...........काय बोलू.........

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
21 Jul 2014 - 9:04 pm

भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो.

इंग्रजी ही जागतिक भाषा आहे.
इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही.
आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच.
इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे...

ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण

इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते
खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते.
असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच...

एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा म्हणून ती ग्रेट असे नसते. कुठली भाषा अधिक सामर्थ्यवान, कशात अधिक चांगले व्यक्त होता येते, त्या भाषेची शब्दसंपत्ती किती आहे... आयात शब्दांपेक्षा...स्वतःचे शब्द किती आहेत ? यावर भाषेचे सामर्थ्य ठरते. इंग्रजांनी भारतातून अनेक गोष्टी नेल्या त्यात अनेक भारतीय शब्दही नेले आणि इंग्रजीला चिकटवले.. पण अशा जोडाजोडीमुळे भाषा सामर्थ्यवान झाली नाही. किचकट मात्र झाली. कारण हे शब्द पटकन एका जातकुळीतले वाटत नाहीत आणि त्यामुळे ते लक्षात ठेवायलाही अवघड जातात. कधीकधी अशा शब्दांचा अर्थ समजावून घेताना तो शब्द मुळात कुठल्या भाषेतून उचलला आहे याचा शोध घेणे आवश्यक ठरते. इंग्लिशमधून सायन्स शिकताना काही वेगळे शब्द पहायला मिळतात. शोध घेतल्यानंतर त्याचा खुलासा होतो. तो शब्द लॅटिन असतो किंवा जर्मन असतो. त्याच्या वेगळेपणामुळे इतर शब्दांबरोबर तो लक्षात ठेवणे अवघड जाते. इंग्रजीने कच्चा पक्का हा शब्द हिंदीतून उचलला आहे. गुरु हा शब्दही हिंदीमधून उचलला आहे. जेव्हा मॅनेजमेंट आणि गुरु एकत्र होवून मॅनेजमेंट-गुरु बनतो तेव्हा तो अगदीच आंतरजातीय विवाह वाटतो.

अर्थ, अर्थपुरवठा, अर्थगृह - सगळे शब्द 'अर्थ' या एका शब्दाशी नाते सांगतात, त्यामुळे डोक्यात कमी मेमरी खातात. पण MONEY, FINANCE, BANK या शब्दांमधे तसे नाते नाही. आता तुम्ही म्हणाल अर्थगृह कुठून आला ? इंडोनेशियामधे खरोखरच हा शब्द रूढ आहे. पहिल्यांदा ऐकल्यावरसुद्धा अर्थगृहचा 'अर्थ' काय हे विचारायची गरज पडत नाही. एकाच क्षेत्रातले शब्द एकमेकांशी असे नाते सांगणारे असतील तर लक्षात ठेवणे निश्चित सोपे जाते.
Song आणि To Sing यामधे असे नाते आहे. पण Music and Song चे काय ? याउलट गीत आणि संगीत लक्षात ठेवायला अत्यंत सोपे. त्यामुळे डोक्यात मेमरीही कमी खातात.

VICTORY DEFEAT - या उलट आपल्याकडे जय पराजय अगदी सहज एकमेकांचे हात धरून येतात. संस्कृत ही संगणकासाठी अतिशय योग्य किंवा सोपी भाषा आहे अशी काही काळापूर्वी चर्चा होती. ती योग्यच असणार. ज्यांनी कंप्युटरसाठी प्रॉग्रॅम लिहीण्याचा अनुभव घेतलाय किंवा त्याहीपलिकडे प्रॉग्रॅमिंग लँग्वेज तयार करण्याचा अनुभव घेतलाय. ते ही गोष्ट नक्की मान्य करतील. संस्कृतमधे कर्ता कर्म क्रियापद यांचे क्रम बदलले तरी अर्थ बदलत नाही. मराठीतही क्रम बदलला तर काही प्रमाणात चालते. कंप्युटरच्या भाषेतही अनेकदा हे स्वातंत्र्य नसते, इंग्रजीमधेही ते नसते.
(संस्कृतचे उदाहरण हे फक्त तुलनेपुरते दिलेले आहे. त्यामुळे तेवढ्याच खुंटीला लोंबकळून झोके घेत बसू नये. विषय इंग्रजी हाच आहे)

राजा, राज्य, राजवाडा, राजप्रासाद, राजपुरोहीत, राजपुत्र आणि इंग्रजीमधे
KING, STATE, PALACE, PRIEST, PRINCE मराठीप्रमाणे हे शब्द एकमेकांशी नाते सांगत नाहीत त्यामुळे ते एका परिवारातले आहेत हे कळतच नाही.
ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान
KNOWLEDGE SCIENCE PHILOSOPHY हेही असेच.
विद्यार्थी विद्यालय हे जितके सहज तसे
STUDENT SCHOOL वाटत नाही.

BIRD WING यामधे काही संबंध आहे का ? TRUNK ELEPHANT यामधे काही संबंध आहे का ? पण पक्ष आणि पक्षी, पंख पाखरू, हस्त हस्तिन, हाथ हाथी, हात हत्ती यामधे तो आहे. एका परिवारातले शब्द एकमेकांशी नाते सांगतात.

मराठीमधे समभुज त्रिकोण कळला की समद्विभुज त्रिकोण सहज कळतो. इंग्रजीमधे मात्र Equilateral triangle कळला तरी isosceles triangle लगेच लक्षात राहील असे नाही

काही वर्षापूर्वी एका प्रकाशनाने कंप्युटरची पुस्तके मराठीत छापली विद्यार्थ्याना त्याचा प्रचंड फायदा झाला. करीयरच्या दृष्टिनेही त्यांना चांगल्या नोकर्‍या मिळाल्या. मराठी त्यांची स्वभाषा होती हे याचे एकमेव कारण नसून इंग्रजीपेक्षा मराठी अधिक सामर्थ्यवान आहे हेही कारण होते.

"मराठीत शिकूनही आमचे काही वाइट झाले नाही" असे आमच्याकडचे काही मराठी वैज्ञानिक सांगतात.
याउलट "मराठीतून शिकल्यानेच आपले भले झाले" ही शक्यता ते का विचारात घेत नाहीत.

जाणकारांनी सांगावे ! इंग्रजीतून मराठीत भाषांतर सोपे की मराठीतून इंग्रजीत...
Life - या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा ? प्राण की आयुष्य ?
तीच तर्‍हा उच्चारांची
Cut कट
But बट पण
Put पूट... हे असे का ? म्हणजे स्पेलिंग एकसारखेच असले तरी उच्चार लक्षात ठेवण्याची भानगड आली.

स्पेलिंग तेच पण उच्चार मात्र वेगळे, हे लक्षात ठेवण्यासाठी एक वेगळी शक्ती खर्च होत नाही का !
LIEUTENANT लेफ्टनंट COLONEL कर्नल हे उच्चार लक्षात कसे ठेवायचे ? आणि त्यातच शक्ती खर्च झाली तर पुढे काही मांडणे दूरच. PSYCHOLOGY सायकॉलॉजी. मग हा प सायलेंट का आणि सायलेंट असेल तर मग लिहीण्यात शक्ती का घालवायची आणि हे सगळे अडथळे पार केल्यावर पुढे आम्ही काहीतरी व्यक्त करणार. बाप रे !
सावरकरांनी नवे पारिभाषिक शब्द तयार केले तेव्हा सुरुवातीला त्या शब्दांची टर उडविली गेली. तरी नंतर ते शब्द रूढ झाले, लोकांच्या तोंडी बसले. नवे शब्द स्वीकारायला कुणी इतके वेडे नव्हते पण ते स्वीकारले गेले याचे कारण अर्थाच्या दृष्टिने ते नेमकेपणाचे होते, अर्थवाही होते मुख्य म्हणजे मूळ भाषेशी ते मिळते जुळते होते.
एकूण मथितार्थ- इंग्रजी मातृभाषा असो वा नसो ती कुणालाही अगदी इंग्रजालाही समजायला अवघडच जात असणार. अवघडपणा हा तिचा अंगभूत गुण आहे.
ashu jog
ashujog@gmail.com

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Jul 2014 - 9:14 pm | मुक्त विहारि

अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका की मामा

आणि

आँटी म्हणजे नक्की कोण? काकी की आत्या की मामी,

हे प्रश्र्न इंग्रजांना पडले की नाहीत, ते माहीत नाही. पण मी शाळेत हा प्रश्र्न विचारला आणि त्याचा एकच परीणाम मिळाला.

इंग्रजी भाषा जशी शिकवल्या जाते, तशीच शिका आणि एकदाचे दहावी पास व्हा..

मराठी कथालेखक's picture

22 Jul 2014 - 11:20 am | मराठी कथालेखक

अंकल म्ह्णजे नक्की कोण? काका की मामा
आणि
आँटी म्हणजे नक्की कोण? काकी की आत्या की मामी,

मला वाटतं हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे. मराठीतही काही ठिकाणी आत्येच्या नवर्‍याला मामा तर कुठे काका म्हणतात. मावशीच्या नवर्‍याकरिता वेगळा शब्द नाही. हिंदीमध्ये तसा आहे (मौसाजी, फूफाजी).

सुनील's picture

22 Jul 2014 - 11:38 am | सुनील

हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे

केवळ संस्कृतीच नव्हे तर ज्या परिसरात ती भाषा प्रामुख्याने बोलली जाते तेथील पर्यावरणदेखिल!

मराठीत आई आणि वडिल दोघांच्या आई-वडिलांना आजी-आजोबा म्हणतात. तर हिंदीत दादा-दादी (वडिलांचे आई-वडिल) तर नाना-नानी (आईचे आई-वडिल), असे वेगळे शब्द आहेत. म्हणून काय हिंदी मराठीपेक्षा वरचढ ठरते? (राज ठाकरेंना विचारायला पाहिजे!) ;)

पर्यावरणाचादेखिल खूप परिणाम होतो. महाराष्ट्रात (काही ठिकाणी) गारा पडतात. म्हणून तो शब्द मराठीत आहे. पण आईस आणि स्नो ह्या दोन इंग्रजी शब्दांची बोळवण बर्फ ह्या एकाच शब्दात आपण करतो. नै का?

आईस आणि स्नो ह्या दोन इंग्रजी शब्दांची बोळवण बर्फ ह्या एकाच शब्दात आपण करतो. नै का?

आईस ला बर्फ आणि स्नो ला हिम असे म्हणतात. उदा. "उसाच्या रसात जरा बर्फ घालून दे." किंवा "काल श्रीनगर येथे जोरदार हिमवर्षाव झाला."

बाकी तुमच्या प्रतिसादाचं एक उदाहरण म्हणजे मराठीत उंट या प्राण्याला तेवढा एकच शब्द आहे. पण अरबीमध्ये उंटासाठी किमान पंचेचाळीस प्रतिशब्द आहेत. अजून एक उदाहरण म्हणजे संत एकनाथांनी प्राकृत भाषेला कमी आणि संस्कृतास श्रेष्ठ मानणार्‍यांना एका ठिकाणी दिलेले प्रत्युत्तर. त्यात मूळ संस्कृत 'घट' या शब्दाला प्राकृतात किती प्रतिशब्द आहेत याची जंत्रीच दिली होती. (माझ्याकडे आत्ता मूळ काव्य नसल्याने संदर्भ देता येणार नाही.)

बॅटमॅन's picture

22 Jul 2014 - 4:22 pm | बॅटमॅन

ते घट-पट इ. आपल्याला ठौक नै पण ते प्रत्युत्तर मात्र ठौक आहे.

'संस्कृत भाषा देवें केली | प्राकृत काय चोरापासून झाली |'

>>मूळ संस्कृत 'घट' या शब्दाला प्राकृतात किती प्रतिशब्द आहेत याची जंत्रीच दिली होती. (माझ्याकडे आत्ता मूळ काव्य नसल्याने संदर्भ देता येणार नाही.) >>

हा घ्या संदर्भ :

संस्कृते घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती।
कवणा घटाची प्राप्ती। पावावी तेणें?
हारा, डेरा, रांजणु। कैसी?...
ऐसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले।
एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन? (महाराष्ट्र - गाथा, पृ. २८)

वाचक्नवी's picture

4 Aug 2014 - 7:19 pm | वाचक्नवी

संस्कृतें घटु म्हणती|
आतां तया घटांचे भेद किती|
कवण्या घटाची प्राप्ती |
पावावी तेणें ?||
हारा, डेरा, रांजणू |
मुढा, पगडा, आनू|
सुगड, तौली, सुजाणू|
कैसी बोलेल?
धडीं, घागरी, घडौली|
आळंदें, वाचिकें, बौळी|
चिटकी, मोरवा, पातेली|
सांजवणे तें|
ऐसे प्रतिभाषें वेगळाले|
घट असती नामाथिले|
एकें संस्कृतें सर्व कळें ऐसें कैसें न?

बाळ सप्रे's picture

22 Jul 2014 - 1:31 pm | बाळ सप्रे

+११
भाषा, संस्कृती, पर्यावरण याबरोबरच लिपीचाही प्रभाव असतो..
आणखी एक उदाहरण..
pen म्हणजे पेन आणि pain सुद्धा पेनच!!.. वेगळा उच्चार लिहिता येत नाही.. कन्नड भाषेत ए स्वरासाठीदेखिल र्‍हस्व ए आणि दीर्घ ए वेगळा आहे pen साठी र्‍हस्व ए आणि pain साठी दीर्घ ए वापरता येतो..

आशु जोग's picture

14 Aug 2014 - 12:07 pm | आशु जोग

इथे संस्कृती वगैरे गोष्टी करून आपण बरीच गल्लत करत आहोत. बर्फ स्नो आइस, जीन्स टॉप त्यावर पदर हे प्रश्न आपल्याला शब्द कधी पडतात ? माध्यम म्हणून इंग्रजी वापरतो त्याबद्दल इथे आपण विचार करत आहोत.

या चर्चेवरुन हिमक्रीम आठवले आणि अं. ह. झालो.

ज्ञानव's picture

21 Jul 2014 - 9:21 pm | ज्ञानव

कर्म आल
क्रि या प द हि आल. पण इंग्रजी नाही आलं....

तसं काय नाना प्रत्येक भाषा शिकायला अवघडच असतीय की. आणि प्रत्येक भाषेच्या खोडी असणारच. उगाच इंग्रजीला कशाला झोडायचं?

उदा.
पुण्याला पुण्याचं काम करतो.
भाग्याच्या भाग्याची काय महती सांगावी.

ह्या लेखात एक महत्त्वाचा भाग, 'एका मूळ शब्दातून निघणारे सारखे शब्द' -मराठी भाषेत असणे आणि इंग्रजी भाषेत नसणे याचा आहे. हे मी पूर्वीपण वाचले आहे. माझ्या मते सावरकरांच्या एका लेखात, पण खात्री नाही. आपण नक्की सांगू शकाल, कुणाचे विचार आहेत हे?

फेरफटका's picture

21 Jul 2014 - 9:50 pm | फेरफटका

मराठी आणी ईंग्रजी ह्या दोन भाषांची तुलना कशासाठी करायची पण? दोन्ही स्वतंत्र भाषा आहेत, दोघींचं स्वतंत्र अस्तित्व, महत्व, स्थान (भौगोलिक, प्रादेशिक, राजकीय वगैरे) आहे. हा अट्टाहास कशासाठी की दोन्ही भाषांतले शब्द interchangeable असावेत?

अट्टाहास नाहीच.

पण मुळात इंग्रजी ही अपरीपक्व भाषा आहे, हे एकदा मान्य केले की बरेच प्रश्र्न सुटतात.

Gopal's aunty came at home.At that time Seeta went to her uncles's house.

ह्याचे भाषांतर करा, असे सांगीतले तर १० मुले १० प्रकाराने ह्याचे भाषांतर करतील.

गोपाळची आत्या घरात आली.त्यावेळी सीता काकांकडे गेली होती. (हे पण वाक्य बरोबर)

गोपाळची मावशी घरात आली.त्यावेळी सीता काकांकडे गेली होती. (आणि हे पण वाक्य बरोबर.)

बादवे,

Gopalला, आम्ही, गोपाळच म्हणायचो आणि गोपाळच म्हणणार.तो अर्धा मार्क गेला उडत.

ह्या अंकल-आँटीने आणि गोपाल-सीतेने आमचे अख्खे बालपण वाया घालवले.

आमच्या पाचवीला ते (गोपाल-सीता) जे काही पूजले ते पार आमचे दाहावीत दहावे घालूनच सोडले.

भिंगरी's picture

22 Jul 2014 - 2:51 pm | भिंगरी

हो गोपाल सीता लीला ..............
पण खादाड सुरेशचा हेवा वाटायचा मस्त झोपा काढायचा.(पण त्याला पोहता येत होत.)
विषयांतर झालं (क्षमस्व) पण शाळेचे दिवस आठवले.

शैलेन्द्र's picture

28 Jul 2014 - 6:07 pm | शैलेन्द्र

अरारारां... गेले ते दिवस.. मिठाईवाला सुरेश..

असंका's picture

21 Jul 2014 - 10:33 pm | असंका

तुलना अशासाठी करायची की निर्णय घेणे सोपे व्हावे.

इथे हीब्रू आणि मँडेरीन या भाषेत तुलना केली जात नाहिये. दोन अशा भाषांमध्ये तुलना होत आहे, ज्यांच्यातील आता कुठली भाषा वापरायची हा निर्णय आपल्याला पदो पदी घ्यावा लागतो. आपला निर्णय जर सयुक्तिक असणे अपेक्षित असेल, तर आपण उपलब्ध पर्यायातील सर्वोत्तम भाषा निवडताल. पण सर्वोत्तम भाषा कुठली हे ठरवण्यासाठी तुलना करणे भाग आहे.

मराठीत शिकूनही आमचे काही वाइट झाले नाही" असे आमच्याकडचे काही मराठी वैज्ञानिक सांगतात.
याउलट "मराठीतून शिकल्यानेच आपले भले झाले" ही शक्यता ते का विचारात घेत नाहीत.

अहो हल्ली सगळे मराठी लोकच आपल्या मुला मुलींना ईग्रजी माध्यमातुन शिकवतात- कारण ते बरं पडतं हो ! आंम्हाला ना खुप मागे रहावं लागलं ईंग्लीश मिडीयम मधे न शिकल्याने !
अश्या लोकांना काय सांगावे ? तुम्ही शंभर मुलं निवडा आणी त्यांनी ईंग्रजीत पन्नस वाक्यांचा निबंध लिहायला लावा. जे व्यवस्थीत लिहीतील ते नक्कीच मराठी माध्यमातुन ( किंवा त्यांच्या मातृभाषेतुन ) शिकलेले असतील ! ईम्ग्रजी माध्यमातुन शिकलेले पाच दहाच निघतील.
ई. पहिली ते दहावी मातृभाषेतुनच शिकले पाहिजे ! नाहीतर मेंदुच्या क्षमतेची वाट लागते!

आशु जोग's picture

24 Apr 2018 - 8:05 am | आशु जोग

अगदी खरे

आयुर्हित's picture

21 Jul 2014 - 9:56 pm | आयुर्हित

नशिब, आता का होईना, बोललात हे फार बरे झाले.
खरे आहे आपले. महाराष्ट्रात ज्ञानदानात असलेले इंग्रजी भाषेचे/माध्यमांचे खुळ जाईल तो सुदिनच म्हणायचा.

माझा म-हाठाची बोलु कौतुके। परि अम्रुताते पैजा जिंके। ऎसि अक्षरे रसिके। मेळविन॥ इति संत ज्ञानेश्वर

असंका's picture

21 Jul 2014 - 10:05 pm | असंका

तुलना अशासाठी करायची की निर्णय घेणे सोपे व्हावे.

इथे हीब्रू आणि मँडेरीन या भाषेत तुलना केली जात नाहिये. दोन अशा भाषांमध्ये तुलना होत आहे, ज्यांच्यातील आता कुठली भाषा वापरायची हा निर्णय आपल्याला पदो पदी घ्यावा लागतो. आपला निर्णय जर सयुक्तिक असणे अपेक्षित असेल, तर आपण उपलब्ध पर्यायातील सर्वोत्तम भाषा निवडताल. पण सर्वोत्तम भाषा कुठली हे ठरवण्यासाठी तुलना करणे भाग आहे.

आशु जोग's picture

21 Jul 2014 - 10:07 pm | आशु जोग

अलिकडे काही कारणामुळे या विषयाचा मला विचार करावा लागला. मूळात इंग्रजी ही एकच भाषा आहे का ?

मराठीत सुद्धा अनेक परकीय शब्द शतकानुशतके राहूनदेखील आपले परकेपण घालवू शकलेले नाहीत...

त्यामुळे नवे नवे शब्द आले की भाषा समर्थ होते. असे म्हणता येइल का...

किमान दोन तपांपूर्वी वि. वा. शिरवाडकरांनी इंग्रजीच्या सांस्कृतिक आक्रमणाचा धोका ओळखला होता.

मराठीतील एक हिमशिखर वि. वा. शिरवाडकर यांचा एक जुना लेख(सुमारे २०-३० वर्षांपूर्वींचा) वाचनात आला. त्यात त्यांनी मराठीबाबत जे काही भाष्य केले आहे, ते सर्वांनाच भावेल आणि मराठीचा दुस्वास करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालेल, असे वाटले. म्हणून त्या लेखाचा संक्षिप्त गोषवारा सोबत जोडत आहे. इंग्रजीशिवाय पर्याय नाही, असे जे कोणी मराठीजन म्हणत असतील त्यांनी तर तो अवश्य वाचावा. कारण समोरून येणाऱ्या शत्रुपेक्षा अस्तनीतले निखारे केव्हाही जास्त धोकादायक असतात.

“शब्द म्हणजे केवळ कोशातील एक निर्जीव नोंद नसते. शब्द माणसाच्या जीवनपध्दतीतून, म्हणजेच त्यांच्या संस्कृतीतून निर्माण झालेले असतात. त्यांना एक सांस्कृतिक आशय असतो. कोशातील अर्थापेक्षा हा अधिक असतो. ज्योतीच्या भोवती एक प्रकाशाचं वलय असतं त्याप्रमाणे हा अधिक आशय त्या शब्दांभोवती असतो. म्हणून भाषांतरित शब्दानं त्याचा विशिष्ट कोरडा अर्थ मनात निपजेल, पण त्याच्या या वलयाचा, भावनेचा ओलावा मनात उतरणार नाही.

शब्दांना आणि पर्यायाने भाषेला कोशार्थापेक्षा अधिक असा एक सांस्कृतिक आशय असतो. लाखो लोक तो शब्द त्या अधिकार्थानं वापरत असतात आणि म्हणूनच त्या शब्दाच्या वा भाषेच्या दुव्यानं आपण त्यांच्याशी, म्हणजेच भोवतालच्या समाजाशी जोडले जातो. मदर, मम्मी , डॅडी इत्यादी शब्दांनी फक्त नाती व्यक्त होतील, पण त्या नात्यातील ओलावा, जिव्हाळा, आर्तता व्यक्त होणार नाही. ती व्यक्त होतील, परस्परांच्या काळजापर्यंत पोचतील, ती आई, बाबा इत्यादी शब्दांनीच.

ज्ञानेश्वरांनी मराठीबद्दल म्हटले आहे, माझ्या मऱ्हाटीची बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके आणि ज्ञानेश्वर-तुकारामांच्या काव्यातच तिनं अमृतावर मात केलं आहे. तिला आजच्या राजकीय, विज्ञानात्मक आणि आर्थिक व्यवहारापासून दूर ठेवून आम्ही-तिची मुलंच-तिला मागे रेटण्याचा, तिचा तेजोभंग करण्याचा, तिला मारण्याचा प्रयत्न करीत आहोत.

पं. नेहरू म्हणाले होते की इंग्रजी भाषा जगाच्या ज्ञानाकडे उघडणारी खिडकी आहे पण खिडक्या हवेत बांधता येत नाहीत. त्यासाठी आधी घर बांधायला हवं. मित्रा, तू मुलांना इंग्रजी जरूर शिकव. शिकवायला हव. पण त्यांचा मराठीशी, मायभाषेशी असलेले संबंध तोडू नकोस. तो सुरक्षित ठेव. हा संबंध सुटला तर ती देशात राहूनही परदेशी होतील. भाषेच्या द्वाराच माणसाच्या अस्तित्वाची सांस्कृतिक पाळंमुळं समाजात पसरलेली असतात. ती खणून काढणं म्हणजे सुसंस्कृत, समृध्द जीवन त्यांना नाकारण्यासारखं आहे.”

साभारः …अमृतातेही पैजा जिंके

अंग्रेजी बडीही भ्रष्ट भाषा है साहेब.
टी ओ टु होता है तो जी ओ...

- प्यारेमोहन अलाहाबादी :)

आशु जोग's picture

12 Jun 2017 - 6:49 pm | आशु जोग
आशु जोग's picture

12 Jun 2017 - 6:50 pm | आशु जोग
रामपुरी's picture

22 Jul 2014 - 4:42 am | रामपुरी

अश्या कित्येक उणीवा मराठी भाषेतल्याही सांगता येतील. कुठलीही भाषा परिपूर्ण नाही आणि असूही शकत नाही. कारण एकदा परिपूर्ण म्हटल्यावर त्यात बदल संभवत नाही. उदा. टेबल, रेल्वे यासारखे अनेक शब्द मराठीत रूढ झाले आहेत. या नवीन शब्दांचे लिंग मराठीत कुठल्या नियमाने ठरवतात? इथे 'चप्पल' या मराठी शब्दाचे लिंग सुद्धा नक्की ठरलेलं नाही. हे फक्त एक उदाहरण आहे (आता हेच वाक्य कसे बोलले जाते यावर त्याची अर्थछटा बदलते. जर इतकी भाषा परिपूर्ण असेल तर मला ज्या अर्थाचे वाक्य अभिप्रेत आहे ते तसेच का लिहिता येऊ नये?).
मोठ्ठी जिलबी पाडता येईल पण असो...
(अवांतर: "संस्कृतचे उदाहरण हे फक्त तुलनेपुरते दिलेले आहे. त्यामुळे तेवढ्याच खुंटीला लोंबकळून झोके घेत बसू नये. विषय इंग्रजी हाच आहे" हे वाक्य बेहद्द (हा शब्द मराठी की उर्दू?) आवडलं.)

पुल्लिगः तो बुट होतो, पण
स्त्रिलिंगः ती चप्पल, ती सँडल, ती स्लिपर, ती कोल्हापूरी चप्पल, ती खडावा, ती पादुका असेच होते.

तो चप्पल असे कधिही ऐकले नाही.

कुठलीही भाषा परिपूर्ण नाही,कित्येक उणीवा मराठी भाषेतल्याही सांगता येतील.: मान्य.
क्रुपया येथे सांगावे जेणेकरुन त्या दुर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.

स्पा's picture

22 Jul 2014 - 9:29 am | स्पा

लेख आवडला

ईंग्रजी ही अतीशय भिकार भाषा आहे असे आमचे स्पष्ट मत आहे

आशु जोग's picture

27 Feb 2018 - 3:09 pm | आशु जोग

छानच !

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 9:44 am | अत्रुप्त आत्मा

मला सांगा .मी Mobile या शब्दाचा उच्चार मोबिले असा का करायचा नाही?
जो "होतो" तो उच्चार करायचा नाही.. आणी जो "होत नाही" तो उच्चार करायचा! :-/
असे का???? :-/

मराठे's picture

22 Jul 2014 - 8:48 pm | मराठे

जर शब्दाचा शेवट मुळाक्षराने(वॉवेल) (विशेषतः e) होत असेल तर त्या शब्दामधल्या मुळाक्षराचा उच्चार बदलतो (म्हणजे i चा उच्चार आय असा होत, a च उच्चार ए असा होतो).
उदा: bit चा उच्चार ब्-इ-ट (बिट) असा होईल पण शेवटी e लावलात तर ब्-आइ-ट (बाईट) असा होईल.

(हे मला अर्थात मी शाळेत असताना शिकवलं नव्हतं, इथे छोट्याबरोबर सिसमी स्ट्रीट बघत बघत शिकलो!!! )

सायलेंट e च्या अधिक माहितीविषयी हा लहान मुलांसठीचा विडियो बघा:
http://www.starfall.com/n/skills/silent-e/play.htm?f

प्रसाद गोडबोले's picture

28 Jul 2014 - 6:32 pm | प्रसाद गोडबोले

बुवा आपण उचललेला मुद्दा अप्रतिम आहे :)

माझ्या माहीतीप्रमाणे पौर्वात्य भाषांमधे (समंस्कृत चायनीज जापनीज वगैरे ) ही फोनेटीक्स ची गडबड नाहीये ...जे जसे लिहाल ते तसेच वाचायचे :)

इतर भाषांबद्दल बॅट्याला विचारावे लागेल .... कॉलिंग बॅट्या !!

बॅटमॅन's picture

28 Jul 2014 - 6:38 pm | बॅटमॅन

प्रगो, ३ मुद्दे.

कोणे एके काळी इंग्रजीतही 'लिहिले तस्सेच बोलायचे'. मग नंतर काय अवदसा आठवली कुणास ठाऊक, ग्रेट व्हॉवेल शिफ्ट नावाची कायतर भानगड झाली अन स्पेलिंग आणि उच्चाराचा घटस्फोट झाला.

तरी इंग्रजी बरेच बरे आहे म्हणायचे. तिची सवय झाली म्हणून नाही, पण फ्रेंच पहा, इंग्लिश ही फोनेटिक भाषा आहे असे म्हणावेसे वाटेल =))

पौर्वात्य भाषांपैकी संस्कृतोद्भव आणि द्राविडी भाषांमध्ये तरी इंग्लिशपेक्षा बरेच जास्त प्रमाणात 'लिहिले तसे बोलतात', यद्यपि हे % १००% कधीच नसते (साधी गोष्ट बघा, नसते चा उच्चार नस्ते असा'च्' होतो). पण इंग्लिशपेक्षा बरेच जास्त असते. मात्र चिनी, जपानी, इ. बद्दल सांगता यायचं नाही. पण उर्दू लिपी बरीक बेशिस्तच हो. व्यंजनं तरी ठीक आहेत, स्वरांत कैकवेळेस मार खातात नेमका स्वर दाखवायला. बाकी अरबी, चिनी, थाई, इ.इ. चं माहिती नाही.

प्रसाद गोडबोले's picture

28 Jul 2014 - 7:32 pm | प्रसाद गोडबोले

इंग्रजी बरेच बरे आहे म्हणायचे. तिची सवय झाली म्हणून नाही, पण फ्रेंच पहा, इंग्लिश ही फोनेटिक भाषा आहे असे म्हणावेसे वाटेल

मीतर ह्याचा अगदी उलट ऐकलं आहे . आयेसाय मधे लिन्ग्विस्टिक्स बराच रीसर्च होतो ब्रान्चिंग थेअरी वगैरे वापरुन काय काय करत असतात तर त्यात रीसर्च करणार्‍या एका इतालियन विद्यार्थीनी कडुन असे कळाले होते की सर्व युरोपीय भाषात इंग्लिशच विचित्र आहे , भारतात तुम्ही इंग्लिश आधी शिकता म्हणुन तुम्हाला इतर भाषा अवघड वाटतात .

अवांतर १ : हा प्रतिसाद थोडा मुक्तपीठीय झाला काय :ड =))

इंग्लिशचं वैचित्र्य जगजाहीर आहेच, पण अन्य भाषाही काय कमी नाहीत.

बाकी, त्या इतालियन तरुणीचं बरोबर आहे ते अशा अर्थी की युरोपातल्या बर्‍याच महत्त्वाच्या भाषा लॅटिनपासून आलेल्या आहेत.त्यांच्या सबफ्यामिलीला 'रोमान्स भाषा' म्हणतात. (रोमन साम्राज्याखालच्या प्रदेशातील अशा अर्थी, पण इंग्रजी अर्थही परफेक्ट आहे) उदा. इतालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज़. याउलट इंग्लिश, जर्मन, स्वीडिश, डच, नॉर्स, या जर्मानिक सबफ्यामिलीतल्या आहेत. रशियन, लाटव्हियन, एस्टोनियन, इ.इ. चा अजूनेक वेगळाच ग्रूप आहे बाल्टो-स्लाव्हिक म्हणून.

त्यामुळे इतालियन मातृभाषा असलेल्या व्यक्तीला फ्रेंच, झालंच तर पोर्तुगीज आणि स्पॅनिश हे इंग्लिशपेक्षा जवळ वाटणं साहजिकच आहे कारण सबफ्यामिली वेगळी आहे.

पण तरी कालौघात इंग्लिशवरचे जर्मन संस्कार बरेच पुसट झालेले आहेत. त्याजागी फ्रेंच अन ल्याटिन शब्दांचा भरणा झालेला आहे. इ.स. १००० च्या आसपासची इंग्लिश पाहिलीस तर इंग्लिश वाटणारच नै, जर्मनचाच अवतार वाटेल. सर्वप्रथम जर्मन, नंतर व्हायकिंगांच्या नॉर्स भाषेतले अनेक शब्द घेऊन इंग्लिश तयार झाली, पुढे फ्रेंच भाषिक नॉर्मन राजांची सत्ता इंग्लंडवर आल्यापासून फ्रेंच अन ल्याटिनबरोबर सरमिसळ झाली. रेनेसाँमध्येही हुच्चभ्रूंनी लॅटिनाळलेली व्हर्जनच कायम केली.

मधुरा देशपांडे's picture

28 Jul 2014 - 9:52 pm | मधुरा देशपांडे

सहमत.

आशु जोग's picture

29 Jul 2014 - 9:00 am | आशु जोग

बॅटमॅन चागली बॅटींग

सोरी चांगली माहिती

आशु जोग's picture

11 Sep 2014 - 12:44 pm | आशु जोग

बालरोग तज्ञ याचा अर्थ जितक्या चटकन समजतो. तितक्या पटकन पेडियाट्रिशियनचा अर्थ कळतो का...
हाडाला इंग्रजीमधे बोन म्हणतात. पण हाड तुटले की ऑर्थोपेडिककडे जावे लागते.

अजून बरेच गोंधळ आहेत. कसं व्हायचं या इंग्लंडचं कळत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jul 2014 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा

माझं.. या भाषांन्ना एव्ह्ढच म्हणणं आहे.
की एकतर तुंम्ही लिहिता ते आंम्हाला बोलू द्या कींवा मग आंम्ही बोलतो तसे आंम्हाला लिहू द्या.
या इंग्रजी'त हे दोन्ही चालू देत नाहीत. हलकट लेकाचे..उगीच आंम्ही स्पेलिंग नावाच्या भिकार भानगडीमुळे कायमचे दुरावलो तिच्यापासून, आणि घोकंपंडीतांची सरशी झाली. :-/

मी MOBILEचं स्पेलिंग पण मोबिले असं फोनोटिक वाचायला सुरवात केल्या मुळे लक्षात राहिलं. नायतर एम.ओ.बी.आय.एल.इ. असं घोकुन -शिरणारा आमचा मेंदूच नै!

आशु जोग's picture

30 Jul 2014 - 1:35 am | आशु जोग

मोबिले म्हटलं की रोहीले आठवतं

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2014 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

ज्याला त्याला आपापली भाषा बोलायचा आणि लिहायचा हक्क असतो. एकदा ते त्या लोकांच्या अंगवळणी पडले की मग ती प्रमाणभाषा बनते आणि त्यावरून त्या भाषेचे व्याकरण बनते. त्या भाषेच्या सर्व उपर्‍या लोकांच्या मताला फाट्यावर मारले जाते.

हा नियम अगदी बोलीभाषेलाही लागू पडतो. उदा. "हे वरचे असे लिहिले गेल्या आहे" या वाक्याबाबत मिपावर कोणी कोणाला "असे का???? :-/" असे विचारू शकतो का? आणि विचारलेच तर त्याला फाट्यावरच मारल्या जाते की नाही ??? :-/ ;) :) =))

याचं अजून एका उदाहरण म्हणजे: जर्मन ही बहुतांश स्वानिकी (फोनेटिक) भाषा आहे. जर्मन भाषेत e चा उच्चार सर्वसाधारणपणे ए असा होत असला शब्दातला अंत्य e चा उच्चारच गायब होतो आणि तो त्याच्या अगोदरच्या व्यंजनाचा उच्चार दीर्घ करतो... जवळपास मराठीतल्या शब्दाच्या शेवटच्या व्यंजनावरील अनुस्वारासारखा... म्हणजे करणं, बोलणं, जाणं, इत्यादीसारखा... म्हणून Danke (Thank you म्हणजे आभार) चा उच्चार डान्के असा न होता डान्कं असा होतो. हे असं का? असं विचारायचं नाही, जर्मनमध्ये ते प्रमाण आहे म्हणून करायचं. कसं !

मधुरा देशपांडे's picture

28 Jul 2014 - 10:31 pm | मधुरा देशपांडे

याचेच अजुन एक उदाहरण. G या अक्षराचा उच्चार बहुतांशी ग असा होतो. परंतु जर त्याआधी i आला तर असा होतो. म्हणजेच geben (देणे) चा उच्चार गेबेन होतो पण billig चा उच्चार बिलिश असा होतो. याशिवाय अजुनही अनेक उदाहरणे आहेत.
कुठल्याही भाषेचे जसे नियम आहेत तसेच त्या नियमांना अपवाद आहेत. इंग्रजीत उणीवा आहेतच. पण फक्त इंग्रजी कठिण आहे असे नाही वाटत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2014 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत. König = क्योनिश = किंग = राजा.

आणि शब्दाच्या मध्यभागी आणि शेवटी साधा सरळ "s = स" शब्दाच्या सुरुवातीला स्वराबरोबर आला की "s = त्स" होतो ? का ? कारण जर्मन लोक तसे म्हणतात म्हणून, बस ! :)

आनन्दा's picture

22 Jul 2014 - 11:24 am | आनन्दा

मराठी मातृभाषा आहे, मान्य. व्यवहारात मराठी वापरली पाहिजे, हे देखील मान्य. पण म्हणून इंग्रजी फालतू भाषा आहे हे अमान्य. तिला एक सर्वमान्य भाषा म्हणून योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे.
तुम्ही ज्या स्पेलिंगच्या विसंगती दिल्या आहेत त्या देखील वस्तुतः काही ना काही नियमांनी बद्धच आहेय, फक्त आपण बाह्य अभ्यासक असल्यामुळे आपल्याला ते सारे नियम माहीत नसतात एव्हढेच.
अर्थवाही शब्दांच्या बाबतीत मात्र अंशतः सहमत.

मराठी कथालेखक's picture

22 Jul 2014 - 11:53 am | मराठी कथालेखक

प्रत्येक भाषेचं काही सामर्थ्य असतं तर काही उणीवा.
तुम्ही नमूद केलेला स्मानार्थी /विरुद्धार्थी (जय/पराजय) किंवा समूहातले शब्द (राजा, राजवाडा, ई) चा मुद्दा आवडला. हे मराठी भाषेचं सामर्थ्य आहेच.
लेखनाप्रमाणे उच्चार नसणे ही इंग्रजीची फार मोठी उणीव आहेच. तर लेखन आणि उच्चारात समानता हे पण मराठी भाषेचं एक सामर्थ्य आहे पण त्यास किरकोळ अपवाद आहेत. उदा: "दिव्या" उच्चारताना दि:व्या असे उचारले जाते
मराठीच्या (माझ्या मते) काही उणीवा पण आहेत. जसं लिंग - वस्तूचं लिंग कशा आधारे ठरतं ? मुख्य म्हणजे निर्जीव वस्तूना लिंग का असावं हे कळत नाही.
विभक्ती प्रत्यय लागताना मूळ शब्दाची मोडतोड का व्हावी ? उदा: मला 'पुणेला' जायचं असताना मी पोहोचतो मात्र 'पुण्याला' !!
तसेच मराठी भाषा/संस्कृतीत एकेरीत वा/आदरार्थी बहूवचन वापरुन बोलण्याने कधी कधी नात्यात /संबंधात गुंता निर्माण होतो.

प्रभाकर पेठकर's picture

22 Jul 2014 - 12:10 pm | प्रभाकर पेठकर

आपल्या मुलाच्या ओळखितल्या माणसांना (उदा. त्याचे शिक्षक, मित्र-मैत्रिणी इ.इ.), त्याच्या-माझ्या नात्याची ओळख कशी करून द्यावी कधी कळत नाही.

१) मी त्याचे वडील?
२) मी त्याचे बाप?
३) मी त्याचा वडील?
४) मी त्याचा बाप?

फार अवघड वाटतं.
त्या पेक्षा 'मैं उसका पिता हूँ।' किंवा 'I am his father.' जास्त सोयिस्कर वाटतं.

'तो माझा मुलगा आहे' ही पळवाट वाटते.

मराठी कथालेखक's picture

22 Jul 2014 - 12:15 pm | मराठी कथालेखक

एकदम रास्त समस्या.

पण आजकाल 'बाबा' एकेरी होवू लागला आहे. त्यामुळे 'मी त्याचा बाबा बोलतोय' असं म्हणू शकता (किंवा निदान ५-१० वर्षांनंतरचे बाप असं म्हणू शकतील)

प्रमोद देर्देकर's picture

22 Jul 2014 - 12:47 pm | प्रमोद देर्देकर

अहो पेठकर साहेब असाच प्रश्न बायकोच्या बाबतीत ही होतो कि.

फोनवर आपण कोण बोलताय म्हंटल्यावर मी तिचा नवरा बोलतोय किंवा मी तिचा मिस्टर असे वा मी तिचा/ तिचे यजमान बोलतोय असे नाही म्हणता येत.

मग इथेही पळवाट शोधत मी तिची ओळख करताना ही माझी पत्नी किंवा माझ्या पत्नीला हा फोन द्या असे म्हणतो.
*unknw*

नाखु's picture

22 Jul 2014 - 12:13 pm | नाखु

१.उदर निर्वाहासाठी - चांगली नोकरी-उच्चशिक्षण यासाठी इंग्रजी
२.आणि उदर निर्वाह का करायचा त्यासाठी (मराठी) मातृभाषा. म्हणजे आपली आवड्-सुसवांद्-कलास्वाद्-संगीत-वाचन्-संस्कार आप्ल्या आईच्या भाषेत नीट आकलन् होतील ना!

इंग्रजी चे गोडवे गाताना मराठी कशी मागास आणी कूपमंडूक आहे असा अविर्भाव नकोच.
मातृभाषा महत्व जाणल्यानेच सर्व भाषीक लेखकांनी (उ.दा.पु.ल्./गिरिश कर्नाड) उत्तमोत्तम साहीत्य आप्लया मातृभाषेत अनुवादित केले आहे.

आशु जोग's picture

22 Jul 2014 - 12:56 pm | आशु जोग

शिक्षणासाठी कोणते माध्यम असावे हा मुद्दा मी मांडत नाहीये.
दुसरी गोष्ट मराठी ही माझी भाषा आहे म्हणून ती श्रेष्ठ हाही माझा आविर्भाव नाही.

अगती तटस्थपणे चर्चा व्हावी

आदिजोशी's picture

22 Jul 2014 - 2:28 pm | आदिजोशी

काका = Paternal uncle
आत्या = Paternal aunty
मामा = Maternal uncle
मावशी = Maternal aunty

असे मूळ इंग्रजी शब्द आहेत.

दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं.

मराठी माध्यमातल्या बहुसंख्य शिक्षकांचेच इंग्रजी भयाण असल्याने आड्यातलेच लोट्यात येणार ह्या न्यायाने मुलांचेही इंग्रजी भिकार असते. ती त्या भाषेची चूक नाही. तुमचे शिक्षक आणि भाषा मुळातून शिकायचा उत्साह ह्यावर सगळं अवलंबून आहे. प्रत्येच भाषेत उणिवा असतात तसेच प्रत्येक भाषेची बलस्थानेही असतात. शिक्षकांनी भाषेची गोडी लावण्याऐवजी मार्कांपुरती भाषा शिकवली की असंच होणार. इतर राज्यांमधल्या मुलांच्या हिंदीची अशीच अवस्था नसते काय?

'अर्थ, अर्थपुरवठा, अर्थगृह' हे जसं मराठीत आहे तसंच इंग्रजीत bank, banking, banker, bankability, bankrupt, bankroll, bankable आहेच की. त्यामुळे मला जे सोयीचे ते त्या भाषेत नाही म्हणून भाषेला भिकार ठरवू नये.

मराठी भाषेच्या कसोट्यांवर पूर्णपणे एकच भाषा उतरू शकते = मराठी. त्यामुळे वडाची साल पिंपळाला लावायचा प्रयत्न करू नये.

तुमची मेमरी, आकलनक्षमता, उच्चार लक्षात ठेवायची कुवत ह्यावरून भाषेची ताकद जोखू नये.

ज्या लोकांना पेन आणि पेन् ह्यांच्या उच्चारातला फरक कळत नाही त्यांनी तर मुळीच बोलू नये.

मराठी कथालेखक's picture

22 Jul 2014 - 2:47 pm | मराठी कथालेखक

दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं.

sister-in-law म्हणजे मेहूणी (बायकोची बहीण) की वहिनी (भावाची बायको) हे स्पष्ट होत नाही.
काका = Paternal uncle हे खरे असले तरी एका शब्दा ऐवजी दोन शब्द लागलेत. मग तर तसे अनेक शब्दांत काहीही वर्णन होवू शकते.
हिंदीमध्ये तर दीर (नवर्‍यापेक्षा) मोठा आहे की लहान आहे त्यावरुन जेठ /देवर असे शब्द वापरले जातात.
थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्‍या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल.
कोणत्याही भाषेला हलके मानन्याचे कारण नाही. तुम्ही जी भाषा वापराल ती मनापासून वापरा, तिची गोडी लागली की त्यातील अनेक पैलू तुमच्यासमोर येतील. अनेक भाषांवर प्रभुत्व गाजवता येईल.

आदिजोशी's picture

22 Jul 2014 - 8:45 pm | आदिजोशी

थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्‍या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल.

१०० लाईक्स

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jul 2014 - 2:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

सहमत...भाषा चांगली वाइट म्हणण्यपेक्षा कशात काय चांगले आहे ते घ्यावे आणि आपला फायदा करुन घ्यावा..उच्च शिक्षणासाठी इंग्रजीला पर्याय नाही असे माझे स्पष्ट मत आहे...मग तुम्ही कितीही वाइट म्हणा
तस्मात दोन्ही आपापल्या जागी योग्य

ऋतुराज चित्रे's picture

22 Jul 2014 - 4:35 pm | ऋतुराज चित्रे

भाषे भाषेत तुलना नकोच. फक्त प्रत्येक भाषेचे नियम पाळावे. मारुती गाडी घेतली असे बोलावे , मारुती घेतली असे बोलून ब्रम्हचारी मारूतीचे लिंग बदलू नये.

अभिजित - १'s picture

22 Jul 2014 - 8:41 pm | अभिजित - १

जीत आणि जेते या २ शब्दांचा अर्थ काय ?
जीत म्हणजे हरणारा / LOSER ? आणि जेते म्हणजे जिंकणारे / winner ?
रावणाचा मुलगा इंद्रजीत . म्हणजे इंद्राला जीत करणारा ? थोडक्यात इंद्राला हरवणारा ..

पण मग हार जीत हे विरुद्ध अर्थी शब्द आहे ना ? जसे कि खेळात हार जीत हि होणारच. म्हणजे कधी जिंकणार / कधी हरणार .. इथे हार = loser आणि जीत = winner. कोणी याच्यावर प्रकाश टाकेल काय ?
या जीत चा मोठ्ठा लोचा आहे !!

अहो त्याहून मोठा लोचा त्या हाराचा आहे.हारांचे असंख्य प्रकार आहेत- मोत्याचा हार, चपलाहार, पोहेहार, झेंडूच्या फुलांचा हार इ.
इंद्रजिताने नक्की कुठला हार दिला म्हणे इंद्राला?

आनन्दिता's picture

28 Jul 2014 - 10:32 pm | आनन्दिता

युद्धाच्या विजयाच्या बाबतीत जो अर्थ अभिप्रेत असतो त्यात,
जीत :- पराजीत
जेते :- विजेते असं काहिसं असावं..

आशु जोग's picture

23 Jul 2014 - 8:58 am | आशु जोग

लूज म्हणजे सैल का

की हारणे

मराठी कथालेखक's picture

23 Jul 2014 - 11:34 am | मराठी कथालेखक

मराठीतली अजून एक गंमत
ती डबी ...मग ती हळू हळू मोठी होत गेली की तिचा होतो डबा. पण नेमकी किती मोठी झाली की डबी चा डबा व्हावा हे स्पष्ट नाही.

सुनील's picture

23 Jul 2014 - 11:41 am | सुनील

जुन्या कंपनीतील एका मुलीला (अत्यंत कमी जेवण आणणार्‍या) आम्ही जेवणाचा डबा आणतेस की डबी, असे चिडवीत असू!

आशु जोग's picture

28 Jul 2014 - 4:24 pm | आशु जोग

हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे

संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले. जी गोष्ट आहे ती आहे असे म्हणून आपण उगीच डीफेंड करीत बसतो. ही अडचण इंग्रजांनाही जाणवत असणार... विचारा त्यांना

मराठी कथालेखक's picture

30 Jul 2014 - 12:42 pm | मराठी कथालेखक

संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले

अहो नाती बदलत नसली तरी नात्यात भेद करण्याची गरज इंग्रजांना पडत नसणार इतकच. म्हणजे अंकल हा अंकल मग तो काका आहे, मामा आहे, मावशीचा नवरा की आत्येचा नवरा याने इंग्रज माणसाला फरक पडत नाही (म्हणजे नसावा) . साधारण बापाच्या वयाचा नात्यातला माणूस हा अंकल आणि आईच्या वयाची नात्यातली स्त्री ही आंटी इतकं त्यांना पुरेसं असेल. आपलं तसं नसतं आपले काकाशी असलेले भावबंध, मामाशी असलेले भावबंध यात फरक असतो.
तसेच आधी म्हंटल्याप्रमाणे मराठी स्त्री करिता दीर हा दीर असतो, तो लहान की मोठा याने तिला फार फरक पडत नसावा. तेच उत्तर भारतातील स्त्रीकरिता दीर हा नवर्‍यापेक्षा मोठा (जेठ) आहे की लहान (देवर) त्याप्रमाणे नात्यात दिला जाणारा आदर, काही औपचारिकता यात फरक पडतो.
उदा: नवर्‍यापेक्षा लहान दीर हा वहिनीला (मोठ्या भावाच्या बायकोला) वाकून नमस्कार करतो, अगदी ती वहिनी त्याच्यापेक्षा वयाने लहान असली तरी.
थोडक्यात काय प्रत्येक संस्कृतीच्या गरजा वेगळ्या.
अजून एक , हिंदी घुंघटला मराठी प्रतिशब्द काय ? कुणी म्हणेल "डोईवरचा पदर"..पण पदर आणि घुंघट यात काहीसा फरक आहेच. पदर हा घुंघटला चपखल प्रतिशब्द होवूच शकत नाही.

आशु जोग's picture

30 Jul 2014 - 12:54 pm | आशु जोग

इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय...

एखादी आई आपल्या बाळ्याला "अंकलला फोन लाव" सांगत असेल तेव्हा कोणते अंकल हा प्रश्न येणारच.

म्हणूनच अंकल आंटीबद्दल कुणीतरी लिहीलय...

मराठी कथालेखक's picture

30 Jul 2014 - 1:12 pm | मराठी कथालेखक

अहो मावशीला फोन लाव म्हंटलं तरी तो प्रश्न येणारच ना ? (एका पेक्षा जास्त मावशी असतील तर)

इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय...

साधी गोष्ट आहे त्यांना गरज पडत असती तर त्यानी त्याकरिता शब्द शोधले असतेच ना. आणि तुम्ही English बोलायचे ठरवले तरी तुम्ही आपल्या मामा, मावशी ला मामा,मावशीच म्हणाना (जसे चपातीला इंग्रजीतपण आपण chapati म्हणतो). इंग्रज येवून तुम्हाला काळ्यापाण्यावर नाही पाठवणार. तुमची गरज इंग्रजीत भागत नसेल तर तुम्ही तुमचे शब्द न्या की खुशाल इंग्रजीत. (MS Word ने spelling error दाखवली तर dictionary मध्ये add करा)
बाकी इंग्रजांचं राहू द्या, तुम्ही मावशीचा नवरा आणि आत्येचा नवरा यात फरक कसा करता ते मला सांगा.

सुनील's picture

30 Jul 2014 - 1:12 pm | सुनील

अंकल टॉमला नायतर अंकल सॅमला फोन लाव असे सांगत असेल!

तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच!

आशु जोग's picture

30 Jul 2014 - 2:03 pm | आशु जोग

तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच!

ती पुढची गोष्ट आहे. पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय.

सुनील's picture

30 Jul 2014 - 2:16 pm | सुनील

पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय

अजिबात नाही.

प्रत्येक समाजाच्या नेमकेपणाच्या गरजा वेगळ्या. त्यांना अंकल+नाव पुरेसे वाटत असेल तर चोंबडेपणा करणारे आपण कोण?

मागे मीच एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, मराठी जनांना आजी-आजोबा म्हणणे पुरेसे वाटते. ते आईच्या बाजूचे की वडिलांच्या याच्यात फरक करण्याची गरज वाटत नाही. परंतु उत्तर भारतीयांना बहुधा ती वाटते म्हणून ते दादा-दादी आणि नाना-नानी अशी संबोधने वापरतात!

बॅटमॅन's picture

30 Jul 2014 - 2:20 pm | बॅटमॅन

अगदी सहमत. मराठी ही कमी नेमकी इ.इ. ठरते काय मग? ज्याची जशी गरज तशी त्याची भाषा.

तुमचा अभिषेक's picture

29 Jul 2014 - 11:01 pm | तुमचा अभिषेक

सहमत, भाषेतले असले विचित्र प्रकार डोक्यातील जास्त मेमरी आणि शक्ती खातात.
तसेच मराठीत शिकूनही आमचे काही अडले नाही असे म्हणणार्‍यांनी मातृभाषेतच शिकल्याने आमचा फायदा झाला असा विचार (जो योग्यच आहे) केला पाहिजे, पसरवला पाहिजे.

स्वतासाठी म्हणून आधी मातृभाषा शिकावी आणि मग इतरांशी संवाद साधायला परकीय भाषा.
त्यातही मातृभाषा मराठी असेल (जी संस्कृतवरून आली आहे) तर नक्कीच ती आधी शिकावी.

खास करून बुद्धीवंतानी मातृभाषेतच (मराठीतच) शिकावे आणि ज्यांची बुद्धीमत्ता जेमतेम आहे ज्यावर ते आयुष्यात कारकूनीच करू शकतात अश्यांनी ईंग्लिशचा रस्ता धरावे.

प्रॉब्लेम त्यांचा होतो जे मराठीत शिकतात पण ईंग्लिश शिकत नाहीत किंवा शिकायचा आळस करतात. त्यामुळे जिथेतिथे त्यांचे घोडे अडते आणि मग अश्यांमुळे मराठीत शिकणे हानीकारक असा चुकीचा समज प्रचलित होतो. !

आशु जोग's picture

8 May 2015 - 12:44 pm | आशु जोग

आत्ताच एक धागा पाहीला माध्यमासंबंधी इंग्रजीची बरीच भलामण करणारा "फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०"

असो

पण ज्ञान मिळवताना माध्यम महत्त्वाचे असतेच.
C for Cat
ज्या लहान मुलांना अक्षर ओळखही नसते त्यांना
सी फॉर सॅट हे समजावून घ्यायला सोपं आहे नाहीतर मग सी ला की तरी म्हणा म्हणजे मग
की फॉर कॅट असं तरी म्हणता येइल

इथे एखादी भाषा माझी आहे असा विचार न करता तटस्थपणे विचार करण्याचा प्रयत्न केला आहे

इनिगोय's picture

30 Jul 2014 - 8:49 pm | इनिगोय

इंग्रजी या भाषेच्या नावापासूनच गोंधळ आहे.

E sounds ए.

पण एंग्लिश असं म्हणायचं नाही. आणि Inglish असं लिहायचं नाही.

आशु जोग's picture

3 Feb 2017 - 7:46 pm | आशु जोग

विनोद तावडे यांनी

मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम याविषयी काही विचार मांडले आहेत !

https://www.youtube.com/watch?v=9MUEp1vGOpo

आपण अवश्य ऐका !

आशु जोग's picture

27 Nov 2019 - 4:22 pm | आशु जोग

आज ह्यो लेख पघितला म्हणून शेयर करायला आलो

इंग्रजी या मातृभाषांसाठी परकी भाषा आहे. या भाषांचे इंग्रजीशी साम्य नाही. भाषिक रचनेच्या दृष्टीनेही ती परकी आहे. शिवाय नित्य ऐकण्या-बोलण्यातील नाही. त्यामुळे इंग्रजी 'येणे' किंवा 'शिकणे' हे वेळखाऊ व अवघड होते. या पार्श्वभूमीवर, इंग्रजी माध्यमातून शिकताना मुलांना प्रथम ही परकी असलेली इंग्रजी भाषा शिकावी लागते आणि मग अनेक विषयांमधील संकल्पना शिकाव्या लागतात. या दोन टप्प्यांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. पाया पक्का होत नाही

मराठवाडी, नागपुरी, अहिराणी या प्रादेशिक बोलींच्या, तसेच कोरकू गोंडी, पारधी, कैकाडी, या आदिवासी व भटक्या बोलींच्या समूहासाठी मराठी ही संपर्क भाषा आहे. म्हणजे संवाद करण्यासाठी मराठी या सामायिक भाषेचा उपयोग होतो. संपर्काची सरकारी भाषाही मराठी आहे. म्हणजे निवेदने, अर्ज, तक्रारी हे सर्व मराठीत करणे सोयीचे जाते. शिक्षण घेण्यासाठीही मराठी ही एक सामायिक भाषा सरकारला सोयीचे जाते. ५६ मातृभाषांमधून शिक्षण देणे अवघड आहे

असं ही लेखिका म्हणते आहे