एका नव्या इतिहासाची सुरुवात -१

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
19 Nov 2014 - 5:15 pm

ही एक काल्पनिका आहे – फँटसी. मराठीत दुर्मिळ असलेला प्रकार. इथे तांत्रिक तपशिलापेक्षा कथानकात रस घ्यावा अशी वाचकांना विनंती आहे. शक्यतेच्या पातळ्या तपासण्याचे निकष मानवी ज्ञानाच्या कक्षेत कमी आहेत. शास्त्रे भौतिक पातळ्या तपासू शकतात. अभौतिक अस्तित्वे शास्त्रीय उपकरणांनी टिपता येणार नाहीत. कलाकाराचा मेंदू अन व्यवहारी माणसाचा मेंदू यात वैद्यकीय उपकरणे तारतम्य करू शकतील का शंका आहे.
तेव्हा चिकित्सक दृष्टीपेक्षा तरतम दृष्टी ठेवली तर या कथेचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल.
.. ( फँटसी-प्रेमी ) स्नेहांकिता.

फक्त पन्नास फुटांवरून इतक्या बेभानपणे खाली कोसळणाऱ्या समोरच्या जलप्रपाताकडे तो मंत्रमुग्ध होऊन पहात होता. जलतुषारांनी त्या प्रपातासभोवती एक अर्धपारदर्शक पडदा तयार केला होता. मधूनच वाऱ्याने तो पडदा सरकवला जाऊन सुसाटणाऱ्या प्रवाहाचे दर्शन होत होते. निळेपणाचा लवलेशही नसलेला तो दुग्धधवल प्रवाह प्रचंड शिळांच्या कपारीमधून तर कधी त्यांच्या डोक्यावरून आनंदनृत्य करत विहरत होता आणि शांतन्यच्या अंत;करणात आपले पडसाद उमटवीत होता.
कंपनीच्या नवीन शाखेचे पाटण्याला काम सुरु व्हायला अन शांतन्यचे प्रमोशन यायला एकाच गाठ पडली. तरुण उत्साही रक्त आणि मुख्य म्हणजे अजून अविवाहित. कुटुंबाची जबाबदारी नाही. शांतन्य ही संधी सोडणे शक्यच नव्हते.
पाटण्याला येऊन आईने घर लावून दिले अन ती पुण्याला परत गेली. शांतन्य कंपनीच्या कामकाजात नवनवी आव्हाने पेलण्यात व्यस्त झाला.
प्राचीन पाटलीपुत्र या मगध राजधानीचे वर्णन त्याने इतिहासातच वाचले होते. मुळात असलेली इतिहासाची सुप्त ओढही त्याला इथे घेऊन येण्यास एक कारण ठरली. त्या प्राचीन वैभवशाली संस्कृतीचे अवशेष पाहता पाहता तो मनाने त्याच काळात वावरत होता.
..आणि गंगेचे विशाल रूप पाहून तर तो स्तिमितच झाला. कंपनीचे गेस्टहाउस शहराच्या बाहेर दूर गंगेच्या किनाऱ्यानजीक होते. इथे शहराची गजबज पोचत नव्हती. रोज काम उरकल्यावर गंगेच्या काठी येऊन बसणे हा त्याचा छंदच झाला. कितीही वेळ होवो, गंगाकिनारी फेरी मारल्याशिवाय त्याचा दिवस संपत नसे.
म्हणूनच कंपनीच्या सहकाऱ्यांनी गंगा-हिमालय ट्रीप काढल्यावर पहिले नाव शांतन्यनेच नोंदवले. आणि आता तो गंगेच्या विविध मनोहारी रूपांचे मनसोक्त दर्शन घेत हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यातून हिंडत होता.
पाटण्यात एखाद्या शालीन कुलीन युवतीसारखी दिसणारी गंगा इथे अवखळ बालिकेसारखी बागडत होती.
त्या प्रपाताचे थंड जलतुषार चेहेऱ्यावर झेलण्यासाठी त्याने वर पहिले तेव्हाच तुषारांचा पडदा क्षणभर बाजूला झाला अन त्याला ती दिसली. जिथून प्रपात कोसळायला सुरुवात झाली होती तिथेच एका मोठ्या शिळेवर ती बसली होती. इतक्या दुरूनही तिची कमनीय आकृती आकाशावर वेलबुट्टी काढल्यासारखी नजरेत ठसत होती.
‘बापरे ! ही काय आत्महत्या करतेय की काय ?’ शांतन्यच्या मनात शंका चमकली.
कपारीतून वाट शोधून तो पन्नास फुटांचा चढ चढायला त्याला तब्बल दहा मिनिटे लागली. मधून मधून वर नजर फेकत चढताना आपल्याला उशीर तर नाही ना होणार हा विचार मनात तरळत होता.
सतराव्या मिनिटाला तो तिच्या समोर होता.
...सौदर्य ? छे ! त्यापेक्षा खूप काही अधिक तिच्या आकृतीत होतं. हिमाची शुभ्रता, जळाचा ताजेपणा, निर्झराचा अवखळपणा आणि बरंच काही काही...शब्दात न उतरवता येणारं.
ब्रम्हांडातली सगळी निर्मलता, शुचिता, पावित्र्य आणि ताजेपणा तिच्या मूर्तीत एकवटलेला . नजर सूर्यकिरणांइतकीच तेज अन स्वच्छ .
त्याला अचानक समोर पाहून ती हडबडल्यासारखी एकदम उभी राहिली अन तोल जाऊन पाण्यात पडली.
मग त्याचे तिला वाचवणे . हजारो वर्षापासून चालत आलेली आकर्षणाची तीच कथा. ..
.. एकमेकांची चौकशी करण्याइतके दोघांना भान आले तेव्हा त्याला समजलं. पायथ्याशी असलेल्या खेड्यातल्या वृद्ध महंतबाबाची ती मानलेली नात. काही वर्षापूर्वी त्याने तिला यात्रेत फिरताना पाहिले. तिची स्मृती हरवली होती. महंत बाबांनी अनाथ म्हणून तिला घरी आणले.
अकलिप्ता..तिचे नाव. विचित्रसे. तिनेच सांगितले.
आकर्षणाच्या वादळात भाषा, शिक्षण, संस्कृती इ. सर्व मुद्दे कस्पटासारखे उडून गेले अन एक आठवड्याच्या मुक्कामात वेगाने घटना घडल्या . त्याची पार्श्वभूमी समजल्यानंतर महंतबाबांची हरकत असण्याचे काहीच कारण उरले नाही. त्यांची संमती घेऊन शांतन्यने अकलिप्ताशी विवाह पक्का केला.
..पण अकलिप्ताने एक अट घातली. तिची स्मृती परत आली तर तिला त्याच्यापाशी राहायचे किंवा नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य हवे.
शांतन्यने किंचित विचार केला. ती कुमारवयापासून महंतबाबांच्या छत्राखाली असल्यामुळे इतर काही प्रकरण असण्याची शक्यता शून्य. आणि आपल्या प्रेमाने तिला एकदा जिंकून घेतले की तिचे चित्त अन्यत्र जाण्याचे काहीच कारण नाही. तेव्हा ती अट मान्य करण्यात त्याला काहीच गैर वाटले नाही.
आईशी संपर्क साधून त्याने सर्व गोष्टींची कल्पना दिली. तिचा विरोध शंका कुशंका मृदू समजुतीने दूर करण्यात त्याला यश आले. आईला तिथेच बोलावून घेतले त्याने.
ट्रीपला जाताना तो एकटा होता. परत येताना त्याच्यासोबत त्याची नववधू.
*****
तो अवकाश दिप्तीमान शतरंगांनी झळाळून उठला होता. त्या स्थळाच्या मिती सापेक्ष होत्या. काळाच्या एका वळणावरून तो अवकाश अवाढव्य दिसे तर दुसऱ्या एका टोकावरून अणुइतका भासे. त्रिमित जगातून स्वप्नवत भासे आणि सातव्या (की आठव्या ? ) मितीतून सघन वाटे. तिथली अस्तित्वेही त्या अवकाशाशी समांतर छटा धारण करून अव्यक्त स्तरावर आपली निर्धारित कार्ये मूकपणे पार पाडत.
...याक्षणी मात्र संवादाची गरज भासत होती.
काहीशी खळबळ माजली. अवकाशाचे काही पदर मागेपुढे झाले. काही अस्तित्वे व्यक्त पातळीवर उतरली.
संवाद अभिव्यक्तीच्या स्तरावर असला तरी शब्द वापरले गेले नाहीत. अर्थ घ्यायचा तर तो साधारण असा होईल.
‘ती कुठे आहे ?’
‘तिची येण्याची निर्धारित वेळ होऊन गेली आहे, महाराज...’
‘तिने विलंबाबद्दल कळवले आहे का ?’
‘नाही, ..’
..एक अस्वस्थता. काहीसा राग ! आजवर असे फार थोड्या वेळी झाले होते.
‘ती कोणत्या पातळीवर कार्य करत होती ?’
‘व्स्ब 3*/न #ज्ग्प..शिन्गुता’
‘तिथे काय आहे ?’
‘ते स्वत:ला मानव म्हणवतात.’
‘ओहो, उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यावरचे ते ?’
‘होय, महाराज’
‘तरीच !’
‘..?’
‘ती तिथे रमली यात काहीच नवल नाही !’
‘...’
‘पण तिला इथे आले पाहिजे. हे कार्य तुमच्यापैकी कुणीतरी केले पाहिजे.’
‘मी जाऊ का ?’
‘नको. तुझे काम इथे जास्त महत्वाचे आहे. क्लोव्तार चांगल्या प्रकारे करू शकेल ते.’
‘होय, महाराज’
‘त्यालाच पाठव. तो आला की आपण पाहू काय ते.’
‘...'
( क्रमशः )

कथाविचार

प्रतिक्रिया

एस's picture

19 Nov 2014 - 5:34 pm | एस

अरे वा! शब्दांची मोहक पखरण आणि काही प्रख्यात कलाकृतीवर चढवलेले काल्पनिकतेचे आवरण... वाचायला मजा येणार आहे निश्चितच. आम्हीही उत्तरीय सरसावून मांड ठोकली आहे श्रवणौत्सुक्याने. स्वागतस्तु!

सखी's picture

19 Nov 2014 - 11:29 pm | सखी

असेच म्हणते, पु.भा.प्र.

कपिलमुनी's picture

19 Nov 2014 - 5:36 pm | कपिलमुनी

प्रभावी आणि गुंतवून ठेवणारी सुरुवात

स्वप्नज's picture

19 Nov 2014 - 6:00 pm | स्वप्नज

+१
आवडली. पु.भा.प्र...

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 5:45 pm | बॅटमॅन

एलियन आणि प्रिडेटर विथ नाथमाधवी साज अशी कथा आहे की काय ;)

ज्योक्स अपार्ट, पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Nov 2014 - 5:54 pm | लॉरी टांगटूंगकर

आवडते आहे, पु.भा.प्र.

काव्यान्जलि's picture

19 Nov 2014 - 6:06 pm | काव्यान्जलि

खूपच छान. उत्कंठा वर्धक …

आता अशी वर्णने दुर्मिळ होत चालली आहेत. चालू द्या. मेघालयातले सात धबधबे ढगांत लपले आहेत हळूच ढग सरकतात आणि क्षणभर दृष्य दिसते. वाट पाहा.

प्यारे१'s picture

19 Nov 2014 - 9:05 pm | प्यारे१

मस्त सुरुवात. पु भा प्र.

बोका-ए-आझम's picture

20 Nov 2014 - 1:27 am | बोका-ए-आझम

छान आहे सुरूवात! पुभाप्र!

मुक्त विहारि's picture

20 Nov 2014 - 1:43 am | मुक्त विहारि

पु भा प्र

स्वॅप्स ने उत्तरीय सावरल्याचे पाहिल्यावर मी माझा शेला पांघरुण बसले आहे.

सुंदर वर्णन स्नेहांकिता!! सायन्टीफिक कथेला दिलेले सुरेख निसर्ग वर्णनांचे आणि प्रेम कथेचे वळण.....

प्रचेतस's picture

20 Nov 2014 - 8:59 am | प्रचेतस

कथा आवडली.
पुभाप्र

प्रीत-मोहर's picture

20 Nov 2014 - 5:33 pm | प्रीत-मोहर

मस्त कथा स्नेहा. आम्हीही आमची नौवारी न शेला सावरुन बसलो आहोत.

कवितानागेश's picture

20 Nov 2014 - 6:35 pm | कवितानागेश

मी मात्र नाक पुसत विचारतेय, मग पुढे काय जाले?

पैसा's picture

20 Nov 2014 - 6:37 pm | पैसा

गंगेची कथा वेगळ्या मितीतून! फार आवडली!

कुसुमावती's picture

28 Nov 2014 - 1:39 pm | कुसुमावती

पुभाप्र.