एका नव्या इतिहासाची सुरुवात -४

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
1 Dec 2014 - 1:00 pm

पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१

एका नव्या इतिहासाची सुरुवात -२

एका नव्या इतिहासाची सुरुवात -३

शांतन्यला अर्थातच सर्व काही सांगणे शक्य नव्हते. सांगूनही त्याचा विश्वास बसला असता का, शंकाच होती.
सात दिवस ! सात दिवसात तयारी करायची होती ! जन्मोजन्मीचा निरोप घ्यायचा होता. तिच्या शोकाला पारावारच नव्हता. आजवर त्याच्या संगतीत घालवलेले अतीव सुखाचे क्षण तिच्या अंतरात, वादळात विखुरलेल्या पानांप्रमाणे भिरभिरत होते. तिच्या आजवरच्या , जवळजवळ अमर आयुष्यात असे निरामय सौख्याचे क्षण फारच कमी आले होते, हे तिला आता आठवत होते, आणि यांनतरही ते येतील का हे सांगता येत नव्हते.
.... ‘तिकडे’ जीवन अधिक उत्तुंग, खाच-खळगे विरहित, सुखासीन आणि अतिदीर्घ होते. मृत्यू होता पण ऐच्छिक... जीवनाचा ढाचा बदलावासा वाटे, तेव्हाच. संकटे, निराशा, दु:ख यांना स्थानच नव्हते. आव्हाने होती, पण साधनांचीही कमतरता नव्हती. तरीही इथल्या कालखंडाच्या मधुर स्मृती तिला, मानवाच्या तुलनेत अतिदीर्घ असणाऱ्या तिच्या आयुष्यातील आणखी काही युगे नक्कीच संजीवनी देत राहणार होत्या.
पण शांतन्यचे काय ? तो कसे सहन करील आपले जाणे ? त्याच्या आयुष्यात डोकावून तिने एक प्रकारे त्याचा अपराधच नव्हता का केला ? त्याच्यासाठी काय केले म्हणजे तिच्या या अपराधाची तीव्रता त्याच्यासाठी सहनीय होईल ? ती आपल्या मर्यादेत काय करू शकत होती ?
आणि तिच्या ते लक्षात आले ! होय, असे होऊ शकले असते. शक्यतांच्या मर्यादित पटामध्ये हा एक दुर्मिळ संभाव्य पर्याय तिला अचानक दिसला ! काळाचे पट ओलांडून तिची अस्मिता जेव्हा सर्वग्राही संचार करत होती, तेव्हाच तिला ते उदाहरण दिसले.
आणि तेच करायचा तिने निर्धार केला . अंशरूपाने का होईना, ती त्याच्यासोबत या जगात राहणार होती.
...दोघांच्या अंशातून जन्म घेणाऱ्या अंकुराच्या रूपाने !
सातव्या दिवशी झोपताना तिच्या डोळ्यात नवा निर्धार होता. शांतन्य जरासा नवलानं तिच्याकडे पहात होता. अजून काही अनिष्ट न घडल्याने तो काहीसा सुखावला होता.
मिटल्या डोळ्यांना निद्रेच्या साम्राज्यात गेलेले समजले नाही.
अन तो आला..!
‘अकलिप्ता...’
‘मी तयार आहे,..’
‘अं ..??’
‘पण माझी एक अट आहे..’
‘हम्म. वाटलेच मला !’
‘....मी तिकडे गेल्यावर तू इथे राहिले पाहिजेस !’
‘मी ? ते कसे शक्य आहे अकलिप्ता ? ती मानवीय पातळी आहे. ’
‘का ? माझ्या पोटात येऊन सुरुवात तर केलीच आहेस ना मानवी जीवनाला ? तीच रेषा पूर्ण करायची.’
‘अकक्लिप्ता, तू भावनेच्या आहारी जाते आहेस. '
'असेल..'
'आणि पुढे काय ? मी अडकेन !’
‘नाही. पुढच्या छेदरेषेवरून तू सहज परत जाऊ शकशील.’
‘मी हे करू शकत नाही.’
‘मग मी येणार नाही. तू जा.’
तिच्या निर्धारापुढे तो मूक झाला.
‘हे योग्य नाही. मला यास्थज्ञ महाराजांना विचारावे लागेल.’
‘....’
एक अस्वस्थता.
‘ठीक आहे, मी पुन्हा दोन पळे थांबतो. महाराज काय म्हणतात पाहून पुन्हा येतो.’

..**..**..

अवकाशाच्या गर्भात पुन्हा उलथापालथ सुरु झाली. प्रकाशमान रंगरेषा जलदगतीनं खालीवर झाल्या.
‘महाराज, तिची एक अट आहे...’
‘मला समजले आहे. माझे लक्ष होते तिकडे..’
‘...?’
करड्या मेघाच्या गर्भात स्मृतींच्या हिरव्या तारका झगमगल्या. काही रेषा दिप्तीमान झाल्या अन परत विझल्या.
‘हम्म.. काळात मागे पाहिले तर दिसते की असे यापूर्वीही झाले आहे. स्थळेही साधारणपणे तीच आहेत. त्यावेळी यातून मानव समाजात बरीच मोठी स्थित्यंतरे झाली होती. त्यांच्या भाषेत काय बरं, ?’
‘महाभारत !’
‘बरोबर.... ! आणि तेव्हा घडलेल्या घडामोडींवरून हेही दिसते की, हा प्रयोग फसला होता !
....ठीक आहे. तेव्हा फसलेला प्रयोग आता पुन्हा वेगळ्या दिशेने करायला हरकत नाही. पाहू यावेळी ते किती शिकतात ते ! कुणी सांगावे त्यांच्या परिवर्तनीय उत्क्रांतीची बीजे या घटनेत रुजलेली असतील, ही एका नव्या इतिहासाची सुरुवात असेल.
.....कदाचित स्वामींची हीच इच्छा असेल ! ’
‘महाराज ? आपला मानस काही विशेष असल्याचे मला जाणवते आहे...’
‘हम्म. शक्यतांची पातळी थोडी बदलली तर व्स्ब 3*/न #ज्ग्प.. पातळीवर सृजनयुक्त कार्य होऊ शकते. त्यात तिची भूमिका महत्वाची ठरू शकेल. ‘
‘आपल्याला तिने तिथेच कार्य करणे तर अभिप्रेत नाही ?’
‘मानव-इतिहासात एक नजर खोल टाकल्यावर असे दिसते की गेल्या वेळी जर ती तिथेच राहिली असती तर कदाचित महाभारत वेगळे झाले असते. वर्णसंकर, आपसातील युद्धे टाळता आली असती. परिणाम सृजनयुक्त असतील तर योजना-बदलासाठी स्वामी निश्चित अनुमती देतील. तिथेच आणि त्याच वंशात राहून तिला आणि वृत्तार-८ ला त्यांच्या उत्क्रांतीला वेग देता येईल अशी योजना माझ्या नजरेसमोर आहे.
पण या योजनेत एक लहानसे विघ्न आहे..’
‘ते काय, महाराज ?’
‘उर्जेच्या दिशेचे परावर्तन. पातळी-बदलातील फरकामुळे तिच्यामध्ये संयुक्त झालेली उर्जा जर परावर्तित करत आली. तर त्याच उर्जेच्या सहाय्याने वृत्तार-८ तिच्या पातळी वर सहज जाऊ शकेल. ‘
‘आणि हे परावर्तन कसे होऊ शकेल ?’
‘सोपे आहे. तरफेचा सिद्धांत ! आपल्याला दोन पातळ्यांच्या मध्ये योग्य अंतरावर एक टेकू मिळाला, की आपण उर्जेच्या वहनाची दिशा बदलू शकतो. ‘
‘मग यात विघ्न कोणते ?’
‘एक तर असा सुयोग्य बिंदू स्थळ-काळ पटात शोधणे अन दुसरे महत्वाचे म्हणजे उर्जेच्या परावर्तनानंतर तो बिंदू तिथल्या सृष्टीसह नष्ट होईल ! स्वामी याला अनुमती देतील का हा प्रश्न आहे.’
‘महाराज ! असा एक बिंदू जर मिळाला, की तिथे सृष्टीच नाही, तर ?’
‘मग हे कार्य सहज सिद्ध होईल !’
‘मला तो शोधण्यासाठी प्रयत्न करण्याची अनुज्ञा द्यावी, महाराज !’
‘अर्थात अनुज्ञा आहे ! पण काळ अल्प आहे, याची जाणीव असू दे.’
‘होय, महाराज’
..**..**..
त्या सात दिवसानंतर आणखी सात दिवस गेले. प्रत्येक रात्र धास्तावलेली होती.
आई इथेच येऊन राहिली होती आणि अजून काही अनिष्ट न घडल्याने आनंदात होती, अकलिप्ताचे हवे-नको बघण्यात तिला दिवस अपुरा पडत होता. आणि अकलिप्ताला एकांत असा मिळत नव्हता. ही गोष्ट एका परीने बरीच होती.
तरीही काही क्षण जरी रिकामे आले तर तिच्या मनात विचारांची वादळे घोंगावू लागत.
‘त्यांचा’ निर्णय झाला का ? तो कधी परत हाक देईल ? दररोज झोपेतून जाग आल्यावर ती धास्तावल्या मनाने पोटावर हात ठेवून चाहूल घेई. आणि बाळ सुरक्षित असल्याची खात्री झाली की तात्पुरत्या दिलाशाचा एक निश्वास तिच्या आणि शांतन्यच्या तोंडून बाहेर पडे. तरीही ती दोघे वाट पहातच राहत, कोणत्या क्षणी ते बोलावणे येईल...
..पण भय, चिंतायुक्त अशा तिच्या मनात ‘ती’ हाक उमटलीच नाही. बाळ सुरक्षित होते. काळ आपली पळे सुरळीतपणे व्यतीत करीत होता. आणि म्हणूनच तिच्या मनाला स्वस्थता नव्हती. दोघेही एकमेकांशी बोलणे टाळत होते. आणि नजरेने एकमेकांना दिलासा देत होते.
अटळ नियतीला तोंड द्यायची एकदा तयारी झाल्यानंतर ही प्रतीक्षा जीवघेणी होती.
( क्रमश: )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Dec 2014 - 4:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भाग पण चांगला रंगवला आहे.
माझा अंदाज बरोबर ठरणार असे वाटुलागले आहे.
इतिहासाची पुनरावृती होउ पहात आहे.
द्वैपायनाला माझा सा.न.

पैजारबुवा,

रामपुरी's picture

3 Dec 2014 - 5:10 am | रामपुरी

द्वैपायन नव्हे भीष्म

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Dec 2014 - 9:56 am | ज्ञानोबाचे पैजार

माझा नमस्कार अधुनिक व्दैपायनास आहे, जो नवा इतिहास लिहितो आहे.

पैजारबुवा,

कवितानागेश's picture

1 Dec 2014 - 4:10 pm | कवितानागेश

मस्त चाललिये कथा

वाचतेय, भाषा भारीच. लवकर टाक पुढचे भाग.

स्नेहांकीता जी
चार ही भाग एकदम च साठवुन वाचले कथा खुप आवडली
कथा विलक्षण उत्कंठावर्धक आहे फारच वेगळी जातकुळी असलेली
तुमची शैली खुप सुंदर आहे
संस्कृत तुमच्या प्रेमाचा/ अभ्यासाचा विषय आहे का ?
मारवा

स्वप्नज's picture

1 Dec 2014 - 9:21 pm | स्वप्नज

सुंदर ... अप्रतिम

मुक्त विहारि's picture

2 Dec 2014 - 3:07 am | मुक्त विहारि

उत्कंठा वाढत आहे...

पुभाप्र

प्रीत-मोहर's picture

2 Dec 2014 - 8:47 am | प्रीत-मोहर

स्नेहा मस्तच... लवकर टाक पुढचा भाग

प्रचेतस's picture

2 Dec 2014 - 9:00 am | प्रचेतस

खूपच छान चाललीय कथा.

स्पंदना's picture

2 Dec 2014 - 12:30 pm | स्पंदना

सहीच!!
कुठे दुसरीकडेच जुळत चाललाय धागा या कथेचा.
येउ दे स्नेहा!! सुरेख!

लैच विन्ट्रेष्ट्रींग झालंय प्रकरण.
वाचतोय. पु भा प्र.

पैसा's picture

5 Dec 2014 - 8:37 pm | पैसा

नवे वळण!