कहां गये वो लोग?--आजीबाई

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
2 Jul 2014 - 6:05 pm

कहां गये वो लोग?--बाबूकाका

आजीबाई, पिंटुला घेउन जरा सिद्धेश्वराच्या देवळात जाउन ये गं

आजीबाई, भांडी पडलीयेत सकाळपासुन

काल का नाही आलीस गे आजीबाई?

येताना थोडी राख घेउन ये उद्या..संपलीये आणि नारळाचा काथ्यापण आण मिळाला तर

पारावर जाउन भाजी आणतेस का आजच्यापुरती?

तसं तर आजीबाई ही काही आमच्या घराचा सदस्य नव्हती. ती होती वाडेघरहुन आमच्या घरी कामाला येणारी मोलकरीण.पण ना तिच्या वागण्यातुन तसे कधी जाणवायचे ना आमच्या.मी तिला बघितली तेव्हापासुन ती म्हातारीच दिसायची. चेहरा कायम सुरकुतलेला,नाकात सुंकलं,हातावर सखुबाई असे नाव गोंदवलेलं,आगरी पद्धतीचं काचा मारलेलं गुढघ्यापर्यंत येणारं लुगडं आणि हिरवी काठाची चोळी हाच तिचा नेहमीचा वेष.तिच्या डोळ्यात कायम एक हसरा प्रेमळ भाव दिसायचा जसा आज्जीच्या चेहर्‍यावर असतो, बहुधा म्हणुनच तिचे नाव आजीबाई पडले असावे.

आईची सकाळी कामावर निघायची घाई चाललेली असायची तेव्हा साधारण आजीबाई उगवायची. ती आली म्हणजे लगेच कामाला सुरवात असे नाही.म्हातारपणाने आणि उन्हातून आल्याने पहीले तिला काही दिसायचे नाही बहुतेक. थोडा वेळ भिंतीला टेकुन बसली आणि पाणीबिणी प्यायली कि ती हुशारीत यायची. मग आई तिला चहा देणार. तो पिउन झाला कि आमची आजीबाई सावकाश कोपर्‍यातला कुंचा हातात घ्यायची.

आई ऑफिसला जातांना तिला काय काय सुचना देउन जायची. त्यातले किती आजीबाई लक्षात ठेवायची हा वेगळाच मुद्दा. आई निघुन गेली की काही वेळाने आजीबाईचे झाडणे संपुन ती भांडी घासायला लागायची. कपडे धुण्यासाठी वेगळी बाई असल्याने हे काम झाले की आजीबाई मोकळी.

मग कधी कधी आजी तिला भाजी आणायला पाठ्वायची किंवा एखादवेळी मी फार त्रास देत असेन तर मला कडेवर बसवुन देवळात घेउन जायला सांगायची.कधी यापैकी काहीच नसेल तर आजीबाई मस्त आपल्या चंचीतुन थोडी तंबाकु आणि कसलीतरी पाने काढायची आणि झकास विडी तयार करुन ओढायला लागायची...अर्थात आजीच्या नकळत. मला तर ती विडी कशी वळते आणि ओढते हे बघायला जाम आवडायचे.

मग ती अजुन एक दोन घरची कामे करुन पुन्हा आमच्याकडे येई आणि २ लाकडी खुर्च्या जोडुन त्यावर मस्त ताणुन देई.उन्हे थोडी उतरली की घरचा रस्ता पकडत असे.कधी गावठी कडवे वाल तर कधी मेणी काकडी असेही काहीबाही घेउन येत असे.

एकदा आजीबाई आठवडाभर कामाला आलीच नाही. आईला तिचा पत्ता साधारण माहीत होता.मग एका रविवारी मी आणि आई आजीबाईचे घर शोधत निघालो. मुख्य म्हणजे तिच्या आसपासच्या घरांमध्ये तिला आजीबाई या नावाने ओळखणारे कोणीच नव्हते.आम्ही आपले चुकत माकत कसेतरी तिचे घर शोधण्यात यशस्वी झालो.

मला आणि आईला बघुन आजीबाईला फार आनंद झाला. पहीले म्हणजे आपल्या तब्बेतीची चौकशी करायला कोणी येईल अशी अपेक्षाच तिने केली नव्हती. दुसरे म्हणजे तिचे घर कोणाला सापडेल असेही तिला वाटले नाही.आणि फोन वगैरे तर तेव्हा नव्हतेच्.तिची मुले,मुली,सुना सगळ्यांना तिने आमची ओळख करुन दिली.आग्रहाने चहा प्यायला लावला,खायला काय काय पापड्,कुर्ड्या वगैरे तळले,शिरा केला.माझ्या चेहर्‍यावरुन पुन्हा पुन्हा हात फिरवुन कशाला याला उन्हातुन घेउन आलीस? म्हणुन आईला विचारत राहीली.

माझ्यामते आजीबाईला तशी पैशाची ददात नव्हती.मोठे घर,त्यापुढे सारवलेले अंगण, लांब गावाबाहेर शेत, बैलाची जोडी असा चांगला पसारा होता.केवळ जुने संबंध आणि शरीराला थोडी कामाची सवय म्हणुन ती आमच्याकडे काम करत असावी.आजी असेपर्यंत आजीबाईपण आमच्याकडे येत राहीली. नंतर केव्हातरी यायची थांबली.

मस्त विडीचा धूर सोडणारी आजीबाई आठवणीत मात्र राहीली.

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

आहा....आजीबाई चेहर्‍यासमोर मूर्तिमंत उभ्या राहिल्या. :)

मस्त आवडलं, आणि अंमळ नॉस्टॅल्जिकही केलंत. :( असो.

मधुरा देशपांडे's picture

2 Jul 2014 - 6:20 pm | मधुरा देशपांडे

छान. घरातल्या सगळ्या आजीबाई, मावशी, ताई आठवल्या.

हाही भाग छान!! पुढच्या भागाला थोडा उशीर झाला चालेल पण एक दोन परिच्छेद आणखी येऊदेत लेखात. अर्थातच यातलं व्यक्तिचित्रण छान जमलंय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jul 2014 - 7:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुढच्या भागात अजुन चांगला प्रयत्न करीन

आतिवास's picture

2 Jul 2014 - 7:13 pm | आतिवास

चांगला जमलाय हाही भाग - पण तरीही काहीतरी अपुरं वाटलं यात.

तुम्ही एका ठरावीक अंतराने भाग टाकलेत तर जास्त चांगलं होईल. काय आहे, सातत्याने चांगलं समोर आलं तरी ते सगळं वाचलं जात नाही अनेकदा - अतिपरिचयात अवज्ञा (दुर्लक्ष) असं काहीतरी होतं. (ही फक्त विनंती आहे. कृपया गैरसमज नसावा. लेख कधी प्रसिद्ध करायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.)

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jul 2014 - 7:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

एवढी फॉर्मॅलिटी कशाला ताई? तुमची सुचना एकदम मान्य

:-)
कुणाच्या भावना कशाने दुखावतील याचा नेम नाही, म्हणून काळजी घेतलेली बरी इतका साधा विचार केला होता.
व्यक्तिचित्रं चांगली येताहेत - जरूर लिहा आणखी.
दुसरं म्हणजे भूतकाळात आपण डोकावून पाहतो तेव्हा किती लोकांनी आपल्याला काय काय दिलं आहे याची जाणीव होऊन आपण बदलून जातो थोडेसे!

अनिता ठाकूर's picture

2 Jul 2014 - 7:18 pm | अनिता ठाकूर

तो पिउन झाला कि आमची आजीबाई सावकाश कोपर्‍यातला कुंचा हातात घ्यायची.
आम्हीही 'कुंचा'च म्हणतो. पण, सहसा हा शब्द वाचण्यात वा ऐकण्यात येत नाही.त्यामुळे, ह्या शब्दाशी अंमळ थांबलेच. बाकी, पु. ले. शु.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jul 2014 - 7:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

कुंचा,झाडु,सळाती वेगवेगळे शब्द आहेत मराठीत.

>>कुंचा,झाडु,सळाती वेगवेगळे शब्द आहेत मराठीत.

मुंबईच्या वातावरणात वाढलेलो असल्याने आम्हीही सगळ्याला सरकट झाडू म्हणत असू. त्यावर एकदा माझ्या मावसबहिणीने सांगितलेला फरक असा, 'रोज घरातला केर काढायला वापरतो ती केरसुणी, जळमटं काढायला लांब काठी लावून वापरतात तो झाडू, हिराच्या काड्या वापरुन केलेला तो खराटा'.

तसंच कंगव्याला आम्ही फणीच म्हणत असू. त्यावर याच बहिणीकडून मिळालेली माहिती अशी की, "केस विंचरायचा तो कंगवा, केसात उवा वैगरे झाल्या असतील तर त्या काढायला वापरतात ती फणी. इथे फणी मागितलीस तर उवा वैगरे झाल्यात की काय असं वाटेल." तेव्हापासून फणी म्हणणं बंद केलं ते आजपर्यंत!!;)

मधुरा देशपांडे's picture

2 Jul 2014 - 7:39 pm | मधुरा देशपांडे

कुंचा,झाडु,सळाती - विदर्भात यालाच झाडणी पण म्हणतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2014 - 2:36 pm | llपुण्याचे पेशवेll

आमच्याकडे देखील गवताचा असतो त्याला कुंचा म्हटले जाते. वेगळ्या गवताचाच पण चपटा आखूड आणि चांगला पसरट असतो त्या झाडूला लक्ष्मी म्हटले जाते. हिरांचा असतो त्याला खराटा.

एस's picture

2 Jul 2014 - 7:44 pm | एस

अजून थोडे मोठे लेख लिहा. वाचकाला व्यक्तिरेखेची ओळख होऊन ते वाचक त्यात गुंगू लागेपर्यंत मध्येच लेख संपतो. सो, ये दिल मांगे मोर... :-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jul 2014 - 7:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

जरुर प्रयत्न करेन पुढच्या लेखात

सुरेख जमले आहे व्यक्तीचित्रण. अतिवासताई, सूड म्हणतात तसे अजूनही फुलवू शकाल.

शुचि's picture

2 Jul 2014 - 7:57 pm | शुचि

आवडले.

सस्नेह's picture

2 Jul 2014 - 10:01 pm | सस्नेह

जरा सविस्तर येऊद्या.

किसन शिंदे's picture

2 Jul 2014 - 10:23 pm | किसन शिंदे

आवडले व्यक्तिचित्रण. येऊंद्यात अजून..

रच्याकने सुंकलं म्हणजे काय?

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2014 - 1:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा नाकात घालायचा दागिना आहे, छोटी रिंगच म्हणा ना पण त्यात वेगवेगळी डिझाईनपण असु शकतात

सूड's picture

3 Jul 2014 - 2:25 pm | सूड

कानात/नाकात घालायची बारीक सोन्याची तार!! भीकबाळी वैगरे घालण्याआधी कान या सुंकल्याने टोचतात, कारण जाड तारेने टोचलं तर जखम होऊन ती लवकर बरी न होण्याचा संभव असतो. सुंकलं टोचून जखम नीट बरी झाली की मग ते काढून भीकबाळी किंवा आणखी काही असेल ते!

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2014 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर

'कहाँ गये वो लोग' ह्या मिपावरील मालीकेला आगामी आकर्षणांसाठी अनेकानेक शुभेच्छा!
अशी विविध व्यक्तिमत्वे आठवून लिहीताना/वाचताना त्या त्या व्यक्तिमत्वातील आपल्याला भावलेल्या गुणांना आपल्या आयुष्यात जोपासण्यचा मनोमन प्रयत्न करावा. ह्यातूनच पुढच्या पिढीला निदान लिहीण्यासाठी एक नवे व्यक्तिमत्व मिळेल. त्यांनाही तसे बनण्याची प्रेरणा मिळेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2014 - 3:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद पेठकरकाका...मालिका रंगतदार बनवायचा जरुर प्रयत्न करेन

मुक्त विहारि's picture

6 Jul 2014 - 8:07 am | मुक्त विहारि

आवडले....

पैसा's picture

31 Jul 2014 - 11:04 pm | पैसा

आजीबाई अगदी डोळ्यासमोर उभी राहिली!

रेवती's picture

1 Aug 2014 - 6:31 am | रेवती

वाह! लेखन आवडले. आजीबाई डोळ्यासमोर उभी राहिली. घरचे सगळे व्यवस्थित असताना कोण कशाला लोकाकडे राबेल असे आधी वाटत असे पण माझ्या मावससाबांकडे स्वयंपाकाला ज्या बाई येत त्यांच्या हाताला चव चांगली होती आणि घरचे सगळे व्यवस्थित असतानाही केवळ हा गूण वाया जाऊ नये म्हणून त्या येत असत ते आठवले पण हे विरळाच असते.