९० डिग्री साऊथ - ६

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
7 May 2014 - 9:18 am

९० डिग्री साऊथ - ५

२५ ऑक्टोबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने ८० अंश दक्षिणेचा आपला डेपो कँप सोडला आणि पुढची दिशा पकडली. दिवसाला सुमारे १५-१६ मैलांची मजल मारत २९ ऑक्टोबरच्या दुपारी त्यांनी ८१ अंश दक्षिण अक्षवृत्तावर असलेला दुसरा डेपो गाठला.

हॅन्सनच्या स्लेजला असलेल्या कुत्र्यांपैकी एक कुत्रा खूपच अशक्तं झाला होता. त्याला पुढे जाणं अशक्यं होणार होतं हे उघड होतं. निरुपायाने हॅन्सनने त्याला गोळी घातली. अ‍ॅमंडसेनने अशक्तं कुत्र्यांना मारुन त्यांचं मांस इतर कुत्र्यांना आणि वेळ पडलीच तर माणसांसाठी वापरण्याचा आधीच निर्णय घेतला होता.

मोटरस्लेजसह निघालेल्या स्कॉटच्या मोहीमेतील तुकडीची प्रगती अड्खळत सुरु होती. मात्रं स्कॉटच्या मते स्लेजमधील अनेक छोट्या-मोठ्या अडचणींनंतर त्याची प्रगती समाधानकारकच होती. २८ ऑक्टोबरला लॅशीची स्लेज सेफ्टी पॉईंटच्या कँपजवळ नादुरुस्त झाली होती. लॅशी आणि डे यांनी रात्रभर जागून मोटर दुरुस्त करण्यात यश मिळवलं खरं, परंतु हट पॉईंटपार गेलेल्या टेडी इव्हान्सला काही सामान विसरल्यामुळे परत येणं भाग पडलं होतं !

१ नोव्हेंबरच्या सकाळी स्कॉटच्या मोहीमेतील सोळाजणांनी केप इव्हान्स सोडलं आणि दक्षिणेचा मार्ग धरला !

४ नोव्हेंबरला स्कॉट आणि इतर सर्वजण एक टन डेपोच्या वाटेवर असताना, त्यांना वाटेत नादुरुस्त झालेली एक मोटरस्लेज आढळली !

लॅशीने स्कॉटसाठी चिठी ठेवली होती. डे च्या मोटरस्लेजचा दुसरा सिलेंडर पूर्णपणे तुटला होता. उपलब्ध असलेला एकमेव जास्तीचा सिलेंडर लॅशीच्या मोटरस्लेजला आधीच बसवण्यात आला होता. डे ची स्लेज तीन सिलेंडर्सवरही चालू शकत होती, परंतु त्यासाठी स्लेजचं इंजिन संपूर्णपणे उघडून परत बसवणं आवश्यक होतं. त्या भानगडीत न पडता त्यांनी सरळ स्लेज वाटेत सोडून दिली होती ! स्लेजवरील बरचंस सामान दुस-या स्लेजवर लादून त्यांनी पुढचा मार्ग पत्करला होता !

५ नोव्हेंबरला कॉर्नर कँपवरुन निघाल्यावर जेमतेम तीन मैल अंतरावर तिसरी मोटरस्लेज नादुरुस्त अवस्थेत आढळून आली ! इव्हान्सच्या चिठीतून मागच्या स्लेजप्रमाणेच या मोटरस्लेजचाही सिलेंडर तुटला होता ! इंजिन उत्तम अवस्थेत असलं तरीही सिलेंडरविना स्लेज पुढे जाणं अशक्यंच होतं. निरुपायाने शक्यं ते सामान घेऊन टेडी इव्हान्सच्या तुकडीने एक टन डेपोची वाट पकडली होती.

ज्या तीन मोटरस्लेजच्या यशाबद्द्ल स्कॉटला खात्री वाटत होती, त्या तीनही स्लेजचा केप इव्हान्सपासून ५० मैलांच्या आत निकाल लागला होता !

स्कॉटला आपली निराशा लपवता आली नाही. मोहीमेच्या एकंदर खर्चापैकी बराच पैसा त्या स्लेजवर खर्च झाला होता. आपल्या डायरीत त्याने नोंद केली,

" मोटरस्लेजवर मला खूप भरवसा होता. ग्रेट आईस बॅरीयरवर त्यांची प्रगती चांगली होईल अशी मला आशा होती."

६ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनने ८२ अंश अक्षवृत्तावर असलेला आपला कँप सोडला आणि दक्षिणेची वाट धरली. डेपो उभारणीच्या मोहीमेत इथपर्यंत मजल मारल्याने या प्रदेशाची त्यांना कल्पना होती, परंतु यापुढील प्रत्येक पाऊल अनोळखी प्रदेशात पडणार होतं ! दक्षिण धृवावर पोहोचून परत येताना साधनसामग्रीची तरतूद करण्याच्या हेतूने दर अक्षांशावर डेपो उभारण्याचा अ‍ॅमंडसेनने निर्णय घेतला होता.

१२ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनने ८४ अंश दक्षिण अक्षवृत्तावर कँप उभारला. कँपपासून दूर अंतरावर पूर्वेच्या दिशेने जाणा-या पर्वतराजीने त्यांचं लक्षं वेधून घेतलं.

ट्रान्सअंटार्क्टीक माऊंटन्स !

TransAntartic
ट्रान्सअंटार्क्टीक माऊंटन्स

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिखराच्या माथ्याजवळ असलेला बर्फाचा थर सोड्ला, तर एकाही पर्वताच्या धारेवर बर्फाचा मागमूसही नव्हता ! या पर्वतशिखरांना वळसा घालून पुढे जाणं अशक्यंच होतं ! या पर्वतराजीतून चढाई करून माथ्यावरुन पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता !

१५ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने ८५ अंश अक्षवृत्तावर कँप उभारला. समोरच उभ्या ठाकलेल्या पर्वतराजीवर चढाईसाठी योग्य मार्ग शोधून काढणं हे अत्यावश्यक होतं. या मार्गाने यापूर्वी कधीही कोणीही दक्षिण दिशेला गेलेलं नसल्याने चढाईसाठी सोईस्कर जागा पाहून तिथून माथा गाठण्याचा अ‍ॅमंडसेनचा बेत होता.

Amundsen85
८५ अंश अक्षवृत्तावरील अ‍ॅमंडसेनच्या डेपो.

अ‍ॅमंडसेन ८५ अंश अक्षवृत्तावर असताना, १५ नोव्हेंबरला स्कॉटने ७९'२९'' वरील आपला एक टन डेपो गाठला !

ScottOneTon
स्कॉटचा एक टन डेपो

८५ अंश अक्षवृत्तावरील आपल्या कँपमध्ये अ‍ॅमंडसेनने आपल्या पुढील मोहीमेची योजना आखण्यास सुरवात केली. दक्षिण धृव गाठून पुन्हा कँपवर परतून येण्यासाठी ६८३ मैल अंतर काटावं लागणार होतं. या प्रवासासाठी दोन महिन्यांचा काळ लागणार होता. त्या दृष्टीने ६० दिवसांची अन्नसामग्री ३ स्लेजवर चढवण्यात आली. दक्षिण धृवावरुन परतल्यावर परतीच्या प्रवासासाठी ३० दिवसांची सामग्री कँपवरच ठेवण्यात आली.

फ्रामहेममधून निघताना त्यांच्याबरोबर असलेल्या ५२ कुत्र्यांपैकी आता ४२ शिल्लक होती. अर्थात या सर्व कुत्र्यांना दक्षिण धृवापर्यंत नेणं अशक्यं होतं. पर्वताचा माथा गाठल्यावर ४२ फक्त १८ कुत्रे धृवाच्या दिशेने जाणार होते ! उरलेल्या २४ कुत्र्यांची हत्या करुन त्यांचं मांस बरोबर घेण्यात येणार होतं. दक्षिणेला जाणा-या १८ कुत्र्यांना आणि गरज पडल्यास अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहका-यांना या मांसाचा उपयोग होणार होता ! १८ कुत्र्यांपैकीही गरज भासेल त्याप्रमाणे ६ कुत्र्यांची हत्या करुन उरलेल्या १२ कुत्र्यांना परत आणण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती.

१६ नोव्हेंबरच्या सकाळी जालांड, हॅसल आणि अ‍ॅमंडसेन पर्वतावर चढाईचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यास निघाले. वाटेत आढळलेल्या सुमारे १००० फूट उंचीच्या शिखराचं त्यांनी माऊंट बेटी असं नामकरण केलं. माऊंट बेटी ओलांडल्यावर चढाई तीव्र होत चालली होती. मात्रं हा मार्गच पुढे वरील ग्लेशीयरकडे जाणारा आहे असं अ‍ॅमंड्सेनला आढळून आलं.

दुस-या दिवशी सकाळी अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने पर्वतावर चढाईस प्रारंभ केला !

कँप सोडण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून अ‍ॅमंडसेनने आपला पुढचा बेत बारीक-सारीक तपशीलांसह एका कागदावर उतरवून काढला. दक्षिण धृव गाठण्याचा मार्ग आणि बरोबर घेतलेल्या अन्नासामग्रीची नोंद करण्यास तो विसरला नाही. एका बाटलीत घालून तो कागद त्याने आपल्या कँपमध्ये ठेवून दिला !

माऊंट बेटी ओलांडल्यावर तीव्र उतारावरुन चढाई करत त्यांनी ११ मैलाची मजल मारली. त्या अकरा मैलात त्यांनी ६०० मीटर उंची गाठली होती. पुढे जाण्याचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी एका दिशेने जालांड आणि दुस-या दिशेने हॅन्सन आणि विस्टींग पुढे निघाले. जालांडने शोधलेला मार्ग तीव्र चढाईचा होता आणि एका उंच कड्यापाशी जाऊन संपत होता ! अ‍ॅमंडसेनने हॅन्सन आणि विस्टींगच्या मार्गाने चढाई करण्याचा बेत केला.

हॅन्सन आणि विस्टींगने आदल्या दिवशी शोधलेल्या मार्गाने त्यांनी चढाईला सुरवात केली. वाटेत आढळलेल्या अनेक पर्वतशिखरांना अ‍ॅमंडसेनने माऊंट फ्रिट्झॉफ नॅन्सन, माऊंट डॉन पेड्रो क्रिस्तोफर्सन अशी नावं देण्याचा सपाटा लावला होता !

Nansen
माऊंट फ्रिट्झॉफ नॅन्सन

Christophersen
माऊंट डॉन पेड्रो क्रिस्तोफर्सन

कुत्र्यांच्या सहाय्याने स्लेजसह सावधपणे चढाई करत त्यांनी ४५५० फूट उंची गाठली. पलीकडे नजर टाकताच त्यांना खाली लांबवर पसरलेलं ग्लेशीयर नजरेस पडलं !

अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयर !

Axel
अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयर

दक्षिण धृवीय पठारावर जाणारी वाट अ‍ॅक्सेल हेलबर्ग ग्लेशीयरवरुनच जात असावी याची अ‍ॅमंडसेनला पक्की खात्री होती. माऊंट नॅन्सन आणि माऊंट क्रिस्तोफर्सन यांच्या मधून हे चढत हे ग्लेशीयर धृवीय पठारावर जात असल्याचं अ‍ॅमंडसेनला आढळलं. परंतु या ग्लेशीयरवरुन वर चढाई करणं हे अतिशय कठीण काम होतं. वाटेत अनेक ठिकाणी भल्याथोरल्या कपारी आSS वासून उभ्या ठाकलेल्या दिसत होत्या. माऊंट नॅन्सनचे सरळसोट कडे चढून जाणं निव्वळ अशक्यंच होतं. त्यामुळे एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे माऊंट क्रिस्तोफर्सनच्या धारेवरुन चढाई करणं !

क्रिस्तोफर्सनच्या धारेवरुन चढाई करणं हे सोपं दिसत असलं तरीही प्रत्यक्षात ते तितकंच कठीण होतं ! अनेकदा फसव्या आणि धोकादायक कपारींमुळे त्यांना मार्ग बदलावा लागत होता. कित्येकदा काही मीटर चढाई केल्यावर खाली उतरुन दुसरा मार्ग शोधावा लागत होता. रात्रीच्या मुक्कामात सर्वजण तंबूत आडवे झालेले असतानाच अ‍ॅमंडसेनला जोरदार गडगडाटा आणि गर्जनेचा आवाज आला.

अ‍ॅव्हलाँच !

सुदैवाने अ‍ॅव्हलाँच मुळे आलेला बर्फाचा लोंढा त्यांच्या तंबूच्या दिशेने न येता क्रिस्तोफर्सनच्या धारेवरुन विरुध्द दिशेने खाली झेपावला होता. अखेरीस २१ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता त्यांनी समुद्रसपाटीपासून १०९२० फूट उंचीवर अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरच्या माथ्यावरील पठार गाठलं ! ८५'३६'' दक्षिण !

आता एक अत्यंत अप्रिय काम करण्याची वेळ येऊन ठेपली होती !

आतापर्यंत साथ दिलेल्या ४२ पैकी २४ इमानी कुत्र्यांची हत्या !

हत्या करण्यासाठी कुत्र्यांची निवड करण्याचं काम अ‍ॅमंडसनने स्लेज चालवणा-यांवर सोडलं होतं. प्रत्येकाने आपापल्या कुत्र्यांपैकी बळींची निवड केली. अ‍ॅमंडसेनने तंबूत शिरुन घाईने स्टोव्ह पेटवण्यास सुरवात केली. तो म्हणतो,

" स्टोव्हच्या आवाजात मला बंदू़कीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येऊ नये अशी इच्छा होती. काही वेळातच पहीला आवाज माझ्या कानावर आल. मग एकामागोमाग एक असे चोवीस गोळ्यांचे आवाज आले ! आतापर्यंत आम्हांला साथ देणा-या इमानी प्राण्यांचे जीव घेणं नकोसं वाटत असलं, तरी दक्षिण धृव गाठण्यासाठी आमच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. रात्री आम्ही सर्वजण विमनस्क मनस्थीतीत होतो. आमच्या कुत्र्यांचा आम्हांला खूप लळा लागला होता !"

अर्थात काहीही झालं तरीही दक्षिण धृवावर पोहोचण्याचं उद्दीष्ट गाठण्याच्या त्यांच्या योजनेत कोणताही बदल होणार नव्हता !

कुत्र्याच्या मांसाचे योग्य प्रमाणात तुकडे कापून बरोबर घेण्याचं काम विस्टींगने सफाईदारपणे पार पाडलं. त्या जागेला त्यांनी यथार्थ नाव दिलं...

बुचर्स शॉप ! खाटीकखाना !

दरम्यान आपल्या एक टन डेपोमधून स्कॉटने १५ नोव्हेंबरच्या रात्रीच पुढे कूच केलं होतं. घोड्यांच्या सहाय्याने त्याची प्रगती सुरु होती. मात्रं बर्फावर पावलं टाकताना काही ठिकाणी घोड्यांना फार कष्टं पडत होते. एका घोड्याविषयी स्कॉटला विशेष काळजी वाटत होती. मात्रं तरीही त्याची आगेकूच सुरुच होती. अ‍ॅमंडसेनच्या तुकडीप्रमाणेच मांसासाठी घोड्यांची हत्या करण्याची स्कॉटची योजना होती.

२१ नोव्हेंबरला स्कॉटने ८०'३२'' अक्षवृत्तावर असलेला कँप गाठला. मोटरस्लेज पार्टी त्यांची वाट पाहत तिथे थांबली होती. इव्हान्स, लॅशी, डे आणि हूपर १५ नोव्हेंबरलाच तिथे पोहोचले होते. गेले सहा दिवस ते स्कॉट आणि इतरांची वाट पाहत तिथे थांबलेले होते. पूर्वी ठरलेल्या बेताप्रमाणे या कँपपासून मोटरस्लेज पार्टी परत फिरणार होती. मोटरस्लेज पार्टीबरोबरच कुत्रेही परत फिरणार होते. परतीच्या वाटेवर डेपो कँप्समध्ये साधनसामग्री भरुन ठेवण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होणार होता.

आतापर्यंतच्या धीम्या प्रगतीने काळजीत पडलेल्या स्कॉटने आता आपला बेत बदलला आणि मोटरस्लेज पार्टी आणि कुत्रे पुढे नेण्याचा बेत केला. त्याच्या नवीन योजनेनुसार आता आणखीन तीन दिवस पुढे वाटचाल केल्यावर डे आणि हूपर केप इव्हान्सला परत फिरणार होते.

स्कॉट आणि इतरांनी पुढचा मार्ग पकडला. स्कॉटच्या घोड्यांपैकी एक अगदीच रोडावला होता. लवकरच कुत्र्यांना आणि माणसांना मांसासाठी त्याचा बळी जाणार हे उघड होतं. परंतु अ‍ॅटकिन्सन आणि ओएट्स काहीही झालं तरी शॅकल्टनने जिथे अन्नासाठी आपला पहिला घोडा मारला, त्या जागेपार त्याला घेऊन जाण्यावर ठाम होते ! शॅकल्टनवर मात करण्यासाठी तसं करणं त्यांना आवश्यंक वाटत होतं !

२३ नोव्हेंबरला स्कॉटने ८१ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. २४ नोव्हेंबरला पूर्वी ठरल्याप्रमाणे डे आणि हूपरने परतीची वाट पकडली. पूर्वीच्या बेतातील हा बदल स्कॉटने त्यांच्यामार्फत केप इव्हान्सला असलेल्या सिम्पसनला कळवण्याची व्यवस्था केली. परंतु ते दोघं परतण्यापूर्वी स्कॉटला आपल्या घोड्यांपैकी सर्वात दुबळ्या घोड्याला गोळी घालावी लागली !

२१ नोव्हेंबरला बुचर्स शॉपवर येऊन पोहोचलेल्या अ‍ॅमंडसेनच्या तुकडीची लवकरात लवकर पुढे निघण्याची इच्छा होती. आतापर्यंत साथ दिलेल्या २४ इमानी साथीदारांची हत्या करावी लागल्यामुळे कँपमध्ये एक प्रकारची खिन्नता पसरलेली होती. पुढे निघण्यासाठी सर्वांची तयारी पूर्ण झाली होती. कुत्र्यांच्या मांसाचे आवश्यक त्या प्रमाणात तुकडे करुन स्लेजवर लादण्यात आलेले होते. परंतु बुचर्स शॉपवर त्यांना आणखीन काही काळ थांबावं लागणार होतं ! २२ नोव्हेंबरच्या पहाटे हिमवादळाला सुरवात झाली !

हिमवादळाचा जोर लवकर ओसरण्याची चिन्हं दिसेनात ! निरुपायाने त्या दिवशी निघण्याचा बेत त्यांना रहित करावा लागला. पुढचे तीन दिवस वादळाचा जोर कायम होता. मात्रं आणखीन वाट पाहण्याची अ‍ॅमंडसेनची तयारी नव्हती. २५ नोव्हेंबरला भर वादळात आणि धुक्यात बुचर्स शॉप सोडून त्यांनी पुढचा मार्ग सुधरला !

दक्षिण दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. मात्रं धुक्यामुळे दृष्यमानता जेमतेम काही फूटच होती ! काही अंतर प्रवास केल्यावर पायाखालची वाट उताराला लागल्याचं अ‍ॅमंडसेनला जाणवलं. मात्रं तरीही न थांबता पुढे जाण्याचा त्याने निर्णय घेतला. २७ नोव्हेंबरला कँपवर थांबल्यावर अ‍ॅमंडसेनने समुद्रसपाटीपासूनची उंची तपासून पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

९४७५ फूट !

अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयर गाठल्यावर धृवीय पठारापर्यंत समुद्रसपाटीपासून उंची वाढत जाईल, किमानपक्षी कायम राहील अशी अ‍ॅमंडसेनची अपेक्षा होती. प्रत्यक्षात दोन दिवसात सुमारे १४४५ फूट खाली उतरल्यामुळे तो गोंधळात पडला होता. आणखीन पुढे जाण्याचा आपला बेत रहित करुन त्याने तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. ८६ अंश दक्षिण !

२८ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनने पुढची वाट पकडली. अद्यापही धुकं पसरलेलं होतंच ! काही मिनीटांकरता धुक्याचा पडदा दूर झाल्यावर उजव्या हाताला सुमारे मैलभर अंतरावर दोन पर्वतशिखरं त्याच्या दृष्टीस पडली ! या शिखरांना हॅन्सनचं नाव देण्यात आलं. त्या पर्वतशिखरांच्या दिशेने जाणं अशक्यंच होतं. धुकं निवळेपर्यंत वाट पाहण्याची कल्पना अ‍ॅमंडसेनच्या मनाला चाटून गेली, परंतु किती वेळ थांबावं लागेल याचा काहीच अंदाज बांधता येईना. अखेरीस दक्षिणेच्या दिशेने पुढे जाण्याचा त्याने बेत केला.

काही अंतर गेल्यावर बर्फात लपलेल्या कपारी नजरेस पडताच अ‍ॅमंड्सेनला आपण ग्लेशीयरच्या मार्गावर असल्याची कल्पना आली. मात्रं धुक्यात कपारीत जाण्याची त्याची इच्छा नव्हती. वातावरण निवळेपर्यंत परतीच्या प्रवासासाठी सामग्रीचा डेपो उभारण्याचा त्याने निर्णय घेतला. ८६'२३'' अंश दक्षिण !

अ‍ॅमंडसेनला बुचर्स शॉपवर रोखून धरणा-या हिमवादळाचा शॅकल्टनच्या मार्गाने दक्षिणेकडे सरकणा-या स्कॉटच्या मोहीमेलाही प्रसाद मिळाला होता. मात्रं त्या परिसरात हिमवादळाची तीव्रता इतकी नसल्याने, स्कॉटवर वाटेत थांबण्याची वेळ अद्याप आलेली नव्हती. मात्रं बर्फावरुन मार्गक्रमणा करणं घोड्यांना कठीण होत असल्याचं त्याच्या ध्यानात आलेलं होतं. मात्रं त्या परिस्थितीतही उरलेल्या घोड्यांसह त्याची आगेकूच सुरुच होती. २८ नोव्हेंबरला स्कॉटने ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तावरील आपला कँप गाठला.

बिअर्डमूर ग्लेशीयरपासून स्कॉटची तुकडी अद्याप ९० मैलांवर होती. त्या दिवशी स्कॉटने आपल्या दुस-या घोड्याला गोळी घातली. त्याच्याजवळ अद्यापही चार घोडे शिल्लक होते. त्या ठिकाणी हवेचा दाब अतिशय कमी असल्याचं बॉवर्सच्या ध्यानात आलं होतं. हा निश्चीतच हिमवादळाचा परिणाम होता.

२८ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनने आपला ८६'२३'' अक्षवृत्तावरील डेपो सोडला आणि पुढची वाट धरली. वाटेत आढळलेल्या अनेक पर्वतशिखरांना अ‍ॅमंडसेनने आपल्या सहका-यांपैकी हॅन्सन, विस्टींग, हॅसल, जालांड, निल्सन यांची नावं दिली. ग्लेशीयरवरुन पुढील वाटचाल करणं मात्रं अधिकाधीक कठीण होत चाललं होतं. पृष्ठभागावरील बर्फाच्या पातळ आवरणाखाली दडलेल्या धडकी भरवणा-या कपारी टाळून सावधपणे त्यांची वाटचाल सुरु होती. मात्रं एका ठिकाणी कपारींचं असं काही उभं-आडवं जाळं पसरलेलं होतं, की पुढची वाटचाल अशक्यंच झाली होती ! अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" त्या ठिकाणी असलेल्या कपारी इतक्या अक्राळविक्राळ होत्या, की आमच्यासारख्या कित्येक मोहीमांमधील माणसं आणि जनावरांचा त्यांत मागमूसही लागला नसता !"

कपारींच्या त्या जंजाळातून मार्ग शोधण्यासाठी अ‍ॅमंडसेन आणि हॅन्सन पाहणीच्या उद्देशाने पुढे निघाले. एक बर्फाचा पूल पार करुन त्यांनी एका लहानश्या धारेवर चढाई केली. या धारेवर चढाई करताना अ‍ॅमंडसेनने सहजच दोन्ही बाजूला नजर टाकली आणि तो हादरुन जागच्या जागी स्तब्ध झाला.

धारेच्या दोन्ही बाजूला भल्या मोठ्या कपारी आSS वासून उभ्या होत्या !

धारेवरुन चालताना एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर त्या कपारीत गच्छंती होणं अटळ होतं ! भरीत भर म्हणूत त्या धारेच्या माथ्यावरुन खाली उतरण्याच्या मार्गावर आणखीन एक भलीमोठी कपार स्वागताला हजर होती ! दक्षिणेकडे जाण्याचा तो एकमेव मार्ग असल्याने त्याच मार्गाने पुढे जाण्याला पर्याय नव्हता ! कपारींच्या या खतरनाक जाळ्याला अ‍ॅमंडसेनने यथार्थ नाव दिलं..

डेव्हील्स ग्लेशीयर गार्डन ! सैतानाचा बगीचा !

Devils
डेव्हील्स ग्लेशीयर गार्डन

परत येताना अ‍ॅमंडसेनचं एका विशीष्ट जागेने लक्षं वेधून घेतलं. सुमारे वीस फूट उंचीच्या एका लांबलचक बर्फाच्या धारेमध्ये सुमारे सहा फूट रुंदीचा भाग कापून काढल्यासासखा निघाला होता. एखाद्या भिंतीत दार करावं असं ते दृष्यं दिसत होतं. तिथून पलीकडे नजर टाकताच अथांग पसरलेलं ग्लेशीयर दृष्टीस पडत होतं. अ‍ॅमंडसेनने त्याला नाव दिलं हेल्स गेट ! अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" दक्षिण धृवाकडे जाणारा आमचा मार्ग हा एखाद्या अद्भुतरम्य रहस्यमय कादंबरीप्रमाणे होता. पूर्वी कोणीही कधीच या मार्गाने दक्षिणेकडे गेलेलं नव्हतं, त्यामुळे रोज रात्री झोपताना पुढच्या वाटेवर काय वाढून ठेवलेलं आहे असा विचार आमच्या मनात येत असे !"

२९ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने सावधपणे मार्गक्रमणा करत हेल्स गेट मधून डेव्हील्स गार्डन मध्ये प्रवेश केला ! एकेक पाऊल सावधपणे टाकत आणि काळजीपूर्वक स्लेज हाकारत त्यांनी तो प्रदेश अखेरीस पार केला. मात्रं त्यासाठी त्यांना कित्येकदा वेडीवाकडी वळणं घ्यावी लागली होती. अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" डेव्हील्स गार्डन पार केल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला खरा, परंतु धृवावर पोहोचून याच मार्गाने फ्रामहेमवर परतायच्या कल्पनेनेच माझ्या पोटात गोळा आला होता !"

क्रमश :

९० डिग्री साऊथ - ७

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

7 May 2014 - 9:47 am | स्पंदना

:(
वर्णन वगैरे जाउ दे!
नाही आवडल इमानी प्राण्यांना मारणं.
ही स्लेजची कुत्री अतिशय म्हणजे अतिशय शहाणी असतात हो! अन त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव तर...
असो.

स्पार्टाकस's picture

7 May 2014 - 8:59 pm | स्पार्टाकस

अ‍ॅमंडसेनने आपले कुत्रे मारणं किंवा स्कॉटने आपले घोडे मारणं आणि त्यांचा अन्नासाठी उपयोग करणं हे निश्चीतच क्रूरपणाचं असलं, तरीही धृवीय प्रदेशात त्या काळात त्यांना दुसरा उपायही नव्हता. खाद्यपदार्थांची आणि एकूणच सामग्रीची वाहतूक करणं हे तसं जिकीरीचंच होतं..

पैसा's picture

21 May 2014 - 10:16 am | पैसा

नाही वाचवत हे सगळं.