टोलनाक्यावर...

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
26 Aug 2014 - 4:44 pm

मी टोलनाक्यावर उभा असतो.

हौसेने नाही राहात.

टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब.

मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल.

उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.

पण मी टोलनाक्यावर उभा असतो.

..

तसा मी ब्राह्मणाचा.

अण्णाआईसोबत चांगला होतो.

अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत.

आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत.

मोहरी करपली, तडतड थांबली..

मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं.

अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर.

मग वर्षं वर्षं.

एकदम आईला म्हणाले तू माझी माऊली.. आणि गेले निघून.

मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या जिवाच्या वर्षामागून वर्षं..

आईच्या जिवावर..

अन नानांच्या..

अण्णा गेले अन नाना आले.

आईच्या मदतीला खूप जण पैदा झाले एकदम..

नानांनीच आईसमोर शाळा घेतली माझी.. ताळ्यावर ये म्हणे. गाव सोड म्हणे. शिक्षण नाही म्हणे.. शिपाई म्हणूनही लायकी नाही म्हणे.

नानांनीच लावला टोलनाक्यावर.

साला भाड्या.. आई घेतलीन माझी..

..

दिवसभर टोलनाक्यावर मी उभा असतो.

रापरापून कातडीचा बामणपणा कंप्लीट गेलाय.

मला कलेक्शनला पण नाही उभे करत.

लायकी नाही माझी... नाना म्हणालेले तशी.

मी फक्त उभा राहतो. बूथपासून लांब. दबा धरुन.

टोल चुकवून पळणार्‍या गाडीला कोलदांडा घालायला.

दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.

दिवसात एकतरी माजुरडा भेटतो.

कोणाकोणाची नावं सांगून टोलऐवजी कचाकचाकचा बडबडत राहतो.

कलेक्शनवाले त्याच्यावर चढतात.

मी कोलदांडा काढत नाही.

मागून अडकलेल्या गाड्यांच्या केकाटण्याचा जोर मिन्टामिन्टाला डब्बल होत असतो.

मला काम मिळाल्याचा आनंद असतो.

शेवटी त्याने नोटा भिरकावल्या की मी कोलदांडा काढतो.

अस्सा माजुरडा दोन दिवस भेटला नाही तर नोकरीची चिंता लागते..

पायाचे नळ आणखीन दुखतात. कंटाळा येतो.

उन्हात जळत मी टोलनाक्यावर उभा असतो.

टोल भरताना दरेक गाडीची खिडकी उघडते अन माझ्यापर्यंत पोचेस्तो बंद होते.

वर सरकणार्‍या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.

त्या बंद होणार्‍या काचेतून मधेच दिसतो एक गोर्‍या गोर्‍या छातीचा तुकडा. आणि त्यात एक घळ.

पायातली ताकद एकदम जाते.

पण कोलदांडा पकडून मी उभाच असतो.

दोन वर्षं गेली तिसरंही जाईल.

उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.

पण मी टोलनाक्यावर उभाच असतो.

......

भाषाप्रकटन

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

26 Aug 2014 - 4:50 pm | सौंदाळा

अस्वस्थ केलत.
त्यांच्या बाजुने असा विचार कधी केला नव्हता.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Aug 2014 - 4:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत.

मोहरी करपली, तडतड थांबली..

साला भाड्या.. आई घेतलीन माझी..

दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.

वर सरकणार्‍या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.

हे खास गवि टच.. बाकी या सगळ्याचा एकत्रित परीणाम... द्येवा... __/\__!!

सुहास झेले's picture

26 Aug 2014 - 5:15 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो.... :)

सूड's picture

26 Aug 2014 - 5:01 pm | सूड

ह्म्म !!

आदूबाळ's picture

26 Aug 2014 - 5:13 pm | आदूबाळ

जबरदस्त!

असा एक इसम परिचयाचा आहे.

पैसा's picture

26 Aug 2014 - 5:16 pm | पैसा

थोडक्या शब्दात संपूर्ण चित्र काढलंत त्याचं. गळक्या लो वेस्ट जीन्स सावरत कुठेतरी हरवलेले भकास डोळे मिरवीत अन पायात स्लीपर्स फरपटत चालणारी अशी पोरं जिथे तिथे पाहते तेव्हा पोटात तुटतं अगदी.

धन्या's picture

27 Aug 2014 - 3:34 pm | धन्या

अगदी अगदी.

अशी टोलनाक्यावरची, हाटेलातली, हापिसातली हाऊसकीपींगची पोरं पाह्यली की काळजात धस्स होतं. शिकलो नसतो तर कदाचित पोट भरण्यासाठी आपणही असेच कुठेतरी अडगळीत असतो हा विचार मनात चमकून जातो. :(

ऑफीसची बस जिथून पकडतो तिथले फुटपाथवरचे भाजीवाले, फळविक्रेते पाहील्यावर अगदी हीच भावना मनात येते.

सौंदाळा's picture

27 Aug 2014 - 4:40 pm | सौंदाळा

धन्या, गवि आणि इतर
आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का?
जर सुरुवातीपासुनच मी शिकलो नाही, टगेगिरी केली आणि नंतर ही कामे करायला लागलो तर माझ्या मनाला तितक्याच वेदना होतील का? बहुधा नाही.
काही कळत नाही :(
लेख म्हणुन गविंनी मस्तच लिहीलयं पण त्या टोलवरच्या माणसाला सुध्दा मनातुन असेच वाटत असेल का? कारण वरकरणी बघुन तरी यातले बरेच लोक मजेत असतात असे वाटते.

धन्या's picture

27 Aug 2014 - 7:51 pm | धन्या

धन्या, गवि आणि इतर
आपण आपल्याला त्यांच्या जागी बघतो पण मनात मात्र आपली सद्य परिस्थिती (नोकरीतले तणाव, घरगुती तणाव, आपले पांढरपेशे विचार) आणि काम्/मिळकत मात्र त्यांची असा विचार करतो म्हणुन जास्त वेदना होतात का?

माझ्यापुरते उत्तर "नाही" असं आहे.

मी कन्व्हर्टेड पाढरपेशा आहे. माझ्या शिक्षणाने माझं जगणं एकशे ऐंशी अंशात फीरलं. मात्र आयुष्याची पहिली वीस बावीस वर्ष तळागाळातल्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलं आहे, प्रसंगी स्वतःही अनुभवलंय. श्रमजीवी माणसं पाहिली की चर्रकन माझं बालपण आणि युवावस्था माझ्या नजरेत उभं राहते. असो.

खटपट्या's picture

28 Aug 2014 - 12:46 am | खटपट्या

सेम हीअर

पैसा's picture

27 Aug 2014 - 9:19 pm | पैसा

टोअलनाक्यावरच्या मुलाच्या मनात काय चालू असेल मी बहुतेक सांगू शकणार नाही. पण मला त्याच वयाच्या माझ्या मुलांचं आयुष्य आणि त्याचं आयुष्य दिसतं. आमच्याकडे पैसे आहेत, म्हणून मुलांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांचं आयुष्य उद्या याहून नक्कीच चांगलं असेल. या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच. आज तो मजेत दिसतो आहे कदाचित, पण काही वर्षात तो कुठे असणार आहे? विविध व्यसने, क्षय, एड्स च्या विळख्यात? की गुन्हेगारीकडे वळून सगळ्या समाजावर सूड घेणारा? की व्यसने आणि इतर हजार भानगडी करून अकाली मरून जाणार आहे हा?

मुक्त विहारि's picture

27 Aug 2014 - 11:41 pm | मुक्त विहारि

विशेषतः....

"आमच्याकडे पैसे आहेत, म्हणून मुलांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो."

अनुप ढेरे's picture

28 Aug 2014 - 10:03 am | अनुप ढेरे

या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.

सहमत. थोडी सहानुभुती वाटते त्यामुळे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Aug 2014 - 11:43 am | विश्वनाथ मेहेंदळे

या नाक्यावरच्या मुलाला त्या संधी कधी उपलब्धच झाल्या नसाव्यात ही शक्यता आहेच.

अशा लोकांना तुमच्या मुलाला मिळाल्या त्या संधी मिळाल्या नसतील पण म्हणून कुठल्याच संधी मिळाल्या नसतील ?

In majority cases, its all about choices. थोडा विचार केलात आणि आजुबाजुला पाहिलेत तर दोन्ही प्रकारची अनेक उदाहरणे मिळतील.

पैसे उपलब्ध करून देणे आणि योग्य सल्ले देणे, प्रसंगी दोन कानाखाली देऊन मार्गावर आणणे हेही महत्वाचे आहे असे मला वाटते. आणि तुझी दानत आहे तुझ्याच मुलाला पैसे देण्याची म्हणून ठीक आहे, नैतर पालकांची परिस्थिती बरी असूनही काहीजण (काही कारणाने का असेना) आर्थिक मदत अपुरी किंवा अजिबात करत नाहीत.

रेवती's picture

26 Aug 2014 - 5:49 pm | रेवती

लेखनशैली गविष्टाईल!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2014 - 7:45 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

वेल्लाभट's picture

26 Aug 2014 - 6:02 pm | वेल्लाभट

कापत गेली ओळ आणि ओळ बास !

सखी's picture

26 Aug 2014 - 9:12 pm | सखी

एक मोठ्ठा ____/\_____
कापत गेली ओळ आणि ओळ बास !

हे आणि असचं म्हणते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Aug 2014 - 6:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्त जमलीय.

एसमाळी's picture

26 Aug 2014 - 6:25 pm | एसमाळी

टोल नाक्यावर उभे राहणारे पोर दुसर्या वर्षी'ये देख पच्चास तोला 'म्हणुन मिरवत असतात.तुमची कथा वेगळी दिसतेय.

बहिरुपी's picture

26 Aug 2014 - 6:36 pm | बहिरुपी

____/\_____ विमान तुफान सुटलय गवि.

चाणक्य's picture

26 Aug 2014 - 7:53 pm | चाणक्य

जोरदार लिखाण

पिंपातला उंदीर's picture

26 Aug 2014 - 8:00 pm | पिंपातला उंदीर

अप्रतिम

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2014 - 9:03 pm | प्रभाकर पेठकर

वेगळीच शैली. पर दु:ख शितलम. टोल भरून पुढे जाताना अशा जीवांचा विचार करायची वेळही आली नाही आणि बुद्धीही झाली नाही.

जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.

मदनबाण's picture

26 Aug 2014 - 9:35 pm | मदनबाण

सुरेख !
जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.
हेच मलाही कळले नाही !

जाता जाता :- इतके टोलनाके दुचाकीने पार केले आहेत, पण २ चाकांना सुद्धा धड जाता येइल इतकी सुद्धा जागा नसते ! दुचाकीवाल्यांना टोल द्यायला लागत नाही त्याची ही अशी शिक्षा ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

सुहास..'s picture

28 Aug 2014 - 12:01 am | सुहास..

जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही. >

आयुष्यात पहिल्यांदा पेठकाकाशीं सहमत ! ( त्यांचे दुर्दैव ) ;)

बाकी ...असो ...अजुन खुप पालथा-पालथ करता आली असती, तरी ही गवि टच च असे म्हणेन ..

राखीव
वाश्या

टवाळ कार्टा's picture

26 Aug 2014 - 11:33 pm | टवाळ कार्टा

जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.

ह्यासाठी डायरेक्ट -६०...काठावर पास...नाहीतर "मेरिट"वाली कविता होती

जातीय टच देण्याचा मोह नव्हे. जात ही उगाच मिठासारखी थोडी घालायची म्हणून नव्हे.

या अश्या प्रकारच्या व्यक्तींचे जे विविध विनाशक गंड असतात ना.. त्यातला एक मुख्य हाही असतो.

फार तपशिलात जाणे शक्य नाही पण ब-याच तरुणांबाबत / पोरांबाबत केवळ उच्चवर्णीय असल्याचा पोकळ अहंकार हा परिस्थिती स्वीकारुन , स्वत:ची कुवत स्वीकारुन त्यावर मात करण्याच्या किंवा किमान अधिक अध:पात टाळण्याच्या वाटेत येतो.

आणि कष्टाची परिस्थिती / दोन पाय-या खाली उतरणारे राहणीमान स्वीकारावे लागलेच तर त्यात असा मनुष्य श्रमप्रतिष्ठा न पाहता न्यूनगंडाने कुचमत अन ती मनाने नाकारत रखडत राहतो. कधीच सिन्सियरली काही करु शकत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2014 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

गवि,

हे ब्राह्मणेतरांमध्ये कधी पाहिले नाही का? 'खानदानी' मराठ्यांमध्ये असे गंड पाहिले आहेत म्हणून म्हणतोय.

खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच. कोणतीही जात असो, त्या जातीमुळे इन इटसेल्फ आपण कोणीतरी कर्तृत्ववान आहोत असा एक घातक गंड / धारणा मनात असल्याने वेळप्रसंगी पडेल ते काम करुन स्वतःला सावरणे किंवा आपला नाकर्तेपणा सरळ स्वीकारुन त्यातून मार्ग काढणे यात मोठा अडथळा येतो.

बेकारतुंबडी पोराला नोकरी नाही आणि शिक्षणही घ्यायची इच्छा/कुवत नाही असे असतानाही जर प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो.

त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल.

बाकी प्रत्येकाची ऑब्झर्वेशन्स वेगळी आणि मतेही. असो.

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2014 - 3:37 pm | प्रभाकर पेठकर

>>>>खानदानी मराठा दाखवला असता तरी जातीयवादाचा टच का दिला हा प्रश्न विचारला गेला असताच.

मान्य आहे. आपण म्हणता तसा गंड मी ब्राह्मणांबरोबरच मराठ्यांमध्येही पाहिला आहे आणि चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंमध्येही पाहिला आहे. कुठल्याही एका जातीचा उल्लेख आला तरी जातियवादाचा आरोप होणारच पण म्हणूनच फक्त 'ब्राह्मण' जातीला (कींवा कुठल्याही एका जातीला) वेगळे काढून लक्ष्य न करता 'उच्चवर्णिय' असा उल्लेख आला असता तर वाक्यात सौम्यपणा आला असता असे वाटते. पण तसे न होता त्या मुलाचे 'ब्राह्मण्य' अधोरेखित केल्याने उच्च वर्णियांमध्येही फक्त ब्राह्मणांमध्येच असा गंड असतो असा (तुमची इच्छा नसातानाही) संदेश बाहेर जातो आहे.

बाकी, प्रत्येकाची मते वेगवेगळी ह्या बाबत १००% सहमत.

गवि's picture

27 Aug 2014 - 3:46 pm | गवि

मूळ भाव पोचला..

बाकी इतके टाळण्यासाठी उगाच:

तसा मी उच्चवर्णीयाचा..

रापरापून कातडीचा उच्चवर्णीयपणा कधीच गेलाय..

अशी वाक्ये लिहिणे हे सेन्सोरग्रस्त केविलवाण्या प्रकारचे दिसेल हो...

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2014 - 3:53 pm | प्रभाकर पेठकर

प्यूनचे किंवा पेपर टाकण्याचे, वेटरचे काम ऑफर केले तर "XXX जातीचा मी.. कितीही वाईट दिवस आले तरी 'हे' असले काम नाही करणार.. या थराला नाही जाणार.." असा गंड खूप खूप असतो.

त्यापेक्षा असा गंड नसलेला पोरगा शर्ट काढून बनियनवर उभा राहील आणि रस्त्याकडेला वडापाव किंवा काहीतरी सुरु करेल. नाहीतर प्यून तर प्यून पण आजच्या दिवसाची भ्रांत मान्य करुन ती नोकरी मनापासून करेल आणि स्थिर होऊ पाहेल.

गवि साहेब,

मला वाटतं हा एखाद्या जातीचा (हल्ली तरी) दोष नसून प्रत्येक व्यक्तिच्या परिपक्वतेचा प्रश्न आहे.
मी स्वतः ब्राह्मण असून आपण वर्णीलेल्या प्रत्येक वर्गवारीत काम केले आहे. ऑफिस हेल्पर, पेपर टाकणे, वडापाव विकणे वगैरे वगैरे सर्व केले आहे. आर्थिक गरज म्हणून नाही तर निव्वळ आवडी पोटी आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आयुष्यात प्रगती करण्यासाठीच. स्वस्थ बसून राहायची सवय लागू नये म्हणून. कष्टही केले, शिक्षणही घेतले आणि तथाकथित प्रगतीही केली. अवहेलनाही सहन केली (अगदी इथे आपल्या मिपावरही) पण माझा आत्मसन्मान कमी होत नाही. कारण कष्टांच्या प्रतिष्ठेला मी मानतो. ब्राह्मणांमधील अजून ३-४ अशी उदाहरणे मला माहित आहेत. तरी पण ब्राह्मणांमध्येही असा गंड असू शकतो ह्या विधानाशी सहमत आहे. पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल.

बाळ सप्रे's picture

27 Aug 2014 - 4:03 pm | बाळ सप्रे

पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही तर उच्चवर्णियांमध्ये असे म्हणावे लागेल

कोण म्हणतय फक्त ब्राह्मणांत गंड असतो?? या लेखात असं कुठेही प्रतीत होत नाही..
ज्याच्या डोक्यात ब्राह्मण वगैरे सतत घोळत असते त्यांनाच खटकेल हे..

ब्रिगेड ब्राह्मण वाद सगळीकडे अप्लाय करु नये.. कलाकृतीचा निखळ आनंद घ्यावा..

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2014 - 4:05 pm | प्रभाकर पेठकर

बरं!

नको नको नको. धाग्याचा विस्फोट (आणि इस्कोट) होऊ शकतो.

माझीही शॅम्पेन's picture

30 Aug 2014 - 9:04 pm | माझीही शॅम्पेन

जातीय 'टच' देण न देण हे सपूर्णपणे लेखकाच स्वा:तंत्र्य आहे ..
पण हा भाग वगळुनही लेख तितकासा गवि-पावरबाज वाटला नाही !!!

मुक्त विहारि's picture

26 Aug 2014 - 10:06 pm | मुक्त विहारि

दंडवत...

जातीय 'टच' देण्याचा मोह का झाला आहे, कळले नाही.
हेच मलाही कळले नाही !
पण एकंदर लिखाण भिडले मनाला

खटपट्या's picture

26 Aug 2014 - 10:45 pm | खटपट्या

मनाला भिड्ला !!!

निशदे's picture

26 Aug 2014 - 10:52 pm | निशदे

अफाट लिहिले आहे गवि. तुमचे लेखन आले की लगेच वाचावेसे वाटते ते या अशा लेखनामुळे.

...उत्तम कथन.

पाचगणीमध्ये रहायला असताना अशा प्रकारची बरीच पोरं बघितलीत.
टोलनाका वाली नाही, ब्राहमण देखील नाहीत. पण अगदी अश्शीच.
कसंबसं शालेय शिक्षण (इंग्रजी माध्यमातून) पूर्ण करुन न करुन बिअर, दारुच्या नादाला लागलेली.
२०-२२ पर्यंत एकदम टकाटक, अस्खलित इंग्लिश बोलत पर्यटकांवर छाप टाकत चार दोन लफडी करुन थोडं कळू लागेस्तोवर जमिनीला पाय टेकायला लागणारी.
मग हळू हळू उतार सुरु होतो.
पूर्वी छान दिसणारे केस हळूहळू गळू लागतात. टक्कल पडतं. चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढू लागतात.
जीन्स टी शर्ट मळलेले अंगावर चढू लागतात. बिअरच्या बाटल्यांच्या जागी नि चखण्याऐवजी देशी दारुच्या दुकानासमोर पाय घुटमळू लागतात. पर्यटक आले की त्यांच्या मागं मागं फिरणं सुरु होतं नि चेहर्‍यावर आर्जवं.

असो...!

काळा पहाड's picture

27 Aug 2014 - 9:44 am | काळा पहाड

थोडक्यात म्हणजे तुम्ही "पाचगणी" त शिकायला होतात. :)

प्यारे१'s picture

27 Aug 2014 - 11:44 am | प्यारे१

शिकायला असणं वेगळं तुम्ही लिहीलंय तसं.
आमचं गाव पाचगणीच. राहायला होतो. (राहायला बरोबर की रहायला?)

विकास's picture

27 Aug 2014 - 1:53 am | विकास

लेखन खूप आवडले. अशा प्रकारच्या कामातल्या माणसांच्या जीवनाची कल्पना करवत नाही.

ब़जरबट्टू's picture

27 Aug 2014 - 9:25 am | ब़जरबट्टू

गविटच....

सविता००१'s picture

27 Aug 2014 - 12:35 pm | सविता००१

__________/\____________

गवि जातीयतेच्या टच संदर्भात एक आठवण
माझ्या एका ओळखीच्यानी नगरपालीकेत असाच एक गणंग कामाला लावला होता. त्याला मैल्याच्या गाडीवर ड्युटी दिली. तेंव्हा त्या मुलाचा बाप तक्रार घेवून आला होता की ब्राम्हणाच्या मुलाला मैल्याच्या गाडीवर पाठवताना जरा विचार करा. तुम्ही हे मुद्दामहून करता आहात.

मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या

बाकी गवि तुमचे हे शब्द चपखल आलेले आहेत.

कवितानागेश's picture

27 Aug 2014 - 4:00 pm | कवितानागेश

.....वास्तव.

बाबा पाटील's picture

27 Aug 2014 - 7:21 pm | बाबा पाटील

साहेबांनो पोटाच्या आगी पुढे कसलीच जात नसते,ब्राम्हण, मराठा,वैश्य,क्षुद्र असल काहीच नसत्,असते ते फक्त जळणार पोट,त्याच्या भुकेपुढे तुमच्या जातीला विचारतो कोन ? कोठ्यावरच्या बाईला नक्की कुठली जात असते, बाकी जावु द्या सिमेवर लढणार्‍या सैनिकाची जात माहिती असते का ? भुकेल्या पोटी कोन जातीचा विचार करतो, नवव्या महिण्याची गर्भार विठाबाई मांग पोटासाठीच तर फडावर नाचली होती ना ? जाती दोनच - एक असते रिकाम्या अथवा अर्ध पोटाची आणी दुसरी असते तुडुंब भरलेल्या ढेरपोट्यांची...

बाळ सप्रे's picture

28 Aug 2014 - 11:51 am | बाळ सप्रे

सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं ही इच्छा असावी.. रिकाम्या किंवा अर्धपोटींची कणवही असावी.. म्हणून बाकी सगळ्यांची 'तुडुंब भरलेले ढेरपोटे' अशी हेटाळणी का?

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2014 - 12:00 pm | प्रभाकर पेठकर

मिपावर लेखनस्वातंत्र्य आहे.

बॅटमॅन's picture

28 Aug 2014 - 12:20 pm | बॅटमॅन

सहमत. हेटाळणीचा सूर खटकला.

दशानन's picture

27 Aug 2014 - 8:03 pm | दशानन

__/\__

दादा कोंडके's picture

27 Aug 2014 - 9:48 pm | दादा कोंडके

जातीचा उल्लेख खट्कला नाही. उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.

कवितानागेश's picture

28 Aug 2014 - 12:36 am | कवितानागेश

काय झालय तरी काय मला?! :)
चक्क दादा कोंडकेशी सहमत.
अवंतरः प्रत्येकात काहितरी पोटेन्शियल असतंच. ते लहानपणीच ओळखले गेले आणि प्रोत्साहन मिळालं तर ठिक आहे. नाहीतर हे असंच फ्रस्ट्रेशन कुठलेही काम करणार्‍याच्या मनात कुठल्याही क्षणी येउ शकतं...

उलट बामनाची पोरं काय नापास झालीतरी भटजीगीरी करून बक्कळ पैसा कमवतात, हे म्हणणार्‍याची कीव येते.

सहमत!!!! उचलली जीभ अन लावली टाळ्याला याचे उत्तम उदा.

नितिन थत्ते's picture

28 Aug 2014 - 8:42 am | नितिन थत्ते

प्रकटन आवडले.

अशा प्रकारची, समाज ज्यांना फुकट गेलेली म्हणतो अशी खूप माणसं आसपास दिसतात. बर्‍याचदा योग्य वेळी योग्य दिशा न सापडल्याने (किंवा तत्कालीन मोहात अडकून ती दिशा न घेतल्याने) अशी परिस्थिती ओढवते. [वर पैसाताईंनी म्हटल्यानुसार संधीची उपलब्धता जशी नसते तशी कधीकधी मोहातून बाहेर काढणारेही नसतात].

सुधीर's picture

28 Aug 2014 - 11:10 am | सुधीर

__/\__

आयुर्हित's picture

28 Aug 2014 - 12:58 pm | आयुर्हित

भयाण परिस्थिती रेखाटली आहे आपण.अभिनंदन!

नायकाची एकच गोष्ट खटकली: "दोन वर्षं गेली तिसरंही जाईल" हे म्हणण्याची वॄत्ती.
"उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.पण मी टोलनाक्यावर उभाच असतो" ह्या परिस्थितीतुन बाहेर न पडण्याची वॄत्ती. हिच वॄत्ती नोकरी करणार्‍यांच्या नशिबी,नोकरदार वर्गाने ओढवून आणलेली असते.

जिजाऊंनी शिवबाला स्वप्न पहायला, संघर्ष करायला शिकवले तर शहाजीराजांनी असमाधानी रहायला.

आपण पालक म्हणुन कमी पडलो कि असे दिवस पाल्याच्या वाट्याला येवू शकतात. पाहिजे त्या कॉलेजला,हव्या त्या विषयाला दाखला न मिळाल्यामूळे किंवा हवे तितके गुण न मिळाल्यामुळे, हवा तो साथीदार न मिळाल्यामुळे नाराजी येते. मग ती आयुष्यभर टिकुन रहाते. मग कोणत्याही कामात, शिक्षणात लक्ष लागत नाही. मन नेहमी भुतकाळात रहाते/रमते आणि येवु घातलेल्या अगणित संधी हातातुन निघुन जातात. मग आहे त्यात समाधान मानावे लागते.

माझ्या मते दोनच जाति आहेत या जगात:
१)उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहुन ते सत्यात आणण्यासाठी संघर्ष करणारे.
२)आपले सामर्थ्य न ओळखता, आहे त्या परिस्थितीला शरण जाणारे.

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2014 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर

आणि

३) आपले सामर्थ्य/कुवत ओळखुन, न कुरकुरता, आहे त्यात समाधानी राहणारे?

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 2:11 am | आयुर्हित

असमाधानी रहा! आणि उपहारगृहाची (रेस्टॉरंट)परवानगी आणाच!

समीरसूर's picture

28 Aug 2014 - 2:55 pm | समीरसूर

कविता जमली आहे खासच!

माझ्या मते कवींनी एकदा अशी काही भडभडून कविता सणकीत लिहून झाली की अजिबात त्याच्यावर प्रेस कॉन्फ्रन्स घेऊन समजावणे, समर्थन, विरोधी मत खंडन वगैरे करत बसू नये. नो रिप्लाइ लागू करावा आणि गप्प बसावे. कलाकृती आहे तशी उभी केली की काम संपले. काहीजण चौथऱ्यावर ठेवताहेत तर काहीजण क्रेन लावून उचकटताहेत असे होतंय हीच पावती आहे.
आवडली प्रतिक्रियासह.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Aug 2014 - 10:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ही कविता आहे? च्यायला मी ललित म्हणून वाचल
येडाच आहे मी पण.... ;)

तिमा's picture

29 Aug 2014 - 8:52 pm | तिमा

त्या मुलाच्या मनांतली कळ तुम्ही नीट पोचवलीत आमच्यापर्यंत! गवि, तुमची मिकाने लिहिलेली वाक्यं खास आवडली. एक कडक सॅल्युट!!

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2014 - 9:42 am | राजेश घासकडवी

लेखन आवडलं. अगदी मोजक्या शब्दांत एक व्यक्तिचित्र उभं राहतं. अशी माणसं दिसतात आसपास. त्यांच्या काय कथा असतील असा प्रश्न उपस्थित होतो. या कथेतून त्या प्रश्नाचं एक उत्तर मांडलेलं आहे. अर्थातच प्रत्येक कथा वेगळी असते, त्यामुळे उत्तर हे शेवटचं नसतं. पण अशी उत्तरं शोधण्यातूनच डोळ्यासमोर काही चित्रं निर्माण होतात, त्यातलं एक हृदयस्पर्शी चित्र मांडलेलं आहे. कॅलिडोस्कोपचा एक विशिष्ट कोन दाखवणारं. त्या काचतुकड्यांतून हे एकच चित्र निर्माण होणार नाही, इतरही अनेक असतील. गविंवी आपला कॅलिडोस्कोप वेगवेगळ्या कोनांतून, वेगवेगळ्या दिशांना फिरवून अशीच चित्रं मांडत राहावं

बाकी 'जातीय टच' विषयी इतकी चर्चा का झाली ते कळलं नाही. अशा प्रकारचे सगळे टच टाळले तर रेलवेच्या वेळापत्रकापलिकडे काहीच शिल्लक राहणार नाही. व्यास जर या जातीय टचबद्दल सेन्सिटिव्ह असते तर कर्णाची वेदना त्यांना कशी उभी करता आली असती?