कहां गये वो लोग?--नाथा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
3 Jul 2014 - 5:24 pm

कहां गये वो लोग?--बाबूकाका

कहां गये वो लोग?--आजीबाई

आमचं ६-७ खोल्यांचं जुनं तिपाखी कौलारु घर होतं.दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची आणि आम्ही पोरेटोरे दुपारी कुणाही एकाच्या घरी किंवा संध्याकाळी कुणाच्याही वाड्यात खेळत पडीक असायचो.आमचे घर मोठे असल्याने त्यातल्यात्यात आमच्याकडेच दुपारचा अड्डा असे.एकदा असेच एका कुठल्यातरी खोलीत पत्ते वगैरे खेळत असताना घरात चोरी झाली आणि चोराने कायतरी बारीकसारीक सामान चोरुन नेले.संध्याकाळी आई दादा घरी आल्यावर ते लक्षात आले आणि आमचा सगळ्यांचा उद्धार झाला.दुपारभर खेळत बसतात,दाराकडे लक्ष नाही,उद्या कोणीतरी येउन मान कापुन नेईल तरी पत्ता लागणार नाही वगैरे झाल्यावर खरी गंभीर चर्चा सुरु झाली आणि सर्वानुमते रोज दुपारी दार कडी लावुन बंद करायचे ठरले.
आता दार बंद करायचे म्हणजे पुढचा प्रश्न..कोणी दारावर आले तर कसे समजणार? कडी वाजवली तर आम्हाला ती आतपर्यंत ऐकायला तरी यायला पाहीजे ना? यावर उपाय म्हणुन टिर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र वाजणारी बेल लावायची ठरले.आणि ती बसवायला नाथाशिवाय कोण येणार?

तर हा आमचा नाथा, अहं, फक्त ईलेक्ट्रीशियन नाही, त्यापेक्षा खूप जास्त.नाथाचे वडील दशग्रंथी ब्राम्हण होते.दोन खोल्यांचे घर. घरात त्रिकाल संध्या,पूजा अर्चा ,पोथ्यांचे ढीग,ईतर पुरोहीत मंडळींचा चर्चा,भेटीगाठींसाठी राबता.घरात २-३ बहीणी,त्यातली एक वेडी.एक मोठा भाऊ,त्याची नोकरी वेगळी. या सगळ्या धबडग्यात नाथा ईलेक्ट्रीशियन कसा आणि कधी झाला देव जाणे.त्याला गाठायचे म्हणजे सकाळीच.कारण एकदा तो कामाला बाहेर पडला की हाती लागणे कठीण.नाहीतर मग त्याच्या घरी निरोप देउन ठेवायचा.म्हणजे नाथा २-३ दिवसांनी केव्हातरी उगवे.अगदीच गळ्याशी आले असेल तर गल्लीतुन जातायेताच आई त्याला हटकायची.

खिडकीतुन हाक मारली की नाथा वर बघुन म्हणे "हां,वैनी बोला?काय काम आहे? " मग अडली नडलेली सगळी कामे पाढा वाचल्यासारखी त्याच्यापुढे ओतायची.कुठे शॉक लागतोय,दिव्याला होल्डर करायचाय,बेल बसवायचेय,टी.व्ही वर चित्र दिसत नाहीये,अँटेना बसवायचा आहे,वायरींग करायचंय एक ना दोन.नाथापण हरहुन्नरी होता.पटपट काम मार्गी लागे. २-३ दिवस थांबल्याचा राग कुठल्याकुठे पळुन जाई.बरं काम झालं की "नाथा,पैसे किती झाले?" तर त्याचे उत्तर "सांगतो हो,काय मी पळुन चाल्लोय की तुम्ही?" मग आठवडा दोन आठवड्याने कधीतरी दुसरे काम निघालेकी दोन्ही कामाचे पैसे एकदम सांगेल.कितीवेळा लोकांनी त्याचे पैसे बुडवले पण असतील. पण तो बिल्डिंग च्या पुर्ण वायरींगची कामेही घ्यायचा. माझ्यामते त्यात त्याला भरपुर फायदा होता.त्यामुळे आमच्या चिरकुट कामांकडे तो दुर्लक्ष करीत असावा पैशाबाबत.

नाथाकडे कामे भरपुर,त्यामुळे त्याला कामाला कायम माणसे हवी असायची.मग दर थोडे दिवसांनी नवीन माणुस त्याच्याबरोबर त्याची जड पिशवी घेउन फिरताना दिसे. या पिशवीत काय नसे?छिन्नी,हातोडा,स्क्रु,मल्टीमीटर सारखी उपकरणे,वेगवेगळ्या तर्‍हेचे स्क्रु ड्रायव्हर,पान्हे,पकडी,रबरी ग्लोव्हज आणि काय काय...आमच्या भागात तर सगळ्या आयांची एक ठरलेली धमकी होती. नीट अभ्यास कर नाहीतर नाथाबरोबर पिशवी उचलुन फिर.एक मात्र आहे...सुट्टीच्या दिवसात किंवा फावल्या वेळी नाथाबरोबर फिरुन आजुबाजुची अनेक मुले ईलेक्ट्रिकचे काम शिकली.काही जण कायमस्वरुपी त्या व्यवसायात शिरलीसुद्धा अणि काहीबाही करुन पोटापाण्याला लागली.आपणच आपली काँपिटीशन तयार करतोय असे त्याला कधी वाटले नसेल काय?

बरे,दिवसा गावभर फिरुन ही कामे केल्यावर माणुस रात्री घरी गप्प बसेल? पण नाही...जेवण झाले की पडला नाथा बाहेर. आज या देवळात भजन तर उद्या त्या, तबल्याच्या साथीला नाथा पाहीजेच.या माणसाकडे एव्हढी उर्जा कुठुन यायची काय माहीत?श्रावण महीना,गणपती,नवरात्र या काळात तर नाथाला पकडणे म्हणजे पारा पकडण्याएव्हढे कठीण्...तो नक्की कुठे असेल याबद्दल त्याच्या घरच्यांना पण खात्री देता येत नसे.दिवसाही आणि रात्रीही...

या सगळ्या उद्योगांमुळे नाथाच्या गावभर ओळखी.ईलेक्ट्रिकचे काम करायला तो घरी आला असेल आणि घरात कुठल्या प्रॉब्लेमविषयी चर्चा चालु असेल तर नाथा मधेच उपाय सांगणार..

"ट्रु कॉपीचा शिक्का हवाय ना? त्या ह्यांच्याकडे जा की. ७ वाजता घरी येतात ते."

"ईंजिनीयरींगची माहीती?अहो त्या मागच्या बिल्डींगमधल्या काकू नाही का? प्रोफेसर आहेत.त्या सांगतील बघा"
"कॅन्सर म्हणता?परवाच त्या डॉक्टरांकडे काम करुन आलोय. हुशार माणुस आहे. एकदा विचारुन बघा"

"किराणा माल चौधरीकडुन घेउ नका बरं का,केव्हढे खडे त्या तांदुळात?"

माहीती तरी किती विषयात असावी माणसाला?

आता पोटापाण्यासाठी गाव सुटले,तरी घर आहे त्यामुळे अधुन मधुन जाणे होते.परवाच गेलो होतो.घरात काहीतरी ईलेक्ट्रिकचे काम करायचे होते त्यामुळे नाथाची आठवण झाली. नाथाला शोधायची गरज नव्हती.कारण मागेच त्याचा मोबाईल नंबर घेतला होता.फोन केला .फोनवर तोच परीचीत आवाज"हॅलो?कोण्?अरे वा,कधी आलास?काय काम काढलंस?" मी त्याला थोडक्यात काम सांगितले. नाथा म्ह्णाला "अरे मी आता हे काम सोडले.किती वर्षे करणार? आता फक्त मोठी कामे घेतो कधीतरी.तू त्या ह्याला फोन कर. तो करेल तुझे काम."

बरोबरच आहे म्हणा.महागाई वाढली तसे आमचे पगार वाढले.घरे ,गावे,नोकर्‍या बदलल्या,लग्न,मुले झाली. नाथातरी तसाच पूर्वीप्रमाणे कसा राहील?पण असे आहे ना?श्रावणाचे,गणपतीचे दिवस आले की मला अजुनही आठवतो ती जड पिशवी घेउन कामे उरकत गावभर फिरणारा नाथा

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

नित्य नुतन's picture

3 Jul 2014 - 5:42 pm | नित्य नुतन

सुंदर

नित्य नुतन's picture

3 Jul 2014 - 5:43 pm | नित्य नुतन

सुंदर

नित्य नुतन's picture

3 Jul 2014 - 5:43 pm | नित्य नुतन

सुंदर

नित्य नुतन's picture

3 Jul 2014 - 5:43 pm | नित्य नुतन

सुंदर

चित्रगुप्त's picture

3 Jul 2014 - 5:43 pm | चित्रगुप्त

दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची

आणि

अँटेना बसवायचा आहे...

हे दोन्ही एकाच काळातील आहे काय ?
बाकी लेख झकास.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2014 - 6:34 pm | राजेंद्र मेहेंदळे

दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती..आणि बेल बसवली हे एका काळातील आहे.
अँटेना नंतर आले आणि लोक टीव्हीला खिळुन एकमेकांकडे जायचे बंद झाले

नित्य नुतन's picture

3 Jul 2014 - 5:44 pm | नित्य नुतन

अर्र चक चक ..

नित्य नुतन's picture

3 Jul 2014 - 5:45 pm | नित्य नुतन

अर्र चक चक ..

एस's picture

3 Jul 2014 - 11:05 pm | एस

थोडेसे प्रतिसाद इतर धाग्यांवरही वाटा की. सगळे इथेच टाकून दिलेन. ;-)

अनिता ठाकूर's picture

3 Jul 2014 - 6:34 pm | अनिता ठाकूर

पु. लं. च्या नारायणची छोटी आवृत्ती!

आयुर्हित's picture

3 Jul 2014 - 11:26 pm | आयुर्हित

"नीट अभ्यास कर नाहीतर नाथाबरोबर पिशवी उचलुन फिर" हे तर भारिच!

प्रभाकर पेठकर's picture

4 Jul 2014 - 2:09 am | प्रभाकर पेठकर

धाग्याचे शीर्षक आणि शैली पुलंची आठवण करून न देईल तर नवलच.

छान लिहीलयल.

सुबोध खरे's picture

4 Jul 2014 - 9:51 am | सुबोध खरे

उत्तम साधे सरळ लेखन. रोजच्या पाहण्यातल्या व्यक्ती जिवंत पणे डोळ्यासमोर उभ्या राहतात. लिहिते रहा

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jul 2014 - 2:30 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्वांचे आभार