मी, ग्रेस आणि दहा रुपये
काय ? ग्रेसच्या कवितेसारखेच दुर्बोध वाटते की नाही ? आता ग्रेस म्हटले की दुर्बोधता आलीच. म्हणजे ग्रेसच्या आधीही मर्ढेकरांनी आपला क्लेम लावला होता पण त्यांचे "पिंपातले ओले उंदीर" आम्ही समीक्षकांच्या मदतीने केंव्हाच समजावून घेतले होते (पचविले म्हणणार होतो पण ओले उंदीर व पचवणे एकत्र आणण्याइतके सत्यकथेचे लेखक नव्हतो ना ! ते जावू दे, सांगत काय होतो
४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कंपनीत नोकरीला होतो व कंपनीच्या गाडीतून फॅक्टरीत जात येत होतो. दिवाळीच्या आधी प्रत्येक जण एकेक दिवाळी अंक खरेदी करावयाचा व मग गाडीत त्याची अदलाबदल व्हावयाची. मी सत्यकथा घेत असे. (तो पर्यंत कवितांची गोडी लागलेली होती व त्यामुळे तीस-चाळीस कवितासंग्रह घरी होते महानोरांच्या "रानातील कविता " बरोबर ग्रेसचा " संध्याकाळच्या कविता" ही सुखेनैव नांदत होता. अर्थात त्यात तरतम होतेच. वसंत-मंगेश यांच्या पंगतीत महानोरांनी आपला पाट टाकला होता. कुणाच्या २५ तर कुणाच्या २० कविता पाठ एवढाच फरक. ग्रेस मात्र कधीच तेथे आपले पळीपंचपात्र टाकू शकले नाहीत. म्हणजे माझ्याकडून कमी प्रयत्न झाला असे नव्हे. निष्ठेने सत्यकथा वाचणारा "कविता" समजावून घेण्याचा प्रयत्न कर
णारच. त्या मुळे मर्ढेकर जसे कुलकर्ण्यांनी (अलिकडे वा.ल. टाका वा द.भि., काय फरक पडतो ?). समजावून सांगितले तसे ग्रेसही कोणी तरी सांगेल अशा अपेक्षेने वाचत राहिलो. पण खरे म्हणजे कोरडाच राहिलो.) हां, तर सत्यकथेच्या अंकात ग्रेसच्या कवितांवर एक टीकालेख होता. दोनदा वाचूनही काहीच कळले नाही. कविता व समीक्षा, दोन्हीही. वैताग आला. मग विचार केला, " आपण एकटेच का त्रास करून घेतो ? इतरांनाही सहभागी करून घ्यावे. " दुसरे दिवशी गाडीत सांगितले " हा ७-८ पानांचा लेख, जो कोणी संपूर्ण वाचेल, त्याला १० रुपये देईन. कळला पाहिजे असे नाही, फक्त पहिल्या पासून शेवट पर्यंत वाचला पाहिजे." बस. त्या वेळी १० रुपये ही मोठी रक्कम होती. दोघा-तिचांच्या हॉटेलचे बील सह्ज भागायचे. लोकांनी " मी पहिला " म्हणत अंक घेतला. पण मित्र हो, एकानेही १० रुपये मागितले नाहीत ! ग्रेस, त्याची कविता, कविता कळली, आवडली म्हणणारे वाचक व टीकाकार,,,,, सर्वच जिंदावाद ! (अर्थात मी, व माझे मित्र मुर्दाबाद )
काही वर्षे गेली. "चंद्रमाधवीच्या देशात " (हा ही ग्रेसचा एक संग्रह) विकत घेतला होता. त्यातल्या काही कविता कळल्या (सगळ्या कळल्या म्हणण्या इतका मूर्ख नव्हतो) या आनंदात होतो..पण हा आनंदही फार दिवस टिकणार नव्हता. मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला होता, त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नव्हता. मी चक्क ६० रुपये रोख मोजून जयंत परां जपे यांचे "ग्रेस आणि दुर्बोधता" हे पुस्तक विकत घेतले. १० रुपयांचे गाजर दाखवूनही कोणी ८ पानांचा लेख वाचत नाही हे माहीत असतांना २४६ पानांचे पुस्तक घेण्याची काय गरज होती ? साठ रुपयांचे सोडा पण आपल्याला "५-६ कविता कळल्या" हा आनंद गमावण्याची बला कशाला घेतली ? तेव्हा ह्या माणसाचे नावही माहीत नव्हते. म्हटले ’चला, आपल्यासारखाच कविताप्रेमी असेल, थोडेफार समजावून सांगेल" पण हे परांजपे तर समस्त कुलकर्णी (पक्षी टीकाकार) परिवाराचे गुर्जीच निघाले.
आता बघा, ग्रेसचे "ती गेली तेव्हा रिमज़िम पाउस निनादत होता " ते ग्रेसचे एक "लॅंडमार्क" गीत आहे हे गीत तसे पॉप्युलर म्हणावयास हरकत नाही. निवडुंग सिनेमात हृदयनाथ यांनी गायले म्हणूनही असेल ! पोरटोरही टी.व्ही. वर गातात. (पाठ्यपुस्तकातही लागले आहे म्हणे) तर काय आहे.... सिनेमात एकुण पाच कडव्यातली दोन गाळूनच टाकली आहेत. तशी ही यांची जूनी सवय. ज्ञानेश्वरीतील ओव्या गाळतांना यांना काही खंत वाटली नाही. इथे तर ही मित्राचीच कविता. त्यामुळे झाले काय "गेली" याचा अर्थ "वारली" असा घेऊन सगळ्यांनी ग्रेस कळला असा आनंद व्यक्त केला. आता सर्व कविता पहा.
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता
सिनेमात यातले २ रे व ५ वे कडवे गाळले आहे. आता दुसरे कडवे कवितेत ठेवा. चार कडव्यांची एकसंघ कविता होते व "वारली" हा अर्थ घेऊनही अर्थ जुळवता येतो. मीही त्या आनंदात होतो. पाचवे कडवे संपूर्णत: अनाकलनीय होते. दुर्गाबाईंचे "व्यासपर्व" चांगल्यापैकी वाचनात असल्याने द्रौपदी-कृष्ण यांच्यातील भ्रातृभावा पलिकडील एका अनोख्या भावसंबंधा विषयी दूर्गाबाईंना सुचित करावयाचा अर्थ माहीत होता. पण कवितेशी सांधा जुळवण्यास तो पुरेसा नव्हता. गुरुवर्य जयंतरावजी आले व त्यांनी आपल्याला एका कवितेचा (मोठा भाग तरी) अर्थ लागला या आनंदावर एक भली मोठ्ठी फुली मारली इतकेच नव्हे तर आपण जाणीवपूर्वक कविता वाचतो या फुग्याला टाचणी लावली
प्रथम त्यांनी "गेली" म्हनजे "वारली" हा अर्थच बाद केला. गेली म्हणजे घराबाहेर गेली असा सरळ अर्थ लावून त्यांनी संपूर्ण कविता उलगडवून दाखविली आहे. ग्रेसच्या समग्र कवितांमध्ये "आई" कशी येते त्याची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी आपली मते मांडली आहेत. हा सगळा भाग येथे देणे शक्य नसल्याने आपण थोडक्यात त्यांच्या विचाराची दिशा पाहू.
(१) फ़्राईडचा मदर फ़िक्सेशनचा सिद्धांत
(२) ग्रेसची ’आई"विषयी संकल्पना.
(३) कवितांमध्ये दिसणारे आईचे स्वैर वर्तन
(४) तिचे बाहेर जाण्यासंबंचीचे क्लेषकारक उल्लेख
(५) स्त्री" संबंधी ग्रेसची विचारसरणी
(६) कवितेतील लैंगीक उल्लेख
(७) आई संध्याकाळी घरी नसल्यामुळे वात्सल्यात कमतरता
(८) निरनिराळ्या टीकाकारांची या संबंधीची मते इत्यादि
मग ५ व्या कडव्याचा संबंध जुळवणे सोपे होते.
हुश्य...खरे सांगू ? मी ग्रेस वाचणेच बंद केले. चंद्रमाधवीच्या देशांत मित्राने नेले व परत केले नाही, मी त्याला धन्यवादच दिले.
परत एकदा, ग्रेस, ग्रेसच्या कविता, कविता वाचणारे, त्या समजल्या म्हणणारे "मेरा सलाम "
शरद
प्रतिक्रिया
8 Oct 2014 - 4:45 pm | समीरसूर
खूप छान लेख! आवडला. एक कविता समजून घेण्यासाठी इतका खटाटोप!! एवढ्या प्रयत्नात एमबीए डिग्री मिळाली असती एखाद्याला. :-)
जे इतके दुर्बोध असेल ते केवळ दुर्बोध आहे म्हणून चांगले आहे असेच बहुधा बर्याच दुर्बोध कलाकृतींच्या बाबतीत घडते का?
हे गाणे ऐकायला छान वाटते; आता वाचतांना काहीच कळले नाही.
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता
हे काय आहे? काय भानगड आहे ही? काही अनैतिक संबंधांविषयी आहे का? मला प्रश्न पडतो की एवढी दुर्बोधता कशासाठी? तुम्हाला आपण काय लिहिले आहे याचा रसिकांना थांग पत्ता लागू नये असे वाटत असेल, सगळं जर असं एन्क्रिप्ट करून ठेवायचं असेल तर मग लिहिण्यातच काय हशील? हे म्हणजे अंधारात एखाद्याच्या सुंदर बायकोला डोळा मारण्यासारखे आहे. एखाद्याला दुसर्याच्या सुंदर बायकोची मोहिनी पडते पण कुठे व्यक्त होण्याची सोय नाही. जोडे पडतील! "मला दीपिका पदुकोण आवडते; तिचा कमनीय बांधा फारच मोहक आहे" असं एखादा सगळीकडे, चारचौघात, दस्तुरखुद्द बायकोसमोरदेखील खणखणीत आवाजात म्हणू शकतो. पण दुसर्याच्या बायकोबद्दल नाही ना असं डायरेक्ट बोलू शकत! मग अंधारात डोळा मारायचा. तेवढंच काहीतरी सनसनीखेज केल्याचं समाधान!
आपलं गुपित, आपल्याच कुपीत!
पुरुषाचा जन्म, तसा आहेच शापित!
असो. मंगेशकरांनी अशी सुंदर गाणी केली नसती तर ग्रेसांच्या कविता किती मर्यादित राहिल्या असत्या? अगदी मूठभर लोकांना माहित असल्या असत्या. कदाचित कविता म्हणून त्या श्रेष्ठ असतीलही, मागे कुणीतरी म्हटल्याप्रमाणे माझाच मेंदू तेवढा प्रगल्भ नसावा. :-(
8 Oct 2014 - 4:48 pm | एस
फक्त प्रगल्भ मेंदूंनाच दुर्बोध गोष्टी समजतात! :-)) आपण आपले जसे आहोत तसेच बरे! काय म्हणता? ;-)
बाकी शरदराव, लेख भारीये!
8 Oct 2014 - 4:55 pm | मदनबाण
हेच म्हणतो. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX
8 Oct 2014 - 4:53 pm | समीरसूर
कवितासंग्रहाचे हे नाव वाचून तुम्ही हा कवितासंग्रह विकत घेऊ शकलात याबद्दल तुमचे अभिनंदन! :-) मला नाव वाचूनच चक्कर (किंवा भोवळ) आली असती. 'चंद्रमाधवी' म्हणजे काय किंवा कोण याच प्रश्नाने मला रात्रभर झोप लागली नसती.
8 Oct 2014 - 4:54 pm | प्रसाद१९७१
मी हेच आधी च्या संक्षींच्या लेखात लिहीले होते. समजायला कठीण असणे, तरल असणे वगैरे समजु शकतो.
३-४ कवितांची गाणी झाली म्हणुन मराठी लोकांना ग्रेस माहीती तरी झाले, तसाही त्या गाण्यांचा अर्थ कोणालाच लागत नाही.
पण असे निरर्थक लिहायला हिंम्मत पाहीजे
8 Oct 2014 - 4:56 pm | प्रसाद१९७१
@ ससु - तुम्हाला "झरे चंद्रसजणांचे" हे कळले का? संक्षी म्हणतात ही फक्त "अनुभवण्याची" गोष्ट आहे. म्हणजे आली का पंचयीत. हे म्हणजे मला देव दिसतो आणि तुम्हाला दिसत नाही कारण तुमची श्रद्धा कमी पडते.
8 Oct 2014 - 5:12 pm | समीरसूर
नाही कळले! :-( एक 'चंद्रमाधवी' कमी होती म्हणून आता 'चंद्रसजणा' पण आला...आणि एक नाही, अनेक! 'चंद्रसजणांचे'? आणि त्यांचे झरे?
8 Oct 2014 - 5:37 pm | अस्वस्थामा
खरं तर निवांत प्रतिसाद लिहीणार होतो पण ससु भाऊंच्या प्रतिसादाने रहावले नाही म्हणून या दोन ओळी.
तसे आम्हाला बर्याचशा गोष्टींमधले काही कळत नाही पण असं वाटत की कविता कळायला तेवढ्यापण प्रगल्भतेची गरज नाहीये हो.
म्हणजे असं की, एखादी कविता भावली, तुम्हाला वाटेल तशी समजली, बास झालं ना ?
संक्षीनी त्यांन जे वाटलं ते त्यांचं त्य कवितेचं रसग्रहण मांडलं, तुम्ही सहमत व्हा अथवा नका होऊ, तुम्हाला कविता ही त्या रसग्रहणाशी कशाला बांधून हवीये.
म्हणजे मला म्हणायचय की, तुम्हाला दिसलेला चंद्र वेगळा असू शकतो. त्याबरोबर भावणारा अर्थ वेगळा असू शकतो. कोणाला विरक्ती येत असेल तर कोणाला प्रेयसी आठवत असेल. कोणाला डाग दिसत असतील तर कोणाला त्याची पांधुरकी किनार मोहत असेल. कदाचित कोणाला काहीच वाटत नसेल.
तिथे चंद्राचा सहभाग इतकाच की तो ह्या संवेदना निर्माण करु शकतोय. तसेच कवितेचे.. कविता अथवा लेखन प्रथम स्वांत सुखाय असावे असे वाटते. मग कोणी प्रकाशित केले तर ते वाचण्या न वाचण्याचे स्वातंत्र्य इतरांचे. तुम्हाला हवा तो अर्थ काढला म्हणून कवी कोर्टात खेचू शकत नाही (असे वाटते).
बर्याचदा कविता कळणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो म्हणजे असे की, स्वतःला भावलेली कविता ही एखाद्या मान्यवराच्या मताशी ताडून पाहिली जाते (जणु काही तो नवनीत अपे़क्षीत प्रश्नसंच आणि हेच ते पैकीच्या पैकी मार्काचे उत्तर!).
मग तुमचे उत्तर त्या बेंचमार्कवर ठेवून पाहणे, मित्रमंडळींच्यात त्यावर चर्चा, मग 'कोणाला किती कळाली (म्हणजे मान्यवराच्या उत्तराच्या जवळ तुमचे उत्तर गेले)' आणि त्यातून मिळणारी पांडित्य प्रशंसा.
कशाला हा सोस.. भावली कविता बस्स. कवी ग्रेस आहे की मर्ढेकर की माडगूळकर त्याने फरक पडू नये आणि मग एखाद्या खूप गाजलेल्या कवी लेखकाचे लेख आपल्याला आवडत नाहीत (वा कळत नाहीत), रुचत नाहीत याची ना खंत ना खेद वाटावा. त्याने हवे म्हणून लिहिले, ज्याना भावले त्यांनी घेतले.
अवांतर : stereogram images या आम्हाला कधी दिसू शकलेल्या नाहीत पण इतरांना दिसतात याचे नेहमीच दु:ख होते.
8 Oct 2014 - 6:27 pm | बॅटमॅन
आहाह! काय नेमके लिहिलेत, वाह ! मान गये. :)
8 Oct 2014 - 11:41 pm | भृशुंडी
अगदी.
हेच वाटत होतं.
कविता कळणे वगैरे सोडून द्या तात्पुरतं.
कविता वाचली- भावली- आनंद झाला. हे जास्त मोठं आहे.
8 Oct 2014 - 7:59 pm | अजया
नेमका प्रतिसाद! अावडला.
एखादी कविता नकळत कविलादेखिल अपेक्षित नसलेला भाव आपल्या मनात देऊन जाऊ शकते.आपल्या भावनिक स्थितीप्रमाणे एखाद्या कवितेचा पहिल्यापेक्षा वेगळाच अर्थही लागु शकतो!
9 Oct 2014 - 10:03 am | समीरसूर
प्रतिसाद भावला कारण तो कळला. :-)
कविता कळलीच नाही तर भावेल कशी हा विचार करतोय. :-(
चंद्र पाहतांना प्रत्येकाच्या मनात निरनिराळे भाव उमटत असतील हे अगदीच मान्य पण चंद्र दिसतोय, सुंदर दिसतोय, आसपासचा परिसर त्याच्या चांदण्यात न्हाऊन निघालाय, वगैरे सगळं आकलन होण्याच्या क्षमतेचं आहे, दृगोचर आहे. आकलन आधी आणि मग भावणं असा हा क्रम आहे. शब्दांच्या बाबतीत मात्र हे तितकसं सोपं नसावं. शब्द हे अनेक चिन्हांसारख्या दिसणार्या अक्षरांचे फक्त संच असतात. शब्दांचं अस्तित्व (आणि सौंदर्यदेखील) शब्दांच्या आणि त्यायोगे वाक्यांच्या अर्थावर अवलंबून असतं असं मला वाटतं. उद्या मी नुसतं "कंदील कळकट, अनारसे तुपकट, कढई ओशट, चालला तांडा; सदरा मातकट, कढी आंबट, नेहमीची कटकट, विटका झेंडा" असं काही लिहिलं तर काही अर्थ तर लागणारच नाही; मग भावणं कसं होणार? लोकं चपलांनी हाणतील ते निराळचं.
शब्द आणि दृष्य यात काहीतरी फरक असावा. असो. मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या आकलनक्षमतेचा प्रश्न आहे. कुणाची कशी तर कुणाची कशी...कुणाला अर्थाविना मोहरता येतं, कुणाला अर्थाचं सोनं गवसल्याशिवाय मोहरता येत नाही...आणि हीच भिन्नता आयुष्यात रंग भरते. :-)
11 Oct 2014 - 12:08 pm | सुबोध खरे
बरं झालं. मला वाटत होते कि मलाच कविता कळत नाहीत. हे म्हणजे कठीण पेपर आला कि आपल्याला वाटते आपलीच गोची झाली. आजूबाजूला बसलेले विद्यार्थ्यांचे चिंताक्रांत चेहरे पहिले कि हायसे वाटते कि चला फक्त आपणच गाळात नाही. आपल्यासारखे बरेच आहेत.
असेच आरती प्रभू यांचे काव्य कळत नाही. केवळ लता/ आशा या दिग्गज गायिकांनी गायल्यामुळे गाणी आवडतात. उदा. गेले द्यायचे ते राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे. कविता काही कळली नाही पण गाणे आवडते. कुणी अर्थ सांगेल का?
8 Oct 2014 - 5:54 pm | रेवती
समजायला अवघड आहे हे खरे! निवडुंगमधील गाण्यात २ कडवी वगळलीयेत हे आत्ता समजले, तरीही कविता दुर्बोधच राहिलीये. मला तेवढीच ग्रेसांची एक कविता माहितीये व गाणे केले म्हणून आवडली. आपले लेखन आवडले.
8 Oct 2014 - 6:22 pm | काउबॉय
ती गेली तेंव्हा रिमझिम हे गाणे ऐकल्यावर असाच गोंधळ झाला होता नंतर लक्षात आले हे गाणे एक मूल ज्याची आई तिच्या प्रियकरासोबत पतीचे कुटूंम्ब सोडून पळुन गेली आहे त्या प्रसंगावर/अनुशंगाने विषद करत आहे..... स्पिचलेस!
8 Oct 2014 - 6:25 pm | तिमा
लहान वयातच घरातून आई निघून गेल्यामुळे, आणि तीही मुलाला आणि नवर्याला सोडून गेल्यामुळे, ग्रेस यांच्या बालमनावर खोल जखमा झाल्या. आणि त्यामुळेच कदाचित ते दुर्बोध कविता लिहायला लागले असावेत. म्हणजे त्या कविता केवळ त्यांच्या स्वतःसाठी होत्या. दुसर्यांना त्या समजायलाच पाहिजेत असा त्यांचा आग्रह नव्हता. तरीही लोकांनी त्यांचा 'साईबाबा' करायचा प्रयत्न केला त्याला ते काय करणार ?
8 Oct 2014 - 9:22 pm | धन्या
>> तरीही लोकांनी त्यांचा 'साईबाबा' करायचा प्रयत्न केला
म्हणजे काय केले? :)
लेख आवडला.
9 Oct 2014 - 11:42 am | तिमा
म्हणजे त्यांना प्रसिद्धीची आवड नसताना प्रसिद्धीच्या झोतात आणले.
8 Oct 2014 - 8:12 pm | पैसा
धन्य तुमची! लेख आवडला.
बाकी अस्वस्थामा यांचाही प्रतिसाद आवडला. कविता किंबहुना प्रत्येक कलाकृती प्रत्येकाला वेगळी दिसेल हे खरे. परंतु ज्ञानोबांची विराणी वाच्यार्थाने घेऊ नये. नाही का! नाहीतर कोणीतरी ती भावगीते आहेत असे म्हणायचे उद्या.
मात्र काही लोक "मला अर्थ कळलाय बुवा, तुला एवढं साधं कळत नाही?" असा दुसर्याच्या मनात न्यूनगंड निर्माण करायचा प्रयत्न करतात ना ते अजिबात आवडत नाही.
8 Oct 2014 - 9:32 pm | रामपुरी
द्या टाळी...
आपली मते बराब्बर जुळतात.
आम्ही ढ असू पण उगीच निरर्थक शब्दांचे डबे जोडलेल्या कशालाही कविता म्हणू शकत नाही.
8 Oct 2014 - 9:54 pm | सुहास..
_/\_
8 Oct 2014 - 9:59 pm | दशानन
ग्रेस, यांच्या कवितेचा अर्थ लागला तर तो तो त्या व्यक्तीपुरता असतो. तुम्हाला लागलेला अर्थ हा दुसऱ्याला समजेलच असे नाही. ग्रेस समजून घेण्याचे काव्य आहे, जेवढे आपल्याला समजले त्याचा आनंद घ्यावा व पुढील मार्ग शोधावा.. !
9 Oct 2014 - 1:40 am | आदूबाळ
पटलं पटलं! "डुडूळगावचा गोलंदाज" ही ग्रेसना मिपाच्या उत्तराची कविता आठवली.
9 Oct 2014 - 2:12 pm | कहर
कविता समजली नाही याचा अर्थ कविता दुर्बोध आहे असा का काढावा? कदाचित ती कविता समाजत नाहीं, भावत नाही म्हणजे आपणच दुर्बोध असु।
9 Oct 2014 - 4:59 pm | मित्रहो
म्हणून मी त्याला निरर्थक शब्दांची जोडणी म्हणनार नाही. मला ग्रेसच्याच काय इतर बऱ्याच कविता समजत नाही. तसेच बरेच चित्रपट किंवा नाटक कळत नाही.
ग्रेसच्या कवितेमधे एक गेयता असते, लय असते ती आवडते. वरच्याच कवितेतील शेवटल्या कडव्याला चाल लावलेली नाही तरीही त्याची लय जाणवते.
वरील कविता ज्यावेळेला ऐकली त्यावेळेला आईशी काहीतरी भांडण होते हे कळले. ती आई होती या ओळीवरुन. ती आई गेली म्हणजे वारली की कोणचा हात धरुन गेली याचा बोध आजवर झाला नाही.
11 Oct 2014 - 9:20 am | इन्दुसुता
शरद, लेख नेहमीप्रमाणेच चांगला आहे, आवडला.
या कवितेविषयी खुद्द ग्रेस यांचेच स्पष्टीकरण कुठ्ल्याशा मुलाखतीत ऐकले तेव्हाच मलाही त्यांना काय अभिप्रेत होते ते कळाले. मला दोन्ही अर्थ तेव्हढेच भावतात.
ग्रेस यांच्या काही कविता आवडतात / भावतात, पण समजतातच असे नाही. त्यांच्या कवितांमधील काही उपमा मात्र अतिशयच आवडल्या आहेत... 'धुरकट कंदील', 'अज्ञात धुके', ' वनवासात सीतेच्या अंगावरचा राघवशेला'
काय अफाट कल्पनाशक्ती आणि जाणीवा असतात एकेकाच्या!!!
11 Oct 2014 - 7:56 pm | आनंदी गोपाळ
वेगळ्या उत्कट भावना सांगणारे नवे शब्द निर्माण करणे, ही खासियत.
रत्नशूळ लकाकी असा शब्दप्रयोग ऑफ्हँड आठवतोय. प्रचण्ड चमकणार्या हिर्याकडे पहावत नाही. डोळ्यांत शूळ -वेदना- उठतो.
ग्रेस मस्तय. लोकांना आवडो नावडो.
13 Oct 2014 - 11:28 am | मारवा
शरद राव !
ग्रेस जर समजुन घ्यायचा असेल तर मला वाटत त्यांच्या साहीत्या चा अनुभवण्याचा आदर्श क्रम असा ठेवला तर ग्रेस नक्कीच अधिक चांगला समजु शकतो. असे मला वाटते.
सर्वात अगोदर मग नंतर नंतर असा खालील क्रम वापरुन बघा हा सोप्या कडुन कठीण होत जातो.
१- सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी.
२- त्यानंतर चर्चबेल ललितलेख संग्रह यातील सर्केस इनोसंट एलीस तांदुळ मोजणार्या मुलींचा लेख अति सुंदर
३- त्यानंतर मितवा ललितलेख संग्रह ( वरील उतारा त्यातीलच अतिशय विलक्षण पुस्तक ह्र्दयनाथ मंगेशकर म्हणतात कोणी गीता कोणी बायबल उशाशी घेउन झोपतो मी मितवा उशाशी घेउन झोपतो.
४- त्यानंतर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा ललित लेख संग्रह वाचावा हा थोडा अलीकडच्या काळातील यात ग्रेस त्यांची निर्मीती प्रक्रीया विस्ताराने उलगडुन सांगतात.
५- त्यानंतर डॉ, नंदकुमार मुलमुले यांचे रचनेच्या खोल तळाशी समीक्षा वाचावी अतिशय आशयगर्भ समीक्षा मानसशास्त्रा च्या व आस्वादाच्या ही अंगाने केलेली अतिशय सुगम.
६- त्यानंतर सामना च्या रविवार च्या उत्सव पुरवणीत येणारा ग्रेस चा स्तंभ मिळवुन वाचावा माझ्याकडे कात्रणे आहेत पण ती स्कॆन वगैरे करणे फ़ार कीचकट आहे यार. ( त्यांचे इतर स्तंभ लेखन अलीकडच्या काळातील नाही ते टाळावे त्याने सुरुवात करु नये असे म्हणायचे आहे)
७- नेट वरुन त्यांच्या जाहीर सभेतील मुलाखती व्याख्याने एकावीत. त्याचे व्हीडीओ बघावेत.
८- संध्यासुक्तांचा यात्रिक हा व्हीडीओ बघावा यात एका भागात शुभा गोखले मुलाखत घेतात ग्रेस यांची त्यांचे घर ग्रेस च्या घराच्या भिंतीवरील भन्नाट पेंटींग्ज अनेक वस्तु आदि ही दाखवलेले आहेत. दुसर्या भागात ग्रेस वरील कवितेवर अगदी डीटेल मध्ये ( ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता वर बोलतात) असा व्हीडीओ आहे. अतिशय सुंदर ग्रेस ला त्यांच्या स्वत:च्या तोंडुन एकण्या सारखा अनुभव नाही भावना सरळ पोचतात.
९- चित्रकर्ती शुभा गोखलेंची साइट त्यांची ग्रेस च्या कवितेवर आधारीत चित्रे बघावीत त्यांचा लेख वाचावा
१०- त्यानंतर जी.ए. आणि ग्रेस यामधील पत्रे वाचावीत व जी.ए. च्या कवि ग्रेस वर केलेले विवेचन वाचावे. हे मौजेने प्रकाशित केलेल्या जी.ए. च्या चार खंडाच्या पत्रसंग्रहात मिळेल. हा पत्र संग्रह अतिशय वाचनीय आहे.
११- ग्रेस यांच्या मृत्यु पश्चात अनेक मान्यवरांनी लिहीलेले उत्तम लेख जमवुन वाचावेत यात महेश एलकुंचवार,आदिंचे खास करुन
१२- हा बेस तयार झाल्यानंतर ग्रेस यांचे म्रुगजळाचे बांधकाम हे पुस्तक वाचावे. ( हा ग्रेसचा अलीकडच्या वर्तमान पत्रातील स्तंभाचा लेखसंग्रह आहे पण थोडा कठीण आहे.)
१३- आता या तयारी नंतर कवि ग्रेस यांचा पहीला कवितासंग्र ह हाती घ्यावा तो म्हणजे संध्याकाळच्या कविता
१४- नंतर राजपुत्र आणि डार्लिंग
१५- नंतर चंद्रमाधवी चे प्रदेश
१६- नंतर सांध्यपर्वातील वैष्णवी
माना के सफ़र काफ़ी लंबा है दोस्त मगर फ़िर जन्नत यु ही तो नही मिलती !
तर शरदराव सध्या शुभारंभ म्हणुन मितवा या ललितलेख संग्रहातील स्वत:च्या राजपुत्र आणि डार्लिंग या कवितासंग्रहातील एका कवितेवर केलेले ग्रेस यांचे हे सुगम भाष्य वाचुन पहावे ही नम्र विनंती !
.लहानपणी आमच्या शेजारी जुई नावाची एक झुळझुळ हसणारी मुलगी राहत असे. संध्याकाळ झाली की ती एका उंच लाकडी स्टुलावर उभी राहुन जाईजुईच्या मांडवावरच्या टपोरलेल्या कळ्या खुडायची. जुईच्या स्वत:च्या वेणीत कधीही फ़ुले माळलेली नसत; पण स्वत:च्या हातांनी फ़ुलांच्या वेण्या गुंफ़ुन शेजारीपाजारी वाटण्याचा तिला फ़ार छंद होता. कुशलतेने गुंफ़लेल्या वेण्या मैत्रीणींच्या केसांवर फ़ुलतांना बघुन जुई फ़ुलुन येत असे. घरात फ़ार त्रास होता त्या पोरीला.कुठली, कुणाची काहीच माहीत नव्हते तिच्यावीषयी. एका निपुत्रीक विधवेने वात्सल्याच्या पुर्तीसाठी तिला अनाथ आश्रमातुन उचलुन आणले आणि या विधवा आईच्या मृत्युनंतर जुई आईच्या कुटुंबातील एक निराधार मुलगी म्हणुन वाढु लागली. घरातली हक्काची दासीच होउन गेली. एक दिवस उंच स्टुलावर उभी राहुन कळ्या तोडत असतांनाच, तिच्या काकुने कर्कश हाक मारुन चुलीवर टाकलेल्या भाताखालचा जाळ कमी करण्यास सांगितले.सांगितल्या बरोबर काम करणे हा जुईचा स्वभावच नव्हे, कर्तव्य धर्मही होता. परकराच्या ओच्यात जमवलेल्या कळ्यांची पुरचुंडी मुठीत धरुन जुईने स्टुलावरुन उडी मारली आणि ती जाळ सारखा करायला धावली.
चुलीत एकावर एक तिरपी ठेवलेली दोन लाकडे असत. ती थोडी बाहेर ओढायची, बाहेरपर्यंत जळत आलेल्या लाकडांवर पाण्याचा एक हबका मारायचा, म्हणजे चुलीतील उरलेल्या निखार्यांच्या मंद आचेवर भात फ़ुलायला लागेल इतकीच माफ़क उष्णता राहते. पण या घडामोडींमध्ये जळक्या लाकडांवरुन राख आणि धुर यांचे जे विचीत्र मिश्रण उडते, ते डोळ्यात गेले की डोळे चुरचुरु लागतात. जुईने लाकडांवर पाणी शिंपडले आणि डोळ्यांतला चुरचुरणारा धुर चोळुन काढण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यावंर धरल्या. परकराची पुरचुंडी बाळमुठीतुन निसटून गेली, आणि ओच्यातल्या कळ्या थेट निखार्यांवर पडल्या, चरचरु लागल्या. डोळ्यांवर मुठी चोळुन झाल्यानंतर जुईने बघितले तर कळ्या करपुन जात होत्या. मग मात्र द्युराशिवाय ही जुईचे डोळे खळखळ पाझरु लागले.
ओच्यातल्या कळ्या फ़ुफ़ाट्यात उधळण्यासाठी आपली प्रारब्धे प्रासंगिक निमीत्ते शोधत असतात. तेवढे साधले की, प्रारब्ध स्वत:चे तांडव घालायला पुन्हा मोकळे होते.
पण कळ्या मात्र नेहमीच फ़ुफ़ाट्यात करपुन जातात !
पुढे लवकरच जुईच्या काकांनी ते घर सोडल्यामुळे नंतर तिचे काय झाले ते कळले नाही. पण अजुनही जुईची आठवण आली की मला फ़ुफ़ाट्यात धुरकटत जाणार्या कळ्याच दिसु लागतात.
तिच्या ओच्यातील हौस अन डोळ्यातील करुणा मी फ़क्त धगधगणारया निखार्यांच्या पार्श्वभुमीवर च बघु शकतो.
आग म्हणजे फ़क्त लाकडांचा जाळ नव्हे;
फ़ुलांची, अंकुरांची, मातीची, पौषाच्या रात्री बरसणारया बर्फ़ांची, चंद्रचांदण्यांची आग असु शकते. म्हणुन तर माझ्या स्वगतात अशा ओळी येतात-
डार्लिंग ! वाळवंटे फ़क्त वाळुचीच नसतात !
फ़ुलांची असतात, झाडांची असतात,
घरांची असतात शहरांची असतात
आणि अनाथ अंतरिक्ष तर
नव्या सौंदर्यजटिल, साक्षात्कारी वाळवंटाचा
एक साधा प्रारंभ असतो.
मितवा- कवि ग्रेस
30 Oct 2014 - 12:05 am | आनंदी गोपाळ
वेळ काढून डिटेल लिहिल्याबद्दल धन्यवाद.
13 Oct 2014 - 1:26 pm | मारवा
संध्यासुक्तांचा यात्रिक मध्ये कुठल्या कवितेवर भाष्य आहे या विषयी मी जरा कन्फ्युज्ड झालेलो आहे. कदाचित दुसर्या कवितेवर भाष्य आहे. पण आई या विषयावर नक्कीच भाष्य त्यात आहे.
खालील लिंका बघा काही अपुर्ण आहेत
1-http://shubhagokhale.com/Inner/Paintings.asp?pcId=4
2-http://shubhagokhale.com/Inner/Article.asp
3-http://www.youtube.com/watch?v=xEn3JcKiytw
4-http://www.youtube.com/watch?v=WswCCdGJodM
13 Oct 2014 - 1:29 pm | मदनबाण
@ मारवा
आपला प्रतिसाद आवडला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण