९० डिग्री साऊथ - १०

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
12 May 2014 - 3:19 pm

९० डिग्री साऊथ - ९

स्कॉटची तुकडी काही वेळातच आपल्या पुढील कँपवर पोहोचली. इथेच त्यांनी घोड्यांची हत्या केली होती. घोड्याचं मांस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांनी भरपेट जेवण करुन विश्रांती घेतली. इथून पुढे मध्ये असलेल्या डेपोतील सामग्रीच्या सहाय्याने एक टन डेपो गाठणं त्यांना शक्य होणार होतं.

रॉस आईस शेल्फवर अर्धवट शुध्दीत असलेल्या टेडी इव्हान्ससह लॅशी आणि क्रेनची वाटचाल सुरु होती. मात्रं खराब हवामानामुळे त्यांची प्रगती खूपच हळू होती. त्यांच्याजवळ अन्नपदार्थांचा साठाही मर्यादीत प्रमाणात होता.

लॅशी आणि क्रेनने आपसात चर्चा केली आणि क्रेनने एकट्याने ३० मैलांवरील हट पॉईंट गाठून इव्हान्ससाठी मदत आणण्याचा निर्णय घेतला. थोडेफार खाद्यपदार्थ घेऊन क्रेन पुढे निघाला.

क्रेन गेल्यावर लॅशीनेही एक मैलावर असलेला कॉर्नर कँप गाठला. तिथे मिळालेले थोडेफार खाद्यपदार्थ घेऊन तो टेडी इव्हान्सजवळ परतला. परंतु तिथे मिळालेल्या डे च्या संदेशामुळे तो काळजीत पडला होता.

" कॉर्नर कँपपासून हट पॉईंटपर्यंतच्या मार्गावर अनेक मोठ्या कपारी असल्याचं डे च्या संदेशात लिहीलं होतं. क्रेनजवळ स्कीईंगचं साहित्य नव्हतं. इव्हान्सला स्लेजवर चढवल्यावर वजन नको म्ह्णून आम्ही स्कीईंगचं साहीत्य मागेच ठेवून दिलं होतं. पायी चालताना क्रेन कपारीत कोसळण्याची जास्त शक्यता होती. मला त्याची काळजी लागून राहीली होती !"

स्कॉटच्या तुकडीची प्रगती अतिशय मंदगतीने होत होती. वाळवंटी प्रदेशातून जात असल्याप्रमाणे स्लेज ओढण्यास त्यांना कष्ट पडत होते. दिवसभरात जेमतेम पाच मैलाची मजल त्यांना मारता आली होती. सध्यातरी खाणं-पिणं मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं, परंतु आपल्याला परतण्यास झालेला उशीर स्कॉटसाठी काळजीचं कारण ठरला होता.

लॅशीला क्रेनच्या काळजीने घेरलं होतं. त्याच्याजवळ मर्यादीत खाद्यपदार्थ उपलब्ध होते. मात्रं तेलाचा ब-यापैकी साठा असल्याने खाद्यपदार्थ संपल्यास गरम पाण्यावर भागवण्याचा त्याचा विचार होता. क्रेन हट पॉईंटला पोहोचण्यात यशस्वी झाला तर सगळेच प्रश्न मिटणार होते.

१९ जानेवारीला अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्री हट पॉईंटवरील डिस्कव्हरी हट मध्ये असताना एक माणूस धडपडत आत शिरला.

टॉम क्रेन !

वा-याशी मुकाबला करत आणि कपारी टाळून सावधपणे वाटचाल करत क्रेन अखेरिस हट पॉईंटला पोहोचला होता !

" टेडी इव्हान्सला स्कर्व्हीने ग्रासलं आहे डॉक्टर !" क्रेन अ‍ॅटकिन्सला म्हणाला, " त्याला चालता येत नाही. तो स्लेजवर आहे ! त्याच्याबरोबर लॅशी आहे. कॉर्नर कँपच्या पुढे एक मैल !"

क्रेनकडून इव्हान्सची गंभीर अवस्था कळताच अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्री कुत्र्यांसह कॉर्नर कँपच्या दिशेने निघाले.

स्कॉटच्या तुकडीची प्रगती धीमेपणानेच सुरु होती. स्कीईंगचा वापर करूनही त्यांना वेगाने मार्गक्रमणा करता येत नव्हती. त्यातच स्लेज ओढण्याचा भार होताच. रात्री त्यांनी गेट वे पासून दहा मैलांवर असलेला आपला कँप गाठला. इथेच बिअर्डमूर ग्लेशीयरवर चढाई करण्यापूर्वी हिमवादळाने त्यांना चार दिवस अडकवून ठेवलं होतं. आपल्या प्रगतीबद्दल स्कॉट समाधानी नव्हता. आपली शारिरीक क्षमता कमी पडत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं.

कॉर्नर कँपच्या पुढे मैलभर अंतरावर असलेले लॅशी आणि टेडी इव्हान्स मदतीची वाट पाहत होते. लॅशी इव्हान्सला सतत धीर देत होता.

अचानक लॅशीच्या कानावर दूरवरुन भुंकत येणा-या कुत्र्यांचा आवाज आला !

लॅशीने तंबूतून बाहेर झेप घेतली. अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्रीला आलेले पाहून त्याच्या डोक्यावरचं ओझं एकदम उतरलं !

" थँक गॉड !" लॅशी म्हणतो, " डॉक्टर आणि डिमीट्रीला पाहून माझ्या मनावरचं दडपण एकदम नाहीसं झालं. आम्ही सुरक्षीत होतो. टेडीला मदत मिळणार होती !"

होबार्टच्या वाटेवर असलेल्या अ‍ॅमंडसेनने आपल्या जहाजावरील सर्वांना उद्देशून एक प्रश्न केला होता,

" उत्तर धृवावर येण्यासाठी कोण कोण तयार आहे ?"

अ‍ॅमंडसेनच्या प्रश्नाला आईस पायलट असलेल्या बेकचा अपवाद वगळता सर्वांनी ठाम नकार दिला होता. चिडलेल्या अ‍ॅमंडसेनने प्रत्येकाला एकेकटं गाठून त्यांची हजेरी घेतली ! पुन्हा तोच प्रश्न करताच सर्वांनी उत्तरेकडे जाण्याची तयारी दर्शवली. अपवाद फक्त जालांडचा ! त्याचा नकार कायमच होता !

स्कॉटपुढे आता वेगळीच समस्या उभी राहीली होती. धृवाच्या दिशेने जाताना लावलेले मार्कर शोधून काढण्यास त्यांना त्रास होत होता. कित्येकवेळा दोन मार्करच्या मधील प्रदेशात वाट चुकून ते भलत्याच दिशेला जात होते. मधूनच घोड्यांच्या बर्फात उमटलेल्या आणि अद्याप न मिटलेल्या खुणांवरुन त्यांना दिशेचा अंदाज येत होता. स्कॉटने आपल्या डायरीत चिंता व्यक्त केली होती,

" मार्करवरुन वाट शोधणं बरंच अवघड होत चाललं आहे. दिवसाला आठ मैलापेक्षा जास्तं अंतर कापणं आवश्यक आहे ! वाट चुकल्यामुळे वेगळ्याच दिशेन एक कँप ओलांडून आम्ही पुढे आलो आहोत, त्यामुळे तिथे असलेलं अन्न आता मिळू शकणार नाही. माझ्या अपेक्षेपेक्षा हा परतीचा प्रवास जास्तच त्रासदायक ठरतो आहे ! हिवाळ्याला सुरवात होण्यापूर्वी आम्ही एक टन डेपो गाठणं आवश्यक आहे !"

२२ जानेवारीला लॅशी आणि टेडी इव्हान्ससह अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्री हट पॉईंटला पोहोचले ! क्रेनला बरोबर घेऊन डिमीट्रीने केप इव्हान्सकडे कूच केलं. अ‍ॅटकिन्सनने त्यांच्याबरोबर सिम्प्सनला संदेश दिला होता.

डॉक्टर असल्याने टेडी इव्हान्सवर उपचार करण्यासाठी अ‍ॅटकिन्सनला हट पॉईंटला थांबणं भाग होतं. परतीच्या वाटेवर असलेल्या स्कॉटला गाठण्यासाठी डिमीट्रीबरोबर उत्कृष्ट नॅव्हीगेटर असलेल्या राईटला एक टन डेपोवर पाठवण्याची अ‍ॅटकिन्सनने सूचना केली होती.

अ‍ॅटकिन्सनचा संदेश मिळाल्यावर राईट आणि चेरी-गॅराड डिमीट्रीसह हट पॉईंटला परतले. सिम्प्सनने राईटला स्कॉटला गाठण्यासाठी पाठवण्यास नकार दिला होता. सिम्प्सन स्वतः अंटार्क्टीकातून परत जाणार होता. हवामानाच्या अभ्यासाचं आणि संशोधनाचं काम त्याने राईटवर सोपवलं होतं. डिमीट्री बरोबर चेरी-गॅराडला पाठवण्याची सिम्प्सनने सूचना केली होती.
टेडी इव्हान्सबरोबर स्कॉटने अ‍ॅटकिन्सनसाठी कुत्र्यांसह ८२ आणि ८३ दक्षिण अक्षवृत्ताच्या मध्ये पोलर पार्टीची भेट घेण्याचा आदेश दिला होता. परंतु हा आदेश अमलात आला नाही !

याचा काय परिणाम होणार होता ?

चेरी-गॅराडला दृष्टीदोष होता. त्याची दूरची नजर अधू होती ! नॅव्हीगेशनचा आणि कुत्र्यांसह स्लेज हाकारण्याचा कोणताही अनुभव नव्हता ! आपल्या डायरीत त्याने प्रत्येक कँपची जागा आणि दिशादर्शक बारीक-सारीक गोष्टी संदर्भासाठी टिपून घेतल्या. स्कॉटच्या तुकडीच्या परतीचा अंदाज बांधून ती तारीखही त्याने डायरीत नोंदवली !

स्कॉटने आपला डेपो गाठला. इथे घोड्याचं मांस मुबलक प्रमाणात असल्याचं पाहून त्याला हायसं वाटलं. मात्रं इंधनाची कमतरता त्यांना जाणवत होती. दहा दिवस पुरेल इतकी सामग्री आणि घोड्याचं मांस त्या डेपोमध्ये होतं. इथे मेयर्स, अ‍ॅटकिन्सन आणि टेडी इव्हान्सने ठेवलेले संदेशही स्कॉटला मिळाले. टेडीच्या संदेशावरुन त्याला वाटचालीला बराच त्रास झाला असावा अशी स्कॉटला शंका आली.

अंटार्क्टीकवर हवामान आता थंडं होत चाललं होतं. बर्फातून सतत चालल्याने आणि तापमान उतरल्यामुळे आपले बूट सतत ओले राहत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं. मधूनच पाय गारठत होते. विल्सनला मध्येच स्नो ब्लाइंडनेसने ग्रासलं. मात्र सुदैवाने बर्फ बराच टणक असल्याने त्यांना वाटचाल करताना फारशी अडचण येत नव्हती.

" हवामान झपाट्याने थंड होत चाललं आहे !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " थंडी असह्य होण्यापूर्वी आम्हांला भराभर पुढे जाणं आवश्यक आहे ! घसरत्या तापमानाशी आणि मोसमाशी आमची जणू शर्यतच लागली आहे ! आमच्यापाशी तीनच दिवस पुरेल इतकं इंधन आहे ! पुढचा डेपो गाठण्यास निदान चार दिवस लागतील. तिथे पोहोचल्यावर आम्ही कदाचित सुरक्षीत असण्याची शक्यता आहे, परंतु मला शंका वाटते. कुत्र्यांची तुकडी आम्हाला कुठे भेटू शकेल ?"

डिमीट्री आणि चेरी-गॅराड हट पॉईंटवरुन एक टन डेपोकडे निघाले. त्यांच्याजवळ २४ दिवसांची सामग्री आणि २१ दिवस पुरेल इतकं कुत्र्यांचं खाद्य होतं. निघण्यापूर्वी अ‍ॅटकिन्सनने चेरीला सूचना दिली होती,

" लवकरात लवकर तू एक टन डेपो गाठ. स्कॉट पोहोचला नसला तर परिस्थिती पाहून काय करायचं आणि किती दिवसा वाट पाहायची हे तूच ठरव ! पुढील वर्षी स्लेजला लावण्यासाठी आपल्याला कुत्रे लागतील, त्यामुळे कुत्र्यांच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ नका असा स्कॉटचा आदेश आहे. असंही परतीच्या वाटेवर स्कॉट कुत्र्यांवर अवलंबून नाही !"

टेडी इव्हान्सबरोबर स्कॉटने कुत्र्यांसह दक्षिणेला येण्यासा पाठवलेल्या आदेशाचं काय झालं होतं ?

एक टन डेपोवर कुत्र्यांच्या खाण्याचा साठाच करण्यात आलेला नव्हता !

डे, हूपर, नेल्सन आणि क्लिसॉल्ड एक टन डेपोवर गेले तेव्हा त्यांच्याबरोबर कुत्र्यांचं खाणं नव्हतं ! याचा अर्थ कुत्र्यांना पुढे नेण्यासाठी खाण्याची समस्या उभी राहणार होती !

.... आणि स्कॉट कुत्र्यांच्या तुकडीच्या आशेवर होता !

रॉस आईस शेल्फवर तापमान -४० अंशांपर्यंत घसरलं होतं. रोज पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी बुटात पाय घालणं हे देखील जिकीरीचं होत होतं. अद्यापही मिडल ग्लेशीयर डेपोपासून ते २४ मैलांवर होते ! इंधनाचा तुटवडा आता चांगलाच जाणवत होता.

२९ फेब्रुवारीला मेयर्स, सिम्प्सन आणि स्कर्व्हीने ग्रस्त असलेला टेडी इव्हान्स यांच्यासह टेरा नोव्हाने केप इव्हान्सहून न्यूझीलंडला जाण्यासाठी नांगर उचलला. व्हिक्टर कँपबेलच्या शास्त्रीय संशोधन मोहीमेला घेण्यासाठी टेरा नोव्हाने इव्हान्स कोव्ह गाठलं, परंतु अनेकदा प्रयत्नं करुनही त्यांना किनारा गाठणं शक्यं होत नव्हतं ! कँपबेलची सहा जणांची तुकडी हिमवादळामुळे तेरा दिवसांपासून आपल्या तंबूत अडकून पडली होती !

डिमीट्री आणि चेरी-गॅराडने चार दिवसांत नव्वद मैल अंतर पार करुन ब्लफ डेपो गाठला होता. घोड्यांच्या तुलनेत बर्फावर सफाईने वावरण्याची कुत्र्यांची क्षमता चेरी-गॅराडच्या ध्यानात आली !

२ मार्चला स्कॉट मिडल बॅरीअर डेपोवर पोहोचला. खाद्यपदार्थांची काळजी नव्हती, परंतु इथेही इंधनाचा तुटवडा होता ! इंधनाच्या कॅनमध्ये अपेक्षेपेक्षा कमी इंधन पाहून स्कॉट निराश झाला. हे कमी होतं म्हणूनच की काय, ओएट्सच्या पायाचं दुखणं वाढीस लागलं होतं ! त्याच्या बोटांवर काळपट निळसर छटा दिसू लागल्या होत्या ! ही फ्रॉस्टबाईटची सुरवात असल्याची स्कॉटला कल्पना आली. रात्री घसरत जाणा-या तापमानाने आणि जोरदार वा-याने त्यांच्या हालात अधिकच भर घातली होती. स्लेज ओढताना त्यांना अपार कष्ट पडत होते.

३ मार्चला डिमीट्री आणि चेरी-गॅराडने एक टन डेपो गाठला. पोलर पार्टीचा तिथे मागमूस नव्हता. चेरीने २ दिवस वाट पाहून पुढची हालचाल करण्याचा निर्णय घेतला.

व्हिक्टर कँपबेलच्या तुकडीतील सहका-यांनी निवा-यासाठी इग्लू बांधण्यास सुरवात केली होती !

" आमच्यापाशी जेमतेम एक महिना पुरेल इतके खाद्यपदार्थ होते !" जॉर्ज लेव्हीक म्हणतो, " ६ किंवा ७ मार्चपर्यंत जहाज येऊन पोहोचलं नाही तर त्यानंतर येणं अशक्यंच आहे ! संपूर्ण हिवाळा आम्ही इथे कसा घालवणार हा कठीण प्रश्न आहे !"

स्कॉटच्या तुकडीच्या हालांत दिवसेदिवस भर पडत होती. आपल्या पुढच्या डेपोपासून ते अद्याप तीसेक मैलांवर होते. ओएट्सचा पाय चांगलाच सुजला होता. त्याल पावलागणिक वेदना होत्या. गरम अन्न मिळाल्यास त्याची परिस्थिती सुधारेल अशी विल्सनला खात्री होती, परंतु इंधनाचा प्रश्न उग्र बनत चालला होता. जेमतेम तीन दिवस पुरेल इतकंच इंधन त्यांच्यापाशी शिल्लक होतं. पुढच्या डेपोवरही इंधनाची कमतरता असली तर ? हा प्रश्न स्कॉटला भेडसावत होता !

" इतक्या कमी तापमानाची आम्हांला अपेक्षा नव्हती !" स्कॉटने डायरीत नमूद केलं.

एक टन डेपोमध्ये असलेल्या चेरी-गॅराडने तापमान -३७ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरल्याची नोंद केली. चेरी-गॅराड नॅव्हीगेटर नव्हता. स्कॉटला भेटण्यासाठी आपण पुढे गेलो आणि स्कॉटशी चुकामूक झाली या भीतीने त्याला ग्रासलं होतं. एक टन डेपोवर कुत्र्यांचं खाद्य नसल्याने कुत्र्यांना घेऊन पुढे जायचं असल्यास किमान काही कुत्र्यांचा बळी देऊन त्यांचं मास इतर कुत्र्यांना खायला घालावं लागणार होतं. परंतु कुत्र्यांच्या बाबत कोणतीही रिस्क घेऊ नका असा स्कॉटचा आदेश असल्याचं अ‍ॅटकिन्सनने त्याला बजावलं होतं. चेरी-गॅराड कात्रीत सापडला होता. तो म्हणतो,

" मला स्कॉटला अन्नपदार्थांचा तुटवडा भासत असेल अशी जराही शंका आली नाही ! आणखीन दोन-तीन दिवसांत पोलर पार्टी येऊन पोहोचेल अशी माझी अपेक्षा होती !"

४ मार्चला फ्रामच्या डेकवर असलेल्या जालांडला दूरवर जमिन दिसली !

टास्मानिया !

दक्षिण धृव पादाक्रांत करुन अ‍ॅमंडसेन ऑस्ट्रेलियाच्या किना-याजवळ येऊन पोहोचला होता !

स्कॉटच्या नशिबात काय लिहीलं होतं ?

टास्मानियाच्या किना-यापाशी येऊन पोहोचल्यानंतरही फ्रामपुढच्या समस्या अद्याप संपल्या नव्हत्या. होबार्ट बंदराभोवतीच्या परिसरात वादळाचा धुमाकूळ सुरू होता ! हवामान सुधरल्यावर ते होबार्ट बंदराजवळ पोहोचत असतानाच जोरदार वा-याने फ्रामला पुन्हा खुल्या समुद्रात आणून सोडलं ! जालांड म्हणतो,

" होबार्ट बंदरात प्रवेश करणं अत्यंत कठीण होत होतं. शेवटी एकदाचे आम्ही तिथे पोहोचलो तर वादळाने पुन्हा आम्हाला सागरात हाकललं ! फ्रामचं एक शिड फाटलं होतं !"

रॉस आईस शेल्फवरुन केप इव्हान्सच्या दिशेने मार्गक्रमणा करणा-या स्कॉटच्या तुकडीच्या हालात दिवसेदिवस भर पडत होती. दिवसभरात ८ मैलांवर वाटचाल करणं त्यांना जमत नव्हतं. ओएट्सच्या पायाच्या दुखापतीने आता उग्र स्वरुप धारण केलं होतं. रोज पायात बूट घालतानाही त्याला संघर्ष करावा लागत होता. स्लेजच्या बाजूने तो केवळ अडखळत चालू शकत होता. परिणामी स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सवर स्लेज ओढण्याचं काम येऊन पडलं होतं. ते तिघं मार्ग शोधत असताना ओएट्स स्लेजवर बसून राहत असे.

" ओएट्सच्या पायात असह्य वेदना होत असाव्यात असा माझा अंदाज आहे !" स्कॉट म्हणतो, " मात्रं तो एका शब्दानेही तक्रार करत नाही. अद्यापही आमच्यापाठोपाठ अडखळत का होईना पण तो चालतो आहे !"

आपल्या डेपोपासून ते अद्यापही सुमारे २० मैलांवर होते. त्यांच्याजवळचं इंधन संपत आलं होतं. स्कॉट आणि बॉवर्स स्पिरीटवर चालणारा दिवा बनवण्याच्या प्रयत्नात होते. डेपो गाठण्यापूर्वी इंधन संपल्यास स्पिरीट वापरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता ! डेपोवर आवश्यक तेवढं इंधन उपलब्ध असेल अशी स्कॉटला आशा होती.

होबार्ट बंदराभोवती घोंघावणारं वादळ अखेर एकदाचं निवळलं ! फ्रामने होबार्ट बंदरात प्रवेश केला !

७ मार्च १९१२ !

नॉर्थवेस्ट पॅसेज मधून यशस्वी प्रवास केल्याची बातमी वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात झालेल्या गोंधळामुळे अ‍ॅमंडसेनने योग्य तो धडा घेतला होता. या वेळी मात्र आवश्यक ती खबरदारी घेण्याचा त्याचा ठाम निश्चय होता. मात्रं आपल्या भावाने - लिऑनने कोणत्या वर्तमानपत्राशी करार केला आहे याची त्याला कल्पना नव्हती ! तसंच आपल्या आधी स्कॉट परतला असण्याचीही त्याला भिती वाटत होती !

फ्रामने होबार्ट बंदरात प्रवेश करुन नांगर टाकला, परंतु ती दक्षिण धृवावरुन परत आली आहे याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली ! इतर कोणाशीही संपर्क साधायचा नाही असा अ‍ॅमंडसेनचा सक्त आदेश होता ! एका लहानशा होडीवरुन अ‍ॅमंडसेन एकटाच होबार्टच्या धक्क्यावर उतरला !

FramHobart
फ्राम - होबार्ट - ७ मार्च १९१२

अ‍ॅमंडसेनने ओरीएण्ट हॉटेलमध्ये एक खोली घेतली. सर्वात प्रथम त्याने चौकशी केली ती स्कॉट आणि टेरा नोव्हाची ! अद्यापही त्यांच्याकडून कोणतीही बातमी न आल्याचं कळताच त्याचा आनंद गगनात मावेना. होबार्टच्या नॉर्वेजियन कौन्सिलरची गाठ घेऊन त्याने आपली ओळख करुन दिली. त्याच दिवशी त्याने आपण दक्षिण धृव यशस्वीपणे गाठून परत आल्याची राजा हकून, फ्रिट्झॉफ नॅन्सन आणि लिऑनला तार पाठवली !

दुस-या दिवशी त्याला लिऑनची तार मिळाली. ' डेली क्रॉनीकल ' वृत्तपत्राला संपूर्ण रिपोर्ट पाठवण्याची लिऑनने त्याला सूचना केली होती. या वृत्तपत्राशी लिऑनने करार केला होता. त्याच्या सूचनेप्रमाणे अ‍ॅमंडसेनने आपली साद्यंत हकीकत डेली क्रॉनीकलला पाठवली.

" अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर पोहोचला !"

जगभरातील सर्व वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर बातमी झळकली.

" १४ ते १७ डिसेंबरच्या दरम्यान दक्षिण धृव पादाक्रांत करण्यात आला ! फ्राम होबार्टमध्ये परत !"

अ‍ॅमंडसेनवर अभिनंदनाचा वर्षाव झाला ! सर्वात पहिली तार नॉर्वेचा राजा ७ वा हकून याची होती ! पाठोपाठ नॅन्सन आणि डॉन पेड्रो क्रितोफर्सन यांच्या तारा आल्या. माजी अमेरीकन प्रेसीडेंट थिओडोर रुझवेल्ट आणि इंग्लंडचा जारा किंग जॉर्ज ५ वा यांचेही अभिनंदनाचे संदेश आले. दक्षिण धृवावरुन परत आल्यावर ब्रिटीश साम्राज्यातील होबार्ट बंदरावर आगमन झाल्याबद्दल राजाने विशेष आनंद व्यक्त केला होता !

Fram Crew
दक्षिण धृवावरुन परतलेले फ्रामवरील दर्यावर्दी - होबार्ट, टास्मानिया

नॉर्वेतील वृत्तपत्रांनी अ‍ॅमंडसेनचं अभिनंदन केलं असलं तरी स्कॉटपूर्वी दक्षिण धृव गाठण्यात अ‍ॅमंडसेनने राजकीयदृष्ट्या घोडचूक केली आहे असं अनेक नॉर्वेजियनांचं मत होतं ! अवघ्या काही वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या नॉर्वेला बलाढ्य इंग्लंडशी या मुद्द्यावरुन शत्रुत्वं पत्करावं लागू शकेल असा त्यांचा अंदाज होता ! एका वृत्तपत्राने तर मॅकमुर्डो साऊंडहून बिअर्डमूर ग्लेशीयरच्या मार्गावर केवळ ब्रिटीशांचा हक्क असल्याचं आणि अ‍ॅमंडसेनने त्यांच्या मार्गावर अतिक्रमण न करता व्हेल्सच्या उपसागरातून अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरमार्गे दक्षिण धृव गाठल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला होता !

इंग्लंडमध्ये 'डेली क्रॉनीकल' आणि 'इलस्ट्रेटेड लंडन न्यूज'ने अ‍ॅमंडसेनच्या यशस्वी मोहीमेची बातमी सविस्तरपणे छापली. 'मँचेस्टर गार्डीयन'ने अ‍ॅमंडसेनच्या धैर्याची तारीफ केली. 'यंग इंग्लंड'ने अ‍ॅमंडसेनच्या शौर्याला वाचकांनी कोणत्याही पूर्वग्रहाविना दाद द्यावी असं आवाहन केलं. इंग्लंडमधील प्रत्येक मुलाने आणि तरुणाने अ‍ॅमंडसेनच्या प्रवासाचा वृत्तांत वाचावा असं 'द बॉइज् ओन पेपर'ने आव्हान केलं होतं. टाईम्सने अ‍ॅमंडसेनच्या साहसाचं आणि अज्ञात प्रदेशातून नवीन मार्ग शोधून काढण्याच्या जिगरी वृत्तीच कौतुक केलेलं असलं, तरी स्कॉटला शेवटच्या क्षणी कळवल्याबद्दल त्याच्यावर टीकाही केली होती. अ‍ॅमंडसेनने आधीच स्कॉटला कल्पना दिली असती तर स्कॉटने त्याचं स्वागतच केलं असतं असा टाईम्सचा सूर होता. न्यूयॉर्क टाईम्सने मात्रं अ‍ॅमंडसेनची दक्षिण धृवावरील मोहीम ही केवळ ब्रिटीशांपूर्वी धृवावर पोहोचण्याचा एकमेव उद्देश असलेली मोहीम म्हणून संभावना केली होती.

PolarParty
दक्षिण धृव सर्वप्रथम पादाक्रांत करणारे दर्यावर्दी - हेसेल, विस्टींग, अ‍ॅमंडसेन, जालांड, हॅन्सन

रॉयल जिओग्राफीक सोसायटीच्या सभासदांनी मात्रं अ‍ॅमंडसेनवर टीकेची झोड उठवली. अ‍ॅमंडसेनने स्कॉटला फसवल्याची बहुतेकांची भावना होती. क्लेमंट्स मार्कहॅमने तर अ‍ॅमंडसेनचा दक्षिण धृवावर पोहोलाच नसल्याची शक्यता व्यक्त केली !

" अ‍ॅमंडसेनचा दावा खोटा असण्याची शक्यता आहे !" मार्कहॅम म्हणाला, " सत्य उजेडात येण्यासाठी टेरा नोव्हा परत येईपर्यंत वाट पाहणं आवश्यंक आहे !"

स्कॉट मार्कहॅमचा पट्ट्शिष्य होता. अ‍ॅमंडसेनने स्कॉटपूर्वी दक्षिण धृव पादाक्रांत केल्याचं मार्कहॅमला सहन होणं शक्यंच नव्हतं.
एर्नेस्ट शॅकल्टनने मात्रं अ‍ॅमंडसेनची मुक्त कंठाने प्रशंसा केली. ' धृवीय प्रदेशातील सर्वोत्कृष्ट संशोधक ' म्हणून त्याने अ‍ॅमंडसेनची पाठ थोपटली.

फ्रिट्झॉफ नॅन्सनने डेली क्रॉनीकलला पत्रं लिहून अ‍ॅमंडसेनवर टीका करणा-यांचा समाचार घेतला. नॅन्सन म्हणतो,
" त्याने आपलं लक्ष्यं निश्चीत केलं होतं आणि मग मात्रं एकदाही मागे वळून पाहीलं नाही ! संपूर्णपणे अज्ञात प्रदेशातून वाटचाल करताना अनेक संकटांशी मुकाबला करत, अनेक अडचणींतून मार्ग काढत तो आपलं उद्दीष्टं गाठण्यात सफल झाला. एखादी शोधमोहीम कशी आखावी आणि पूर्ण करावी याचा वस्तूपाठ त्याने सगळ्या जगाला घालून दिला आहे ! सहजपणे एखाद्या सहलीला जावं तसं आपल्या प्रवासाचं त्याने वर्णन केलं असलं तरी त्यामागे असामान्य धाडस आणि प्रचंड मेहनत दडलेली आहे !"

कॅथलीन स्कॉटने मात्रं आपल्या पतीचा पराभव खिलाडूपणे स्वीकारला. ती म्हणते,
" अ‍ॅमंडसनने शेवटच्या क्षणापर्यंत आपला उद्देश लपवून ठेवला असला, तरीही दक्षिण धृव गाठून परत येण्याचा त्याचा असामान्य धाडसी प्रवास नि:संशय कौतुकास्पद आहे !"

सर्व जग अ‍ॅमंडसेनची पाठ थोपटत असताना स्कॉट कुठे होता ?

आपल्या डेपोपासून अद्यापही ८ मैलांवर असलेल्या स्कॉटच्या तुकडीची परिस्थिती दिवसागणि़क खालावत होती. ओएट्सच्या डाव्या पायातील वेदना आता इतक्या वाढल्या होत्या, की आपण सुखरुप परतू शकणार नाही याची त्याला शंका येत होती ! त्यातच विल्सनच्या पायाच्याही तक्रारी सुरु झाल्या होता. दक्षिणेला जाताना ज्या प्रदेशातून त्यांनी सहजपणे मार्गक्रमणा केली होती, त्याच प्रदेशात परतीच्या वाटेवर दुपटीने श्रम करुन अर्ध्या अंतराचीही मजल मारणं त्यांना कठीण जात होतं. डेपोला पोहोचल्यावर काय परिस्थिती असेल याचा विचार सतत त्याच्या मनात येत होता.

" डेपोवर पोहोचल्यावर तिथे काय परिस्थिती असेल ?" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " कुत्र्यांची तुकडी तिथे येऊन पोहोचली असल्यास पुढील काही दिवस वाटचाल करण्याइतपत सामग्री आम्हाला मिळू शकेल, परंतु तिथेही पुरेसं इंधन उपलब्ध नसेल तर मात्रं पुढे काय होईल हे सांगता येत नाही ! आम्ही मोठ्या कठीण परिस्थितीत सापडलो आहोत !"

चेरी-गॅराड आणि डिमीट्री अद्यापही एक टन डेपोवर पोलर पार्टीची वाट पाहत होते ! हवामान झपाट्याने बिघडत चाललं होतं.
चेरी-गॅराड म्हणतो,
" रात्री किमान -४० अंश सेल्सीयसपर्यंत तापमान घसरत होतं. आम्ही पुढे काय करावं याची चर्चा करत इथे वाट पाहत थांबलो आहोत. काल रात्री मला पोलर पार्टी दूरवरुन येताना दिसल्याचा भास झाला ! स्कॉट आल्याची माझी इतकी खात्री पटली होती, की मी त्या दिशेने जाण्यास जवळजवळ निघालोच होतो !"

१० मार्चला स्कॉट आपल्या डेपोवर पोहोचला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे कुत्र्यांच्या तुकडीने तिथे भेट दिलेली नव्हती ! इंधनाचे कॅन उघडून पाहिल्यावर स्कॉट निराश झाला. त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी इंधन तिथे उपलब्ध होतं. त्यातच खाद्यपदार्थांचीही कमतरता असल्याचं त्याच्या ध्यानात आलं !

" अखेर आम्ही डेपोवर पोहोचलो खरे, " स्कॉटने डायरीत नोंद केली, " परंतु इथे एकही गोष्ट धड नाही. खाद्यपदार्थ, इंधन सगळ्याचीच कमतरता आहे ! यात कोणाचा दोष आहे याची मला कल्पना नाही, मात्रं पुढे गेलेल्यांनी मागून येणा-यांचा विचार केला आहे असं मला वाटत नाही. आम्ही ज्यांच्यावर अवलंबून होतो, ती कुत्र्यांची तुकडी सपशेल अपयशी ठरलेली दिसते आहे ! मेयर्सला परतीच्या वाटेवर बराच त्रास झाला असावा ! आम्ही कठीण परिस्थितीत सापडलो आहोत !”

वास्तविक पूर्वी ठरलेल्या योजनेत बदल करुन कुत्र्यांसह मेयर्सला पुढे नेण्याचा स्कॉटचा निर्णय याला कारणीभूत होता. योग्य वेळी कुत्र्यांसह मेयर्स केप इव्हान्सला न पोहोचल्याने त्याला पुन्हा दक्षिणेला येणं अशक्यं झालं होतं. तसंच स्कॉटने शेवटच्या क्षणी पोलर पार्टीत चार ऐवजी पाचा माणसांचा समावेश केल्यामुळे टेडी इव्हान्सच्या तुकडीला सर्व खाद्यपदार्थांची दर कँपवर नव्याने वाटणी करावी लागली होती, परंतु या गोष्टीचा स्कॉटला विसर पडला होता !

हवामान आता झपाट्याने बिघडत चाललं होतं. थंडगार वा-यांचा जोर चांगलाच वाढत होता. त्यातच ओएट्सची अवस्था अत्यंत दयनिय झाली होती. आपण सुखरुप परतू शकणार नाही याची त्याला जवळपास खात्री पटत चालली होती.

" डॉक्टर, मला किती चान्स आहे असं तुम्हांला वाटतं ?" ओएट्सने विल्सनला विचारलं !
" मला कल्पना नाही !" विल्सन उत्तरला, " परंतु तू हिम्मत सोडू नकोस ! काही दिवसांचाच प्रश्न आहे ! एकदा एक टन डेपोला पोहोचलो की मग आपल्याला चिंता नाही !"

विल्सनचा स्वतःचा तरी आपल्या शब्दांवर विश्वास होता की नाही कोणास ठाऊक, परंतु डॉक्टर म्हणून ओएट्सला धीर देण्याचं आपलं कर्तव्य बजावत होता ! स्कॉट म्हणतो,

" ओएट्सच्या पायाची अवस्था पाहता, एखादा चमत्कार झाला तरच... अन्यथा त्याची वेळ आली आहे ! त्याच्यामुळे आम्हांला कित्येकदा खोळंबून राहवं लागतं आहे ! अर्थात त्याला आमचा नाईलाज आहे ! बिचा-याला धीर देण्याव्यतिरिक्त आम्ही काहीच करु शकत नाही. परिस्थिती अशीच राहीली तर आम्ही तरी सुखरुप एक टन डेपो गाठू शकतो का ?"

पोलर पार्टीची वाट पाहत एक टन डेपोवर थांबलेल्या डिमीट्री आणि चेरी-गॅराडने अखेर कँप सोडला आणि हट पॉईंटची वाट धरली.

..... आणि स्कॉटची कुत्र्यांच्या मदतीची शेवटची आशा मावळली !

स्कॉट आणि इतर सर्वजण एक टन डेपो पासून अवघ्या ७० मैलांवर होते ! चेरी-गॅराडला याची कल्पना असती तर.....

स्कॉटला आता आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या बळावर एक टन डेपो गाठावा लागणार होता ! मात्रं ओएट्सची अवस्था पाहता त्याला ते जवळपास अशक्यंच होतं !

पुढील तीन दिवसात त्यांनी आणखीन वीस मैलांची मजल मारली. तापमान -४३ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरलं होतं !

एक दिवस स्कॉटने विल्सनला आदेश दिला,

" या सर्व वेदनांतून कायमची सुटका करणारी जी औषधं तुझ्यापाशी आहेत, त्याची सर्वांमध्ये योग्य प्रमाणात विभागणी कर !"

स्कॉटच्या या आदेशाने विल्सन हादरुन गेला, परंतु स्कॉटचा हुकूम टाळणं त्याला शक्यं नव्हतं. त्याने स्कॉट, बॉवर्स आणि ओएट्सला प्रत्येकी तीस अफूच्या गोळ्या दिल्या ! मॉर्फीनने भरलेली एक ट्यूब त्याने स्वतःसाठी ठेवली होती !

" आमच्यापाशी अद्यापही चार ते पाच दिवस पुरतील इतके खाद्यपदार्थ आहेत. एक टन डेपोपासून आम्ही बहुतेक ४२ मैलांवर आहोत ! ओएट्सला घेऊन दिवसाला ६ मैलांपेक्षा जास्तं अंतर कापणं आम्हाला अशक्यं आहे ! तरीही डेपो पासून १० मैल अंतर बाकी राहील ! सहनशक्तीच्या पलिकडे हवामान थंडगार आहे. वा-याचा जोर असह्य आहे ! वर्षाच्या या वेळेला हिमवादळाने गाठावं यापेक्षा दुसरं दुर्दैवं कोणतं ?"

होबार्ट बंदरात पोहोचल्यापासून अ‍ॅमंडसेनने प्रत्येक गोष्टीतून योहान्सनला कटाक्षाने वगळलं होतं ! कोणत्याही समारंभापासून अथवा सत्कारापासून त्याने योहान्सनला जाणिवपूर्वक दूर ठेवलं होतं ! आपला हा अपमान योहान्सनला सहन झाला नाही ! तो दारुच्या आहारी गेला ! अ‍ॅमंडसेनला तेवढंच निमीत्तं पुरलं ! त्याने योहान्सनची फ्रामवरुन हकालपट्टी केली. त्याला दुस-या जहाजावरुन एकट्याने नॉर्वेला परतण्याचा आदेश दिला !

योहान्सनने फ्राम सोडताच अ‍ॅमंडसेनने आपल्या मोहीमेतील प्रत्येकाला मोहीमेबद्दल एक शब्दही न उच्चारण्याची तंबी दिली ! मोहीमेची संपूर्ण हकीकत लिहीण्याचा अधिकार फक्त अ‍ॅमंडसेनला होता ! मोहीमेचं तपशीलवार वर्णन करणारं त्याचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार होतं ! फ्रामवरील प्रत्येकाची अशा आशयाच्या करारावर त्याने सही घेतली होती !

अ‍ॅमंडसेनने नॅन्सनला लिहीलेल्या पत्रात योहान्सनने आपला आदेश मानण्यात नकार दिल्याचा आरोप केला ! त्याच्या लहरीपणामुळे सर्व मोहीमेलाच धोका उत्पन्न होण्याची शक्यत असल्यामुळे दक्षिण धृवावर जाणा-या तुकडीत त्याचा समावेश केला नसल्याचं त्याने स्पष्टीकरण दिलं. होबार्टला परतल्यावर दारुच्या नशेत तो इतरांना त्रास देत असल्याने आणि त्यांच्या कामात अडथळे आणत असल्यामुळे त्याची फ्रामवरुन हकालपट्टी केल्याचं नमूद केलं ! योहान्सनने स्वत:चा जीव धोक्यात घालून हिमवादळाशी मुकाबला करत प्रेस्टर्डला सुखरुप फ्रामहेम मध्ये आणल्याचा मात्रं त्याने उल्लेखही केला नाही !

एवढं करुनही अ‍ॅमंडसेनचं समाधान झालं नव्हतं ! योहान्सनचं पूर्णपणे खच्चीकरण करण्याचा त्याने चंग बांधला होता. नॉर्वेजियन जॉग्रॉफीक सोसायटीच्या अध्यक्षाला अ‍ॅमंडसेनने तार केली,

" योहान्सनने बंड पुकारल्यामुळे त्याला फ्रामवरुन बडतर्फ करण्यात आलं आहे ! नॉर्वेतील कोणत्याही समारंभामध्ये त्याचा समावेश करण्यात येऊ नये !"

असामान्य धाडसी दर्यावर्दी असलेल्या अ‍ॅमंडसेनेनची ही काळी बाजू

क्रमश :

९० डिग्री साऊथ - ११

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

12 May 2014 - 9:59 pm | लॉरी टांगटूंगकर

प्रत्येक वेळेस प्रतिसाद देत नाहीये, पण वाचतो आहे. आणि स्पार्टाकस स्टाइल झक्कास सुरु आहे.