त्या दिवशी ऑफिसला उशीर होणार अशी कल्पना होतीच. संध्याकाळचे सात वाजून गेले तरी काम चालू होतं. एरवी मिळणारी लिफ्ट आज मिळणार नव्हती त्यामुळे कसं जायचं याचे आडाखे मनात बांधले होते. कामाच्या व्यापात १० कसे वाजले कळलंच नाही. ट्रेन ने सगळ्यात पटकन प्रवास होईल असं म्हणून कांजूरमार्ग स्टेशन वर पोहोचलो.
रात्रीचे सव्वा दहा वाजले होते. सीएसटी च्या बाजूकडील सर्व तिकिट खिडक्या बंद होत्या. एटीव्हीएम व कूपन मशीन्स चालू होती, पण नेहमीचा ट्रेन प्रवास नसल्याने माझ्याकडे स्मार्टकार्ड किंवा कूपन यापैकी काही नव्हतं त्यामुळे पंचाईत होती. मी त्या बंद खिडकीच्या किलकिल्या फटीतून आतल्या माणसाला विचारलं, "तिकीट कसं काढणार साहेब?" "त्या बाजूला जा.", असं उत्तर मिळालं. आता पूर्ण फलाट पार करायचा होता. तसाच रेल्वे, शासन यांच्या नावाने मनातल्या मनात स्तुतिसुमनं उधळत फलाट पार करून पलिकडच्या म्हणजेच कल्याण च्या दिशेच्या तिकीट घरापर्यंत पोहोचलो.
तिथेही तीच गत होती. सगळ्या खिडक्या बंद. मशीन्स चालू पण त्यांचा मला उपयोग नाही. तिथे अक्षरश: शुकशुकाट होता. आता काय करायचं, असा विचार करत असताना एक साधारण तिशीचा मुलगा तिथे आला. त्याच्याकडे स्मार्टकार्ड होतं. तो आपलं तिकीट काढायला एटीव्हीएम मशीनजवळ गेला असता मी माझ्या हातातली दहाची नोट पुढे करत विचारलं, "भाऊ एक ठाणा सिंगल काढून देणार का?" "देतो ना", तो म्हणाला. त्याचं तिकीट काढून झाल्यावर त्याने एक ठाणा सिंगल काढून माझ्या हातात ठेवलं. मी ती दहाची नोट त्याला देऊ केली. आपल्याकडे सुट्टे नाहीत हे बघून तो म्हणाला, "राहूदे". मी माझंही पाकीट पुन्हा पुन्हा बघितलं पण सुट्टे माझ्याकडेही नव्हते. मी म्हणालो, "माझ्याकडेपण नाहीयेत यार, पण तू घे ना... असं नको" "नाही रे; राहूदे", तो पुन्हा म्हणाला. "अरे असं नको करूस, माझ्याकडे सुट्टे नाहीत, पण तू दहा ठेव. मला आत्ता गरज होती कारण इथे एकही तिकीट खिडकी चालू नाहीये आणि माझ्याकडे कार्ड किंवा कूपन नाही.", मी सांगितलं. तरीही त्याने पैसे घ्यायला नकारच दिला. मी फलाटापर्यंत त्याच्याबरोबर चालत होतो, त्याला पैसे देऊ करत होतो, पणा त्याने घेतले नाहीत. शेवटी ‘पाच रुपयांसाठी काय एवढं रे!’ असं हसत म्हणाला. मीही मग नाईलाजाने थॅंक्स म्हटलं, आणि समोर आलेल्या ट्रेन मधे तो चढला.
मी त्याचा विचार करत तिथे उभा होतो. मला आश्चर्य वाटत होतं ते त्याच्या पाच रुपये असे सोडून देण्याचं नव्हे, तर त्याच्या वृत्तीचं. पाच रुपये किंवा पाच लाख रुपये, हे महत्वाचं नसतं, पण महत्वाची असते ती दानत. देण्याची वृत्ती. असं बघायला गेलं तर तो मुलगा फार श्रीमंत घरातला वाटत नव्हता, अगदी साधारण दिसणारा असा तो मुलगा होता. त्यामुळे त्याच्याकडे खूप पैसे असून म्हणून त्याला पाच रुपयांचं फारसं महत्व नाही, अशातला भाग नव्हता.
त्या मुलाचा विचार करत असताना मला आसपासची श्रीमंत माणसं आठवत होती जी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या मूलभूत कंजूसपणाचं दर्शन जगाला घडवत असतात. ती माणसं जी लाखावारी पैसे कमवूनही, खर्च करणं तर सोडा, पण अडलेल्या कुणाला मदत करायलाही कचरतात. अशांचा विचार करत असतानाच मला या मुलाचं, त्याच्या दानतीचं खूप कौतुक वाटत होतं. कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
दुस-या दिवशी ट्रेन चा प्रवास करायचा नव्हता, पण तरीही सकाळी आदल्या दिवशीचं ते तिकीट पाकिटात दिसलं. घरातून बाहेर पडल्यावर जवळच्याच देवळात गेलो. तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा"
प्रतिक्रिया
5 Apr 2014 - 6:19 pm | यशोधरा
आवडलं.
5 Apr 2014 - 6:24 pm | अनुप ढेरे
हेच म्हणतो...
5 Apr 2014 - 6:58 pm | आरोही
मस्त लिहिलेय ..वेल्लभट तुमचे लेख आवडतात ...मिपावरचे आणि ब्लोग वरचे लेख हि वाचलेत ...शुभेच्छा अजून लेखांसाठी ....+)
5 Apr 2014 - 8:09 pm | प्यारे१
असेच म्हणतो
6 Apr 2014 - 8:39 am | वेल्लाभट
मनापासून धन्यवाद....
5 Apr 2014 - 7:16 pm | इन्दुसुता
कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
हे विशेष आवडले.
आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!!
तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.
5 Apr 2014 - 9:18 pm | अत्रुप्त आत्मा
@आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!!
तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.>>> +++१११
5 Apr 2014 - 9:46 pm | सानिकास्वप्निल
लेख आवडला :)
छान लिहिले आहे.
5 Apr 2014 - 10:58 pm | मधुरा देशपांडे
असेच म्हणते.
5 Apr 2014 - 11:06 pm | मुक्त विहारि
आवडला...
6 Apr 2014 - 12:35 am | खटपट्या
मस्त !!!
6 Apr 2014 - 7:32 am | फारएन्ड
आवडले!
6 Apr 2014 - 8:35 am | जोशी 'ले'
मस्त !!!
6 Apr 2014 - 8:38 am | वेल्लाभट
धन्यवाद ! :)
@जोशी 'ले', फारएन्ड, खटपट्या, मुक्त विहारि, मधुरा देशपांडे, सानिकास्वप्निल, अत्रुप्त आत्मा, प्रशांत आवले, अनुप ढेरे, यशोधरा
@इन्दुसुता: अगदी बरोब्बर बोललात.... तीच खरी कमाई, ते खरं सुख
6 Apr 2014 - 9:10 am | प्रभाकर पेठकर
सुंदर लेख.
मिपा, हे चांगले विचार/अनुभव ह्यांचे आदानप्रदान करण्याचेही ठिकाण आहे ह्याचा विसर सदस्यांना पडलेला नाही हे पाहून बरं वाटलं. >>>>कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.<<<
6 Apr 2014 - 9:21 am | ज्ञानोबाचे पैजार
पेठकर काकांशी शब्दशः सहमत.
6 Apr 2014 - 9:36 am | डॉ सुहास म्हात्रे
चांगली माणसं बरीच आहेत या जगात अजून.
6 Apr 2014 - 9:41 am | पैसा
एक समृद्ध करणारा अनुभव आवडला!
6 Apr 2014 - 9:41 am | पैसा
एक समृद्ध करणारा अनुभव आवडला!
6 Apr 2014 - 12:03 pm | कानडाऊ योगेशु
असेच कुठेतरी वाचले होते कि "पैसे गेल्याचे दु:ख होत नाही पण फसले गेल्याचे दु:ख जास्त होते."
समजा तुम्ही त्याला डायरेक्ट तिकिटाऐवजी पाच रुपये मागितले असते तर त्याने ते सहजपणे दिले असते का? असा एक विचार मनात आला. यात त्याच्या दानत पणा वर व तुमच्या नाईलाजावर शंका घ्यायची नाही आहे पण एक दोनदा अश्या बाबतीत फसला गेलेला माणुस कुणाला डायरेक्ट पैसे देताना नक्कीच विचार करेल.
6 Apr 2014 - 12:06 pm | कानडाऊ योगेशु
विद्यार्थीदशेत असताना एका धाय मोकलुन रडणार्या रस्त्यावरच्या इसमाला काही रू.ची मदत केली होती पण नंतर कळले कि असाच प्रकार इतरांच्या बाबतीतही झाला होता.तेव्हापासुन कोणी गरजु ही खरेच रडत असेल तर त्यावेळी जितक्या सहजपणे खिशात हात गेला होता तितक्या सहजपणे आता जात नाही.
6 Apr 2014 - 5:13 pm | किसन शिंदे
काही महिन्यांपुर्वी ठाणे स्टेशनबाहेर टिप टॉपसमोर संध्याकाळच्या वेळी उभं असताना बाजूच्या एका इसमाचे शब्द कानावर पडले. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि त्याला विचारत होता इथून म्हणजे ठाण्यावरून विरारला कसे यायचे? किती पैसे लागतील? माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीयेत. हे बोलताना तो कमालीचा घाबरलेला व गोंधळलेला दिसत होता. मनात विचार केला कोणीतरी बिचारा भटकलेला दिसतोय मदत करावी, म्हणून १०० रू त्याला दिले आणि कसं जायचं हे ही समजावून सांगितलं. दोनदा नको नको म्हणत तिसर्यांदा त्याने ते पैसे हातातून घेऊन पटकन खिशात टाकले. कोणाला तरी मदत केल्याचं समाधान मिळालं, पण ते काही दिवसच टिकलं. त्यानंतर पंधरवड्याने तोच माणूस त्याच ठिकाणी अगदी तसंच एका माणसाच्या शेजारी उभं राहून फोनवर बोलताना आढळला. :( वाटलं होतं जावून त्याची गंचाडी धरावी, पण मागून गप्प बसलो.
6 Apr 2014 - 11:42 pm | सुबोध खरे
मलाही दादर स्थानकावर एक सभ्य आणि सुव्यवस्थित कपडे घातलेला माणूस भेटला आणि मला शुद्ध इंग्रजीत विचारू लागला कि माझे पाकीट मारले गेले आहे त्यात माझा पास, पैसे आणि क्रेडीट कार्ड पण गेले आहे आणि मला कर्जतला जायचे आहेत तर तुम्ही मला शंभर रुपये देऊ शकता का? मी यावर त्याला तशाच गोड शब्दात सांगितले साहेब तिकिटाच्या खिडकीवर चला मी तुम्हाला कर्जतचे तिकीट काढून देतो त्यावर तो सभ्य माणूस "इट्स ओके" काहीतरी पुटपुटत गर्दीत एकदम गायब झाला. हाच अनुभव माझ्या भावाला आला होता तेंव्हा त्याने हि तिकीट काढून देण्याचे सांगितल्यावर तो माणूस गायब झाला होता
तेंव्हा दिसतं तसंच असतं असं नाही.
7 Apr 2014 - 11:46 am | वेल्लाभट
बरोबर आहे...
असंही होतं. अशीही लोकं भेटतात. आमच्या भागात एक आजोबा बरेचदा असतात. छातीवर हात ठेवून कळवळून आह् ओह ... छातीत दुखतंय अस म्हणतात एखाद्याला. रिक्षाचे पैसे मागतात, अमूक नगर ला रहातो म्हणून, मुलाच्या ऑफिसला जातो तो घेऊन जाईल डॉक्टरांकडे... काहीही सांगतात आणि २५-३० रुपये घेतात. दुस-या दिवशी पुन्हा आह... छातीत दुखतंय..... दुस-या कुणाला तरी पकडायचं.
असो. ज्याचे त्याला!
6 Apr 2014 - 12:10 pm | राही
अनुभव आवडला. तो लिहिलाही आहे छान.
7 Apr 2014 - 11:21 am | स्पंदना
तुम्ही फसवत नव्हतात म्हणुम हा अनुभव समृद्ध करणारा ठरला.
बाकिच्यांना अन मलाही अश्या मदत मागू व्यक्ती शहाणे करुन गेल्या.
मी एकदा बस स्टँदवर पैसे कमी आहेत म्हणुन एका मुलाला पैसे मागितले तर त्याने सगळ तिकीट काढून मला मदत केली होती. ठायी ठायी अजुन अशी मदत करणारी माणसे चांगल्या मनाची माणसे आहेत म्हणुन तुम्ही आम्ही संकटातुन वाचतो. जीवंत रहातो.
7 Apr 2014 - 12:05 pm | सविता००१
छानच.
मला मात्र किसन शिंदेंनी सांगितल्यासारखाच अनुभव आलाय. तिथेच. पण मी ही गप्पच बसले होते. फरक फक्त एवढाच की पैसे मागणारी व्यक्ती एक वयस्क स्त्री होती. पैसे दिल्यादिवशी मी अत्यंत समाधानी होते. पण १५ दिवसांनी फसवणुकीच्या भावनेने फार नैराश्य आलं होत खर.शेवटी आपली भावना तर सच्ची होती ना मदत करताना? आता त्या बाई आणि त्यांची वागणूक त्यांच्यापाशी असा विचार केला झालं.
7 Apr 2014 - 12:11 pm | इरसाल
अजुनही माणुसकी टिकुन आहे हे पाहुन बर वाटते.
देव तुम्हाला/त्या मुलाला याचं फळ जरुर देईल
7 Apr 2014 - 1:22 pm | प्यारे१
लगे रहो मुन्नाभाई च्या बाप्पूसारखं फसवणारांना 'गेट वेल सून' म्हणत यथाशक्ती मदत करणं आपण थांबवू नये. आपलंच भलं होत असतं त्यानं. समोरच्यानं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो ची तिकीटं काढून एखादा चित्रपट आपण पाहतो. रद्दड निघतो. १५० रुपये माणशी पाण्यात जातात. फसवणूकच असते की ती! चित्रपट बघणं थांबवतो का आपण? नाही. बघतोच.
असो!
7 Apr 2014 - 1:26 pm | नितिन पाठे
खूपच छान..........आवडलं.
7 Apr 2014 - 1:43 pm | मृत्युन्जय
मस्त.
7 Apr 2014 - 3:36 pm | शिद
छान अनुभव.
7 Apr 2014 - 4:20 pm | आदूबाळ
खूप छान अनुभव आणि चर्चा!
7 Apr 2014 - 4:38 pm | तुमचा अभिषेक
तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा"
इथे देवाच्या जागी थेट कोण्या गरजूला दान केले असते तर चांगले झाले असते असे उगाच माझ्या नास्तिक मनाला वाटून गेले. असो, उगाच यावर आता वाद नको.. :)
पण स्वताचा एक अनुभव आठवला, असेच मी एकाला तीन रुपयांचे कूपन कमी पडत असताना माझ्याकडेच दिले होते. बरोबर त्याची आई आणि बायको अशी फॅमिली होती. तो साहजिकच मला ते तीन रुपये परतवायला गेला तर मी सहजच नाकारले, जणू काही तो माझा मित्र वा ओळखीचा होता आणि दोनचार रुपयांची काय देवाणघेवाण करायची असे वाटले. अर्थात हे सहजच घडले, मी काही फारसा दानशूर गटात मोडणारा नाहीये, पण असेही होते. असो, शेवटी त्या व्यक्तीने जबरीच माझ्या हातात तीन रुपयांची चिल्लर कोंबली आणि मग थोड्यावेळाने मला जाणवले की बरोबर यार, त्याच्या दृष्टीने विचार करता तो का आपली तीन रुपयांची मेहेरबानी स्विकारेल, ते देखील पैसे नसणे हा त्याचा मूळ प्रश्न नसताना, म्हणून मी आढेवेढे न घेता अगोदरच पैसे स्विकारायला हवे होते.
लेख छान आहे, असे छोटे छोटे चांगले अनुभव कागदावर उतरवणे आणि प्रकाशित करणे हे त्यापेक्षा छान आहे.
9 Apr 2014 - 5:51 am | स्पंदना
अच्छा बाळाचे नाव "परी" ठेवल?
छान!
8 Apr 2014 - 10:46 pm | सखी
साधा अनुभव पण चांगल्या शब्दात मांडला आहे तुम्ही.
8 Apr 2014 - 11:00 pm | वेल्लाभट
@सखी,अभिषेक,आदुबाळ्,शिद, मृत्युंजय,नितिन,प्रशांत, ईरसाल, सविता, अपर्णा, राही
आभार...
8 Apr 2014 - 11:28 pm | रेवती
छान लिहिलय.