सीट

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
20 Nov 2014 - 11:35 pm

(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून)

खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार
इवलसं दुःख पिउन टाक
बघ माझी आठवण येते का?

रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे,
पदर सांभाळ, हात दाखव
इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये
तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा
सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, नजरेच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा टॅक्सी मिळेपर्यंत, ती मिळणार नाहीच, ऑफिसला ये
केस सेट करु नकोस, घाम पुसू नकोस, पुन्हा त्याच गॅलरीत ये
आता तो तारेवर बसलेला कावळा बघ
बघ माझी आठवण येते का?

फोनची रिंग वाजेल, फोन घे, बॉसच असेल,
त्याला कोरडच हॅलो म्हण, पुढे तो स्वतःच बोलेल
तो विचारेल तुला तुझ्या उशीरा येण्याचे कारण, तू म्हण ऑफिस छळतय
मग बॉसकडे जा, फाइल घे,
तो उठून जुनाट सोफ्यावर बसेल, तू तशीच उभी रहा,
नवीन सोफ्याची ऑर्डर लिहून घे, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तुझा मुलगा कुशीत येईल, म्हणेल भूक लागली वाढतेस
दोन मिनिट झालच रे सोऩ्या
फोडणीचा कडकडाट होईल, भांड्यांचा दणदणाट होईल
नवराही जेवायला बसेल, त्याने खुर्चीतही घातलेल्या मांडीकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर थकलेल्या हातांनी गजर लावायला विसरु नकोस,
यानंतर नवर्‍याच घोरण नुसत ऐकण्याच प्रयत्न कर,
यानंतर ओट्यावरची सुरी घे, भाजी चिरण्याचा प्रयत्न कर,
सार्‍या दिवसभरात एकदातरी बघ माझी आठवण येते का?

(रोज आपल्या दोन पायांची सीट करणार्‍या असंख्य भगिनींस प्रणाम)

मित्रहो
www.mitraho.wordpress.com

कवितामुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

विडंबन खरंतर गंभीर निघालं! पण आवडलं. आमचाही प्रणाम!

मित्रहो's picture

21 Nov 2014 - 11:17 am | मित्रहो

हो गंभीर आहे पण शेवटी मूळ कवितेवरच बेतलेले आहे. विडंबन म्हणावे की नाही हा प्रश्न वेगळा.

पैसा's picture

21 Nov 2014 - 1:23 pm | पैसा

विडंबन नाही म्हणणार. खूपच समजून आणि गंभीरपणे लिहिले आहे. खरं तर मूळ प्रेमकवितेपेक्षाही आवडले.

मित्रहो's picture

21 Nov 2014 - 4:05 pm | मित्रहो

मूळ कवितेतला नाद, लयबद्धता, मांडणी मला कधी जन्मात नसती सुचली. मी फकत् शब्द बदलले. तेंव्हा मूळ कविता यापेक्षा सुंदरच आहे यात काही शंका नाही.

जेपी's picture

21 Nov 2014 - 1:29 pm | जेपी

आवडल.

आतिवास's picture

21 Nov 2014 - 1:32 pm | आतिवास

अवांतरः जमल्यास मूळ कविताही द्या हो कोणातरी, वाचलीय पण आत्ता पूर्ण आठवत नाही ती!

बरं वाटलं वाचुन.तिच्या कष्टाची जाण कवितेच्या शब्दाशब्दातुन जाणवतेय.आवडलं.

मित्रहो's picture

21 Nov 2014 - 5:18 pm | मित्रहो

धन्यवाद अजया
धन्यवाद आतिवास, जेपी.

कोऽहम्'s picture

24 Nov 2014 - 11:34 am | कोऽहम्

सुंदर जमलीये!!!

वेल्लाभट's picture

24 Nov 2014 - 12:58 pm | वेल्लाभट

दोन पायांची सीट करणा-या प्रत्येकीचं कौतुक, आदर आणि काळजी.
कविता छान.

मित्रहो's picture

24 Nov 2014 - 1:37 pm | मित्रहो

धन्यवाद वेल्लाभट आणि कोऽहम्

नाखु's picture

24 Nov 2014 - 1:52 pm | नाखु

त्रिवार सहमत