जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १६ (अंतिम)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
22 Nov 2014 - 1:06 pm

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ६
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ७
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ८
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ९
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १०
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ११
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १२
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १३
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १४
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १५
सर्व वाचकांना धन्यवाद! :)

“मेरे रुह की तस्वीर मेरा कश्मीर. . .”

मेरे रुह की तस्वीर मेरा कश्मीर. . .
ओ खुदाया लौटा दे कश्मीर दोबारा. . .

हे गाणं सारखं आठवत आहे. १९ ऑक्टोबरच्या पहाटे लवकर उठलो. शक्य तितकं लवकर जम्मूला जायला निघायचं आहे कारण मुघल रोडवरही नंतर ट्रॅफिक जाम होऊ शकतो. आजसुद्धा पहाटे साडेपाचला भर थंडीमध्ये बाहेर होतो. सोबतचे कार्यकर्ते झोपले आहेत. परिसर एकदम शांत आहे. बस स्टँडवर जाऊन जीप घ्यायची आहे. थंडीत चालताना खूप मजा आली. पाय समोर चालत होते; पण विचार मागे जात होते. फक्त पंधरा दिवसांचाच हा प्रवास! पण वाटतंय की हा प्रवास खूप आधीपासूनचा आहे. . .

ज्या ज्या कार्यकर्त्यांसोबत काम केलं ते सगळे आठवत आहेत. देशाच्या अनेक भागांमधून आलेले डॉक्टर आणि अन्य कार्यकर्ते. सेवा भारतीचे कार्यकर्ते- आता त्यांना मित्र म्हणणं जास्त योग्य राहील. जावेदभाईंनी म्हंटलेलं गाणं. कश्मीरच्या अंतरंगाचं झालेलं दर्शन. कित्येक आठवणी मनात येत आहेत. असो. बस स्टँडजवळच एक जीप मिळाली. आता जम्मू जाणा-या लोकांची संख्या जास्त व साधने कमी आहेत; त्यामुळे भाडं वाढलेलं आहे. जीप जम्मूच्या सांबा जिल्ह्यातल्या पासिंगची आहे. जेके- २१. चालकाने श्रीनगरमध्ये फिरून आणखी प्रवासी घेतले. एक सरदारजी कुटुंब आहे. पुलवामाच्या रस्त्यावर निघता निघता पंक्चर झालं. सगळं होऊन निघताना सात वाजले आहेत. थंडी एकदम जोरदार आहे. जाताना सोबततच्या सरदारांनी शोपियाँमध्ये एका ठिकाणी बोट दाखवून कश्मिरी पंडितांची ओस पडलेली आणि पडझड झालेली घरं दाखवली. शोपियाँमध्येच काही स्थानिक लोकांना लिफ्ट हवी होती. पण भाडं त्यांना पटलं नाही. त्यामुळे थोडी वादावादी झाली. प्रत्येक ठिकाणी एक अंतर असल्याचा अनुभव येतो आहे. शोपियाँमध्ये एका ढाब्यावर थोडा वेळ थांबून पुढे निघालो. शोपियाँ सफरचंद नगरी आहे!

पुढे पीर की गली. आता इथे रस्त्यावरही बर्फ पडला आहे! थोडा वेळ नजारा डोळ्यांमध्ये साठवला. इथे ट्रॅफिक जामसुद्धा झाला आहे. पण थोड्याच वेळात तिथून पुढे निघालो. एका जागी मिलिटरीने सगळ्यांची चौकशी केली. मध्ये मध्ये मेंढपाळ रस्ता अडवतात. हे दृश्यही सुंदर आहे. ह्या प्रवासाचे फोटोज आणि व्हिडिओज इथे बघता येतील. मध्ये थोडा थोडा जाम होता; पण मग न थांबता पीर पंजाल उतरून दुपारी दोन वाजेपर्यंत राजौरीला पोहचलो. जेवणासाठी नौशेराच्या थोडं आधी थांबलो. इथेच जवळून एक नदी जाते आहे आणि आजूबाजूला चिनार राज्य आहे! खरोखर चिनारच कश्मीरचे खरे पहरेदार आहेत! इथे मोबाईल नेटवर्क सर्च केलं तर दोन नेटवर्क पाकिस्तानचे दिसले. त्यांचे सिग्नलही भरपूर होते. ही छोटीशी गोष्ट एका मोठ्या तथ्याकडे निर्देश करते. आपण डोळे उघडून बघितलं तर दिसतं की, देशातले कित्येक भाग असे आहेत, जिथे देशातल्या लोकांपेक्षा विदेशी लोक जास्त रस घेतात. आणि ही गोष्ट फक्त राजकीय नाही आहे की, कश्मीरमध्ये पाकिस्तानला रस आहे. ही बाब व्यापक आणि सामाजिक आहे. जर आपण आपल्या देशाच्या सर्व भागांशी संबंध ठेवलाच नाही, तर उघड आहे की आपलं त्या ठिकाणासोबत असलेलं नातं हळु हळु तुटत जाईल. जसं नॉर्थ ईस्टचे प्रदेश आहेत. जर आपण तिथे कधी गेलोच नाही; तिथल्या प्रदेशाला, जनतेला, तिथल्या संस्कृतींना समजून घेतलंच नाही, तर नातं तुटतच जाईल. आज देशातले कित्येक भाग असे आहेत की त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची असेल, तर विदेशी प्रवाशांचे विवरण वाचावे लागतात. हिमालयामध्ये आपल्यापेक्षा कदाचित विदेशी लोकच जास्त भ्रमण करतात. हिमालयात असे सुदूर आणि दुर्गम असलेले स्थान आहेत जिथे आपण जाण्याचा विचारही करू शकत नाहीत आणि हे लोक तिथे जातात. जर आपल्याला वाटत असेल की, हे सर्व स्थान आपल्या देशात आहेत आणि पुढेही राहावेत, तर आपल्याला त्या भागाशी जोडून राहावं लागेल. असो.

प्रवास सुरळीत झाला आणि संध्याकाळी सहा वाजता जम्मूला पोहचलो. पायी चालत आणि जम्मू शहर बघत सेवा भारतीच्या कार्यालयात पोहचलो.

इथे रोहितजी‌ आणि दादाजी भेटले. मदतकार्याची पुढची दिशा कळाली. बनवलेले काही पाम्पलेटसुद्धा मिळाले. पुढे काही स्टॉल्स देण्याच्या योजनेवर काम होणार आहे. त्यामुळे लोकांना उपजीविका रिस्टोअर करण्यासाठी मदत मिळणार आहे. सहा महिन्यांसाठी डॉक्टर यावेत, ह्यासाठीसुद्धा भरपूर प्रयत्न चालू आहेत. रोहितजी खूप उत्साहाने आणखी पुढे सहभाग देणार आहेत. संध्याकाळी जम्मूत थोडी शॉपिंग झाली. नंतर रवीजींसोबत गप्पा झाल्या. अनेक आठवणींसह तो दिवस संपला.

वीस ऑक्टोबरच्या सकाळी दादाजींचा निरोप घेतला. संस्थेसोबत पुढेही भविष्यात काम करायचं आहे. जसं जमेल तसं परत यायचं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे जे काम इथे बघितलं ते सर्वांपर्यंत न्यायचं आहे. रवीजींनी स्टेशनवर सोडलं. त्यांनीच जम्मूमध्ये रात्री दीड वाजता रिसिव्ह केलं होतं. फक्त पंधरा दिवसांपूर्वी. पण आता तर ही गोष्ट खूप जुनी वाटते. . .
जम्मूतून निघताना मनात अनेक विचार आणि भावनांची दाटी आहे. पहिली गोष्ट म्हणजे कश्मीरमध्ये जे काही बघितले; त्यामध्ये लोक परत स्वत:च्या पायावर उभे राहताना दिसले. अनेक ठिकाणी तर वाटलंच नाही की, इतका विनाशकारी पूर नुकताच येऊन गेला आहे. लोकांमध्ये स्वत:च्या हिमतीवर पुन: उभं‌ राहण्याची हिंमत दिसली. बचाव कार्यात आणि मदतकार्यात खूप काम केलेल्या अनेक कार्यकर्त्यांशी भेट झाली. हिलाल भाई- ज्यांनी अनेकांचे प्राण वाचवले त्यांचे वडील अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. अर्थात् नंतर ते बरे झाले. एकटेच आलेले कित्येक कार्यकर्ते! सेवा बहरतीचं कार्य आणि संस्थेचं 'good conductor' बनणं! दादाजींसारख्या व्यक्तिमत्वाची भेट. आणि असे अनेक. . .

आणि त्या अस्वस्थ करणा-या गोष्टी. पण आता त्या गोष्टींमुळे इतकं जास्त अस्वस्थही वाटत नाही आहे. आधी एकदा उल्लेख केला होता त्याप्रमाणे धर्माचे, राहण्याच्या- वस्तीच्या ठिकाणामुळे होणारे फरक फार वरवरचे असतात. मर्यादित असतात. खरं सत्य माणूस असणं हेच आहे. त्यामुळे अशा वरवरच्या संकुचित फरकांना इतकं महत्त्व देण्याची काहीच गरज नाही. आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे ठोस कारणं आहेत. ज्या काही प्रतिक्रिया आहेत; ज्या भावना आहेत; त्यांच्या मागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. अशा परिस्थितीत आपणही कदाचित असा विचार करू. ते स्वाभाविकच आहे.

थोडं दु:ख ह्या गोष्टीचं नक्की होतं की, माणसाला अजूनही माणूस म्हणून बघितलं जात नाही. त्याच्या लेबल आणि बॅकग्राउंडवरूनच ओळखलं जातं. फक्त माणूस म्हणून बघणारी दृष्टी आणि ती परिपक्वता अजून थोड्याच प्रमाणात आहे. पण जेव्हा ती दृष्टी व ती समज समाजात येईल, तेव्हा परिस्थिती बदलेल. आत्ताची परिस्थिती नक्कीच तशी नाही आहे. अशा वेळेस मिल्खासिंहच्या चित्रपटातला संवाद आठवतो, “इन्सान बुरे नही होते हैं; हालात बुरे होते हैं|” आणि परिस्थिती ठीक करायची असेल तर त्यासाठी आधुनिक दृष्टी आणि समज हवी जी तरुण पिढीकडे नक्कीच दिसते. जशी जशी ही दृष्टी वाढेल, तशी परिस्थिती बदलेल. ह्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. हे जे अंतर आहे, ते चालून कमी करायचं आहे. डॉ. त्रिपाठीजी ह्या कामाच्या प्रारंभिक टप्प्यावर खूप सक्रिय होते. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते- तुम्हांला जे काही करायचं असेल, ते कश्मीरला येऊन करा. फिरायचं असेल, ट्रेकिंग करायचं असेल, पर्यटन करायचं असेल, त्यासाठी कश्मीरला या. हीच गोष्ट देशाच्या अन्य भागांनाही लागू पडते. जम्मू- कश्मीर- लदाख असेल, हिमाचल, उत्तराखण्ड, नॉर्थ ईस्ट, अंदमान किंवा लक्षद्विप असेल, तिथे आपण गेलं पाहिजे आणि त्या भागासोबत नातं ठेवलं पाहिजे. अधिकारांबद्दल म्हणतात ना की जे अधिकार वापरले जात नाहीत ते हळु हळु नष्ट होतात. आणि ही आपली निवड असते. असो.

युवा पिढीची नवीन दृष्टी एक स्वप्न देऊन जाते. जर परिपक्वता अशीच वाढत राहिली तर एक दिवस भारत पाकिस्तानसुद्धा युरोपियन युनियनप्रमाणे जवळ येऊ शकतात. युरोपियन युनियनमध्येही सर्व देश एकमेकांशी असंख्य वेळेस भांडलेले आहेत. आणि त्यांच्यात तर मतभेद व भिन्नता आणखी सूक्ष्म आहे. भारत- पाकिस्तानमध्ये तरी खूप समानता आहे. भाषेचा फरक नसल्यात जमा आहे; संस्कृतीसुद्धा ढोबळ मानाने सारखी आहे. स्ट्रेंथ आणि वीकनेसेससुद्धा एकमेकांसारखेच आहेत. थोडं जरी शहाणपण आलं आणि खरा 'स्वार्थ' कशामध्ये हे कळालं तर हे देश जवळ येऊ शकतात. कारण ते जवळ आहेतच. अजून एक गोष्ट. म्हणतात ना मैत्री आणि वैर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात; प्रेमामध्ये इन्कारसुद्धा असतो! तसंच इथेही आहे. आपण त्याच्याशीच वैर करू शकतो ज्याचे आपण मित्र असतो. त्याच्यासोबतच भांडू शकतो; ज्याच्यासोबत काही नातं असतं. नाही तर अनोळखी व्यक्तीसोबत कोण भांडेल? म्हणून अशा कित्येक गोष्टी सकारात्मक आहेत.


जहाँ दूर नजर दौडाए. . . आज़ाद गगन लहराए. . . लहराए. . .

सर्व आठवणींना जीवंत ठेवून आणि सर्व कार्यकर्त्यांना नमन करून आता हे लेखन थांबवावं लागेल. प्रवासाचा शेवट नावाचा प्रकार जीवनामध्ये नसतो. जीवन तर एका पडावाकडून दुस-या पडावाकडे पुढे जातच राहतं. जीवनाचा प्रवाह थांबत नाही. सर्व कार्यकर्त्यांना प्रणाम करून आणि आपल्यासारख्या सर्व वाचकांना धन्यवाद देऊन लेखणीला तात्पुरता विराम देतो. पुढच्या एखाद्या पडावावर भेटेपर्यंत रामराम, नमस्कार!

सर्व मिपाकरांना खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च नमस्कार!

समाजविचार

प्रतिक्रिया

तुम्हांला खूप खूप धन्यवाद आणि सलाम! तुम्ही तिथे आपल्या देशाच्या एका काहीशा दुरावलेल्या भागात, तिथल्या आपत्तीत सापडलेल्या दुर्दैवी जीवांसाठी जे कार्य केलेय त्याचे मोल एखाद्या प्रतिसादात जोखणे अशक्य आहे. आणि मिपाच्या माध्यमातून ते आम्हां वाचकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी आपला ऋणी आहे.

काश्मीरच्या वस्तुस्थितीबद्दलचे तुमचे आकलन अतिशय समतोल आणि सकारात्मक वाटले. तसेच काही बाबी अजूनपर्यंत माहिती नव्हत्या त्या समजून घेता आल्या. ह्या प्रश्नाची मुळे १९४७ च्या कितीतरी शतके आधी भूतकाळात जातात. आणि त्याचे एकच एक सरधोपट असे उत्तर असू शकत नाही हेही महत्त्वाचे!

पुन्हा एकवार तुम्हांला आणि सेवाभारतीला सलाम करून माझे दोन शब्द संपवतो! आभार आणि हॅट्स ऑफ्!

मार्गी's picture

22 Nov 2014 - 6:10 pm | मार्गी

स्वॅप्स जी, मन:पूर्वक धन्यवाद. आपली प्रतिक्रिया बघून खूप आनंद वाटला. आपण सर्वच जण असं काम कुठे ना कुठे करत असतो आणि पुढेही करत राहूच. धन्यवाद.

स्वॅप्स ह्यांच्याप्रमाणेच म्हणते.

बोका-ए-आझम's picture

22 Nov 2014 - 7:07 pm | बोका-ए-आझम

इथे मोबाईल नेटवर्क सर्च केलं तर दोन नेटवर्क पाकिस्तानचे दिसले. त्यांचे सिग्नलही भरपूर होते. ही छोटीशी गोष्ट एका मोठ्या तथ्याकडे निर्देश करते. आपण डोळे उघडून बघितलं तर दिसतं की, देशातले कित्येक भाग असे आहेत, जिथे देशातल्या लोकांपेक्षा विदेशी लोक जास्त रस घेतात. आणि ही गोष्ट फक्त राजकीय नाही आहे की, कश्मीरमध्ये पाकिस्तानला रस आहे. ही बाब व्यापक आणि सामाजिक आहे. जर आपण आपल्या देशाच्या सर्व भागांशी संबंध ठेवलाच नाही, तर उघड आहे की आपलं त्या ठिकाणासोबत असलेलं नातं हळु हळु तुटत जाईल. जसं नॉर्थ ईस्टचे प्रदेश आहेत. जर आपण तिथे कधी गेलोच नाही; तिथल्या प्रदेशाला, जनतेला, तिथल्या संस्कृतींना समजून घेतलंच नाही, तर नातं तुटतच जाईल. आज देशातले कित्येक भाग असे आहेत की त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची असेल, तर विदेशी प्रवाशांचे विवरण वाचावे लागतात. हिमालयामध्ये आपल्यापेक्षा कदाचित विदेशी लोकच जास्त भ्रमण करतात. हिमालयात असे सुदूर आणि दुर्गम असलेले स्थान आहेत जिथे आपण जाण्याचा विचारही करू शकत नाहीत आणि हे लोक तिथे जातात. जर आपल्याला वाटत असेल की, हे सर्व स्थान आपल्या देशात आहेत आणि पुढेही राहावेत, तर आपल्याला त्या भागाशी जोडून राहावं लागेल. >>>

अप्रतिम निरीक्षण आणि एकदम छान लिखाणाची शैली यामुळे सगळेच भाग खूप आवडले आणि हा जो मुद्दा तुम्ही मांडलेला आहे तो एकदम बरोबर आहे. आपल्याला आपल्या खंडप्राय देशाचीच अजून नीट माहिती नाही. असे लेख लिहून लोकांच्या डोळ्यांत अंजन घातल्याबद्दल खूप धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2014 - 8:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

जो भूभाग भारताचा अविभाज्य भाग आहे असे आपण छाती ठोकत सांगत फिरत असतो त्याबद्दल काडीचाही खराखूरा प्रत्यक्षानुभव नाही ही जाणीव प्रकर्षाने करून देणारी लेखमाला !

याशिवाय, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांची सेवा करण्याच्या तुमच्या प्रयत्नांची आणि ते शक्य करणार्‍या सेवा भारती या संस्थेच्या कार्याची ओळख करून देण्याबद्दल जितके धन्यवाद करावे तेवढे कमीच. तेव्हा दोघांसाठी एक कडक सॅल्युट मान्य करा !

हा नेहमीपेक्षा फार वेगळा अनुभव तुम्हाला आयुष्यभर पुरेल असे एक वेगळेच मानसिक समाधान देणार यात शंका नाही. तो आमच्याबरोबर वाटून घेतल्याबद्दल खास आभार !

बहुगुणी's picture

22 Nov 2014 - 8:35 pm | बहुगुणी

पण योग्य ठिकाणी विराम घेतलेलं असं अतिशय वाचनीय लेखन!

जर आपण आपल्या देशाच्या सर्व भागांशी संबंध ठेवलाच नाही, तर उघड आहे की आपलं त्या ठिकाणासोबत असलेलं नातं हळु हळु तुटत जाईल. हे खूपच मर्मावर बोट ठेवणारं निरीक्षण आहे, संयत पण स्पष्टपणे मांडल्याबद्दल धन्यवाद!

“इन्सान बुरे नही होते हैं; हालात बुरे होते हैं|” आणि परिस्थिती ठीक करायची असेल तर त्यासाठी आधुनिक दृष्टी आणि समज हवी जी तरुण पिढीकडे नक्कीच दिसते. जशी जशी ही दृष्टी वाढेल, तशी परिस्थिती बदलेल. ह्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. हे जे अंतर आहे, ते चालून कमी करायचं आहे.
हा आशावाद प्रचंड आवडला!

लेखांमधली प्रकाशचित्रेही आवडली. दुव्यामधल्या व्हिडिओमध्ये गाणारे तुम्हीच असाल तर तशा ध्वनिमुद्रणांवरही एक लेख येऊ द्या. या संपूर्ण लेखमालेवर आधारित documentary काढली पाहिजे. 'एक अंधेरा, लाख सितारे' हे गाणं शीर्षकगीत म्हणून चपखल बसेल.

एकूणच, प्रवाही आणि माहितीपूर्ण लेखमालेबद्दल मनःपूर्वक आभार.

(अति अवांतरः "मोबाईल नेटवर्क सर्च केलं तर दोन नेटवर्क पाकिस्तानचे दिसले. त्यांचे सिग्नलही भरपूर होते" हे कसं कळलं? म्हणजे फोनवर भारतीय किंवा पाकिस्तानी नेटवर्क्स वेगळे कसे ओळखता येतात?)

मार्गी's picture

23 Nov 2014 - 10:35 am | मार्गी

प्रतिक्रियेबद्दल व सविस्तर वाचल्याबद्दल; फोटो- व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद!! व्हिडिओ बनवण्यात माझा सहभाग नव्हता आणि मोबाईल सिग्नलवर IND/ PK दिसतं. त्यामुळे कळालं. सर्व वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद. :)‌ :) :)

कपिलमुनी's picture

22 Nov 2014 - 10:07 pm | कपिलमुनी

अप्रतिम लेखन आणि काही ठिकाणी अंर्तमुख व्हायला लावणारी लेखमाला

मार्गी's picture

23 Nov 2014 - 10:39 am | मार्गी

"दखल" मध्ये लेखमाला घेतल्याबद्दल सर्व एडमिन- प्रशासकांना मनःपूर्वक धन्यवाद! :)