९० डिग्री साऊथ - ७

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
9 May 2014 - 6:22 am

९० डिग्री साऊथ - ६

३० नोव्हेंबरला अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरवरुन वाटचाल करता अ‍ॅमंडसेनची तुकडी बर्फाच्या टेकड्या आणि त्यांना लागूनच असलेल्या खोल द-या अश्या परिसरात येऊन पोहोचली. या प्रदेशातून मार्ग काढणं अतिशय जिकीरीचं होतं. कित्येकदा वेगवेगळ्या दिशांनी मार्ग काढण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ होत होते. अखेरीस एका टेकडीवरुन जाणारा बर्फाचा पूल त्यांना आढळला. एकावेळी जेमतेम एक स्लेज जाऊ शकेल इतक्याच रुंदीचा तो पूल होता ! दोन्ही बाजूला खोल द-या पसरलेल्या होत्या. अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" एखाद्या सुरीच्या धारेवर चालावं अशी तिथून जाताना आमची अवस्था झाली होती. या पूलावरुन जाताना नायगारा धबधब्यावरुन दोरवरुन चालत जाणा-यांची आम्हांला आठवण होत होती ! आम्हांला कोणाला उंचीचं भय नव्हतं हे आमचं सुदैवंच !"

हा बर्फाचा पूल विरुध्द बाजूला एका भल्यामोठ्या दरीत उतरत होता ! या दरीच्या दोन्ही बाजूला बर्फाच्या भिंती होत्या ! या भिंतींवर चढून दक्षिणेकडे जाण्याची दिशा पकडण्याचे सर्व प्रयत्नं व्यर्थ ठरले होते ! दरीच्या तळाशी असलेल्या बर्फावरुनच वाटचाल करण्यापलीकडे त्यांच्यासमोर मार्ग उरला नव्हता. अर्थात या मार्गाने वाटचाल करताना अनेक कपारी त्यांच्या वाटेत आडव्या येत होत्याच !

बर्फाच्या त्या दरीतून वाटचाल करत ते पूर्व-पश्चिम पसरलेल्या पर्वताच्या धारेवर पोहोचले. पूर्वेच्या दिशेने सुमारे १०० फूट सरळसोट तुटलेला कडा होता ! पश्चिमेच्या दिशेने मात्रं उताराची तीव्रता बरीच कमी होती. सावधपणे उतरत अखेरीस ते ग्लेशीयरच्या मोकळ्या पृष्ठभागावर पोहोचले ! पुन्हा दक्षिणेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली !

काही वेळाने ते ग्लेशीयरच्या तिस-या भागात असलेल्या घुमटाकार टेकड्यांपाशी पोहोचले. या टेकड्यांच्या माथ्यावरुन पुढील प्रदेशाचं निरीक्षण केल्यावर तिथेही अनेक कपारी असल्याचं अ‍ॅमंडसेनला आढळलं. सुदैवाने या सर्व कपारी बर्फाने पूर्ण भरलेल्या असल्याने त्या ओलांडून पलीकडे जाणं सहज शक्यं होतं !

स्कॉटच्या तुकडीतील माणसांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे स्लेज ओढून नेण्यास सुरवात केली होती. स्कॉटच्या योजनेनुसार बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्यापर्यंत पोहोचल्यावर घोड्यांची हत्या करुन त्यांचं मांस बरोबर घेऊन माणसांनी स्लेज ओढत पुढची मजल मारायची होती. परंतु एकंदर प्रवासाचा अनुभव पाहता, बिअर्डमूर ग्लेशीयरच्या ब-याच आधी माणसांनी स्लेज ओढण्यास सुरवात केली होती ! १ डिसेंबरला स्कॉटने आपल्या तिस-या घोड्याला गोळी घातली. 'नोबी' या एकमेव घोड्याचा अपवाद वगळता इतर सर्व घोडेही आता थकल्याचं स्कॉटच्या ध्यानात आलं होतं.

अ‍ॅमंडसेनप्रमाणेच स्कॉटनेही आजूबाजूला आढळलेल्या अनेक पर्वतशिखरांना आपल्या हितचिंतकांची नावं देण्याचा सपाटा लावला होता. १९०३-०४ च्या डिस्कव्हरी मोहीमेत त्याने रॉस आईस शेल्फच्या पूर्वेला असलेल्या एका उत्तुंग पर्वतराजीला क्लेमंट्स मार्कहॅमचं नाव दिलं होतंच ! त्याच रांगेतील वेगळ्या एका पर्वताला त्याने माऊंट लाँगस्टाफचं नाव दिलं !

Markham
माऊंट क्लेमंट्स मार्कहॅम

१ डिसेंबरला स्कॉटने ८२'४७'' दक्षिण अक्षवृत्तावर डेपो कँप उभारला. त्या दिवशी रात्री पुढे मजल मारताना त्याने नोबी या घोड्याला बर्फापासून वाचवण्यासाठी खास बनवण्यात आलेले 'स्नो शूज' घालण्याची सूचना दिली. याचा योग्य तो परिणाम तत्काळ दिसून आला ! स्नो शूज घातल्याने नोबीची प्रगती झपाट्याने होत होती. स्कॉटने इतरही घोड्यांसाठी स्नो शूज बनवून घेतले होते, परंतु घोड्यांची जबाबदारी असलेल्या ओएट्सला त्या स्नो शूजबद्दल साशंकता होती, त्यामुळे त्याने ते स्नो शूज हट पॉईंटलाच ठेबले होते ! स्कॉट म्हणतो,

" स्नो शूज घातल्यावर नोबीची झालेली प्रगती पाहिल्यावर आम्हाला आमची चूक उमगली. हट पॉईंटपासूनच स्नो शूज घातले असते, तर घोड्यांची प्रगती मंदावली नसती !"

२ डिसेंबरला स्कॉटने ८३ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. मात्रं वाटेत घोडे बर्फात सतत रुतत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं. डे आणि हूपर परतल्यावरही अद्याप स्कॉटच्या तुकडीत स्वतः स्कॉट, विल्सन, ओएट्स, कोहेन, बॉवर्स, क्रेन, चेरी-गॅराड, टेडी इव्हान्स, एडगर इव्हान्स, अ‍ॅटकिन्सन, राईट आणि लॅशी असे एकूण बाराजण होते. त्याखेरीज मेअर्स आणि डिमीट्री कुत्र्यांची तुकडी सांभाळत होते स्कॉटचा चौथा घोडा मांसासाठी गोळीला बळी पडला.

डेव्हील्स ग्लेशीयर गार्डनचा परिसर ओलांडून चांगल्या प्रदेशात पोहोचल्याचं अ‍ॅमंडसेनचं समाधान जेमतेम एक दिवस टिकलं ! १ डिसेंबरला पुढच्या प्रवासात त्याचं स्वागत केलं ते बर्फाच्या कपारींनी !

दुरुन पाहताना या कपारी बर्फाने भरलेल्या व अत्यंत निरुपद्रवी वाटत असत, परंतु जवळ पोहोचल्यावर त्यांचं फसवं रुप समोर येत असे. या कपारींत असलेला बर्फ गोठून टणक न बनता भुसभुशीतच राहीला होता. त्यामुळे त्यावरुन मार्ग काढणं हे महाकर्मकठीण होतं. स्लेजसह कपारीत उतरणं सोपं असलं, तरी दुस-या बाजूने बाहेर पडणं हे महाकर्मकठीण होतं ! त्यातच वा-याचा जोर आता वाढत होता. कपारींच्या त्या धोकादायक प्रदेशातून पार झाल्यावर अ‍ॅमंडसेनने डेपो कँप उभारण्याचा निर्णय घेतला. समुद्रसपाटीपासून ते ९७८० फूट उंचावर होते. ८६'४७'' दक्षिण !

४ डिसेंबरला अखेर एकदाचं दक्षिण धृवीय पठार आलं आणि पर्वतांचा आणि कपारींचा प्रदेश संपला म्हणून अ‍ॅमंडसेनच्या तुकडीला हायसं वाटतं आहे तोच एक पर्वताची धार दत्त म्हणून त्यांच्यासमोर उभी राहीली !

एक मोठी दरी पार करुन अ‍ॅमंडसेनने या पर्वतधारेचा पायथा गाठला. या पर्वतधारेत अनेक बर्फाळ टेकड्या आणि फसवे उंचवटे होते. ही धार पार करताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार होती !

या पर्वतधारेचा परिसर अनेक धोकादायक आणि फसव्या कपारींनी भरलेला होता. अशाच एका कपारीवरुन जाताना विस्टींगची स्लेज भुसभुशीत बर्फात भस्सदिशी रुतली ! सुदैवाने हॅसलच्या मदतीने कोणतंही नुकसान न होता तो बाहेर पडण्यात यशस्वी झाला. हॅसल आणि विस्टींग स्लेज बाहेर काढत असताना जालांडने त्यांचे फोटो काढण्यात मग्नं होता !
या कपारींबद्दल एक धोकादायक गोष्ट म्हणजे या कपारींना असलेला बर्फाचा फसवा तळ ! बर्फाच्या वरच्या थरातून आत रुतल्यावर खाली असलेला दुसरा तळ आढळून येत असे. हा तळ टणक बर्फाचा असल्याने आपल्याला आधार मिळेल अशी सर्वांची कल्पना होती. मात्रं ही कल्पना साफ चुकीची असल्याचं लवकरच त्यांच्या ध्यानात आलं. अशाच एका कपारीवरुन जात असताना जालांडने बर्फाच्या वरच्या थरावरुन खाली सूर मारला ! खालच्या बर्फाचा आपल्याला आधार मिळेल ही त्याची अपेक्षा फोल ठरली आणि त्या थरात तो छातीपर्यंत आत रुतला ! प्रसंगावधान राखून स्लेजला असलेला एक दोर त्याने वेळीच पकडला, अन्यथा तो त्या अंतहीन कपारीच्या तळाशी विसावला असता.

कपारींत असलेल्या बर्फाच्या या दोन थरांमधील पोकळीमुळे त्या कपारींवरुन जाताना एक पो़कळ जमिनीवरुन चालल्यासारखा आवाज होत असे ! अ‍ॅमंडसेनने या प्रदेशाला यथार्थ नाव दिलं.

डेव्हील्स बॉलरुम ! सैतानाचं नृत्यागृह !

सावधपणे वाटचाल करत अखेरीस ते त्या धोकादायक प्रदेशातून बाहेर पडले. धोकादायक कपारींचा आणि टेकड्यांचा प्रदेश अखेर संपला होता ! अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरच्या दक्षिण टोकाला ते पोहोचले होते ! इथून पुढे बर्फाच्छादीत धृवीय पठार पसरलेलं होतं ! ८७ अंश दक्षिण !

स्कॉटच्या तुकडीची प्रगती धीम्यागतीने सुरुच होती. ३ आणि ४ डिसेंबरला स्कॉटच्या तुकडीला केवळ १३ मैलाची मजल मारता आली होती. स्कॉटच्या घोड्यांची प्रगती आता मंदावत होती. ४ डिसेंबरला स्कॉटने बिअर्डमूर ग्लेशीयरवर जाणा-या गेट-वे पासून सुमारे १० मैल अंतरावर मुक्काम ठोकला. वा-याचा जोर आता वाढत होता. त्या दिवशी रात्री चेरी-गॅराडच्या घोड्याचा बळी पडला. स्कॉट म्हणतो,

" आमच्या दक्षिण धृवाच्या मोहीमेतील पहिला टप्पा आम्ही गाठला होता. वायव्येला दूरवर दृष्टीपथात येणा-या जमिनीचा विचार करता, धृवाजवळील अक्षवृत्तावरील तो प्रदेश असावा ! अ‍ॅमंडसेनने नेमका तोच मार्ग धरला असला, तर त्याला दक्षिण धृव गाठण्यास जेमतेम शंभर-सव्वाशे मैल अंतर काटावं लागेल !"

बॉवर्सने आपल्या डायरीत नोंद केली,

" कदाचित अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर पोहोचला असेल. पण तो पोहोचला नसेल अशी मला आशा आहे. त्याने स्कॉटला फसवलं आहे !"

दक्षिण धृवावर आपला एकाधिकार मानणा-या ब्रिटीश मानसिकतेचं हे नेमकं दर्शन !

स्कॉटला आलेली शंका खरी होती. अ‍ॅमंडसेन त्याच मार्गावर होता. ८७ अंश अक्षवृत्तावर दक्षिण धृवापासून तो केवळ २०९ मैलांवर होता !

५ डिसेंबरच्या सकाळी पुढे निघालेल्या अ‍ॅमंडसेनच्या तुकडीचं स्वागत केलं ते जोरदार वा-याने आणि त्याबरोबर उडणा-या बर्फाच्या पुंजक्यांनी. दृष्यमानता जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आलेली होती. मात्रं त्या परिस्थितीतही जवळपास आंधळेपणाने ते दक्षिणेच्या दिशेने जात होते ! त्यातच पठारावरील पृष्ठभाग सरळ सपाट असेल ही त्यांची अपेक्षा फोल ठरली. इथला पृष्ठभाग बर्फाच्या मोठाल्या लाटांपासून तयार झाला होता. त्यावरुन स्लेज हाकारणं हे अत्यंत जिकीरीचं काम होतं.

दुस-या दिवशीही वातावरणात काहीच फरक पडला नव्हता. वा-याचा जोर अद्यापही ओसरला नव्हता, त्यामुळे हिमकणांचा मारा होतच होता ! त्यातच समुद्रसपाटीपासून उंची वाढल्यामुळे मधूनच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. मात्रं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्यांचा दक्षिणेकडे प्रवास सुरुच होता. ६ डिसेंबरला त्यांनी ८८ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं ! ८८'९'' अक्षवृत्तावर त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. दर अक्षांशावर डेपो कॅंप उभारण्याच्या आपल्या बेताला यावेळेस अ‍ॅमंडसेनने बगल दिली. शॅकल्टनचा ८८'२३'' दक्षिण अक्षवृत्ताचा विक्रम मोडल्यावरच डेपो उभारण्याचा त्याचा बेत होता !

७ डिसेंबरच्या सकाळीही वा-याचा जोर कायम होता, परंतु दुपारी हवामान अकस्मात बदल झाला ! वा-याचा जोर ओसरला. हवामानाचा योग्य उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने सेक्स्टंटच्या सहाय्याने निरीक्षण करुन आणि गणिताच्या सहाय्याने काळजीपूर्वक आपलं नेमकं स्थान निश्चित केलं - ८८'१६'' दक्षिण !

शॅकल्टनच्या दक्षिण धृवावरील विक्रमापासून ते अवघ्या काही मैलांवर होते !

८८ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडताच अ‍ॅमंडसेनने आघाडीवर असलेल्या हॅन्सनच्या स्लेजवर नॉर्वेचा झेंडा लावला होता. अ‍ॅमंडसेन आघाडीवर होता. त्याच्यापाठोपाठ सर्वजण पुढे निघाले. अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" मजल-दरमजल करत मी स्कीईंग करत पुढे चाललो होतो. एका विशीष्ट जागी पोहोचल्यावर मागून माझ्या सहका-यांचा जल्लोष माझ्या कानावर आला ! मागे वळून मी पाहीलं आणि त्यांच्या आनंदाचं कारण माझ्या ध्यानात आलं ! आम्ही ८८'२३'' दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं होतं ! शॅकल्टनचा विक्रम इतिहासजमा झाला होता !"

Shackelton
अ‍ॅमंडसेन - ८८'२३'' दक्षिण अक्षवृत्तापार

अ‍ॅमंडसेनने शॅकल्टनचा विक्रम मोडला असला तरी शॅकल्टनबद्दल त्याला अपार आदर होता.

" सर एर्नेस्ट शॅकल्टन आणि त्यांच्या सहका-यांनी अतिशय धाडसाने ८८'२३'' अक्षवृत्त गाठलं होतं. त्यांच्यापूर्वी कोणीही इथपर्यंत मजल मारली नव्हती. दक्षिण धृवाच्या इतिहासात शॅकल्टनचं नाव सुवर्णाक्षरात लिहीलं जाईल !"

दोन मैल पुढे अ‍ॅमंडसेनने आपला शेवटचा डेपो कॅंप उभारला. ८८'२५'' दक्षिण अक्षवृत्त !

अ‍ॅमंडसेनने जोरदार वा-याची पर्वा न करता पुढे मजल मारली होती, मात्रं स्कॉटच्या तुकडीला बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्याशी हिमवादळामुळे अडकून पडावं लागलं होतं. स्कॉट म्हणतो,

" तंबूबाहेर पाऊल टाकताच दोन मिनीटांत माणूस हिमाने नखशिखांत माखून निघत होता ! घोड्यांच्या देहाच्या ज्या भागावर आम्ही जाड रग टाकले नव्हते, त्या भागांवर बर्फाचा थर साचत होता. घोड्यांना आडोसा मिळण्यासाठी बर्फाची भिंत पुन्हा उभी करुन आम्ही आपापल्या स्लीपींग बॅगमध्ये शिरलो. शेजारचा तंबू दिसत नव्हता ! इतक्या जोरदार हिमवादळाची वर्षाच्या या मोसमात आम्ही कल्पनाही केली नव्हती !"

६ डिसेंबरला अनपेक्षीतपणे तापमान शून्य अंश सेल्सीयसपार गेलं ! त्यामुळे वेगळीच समस्या उभी राहीली. वाढलेल्या तापमानामुळे बर्फ वितळण्यास सुरवात झाली होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ओलीचिंब झाली होती !

स्कॉटपुढे आता एक वेगळीच समस्या उभी राहीली होती. या अनपेक्षीत हिमवादळामुळे रॉस आईस शेल्फ पार पार करण्यासाठी राखून ठेवलेली अन्नसामग्री संपत आलेली होती. त्यामुळे बिअर्डमूर ग्लेशीयर आणि दक्षिण धृवासाठी राखून ठेवलेल्या अन्नसामग्रीचा वापर करण्यास सुरवात करण्यावाचून पर्याय नव्हता !

टेडी इव्हान्स म्हणतो,

" घोड्यांचा उपयोग आता पूर्णपणे संपला आहे ! त्यांना या अवस्थेत आणखीन बारा मैल पुढे नेण्यापेक्षा गोळ्या घालून मुक्तं करणंच योग्य ठरेल आमच्यापैकी अनेकांनी आतापर्यंत स्लेज ओढत इथवर मजल मारली होती. पुढे जाणं आम्हांला अशक्यं नाही !"

चेरी-गॅराडच्या डोक्यात खाण्याच्या रेशनींगबद्दल विचार घोळत होते. मेअर्सला कुत्र्यांसह मागे पाठवण्याचा निर्णय बदलून ऐनवेळी स्कॉटने त्याला आपल्याबरोबर पुढे आणलं होतं. त्यामुळे इतरांच्या रेशनींगवर परिणाम होत असल्याचं चेरी-गॅराडचं मत होतं. मात्रं घोड्याच्या मांसाचा खुराक मिळाल्याने कुत्र्यांच्या सहाय्याने केप इव्हान्सला परतणं मेअर्सला सहजसाध्य होणार होतं.

८ डिसेंबरच्या दुपारी वादळाचा जोर साफ ओसरला. पुढे कूच करण्याच्या दृष्टीने सर्वांनी तयारीला सुरवात केली, परंतु बर्फात गाडल्या गेलेल्या स्लेज काढून तयारी करेपर्यंत रात्र झाली होती !

दुस-या दिवशी सकाळी स्कॉटच्या तुकडीने आगेकूच सुरु केली. हिमवादळामुळे बर्फाचे थर जमा झाले होते. त्यातून मार्ग काढणं अत्यंत जिकीरीचं झालं होतं. घोड्यांची तर फारच वाईट अवस्था झाली होती. त्यांचे पाय बर्फात रुतत होते. ब-याचदा पोटापर्यंत बर्फात रुतल्यावर बाहेर पडण्यात अधिकच शक्ती खर्च होत होती.

चेरी-गॅराड आणि बॉवर्स एक स्लेज ओढत सर्वात पुढे होते. त्यांच्या खुणांच्या अनुरोधाने मागून इतर सर्वजण येत होते. चेरी-गॅराड म्हणतो,

" आमच्या पाठोपाठ येणा-या घोड्यांची अवस्था कल्पनेपेक्षाही वाईट होती. कित्येक तास आम्ही पुढे जात होतो. दुपारच्या जेवणासाठी थांबायचंही आम्ही टाळलं. एकदा का थांबलो, की परत पुढे निघणं शक्यं होणार नाही हे आम्हांला पक्कं ठाऊक होतं !"

अ‍ॅव्हलाँचमुळे निर्माण झालेल्या बर्फाच्या लाटांमधून मार्ग काढत असताना आपण एका टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो असल्याचं स्कॉटच्या ध्यानात आलं. उजव्या हाताला एक खोल दरी होती. पुढच्या दिशेने अ‍ॅव्हलाँचमुळे तयार झालेल्या बर्फाच्या लाटांचा प्रदेश दृष्टीस पडत होता. स्कॉटला बर्फातील कपारींची काळजी वाटत होती. अत्यंत सावधपणे मार्गक्रमणा करत त्यांनी ती दरी ओलांडली आणि माऊंट होपच्या बाजूला असलेल्या गेट वे ची वाट धरली.

गेटवेपासून दोन मैल अंतरावर स्कॉटने कँप उभारला.

त्या रात्री स्कॉटच्या तुकडीतील उरलेल्या घोड्यांचा बळी देण्यात आला ! घोड्यांचा निकाल लागल्यावर स्लेजवरील माणसांची पुन्हा विभागणी करण्यात आली. स्वतः स्कॉट, विल्सन, ओएट्स आणि एडगर इव्हान्स एका स्लेजवर होते. टेडी इव्हान्स, अ‍ॅटकिन्सन, लॅशी आणि राईट असे चौघजण दुस-या स्लेजवर होते. इव्हान्स आणि लॅशीने तर मोटरस्लेज बंद पडल्यापासून स्लेज ओढत इथवर मजल मारलेली होती ! बॉवर्स, चेरी-गॅराड, क्रेन आणि कोहेन यांचा तिस-या स्लेज तुकडीत समावेश होता.

पूर्वी ठरलेल्या योजनेनुसार बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्यापाशी असलेल्या गेट वे पासून मेयर्स आणि डिमीट्री परत फिरणार होते, परंतु शेवटच्या क्षणी स्कॉटने त्यांना आणखीन दोन दिवस पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

आधीच कमी होत असलेल्या अन्नसामग्रीवर आणखीन ताण पडणार होता !

८८'२५'' दक्षिण अक्षवृत्तावरील आपल्या कँपमधून निघालेल्या अ‍ॅमंडसेनने ८८'४८'' दक्षिण अक्षवृत्त गाठलं होतं !

" आणखीन जास्तीत जास्त पाच दिवसात आम्ही दक्षिण धृवावर पोहोचलो असतो !" अ‍ॅमंडसेन.

१० डिसेंबरला स्कॉटच्या तुकडीने गेट वे मधून बिअर्डमूर ग्लेशीयरची वाट धरली. नुकत्याच झालेल्या हिमवादळामुळे सर्वत्र बर्फाचा थर साचला होता. कित्येक वेळेला गुडघ्यापर्यंत पाय आतमध्ये रुतत होते. संध्याकाळी पाचच्या सुमाराला त्यांनी बिअर्डमूर ग्लेशीयरचा माथा गाठला. ९ वाजता त्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी कँप उभारला. मात्रं आपल्या सहका-यांविषयी, विशेषतः टेडी इव्हान्सच्या तुकडीविषयी स्कॉटला काळजी वाटत होती. विल्सनकडून त्याला त्यांची दमछाक झाल्याबद्दल कल्पना आली होती. विशेषतः लॅशी आणि राईटची फारच कठीण अवस्था झाली होती.

Hope
माऊंट होप आणि गेट वे

निम्रॉड मोहीमेत बिअर्डमूर ग्लेशीयरच्या सुरवातीला लागलेल्या टणक बर्फाचं तपशीलवार वर्णन शॅकल्टनने केलं होतं. मात्रं स्कॉटच्या तुकडीला हिमवादळामुळे भुसभुशीत बर्फातून मार्ग काढावा लागला होता. स्कॉट म्हणतो,

" दर पावलागणिक शॅकल्टन किती सुदैवी होता याचं आम्हाला प्रत्यंतर येत होतं. बिअर्डमूर ग्लेशीयरच्या सुरवातीला आमच्यासारख्या कठीण परिस्थितीचा त्याला सामना करावा लागला नव्हता ! निव्वळ सुदैवानेच त्याला एवढी मजल मारता आली होती !"

स्कॉटच्या मनातील शॅकल्टनविषयी असलेली अढी गेली नव्हती !

अ‍ॅमंडसेनने ८९ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं होतं !

११ डिसेंबरला स्कॉटने बिअर्डमूर ग्लेशीयरवर आपला डेपो कँप उभारला. परतीच्या वाटेवर उपयोगासाठी साधनसामग्रीची तरतूद तिथे करुन ठेवली. भुसभुशीत बर्फातून स्लेज ओढत जाणं त्यांना जिकीरीचं होत होतं. कोणत्याही क्षणी गुडघ्यापर्यंत पाय बर्फात रुतत होते.

दुपारी ३.०० च्या सुमाराला स्कॉटने मेयर्स आणि डिमीट्री यांची कुत्र्यांच्या तुकडीसह केप इव्हान्सला परत पाठवणी केली. त्यांच्याबरोबर त्याने सिम्प्सनला निरोप पाठवला,

" आम्हांला वाटलं होतं तितका हा प्रवास सोपा राहिलेला नाही ! अर्थात आम्ही हार मानणं शक्यंच नाही. मला खात्री आहे लवकरच नशिबाची आम्हाला साथ मिळेल !"

LowerBeardmoore
लोअर बिअर्डमूर ग्लेशीयरवरील स्कॉटचा डेपो कँप

आता सर्वस्वी मानवी मेहनत आणि सहनशक्तीवरच त्यांचं यशापयश अवलंबून होतं ! बिअर्डमूर ग्लेशीयरमधून स्लेज ओढत दक्षिण धृव गाठणं आणि सुखरुप परत येणं हे अत्यंत कठीण काम होतं !

रात्रीच्या कँपवर कोहेनला बर्फामुळे तात्पुरतं अंधत्वं ( स्नो ब्लाईंडनेस ) आल्याची स्कॉटला जाणीव झाली. आतापर्यंत वेगवेगळ्या अक्षांशांवर इव्हान्स, बॉवर्स, लॅशी, ओएट्स यांनाही हा त्रास झाला होता. बर्फावरुन स्लेज ओढताना होणा-या परिस्थितीची एव्हाना स्कॉटला कल्पना आली होती. तो म्हणतो,

" या परिसरात बर्फ इतका भुसभुशीत होता, की स्लेज ओढणं महाकर्मकठीण झालं होतं. पुढचं प्रत्येक पाऊल गुडघ्यापर्यंत बर्फात रुतत होतं. कुत्र्यांच्या पंजांनाही बर्फावर पकड मिळत नव्हती. यावर केवळ एक आणि एकच मार्ग होता तो म्हणजे स्किईंग ! परंतु माझ्या सहका-यांच्या मनात स्किईंगविषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे त्यांनी त्या़कडे काणाडोळा केला होता !"

स्वत: स्कॉटने कुत्र्यांविषयीच्या आपल्या पूर्वग्रहामुळे त्यांचा योग्य वापर करुन घेतला होता का ?

८९' अंश दक्षिण अक्षवृत्तावरुन निघालेल्या अ‍ॅमंडसेनच्या तुकडीला धृवीय पठाराला असलेल्या उताराची जाणीव झाली. सुदैवाने हवामान पूर्णपणे अनुकूल होतं. वा-याचा मागमूस नव्हता ! जालांड म्हणतो,

" दक्षिण धृव आता दृष्टीपथात आला होता. हवामान अनुकूल राहीलं तर एक-दोन दिवसाचाच प्रश्न होता !"

हॅसलच्या मते लक्ष्याच्या जवळ पोहोचल्यावर अ‍ॅमंडसेन बराचसा नर्व्हस् झाला होता. शेवटच्या क्षणी काही अघटीत घडेल अशी त्याला सतत भीती वाटत होती. क्षुल्लक कारणावरुन आपल्या सहका-यांशी त्याचे वाद होत होते ! ८९'१५'' दक्षिण !

१२ डिसेंबरला अ‍ॅमंडसेनने उत्तम हवामनात टणक बर्फावरुन स्कीईंग आणि स्लेजच्या सहाय्याने आपली आगेकूच सुरू केली ! आपल्या लक्ष्याजवळ पोहोचत असताना त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना मूळ धरु लागली होती. आपल्या आधी स्कॉटची तुकडी पोहोचली तर ? स्कॉटजवळ असलेल्या मोटरस्लेजची अ‍ॅमंडसेनला विशेष काळजी वाटत होती. प्रत्यक्षात स्कॉट अद्याप बिअर्डमूर ग्लेशीयरवर असल्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती !

आपला तंबू उभारत असताना काही अंतरावर जालांडला एक काळा ठिपका दिसून आला ! त्याने ताबडतोब आपल्या सहका-यांचं ति़कडे लक्ष्यं वेधलं.

" तिकडे पहा ! तो काळा ठिपका ! तो स्कॉट असेल का?"

सर्वांना निराशेने घेरलं. इतक्या जवळ आल्यावर आपल्याला स्कॉटकडून पराभव स्वीकारावा लागणार का ?

जालांडने त्या ठिपक्याचा छडा लावण्यासाठी तिकडे मोहरा वळवला. काही वेळाने तो समाधानाने परत आला. तो काळा ठिपका म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून त्यांच्याच एका कुत्र्याची विष्ठा होती ! ८९'३०'' अंश दक्षिण !

बिअर्डमूर ग्लेशीयरवरुन दक्षिणेच्या मार्गाला लागलेल्या स्कॉटच्या तुकडीला भुसभुशीत बर्फामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. एव्हाना ते ग्लेशीयरच्या मध्यापर्यंत पोहोचले होते. गुडघ्यापर्यंत त्यांचे पाय बर्फात रुतत होते. बर्फावरुन स्लेज ओढताना त्यांना त्रासदायक होत होतं. स्कॉट म्हणतो,

" शॅकल्टनच्या वेळापत्रकापेक्षा आम्ही सुमारे ५ ते ५ १/२ दिवसांनी मागे होतो. अर्थात गेट वे च्या आधी आम्हांला अडकवून ठेवणा-या हिमवादळाचा हा परिणाम होता. ग्लेशीयरवर साचलेल्या बर्फामुळे स्लेज ओढणं सोपं नव्हतं. शॅकल्टन खूपच सुदैवी ठरला होता !"

१३ डिसेंबरला स्कॉटच्या तुकडीची प्रगती अधिकच मंदावली होती. टेडी इव्हान्सच्या तुकडीने आघाडीवर मजल मारली होती, परंतु इतरांना मात्रं त्यांच्यापाठोपाठ मार्गक्रमणा करण्यात अडचणी येत होत्या. बॉवर्सच्या तुकडीची स्लेज एका विशीष्ट ठिकाणी पक्की अडकून बसली. अखेर स्कॉटने दहा फूट लाकडी रूळ स्लेजखाली घातले, परंतु तरीही त्यांची प्रगती समाधानकारक नव्हती. स्लेज एका बाजूल कलंडत सतत बर्फात रुतत होती. बर्फात रुतलेली स्लेज बाहेर ओढताना त्यांची प्रचंड दमछाक होत होती. दिवसभरात जेमतेम साडेचार मैलांचं अंतर पार करण्यात त्यांना यश मिळालं होतं !

अ‍ॅमंडसेनची तुकडीने ८९'३०'' अक्षांशावरील आपल्या कँपमधून दक्षिणेचा मार्ग धरला. हवामान पूर्णपणे अनुकूल होतं. दिवसभरात पंधरा मैल अंतर पार करुन त्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी तंबू ठोकला. जालांड म्हणतो,

" आमच्या तंबूत पडल्यापडल्या आम्ही दक्षिण धृवाकडे पाहू शकत होतो ! दुस-या दिवशी आम्ही दक्षिण धृवावर पोहोचणार याबद्दल कोणतीच शंका उरली नव्हती ! आम्हांला तिथे स्कॉटची काही खूण, युनियन जॅक दिसून येईल का ? देव करो आणि तसं काही दृष्टीस न पडो ! निदान मला तरी तशी अपेक्षा नाही !"

अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" आम्ही अतिशय उत्तेजीत झालो होतो. ख्रिसमसच्या आधी लहान मुलांना जशी नवीन खेळणी मिळण्याची आतुरता असते, नेमकी तशीच आमची अवस्था झाली होती !"

८९'४५'' अंश दक्षिण !

१४ डिसेंबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने दक्षिण धृवाच्या दिशेने अखेरच्या टप्प्यासाठी आपला कँप सोडला ! दक्षिण धृव तिथून साडेसतरा मैलांवर होता ! हवामान पूर्णपणे अनुकूल होतं. आघाडीवर असलेला हॅन्सन स्लेज चालवताना डोळ्यात तेल घालून स्कॉटची काही खूण दिसते का ते पाहत होता. अगदी शेवटच्या क्षणी स्कॉट आपल्यावर मात करेल या भीतीने सर्वांना ग्रासलं होतं.

दुपारी वा-याने थोडासा वेग पकडला ! सकाळपासून दर्शन देणारा सूर्य आता ढगांआड गेला होता. मात्रं त्या वातावरणाचा त्यांच्या वाटचालीवर कोणताच परिणाम झाला नाही. आठ मैल अंतर बाकी असतांना हॅन्सनने अ‍ॅमंडसेनला स्कीईंग करत पुढे जाण्याची सूचना दिली.

" या बर्फावरुन कुत्र्यांना हाकारणं मला थोडं कठीण जातं आहे !" हॅन्सन म्हणाला, " तू पुढे गेल्यावर तुझ्यापाठी येणं मला सोपं पडेल !"

हॅन्सन हा उत्कृष्ट नॅव्हीगेटर होता. फ्रामहेम पासून आतापर्यंत आघाडीवर राहून त्याने मार्ग आखला होता. पार दक्षिण धृवापर्यंत आघाडीवर राहणं त्याला सहज शक्यं होतं. परंतु दक्षिण धृवावर सर्वप्रथम पाय ठेवण्याचा मान अ‍ॅमंडसेनला मिळावा अशी हॅन्सनची मनीषा होती !

आठ मैलाचं अंतर पार करताच अ‍ॅमंड्सेनने स्कीईंग करणं थांबवलं ! त्याच्यापाठोपाठ हॅन्सन, जालांड, हॅसल आणि विस्टींग येऊन पोहोचले !

१४ डिसेंबर १९११ दुपारी ३.०० वाजता रोनाल्ड अ‍ॅमंडसेनने सर्वप्रथम दक्षिण धृव पादाक्रांत केला !

अ‍ॅमंडसेन म्हणतो,
" आम्ही दक्षिण धृवावर येऊन पोहोचलो होतो ! अर्थात ९० अंशावरील नेमका बिंदू शोधून काढणं त्यावेळी आम्हाला शक्यं होणार नव्हतं, परंतु जास्तीत-जास्त एक-दोन मैलाचा फरक हा फारसा महत्वाचा नव्हता !

माझ्या आयुष्यातील महत्वांचं लक्ष्यं गाठण्यात मी यशस्वी झालो होतो. प्रामाणिकपणे सांगायचं तर उत्तर धृवावर पोहोचणं हे माझं ध्येय होतं आणि मी पृथ्वीच्या बरोबर विरुध्द टोकाला - दक्षिण धृवावर उभा होतो ! माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा विरोधाभास होता !"

सेक्स्टंट आणि गणिताच्या सहाय्याने त्यांनी आपलं स्थान निश्चित केलं.

८९'५६'' दक्षिण अक्षवृत्त !

( एक अक्षवृत्त ६० मिनीटांत आणि प्रत्येक मिनीट ६० सेकंदात विभागलेलं असतं. त्या हिशोबाने दक्षिण धृवाच्या नेमक्या बिंदूपासून ते फक्त ४'' मिनीटं दूर होते ! )

अ‍ॅमंडसेनने बर्फात रोवलेल्या मोठ्या पोलवर सर्वांनी मिळून नॉर्वेचा झेंडा फडकवला ! धृवीय प्रदेशाला त्यांनी नॉर्वेचा राजा किंग हकून ७ वा याचं नाव दिलं.

विस्टींग म्हणतो,
" दक्षिण धृवावर आम्ही सर्वांनी मिळून नॉर्वेचा ध्वज फडकवावा असा अ‍ॅमंडसेनचा आदेश होता. हे यश एका माणसाचं नसून आपल्या सर्वांचं आहे आणि ध्वजसंचलनाचा मान प्रत्येकाला मिळाला पाहीजे अशी त्याची भावना होती !"

AmundsenPole
अ‍ॅमंडसेन, हॅसल, जालांड आणि विस्टींग - हॅन्सनने काढलेला फोटो - दक्षिण धृव

AmundsenPole
सेक्स्टंटच्या सहाय्याने स्थान निश्चीती करताना अ‍ॅमंडसेन - दक्षिण धृव

फ्रेडरीक कूक आणि रॉब पेरी यांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे उत्तर धृव पादाक्रांत करण्याबाबत असलेली संदिग्धता आणि झालेले आरोप-प्रत्यारोप यांची अ‍ॅमंडसेनला पूर्ण कल्पना होती. दक्षिण धृवाबाबत अशी कोणताही वाद होऊ न देण्याचां त्याने मनाशी पक्कं ठरवलं होतं. त्या हेतूने नॉर्वेच्या ध्वजाला केंद्रबिंदू धरुन भोवताली सुमारे साडेबारा मैल त्रिज्येच्या परिसरात खूण म्हणून झेंडे लावण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती. दक्षिण धृवावर आपल्या विजयाचा निर्विवाद खुणा सोडण्याचा त्याचा निश्चय होता.

" आपण दक्षिण धृवावर निश्चितपणे येऊन पोहोचलो होतो हे स्कॉटला या दिशादर्शक झेंड्यांमुळे नक्की समजून येईल !" अ‍ॅमंडसेन आपल्या सहका-यांना म्हणाला.

जालांड, विस्टींग आणि हॅसेलची फार वेळ घालवण्याची तयारी नव्हती. थोड्या विश्रांतीनंतर १५ डिसेंबरच्या पहाटे त्यांनी नॉर्वेचा झेंडा मध्य धरुन आणि ते आलेली दिशा सोडून तीन दिशांना स्कीईंग करण्यास सुरवात केली. प्रत्येकाला आपापल्या दिशेने आता साडेबारा मैल अंतर पार करुन खुणेचे झेंडे उभारायचे होते.

अ‍ॅमंडसेन म्हणतो,
" त्या तिघांनी अंगावर घेतलेली कामगिरी सोपी वाटत असली तरी ती अतिशय अवघड होती. आमचा लहानसा तंबू त्या बर्फाळ प्रदेशात दूर अंतरावरुन दिसणं हे अशक्यंच होतं. दिशा दर्शवण्यासाठी कंपास योग्य ठरला असता, परंतु आमचे कंपास स्लेजला जोडलेले होते. बर्फात दिशा भरकटणं अगदी सहज शक्यं होतं. हवामान अनुकूल असलं तरी कधीही बदलण्याची शक्यता होती. तसं झालं तर तंबूच्या दिशेने सुखरुप परतणं अशक्यप्राय झालं असतं ! परंतु त्या तिघांना त्याची कसलीच पर्वा नव्हती !"

सुदैवाने कोणतीही अडचण न येता तीन दिशांना गेलेले जालांड, विस्टींग आणि हॅसल सहा तासांनी जवळपास एकाच वेळेला येऊन पोहोचले. आपल्याबरोबर नेलेले खुणेचे झेंडे प्रत्येकाने उभारले होते.

" ब्रिटीशांची कोणतीही खूण दूर अंतरावरही आम्हांला आढळली नाही !" जालांड म्हणाला.

जालांड, हॅसल आणि विस्टींग या कामगिरीवर गेलेले असताना अ‍ॅमंडसेन आणि हॅन्सन यांनी अनेक निरीक्षणं आणि गणिताच्या सहाय्याने दक्षिण धृवाचं नेमकं स्थान अद्याप सात मैलांवर असल्याचं शोधून काढलं होतं ! तिघांनी झेंड्याच्या सहाय्याने खुणा केलेल्या प्रदेशाच्या केंद्रस्थानी हे स्थान होतं. अ‍ॅमंडसेनची मात्रं वादासाठी एवढीशीही संधी ठेवण्याची इच्छा नव्हती.

" उद्या सकाळी आपण या शेवटच्या सात मैलांच्या प्रवासाकरता कूच करणार आहोत !" अ‍ॅमंडसेन आपल्या सहका-यांना उद्देशून म्हणाला, " मला कोणालाही कोणताही वाद निर्माण करण्याची संधी देण्याची इच्छा नाही !"

१६ डिसेंबरच्या सकाळी लवकरच अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने या शेवटच्या सात मैलांच्या प्रवासासाठी आपला कँप सोडला. शिल्लक असलेल्या सोळा कुत्र्यांना हॅन्सन आणि विस्टींगच्या स्लेजला जोडण्यात आलं. पूर्वी ठरल्याप्रमाणे जालांडची स्लेज तिथेच सोडून ते पुढे निघाले. अ‍ॅमंडसेनने जालांडला सर्वात पुढे जाण्याची सूचना केली. त्याच्यापाठोपाठ हॅसल, आपापल्या स्लेजसह हॅन्सन आणि विस्टींग आणि सर्वात शेवटी अ‍ॅमंडसेन या क्रमाने सकाळी ११.०० वाजता ते दक्षिण धृवाच्या नेमक्या बिंदूपाशी येऊन पोहोचले !

दिवसभरात अनेक निरीक्षणं आणि गणितं याच्या आधारे त्यांनी आपलं नेमकं स्थान निश्चित केलं.

९०' अंश दक्षिण अक्षवृत्त !

दक्षिण धृव !

त्या रात्री जालांडने आपल्या सहका-यांसमोर भाषण ठोकलं ! आपल्या मोहीमेचं नेमकं वर्णन त्याने यथार्थ शब्दांत केलं होतं. त्यानंतर जालांडने एका सिगरेट केसमधून सर्वांना सिगारेट्स दिल्या ! उरलेल्या सर्व सिगारेट्ससह ती केस त्याने दक्षिण धृवाची खास आठवण म्हणून अ‍ॅमंडसेनला दिली ! जालांड स्वतः धूम्रपान करत नसूनही पार फ्रामहेम पासून त्याने ती सिगारेट केस खास या प्रसंगासाठी म्हणून जवळ बाळगली होती !

" आमच्या व्यतिरिक्त तिथे कोणाच्याही अस्तित्वाची कोणतीही खूण आढळली नाही !" अ‍ॅमंडसेन.

दक्षिण धृवाच्या नेमक्या बिंदूवर पोहोचल्यावरही अ‍ॅमंडसेन समाधानी नव्हता ! त्याने आपल्या सहका-यांना तीन मैलाच्या परिघात खुणेचे झेंडे लावण्याच्या कामगिरीवर पाठवलं. दुपारी ती कामगिरी आटपताच अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवावर खास निशाणीसाठी आणलेला तंबू उभारला ! या तंबूवर दोन लेबलं शिवण्यात आली होती. एकावर लिहीलं होतं 'बॉन व्हॉयेज' तर दुस-यावर मजकूर होता, ' वेलकम टू ९० डिग्रीज् !'. या तंबूच्या वर बांबूची सऱळसोट काठी उभारण्यात आली आणि त्यावर नॉर्वेचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. खेरीज फ्राम जहाचाचाही खास झेंडा त्यावर होता ! अ‍ॅमंडसेनने या तंबूला नाव दिलं -

पोलहेम !

धृवावरील घर !

Poleheim
अ‍ॅमंडसेन, हॅन्सन, हॅसल आणि विस्टींग - पोलहेम - ९० अंश दक्षिण - जालांडने काढलेला फोटो

अ‍ॅमंडसेनने पोलहेम मध्ये कागदावर नोंद करुन ठेवली.

रोनाल्ड अ‍ॅमंडसेन
ओलाव्ह ओलाव्हसन जालांड
हेल्मर हॅन्सन
स्वेर हॅसल
ऑस्कर विस्टींग
- १५ डिसेंबर १९११

आपल्या तंबूमध्ये नॉर्वेचा राजा ७ वा हकून याच्या नावाने त्याने पत्रं लिहून ठेवलं होतं.

" महाराज, आम्ही ग्रेट आईस बॅरीअरच्या दक्षिणेच्या बिंदूवर जिथे व्हिक्टोरीया लँड आणि किंग एडवर्ड लँड एकत्र येतात त्या दक्षिण धृवावर पोहोचण्यात यशस्वी झालो आहोत ! वाटेत आढळलेल्या समुद्रसपाटीपासून सुमारे २२००० फूट उंचीच्या पर्वतरांगेचं आपल्या परवानगीने आम्ही क्वीन मॉड पर्वतश्रेणी असं नामकरण केलं आहे. ८९ अंश दक्षिण अक्षवृत्तापासून दक्षिण धृवावर पोहोचेपर्यंत आढळलेल्या मोठ्या पठाराला आम्ही आपलं - किंग हकून ७ वा असं नाव दिलं आहे ! - रोनाल्ड अ‍ॅमंडसेन, पोलहेम, ९० अंश दक्षिण - १७ डिसेंबर १९११."

आपल्या पाठोपाठ दक्षिण धृवावर पोहोचणारा पहिला माणूस कॅप्टन स्कॉट असेल याची अ‍ॅमंडसेनला खात्री होती. नॉर्वेच्या राजाच्या नावाने लिहीलेलं हे पत्रं पोहोचवण्याची विनंती करणारी चिठी त्याने स्कॉटच्या नावाने लिहीली.

अ‍ॅमंडसेन म्हणतो,
" ज्या मार्गाने आम्ही दक्षिण धृवावर पोहोचलो होतो, त्याचा विचार करता फ्रामहेमकडे परतताना वाटेत काहीही घडण्याची शक्यता होती ! दुर्दैवाने आमच्यापैकी कोणीही जिवंत परत गेला नाही तर आम्ही दक्षिण धृव गाठल्याची बातमी नॉर्वेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पत्रं कामी येणार होतं !"

राजाच्या नावने लिहीलेलं पत्रं आणि स्कॉटला लिहीलेल्या चिठीव्यतिरिक्त अ‍ॅमंडसेनने स्कॉटच्या तुकडीसाठी काही साधनसामग्री मागे ठेवली होती. उत्तर धृवाच्या मोहीमेकरता स्कॉटने पाठवलेल्या उपकरणांचा त्यात समावेश होता. त्याचबरोबर रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेले उबदार कपडे, एक सेक्स्टंट आणि इतर काही उपकरणं होती.
संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवाचा निरोप घेतला आणि उत्तरेकडे मोहरा वळवला.

" गुडबाय डियर पोल !" अ‍ॅमंडसेन उद्गारला, " पुन्हा आपली भेट होईल असं वाटत नाही !"

विस्टींगने आपल्या डायरीत स्कॉटविषयी सहानुभूती व्यक्तं केली,
" बिचारा कॅप्टन स्कॉट ! इतक्या मेहनतीनंतर इथे पोहोचल्यावर इथे नॉर्वेजीयन झेंडा आणि पोलहेम पाहून काय वाटेल याची कल्पनाही करवत नाही !"

अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर विजयी झेंडा रोवून परत फिरत असताना कॅप्टन स्कॉट कुठे होता ?

अ‍ॅमंडसेनचा मार्ग :-
Map

क्रमश :

९० डिग्री साऊथ - ८

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

9 May 2014 - 7:12 pm | llपुण्याचे पेशवेll

थरारक. स्कॉटचे काय झाले हे जाणण्यास उत्सुक.

कवितानागेश's picture

9 May 2014 - 8:05 pm | कवितानागेश

सगळे भाग एकापाठोपाठ एक वाचून काढले. :)
..... दमले!

पैसा's picture

21 May 2014 - 10:17 am | पैसा

वाचत आहे