माफ करायचं...

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
4 Aug 2014 - 3:47 pm

आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने.
मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर.
वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते.
माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते.
ज्या व्यक्तीने दुखावले त्या व्यक्तीचा बदला घेण्याची भावना प्रबळ होत जाते.
हा सुड कसा घेता येईल याचे मन सतत चिंतन करु लागते.
समोरच्या व्यक्तीला धडा शिकवण्याच्या नादात आपणच सुडाच्या, क्रोधाच्या आगीत जळत राहतो.
किंवा अगदीच तसं झालं नाही तरी आपल्या दु:खाला कुणीतरी दुसरा कारणीभूत आहे या विचारांनी मन खिन्न होते.
तो असं बोलला नसता किंवा त्याने असं केलं नसतं तर हा विचार मनात पिंगा घालू लागतो.
दुसर्‍याला त्रास कसा देता येईल किंवा दुसर्‍यामुळे आपण कसे दु:खी आहोत या विचारांनी आपली झोप उडते.
आपणच पेटवलेल्या वणव्यात आपणच होरपळत आहोत हे आपल्या गावीही नसते.
हा वणवा विझवून आपण आपल्या जखमेवर हळूवार फुंकर मारु शकतो हे आपल्याला कळत नसते.
फार काही करावं लागत नाही त्यासाठी.
ज्याने आपल्याला दुखावले, शब्दांतून किंवा कृतीतून, त्याला माफ करायचे.
अगदी मनापासून.
तुमच्या-आमच्यासाठी माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले त्याच्याकडे दुर्लक्ष करणे.
खरं नाही ते तितकंसं.
माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं.
ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे.
मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.
कधी कधी नुसताच स्पर्श राहतो.
मात्र असे माफ करण्यासाठी आपल्याला दुखावणार्‍या व्यक्तीला समजून घ्यावे लागते.
मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, करुणा निर्माण व्हावी लागते.
माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे.
माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.
माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले, ती व्यक्ती माणूस म्हणून स्खलनशील आहे, तिच्याकडून चूका होऊ शकतात हे स्विकारणे.
माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे.
आपणच पेटवलेल्या क्रोधाच्या, सुडाच्या वणव्यावर हळूवार फुंकर मारणे.
थोडासा आपल्याला दुखावणार्‍या माणसाचा विचार करायचा.
तो ही आपल्यासारखाच माणूस आहे, चूका करु शकणारा.
स्वतःबद्दलच्या आणि सभोवतालच्या जगाबद्दलच्या भ्रामक विचारांच्या जाळयात अडकलेला.
कुठेतरी सुरक्षितता, मान-सन्मान, स्विकृती शोधणारा.
परिस्थीतीवर ताबा ठेवू पाहणारा.
स्वतःच्या जगाबद्दलच्या अपेक्षा पुर्ण न झाल्यामुळे भेदरलेला.
आणि या सार्‍याच्या मागे असलेला तो आहे तुमच्यासारखंच निसर्गाचे लेकरु, मनःशांतीच्या शोधात असलेला.
न जाणो त्याने लहानपणापासून काय झेललं असेल, कशा-कशाला तोंड दिलं असेल.
त्याला कसं घडवलं गेलं असेल, तो कसा घडला असेल.
कुठल्या विचारांना त्याने आपलंसं केलं असेल, कुठल्या विचारांना त्याने धुडकावून लावलं असेल.
आजचे त्याचे विचार, त्याची कृती कदाचित स्विकारण्याजोगी नसेल.
पण आत खोलवर कुठेतरी हा त्याच्यापरीने मार्ग शोधण्याचा प्रयत्न असेल.
म्हणूनच, सोडून दयायचं.
माफ करायचं...

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

सूड's picture

4 Aug 2014 - 3:50 pm | सूड

आवडलं आणि पटलंही!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2014 - 7:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यासेठ, विचार आवडला आणि पटलाही. हं आता वास्तवात किती जमुन येईल ते कै सांगता येत नै.

-दिलीप बिरुटे

सौंदाळा's picture

4 Aug 2014 - 3:52 pm | सौंदाळा

छान लेख.
आवडला, पटला
पण
कळत पण वळत नाही धन्या :(

अनेक विचार मनात येतात. एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं

एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं

अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं.

काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

लेख उत्तम आहे, पण अंशतःच पटला. ते एक असोच.

प्यारे१'s picture

4 Aug 2014 - 3:59 pm | प्यारे१

लिखाण आवडलं.
माफ करावंच पण माफ करताना अहंकार आडवा येऊ देऊ नये.
कालांतरानं मी(च) एकटा शहाणा असा गैरसमज होऊ शकतो.
बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.

बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.

हे एव्हढं कळलं की माफ करणं खुप सोपं जातं. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपला मनस्ताप कमी होतो. :)

प्यारे१'s picture

4 Aug 2014 - 4:18 pm | प्यारे१

दारुचा अम्मल नि स्वभावाचा अम्मल सारखाच. बर्‍याचदा ती व्यक्ती एखाद्या घटनेनंतर नेमकी कशी वागेल हे 'प्रेडीक्ट' करता येतं. नि 'अशी नाही वागणार तर कशी वागणार' असा प्रश्न पडून त्रास न होता मौज वाटते. ;)
(अर्थात स्वभावाचा त्रास त्या व्यक्तीलाच होत असेल तर तिला समजावण्याचा प्रयत्न करावा. न ऐकल्यास 'अच्छा' म्हणावं.)

पिलीयन रायडर's picture

4 Aug 2014 - 4:02 pm | पिलीयन रायडर

केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं...
आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. पण आता हे वाचुन माफ केलं..
ह्यासाठी नाही की त्या व्यक्तीकडुनही चुका होऊ शकतात वगैरे विचार केला... ह्यासाठी की आपल्याला आपणच त्रास करुन घ्यावा मुळात कुणाचीच एवढी लायकी नसते... शिवाय ह्या जन्मातलं इथेच भोगुन जायचयं.. तेव्हा कधी ना कधी न्याय होईलच..

बरंय.. आज अजुन एक विषय संपवला!

धन्यवाद...!

टवाळ कार्टा's picture

4 Aug 2014 - 4:58 pm | टवाळ कार्टा

खुप "ब्याटींग" करायचा का "तो" ;)

पिलीयन रायडर's picture

4 Aug 2014 - 5:34 pm | पिलीयन रायडर

दोन्ही चुक..!!

तुम्ही म्हणताय ते फक्त मनोरंजनाचे स्त्रोत आहे.. बाकी काही नाही!!

टवाळ कार्टा's picture

4 Aug 2014 - 5:42 pm | टवाळ कार्टा

संतोष जाहला :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

10 Aug 2014 - 9:08 pm | पुण्याचे वटवाघूळ

केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं...
आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं..

असे लोक असणारच ही बेशर्त स्विकृती केलेली बरी :)

मस्त लिहिलं आहेस धन्या. आवडलं. :)

मूकवाचक's picture

4 Aug 2014 - 8:34 pm | मूकवाचक

+१

मैत्र's picture

4 Aug 2014 - 4:18 pm | मैत्र

का कुणास ठाऊक, अशाच विविध विचारांच्या फेर्‍यात होतो /आहे.
पण या संयत, नेमक्या शब्दांनी काहीसं शांत केलं आहे मनाला.
एका दिवसात / एका मिनिटात पचवता नाही येणार हा विचार. पण किमान प्रयत्न तर सुरू झाला आणि त्यासाठी काही प्रमाणात लॉजिकल, अभिनिवेश किंवा हेच कसं बरोबर असा कसलाही आग्रह न धरणारा हा लेख नक्कीच कारणीभूत आहे आणि पुढेही उपयोगी पडेल.

अनेक धन्यवाद !!

तिमा's picture

4 Aug 2014 - 4:24 pm | तिमा

लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. सूडाची भावना न ठेवणे शक्य आहे पण काही झालेच नव्हते असे आपल्या मनाला पटवणे कसे शक्य आहे ?

झालेली घटना पुर्णतः पुसून टाकता येत नाही.

माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं.
ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे.
मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.

तसेच,

माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे.
माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.

माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे.

लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे.

प्रथमतः धन्याचं या जीवनाच्या सर्वात महत्वपुर्ण अंगावरील लेखाबद्दल अभिनन्दन. खुपच गहन विषय आहे हा. प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने यावर उपाय शोधत असतोच हे आलेल्या प्रतिसादांवरुन दिसुन येइल. पण मला तिमांचा हा ( तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे)प्रश्न सर्वात मूळ आणी महत्वाचा वाटला. या विषयाबद्दल माझा अनुभव .

जीवनामधे दुख: आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही. मग ते दुख: म्हणजे आहे तरी काय? याचा खरच कोणी तटस्थपणे मागोवा घेइल तर लक्षात येइल की ढोबळमानाने दुख: म्हणजे कुठलीही गोष्ट( व्यक्ती,घटणा,स्थीती,परीस्थीती)माझ्या मनाविरुध्द होणे.याउलट मनाप्रमाणे होणे म्हणजेच सुख. मग आता मन म्हणजे काय? मन ही सर्वात वेगवान आणी गुन्तागुन्तीची प्रक्रीया आहे.ही स्वतः अनुभवाच्या पातळीवर समजुन घेतल्याशिवाय आपण जेजे करु ते आपल्याला दुक्खातच लोटेल. अगदी आत्ता सुखद वाटणारी घटनाही थोड्याच काळात दुक्खात बदलेल/बदलते. हे आपल्याला आपल्याच तटस्थ निरीक्षणाने लक्षात येइल. तर यासाठी मनाला समजुन घ्यावे लागेल.

मनाचे साधारणपणे दोन भाग असतात. पहीला चेतन मन. यानेच आपले रोजचे व्यवहार पार पाडत असतो. अनेक चांगल्या वाईट घटनांवर चिंतन मनन करुन आपण निर्णय घेत असतो. निरीक्षण केलेत तर असे दिसुन येईल की मनाच्या विचलीत अवस्थेत जे निर्णय घेतले त्यात काही ना काही त्रुटी असेल अन मन विचलीत नसताना जे काही कराल ते योग्य असेल.आपले मन काहीही करताना द्वन्द्वात असते मग बर्याचदा चुकीच्या गोष्टी घडुन पश्चाताप करावा लागतो हेही दुक्खदच.मग करायचे काय? मन शांत ठेवुन व्यवहार करणे, ते तर आपल्याला कळते पण कसे करायचे ते वळत नाही.

मग मनाचे आणखी सुक्ष्मपणे निरीक्षण करायचे. खरच लक्षपुर्वक पाहीले तर आपले मन हे दोन क्षेत्रात रमते. एकतर भुतकाळात ( ते त्याने असे केले, मला समजत नव्हते तेंव्हा, आता भेटेल तर मग दाखवतो. नाहीतर मी विश्वास ठेवला म्हनुन फसलो अश्या अनंत तर्‍हा असो.) नाहीतर लगेच भविष्यात उडी मारते ( मी दोन वर्षानी अमुक पदावर असेल, मग मला या पावर असतील, मग मी लोकांचे भले करण्याचे निर्णय घेउ शकेल, कींवा माझेच भले करु शकेल , अमुक करेल नी तमुक करेल, थोडक्यात स्वप्नरंजण). जगामधे जो अन्याय होतो तो त्या व्यक्तीच्या/ समाज्याच्या कल्याणाच्या नावावर सर्वात मोठ्या प्रमाणात होतो हे दिसुन येइल , खासकरुन धर्माच्या नावावर. अगदी कुटूंबातही अशी उदाहरणे सापडतील.मग आण्खी लक्षपुर्वक पहा.
तर असे दिसुन येईल मन भुतकाळात असु की भविष्यात दोनच गोष्टीत रमते. जेजे प्रिय ते सुखद आनी जेजे अप्रिय तेते दुखद. सुखद आठवण असेल तर तासंतास त्या आठवन/ घटणा मनाच्या रंग मंचावर पहाण्यात निघुन जातात,मनाला प्रसन्न वाटते. तसेच दुखद आठवणी आपल्याला पुन्हापुन्हा दुखः देतात मग आपण त्या मनातुन काढुन टाकण्यासाठी पुन्हा चांगल्या घटणा आठवतो/ कींवा मित्राला फोन लावतो/ सिनेमाला जातो/ फिरायला जातो/ व्यसन करतो अशा अनेक गोष्टी.
कारण त्या दुखद गोष्टीचा त्रास नको म्हनुन आपण असे उपाय योजतो. मग ज्या घटणेमुळे व्याकुळता आली ती दाबली जाते अंतरमनात आनी आपले चेतन मन त्या सिनेमात रमुन जाते आनी आपल्याला बरे वाटते . आनी असे वाटते की त्या व्याकुळतेतुन सुटका झाली. होतेही पण तात्पुरती, कारण तिचा पुर्ण निचरा न होता ती अतरमनात जाते. परत त्या व्याकुळतेशी संबंधीत काही घटणा घडली तर ती पुन्हा प्रकट होते आनी आपण पुन्हापुन्हा व्याकुळ्/दुक्खी होतो.
मग उपाय काय तर त्या व्याकुळतेचा पुर्णपणे निचरा/इरेज करणे की तीच पुन्हा आपल्याला त्रास देउ शकणार नाही.
हे कसे शक्य आहे यावर आपल्या संतांनी/ऋषीमुनिंनी खुपच प्रयोग केले तर त्यांच्या लक्षात आले की चेतन मन हा मनाचा फार लहान हिस्सा आहे. आपल्याला सुख/दुक्ख/आनंद कुठे होतो तर आपल्या शरीराच्या आतमधे. घटणा बाहेर जरी घडली तरी सुख/दुक्ख/आनंद हे शरीरात होते. मग त्यांनी आतमधे डोकवायला सुरवात केली आनी एकेक रहस्य बाहेर येउ लागले. ते सारे आपल्याला धर्मग्रथांत/ संत साहित्यात आजही सापडेल. सगळ्यांना माहीत आहे मला राग येतो ,त्याचा त्रास मला होतो तसा मझ्या सभोवतालच्या लोकांना /वातावरनालाही होत. जेंव्हा मी दुक्खी असतो तेंव्हा मी ते दुक्खः माझ्यापुरतेच सिमीत न ठेवता त्याचे वितरण करतो आनी आजुबाजुच्या लोकांना/वातावरनाला दुक्खी करुन टाकतो ( कळत नकळत).
मग ज्यांनी अंतर्मनाचा अभ्यास केला त्यांच्या हे लक्षात आले की चेतन मन सुद्धा स्वतंत्र नाही आहे. अंतर्मन जास्त बलवान आहे. चेतन मनाने कुठलेही संकल्प करा ते संपुर्णपणे सिद्द्दीस नेता येत नाहीत कारण अंतरमन त्याचे काहीही ऐकत नाही, त्याची अंतरमनावर काहिही हुकुमत नाही, सगळ्या समस्यांचे माहेरघर म्हणजे हे अंतर्मन. मग त्यांनी अनेक साधनाविधी शोधल्या त्यांचे तत्कालीक फायदेही झालेत , आजही होताहेत. मग अनेक संशोधनानंतर गौतम बुद्धांनी अंतर्मन पुर्ण शुद्ध करण्याची विद्या विपश्यना शोधुन काढली. जी आज भारतात आनी जगातही अनेक केंद्रांमार्फत मोफत शिकवली जाते.

मी स्वतः विपश्यनेचा साडेतीन वर्षांपसुन नियमीत अभ्यास करतोय त्यामुळे वरील गोष्टी जरी विपश्यनाचार्य गोयंका सांगत असले तरी मी याचा घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे ईथे लिहीत आहे. एका जरी माणसाला यातून लाभ झाला/ प्रेरणा मिळाली आनी त्यांना मार्ग मिळाला तर माझे हे लिहीण्याचे सार्थक झाले एवढाच उद्देश. इथे अनेकांनी विपश्यना केलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की नियमीत अभ्यास करा आनी वर्षातुन एकदा कोर्स करा. खरी साधना २०/३०/४५/६० दिवसांत चालु होते. १० दिवसांचे शिबीर तर पुर्वतयारी आहे अंतरमनात खोलवर उतरन्याची.
मी कालच ३० दिवसांचे शिबीर करुन आलोय आनी पुर्ण शुद्ध मनाने हे सांगतो वर लिहिलेला प्रत्येक शब्दन्शब्द माझ्या स्वतःच्या अनुभवावर उतरलेला आहे. कुठलीही पोपटपंची यात नाही. आता सागळ्या शंका मिटल्यात मार्गाबद्दल. पुर्णपणे यावर चालण्याचा निर्धार केलाय अगदी मरेपर्यंत. जेवढे अंतर्मन साफ होते त्यात्या वेगवेगळ्या अनुभुती येताहेत पण त्या काही महत्वाच्या नाहीहेत. रहायचय तर याच समाज्यात. सुखद/दुह्खद घटनांमधे मन जराही विचलीत होउ न देता समता ठेवणे हीच खरी कसोटी.
फार लांबचा रस्ता आहे कारण आपण जमा केलेले संस्कार. हेच अडचणीत आणतात. या साधानेने ते इरेज होतात. जेंव्हा चांगला/ वाईट अगदी शेवटचाही संस्कार इरेज होईल तीच संपुर्ण दुखःमुक्ती. आपण जमा केलेले चांगले/ वाइट संस्कार हीच मनाची कंडीशनींग. तीचा संपुर्ण निचरा म्हणजेच मुक्ती.
ही इगतपुरीची माहीती
http://www.dhamma.org/en/schedules/schgiri#
हे जगातील केंद्र
http://www.dhamma.org/en/maps#001

सुंदर प्रतिसाद विलासराव.

या प्रतिसादाचा विपश्यनेची थोडक्यात माहिती देणारा लेख होऊ शकतो. :)

अर्धवटराव's picture

7 Aug 2014 - 7:19 pm | अर्धवटराव

सुख म्हणजे वेदना अनुकुला आणि दु:ख म्हणजे वेदना प्रतिकुला असं म्हणतात.

विपश्यनेने अंतर्मनातील संस्कार धुतल्या जातात हे छान समजुन सांगितलं तुम्ही. एक शंका... अंतर्मनात अनुभव कोरले जाणं हा आपल्या इव्हॉल्युशन प्रोसेसचा एक भाग आहे. जर असं इरेझींग केलं तर अजाणते प्रॉब्लेम्स येऊ शकतील ना भविष्यात...

विलासराव's picture

8 Aug 2014 - 9:17 am | विलासराव

प्रयत्न करुन पहातो.तीन प्रकारचे संस्कार आपण बनवत असतो जाणता/अजाणता.
१) हे जे कोरले जातात. पण पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखे ते नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही.
२)हे वाळुवर ओढलेल्या रेषेसारखे. हे जास्त वेळ टिकतात पण तरीही हेही नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही.
३)हे पाषाणावर कोरलेल्या रेषेसारखे. आपण ज्या मनाशी खुनगाठ बांधतो( चांगल्या अथवा वाईट), हे सर्वात खतरनाक.

जसं की कुणाची हत्या केली. हसत हसत काही काणी कोणाची हत्या करत नाही. त्यासाठी कीतीतरी वेळा मनात क्रोध जागवतो, पुन्हा-पुन्हा जागवतो,प्रत्येक वेळेस जेंव्हा माणुस मनावर क्रोध जागवतो त्या प्रत्येक वेळेस आधीच्या क्रोधात तो आणखी तेल टाकतो, असे करत करत जेंव्हा आधी भडका उडतो,तेव्हा बेभान होउन हत्या करतो आनी नंतर पस्चाताप.

आता दुसरी बाजु. मी रोज दारु प्यायचो अगोदर. जवळपास १५ वर्षे. खुप आनंद वाटायचा. खायच-प्यायच आनी कोणालाही न दुखावता आनंदात रहायचो. आता यात काय वाईट अशी माझी समजुत होती.

मुळात होतं काय की दारु प्यायल्याने संपुर्ण शरिरात अतिसुक्ष्म संवेदना निर्माण होतात हे आपल्याला समजत नाही. त्या ईतक्या सुखद वाटतात की मन त्यात समाधीस्त झाल्यासारखे होते. आनंद वाटतो. पण त्या केमीकल्सचा प्रभाव जसजसा कमी होतो तसतसा वाटणारा आनंदही कमी होतो. मग मन तो पुन्हा-पुन्हा आठवायचा प्रयत्न करते. आनी जेंव्हा त्याचा प्रभाव नाहीसा होतो तेंव्हा परत त्याचे पाय बारकडे वळतात. हीच ती दारुची होणारी आसक्ती. जितकी सवय जुणी तितकीच ती सुटणे दुरापास्त.

आता मी कधीतरी पहील्यांदा दारू प्यायलेलो असतो त्याअगोदरही मी जगत असतोच ना? त्या अगोदर ही आसक्ती नव्हतीच ना? मी जेंव्हा पहिल्या शिबीराला गेलो आनी परत आलो तेंव्हा मला काय झालेय ते अंदाजच आला नाही. घरी आलो मित्र यायचे रोजचे बरोबर पिणारे. मला इच्छाच व्हायची नाही. १ दिवस,२ दिवस, १ आठवडा, १ महीना, १ वर्ष आणी आता साडेतीन वार्षे झालीत एकदाही ईच्छा झाली नाही. झालं काय.
झालं असं की शिबीरात जी साधना केली त्यात माझे दारु पिउन जामा केलेले सर्व संस्कार पुसले गेले. मला सोडावी लागली नाही. तर सुटली. मी जर एखाद्या डॉ.कडे गेलो असतो दारु सोडवायला तर त्यांनी इतकी जुनी सवय म्हणल्यावर साईडइफेक्ट होउ नये म्हनून हळुहळू कमी करण्याचा सल्ला तर नक्कीच दिला असता.

म्हणुन आपल्याला असे वाटते की. तुम्ही जर गुलाबजामुन पहील्याप्रथम खाल्ला तर किती आवडतो. तुम्ही तो निखःळ खात नाही तर लगेच नकळत आसक्ती निर्माण करतो. आनी त्याची चव मेंदुवर कोरुन टाकता. त्या आधी आपण ही चव घेतलेली नसते. त्याअगोदरही आपण जगतच असतो ना? मग आपण परत दुसर्यांदा गुलाबजामुन खातो, तोंडात टाकल्याबरोबर मन प्रोसेसींग करुन काही क्षणात तुम्ही म्हणता आज खाल्लेला गुलाबजामुन अगोदरच्या ईतका चवदार नाही किंवा याउलट. आनी जे कृष्णमुर्ती म्हणतात तशी ही तुलनेची साखळी चालु रहाते. हीच ती कंडीशनींग. पण जर मन समतेत असले तर तुम्ही आधीची कुठलीच तुलना न करता या क्षणी , याच क्षणात उपस्थीत राहुन आजच्या गुलाबजामुनची चव चाखु शकता तेही मनावर न कोरता.ही प्रोसेस इतकी वेगवान होते की ती आपल्याला पकडता येत नाही. हेच सर्व ध्यानात हळुहळु पकडता येते आनी प्रत्यक्ष अनुभवाने आपण बर्याच प्रमाणात वर्तमानात जगायला लागतो. वर्तमानात समतेत जगणे म्हणजे काहीही मेंदुवर कोरले न जाणे. खरतर ध्यान आपण करत नसतो, आपण फक्त जे घटतय ते साक्षीभावाने( तटस्थपणे) पहात असतो. ही नैसर्गीक प्रक्रीया आहे की जेंव्हा तुम्ही या संवेदनांकडे तटस्थपणे पहाता तेव्हा नवीन संस्कार बनत नाहीत. आनी नवीन बनत नसतील आनी तरीही तुम्ही तटस्थपणे पहाल तर जुने जमा झालेले संस्कार आपोआप वर येतात आनी आताही तुम्ही समतेत( चांगले/वाईट अशी प्रतिक्रिया देत नसाल) असाल तर ते नैसर्गीकपणे पुसुन टाकले जातात. हे आपणाला ध्यानात पुर्णपणे ध्यानात येते. आनी मग बोध होतो की जो काही संवेदनांचा खेळ चाललाय तिथे आपली मर्जी जराही चालत नाही. जेवढी आपण सुखद/दुखःद अशी प्रतिक्रिया देतो , तेवढी तेवढी तॉ जो सुखद/ दुखद संस्कार आपण आणखी द्रुढ ( सोप्या भाषेत वाढ )करतो, परीणामी आपले सुख /दु:ख वाढते. हीच ती कोण्या बुध्दाची बोधी, ज्याने ते स्वतः मुक्त झाले आनी करुणेने इतरांना शिकवले. गोयंका गुरुजी वारंवार सांगतात एका सिध्द्दार्थ गौतममधे बोधी जागली त्याने फक्त एकच मनुष्य मुक्त झाला तो म्हणजे फक्त सिध्द्दार्थ गौतम. बाकीच्यांना मार्ग सांगीतला. जे चालले त्या मार्गावरुन ते मुक्त झाले. जे कुणाची क्रुपा होईल ( अगदी बुध्दाची का होईना) ते वंचीत राहिले आनी भवचक्रात फिरत राहीले.

प्रयत्न केलाय पहा काय वाटते, हे असे आहे जसे घरातील बल्ब. हाय फ्रीक्वेंन्सीवर लागतो-विझतो.पण आपल्या डोळ्यांच्या शक्तीपलीकडे असल्याने सलग लागल्याचा भास होतो तसेच. म्हणुन विपश्यनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त महत्वाचे. नुसतेच बुद्धीने हे सर्व पटले तरी लाभ होत नाही. अनुभच घ्यावा लागेल तेंव्हा शंका मिटतील.

अर्धवटराव's picture

10 Aug 2014 - 10:47 pm | अर्धवटराव

ध्यानाची प्रक्रिया आणि परिणाम तुम्ही स्वानुभवाने सांगताय हे मला माहित आहे.. नो डाऊट अबाउट इट. माझा प्रश्न वेगळा आहे.

जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस हि सर्व प्रक्रिया संस्कार मनावर कोरल्यामुळे होते. जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. भूतकाळातील आठवणी वर्तमानात सुख-दु:ख रूपाने अनुभवता येणे व तदनुषंगाने भविष्यातल्या सुख-दु:खाचा तीव्र विचार करणे हे शरीर बदलास आवष्यक असे प्रारुप निसर्गाने निर्माण केले. त्यात व्यत्यय आणल्यास काय परिणाम होतील आपल्याला माहित नाहि...

कवितानागेश's picture

10 Aug 2014 - 11:02 pm | कवितानागेश

जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. >>>
याबद्दल जरा शंका आहे. माकडाचे इव्होल्युशन होउन माणूस होणार आहे असं वाटत नाही. कदाचित जास्त उत्तम/ शक्तिवान माकडच होउ शकेल.
असो.
पण ध्यानामुळे संवेदना थांबत नाहीत, किंवा शिक्षणही थांबत नाही. नक्की काय होतय आणि ते कसे होतय हे कळायला सुरुवात होते. आपोआपच मन शांत निवांत होत असल्यानी सात्त्विकता वाढते. करुणा वाढते. कृतज्ञता वाढते. भिती कमी होते. त्यामुळे 'योग्य' तेच शिक्षण आणि त्याप्रमाणे बदल होत रहातात.

विलासराव's picture

11 Aug 2014 - 12:18 am | विलासराव

जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस.

हे याच क्रमाने झाले असणार किंवा नाही मला माहीत नाही. पण बुद्धांनी बर्याच भिक्षुंच्या प्रश्नांना वेळोवेळी उत्तरे दिली आहेत त्यानुसार मनुष्य ध्यानाच्या सहाय्याने वरच्या उदा: देव्/ब्रह्म्मा योनीमधे जाउ शकतो. किंवा अंतर्मनात असलेल्या पशुवत संस्कारच्या प्रभावाने पुन्हा मागच्या ( पशुप्राणी किंवा ईतर) योनीत जन्म घेतो.

हे आता कोणालही पटणार नाही. आणी त्याची गरजही नाही.तुम्ही जेंव्हा कधी ध्यानात उतराल तेंव्हाच तुम्हाला या गोष्टी हळुहळु (जशी साधना वाढेल)लक्षात येतील. ज्यांनी कधी ध्यान केले नाही ते ही गोष्ट तर्काच्या आधारे अनुभवु शकत नाहीत. संपुर्ण मुक्ती खुपच लांबची गोष्ट आहे. पण आता उदाहरणच द्यायचे झाले तर माझं पिणं बंद झाले, नॉनव्हेज खाणे बंद झाले, माझा क्रोध पुर्ण गेला तर नाही पण आता तो आलाच तर बर्याचदा मी त्रागा करुन घेत नाही, माझे माझ्याशी ज्या लोकांचे सबंध दुरावले होते ते जवळपास ९०% तरी पुर्ववत झालेत. मी स्वतः माझी चुक होती की नव्हती याचा विचार न करता माफी मागीतली आणी समोरच्या व्यक्तिंनीही मला माफ केले, माझ्या व्यवसायात मी जी थोडीफार लबाडी करायचो ती मी पुर्णपणे बंद केली अशा अनेक गोष्टीत जो बदल झालाय तेवढी तेवढी मुक्ती( त्या त्या गोष्टींपासुन)
मीळाली की नाही?

तुमच्या प्रश्नाच मी रेडीमेड उत्तर देउही शकेल कदाचीत पण ते माझ्या अनुभवावर उतरलेले नसेल. म्हणुन इथेच थांबतो. चर्चा दुसरीकडेच भटकेल. बुद्धांनी संपुर्ण मार्ग अगदी मधे लागणार्या थांब्यांसह सांगीतलेला आहे. त्यांनीच काय अगदी तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगामधे साधनेच्या अवस्थांचे निसंदीग्ध वर्णन केलेले आहे. पण ते वाचुन कोणीही संत होउ शकत नाही, ती अवस्था अनुभवु शकत नाही. तुम्ही ध्यान कारायला सुरवात करा तुमच्या स्वतःच्या अनुभुतीवर त्या अवस्था उतरतील. बाजारात साखळीचे अभंग म्हणुन तुकाराम महाराजांचे १२ अभंग असलेले पुस्तक मीळते. ते वाचा आणी विपश्यना करा तुम्हाला खात्री होईल की ती संपुर्णपणे विपश्यना आहे. माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे.

म्हणुन मी म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुमचा प्रश्न बरोबर आहे पण त्याला मी जे काही उत्तर देईल त्यातुन असे अनेक प्रश्न निर्माण होतील. मुळात जे माझ्या अनुभवावर उतरले नाही त्यावर मी बोलुच नये.
जे वर मला झालेले लाभ सांगीतले आहेत तीच एका चांगल्या जीवनाची सुरवात नाही का? तुम्हाला पडलेले प्रश्न मलाही पडलेच होते. पण जसजशी साधना उन्नत होते तसतसे बरेचसे प्रश्न आपोआप विलीन होउन जातात. त्यातुनही काही राहिलेच तर गुरुजी त्यांचे निवारण (बुध्दांचे सुत्र स्पष्ट करुन) करतात या मोठ्या शिबीरामधे.

पैसा's picture

11 Aug 2014 - 9:25 am | पैसा

या धाग्यावरचे विलासरावांचे प्रतिसाद खूप आवडले आहेत!

विलासरावांचे प्रतिसाद बर्‍याच प्रश्नांची उत्तरं देऊन गेले. याआधी अपर्णातैंच्या एका प्रतिसादाने असा लख्ख उजेड पडला होता डोक्यात!! :)

>>माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे.
नोटेड.

खूप सुरेख प्रतिसाद. आवडला.

कवितानागेश's picture

7 Aug 2014 - 11:57 pm | कवितानागेश

विलासरावांना इतक्या दिवसांनी बघून खूपच आनंद झालाय.
आता प्रतिसाद शांतपणे वाचते. :)

माउ जरी मला विपश्यनेची अगोदर माहीती होती तरी मी मी तुमचे काय ध्यान आहे हे वाचल्याबरोबर मला पुन्हा प्रेरना मिळाली. आनी मी शिबीराला गेलो.
या शिबीरात तर खुपच गहन साधना झाली, आणी तुम्हाला तर मी खुप मंगलमैत्री दिली. पोहोचली का?

मंगलमैत्री म्हणजे? आणि ती दिली म्हणजे काय?

विलासराव's picture

8 Aug 2014 - 10:02 am | विलासराव

मंगलमैत्री म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वरांचे पसायदान. साधना केल्याने जेवढे काही पुण्य अर्जीत केले त्याचे वितरण
सर्व जिवमात्रांचे(द्रुष्य-अद्रुष्य) कल्याण होवो, ते आपल्या विकारांपासुन (षढरिपु) मुक्त होवो अशी प्रार्थना.पुण्य म्हणजे जेजे केल्याने तुमचे मन निर्मळ होते तेते.

यशोधरा's picture

8 Aug 2014 - 10:04 am | यशोधरा

अच्छा. ओके.

कवितानागेश's picture

10 Aug 2014 - 10:38 pm | कवितानागेश

मंगलमैत्री पोचते. :)
I know, 'I am blessed.'

स्पा's picture

4 Aug 2014 - 4:34 pm | स्पा

मस्त रे
आवडलं

प्रचेतस's picture

4 Aug 2014 - 4:38 pm | प्रचेतस

लिहितोस, छान लिहितोस.
मी तरी इतका खोलवर विचार करू शकत नाही. दुर्लक्ष करणं बरं.

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2014 - 4:54 pm | प्रसाद गोडबोले

अज्याबात माफ करायचं नाय कोनाला ... चान्स मिळाला की कचकुन बदला घ्यायचा...

अकीलीज कसं म्हनाला तसं म्हनायच
" You sack of wine! Before my time is done, I will look down on your corpse and smile."

*diablo*

>>अज्याबात माफ करायचं नाय कोनाला ... चान्स मिळाला की कचकुन बदला घ्यायचा...

आपल्या मताचा आदर आहेच!! शुभेच्छा !! :)

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2014 - 5:30 pm | प्रसाद गोडबोले

अग्ने यत्ते तपस्तेन तं प्रति तप योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।१ । ।
अग्ने यत्ते हरस्तेन तं प्रति हर योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।२ । ।
अग्ने यत्तेऽर्चिस्तेन तं प्रत्यर्च योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।३ । ।
अग्ने यत्ते शोचिस्तेन तं प्रति शोच योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।४ । ।
अग्ने यत्ते तेजस्तेन तं अतेजसं कृणु योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।५ । ।

अथर्ववेद संहिता

*diablo*

बॅटमॅन's picture

4 Aug 2014 - 5:38 pm | बॅटमॅन

च्यायला. भलतेच खूंखार होते वैदिक लोक.

स्पा's picture

4 Aug 2014 - 6:04 pm | स्पा

खि:खि

खि:खि नाय रे मेल्या खूंखार !! *yes3*

त्यांचे प्रताप इतके मोठे होते की सर्व लोक वैदिकांना टरकून असत. इतका मोठा शब्दार्णव, पण त्यालाही या प्रतापाने पिऊन टाकले ;)

स्पा's picture

4 Aug 2014 - 6:30 pm | स्पा

गो प्रो ककन्शि सह्म्त

बॅटमॅन's picture

4 Aug 2014 - 6:35 pm | बॅटमॅन

मि प्न तुझ्हयशि सह्मत.

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2014 - 11:36 pm | प्रसाद गोडबोले

सूड हे घे रे अजुन एक रेफरन्स सापडला

" न श्रेय: सततं तेजो न नित्यम श्रेयस क्षमा। तस्मान्नित्यं क्षमा तात पंडितैरपवादिना।।"

महाभारत . वनपर्व २८ -६ -८

हेच आमचे ह्या विषयावरील अंतिम मत !!

येवढे बोलुन मी माझे चार शब्द सम्पवतो !

आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना.

तेव्हा ते शक्य होतं आज ते शक्य नाही. तलवार, धनुष्यबाण, गदा अमुक तमुक हे वापरुन सूड घेणाराला तेव्हा प्रतिष्ठा होती. आज ते शक्य नाही. आज दंबुका घेऊन मुडदे पाडून सूड घेणाराला भारतीय दंडविधान कायद्यानं शिक्षा करतं.

माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं.
'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं.

गल्ली, समाज, देश वगैरेसाठी वरचं (गीता, वैदिक) सगळं मान्य आहे. मात्र त्यामध्ये कर्तव्यबुद्धी म्हणून सूड घेणं हे जास्त परिणामकारक ठरेल. असंही भावनांच्या आहारी जाऊन काहीही करणं त्रासदायकच.

परवा कुठल्या तरी 'सरां'च्या वॉलवर सूडाची/रागाची भावना म्हणजे हाती जळता निखारा घेणं, दुसर्‍याला देताना आपला हात पोळला जातो असं काहीसं वाचलं.

तेव्हाही शक्य होतं अन आत्ताही शक्य आहे. फक्त धनुष्यबाण-तलवार यांच्याऐवजी वाग्बाण, योग्य ठिकाणी चुगली, इ. अनेक दिव्यास्त्रे लागू पडतात. हे झालं बाहेरच्यांचं.

बाकी कधी कधी प्रसंग असेही येतात जेव्हा घरचे म्हणवणारे माजतात तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. का? तर नात्यांचं तथाकथित पावित्र्य जपायचा मक्ता फक्त एकाने घेतलेला नसतो, नसावा. कुटुंब अन कौटुंबिक म्हंजे कित्ती छान छान इ.इ. म्हणणार्‍यांना कदाचित हे पटणार नाही, पण अशावेळी

'अर्थार्थी जीवलोकोऽयं न कश्चित्कस्यचित्प्रियः'

हे लक्षात ठेवले तर बरे पडते. कैकदा आतले बाहेरच्यांपेक्षा परके होतात, तर बाहेरचे आतल्यांच्या वर क्लोज होतात. असो.

प्यारे१'s picture

5 Aug 2014 - 12:49 am | प्यारे१

सूडातून तात्कालिक समाधान मिळतं. नंतर उरतं ते भकासपण.
अर्थात पशूवत वर्तन असणारांना, आततायी (जमीन लुबाडणारा, घराला आग लावणारा, बाईवर हात टाकणारा इ.इ.) माणसांना माणूसपणाची ट्रीटमेण्ट देऊन चालत नाहीच्च. तिथं तुकडाच पाडायचा. पण तोही योग्य प्रकारे. अर्थात तिथंही हिंसेचा मार्ग स्विकारावा असं वाटत नाही. बलवंतांची क्षमा म्हणण्याइतपत बल आपल्यापाशी असलं तरच काही जमतं. ते नसलं तर कमवावं.

ह्या सगळ्यात सूडाची भावना आत पेटून आपण का त्रास करुन घ्यावा पण? समोरचा बर्‍याचदा आपल्याच पैशावर खाऊन पिऊन ऐश करतोय नि आपण जळत बसतो. सांगितलंय कुणी? शांतपणं लढता येतं की.
फरगिव्ह बट डोण्ट फरगेट. (माणसाला नाही तर वृत्तीला)
वाग्बाण, चुगल्या वगैरेचे उपाय आहेत पण ते आपल्यावर देखील उलटू शकतातच.

बाकी दिवस बदलतात, बाजू पलटतात, क्वचित कधी माणूस देखील बदलतो. सगळं होतं. सबुरी ठेवायची. नुसती बडबड नाही उपयोगाची.

घरातल्या माणसांबद्दल विसंगती सोसणं हा उत्तम उपाय असतो. भावाभावांची भांडणं सोडवताना प.पू. गोंदवलेकर महारजांचं उदाहरण ऐकलंय. जमीनीचा काही वाद होता. भावानं ह्यांच्यावर केस केली. कोर्टात तारखेला गेले. हिअरींग झाली नंतर भावाला म्हणे चल जेवायला. भाऊ धुमसतोय. हे म्हणे अरे पैसे देऊन वकील केलेत आपण. लढताहेत की ते. आपण आता का भांडायचं? डोकं शांत, मन शांत.

बॅटमॅन's picture

5 Aug 2014 - 1:13 am | बॅटमॅन

हॅ हॅ हॅ. नुसती बडबड जशी उपयोगाची नसते तसाच सबुरीचा उपदेशही नुस्ता कामाचा नै.

अन विसंगती सोसणं हे एका मर्यादेपर्यंत ठीके. बाकी गोंदवलेकर महाराजांशी काय स्पर्धा करायची इच्छा / कुवत नाही त्यामुळे त्यांच्या उदाहरणाने काही होणार नाही. अशी उदा. सांगून कूल पॉइंट्स मिळतील, प्रत्यक्ष आचरताना फेफे उडेल. तितका दम असतो कुणात? ते एक असोच.

पेटण्यात काहीच हर्कत नाही, फक्त स्वतःचा त्रास कमी केला की झालं. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नाहीत हे लक्षात येणं महत्त्वाचं. असो, शेवटी प्रगोने दिलेली अथर्ववेदातली प्रार्थनाच शिरोधार्य आहे या बाबतीत.(त्रेतायुग-कलियुगाच्या फंड्यापलीकडची सार्वकालिक आहे, इन केस अर्थ पाहिला नसेल तर कळावे म्हणून..)

धन्या's picture

5 Aug 2014 - 12:09 am | धन्या

>> माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं.
'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं.

अगदी नेमके लिहीलं आहेस प्रशांत. कदाचित प्रगोंच्या सुदैवाने त्यांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं नसावं. त्यामुळे मी लिहीलेलं त्यांच्यापर्यंत पोहचलेलंच नाही.

प्रगो, तुमच्या प्रतिसादांवरुन माझा हा लेख तुमच्या अनुभवविश्वापलिकडचा आहे असं मला वाटतं. You are unable to tune to what I have written.

सारांश, तुम्ही सुखी आहात.

स्वप्नांची राणी's picture

7 Aug 2014 - 7:40 pm | स्वप्नांची राणी

"आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं.".... आणि बायकोचा सूड घेण्याची हिम्मत नसते....*ok* *OK*

प्यारे१'s picture

7 Aug 2014 - 8:00 pm | प्यारे१

आमी काय बोल्लो का ताई? सायलेंट र्‍हाऊन्दे की काई गोष्टी. ;)

बॅटमॅन's picture

4 Aug 2014 - 5:30 pm | बॅटमॅन

अगदी सहमत.

असा क्षमाशील विचार छत्रपती शिवाजीमहाराजांनी केला असता तर काय झाले असते असा क्षणभर विचार मनात आल्यावाचून राहिला नाही. धनाजीराव मापी क्रा प्न मोह अवर्ला नै.

धन्या's picture

4 Aug 2014 - 6:42 pm | धन्या

हरकत नाही.

माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

प्रसाद गोडबोले's picture

4 Aug 2014 - 7:16 pm | प्रसाद गोडबोले

आमच्या मते

भावना ह्या मनाचा आणि त्यामुळे शरीराचा अविभाज्य भाग आहेत , शिवाय , आपले शरीर हीच आपली सर्वात मोठ्ठी अ‍ॅसेट मालमत्ता असतेच .

म्हणुन भावनिक जखमा ह्याही शाररिक इजा आणि आर्थिक/ मालम्त्तेचे नुकसान ह्यांच्यामधे अंतर्भुत होतात त्यामुळे त्यांन्ना स्वतंत्र नियम लावता येणार नाही :)

आणि महाराजांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुधोळच्या बाजी घोरपड्याची गोष्ट ऐकली नाही काय धनाजीराव ?
बाजी घोरपड्याने १६४८ मधे शहाजी राजांना कैद करण्यात आदीलशहाला मदत केली , त्याचा वचपा १६६४ मधे महाराजांनी घेतला महाराजांनी खुद्द स्वतः बाजीला कंठ्स्नान घातले (इतिहास नक्की माहीत नाही पण सीरीयल मधे तरी हेच दाखवले आहे ) ! त्यातही विशेष म्हणजे "बाजीला जिवंत सोडु नये" अशा आशयाचे जिजाउ मा साहेबांचे पत्र आहे.
!!

बाजीला महाराजांनी मारले हे खरेच आहे. तो सर्व प्रकार निव्वळ स्ट्रॅटेजिक-डिप्लोम्याटिक होता असे म्हणवत नाही खास.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2014 - 8:11 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत. आणि त्या धाडीत मुधोळकरांच्या कुटुंबातली आणि नात्यातली किमान १०० माणसे तरी कापली होती.

यसवायजी's picture

4 Aug 2014 - 7:28 pm | यसवायजी

रैट्ट.
बहुतेक विवेकानंदांची गोष्ट आहे. माकडे त्रास देत असतील तर किती वेळ दुर्लक्ष करणार? एकदाच हिसका दावला की माकडचाळे बंद.
& then, this part of your life is called as "मनःशांती" (साभार- pursuit of Happyness‎)

अगदी असच म्हणावसं वाट्टं, पण जौ द्या!

भिंगरी's picture

4 Aug 2014 - 5:06 pm | भिंगरी

(माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे)
आकस सोडणे महत्वाचे.
नाहीतर माफ केले म्हणायचे आणि मनात आकस धरुन रहायचे
त्यामुळे स्वत:लाही त्रास आणि दुसर्यालाही त्रास

मृत्युन्जय's picture

4 Aug 2014 - 5:09 pm | मृत्युन्जय

Always Forgive the Wrongdoers. Never Forget them :)

बन्डु's picture

4 Aug 2014 - 6:20 pm | बन्डु

Forgive but Don't Forget

यसवायजी's picture

4 Aug 2014 - 5:13 pm | यसवायजी

असं कसं चालेल? परत फसवलं तर?
Cheat me once, shame on YOU. Cheat me twice, shame on ME.

अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं.

काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

यसवायजी's picture

4 Aug 2014 - 5:32 pm | यसवायजी

मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

गुन्हेगारांच्या शिक्षेबाबत आपलं काय मत आहे?

गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. मात्र ती त्याला धडा शिकवायला (अद्दल घडवायला) म्हणून नव्हे तर त्याने केलेल्या चुकीची जाणिव त्याला होऊन त्याने शहाणं व्हावं म्हणून.

माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

यसवायजी's picture

4 Aug 2014 - 6:42 pm | यसवायजी

:)

एखाद्याला केलेल्या चुकीबद्दल माफ करणे मला तरी जमणार नाही.चुक केलीस ना,मग त्याचे परिणाम तुला भोगायलाच लावीन.कदाचीत याला डुख धरुन राहणे असे ही म्हणु शकता.

माफ करणे म्हणजे समोरच्याचे कसेही वागणे चालवून घेणे नव्हे.

समोरच्या व्यक्तीच्या त्रासदायक/हानीकारक वर्तनाला शब्दांतून अथवा कृतीतून योग्य ते उत्तर दयावेच. मात्र त्यात आकसाची किंवा बदला घेण्याची भावना नसावी. झालेल्या गोष्टीला चिकटून राहू नये.

कवितानागेश's picture

4 Aug 2014 - 5:37 pm | कवितानागेश

खूप आवडलं.
माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे. हेतर खूपच छान आहे. :)
पण तरीही एकीकडे प्रगोशी सहमत व्हायचा मोह होतोय!! :P

प्रभाकर पेठकर's picture

4 Aug 2014 - 5:38 pm | प्रभाकर पेठकर

डूख धरणे, बदला घेणे, आकस ठेवणे वगैरे वगैरे टाळणं शक्य असतं. पण हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे असा गैरसमज पसरू न देणं हेही पाहावं लागतं. तसंच, अशा प्रत्येक व्यक्तीची नोंद मनांत करून ठेवणं, आपल्या पुढच्या वाटचालीत ती व्यक्ती समोर आल्यास आपल्या वागण्याची तर्‍हा ठरवून ठेवावीच लागते. तुम्ही माफ करता म्हणून समोरचा माणूस येताजाता तुमचा पाणउतारा करुन स्वतःचा 'स्व' कुरवाळू पाहात असेल तर कानाखाली काडकन आवाज काढायची ताकद मनगटात आणि हिम्मत मनांत ठेवावी लागते. ते नाही केलं तर आत्मसन्मानाला धक्का पोहोचून तणाव (स्ट्रेस) वाढू शकतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2014 - 8:13 am | llपुण्याचे पेशवेll

i forgive my enemies but never forget their names

चिगो's picture

20 Aug 2014 - 4:26 pm | चिगो

पेठकरकाकांच्या प्रतिसादाशी सहमत.. ह्यावरुन एका हिंदी कवितेच्या ओळी आठवल्या..
"क्षमा शोभती उस भुजंग को, जिसके पास गरल हो,
उसको क्या जो दंतहीन विषरहीत विनीत सरल हो |"

राही's picture

4 Aug 2014 - 6:06 pm | राही

लेख अतिशय आवडला. बहुतांशी सहमत.
विखार, क्रोध या नकारात्मक भावनांनी मनातली जागा व्यापली की आनंद, समाधान अशा सकारात्मक बाबी दूर, बाहेर लोटल्या जातात. आपली कार्यशक्ती कमी होते आणि उद्दिष्टावरील लक्ष विचलित होते.

विटेकर's picture

4 Aug 2014 - 6:13 pm | विटेकर

आवडले आणि पटले देखील !
बदल्याच्या आगीत शत्रुपक्षाला नुकसान होईल तेव्हा होईल..पण तो पर्यन्त आपणच पेटविलेल्या वणव्यात आपलीच राख होत जाते ... मानसिक त्रास तर होत असतोच पण नकळत शरिरावरही आघात होत असतो .. आपण कणा - कणाने मरत असतो आपल्याच विचार- शृंखलानी आपणच बेडीत अडकतो.. आणि असल्या विचारानी बाहेरच्या परिस्थितीत शष्प देखील फरक पडत नाही ... !

vikramaditya's picture

4 Aug 2014 - 7:00 pm | vikramaditya

आपल्याला त्रास देणारी व्यक्ती पुन्हा तसे करणार नाही ह्यासाठी गड सुरक्षित करावा आणि माफी देवुन टाकावी पण "आपल्या मनात". त्या व्यक्तिबरोबर मात्र फार सावधपणेच वागावे.

पण ती व्यक्ती / घटना मनात ठेवुन माफी देणे कठीण.

One needs to forget as well as forgive.

कळतेय, वळत मात्र नाहीये, फक्त असे वाटणारी मी एकटी नाही या विचाराने बरे वाटते. ;)

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 Aug 2014 - 7:34 pm | पुण्याचे वटवाघूळ

लेखातील काही मते पटली तर काही पटली नाहीत.

ह.घ्या: मी बाकी कोणालाही माफ करेन पण फेसबुकावर कॅन्डी क्रशची रिक्वेस्ट पाठवणार्‍या कोणालाही माफ करू शकणार नाही :)

प्रत्येक वेळी माफ करण शक्य नसत
अहो सहनशक्तीला पण मर्यादा असतात

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2014 - 8:53 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif स्वाल्लिड रे धन्या! http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif

सुहास..'s picture

4 Aug 2014 - 9:01 pm | सुहास..

बघ लवकरच टंकावे लागेल .....|| क्या जमाना था ||

पैसा's picture

4 Aug 2014 - 10:02 pm | पैसा

मला वाटतं, दुसर्‍याला माफ करण्याआधी स्वतःला माफ करता आले पाहिजे. माझ्या हातूनही चुका होतात, मला कोणी फसवू शकतं, माझा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, मला कोणी वाईट वागवलं आणि त्याचा प्रतिकार करता आला नाही असंही होऊ शकतं. आणि त्याबद्दल स्वतःला जर माफ केलं तर दुसर्‍याला माफ करणं फार सोपं होईल. बहुतेकवेळा दुसरा असा कसा वागला यापेक्षाही मला या घटनेबद्दल काही करता येत नाहीये ही भावना जास्त त्रासदायक असते.

नगरीनिरंजन's picture

11 Aug 2014 - 5:31 am | नगरीनिरंजन

अत्यंत सहमत. बहुतेक वेळा बोलणारा बोलून जातो आणि त्याला त्याचक्षणी सडेतोड उत्तर का सुचले नाही याबद्दल स्वतःचाच राग येत राहतो. मग असंच म्हणायला हवं होतं आणि तसंच करायला पाहिजे होतं हे मनाचे खेळ काहीकाळ चालू राहतात. पुढच्यावेळी पुन्हा अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितपणे कोणीतरी काहीतरी बोलतो आणि मनाचे खेळ चालू राहतात. बरं सूड किंवा बदला घेण्याएवढीही त्या माणसांना किंमत द्यायची इच्छा नसते; मग अशावेळी अशा माणसाचं बोलणं ऐकून घ्यावं लागण्याचा बावळटपणा घडल्याबद्दल स्वतःलाच माफ करणे याशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही.
विशेषतः मनमभोळ्सट, साध्यासुध्या आणि भोळ्सट लोकांना तथाकथित व्यवहारी व स्मार्ट लोकांकडून असे अनुभव वारंवार येतात. त्यासाठी आधी स्वतःला क्षमा करण्याची कला साध्य होणे महत्त्वाचे असते.

मराठी_माणूस's picture

20 Aug 2014 - 5:25 pm | मराठी_माणूस

दिल के बात

अस बर्‍याचदा होते पण स्वतःला माफ करणे जमत नाही. आतल्या आत चिड्चिड होत रहाते.

अर्धवटराव's picture

4 Aug 2014 - 11:01 pm | अर्धवटराव

धन्या शेठ, लेख आवडला.

ज्यानी कोणि आगळीक केली ति त्याची मानसीक अपरिहार्यता होती, त्यामुळे तो तसा वागला, त्याच्याबद्दल सहानुभुती-दया वाटावी... असले विचार केल्याने माफिनामा आपसूक पास होतो म्हणतात (आपण त्या वाटेला फार जात नाहि)

बर्‍याचदा आगळीक करणार्‍याचं काहि वाईट झालं कि आपला बदला अ‍ॅटोमॅटीक पूर्ण झाल्याचं समाधान लाभतं, किंवा दुश्मनकोभि ऐसे दिन ना देखने पडे टाईप काहि भोग त्याच्या वाटेला आले कि एक सहाजीक माणुसकिची भावना म्हणुन देखील त्याच्याबद्दल दया उत्पन्न होते व सहाजीक क्षमादान होतं. पण प्रयत्नपूर्वक मनापासुन क्षमा करायला फार मोठं मन लागतं हे नक्की.

कुछ इस तरह मैंने अपनी जिंदगी को आसान कर दिया,
किसी से माफी मांग ली तो किसी को माफ कर दिया| :-)

~ कवी अज्ञात

अजया's picture

5 Aug 2014 - 6:46 am | अजया

दोन ओळीत सगळ्या लेखाचं सार आलंय.

धन्या's picture

5 Aug 2014 - 8:50 am | धन्या

सुंदर आणि समर्पक ओळी !!!

बऱ्याच वेळेला आपण माफ करतो पण समोरच्याला वाटते की हा आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीं आणि मग तो आपला अजून पाणउतारा करू पाहतो.
समोरच्याला माफ करायला हरकत नाही पण त्याने तिथेच थांबले पाहिजे यासाठी इशारा तर द्यावाच लागणार.

साम, दाम दंड भेद हेच बरे वाटते कधी कधी