणसांची ओळख होणे,म्हणजे-कुठेतरी असं वाचायला मिळालं.किंवा एखाद्या'नी त्यांच्यावर काहि सिनेमा किंवा तत्सम कलाकृती निर्माण केली,कीच! एरवी आपल्याकडे हे सर्व ऐतिहासिक वास्तु संग्रहालया सारख्या ठिकाणीच, जमा अवस्थेत पाहायला मिळतं. :(
तरिही,आज मात्र विशालना विनंती आहे..की हे असलं लेखन इथे करतच रहा. मी आमच्या शाळेत जाऊन विचारतो.आणि ऑफतासांना तिथे निरुपण करतो या अश्याचं.. खरच काहि पुण्य लाभायच असेल,तर हे असलं लाभू दे. मग मरणाचं भय खरच वाटायचं नाही..केंव्हाही आलं तरी!

@उर्जेचे अमरत्व टिकवण्यासाठी निसर्ग घडवून आणत असलेली एक सर्वसामान्य प्रक्रिया म्हणजे मृत्यू. >>> ह्या विचाराबद्दल तर शतशः धन्यवाद! __/\__

पैसा's picture

3 Jan 2015 - 7:52 pm | पैसा

एका अतिशय सुरेख कविता आणि गीताचे तितकेच सुरेख रसग्रहण! 'घन तमी' आणि 'नववधू प्रिया मी' तसेच 'जन पळभर म्हणतिल' आणि 'निजल्या तान्ह्यावरि' ही सगळीच गीते अद्वितीय आहेत. सोबत इतर ज्या कविता आणि गाण्यांचा उल्लेख केलास तीही अप्रतिम!

शेखर काळे's picture

4 Jan 2015 - 4:49 am | शेखर काळे

रसग्रहण फार आवडलं ..
पहाटे जेव्हा सुर्योदय व्हायच्या आधी काळोख सगळ्यात गडद असतो असे म्हणतात. तेव्हाच शुक्राची चांदणी ऊगवते.
हृदयनाथांनी काय चाल लावली आहे - तोडीस तोड.
सुंदर ..

एस's picture

4 Jan 2015 - 5:16 am | एस

हा वाचकांशी साधलेला सुसंवाद म्हटला पाहिजे खरंतर. फारच भावपूर्ण आणि रसाळ.

विशाल कुलकर्णी's picture

4 Jan 2015 - 9:11 am | विशाल कुलकर्णी

मन:पूर्वक आभार मंडळी _/\_

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jan 2015 - 10:18 am | ज्ञानोबाचे पैजार

हे रसग्रहण पुरणपोळीवर धरलेल्या साजुक तुपाच्या धारे सारखे वाटले हवे हवेसे.

घन तमी फेवरेट गाण्यांपैकी एक आहेच. बाकीची उल्लेखलेली गाणी पण मनाचा एक कोपरा व्यापून बसली आहेत.

लेखात उल्लेख केलेल्या प्रत्येक गाण्यावर एक स्वतंत्र रसग्रहणाचा कार्यक्रम होउन जाउदे.

वाखु साठवली आहे.

बर्‍याच दिवसांनी वाचताना लेख संपूच नये असे वाटले.

पैजारबुवा,

कलंत्री's picture

4 Jan 2015 - 12:17 pm | कलंत्री

मनात कोठेतरी मराठी भाषेबद्दल विचार चालू असताना, मनात काहीसे उदास विचार असताना हा लेख वाचण्यात आला. योग्यवेळी औषधासारखे परिमाण मिळाळे.

अभिनंदन.

विशाल कुलकर्णी's picture

4 Jan 2015 - 3:14 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !

योगेश पाडेकर's picture

6 Jan 2015 - 5:39 pm | योगेश पाडेकर

हरवलोच!

दिलिप भोसले's picture

7 Jan 2015 - 7:08 pm | दिलिप भोसले

सुंदर रसग्रहण केले आहे. एकदा पट्टीचा लेखकही आपणास मनापासून दाद देईल. मला वाटते आपण अशा अर्थपूर्ण गीतांचे रसग्रहण जरूर करावे. मराठी मध्ये अगणित अशी सुरेख गाणी आहेत. मनपूर्वक अभिनंदन

‘तू जोवर स्वतःला ‘लाट’ समजत आहेस, तोवर तुला फुटून नाश पावण्याचं भय वाटत राहील. स्वतःला लाट समजू नकोस, स्वतःला ‘सागर’ समज. तू आत्ता फुटून जाशील. पुन्हा तुझी एक लाट तयार होईल. ती देखील कधीतरी फुटेल. पण तरीही तू या समुद्राचाच एक भाग बनून राहशील.’

रसग्रहण तर छानच, पण हे विशेष आवडलं.

विशाल कुलकर्णी's picture

10 Jan 2015 - 12:36 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद :)