आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १४

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
8 Oct 2014 - 4:15 am

बर्फाच्या कडेने जात एका लहानशा खाडीत ग्जो ने प्रवेश केला. या खाडीच्या पलीकडे पश्चिमेच्या दिशेने जाणारा दुसरा जलमार्ग असल्याचं हॅन्सनला आढळलं होतं. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच बर्फाने वाट अडवली होती. अनेक लहान-लहान खाड्या हिमखंडाच्या आतपर्यंत शिरलेल्या आढळत होत्या. यापैकी एक खाडी हर्शेल बेटापासून पंधरा मैलांपर्यंत आत शिरली होती. ही खाडी आणि पश्चिमेचा जलमार्ग यात बर्फाचा लहानसा पट्टा होता, पण दुर्दैवाने हा बर्फ अद्यापही घट्ट होता. २४ जुलैच्या रात्री ११ वाजता ग्जो ने बर्फापुढे माघार घेतली आणि हर्शेल बेटाचा मार्ग धरला! परंतु विरोधी वार्‍याला तोंड देत हर्शेल बेट गाठेपर्यंत २६ जुलैची पहाट उजाडली होती!

हर्शेल बेटावर परत आल्यावर सकाळी हेल्मर हॅन्सन बेटावरील टेकडीच्या माथ्यावर गेला होता. कॅनडाच्या अंतर्भागातून मोठी वावटळ आर्क्टीकच्या किनार्‍याच्या दिशेने येत असल्याचं त्याला आढळून आलं!

सुदैवाने हे वादळ किनार्‍यावर धडकण्यापूर्वीच शमलं होतं! दुपारी चारच्या सुमाराला हॅन्सनने बेटाचा पूर्व किनारा गाठला. मन्नीचा मृतदेह कदाचित इथे येण्याची शक्यता होती. परंतु हॅन्सनची ही शोधमोहीम निष्फळच ठरली.

३० जुलैला पूर्वेच्या दिशेला गेलेल्या व्हेलच्या शिकारी जहाजांपैकी बेल्व्हेडेर हे हर्शेल बेटावर येऊन पोहोचलं!

१ ऑगस्टला हवामान अनुकूल असल्याचं आढळल्यावर पहाटे ४.३० ला ग्जो ने पुन्हा एकदा हर्शेल बेटाचा किनारा सोडून पश्चिमेची वाट धरली. ग्जो पश्चिमेच्या मार्गावर असताना तासाभरातच बेल्व्हेडेरने त्यांना मागे टाकलं. जहाजावरील काही जणांना स्कर्व्हीने ग्रासलं असल्याने पश्चिमेच्या दिशेने मार्गक्रमणा करण्यास बेल्व्हेडेरचा कॅप्टन उतावीळ झाला होता!

२ ऑगस्टच्या रात्री ९ वाजता हर्शेल बेटाच्या पश्चिमेला किनार्‍यापासून ७ मैलांवर आणि डीमार्केशन पॉईंटपासून १० मैलांवर ग्जो बर्फात अडकलं! जहाज बर्फात अडकल्यामुळे ते मागे घेण्याचा मार्गही खुंटला होता! दुसर्‍या दिवशी झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळेतर जहाज इथेच बर्फात अडकण्याची भीती निर्माण झाली होती! सुदैवाने ४ ऑगस्टच्या सकाळी बर्फातून जहाजाची सुटका झाली. मात्रं आता दाट धुकं पसरलं होतं! अशा परिस्थितीत पुढे जाण्यात काहीच अर्थ नव्हता. एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे परतून हर्शेल बेट गाठणं!

५ ऑगस्टच्या पहाटे २.३० वाजता ग्जो पुन्हा हर्शेल बेटाच्या किनार्‍यावर परतलं! बेल्व्हेडेर त्यांच्यापूर्वीच परतलं होतं. पूर्वेला गेलेलं हर्मन हे जहाजही हर्शेल बेटावर परतलं होतं. त्याच रात्री कार्लक या जहाजानेही पूर्वेकडून हर्शेल बेट गाठलं. दोन दिवसात ट्रेझर आणि बोहेड ही जहाजंही हर्शेल बेटावर येऊन पोहोचली. पॉईंट बॅरो इथून इंधन आणि अन्नसामग्री घेऊन येणार्‍या जहाजाची ही सर्व जहाजं आतुरतेने वाट पाहत होती. १० ऑगस्टपर्यंत हे जहाज न आल्यास पश्चिमेच्या दिशेने मार्गक्रमणा करण्याचा सर्वांचा विचार होता!


हर्शेल बेट

९ ऑगस्टला एडमंटन आणि फोर्ट मॅकफर्सन इथून बोटीने येणारी टपालफेरी आली! ही टपालफेरी मॅकेंझी नदीच्या मार्गाने आलेली होती. यातील सर्वात मोठी बातमी होती ती सॅन फ्रॅन्सिस्को इथे १८ एप्रिल १९०६ या दिवशी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाची आणि त्यानंतर लागलेल्या भयानक आगीची! या भूकंपात ८०% सॅन फ्रॅन्सिस्को शहर उध्वस्तं झालं होतं!

दुपारी १ वाजता आणखीन एक जहाज हर्शेल बेटावर येऊन पोहोचलं. गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या जहाजाबद्दल कोणतीही बातमी न आल्याने सर्वजण काळजीत पडलेले होते तेच हे जहाज होतं.

ओल्गा!

प्रिन्स अल्बर्ट बेटावरील मिंटो खाडीत ओल्गाने हिवाळ्याकरता मुक्काम केला होता. तिथे त्यांची एस्कीमोंच्या एका तुकडीशी गाठ पडली होती. १९०५ मध्ये हॅन्सन आणि रिझवेल्ट यांना भेटलेले कॉपरमाईन नदीच्या परिसरातील हे किल्नेर्मियम एस्कीमो असावेत असा अ‍ॅमंडसेनचा अंदाज होता. जहाजावरील अनेक खलाशी आणि जहाजाचे दोन्ही इंजिनीयर मरण पावले होते. इंजिनीयर मरण पावल्यामुळे केवळ शिडांच्या आधारानेच त्यांना मार्गक्रमणा करणं शक्यं होतं! हर्शेल बेटावर येताना त्यांना अनेक व्हेल आढळले होते, परंतु अपुर्‍या मनुष्यबळामुळे त्यांची शिकार करणं अशक्यं झालं होतं!

ओल्गावरील खलाशांकडून व्हेल्सच्या मुबलक संख्येची माहिती मिळताच बोहेड जहाजाने पूर्वेकडे कूच केलं!

१० ऑगस्टच्या सकाळी उत्तर-पूर्वेच्या दिशेने वारा वाहण्यास सुरवात झाली. मात्रं अमेरीकन कॅप्टन्सच्या मते हा वारा अद्यापही बर्फ मोकळं करण्यास पुरेसा नव्हता!

हर्शेल बेटावरील मुक्कामाला कंटाळलेल्या अ‍ॅमंडसेन - गॉडफ्रे हॅन्सनने एक धाडसी निर्णय घेतला...

आदल्या खेपेला ज्या बर्फात जहाज रुतलं होतं तिथपर्यंत जाऊन परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि मोकळी खाडी आढळली तर सरळ पश्चिमेचा मार्ग धरावा!

१० ऑगस्टच्या दुपारी ग्जो ने चौथ्या खेपेला हर्शेल बेटावरुन नांगर उचलला!

पश्चिमेच्या दिशेने वाहणार्‍या जोरदार प्रवाहामुळे बंदरातून बाहेर पडण्यास त्यांना मदत झाली. पूर्ण दिवसभर दक्षिण-पश्चिमेच्या दिशेने त्यांची मार्गक्रमणा सुरु होती. रात्री धुकं पडल्यावर पुढची वाटचाल करणं दुरापस्तं झालं होतं. सागरतळाची खोलीही बारा फॅदमवरुन साडेसात फॅदमवर आली होती! जमिनीपासून काही अंतरावरच असूनही समुद्राच्या तळाशी इथे बर्फ असल्याचं त्यांना आढळलं. या बर्फातच नांगर टाकून वाट पाहण्याचा अ‍ॅमंडसेनने निर्णय घेतला!

दुसर्‍या दिवशी सकाळी अ‍ॅमंडसेनने दुसर्‍या भागात नांगर टाकला. आदल्या रात्री ज्या हिमखंडावर जहाजाने नांगर टाकला होता, तो आता सुटा होऊन पाण्यावर तरंगत होता!

संध्याकाळी ६ वाजता धुक्याचा पडदा उठला आणि समोर दिसलेलं दृष्यं पाहून हॅन्सनने आरोळी ठोकली!

ग्जो मोकळ्या पाण्याच्या खाडीपाशी पोहोचलं होतं!
पश्चिमेला नजर जाईल तिथपर्यंत खाडीचा मार्ग निर्वेध दिसत होता!

सावधपणे मार्गक्रमणा करत ग्जो ने या खाडीत प्रवेश केला. सुरवातीला बरीच अरुंद असलेली खाडी पुढे बर्‍यापैकी प्रशस्त होती. या खाडीच्या किनार्‍याजवळच्या भागात बर्फामुळे एक भिंत तयार झाली असल्याचं अ‍ॅमंडसेनला आढळून आलं. मात्रं वेळेच्या अभावी या विलक्षण चमत्काराचं संशोधन करणं त्यांना शक्यंच नव्हतं!

ग्जो ने आता कॅनडाच्या किनार्‍यावरुन अलास्काच्या किनार्‍यावरील सागरात प्रवेश केला होता!

१४ ऑगस्टच्या सकाळी १० वाजता ग्जो ने मॅनींग पॉईंट ओलांडला. किनार्‍यावर अनेक एस्कीमोंच्या झोपड्या दिसत होत्या. मात्रं एकही एस्कीमो तिथे आढळला नाही. दुपारी उत्तरेला असलेल्या हिमखंडामुळे त्यांना किनार्‍याला अगदी चिकटून मार्ग काढावा लागत होता. इथे काही ठिकाणी जेमतेम दोन-तीन फॅदम खोल पाणी होतं! मात्रं सुदैवाने लवकरच खोल पाण्यात प्रवेश करुन ग्जो ने उत्तरेचा मार्ग धरला!

धुक्यात गुरफटल्यामुळे आपण नक्की कोणत्या भागात आहोत हे अ‍ॅमंडसेन आणि इतरांच्या लक्षात येत नव्हतं. त्यातच आता जोरदार वार्‍याला सुरवात झाली. वार्‍याचा जोर इतका वाढला, की जहाजाची शिडं खाली उतरवून ठेवण्यात आली. १५ ऑगस्टला अचानक एका क्षणी धुकं नाहीसं झालं आणि जहाजाच्या बरोबर समोर काही अंतरावर असलेला भूभाग अ‍ॅमंडसेनच्या नजरेस पडला! ही फ्लॅक्समन बेटं असावी असा त्याचा तर्क होता.

१६ ऑगस्टचा संपूर्ण दिवस ग्जो आपल्या जागीच उभं होतं. काही काळ धुक्याचा पडदा दूर झाल्यावर गॉडफ्रे हॅन्सनने आपलं स्थान निश्चीत केलं असता फ्लॅक्समन बेटं दक्षिणेला तीन मैलांवर असल्याचं निष्पन्नं झालं! १७ ऑगस्ट्ला धुकं निवळल्यावर ग्जो ने पुढचा मार्ग धरला.

दुपारी ४ च्या सुमाराला ग्जो ने समुद्रात असलेला पहिला वाळूचा पट्टा ओलांडला. पश्चिमेकडे बर्फामुळे मार्ग खुंटला होता. अ‍ॅमंडसेनने वाळूच्या पट्ट्यांतून मार्ग काढण्याचा बेत केला. अमेरीकन जहाजांच्या अनुभवी कप्तानांकडून वाळूच्या पट्ट्यांतून मार्ग काढणं शक्यं असल्याचं अ‍ॅमंडसेनला समजलं होतं. मात्रं या पट्ट्यांमधील सागरतळ काही वेळेस फार उथळ असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. वाळूमुळे बर्फाला इथे शिरकाव नव्हता!

या पट्ट्यांच्या अंतर्भागात शिरणं हे कठीण काम होतं. कोणत्याही क्षणी नांगर टाकण्याची तयारी केल्यावर जहाजाची वाटचाल पुढे सुरु झाली. समुद्रतळाची खोली झपाट्याने कमी होत असल्याचं एव्हाना लिंडस्ट्रॉमच्या ध्यानात आलं होतं. नऊ फूट खोलीवर ग्जो ने नांगर टाकला! मात्रं वाळूच्या पट्ट्यात शिरणारी ही खाडी पुढे गाळाने भरल्यामुळे बंद होती.

दक्षिणेला असणारी दुसरी खाडी टेहळणी करणार्‍या हेल्मर हॅन्सनच्या नजरेला पडली होती. या खाडीत साडेतीन ते चार फॅदम खोल पाणी असावं असा त्याचा अंदाज होता. या खाडीकडे वळल्यावर हॅन्सनचा अंदाज खरा असल्याचं सिद्धं झालं. चार फॅदम खोल पाण्यातून अखेर जहाजाने वाळूच्या पट्ट्यांच्या अंतर्भागात प्रवेश केला होता!

१८ ऑगस्टच्या सकाळी ५ च्या सुमाराला ग्जो ने क्रॉस बेट ओलांडलं. या बेटावर एक भला मोठा क्रॉस एक खूण म्हणून बसवण्यात आला होता. वाळूच्या पट्ट्यांच्या अंतर्भागातून बर्फाला बगल देऊन निसटल्यामुळे अनेक दिवस बर्फात आणि धुक्यात अडकून पडण्याचा धोका टळला होता. जहाज आता खुल्या समुद्रातील खोल पाण्यात पोहोचलं होतं!

हॅरीसन उपसागरात पुन्हा जहाजासमोर हिमखंड उभे ठाकले. उपसागरात दक्षिणेला वळण्याविना दुसरा कोणताच मार्ग दिसेना! रात्री सागरतळाची खोली अचानक अडीच-तीन फॅदमपर्यंत कमी झालेली लिंडस्ट्रॉमला आढळली! इथे पाण्याखाली वाळूचे पट्टे तयार झालेले होते. बर्फामुळे किनार्‍याच्या अगदी जवळून जाण्यास पर्याय नव्हता. केप हॅल्केट ओलांडून ग्जो ने स्मिथच्या उपसागरात प्रवेश केला.

स्मिथच्या उपसागरातील सागरतळ चार-पाच फॅदमपर्यंत उथळ असला तरी खोली सतत बदलत नव्हती असं अ‍ॅमंडसेनला आढळून आलं. १९ ऑगस्टला संध्याकाळी ग्जो ने स्मिथ उपसागर ओलांडला त्याचं पश्चिमेचं टोक असलेलं केप सिम्प्सन गाठलं. इथे बर्फाचं आवरण किनार्‍याच्या बरंच जवळ होतं. पूर्वेलाही बर्फ असल्याने किनार्‍याला लागून पुढे सरकण्याला पर्याय नव्हता. सुदैवाने किनार्‍याच्या अगदी जवळून जहाज जाऊ शकेल इतपत रुंद खाडी होती!


केप सिम्प्सन

अ‍ॅमंडसेनने या खाडीत शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु सागरतळाची खोली अचानक खूपच कमी झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. मागे फिरुन बर्फात नांगर टाकण्यापलीकडे त्याच्यापुढे पर्याय नव्हता, परंतु इथला बर्फ खूपच धोकादायक दिसत होता. दुसर्‍या दिवशी ग्जो ने पुन्हा खाडीत शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु आतातर सागरतळ जेमतेम एक दे दीड फॅदमवर आला होता! पुन्हा एकदा बर्फात नांगर टाकण्यावाचून गत्यंतर नव्हतं, परंतु नांगर टाकण्यासाठी किनार्‍यापाशी हिमखंडाचा लहानसा एक तुकडाच शिल्लक होता!

२० ऑगस्टच्या रात्री पूर्वेकडून येणार्‍या वार्‍याचा जोर चांगलाच वाढला. या वार्‍यामुळे जहाजाला ज्या हिमखंडाचा आडोसा मिळत होता, तो वाहून जात दिसेनासा झाला. नांगर टाकलेल्या बर्फाचाच काय तो आधार आता शिल्लक होता! त्यातच वार्‍यामुळे जहाजाच्या दिशेने अनेक लहानमोठे हिमखंड वाहून येण्यास सुरवात झाली! कोणत्याही क्षणी एखादा हिमखंड जहाजावर येऊन आदळणार अशी प्रत्येकाला भिती वाटत होती! हिमखंड जहाजावर आदळलाच तर अचानक जोराचा धक्का बसू नये म्हणून अटकाव करणारे मोठे लोखंडी हूक्स बाहेरच्या बाजूने लावण्यात आले होते. त्यातच आणखीन एक भिती होती, ती म्हणजे बर्फाच्या ज्या तुकड्यावर ग्जो ने नांगर टाकला होता, तो तुकडा पाण्याच्या प्रवाहाने कधीही सुटा होऊन वाहत जाण्याची शक्यता होती!

सुदैवाने कोणतीही अडचण न येता रात्रं पार पडली!

२१ ऑगस्टच्या सकाळीही वार्‍याचा जोर कायमच होता. लवकरच वादळ होण्याची चिन्हं दिसत होती. अशा परिस्थितीत किनार्‍यावरील बर्फाचा आधार घेणं कधीही श्रेयसकर होतं. एखाद्या मोठ्या हिमखंडाच्या अंतर्भागात अथवा कडेला असलेल्या उपसागरात आश्रय घेतल्यास पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे हिमखंडावरुन उत्तर धृवाची विनामुल्य सफर घडण्याची शक्यता होती! अलास्काच्या किनार्‍याजवळ, विशेषतः पॉईंट बॅरोच्या परिसरात अनेक अमेरीकन जहाजं प्रवाहात सापडल्यामुळे उत्तर धृवाच्या दिशेने भरकटली होती!

हिमखंडात अडकून उत्तरेला भऱकटण्याची अर्थातच अ‍ॅमंडसेनची इच्छा नव्हती. किनार्‍यावरील बर्फाचा आधार घेणं तुलनेने सुरक्षीत असल्याने अ‍ॅमंडसेनने तो मार्ग धरला. दुर्दैवाने जहाजाच्या प्रॉपेलरचं एक पातं हिमखंडाच्या पाण्यात लपलेल्या भागावर धडकलं. याचा व्हायचा तोच परिणाम झाला...

इंजिन बंद पडलं!

रिझवेल्टने इंजिनाची तपासणी केली. सुदैवाने प्रॉपेलरचं अथवा पात्याचं नुकसान झालेलं नव्हतं, परंतु शाफ्ट मात्रं गुरफटला होता. एव्हाना जहाज फटीग बे च्या परिसरात आलं होतं. सतत हालचाल करणारा हिमखंड कधी जहाजाच्या जवळ तर कधी लांब जात होता. हिमखंडाचा तो पाठशिवणीचा खेळ रात्रभर सुरु होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी सहाच्या सुमाराला ग्जो ने बर्फाचा आधार सोडला आणि पश्चिमेची वाट धरली. इंजिन बंद असल्यामुळे शिडं उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जहाजाचं मुख्य शिड उभारत असतानाच शिडाला आधार देऊन धरून ठेवणारं उपकरण नादुरुस्तं झालं!

इंजिन बंद आणि मुख्य शिड उभारलेलं नाही अशा धोकादायक अवस्थेत जहाज सापडलं होतं!

मुख्य शिड उभारणं शक्यं नाही हे ध्यानात येताच गॉडफ्रे हॅन्सनने मागच्या बाजूला असलेलं लहान शिड उभारलं. सुदैवाने कोणतीही अडचण न येता हे शिड उभारलं गेलं. सुदैवाने तासाभरातच मुख्य शिड उभारण्यात त्यांना यश आलं. मात्रं अद्यापही अलास्काचा किनारा आणि जहाजाच्या मध्ये बर्‍याच प्रमाणात बर्फ पसरलेला होता.

दुपारनंतर बर्फाचं हे आवरण इतकं घट्ट होत गेलं, की पश्चिमेला मार्गक्रमणा करणं जवळपास अशक्यं होऊन बसलं.

धुक्याचा पडदा दूर झाल्यावर पश्चिमेला दोन जहाजं अ‍ॅमंडसेनच्या दृष्टीस पडली. ही जहाजं किनार्‍यावरील एका तुलनेने खोलगट भागाच्या पश्चिमेला बर्फातून मोकळी वाट मिळण्याची प्रतिक्षा करत होती. एव्हाना हिमखंडांची हालचाल होण्यास सुरवात झाली होती. समोर असलेले हिमखंड ओलांडण्यात यश मिळालं तर पॉईंट बॅरॉच्या परिसरातील खुला समुद्र गाठता येणं सहज शक्यं होणार होतं!

अ‍ॅमंडसेनने एक धाडसी निर्णय घेतला!

हिमनगांतून जहाज घुसवत आणि प्रसंगी धडक देऊन हिमनग फोडून पश्चिमेला असलेला खुला समुद्र गाठण्याचा त्याने बेत केला!

अँटन लुंड सर्वात अनुभवी होता. त्याने सावधपणे हिमखंडात जहाज घुसवण्यासाठी योग्य मार्ग शोधण्यास सुरवात केली. अखेरीस एके ठिकाणी ठिसूळ बर्फ दिसताच त्याने अ‍ॅमंडसेनला तिथे जहाज घुसवण्याची सूचना दिली!

सुदैवाने जहाजासमोर काही अंतरपर्यंत खुलं पाणी होतं. या खुल्या पाण्यातून पूर्ण वारा भरलेल्या शिडाच्या जोरावर शक्य तितक्या वेगाने गॉडफ्रे हॅन्सनने समोर असलेल्या हिमखंडावर चाल केली!

जहाजाची पुढची बाजू हिमखंडाला धडकली!

जहाजावरील सर्वजण जागच्या जागी हादरले! डेकवरील अनेक वस्तू इकडे-तिकडे फेकल्या गेल्या. सुदैवाने जहाजावरील एकाही बोटीचं नुकसान झालेलं नव्हतं. सुकाणू नियंत्रण करणार्‍या हॅन्सन व्यतिरीक्त प्रत्येकजण जिवाच्या आकांताने जहाजाच्या आजूबाजूला असलेला बर्फ दुर करण्याच्या मागे लागला होता. इंचाइंचाने जहाज त्या हिमखंडात पुढे पुढे शिरत होतं! डेकवरील प्रत्येकजण बर्फाशी झुंजत होता. परंतु तो हिमखंड मागे हटण्यास तयार नव्हता. आपला निर्णय चुकीचा तर नव्हता असं क्षणभर अ‍ॅमंडसेनला वाटून गेलं. जहाज हिमखंडात फसलं, तर बाहेर निघणं खूपच कठीण गेलं असतं!

.... आणि अचानक त्या हिमखंडाचे दोन तुकडे पडले!
जहाज हिमखंडाच्या दुसर्‍या बाजूने बाहेर पडलं!

एका हिमखंडातून पार होण्यात यशस्वी झाल्याने ग्जो वरील सर्वांना आता हुरुप आला होता. भरवेगाने चाल करत त्यांनी दुसर्‍या हिमखंडावर हल्ला केला!

हा हिमखंड पूर्वीपेक्षा मोठा होता. परंतु ग्जो वरील कोणालाच त्याची पर्वा नव्हती. मोठ्या हूकच्या सहाय्याने डेकवरील प्रत्येक जण बर्फावर तुटून पडला होता. पूर्वीपेक्षा धीम्यागतीने जहाज पुढे-पुढे सरकत होतं, परंतु ग्जो वरील प्रत्येकजण त्वेषाने बर्फावर घाव घालत होता. कोणत्याही परिस्थितीत हिमखंड पार करायचाच या ईर्ष्येने ते जणू पेटले होते. परंतु तो हिमखंडही चिवटपणे त्यांची परिक्षा पाहत होता.

अखेर एका क्षणी ग्जो हिमखंडातून बाहेर पडलं!

जहाजावरील सर्वांनी एकच जल्लोष केला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधील शेवटचा अडथळा त्यांनी यशस्वीपणे ओलांडला होता!

पश्चिमेच्या दिशेने जाणार्‍या मोकळ्या खाडीतून ग्जो ने पुढचा मार्ग धरला. आता ती दोन्ही जहाजं समोरच दिसत होती. त्या जहाजांशी संपर्क साधण्याचा अ‍ॅमंडसेनचा विचार होता. परंतु संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला जोरदार पावसाला सुरवात झाली. निरुपायाने अ‍ॅमंडसेनने एका हिमखंडालगत नांगर टाकून पाऊस थांबण्याची वाट पाहण्याचा निर्णय घेतला!

तासाभराने पावसाचा जोर कमी झाल्यावर गॉडफ्रे हॅन्सनला पाच जहाजांशी शिडं दिसून आली. लवकरच जहाजावर शिडं उभारुन ग्जो ने पुढचा मार्ग धरला. अद्यापही वारा उत्तर-पूर्वेच्या दिशेने वाहत होता, त्यामुळे इंजिनाच्या वापराची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती!

रात्री दहाच्या सुमाराला ग्जो ने अलास्काच्या सर्वात उत्तरेकडील टोकाला वळसा घातला.

पॉईंट बॅरो!
२२ ऑगस्ट १९०६!

अलास्काच्या किनार्‍यावरील सर्वात उत्तरेच्या भागात प पोहोचल्यावर अ‍ॅमंडसेनच्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे जहाजावर नॉर्वेचा ध्वज फडकवण्याचा! रात्रीच्या अंधारातही नॉर्वेचा ध्वज जहाजावर डौलाने फडकू लागला!

पॉइंट बॅरो इथे असलेल्या जहाजांच्या दृष्टीस ग्जो आधीच पडलं होतं. ग्जो पॉइंट बॅरोच्या पश्चिमेला येऊन पोहोचलं असतानाच एक बोट जहाजाजवळ आली. डॅनिश-अमेरीकन धृवीय मोहीमेचा प्रमुख आयनर मिकेल्सन या बोटीत होता! मिकेल्सनचं डचेस ऑफ बेडफोर्ड हे जहाज पूर्वेकडे जाण्यासाठी बर्फ वितळण्याच्या प्रतिक्षेत होतं.

मिकेल्सनची भेट झाल्यावर ग्जो ने किनार्‍याजवळ येऊन नांगर टाकला. पॉईंट बॅरो इथे असलेल्या सर्व जहाजांच्या भोंग्यांच्या गजरात ग्जो चं पॉईंट बॅरो इथे आगमन झालं!

अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला!

हॅरॉल्ड डॉलर्स हे आर्क्टीकमध्ये शार्क्सच्या शिकारी जहाजांना इंधन आणि अन्नसामग्री नेणारं जहाज पॉईंट बॅरोलाच अडकून पडलं होतं. पूर्वेला जाण्याचा विचार त्यांनी रद्द केला होता! माँटेरेरी हे व्हेलच्या शिकारीसाठी आर्क्टीकमध्ये आलेलं जहाजही तिथे होतं. हिवाळ्यात बर्फात अडकण्यापूर्वीच माँटेरेरी आर्क्टीक सर्कलमधून सटकलं होतं! या सर्वांनी अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांना अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचण्याचं तेवढं बाकी राहीलं होतं. अमेरीकन सरकारच्या थेईस्ट या जहाजावरुन एका बोटीने जहाजाचा कॅप्टन आणि इतर अधिकारी अ‍ॅमंडसेनच्या भेटीला आले होते.

ग्जो वरील सर्वजण या अभिनंदनाच्या आणि स्वागताच्या वर्षावामुळे भारावून गेले होते. थोडी उसंत मिळाल्यावर अ‍ॅमंडसेनने हॅरॉल्ड डॉलर्स गाठलं. मायदेशातून आलेली पत्रं वाचण्यास ग्जो वरील प्रत्येकजण अधिर झाला होता. जहाजावर प्रवेश केल्यावर अ‍ॅमंडसेनला कोण भेटलं असावं?

कॅप्टन मॉग!

ईगल सिटीतून अ‍ॅमंडसेनचा निरोप घेऊन सॅन फ्रॅन्सिस्कोला गेल्यावर पुन्हा त्याची भेट झाल्याने मॉगला आनंद झाला. नॉर्वेतून आलेल्या पत्रांवर ग्जो वरील प्रत्येकाने झडप घातली. या वेळेस सर्वांना एका माणसाची मात्रं फार उणीव जाणवली.

गुस्ताव जूल विल्क!

ग्जो च्या डोलकाठीवरचं शिड सांभाळणारं उपकरण पुन्हा दुरुस्तं करणं आवश्यक होतं. हे उपकरण दुरुस्तं करण्यासाठी लुंडने जे लाकूड पैदा केलं होतं, त्याचा आकार पाहूनच अ‍ॅमंडसेनला धडकी भरली. 'त्याच्या आकाराने एखादे वेळी जहाज बुडायचं!' अ‍ॅमंडसेनच्या मनात आलं. अमेरीकन कॅप्टननी भेट दिलेल्या अनेक वस्तू आणि खाद्यपदार्थ जहाजावर चढवण्यात आले आणि २३ ऑगस्टच्या रात्री ग्जो ने पॉईंट बॅरो सोडलं.

ग्जो पॉईंट बॅरो इथून बाहेर पडत असताना ट्रेझर आणि कार्लक ही दोन्ही जहाजं पॉईंट बॅरो इथे पोहोचली. त्यांच्या पाठोपाठ थेईस्ट हे जहाजही तिथे पोहोचलं. त्यांचा निरोप घेऊन ग्जो ने दक्षिणेचा मार्ग धरला.

पॉईंट बॅरो इथे किनार्‍याच्या दिशेने बर्फ येत होता. काही वेळातच ग्जो ने केप बेल्चर ओलांडलं. आर्क्टीक मधल्या बर्फाचा इथे अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांनी निरोप घेतला! बर्फाचे लहानसहान पुंजकेच इथे दिसत होते!

२४ ऑगस्टच्या सकाळी भर समुद्रातील एका लहानशा बेटावर बसलेला एक प्राणी हेल्मर हॅन्सनच्या नजरेस पडला. ग्रीनलंडचा किनारा सोडल्यापासून या महाभागाचं त्यांना दर्शन झालं नव्हतं... वॉलरस!

प्रत्येक दिवसागणिक तापमानात होणारी वाढ सर्वांनाच सुखकारक वाटत होती. ३० ऑगस्टला सकाळी ११ वाजता त्यांना बेरींग सामुद्रधुनीचं पूर्वेच प्रवेशद्वार असलेलं केप प्रिन्स ऑफ वेल्स दृष्टीस पडलं. अलास्काचं हे सर्वात पश्चिमेकडील टोक!


केप प्रिन्स ऑफ वेल्स

केपवरील डेकडीचा माथा धुक्यात वेढलेला होता. इथून सुमारे पंचवीस मैलाचा एक वाळूचा पट्टा उत्तरेला पसरलेला आहे. या वाळूच्या पट्ट्याच्या दोन्ही बाजूला खोल पाणी आहे. त्यामुळे सतत सागराची खोली मोजत राहूनही काहीही उपयोग नव्हता! अखेर जमिन दिसताच खोल पाणी गाठण्याचा अ‍ॅमंडसेनने निर्णय घेतला. या तर्‍हेने काही अंतर गेल्यावर रात्रीच्या सुमाराला त्यांच्या नजरेला एक ओळखीची खूण दिसली.

फेयर वे रॉक!

भर समुद्रातून धूमकेतूप्रमाणे उगवलेला हा खडक वर्षानुवर्षे बेरींगच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या जहाजांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत होता.


फेयर वे रॉक

फेयर वे रॉक नजरेस पडताच बेरींग सामुद्रधुनीचा नेमका मार्ग अ‍ॅमंडसेनच्या ध्यानात आला. सामुद्रधुनीतून दक्षिणेच्या मार्गावर असताना सामुद्रधुनीतील डायोमेड्स बेटं हॅन्सनच्या नजरेस पडली. एस्कीमोंची भरपूर मोठी वसाहत या बेटांवर आहे. अनेक वर्षे अमेरीकन जहाजं इथून अन्नसामग्री खरेदी करत असत. व्हेलच्या शिकारीसाठी एस्कीमोंची भरतीही या बेटावरुन होत असे. या बेटांमधून जहाज जात असताना अनेक एस्कीमो किनार्‍यावरुन हात हलवून जहाजाला निरोप देत होते!

डायोमेड्स बेटांपैकी पश्चिमेला असलेलं मोठं बेट रशियाच्या सैबेरीयात येतं तर पूर्वेचं लहान बेट अलास्कामध्ये. हिवाळ्यात बर्फ गोठल्यावर या दोन बेटांच्या दरम्यान बर्फाचा पूल तयार होतो. या पुलावरुन अमेरीकेतून रशियात चालत जाता येतं! आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा (इंटरनॅशनल डेट लाईन) या दोन्ही बेटांच्या मधून जात असल्याने स्थानिक प्रमाणवेळेनुसार रशियातील मोठं डायोमेड्स बेट अलास्कातील लहान डायोमेड्स बेटाच्या २१ तास पुढे आहे!


डायमोडेस बेटं

अटलांटीक महासागरातून आर्क्टीक मध्ये प्रवेश केलेल्या अ‍ॅमंडसेनच्या ग्जो जहाजाने बेरींगच्या सामुद्रधुनीतून अखेर पॅसिफीक महासागरात प्रवेश केला होता!

नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्यात अ‍ॅमंडसेन आणि त्याचे सहकारी यशस्वी झाले होते!

रात्रं होण्यापूर्वी अलास्काच्या पश्चिम किनार्‍यावरील केप यॉर्क गाठण्याचा अ‍ॅमंडसेनचा विचार होता. परंतु केप यॉर्कपासून दहा मैलांवर असताना रात्रीच्या मुक्कामासाठी तिथे पोहोचणं शक्यं नाही असं अ‍ॅमंडसेनच्या ध्यानात आलं. अखेर केप यॉर्कच्या उत्तरेला असलेलं नोम गाठण्याचा अ‍ॅमंडसेनने बेत केला.

नोम इथे सुरक्षीत बंदर नव्हतं, त्यामुळे ग्जो ने भर समुद्रातच नांगर टाकला. एका लहानशा होडीतून अ‍ॅमंडसेन आणि इतर सर्वजण नोमच्या किनार्‍यावर पोहोचले.

३१ ऑगस्ट १९०६!


नोम इथे नांगरलेलं ग्जो जहाज


नॉर्थवेस्ट पॅसेजचे यशस्वी दर्यावर्दी - नोम. ३१ ऑगस्ट १९०६

नोम इथे पोहोचल्यावर ग्जो वरील सर्वांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडणारं ग्जो हे पहिलंच जहाज असल्याने सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला!

नॉर्वेजियनांच्या दृष्टीने आणखीन एक खास बातमी त्यांची वाट पाहत होती.
नॉर्वेच्या स्वातंत्र्यासाठी स्वीडनशी सुरु असलेली चर्चा यशस्वी झाली होती!

नॉर्वे हा आता स्वतंत्र देश झाला होता!

ईगल सिटी इथल्या वास्तव्यात अ‍ॅमंडसेनला न मिळालेली ही महत्वपूर्ण बातमी कळताच त्याने नॉर्वेचा राजा ७ वा हकोन याला पत्रं लिहीलं. नॉर्थवेस्ट पॅसेजचं आपलं यश हे स्वतंत्रं नॉर्वेच्या भविष्यासाठी प्रेरक ठरेल अशी त्याने आशा व्यक्तं केली. भविष्यात आणखीन सफरी करण्याचा इरादाही त्याने व्यक्तं केला होता!

जहाजाच्या शिडाचं काम आटपल्यावर ५ सप्टेंबरला ग्जो ने नोम सोडलं आणि १९ ऑक्टोबरला सॅन फ्रॅन्सिको बंदरात नांगर टाकला!

क्रमशः

(पुढील भाग अंतिम)

प्रवासलेख

प्रतिक्रिया

एस's picture

8 Oct 2014 - 11:32 am | एस

वा!

कपिलमुनी's picture

8 Oct 2014 - 4:17 pm | कपिलमुनी

गुगल मॅप वर हा प्रवास दाखवता येईल का ?

स्पार्टाकस's picture

8 Oct 2014 - 8:49 pm | स्पार्टाकस

शेवटच्या भागात गूगलमॅपची पूर्ण लिंक देत आहे. इंटरअ‍ॅक्टीव्ह मॅप आहे, त्यामुळे नेमकी जागा कळू शकेल.

कपिलमुनी's picture

8 Oct 2014 - 9:21 pm | कपिलमुनी

धन्यवाद

राघवेंद्र's picture

9 Oct 2014 - 12:34 am | राघवेंद्र

शेवटच्या भागाच्या प्रतिक्षेत ... :)

मुक्त विहारि's picture

9 Oct 2014 - 12:52 am | मुक्त विहारि

हा पण भाग आवडला...

(सपादकांना नम्र विनंती, की शेवटचा भाग आल्यावर, सगळ्या लिंक एकमेकांना जोडल्या तर फार उत्तम)

सुरेख!फार छान चालली अाहे मालिका!