माफ करायचं...

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
4 Aug 2014 - 3:47 pm

आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने.
मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर.
वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते.
माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते.
ज्या व्यक्तीने दुखावले त्या व्यक्तीचा बदला घेण्याची भावना प्रबळ होत जाते.
हा सुड कसा घेता येईल याचे मन सतत चिंतन करु लागते.
समोरच्या व्यक्तीला धडा शिकवण्याच्या नादात आपणच सुडाच्या, क्रोधाच्या आगीत जळत राहतो.
किंवा अगदीच तसं झालं नाही तरी आपल्या दु:खाला कुणीतरी दुसरा कारणीभूत आहे या विचारांनी मन खिन्न होते.
तो असं बोलला नसता किंवा त्याने असं केलं नसतं तर हा विचार मनात पिंगा घालू लागतो.
दुसर्‍याला त्रास कसा देता येईल किंवा दुसर्‍यामुळे आपण कसे दु:खी आहोत या विचारांनी आपली झोप उडते.
आपणच पेटवलेल्या वणव्यात आपणच होरपळत आहोत हे आपल्या गावीही नसते.
हा वणवा विझवून आपण आपल्या जखमेवर हळूवार फुंकर मारु शकतो हे आपल्याला कळत नसते.
फार काही करावं लागत नाही त्यासाठी.
ज्याने आपल्याला दुखावले, शब्दांतून किंवा कृतीतून, त्याला माफ करायचे.
अगदी मनापासून.
तुमच्या-आमच्यासाठी माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले त्याच्याकडे दुर्लक्ष करणे.
खरं नाही ते तितकंसं.
माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं.
ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे.
मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.
कधी कधी नुसताच स्पर्श राहतो.
मात्र असे माफ करण्यासाठी आपल्याला दुखावणार्‍या व्यक्तीला समजून घ्यावे लागते.
मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, करुणा निर्माण व्हावी लागते.
माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे.
माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.
माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले, ती व्यक्ती माणूस म्हणून स्खलनशील आहे, तिच्याकडून चूका होऊ शकतात हे स्विकारणे.
माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे.
आपणच पेटवलेल्या क्रोधाच्या, सुडाच्या वणव्यावर हळूवार फुंकर मारणे.
थोडासा आपल्याला दुखावणार्‍या माणसाचा विचार करायचा.
तो ही आपल्यासारखाच माणूस आहे, चूका करु शकणारा.
स्वतःबद्दलच्या आणि सभोवतालच्या जगाबद्दलच्या भ्रामक विचारांच्या जाळयात अडकलेला.
कुठेतरी सुरक्षितता, मान-सन्मान, स्विकृती शोधणारा.
परिस्थीतीवर ताबा ठेवू पाहणारा.
स्वतःच्या जगाबद्दलच्या अपेक्षा पुर्ण न झाल्यामुळे भेदरलेला.
आणि या सार्‍याच्या मागे असलेला तो आहे तुमच्यासारखंच निसर्गाचे लेकरु, मनःशांतीच्या शोधात असलेला.
न जाणो त्याने लहानपणापासून काय झेललं असेल, कशा-कशाला तोंड दिलं असेल.
त्याला कसं घडवलं गेलं असेल, तो कसा घडला असेल.
कुठल्या विचारांना त्याने आपलंसं केलं असेल, कुठल्या विचारांना त्याने धुडकावून लावलं असेल.
आजचे त्याचे विचार, त्याची कृती कदाचित स्विकारण्याजोगी नसेल.
पण आत खोलवर कुठेतरी हा त्याच्यापरीने मार्ग शोधण्याचा प्रयत्न असेल.
म्हणूनच, सोडून दयायचं.
माफ करायचं...

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

धन्या's picture

5 Aug 2014 - 8:49 am | धन्या

साम, दाम दंड भेद हेच बरे वाटते कधी कधी

हे परक्यांच्या बाबतीत शक्य असतं. काही नाती किंवा प्रसंग अगदी नाजूक किंवा गुंतागुंतीची असतात. अशा वेळी कितीही "डिसापॉईंट" किंवा "हर्ट" झालो तरीही हताशपणे डोक्याला हात लावणे किंवा आतल्या आत धुमसत राहणे या पलिकडे आपण काहीच करु शकत नाही.

मात्र अशा धुमसत राहण्याने त्रास आपल्यालाच होतो. त्यावेळी सोडून दयावं. :)

खटपट्या's picture

5 Aug 2014 - 9:44 am | खटपट्या

खरंय,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Aug 2014 - 7:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख आवडला. पण माफ करताना ती व्यक्ती आपल्याला दुबळा समजणार नाही ह्याची काळजी मात्र करावी. आणि माफ एकदाच करावं, कारण कितीतरी वेळा, ह्यानी माफ केलं, परत करेल, चलता है बॉस असा अ‍ॅटीट्युड होत जातो लोकांचा.

प्रीत-मोहर's picture

5 Aug 2014 - 8:36 am | प्रीत-मोहर

धन्या लेख आवडला आणि पटला . मनाला थोडे शांत वाटले. माफ करणे पटते. पण वळते का ते पहाते आता..

सस्नेह's picture

5 Aug 2014 - 9:03 am | सस्नेह

गड सुरक्षित करण्याची आयड्या साअंगा की राव ! मग माफीचा विचार करू.

ते व्यक्तीगणिक, प्रसंगानुसार वेगळे असेल नाही का?

नाखु's picture

6 Aug 2014 - 9:11 am | नाखु

गुंतागुंतीचा आणि बहुपेडी आहे.एकाच व्य्क्तीच्या बाबत काय माफ करायचं आणि काय नाही हे घटनासापेक्ष आहे.सगळीच नाती काळी-पांढरी नसतात त्यामुळे "करडा" रंग काळा होउ नये म्हणून प्रयत्न कारायचे का, त्याला पांढरा करायचा अट्टहास हे ज्याच्या त्याच्य स्वभावावर्/वर्तनावर अवलंबून आहे.

काही स्वयंघोषीत महात्म्यांना त्यांनी केलेल्या प्रत्येक कॄतीची आणि उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाच्या योग्यतेची इतकी खात्री असते की त्यांना माफीची गरजच नसते. त्यांना आम्ही पामरं काय माफ करणार?
काही लोक पावसाळी चिलटां सारखी त्रासदायक असतात, परंतु इरेला पडून त्यांचा सूड घ्यावा अशी त्यांची योग्यता नसते. त्यांचा संपर्क टाळणे हा एकमेव पर्याय असतो.

.... पण जी लोकं माझ्याशी माणूसकीने / माणसांसारखी वागतात, बोलतात त्यांना मी सहजी माफ करू शकते .
किंवा त्यांनी केलेली आगळीक मला फारशी खुपत नाही असे म्हणणे संयुक्तीक ठरेल.

प्रभाकर पेठकर's picture

6 Aug 2014 - 10:38 am | प्रभाकर पेठकर

चांगला प्रतिसाद. १०० टक्के सहमत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2014 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे

चपखल, वास्तववादी प्रतिसाद !

अजया's picture

6 Aug 2014 - 10:22 am | अजया

मनिषा,+६८२०१४!!

एक स्पष्टवक्ता..'s picture

8 Aug 2014 - 9:31 am | एक स्पष्टवक्ता..

डोकं दुखायला लागलं राव…. कसला ओव्हरडोस आहे हा उपदेशाचा…

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Aug 2014 - 10:17 am | डॉ सुहास म्हात्रे

माफ करायला शिका... डोके दुखणार नाही :) ;)

अजया's picture

11 Aug 2014 - 8:12 am | अजया

खूप आवडला आहे हा लेख आणि त्यातल्या काही प्रतिसादही.काही काळापुरतंतरी क्रोधाविष्ट मन अशा लिखाणामुळे शांत वाटून विचार करु लागतं.तापलेल्या डोक्यावरुन बर्फ फिरवल्याचा इफेक्ट म्हणायला हरकत नाही!!

समीरसूर's picture

11 Aug 2014 - 4:32 pm | समीरसूर

खूपच छान आणि तार्किक! पटला.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Nov 2021 - 1:56 pm | प्रकाश घाटपांडे

आपण ज्याला माफ केल त्याला नंतर ते समजल आन तो भांडायला आला तर काय करायचं? तू कोण माफ करणार मला? मी माफी मागितली होती का? :)