छावणी - २

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
20 Nov 2014 - 10:43 am

http://www.misalpav.com/node/29500

*******

३ जून १९४७ !!

या दिवशी दिल्लीहून आकाशवाणीवरुन एक महत्वाची घोषणा केली जाणार होती.

जनाब जिन्हांना अपेक्षीत असलेलं पाकीस्तान मिळणार की नाही? हिंदुस्तान एकसंध राहणार की देशाची फाळणी होणार? फाळणी झालीच तर ती नेमक्या कोणत्या आधारावर? पश्चिमेला पंजाब आणि पूर्वेला बंगाल यांच्यातील नेमका कोणता भाग पाकीस्तानमध्ये जाणार? पाकीस्तान झालंच तर तिथल्या हिंदू आणि शीखांचं काय? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? पाकीस्तान की हिंदुस्तान?

उभ्या हिंदुस्तानातील अनेकांचं भवितव्य या घोषणेवर अवलंबून होतं. पंजाबातील हिंदू, शीख आणि मुसलमान तर ही घोषणा ऐकण्यास कमालीचे आतूर झाले होते. हिंदू आणि शीखांना ही घोषणा तारक अथवा मारक ठरणार होती. फाळणी झाली तर चिनाब नदीचं खोरं ही सीमारेषा धरुन व्हावी अशी बहुतेक शीखांची अपेक्षा होती. या भागातच शीखांची सर्व महत्वाची धर्मस्थळं आणि पूजास्थानं होती. मुसलमानांचा याला अर्थातच विरोध होता, कारण चिनाबच्या खोर्‍याप्रमाणे फाळणी झाल्यास लाहोर आणि गुजरानवाला ही दोन्ही शहरं हिंदुस्तानकडे गेली असती! रावी नदीच्या खोर्‍यातच सीमारेषा व्हावी म्हणून मुसलमान हट्ट धरुन बसले होते.

चौधरी महेंद्रनाथांच्या वाड्यातील भाडेकरुंमध्ये एका शीख कुटुंबाचा समावेश होता. हे कुटुंबं मूळचं अमृतसरचं. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सरदार कर्तारसिंग गुजरानवाला इथे येऊन स्थायिक झाले होते. चौधरींच्या भांड्यांच्या दुकानाच्या शेजारीच त्यांचं सायकलींचं दुकान होतं. कर्तारसिंगांची पत्नी बर्याच वर्षांपूर्वी निवर्तली होती. गुरकिरत हा त्यांचा एकुलता एक मुलगा वडीलांना दुकानात मदत करत होता. आपली पत्नी जसविंदर आणि चार वर्षांचा मुलगा सतनाम यांच्यासह आपल्या वडिलांबरोबर तो चौधरींच्या वाड्यात राहत होता.

दुसरं बिर्‍हाड होतं ते रुक्सानाबानूचं. रुक्सनाबानू मूळची काश्मिरमधील श्रीनगरची. मोठी कुर्रेबाज आणि हिकमती बाई! अगदी तरुण वयात असताना ती चमनलाल बरोबर गुजरानवाला इथे आली होती. चमनलाल तिला कुठे आणि कसा भेटला होता कोणास ठाऊक. त्याचं यथातथा चालणारं उपहारगृह तिने आपल्या ताब्यात घेतलं आणि अल्पावधीतच ते अत्यंत यशस्वीपणे चालू लागलं होतं! अवघ्या दोन वर्षात ती गुजरानवाला इथल्या दोन मोठ्या उपहारगृहांची मालकीण बनली होती! रुक्सानाने सगळा धंदा हातात घेतल्यावर चमनलालने आपलं अंग त्यातून काढून घेतलं! दिवसभर तो घरात पडून राहू लागला.

सुखदेव हा रुक्सानाने दत्तक घेतलेला मुलगा. प्रचंड लाडावलेला आणि त्यामुळे वाया गेलेला. दिवसभर मित्रांच्या टोळक्यात गावभर उंडारत रहावं हा त्याचा रोजचा कार्यक्रम. विडी-सिगरेट, दारु असं कोणतंही व्यसन त्याला वर्ज्य नव्हतं. आपल्या मुलाचे हे प्रताप रुक्सानाबानूला ठाऊक होते, पण तिने त्याच्याकडे सोईस्करपणे काणाडोळा केला होता. दोन्ही उपहारगृह व्यवस्थित चालत असल्याने त्याला काही कामधंदा करण्याचीही आवश्यकता नव्हती. लग्नं झाल्यावर तरी तो सुधारेल आणि त्याला जबाबदारीची जाणिव होईल या आशेने रुक्सानाबानूने त्याचं लग्नं करुन दिलं होतं, पण सुखदेवमध्ये काडीचा फरक पडला नव्हता. त्याला थोडाफार धाक होता तो चौधरींचाच!

सुखदेवची पत्नी चंदा मात्रं अतिशय सालस आणि गुणी होती. घरातलं सगळं काम सांभाळून आपल्या सासूला ती हॉटेलच्या कामात शक्यं ती सर्व मदत करत असे. आपल्या नवर्‍याने सुधारावं, नीट कामधंदा सांभाळावा म्हणून ती वेळोवेळी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे. ती मूळची चौधरींच्या गावच्या मोठ्या जमिनदार घराण्यातली होती. तिचं इंग्रजी शाळेत पाच-सहा वर्ष शिक्षण झालं होतं दुष्काळामुळे आलेल्या विपन्नावस्थेमुळे तिच्या पदरी सुखदेवसारखा आळशी आणि उनाड नवरा आला होता. रुक्सानाबानूचा मात्रं आपल्या सुनेवर खूप जीव होता. कोणताही महत्वाचा निर्णय घेताना ती सुनेचा विचार घेत असे.

वाड्यातील तिसरं बिर्‍हाड होतं ते एका डॉक्टरांचं. डॉ. सेन हे मूळचे बंगालचे. आपल्या पत्नीसह गेल्या पाच वर्षांपासून ते वाड्यात राहत होते. वाड्यापासून हाकेच्या अंतरावर त्यांचा दवाखाना होता. डॉक्टरांचा बहुतेक वेळ आपल्या दवाखान्यातच जात असे. डॉक्टरांची पत्नी चारुलता, चंदा आणि जसविंदर एकाच वयोगटातल्या असल्याने त्यांची घनिष्ट मैत्री होती.

चौधरी महेंद्रनाथ दुपारीच आपली दोन्ही दुकानं बंद करुन घरी आले होते. आकाशवाणीवरुन होणार्‍या घोषणेची त्यांनाही उत्सुकता होतीच. आपलं जेवण आटपून ते रेडीओसमोर बसले होते. सरिता कमलादेवींच्या शेजारी बसली होती. सरदार कर्तारसिंग आणि गुरकीरत, चंदा आणि चारुलता सेन या दोघीही तिथे होत्या. सर्वांचेच कान दिल्लीच्या घोषणेकडे लागले होते.

आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन निवेदकाचा आवाज उमटला.
"शांतता! दक्ष रहा!"

सुरवातीच्या निवेदनानंतर हिंदुस्तानचे शेवटेचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांचं भाषण सुरू झालं. वाटाघाटींचा सारा इतिहास थोडक्यात वर्णन करुन माऊंटबॅटन म्हणाले,
"हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मियांच्या दरम्यान योग्य ते सामंजस्य आणि सौहार्द टिकून राहील्यास हिंदुस्तान अखंड राहील अशी माझी अपेक्षा होती. तो तोडगा सर्वोत्कृष्ट ठरला असता. परंतु दुर्दैवाने तसं झालेलं नाही! हिंदुस्तान एकसंध राहवा याबद्दल त्रिमंत्री मंडळाची अथवा इतर कोणतीही योजना मुस्लीम लीगला मान्य झालेली नाही. मुस्लीम लीगने हिंदुस्तानच्या फाळणीचीच मागणी केली! जर फाळणी होणार असेल तर ती सर्वच प्रांतांची व्हावी असं काँग्रेसचं मत पडलं. व्यक्तिशः माझा अखंड हिंदुस्तानच्या आणि सर्वच प्रांतांच्या फाळणीला विरोध होता. परंतु प्राप्त परिस्थितीत कोणताही दुसरा मार्ग न उरल्याने हिंदुस्तानची फाळणी होणं आता अपरिहार्य आहे! पंजाब, बंगाल आणि आसाम या प्रदेशांतील लोकांचं मत विचारात घेऊन कोणता प्रांत मुस्लीम बहुसंख्येचा आणि कोणता हिंदू बहुसंख्येचा हे ठरवण्यात येईल. परंतु अंतिम सीमारेषा ही रॅडक्लीफ कमिटीने आखलेल्या योजनेनुसारच ठरवली जाईल. आतापर्यंतच्या इतर कोणत्याही योजनेप्रमाणे ही योजनाही काटेकोर आणि परिपूर्ण नाही, परंतु आहे त्या परिस्थितीत इतकंच करणं सध्या सरकारच्या हाती आहे! शक्यं तितक्या लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने सत्तांतर करण्याची ब्रिटीश सरकारची मनिषा आहे!"

माऊंटबॅटनच्या भाषणानंतर पं. जवाहरलाल नेहरुंचा आवाज सर्वांच्या कानी आला,
"ब्रिटीश सरकारच्या या घोषणेप्रमाणे हिंदुस्तानचा काही भाग आता विभक्त होत आहे. वैयक्तीकरित्या मला हे मंजूर नसले तरी प्राप्त परिस्थितीत याला मान्यता देण्याव्यतिरीक्त दुसरा कोणताही पर्याय काँग्रेसपुढे नाही! स्वतंत्र आणि एकसंध हिंदुस्तान निर्माण व्हावा या अपेक्षेने आजवर आपण लढा देत आलो, परंतु बळजबरीने आणि सक्तीने हिंदुस्तानचं स्वातंत्र्य आणि अखंडत्व टिकवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. संपूर्ण स्वातंत्र्याच्या आणि प्रगतीच्या दिशेने हे आपलं पहिलं पाऊल ठरेल अशी मला आशा आहे!"

त्यानंतर महंमदअली जिन्हांचा आवाज ऐकू येऊ लागला,
"ब्रिटीश सरकारच्या या योजनेमुळे मुस्लीम लीगची मागणी पूर्णपणे पुरी झालेली नसली तरी सध्याच्या परिस्थितीत ही योजना आम्हांला मान्यं आहे, ब्रिटीश सरकारचा मी मनापासून आभारी आहे. वायव्य सरहद्द प्रांतात सुरु असलेलं आंदोलन लीगच्या कार्यकर्त्यांनी आता मागे घ्यावं असं मी आवाहन करतो आहे. आजचा हा दिवस पाकीस्तानच्या भविष्यातील महत्वाचा दिवस म्हणून गणला जाईल!"

ठो! ठो! ठो! धडाड् धुम! धडाड् धुम!

आकाशवाणीवरील घोषणा पूर्ण होते ना होते तोच चारही बाजूने जोरजोरात आवाज येऊ लागले! चौधरींच्या वाड्यच्या आजूबाजूचे बरेचसे मुसलमान रस्त्यावर येऊन मोठ्याने आरोळ्या ठोकू लागले! आनंदाचा जल्लोष सुरु झाला! भर रस्त्यात नाचगाण्यांना उत आला! नाचगाणी कसली.... धांगडधिंगाच! धुमाकूळ होता तो! फटाक्यांच्या लडीच्या लडी फुटू लागल्या. आकाशात बाण सुटत होते. रोषणाईच्या फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली! हा आसुरी आनंद होता. हिंदुस्तानच्या छाताडावर बसून वेगळा पाकीस्तान घेतल्याचा आनंद! पाकीस्तानचं स्वप्नं अखेर पूर्ण झालं होतं! त्यांचे हात आस्मानाला पोहोचले होते.

चौधरींच्या घरात जमलेले सर्वजण ही घोषणा ऐकून सुन्न झालेले होते. काय बोलावं हे कोणालाच कळत नव्हतं. चौधरी महेंद्रनाथ, सरिता, चंदा आणि चारुलता यांनाच त्या घोषणेचा अर्थ बरोबर समजला होता. कर्तारसिंग आणि गुरकीरत पार गोंधळून गेले होते. कमलादेवी आणि जसवीर यांना भाषणंच कळली नव्हती. चंदापाठोपाठ तिथे आलेल्या सुखदेवला तर त्या घटनेच्या गांभिर्याची कल्पनाही आली नव्हती!

"पाकीस्तान तो हुआ! अब क्या होगा पापाजी?" गुरकिरतने कर्तारसिंगांना विचारलं.
"पता नही बेटा! आगे क्या होगा कुछ पता नही!"
"पिताजी," सरितेने विचारलं "ही घोषणा ऐकून तुम्हांला काय वाटतं?" .
"बेटी, कर्तारभाई म्हणाले तसं पुढे काय होईल याची खरच कल्पना येत नाही मला सुद्धा! रस्त्यावरची ही नाचगाणी आणि धांगडधिंगा पाहता हे शहर पाकीस्तानच्या ताब्यात जाणार हे नक्की!"
"चाचाजी, आपलं शहर पाकीस्तानात गेलं तर आपल्या लोकांच काय होणार?" चारुलताने प्रश्न केला,
"जे नशिबात असेल ते होईल चारु बेटी! पण माझा असा अंदाज आहे, आपण वर्षानुवर्षे इथे राहतोय, हे सगळे मुसलमान आपल्याला एका जमान्यापासून ओळखतात. आपल्याला ते सहानुभूतीने आणि माणूसकीनेच वागवतील!"
"आणि ते तसं वागले नाहीत तर?" जसवीरने मध्येच प्रश्न केला, "आपल्याला त्यांनी इथून हाकलून लावलं तर? आपण कुठे जायचं? कसं जायचं? काय करायचं?"
"ओये, तू क्यों चिंता कर रही है पुत्तर? जब तक कर्तारसिंग जिंदा है तैणू फिकर करणेकी जरूरत नही!"

चौधरी उठून आपल्या घरात निघून गेले. देवघरात ठेवलेली भग्वदगीता काढून त्यांनी पठणास प्रारंभ केला. मंडळी आपापल्या बिर्‍हाडाकडे पांगली. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे याची चिंता प्रत्येकाला सतावत होती.

केशवराव पटवर्धनांनी कचेरीतील एका स्नेह्याच्या घरी आकाशवाणीवरील घोषणा ऐकली. घरी परतत असताना रस्त्यात सुरु असलेला जल्लोष पाहून नाही म्हटलं तरी ते चरकलेच होते. भर रस्त्यात लोक नाचत होते. गात होते. मोठमोठ्याने घोषणा देत होते. या घोषणा कसल्या होत्या? पाकीस्तानच्या विजयाचे नारे लावले जात होते. जिन्हासाहेबांचा जयजयकार सुरु होता! काँग्रेस पुढार्‍यांच्या नावाने अर्वाच्च शिवीगाळ सुरु होती! लोक बेभान झाले होते. रस्त्यात नुसता तमाशा सुरु होता. काही जणांनी भर रस्त्यावर नमाज अदा करण्यास सुरवात केली होती! धार्मिक उन्माद शिगेला पोहोचला होता!

विमनस्कं मनाने केशवराव घरी आले. खुर्चीत बसल्याबसल्या त्यांनी पत्नीने आणून दिलेला पाण्याचा तांब्या तोंडाला लावला.

"अहो, बाहेर एवढी कसली गडबड चालली आहे?" केशवरवांच्या पत्नीने, मालतीबाईंनी चौकशी केली.
"रेडीओवर घोषणा झाली. पाकीस्तान झाल्याची!"
"अरे देवा!" मालतीबाईंनी कपाळाला हात लावला, "आता हो काय होणार?"
"जे होईल ते बघायचं! आपल्या हाती दुसरं काय आहे?"

त्याचवेळी आदित्य आत आला.

"नाना, अखेर पाकीस्तान झालंच!" आदित्यचा संताप शब्दात मावत नव्हता, "शहरात सगळीकडे नुसता हैदोस सुरु आहे मुसलमानांचा. त्यांचे हात जणूकाही स्वर्गाला लागले आहेत!"
"अहो, आता आपलं काय होणार? हे लोक आपल्याला इथून हाकलून तर लावणार नाहीत?"
"ते आताच कसं सांगता येईल? गेल्या कित्येक वर्षांपासून आपण या मुलुखात राहत आहोत. अनेक मुसलमानांशी आपले चांगले संबंध आहेत. आदित्याचे अनेक मित्रं मुसलमान आहेत, तशाच रजनीच्या मैत्रिणीही. माझे कचेरीतील कित्येक सहकारी मुस्लीम आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांना हे पाकीस्तानचं खूळ पटलेलं नाही. मला खात्री आहे हा सुरवातीचा जोश उतरल्यावर सगळं स्थिरस्थावर होईल हळूहळू! मुसलमान आपल्याला बरोबरीनेच वागवतील!"
"नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने तुम्ही म्हणता ते बरोबर आहे नाना!" आदित्य म्हणाला, "पण एकदा माणूस धर्मांध झाला की त्याला सारासार विचार राहत नाही. उद्या इथले मुसलमान हिंदू आणि शीखांची कत्तल उडवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत!"
"मुसलमान बेभान झाले तर केवळ कत्तली करुनच थांबतील? हिंदू आणि शीखांच्या बायका-मुलींचं अपहरण करतील. अब्रूचे धिंडवडे काढतील आणि जनानखान्यात टाकतील!" रजनी उद्गारली.
"खरं आहे तू म्हणतेस ते!" आदित्यने तिला दुजोरा दिला, "नाना, इथून जाण्याची वेळ आलीच तर आपण काय करायचं? कुठे जायचं?"

केशवराव काही वेळ शांत बसून होते. मग ते म्ह्णाले,
"पुढे काय होईल याचा विचार केला पाहीजे खरा. आपल्याला इथून जावं लागेल असं मला वाटत नसलं तरीही तशी वेळ आलीच तर मुंबईला जाऊ आपण तुमच्या वामनकाकाकडे!"

रुक्सानाबानू वाड्यात पोहोचली तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेलेले होते. वाड्यावर येताना तिला वाटेत रस्त्यात सुरु असलेला जल्लोष दिसला होता. उपहारगृहात आलेल्या लोकांच्या उत्तेजित आवाजातल्या चर्चेवरुन काहीतरी महत्वाची घटना घडली असावी इतकीच तिला कल्पना आली होती. पण नेमका काय प्रकार असावा याची तिला काहीच कल्पना नव्हती.

आपल्या घराकडे न जाता ती जिना चढून वर चौधरींच्या घरी आली. चौधरींना ती आपला बडा भाई मानत असे. आपल्या उपहारगृहासंदर्भात किंवा इतर महत्वाच्या आर्थिक व्यवहारात ती फकतं चौधरींचाच सल्ला घेत असे. चंदा शहाणी आणि चतुर आहे याची तिला कल्पना होती, पण आर्थिक व्यवहारांपासून तिने धोरणीपणे सुनेला दूर ठेवलं होतं.

"महेंदर भाई, हा सगळा हल्लागुल्ला किस वास्ते शुरु आहे?"
"रुक्सानाबहेन, आताच सरकारने जाहीर केलं की मुस्लीमांना पाकीस्तान देण्यात येणार आहे! त्यासाठी हिंदुस्तानची फाळणी करणार आहेत!"
"याने के हिंदुस्तानका एक इलाखा पाकीस्तान होगा?"
"हां जी!"
"पर इतना शोरगुल किस वास्ते?"
"आपलं हे शहर पाकीस्तानात राहणार आहे म्हणून!"
"मग आपण या पाकीस्तानात राहयचं?"
"त्यांनी सुखाने राहू दिलं तर!"
"मतलब?"
"बहेन, पाकीस्तान झाल्यावर हिंदू आणि शीखांना इथले मुसलमान पूर्वीप्रमाणे सुखात राहू देतील काय?"
"पण भाईजी, आपलं घरदार, मालमता सगळं इथेच आहे! जमानेभरसे हम यहां रह रहे है. हमें कौन निकालेगा यहां से?"
"राहू दिलं तर ठीकच आहे! पण आपल्याला इथून हाकलून लावलं तर?"
"या खुदा! फिर क्या करेंगे?"

महेंद्रनाथ काही बोलणार इतक्यात कमलादेवी चेष्टेने म्हणाल्या,

"आप क्यों परेशान हो रही हो रुक्सानाबहेन? आप तो मुसलमान हो, आपको कुछ तकलीफ नही होगी!"
"क्या बात कर रही हो कमलाभाभी! मै तो बस नाम के वास्ते मुसलमान हूं! तुम तो सब जानती हो! सारी उमर आपके साथ गुजरी है मेरी! अब इस वक्त तो मुसलमान कहकर अलग मत करो!"

कमलादेवी काहीच बोलल्या नाहीत. रुक्सानाबानूचं म्हणणं त्यांना पटत होतं. जन्माने मुसलमान असलेल्या या बाईची काश्मिरच्या वैष्णोदेवीवर अपार श्रद्धा होती. दर दोन-तीन वर्षांनी ती वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असे.

"आपल्या नशिबात काय आहे ते एक त्या श्रीकृष्णालाच ठाऊक बहेन! उसकी मर्जीके आगे हम कुछ नही कर सकते!"

आदित्यच्या डोळ्यासमोर पाकीस्तानच्या मूळ संकल्पनेचा इतिहास तरळत होता. १९३३ मध्ये ही संकल्पना प्रथम मांडली होती ती केंब्रिज विद्यापीठात शिकणार्‍या एका मुस्लिम विद्यार्थ्याने...

रहमत अली!

हंबरस्टॉन रोडवरील आपल्या कॉटेजमध्ये बसून रहमत अलीने ही कल्पना अवघ्या चार पानांवर टाईप केली होती! ही एक अत्यंत जहाल आणि स्फोटक योजना होती -

हिंदुस्तान हे एक राष्ट्र असून या राष्ट्रावर मुसलमानांचाच अधिकार आहे! वायव्य सरहद्द प्रांत तर मुसलमानांचाच आहे! त्याच्या जोडीला पंजाब, काश्मिर, सिंध आणि बलुचीस्तान यावरही मुसलमानांचाच हक्क आहे! मुसलमानांचं नवीन राष्ट्र या सार्‍या प्रदेशांचा समावेश करुन आकाराला आणण्यात यावे! या राष्ट्रातील रहिवासी हे केवळ मुस्लीम असतील. इतर धर्मीयांना यात कोणतंही स्थान राहणार नाही! हिंदू राष्ट्रीयत्वाच्या क्रूसावर मुसलमानांनी बळी जाण्यात काहीच अर्थ नाही!

२८ जानेवारी १९३३ या दिवशी रहमत अलीने आपली ही कल्पना मुस्लीम समाजापुढे प्रथम मांडली. त्यानेच या नवीन राष्ट्राला नाव सुचवलं होतं.

पाकीस्तान!

रहमत अलीने पेरलेल्या पाकीस्तानचं विषारी बीजच पेरलं होतं! या बीजाचं आता बांङगुळात रुपांतर झालं होतं आणि हिंदुस्तानच्या मुळावर आलं होतं! पाकीस्तानच्या निर्मीतीसाठी अखंड हिंदुस्तानचा लचका तोडला जाणार होता!

रहमत अलीची पाकीस्तानची ही योजना मुस्लीम लीगने ताबडतोब उचलून धरली. बॅ. जिन्हांनी इंग्रज सरकारला आणि काँग्रेसच्या पुढार्‍यांना आपलं सामर्थ्य दाखवून देण्यासाठी १६ ऑगस्ट १९४६ ला डायरेक्ट अ‍ॅक्शन डे पुकारला आणि कलकत्याचे रस्ते निरपराध्यांच्या रक्ताने रंगून निघाले!

दुसर्‍या महायुद्धात विजयश्रीने माळ घातली तरी ब्रिटीश साम्राज्य खिळखिळं झालं होतं, हिंदुस्तानचा स्वातंत्र्यलढा अधिक काळ दाबून ठेवता येणार नाही याची ब्रिटीश राज्यकर्त्यांना कल्पना आली होती. त्यातच भारतीय राजकारण्यांविषयी विशेषतः गांधीजींविषयी कमालीचा आकस बाळगणार्‍या विन्स्टन चर्चीलचा निवडणूकीत पराभव झाला होता. क्लेमंट अ‍ॅटली पंतप्रधान झाले होते. हिंदुस्तानला स्वातंत्र्य द्यावंच लागेल याची ब्रिटीश राज्यकर्त्यांना कल्पना येऊन चुकली होती.

अशा परिस्थितीत हिंदुस्तानचे शेवटचा गव्हर्नर म्हणून राजघराण्यातील एका शाही नौदल अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली..

लुई फ्रान्सिस निकोलस माऊंट्बॅटन!

आजपर्यंत फोडा आणि राज्य करा या आपल्या तत्वानुसार ब्रिटीशांचा कारभार सुरु होता. हिंदू आणि मुसलमानांच्यात द्वेषाचं बीज रोवण्यात इंग्रजांना यश मिळालं होतं. परंतु आता हिंदुस्तानला स्वातंत्र्य देण्याची वेळ आल्यावर आपले उद्योग निस्तरणं त्यांना भाग होतं. याच कामगिरीवर माऊंटबॅटनची नेमणूक झाली होती.

माऊंटबॅटननी पंतप्रधान अ‍ॅटलींपुढे दोन अटी ठेवल्या -

पहिली अट म्हणजे हिंदुस्तानला नेमकं कोणत्या तारखेला स्वातंत्र्य देणार याची तारीख घोषीत करावी! तारीख घोषीत केल्यावरच हिंदु आणि मुस्लीम पुढार्‍यांना वेळेचं महत्वं कळू शकेल आणि फाळणीबाबत वाटाघाटी करणं आपल्याला सुलभ होईल असा माऊंटबॅटनचा युक्तीवाद होता.

दुसरी अट मात्रं फार भारी होती.
ब्रिटीश राजसत्तेचा पसारा आवरण्याच्या कामी आपल्या कोणत्याही निर्णयात लंडन इथून हस्तक्षेप केला जाऊ नये! कोणत्याही निर्णयात ब्रिटीश पार्लमेंटचा हस्तक्षेप असू नये!

थोडक्यात माऊंटबॅटननी राजाचे सर्वाधिकारच मागितले होते!

पंतप्रधान अ‍ॅटलींनी हिरवा झेंडा दाखवल्यावर माऊंटबॅटननी इंग्लंडचा राजा सहावा जॉर्ज याची भेट घेऊन आपली योजना त्याच्या कानावर घातली. राजा जॉर्ज हा माऊंटबॅटनचा भाऊच! त्याने या योजनेला संपूर्ण पाठिंबा दिला. वाटाघाटींचे सर्वाधिकार घेऊनच माऊंटबॅटन दिल्लीत आले होते.

पंजाबातील हिंदू आणि शीखांसमोर आपल्या भविष्याची चिंता उभी राहीली होती. अनेक वर्षांपासून, काहीतर पिढ्यान पिढ्या पंजाबात सुखासमाधानाने राहीलेले होते. कित्येकांचे इथल्या मुस्लीमांशी घनिष्ट कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. एकमेकाच्या अडी-अडचणीला हीच माणसं धावून गेली होती. परंतु आता सगळीच परिस्थिती बदलली होती. माणसा-माणसातील विश्वास आणि माणुसकीपेक्षा धर्म हा सर्वात महत्वाचा ठरला होता!

पाकीस्तान झाल्यावर पंजाबातले हिंदू आणि शीख निराधार ठरणार होते. धर्मांध माथेफिरु त्यांना पाकिस्तानात पूर्वीप्रमाणे सुखासमाधानात राहू देणं शक्यंच नव्हतं. त्यांच्या दृष्टीने मुसलमान नसलेला प्रत्येकजण काफीर होता. या काफरांना हिंदुस्तानात हाकलून द्या अशी कोणीतरी हाक देण्याचा अवकाशच होता. एखादी क्षुल्लकशी घटनाही भयंकर विस्फोटाला कारणीभूत ठरणार होती. धर्माच्या नावावर माणूस बहकला की त्याचा सैतान होतो आणि मग माणूसकीला शरमेने मान खाली घालावी लागते!

हिंदुस्तान आता फाळणीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता!

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

20 Nov 2014 - 3:04 pm | कवितानागेश

भयानक इतिहास.......

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2014 - 3:32 pm | टवाळ कार्टा

मलाच एकट्याला "गदर" "वाचतोय" असे वाटतेय??? :(

कपिलमुनी's picture

20 Nov 2014 - 4:48 pm | कपिलमुनी

गदर ची आठवण येत आहेच.

कथा छान पकड घेत आहे .. पुभाप्र

वाचतेय.कल्पना येतेय पुढे काय भीषण वाचावे लागणार आहे.काळाकुट्ट इतिहास या दिवसातला,बरेच दिवसात वाचण्यात आला नव्हता.पुभाप्र.

सस्नेह's picture

20 Nov 2014 - 6:23 pm | सस्नेह

प्रभावी मांडणी अन अभ्यासपूर्ण लेखन
पुभाप्र

बोका-ए-आझम's picture

20 Nov 2014 - 6:59 pm | बोका-ए-आझम

स्पार्टेशअण्णा, कथेची मांडणी छान केली आहे. पुभाप्र!

असेच लिहा स्पार्टकस.

किसन शिंदे's picture

21 Nov 2014 - 11:08 pm | किसन शिंदे

जबरदस्त आहे कथेची मांडणी. अभ्यासपूर्ण लेखन आणि ओघवता वेग यामुळे ही कथा चांगली पकड घेते आहे, तेव्हा लवकरात लवकर पुढील भाग टाकाच.

वॉल्टर व्हाईट's picture

22 Nov 2014 - 2:57 am | वॉल्टर व्हाईट

चित्रपट पहातांना उत्कंठा शिगेला पोचावी अन जाहिराती लागाव्यात असे झाले. पुढचा भाग कधी येतोय ?

पैसा's picture

23 Nov 2014 - 8:49 pm | पैसा

माहीत असलेला पुस्तकात लिहिलेला इतिहास आणि जिवंत माणसांच्या कहाणीतून सांगितलेला इतिहास यातला फरक अनुभवते आहे.