सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
24 Mar 2014 - 12:34 am

शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.

तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे. बायोलॉजीचा ‘ब’ सुद्धा माहीत नसलेलो मी, बाप होत असलो तरी याबद्दल जेमतेमच जाणकारी राखून होतो. बायकोने फोनवर ‘जेवलास का आणि भाजी कशी झाली होती’ असे विचारावे त्या थाटात ही बातमी दिली आणि मी कामाच्या वेळी कमीच बोलतो हे माहीत असल्याच्या सवयीने फोन कटही केला. तिच्या आवाजातून चिंतेचे कारण काय अन किती हे देखील समजले नाही. माझे दिवसभराच्याच नाही तर पुढच्या आठवडाभराच्या कामाची प्लॅनिंग मी एक एप्रिल या तारखेच्या हिशोबाने केली होती. त्यातही आजच्या दिवसाचे काम रात्री नऊ पर्यंत चालणार होते. पण आता काय किती बोंबलले याचा हिशोब करायचा प्रश्नच नव्हता. लागलीच लाईन मॅनेजरला कल्पना दिली. त्यालाही अगोदरच याबाबत माहीत असल्याने फारसा काही गोंधळ न घालता त्याने माझ्या हातात असलेले काम दुसर्‍या कोणाला तरी हॅण्डओवर करून मला निघायला सांगितले. पुन्हा बायकोला फोन लाऊन परिस्थितीची कल्पना घेतली, तर संध्याकाळी सावकाश अ‍ॅडमिट झाले तरी हरकत नाही असे समजले. त्यानंतर उद्या वा परवा, किती लवकर पुन्हा ऑफिसचे तोंड बघायला मिळेल याची कल्पना नसल्याने संध्याकाळपर्यंत वेळ घेऊन निदान माझ्यावाचून अडणारी कामे तरी आटोपून घेऊया असे ठरवले. पण बस्स ठरवलेच.! फोन ठेवताक्षणीच जाणवले की आपली छाती तूफान वेगाने धडधडू लागलीय अन श्वास थंड. इथून पुढे कामात लक्ष लागणे कठीणच होते. कामावरची निष्ठा दाखवायची हिच ती वेळ असे मनाला बजावत संध्याकाळपर्यंत जमेल तसे आटोपले आणि निघालो.

तिथे तिची एव्हाना अजून एक डॉक्टरवारी करून झाली होती ज्यात संध्याकाळ ऐवजी दुसर्‍या दिवशी सकाळी अ‍ॅडमिट व्हायचे ठरले होते. डॉक्टरकडून येताना ती मला परस्पर बाहेरच भेटली तेव्हा तिने मला या बदललेल्या वेळापत्रकाबद्दल सांगितले. मात्र उद्या अ‍ॅडमिट झाल्यावर तिथून पुढे काय करणार आणि फायनल रिझल्ट कधीपर्यंत हाती येणार याची मला तोपर्यंत काहीही कल्पना नव्हती. पण त्या आदल्या संध्याकाळी पाणीपुरी खायचा तिचा शेवटचा डोहाळा पुरवताना मला दुपारपासून मनावर आलेले दडपण तेवढे निवळताना जाणवले.

ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या. रात्री झोपताना आई म्हणाली, उद्या होवो किंवा परवा, दोन्ही चांगले दिवस आहेत. उद्या शिवजयंती तर परवा संकष्टी...
आणि पुन्हा एक अनामिक हुरहूर मनी दाटून आली. म्हणजे उद्या किंवा परवाच,, होणारही होते तर..

सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते हे त्या रात्री जाणवत होते. धडधडत्या छातीने आणि थंड पडत चाललेल्या श्वासांनी, येणार्‍या सुखाच्या वाटेवर डोळे लाऊन बसणे.. कमिंग सून कमिंग सून असे स्वताच स्वताच्या मनाला बजावणे.. ती रात्र माझी तशीच गेली. शिवजयंती की संकष्टी,, मुलगा की मुलगी.. नॉर्मल की सिझेरीअन,, तिच्यासारखे की माझ्यासारखे.. आपल्या मनात काय आहे.. आपल्या मनासारखे होईल का.. जर मुहुर्तच साधायचा असेल तर शिवजयंतीचाच साधू दे, मुलगा वा मुलगी काहीही माझेच असले तरी माझ्या मनासारखी मुलगीच होऊ दे.. याच विचारांत गेली..

परीणामी सकाळी उशीराच उठलो. पाहतो तर वाजलेला अलार्म चुकून झोपेतच बंद केला होता. अरे देवा, आता पुन्हा शिव्या पडणार तर. गेल्या सोनोग्राफीच्या वेळी तिच्याबरोबर जायला न जमल्याच्या शिव्या ताज्या होत्या आणि आज महत्वाच्या दिवशी सुद्धा ... सुदैवाने तिलाही घरून निघायला थोडाफार उशीरच झाला होता. तरीही माझ्याआधीच घरच्यांना बरोबर घेऊन ती अ‍ॅडमिट झाली होती. पण आजचा तिचा मूड वेगळाच होता. माझ्या उशीरा येण्यापेक्षा माझ्या येण्याला तिच्याठायी जास्त महत्व होते. मी पोहोचलो तेव्हाच बाईसाहेब मस्त हाताला सलाईन लाऊन बेडवर पहुडल्या होत्या. आता पुढे चार-पाच तासांतच कळा सुरू होऊन पुढे आणखी तासभरातच... ईति तिच्या बहीणींनी पुरवलेली वैद्यकीय माहिती आणि मी एक नजर घड्याळावर टाकली. याचा अर्थ फार तर फार दुपारी दोन वाजेपर्यंत मी बाप होणार होतो. हि वेळ इतक्या समीप आलीय यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. माझ्या डोक्यातून अजूनही ती एक एप्रिलची तारीख बाहेर पडली नव्हती. गेले नऊ महिने एकेक करत मोजत असलेले दिवस आठवू लागले. महिन्याभरापूर्वी ती माहेरी गेल्यापासून या दिवसाच्या प्रतीक्षेत होणारे आमचे रोजचे फोनवरचे बोलणे आठवू लागले. किंबहुना लग्नानंतरचा तो प्रत्येक एक क्षण आठवू लागला ज्यात दडलेल्या भावना कळतनकळत आजच्याच दिवसाची वाट बघत होत्या. येत्या काही तासांतच आमच्या नात्याला आणखी घट्ट करणारी एक कायमस्वरूपी गाठ बांधली जाणार होती.

मी माझ्या घरी फोन करून दुपारी दोनची वेळ कळवून घरच्यांना त्याआधी यायला सांगितले, तिचे घर जवळच असल्याने तिच्या घरचे सारे हजेरी लाऊन गेलेलेच वा गरज पडेल तसे कधीही हजर होतील अश्या हाकेच्या अंतरावरच होते. जवळपास सर्वांनीच रजा टाकल्या होत्या. आपापले सारे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामागे कारणही तसेच होते. दोन्ही घरांमध्ये कित्येक वर्षांनी, तब्बल एका पिढीनंतर आज पहिल्यांदाच बाळाचा रडण्याचा आवाज घुमणार होता, म्हणून हा दिवस सर्वांसाठीच स्पेशल होता. आणि आता सुरू झाले होते ते काऊंटडाऊन .. टिक टिक वन.. टिक टिक दोन.... दोन वाजताची प्रतीक्षा !

रूमवर टाईमपास करायला टिव्ही होता. पण त्याचा रिमोटही हातात घ्यायला कोणाला सुचत नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकताना बघणे हाच सर्वात मोठा विरंगुळा होता. मात्र तो काटा बाराला पार करून दिवसाच्या दुसर्‍या सत्रात पोहोचला तरी अजून काहीतरी घडतेय अशी चिन्हे दिसायला मागत नव्हती. मी पुन्हा माझ्या घरी फोन करून अजून थोडे उशीरा आलात तरी चालेल असे कळवले पण होणार्‍या बाळाच्या आजीआजोबांचा पाय आता घरी टिकणे शक्य नव्हते. रूमवर फारच गर्दी होत असेल तर तिथेच आजूबाजुला भटकू पण आम्ही येतो असे म्हणत ते घरून निघाले. पण ते पोहोचले तरी अजून कश्याचा काही पत्ता नव्हता. दुपारी दोन वाजता तिला चेकींगसाठी मात्र तेवढे नेले. त्यात फारशी प्रगती न दिसल्याने आता संध्याकाळच उजाडेल एवढेच काय ते समजले. मिनिटे मोजायचा उत्साह अजूनही मावळला नव्हता मात्र मनावर आलेले दडपण कमी व्हावे म्हणून आता होईल तेव्हा होईल म्हणत वेळ बघणे थांबवले. दुपारी बाहेर जाऊन जेवण करून आलो, बसल्याबसल्या जागेवरच तासभर पेंगून घेतले, थोडाश्या इकडतिकडच्या गप्पा यांत संध्याकाळ उजाडली देखील. एव्हाना पोटात दुखायला सुरुवात झाली होती मात्र ते दुखणे केवळ छळण्यापुरतेच होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास केलेल्या चेकींगच्या वेळीही पुढच्या चेकींगची वेळ रात्री आठ-साडेआठ वाजताची एवढाच निष्कर्ष निघाला. एखादा क्रिकेटचा सामना पावसामुळे थांबावा, अधूनमधून पंचांनी खेळपट्टीची पहाणी करावी आणि सामना सुरू कधी होईल हे सांगण्याऐवजी पुढची पहाणी अमुकतमुक वाजता होईल असा क्रिकेटरसिकांना टांगणीवर लावणारा निर्णय द्यावा अश्या धाटणीचा खेळ चालू होता. हाडाचा क्रिकेटप्रेमी असल्याने मी आजवर हे बरेचदा अनुभवलेय पण आजच्या अनुभवाची त्या कशाशीही तुलना नव्हती.

आता कदाचित रात्रीच्या मुक्कामाचीही तयारी ठेवावी लागेल म्हणत दिवसभराची मरगळ झटकून ताजेतवाने होण्यासाठी एकेक करून ब्रेक घेण्याचे ठरवले. संध्याकाळच्या सुमारास चहापाण्याच्या निमित्ताने जवळच असलेल्या सासुरवाडीला माझी देखील एक फेरी झाली. पण चहा आणि पाण्याव्यतिरीक्त आणखी काही घ्यायची इच्छा झाली नाही. धावत गेलो आणि पळत आलो असे केले. मधल्या काळात हिच्या पोटातल्या दुखण्याने बर्‍यापैकी जोर पकडला होता. मी परतलो तेव्हा बाईसाहेब पुन्हा चेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळची स्थिती तुलनेत आशादायी असली तरी एव्हाना ती पार कंटाळली होती. एकीकडे दुखणे वेगाने वाढत होते मात्र सकाळपासूनची प्रगती पाहता आणखी तास दोन तास थांबून काही चमत्कार घडेल अशी आशा तिला स्वताला तरी वाटत नव्हती. सिझेरीयन झाले तरी चालेल पण यातून मला एकदाचे सोडवा या मनस्थितीला ती पोहोचली होती. पण डॉक्टरच म्हणाले, थांबा, शक्य आहे तोपर्यंत नॉर्मलच करूया, जरा कळ काढा..

जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता.

आता दर दुसर्‍या मिनिटाला कळ निघत होती. माझ्याही हातावरचा दाब वाढत होता. डॉक्टरने पुढच्या आणि कदाचित शेवटच्या चेकींगची दिलेली वेळ अजून तासाभराने होती, तेव्हाही नक्की काय होणार होते, काय डिसीजन घेतला जाणार होते हे ठाऊक नव्हते. जर तोपर्यंत थांबूनही सिझेरीयनच करावे लागणार होते तर का उगाचच थांबायचे हा प्रश्न छळत होता. पुर्ण दिवस निघाला असला तरी हा तास निघणे फार कठीण होते. होणारा त्रास पाहता फक्त आणखी अर्धा एक तासच सहन करायचे हा खरा खोटा दिलासा तरी तिला कसा द्यावा हा प्रश्न होता. त्यामुळे सारेच शांत होते, ज्या धीराची तिला गरज होती तो शब्दांतून नाही तर फक्त स्पर्शातून दिला जात होता.

आजवर सिनेमांमध्ये बघितलेले बाळंतपणाचे सारे प्रसंग डोळ्यासमोर येत होते. दिवसभर एकच प्रार्थना करत होतो की ते सारे तितकेसे खरे नसून अतिरंजीत असावेत, ती केवळ नाटक सिनेमांमधील ओवरअ‍ॅक्टींग असावी, पण आता मात्र हे सारे हळूहळू नजरेसमोर अनुभवायला सुरुवात झाली होती. आता मी देखील घड्याळाकडे पाठ करून बसलो होतो, मागे काटे वेगाने पळत असतील अशी स्वताच्या मनाची समजूत काढत. खरेच तसे होत होते का याची कल्पना नाही पण वेळ मात्र सरकत होती. साडेदहाची वेळ दिली होती, पावणेअकरा वाजता पुन्हा डॉक्टरांचे आगमन झाले. चेकींगसाठी म्हणून तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आम्ही सारे बाहेरच जमलो होतो, कारण याच चेकींग नंतर ऑपरेशन करायचे का नाही याचा निर्णय घेऊन त्याची लागलीच अंमलबजावणी होणार होती.

इतक्यात आतून तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. चेकींग हा प्रकार देखील खूप त्रासदायक आहे असे ती संध्याकाळी म्हणाल्याचे आठवले. थोड्याच वेळात एक मदतनीस आतून वेगाने बाहेर आली शेजारच्या रूममधून काही औजारे घेऊन पुन्हा आतल्या दिशेने गायबली. तिच्यापाठोपाठ आणखी एक जण आत गेली. हा प्रकार एक-दोन वेळा घडला आणि कल्पना येऊ लागली की आत काही तरी घडायला सुरुवात झाली आहे. दोनचार वेळा उघडणार्‍या दरवाज्यामधून मी दबकत आत डोकावून बघायची हिंमत दाखवली खरी पण तिथून काहीच दिसत नव्हते याचा खरे तर दिलासाच वाटला. सुरुवातीलाच आलेला तिचा ओरडायचा आवाज त्यानंतर पुन्हा आला नव्हता. आता हे चांगले की वाईट हे मात्र समजत नव्हते ना कसलेही वेडेवाकडे अर्थ लावायच्या मनस्थितीत मी होतो. जेमतेम सात आठ मिनिटे झाली असावीत, तोच लहानग्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि बाहेरच्या तंग झालेल्या वातावरणात कुजबूज सुरू झाली. काही चेष्टा पण किती क्रूर असतात, हा आवाज अगदी विरुद्ध दिशेला असलेल्या एका रूममधून येत होता मात्र तरीही बेसावध मनाने त्याचा पटकन आपल्या सोयीने अर्थ काढला होता. इतकेच नव्हे तर हट्टाने हा आवाज आपलाच आहे हे पटवून द्यायची चढाओढ लागली होती. तो आवाज विरला आणि पुन्हा मिनिटभराची शांतता. वातावरणातील ताण निवळावा म्हणून काही जणांचे तेच पुराने घीसेपीटे विनोद मारणे सुरू झाले, की काही चांगलेही होते, कोणास ठाऊक, पण त्यावेळी मला हसवण्याचा प्रयत्न करणे हेच मुळात माझ्या दृष्टीने हास्यास्पद होते. पण लोकांच्या भावनांची कदर करत ना कोणाला काही बोलता येत होते ना कोणावर काही चिडता येत होते. अन्यथा मला ताटकळत उभा राहण्याऐवजी बसून घे जरा असा सल्ला देणार्‍यांनाही ओरडून शांत राहा सांगावेसे वाटत होते. बाप होतोयस तर आता बापाची जबाबदारी घ्यायला शिक हे वाक्य गेल्या काही महिन्यात कित्येकदा ऐकले होते आणि हसून टाळले होते, पण आता ऑपरेशन थिएटरच्या आत असलेल्या माझ्या बायकोची आणि होणार्‍या मुलाची त्याच्या जन्माआधीपासूनच लागलेली चिंता, हे दडपण, बापाची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे हे स्वताच स्वताला पटवून देत होते.

ईतक्यात पुन्हा एक बारीकसा रडण्याचा आवाज आला. हा आवाज कदाचित अपेक्षित दिशेने आला होता म्हणून पुन्हा सर्वांनी कान टवकारले. नजरेनेच एकमेकांना शांत राहण्याच्या खाणाखुणा झाल्या. दुसर्‍याच क्षणाला तेच ते रडणे, यावेळी मात्र आधीपेक्षा कैक मोठ्या आवाजात, न थांबता येऊ लागले, आणि बाहेर एकमेकांना अभिनंदन करणे सुरू झाले. काही हात माझ्याही दिशेने सरसावले मात्र माझ्या चेहर्‍यावरची चिंतेची रेष अजूनही काही हलायला मागत नव्हती. रडण्याच्या आवाजाने बाळ कदाचित सुखरूप आहे हे नक्की झाले होते पण त्याच्या आईची खुशाली समजणे बाकी होते. ईतर अनुभवी लोकांना कदाचित ते काळजीचे कारण वाटत नसावेही पण..... मी अजूनही वाट बघत तसाच त्या ऑपरेशन थिएटरच्या दारावर उभा होतो. दार उघडले आणि एक नर्स माझ्या मुलीला घेऊन बाहेर आली. मगासच्या रडण्याच्या खणखणीत आवाजावरून कोणीतरी मुलगा आहे असा अंदाज बांधला होता, तेव्हा होणार्‍या बाळात मुलगा मुलगी असेही असते ही बाब डोक्यातच आली नव्हती. पण आता मुलगी आहे असा गलका होताच आठवले की येस्स, मला मुलगीच तर हवी होती. गर्दीच्या सर्वात पाठीमागे उभा राहून मी माझ्या मुलीला कोणाच्या तरी खांद्यावरून डोकावून पाहिले आणि आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीच्या बघताक्षणीच प्रेमात पडलो असे झाले. आजवर मी पाहिलेली सारीच नवजात पिल्ले मला एकसारखीच वाटायची. पण हे वेगळे होते. हे माझे होते. माय लिटील प्रिन्सेस. अभि’ज लिटील गर्लफ्रेंड. तिला पाहताना मला दडपणाच्या उंच कड्यावरून अलगपदणे तरंगत खाली येत असल्याचा भास होत होता. शिवजयंतीच्या मुहुर्ताला राणी लक्ष्मीबाई आली असे कोणीतरी म्हणताच घड्याळावर नजर गेली तर जेमतेम अकरा वाजून गेले होते. बाळ ज्या मुहुर्ताला सुखरुप येते तोच खरा शुभ मुहुर्त याची जाणीव झाली. मुलीचे केवळ क्षणभर दर्शन करवून, तिचे वजन मोजून, तिला पुन्हा आत घेऊन गेले. माझी नजर अजूनही त्या दरवाज्यावरच होती, माझ्यासाठी तो अजून एकदा उघडायचा होता. उघडला, आणि स्ट्रेचरवर झोपूनच माझी बायको हसतमुखाने बाहेर आली. कोण विश्वास ठेवेल की थोड्यावेळापूर्वी हिच बाई वेदनेने नुसते व्हिवळत होती, पण आता मात्र तिच्या चेहर्‍यावर एक तृप्तीचे समाधान दिसत होते. की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...

न्यू बॉर्न फादर
तुमचा अभिषेक

रेखाटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

24 Mar 2014 - 12:48 am | किसन शिंदे

आत्तापर्यंत आयुष्यात बरीच वेगवेगळी नाती निभावली असशील, पण हे नातं खूप वेगळं आणि स्पेशल आहे!! :)

कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...

जबराट वाक्य!

सुहास झेले's picture

24 Mar 2014 - 12:29 pm | सुहास झेले

अगदी अगदी... खूप खूप अभिनंदन रे :)

अर्धवटराव's picture

24 Mar 2014 - 2:51 am | अर्धवटराव

अभिनंदन रे मित्रा... तुम्हा दोघांचे हार्दीक अभिनंदन. मुलगीच हवि होती आणि मुलगीच झाली म्हणुन त्रिवार स्पेशल अभिनंदन :)

आयला...सर्व बाप लोकांची स्टोरी जवळपास सारखीच असते काय... मलाहि "तो" दिव्य दिवस अजुनही आठवतोय. एरवी कितीही मोठा आवाज अंमळ उशीरा ऐकु येणारी मी त्यादिवशी मात्र कसा काय एलर्ट होतो कोण जाणे. चिरंजीवांचा ट्यांहा मी ऐकला आणि "झालं" म्हणुन सर्वांकडे आनंदाने पाहिलं. बाकि सगळ्यांना काहिच ऐकु आलं नव्हतं...पण दोन सेकंदात नर्स बाईंनी बाहेर येऊन गुडन्युज सांगितली... च्यायला...माझं पुराण काय लाऊन बसलोय. अभ्या... लेका. बाप झालास. एंजोय माडी :)

अभिषेक जी प्रथम तुम्हा दोघांचे हार्दीक अभिनंदन..
अर्धवटराव , तुमच्या या वाक्यात आमचे हे फिट बसत नाहीत.
"आयला...सर्व बाप लोकांची स्टोरी जवळपास सारखीच असते काय... मलाहि "तो" दिव्य दिवस अजुनही आठवतोय".
कारण या दिव्य दिवसाच्या दिवशी त्या॑ना आम्हि ऑफिसात पाठवले होते. घर्च्या॑च्या म्हणन्यानुसार प्रसुतिच्या वेळेला आई आणी नव-याने जवळ असु नये, त्या मुळे बाईला मोकळ व्हायला त्रास होतो अस काही सा॑गितल्या मुळे प्रसुति होइ पर्यन्त त्या॑ना कही सा॑गितले नाही. त्या दिवशी दवाखान्यत प्रसुति खोली बाहेर येर- झा-या घालायला मिळ्यल्या नाहीत म्हणुन अजुन बोलणी खावी लगतात.

अर्धवटराव's picture

25 Mar 2014 - 3:37 am | अर्धवटराव

होतं असं कधि कधि(च) :)
मी पण त्यादिवशी ओटी मेधे का गेलो नाहि याचा पश्चात्ताप होतो कधि कधि. पण त्या डॉक्टरबाईंनी आत येऊ दिलं असतं काय हा हि प्रश्न होताच. शिवाय सी-सेक्शन प्रोसेसमधे चिरंजीवांना थोडी दुखापत झाली. त्याला डोक्याला दोनचार टाके घातले जन्मल्याबरोबर... छातीवरपण भलामोठा ओरखंडा. मी ते सहन केलं असतं काय माहित नाहि.

प्रभाकर पेठकर's picture

24 Mar 2014 - 3:08 am | प्रभाकर पेठकर

हार्दिक 'अभि'नंदन.

ती प्रतिक्षा, ती काळजी, ते अवघडलेपण सर्व..सर्व शब्दांत उतरलं आहे.

नशिबवान आहात. बाप झालात तो क्षण ऑपरेशन थिएटराबाहेरच अनुभवला. मी तर दूर देशी अनुभवला. मोजून ८ दिवस, किती? ८ दिवस तणावात काढले होते. बाळ जन्मल्यानंतर ८ दिवसांनी पत्राद्वारे मला बातमी मिळाली होती. असो.

तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.

स्पंदना's picture

24 Mar 2014 - 3:14 am | स्पंदना

हार्दिक अभिनंदन!!
जबराट उतरलेत भावना.

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Mar 2014 - 6:47 am | लॉरी टांगटूंगकर

+१ असेच म्हणतो.
खूप खूप वेळा अभिनंदन!!

मूकवाचक's picture

25 Mar 2014 - 4:58 pm | मूकवाचक

+२

राघवेंद्र's picture

25 Mar 2014 - 9:56 pm | राघवेंद्र

हार्दिक अभिनंदन !!!

जातवेद's picture

29 Mar 2014 - 4:51 pm | जातवेद

फुल्ल३ अभिनंदन!!!

रेवती's picture

24 Mar 2014 - 4:18 am | रेवती

अरे वा! अभिनंदन!
छान बातमी.लेखनही आवडले. अनेकांना आपापल्या मुलांच्या जन्मकथा आठवणार हे नक्की!

नंदन's picture

24 Mar 2014 - 4:29 am | नंदन

हार्दिक अभिनंदन!

भ ट क्या खे ड वा ला's picture

24 Mar 2014 - 4:41 am | भ ट क्या खे ड वा ला

आई बाबा आणि तुमच्या नव्या गर्ल फ्रेंड चे
होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता.
कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...

जबरदस्त

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2014 - 6:12 am | अत्रन्गि पाउस

होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता.
कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...

अतिशय नेमके....
पुढचे ६ महिने, आयुष्यातील सगळ्यात सोनेरी ६ महिने....एक एक क्षण आसुसून घालवा...बाकी सगळे म्हणजे सगळे दुय्यम ..
तुम्हा दोघांना शुभेच्छा आणि त्या चिमुकलीचे मन:पूर्वक स्वागत !!

kurlekaar's picture

24 Mar 2014 - 7:28 am | kurlekaar

खुप सुन्दर.

अप्पा जोगळेकर's picture

24 Mar 2014 - 7:35 am | अप्पा जोगळेकर

अभिनंदन.

आवडलच! माझ्या याच क्षणांच्या वेळी आलेली अस्वस्थता घालवण्यासाठी अथर्वशिर्ष म्हणत बसलेला नवरा आठवला. नर्सने बाळ हातात दिल्यावर एकदम थरथरायला लागलेला !!

इनिगोय's picture

24 Mar 2014 - 9:21 am | इनिगोय

आवड्या! मस्त जमलाय लेख.
शादी के साईड इफेक्टस् मधली विद्या बालन म्हणते 'वुई आर प्रेग्नंट..!' त्याची आठवण झाली. :D

तुम्हा दोघांनाही हॅप्पी पेरेंटिंग :)

अनन्त अवधुत's picture

25 Mar 2014 - 2:34 am | अनन्त अवधुत

आमची प्रेग्नन्सी मी सगळे आप्त मित्र जमा करून अशीच जाहीर केली होती, " We are pregnant..." ते आठवले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Mar 2014 - 9:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

"अभि"नंदन :) :)...

निरंजन's picture

24 Mar 2014 - 9:49 am | निरंजन

अभ्या तुझा आजपर्यंतच्या लेखातला सर्वोत्तम लेख. अगदी मनापासुन लिहिलेला आहेस.

प्रमोद देर्देकर's picture

24 Mar 2014 - 9:59 am | प्रमोद देर्देकर

Congrats on the first arrival of your new baby girl! May your daughter fills your life with joy and love!
अभिनंदन

0

मि मिपाचा मित्रच's picture

24 Mar 2014 - 10:03 am | मि मिपाचा मित्रच

अभिनंदन मित्रा, जिकलेस रे ....
मि पण बरोबर १ येअर पुर्वि हेच अनुभवले आहे , ते आठवले आणी .....

टिवटिव's picture

24 Mar 2014 - 10:04 am | टिवटिव

अभिनंदन

यशोधरा's picture

24 Mar 2014 - 10:06 am | यशोधरा

सुरेख! अभिनंदन!

राही's picture

24 Mar 2014 - 10:16 am | राही

अतिशय मनमोकळे आणि हृद्य लिखाण. तुमच्या राजकन्येला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
मुलगी चालती, बोलती, धावती होईपर्यंतचा प्रत्येक क्षण रसरसून अनुभवा. जमतील तितके वाढीच्या तिच्या प्रत्येक टप्प्याचे क्षण नैसर्गिकरीत्या (मुद्दाम पोझ द्यायला न लावता) कॅमेराबद्ध करा. तिच्या सोळाव्या वर्षापर्यंत पुरेल असा एक भक्कम अल्बम आणून त्यात तिच्या प्रत्येक वाढदिवसाचे काही फोटो डकवत रहा. मुले मोठी होऊन दूर गेली की असे फोटो हा मोठा विरंगुळा असतो आपला अन त्यांचाही, एक दस्त-ऐवज म्हणून.

सुबोध खरे's picture

24 Mar 2014 - 10:30 am | सुबोध खरे

+१
दर महिन्याच्या वाढदिवसाला एक छोटासा व्हिडीओ काढून ठेवा आणि दर वर्हाची सीडी तयार करून ठेवा. मुलगी मोठी झाली कि तिचे लहानपण फार आठवत राहते. हे दिवस परत येत नाहीत.
दर महिन्याच्या वाढदिवसाला एक छोटासा व्हिडीओ काढून ठेवा आणि दर वर्हाची सीडी तयार करून ठेवा. मुलगी मोठी झाली कि तिचे लहानपण फार आठवत राहते. हे दिवस परत येत नाहीत.
बायकोकडे पुढील काही दिवस जरा जास्त लक्ष द्या. तिला आपली आता जास्त गरज आहे. पोस्टपारटम डिप्रेशन(post partum depression)कडे लक्ष ठेवा. बाळंत पणामुळे मनस्थिती फार नाजूक झालेली असते. शिवाय आत्तापर्यंत डोहाळे आणि कोडकौतुक झाले असते आणि एकदम सर्व जण तिच्याकडे दुर्लक्ष करतात. (आकर्षणाचा केंद्रबिंदू आता दुसरा असतो).बाळाच्या कोडकौतुकात बाळन्तिणीकडे दुर्लक्ष होते
कोणत्याही वैद्यकीय सल्यासाठी व्यनी केलात तरी चालेल.

प्रभाकर पेठकर's picture

25 Mar 2014 - 2:17 am | प्रभाकर पेठकर

उत्तम प्रतिसाद आणि सल्ला. आवडला.

अनन्त अवधुत's picture

25 Mar 2014 - 2:28 am | अनन्त अवधुत

स्वानुभवाने सांगतो, अगदी योग्य सल्ला. तुम्ही बाळाच्या आईची जास्त काळजी घ्या.

नावातकायआहे's picture

24 Mar 2014 - 10:22 am | नावातकायआहे

विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती.

हे विशेष आवडले...

तुषार काळभोर's picture

24 Mar 2014 - 10:24 am | तुषार काळभोर

आमचे दिवस भरत आलेत, अन् तुम्ही टेन्शन दिलं राव...
वाचता वाचता डोळे अलगद पाणावले, हे सुद्धा लक्षात नाही आलं.

-(अलिकडे थोडा संवेदनशील झालेला) पैलवान

अमोल केळकर's picture

24 Mar 2014 - 10:26 am | अमोल केळकर

कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...

क्या बात है ....

अभिनंदन

अमोल केळकर

तुमच्या आजपर्यंतच्या लेखातील सर्वोत्तम लेख. अभिनंदन !! मनापासून लिहीलंय हे वाक्यावाक्याला जाणवतंय.

>>कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
सबंध लेखात हे एक वाक्य भाव खाऊन गेलंय. :)

उपाशी बोका's picture

24 Mar 2014 - 10:35 am | उपाशी बोका

हार्दिक अभिनंदन !

आयुर्हित's picture

24 Mar 2014 - 10:55 am | आयुर्हित

खरोखर अवर्णनीय अनुभव आहे पण छान शब्दांत मांडलाय!
अभिनंदन!
बेटी: धनकी पेटी असते
छान गोड बर्फी येऊ द्या आता!

दिव्यश्री's picture

24 Mar 2014 - 11:13 am | दिव्यश्री

अभिनंदन हो तुमच्या सगळ्या कुटुंबाचे .

.

आधी सुरवातीला मलाच धडधडले , अक्षरशः हात थरथरले म्हणून शेवटचा परिच्छेद (भाग ?) आधी वाचला . तरी थोडा वेळ ...असो . बाकी लेख नेहमीप्रमाणे मस्तच . खूप छान लिहिता तुम्ही .

कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...>>>याचा थोडासा वाईट अनुभव घेतलाय . :(

मी_आहे_ना's picture

24 Mar 2014 - 12:00 pm | मी_आहे_ना

अभिनंदन रे! अगदी आमच्या बाळाच्या जन्मावेळचे ६ वर्षांपूर्वीचे स्वगत वाचतोय असंच वाटत होतं आणि तो क्षण अन् क्षण अनुभवला.
पुन्हा अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!

प्रफ's picture

24 Mar 2014 - 12:03 pm | प्रफ

हार्दिक अभिनंदन !

michmadhura's picture

24 Mar 2014 - 12:17 pm | michmadhura

खूप छान लिहिलय. माझी मुलगी ३१ जानेवारीला झाली पण मी २६ जानेवारी पासून फेर्‍या मारत होते, सगळं अगदी तेच, आज परत आठवलं. ऑपरेशन थेटरमधून बाहेर येताना हसतही होते नी रडतही होते, तेव्हाचा नवर्‍याचा चेहरा आजही आठवतो.

बाबा पाटील's picture

24 Mar 2014 - 12:20 pm | बाबा पाटील

नशिबवान आहेस लेका,पहिली कन्या झाली.लेकीची माया कार्ट्यांना येत नाही.माझ्या दोन्ही कन्यांच्या जन्माच्या वेळेस मी ओ.टी.मध्येच होतो.ते कापसाचे गोळे माझ्याच हातात पहिल्यांदा आले होते.बायकोकडे लक्ष देण्याएवजी मी वेड्यासारखे पिल्लाकडे पाहात होतो.बायको शुद्धीवर येण्यासाठी दोन्ही वेळेस ४ ते ६ तासांचा वेळ लागला होता.तो पर्यंत सिरींजने लॅक्टोजनचे फिड मिच माझ्या लेकींना दिले होते.आणी पोरींनीही बापाचा स्पर्श बहुतेक बरोबर ओळखला होता.त्या ही न रडता निवांत सिरंजने दुध ओढत होत्या.हे क्षण मी आयुष्यात कधीच विसरु श़कणार नाही.

प्रभाकर पेठकर's picture

25 Mar 2014 - 2:23 am | प्रभाकर पेठकर

बाकी प्रतिसाद आवडला पण लेकीची माया कार्ट्यांना येत नाही. ह्या वाक्यासाठी निषेध. मुलंही भरपूर माया करतात आई-वडिलांच्या आजारपणात, शेवटच्या क्षणांमध्ये ढसाढसा रडतात.
माझा मुलगाही भरपूर माया करतो. ती ओळखणं आपल्याला जमायला हवं.

सुबोध खरे's picture

25 Mar 2014 - 10:37 am | सुबोध खरे

एकदम सहमत. मला एक मुलगा आणी मुलगी आहे( परमेश्वरकृपेने). मुलगी आपल्या भावनांचे प्रदर्शन करू शकते मुलगे कदाचित करू शकत नाहीत. माझा मुलगा लोणावळ्याला सहलीला गेला होता. मला चिक्की आवडते म्हणून त्याला पिकनिकला दिलेल्या सगळ्या पैशाच्या तो चिक्क्या घेऊन आला. स्वतः साठी एकही पैसा खर्च न करता. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

कारण मला दोन्ही लेकीच आहेत आणी त्यांच्यासाठी मी आनी माझ्यासाठी त्या सर्वस्व आहेत.जर कधी एखादी मिटींग लेट नाइट चालली आणी मला घरी यायला रात्रीचे १-२ वाजले तरी माझी सहा वर्षाची लेक जागीच असते,पपल्या का आला नाही,आजपर्यंत असंख्य वेळा समाजावुन झाले बाळा झोपत जा पण नाही जोपर्यंत मी पोहचत नाही तो पर्यंत ती आणी तीचे आजोबा वाट पहात असतात ,मग आता मिच रात्रीच्या मिटींग्ज पुर्णपणे बंद करुन टाकल्या,दहाच्या आत घरात.कदाचित सुपुत्र असता तर त्याने इतकी काळजी घेतली असती की नाही कुनास ठाउक्,की माझ्यासारखाच नग झाला असता.....!

सुबोध खरे's picture

25 Mar 2014 - 12:52 pm | सुबोध खरे

बाबासाहेब
आपल्याला व्यक्तिगत नाही परंतु जर आपण "मुलगा" असल्याने आपल्या आई वडिलांची काळजी घेत नसाल तर वरील म्हणणे मान्य होईल.
आमच्या घरी जेंव्हा असा वाद होतो तेंव्हा आम्ही आमच्या बायकांना हेच सांगतो कि आम्ही दोघे भाऊ आमच्या आईवडिलांची काळजी व्यवस्थित घेतो आहोत तर मुलगी असल्याने काय मोठी क्रांती झाली असती?
जर मुलगा सुनेच्या ताटाखालचे मांजर असून आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असेल आणि सून सासू सासर्यांकडे बघत नसेल तर सुनेच्या आईवडिलांनी तिच्या वर केलेल्या संस्कारांचा दोष आहे असेच मी म्हणेन.
माझ्या अतिशय जवळच्या माहितीतील एक भाभा अणुकेंद्रातील शास्त्रज्ञ चार मुली असूनही वृद्धाश्रमात मरण पावले आणि मृत्युसमयी त्यांच्याकडे तीन कोटीची(वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित) संपत्ती होती. पस्तीस लाख रुपयांची एक मुदत ठेव होती. हे गृहस्थ आपल्या सर्वात धाकट्या मुलीला विनवीत होते कि तुझ्या घरात एका कोपर्यात पडून राहीन काही मागणार नाही पण मला वृद्धाश्रमातून घरी घेऊन चल. त्यांच्या वैद्यकीय खर्च सुद्धा सरकारच करीत होते तरीही हि परिस्थिती आहे.चारही मुलींकडे तीन तीन महिने काढत असताना पुण्याच्या मुलीने घरी कटकट नको म्हणून पुण्यातच कोणत्यातरी वृद्धाश्रमात ठेवले होते. आता त्यांच्या संपत्तीवरून चारही जावयात /मुलीत वाद चालू आहेत.
याचे तात्पर्य एकच- मुलगा काय मुलगी काय म्हातारपणी कोण विचारेल हे सांगता येत नाही. मला केवळ मुली आहेत म्हणून माझे म्हातारपण मजेत जाईल हा आशावाद फोल आहे.

मुला मुलीत फरक करायचाच नसतो,आणी आमच्यात तो कधीच झाला नाही.मी माझ्या कुटुंबात १२-१३ माणसे एकत्रच राहतो. आईवडील माझ्या घरात नव्हे तरे मी त्यांच्यात राहतो.त्यामुळे तुम्ही म्हणता तसे बाकीचे विषयच उद्भवत नाहीत्,असो. प्रत्येक व्यक्तीपरत्वे फरक पडतो,वडिलोपार्जित मालमत्तेविषयी बोलाल तर मागच्या वर्षी आमच्या पुर्ण खानदानाची साधारण १५० एकराची खातेफोड झाली तेंव्हा माझ्या सख्या ४ आत्या व एक बहिण आणी चुलत १४ आत्या व २० चुलत बहिणी यातील एकीनेही हक्कसोड करताना एका शब्दाने देखिल विचारले नाही.की कुठे सही करायची,ज्या दुय्यम उपनिबंधकाच्या ऑफिसमध्ये हा व्यवाहार झाला तो देखिल वेडा झाला म्हटला माझ्या आजपर्यंतच्या कार्यकिर्दीत हा पहिले खातेफोड आहे की जे एका दिवसात संपले.बाकी काय सांगु....मग समानता याच्यापेक्षा आणखी काय असते.

यशोधरा's picture

25 Mar 2014 - 5:53 pm | यशोधरा

आई गं :( हे वाचून फार वाईट वाटले.

बाबा पाटील's picture

25 Mar 2014 - 6:42 pm | बाबा पाटील

नक्की कश्याबद्दल वाइट वाटल ?

शास्त्रज्ञ आणि त्यांच्या म्हातारपणात त्यांना जे भोगायला लागले त्याबद्दल. माझा प्रतिसाद डॉ खरे ह्यांच्या पोस्टला आहे. पहा बरं एकदा :)

दिव्यश्री's picture

26 Mar 2014 - 7:07 pm | दिव्यश्री

Son is ur son till he finds wife , Daughter is ur daughter for life :)
मी काही प्रमाणात सहमत आहे . पण माझे वडील , प्यांटवालं आणि नात्यातले भाऊ ( सख्खा नाही म्हणून) हे अपवाद मी याची देही याची डोळा पहिले आहेत .

जोडी तुझी माझी - सतीश शहा आणि त्यांच्या सौ.यांचा कार्यक्रम सगळ्यांनी बघा . तीन मुली असताना एक जावई कसा मुलगा बनला ते कळेल . समाजात चांगल्या-वायीट गोष्टी असतात , असणारच आहेत . एकंच बाजू कधीही बरोबर किंवा चुकीची असू शकतच नाही . मुलांवर काय , कसे संस्कार आहेत हे अशा वेळी दिसून येते . :)
बाकी हल्ली मुल काय मुली काय कसे पलटतील याचा नेम नाही . मुली त्यातल्या बर्या . मुल बायको आली कि बदलतात असे सर्रास बोलले जाते . पण मुलीचे लग्न झाली कि जावई मुलाची जागा घेतो असेही चित्र आहे .

मायेच्या बाबतीत मुलींचा नंबर वरचा लागेल लग्नाला कितीही वर्ष झाली तर आपल्या बाबांना काय आवडत , आईला काय आवडत हे कुठलीही मुलगी पटकन सांगू शकते . त्यातही बाप- मुलीचं नात शब्दबद्ध करणं कठीण काम आहे . ज्यांना मुलगी आहे ते जास्त चांगल्याप्रकारे हे समजू शकतात . वादविवाद जिंकण आणि प्रत्यक्ष आयुष्यात जगण , अनुभूती घेण यात बराच फरक आहे .

बाप अन मुलाचे नातेही युनिक असते. सुरुवातीला हीरोवर्शिप, नंतर तिरस्कार-द्वेष अन नंतर नंतर त्याआडच्या प्रेमाची जाणीव असा त्या नात्याचा प्रवास आहे. आपल्याकडे आई काय अन मुलगी काय, या नात्यांचा लैच उदोउदो झालाय. बाप अन मुलगा ही नाती त्यात लैच मागे पडलीत. त्यांबद्दल बोलणे तितकेसे फ्याशनेबल मानले जात नै. त्यात परत मुलींचा संघर्ष वेगळा, मुलांचा वेगळा. आईवडिलांच्या प्रभावापलीकडे जाऊन स्वतःची वेगळी ओळख बनवण्याचे प्रेशर एका मर्यादेनंतर मुलांवर ज्या तीव्रतेने येते त्याला तोड नाही. अशावेळी मग बाप काय आहे ते कळते. पण त्याला वयाची किमान वीसेक वर्षे तरी पूर्ण व्हावी लागतात. अन आईपेक्षा बापाचे प्रेम जास्त अव्यक्त असते, लगेच कळेलसे नाही. सोसायटल कंडिशनिंगमुळे बापही ते जास्ती दाखवू शकत नाही, पण "पुत्रे मित्रवदाचरेत्" वाली भावना बापाकडून आली की जे गारगार वाटतं त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ही भावना पुरुषांनाच समजू शकेल. इट इज़ दि अल्टिमेट व्हॅलिडेशन दॅट वन कॅन हॅव.

बाप-मुलाचे नाते हे तितकेसे mushy नसते, जरा वेगळ्या प्रकारचे असते. त्याचे मला आवडलेले प्रकटीकरण रारंग ढांग या जब्री कादंबरीत हीरोचे वडील त्याला पत्र पाठवतात त्यात अतिशय हृद्यपणे आलेले आहे. भावनांचे प्रकटीकरण म्हणावे तितके होत नाही, अंमळ स्पार्टन असते.

पण जितके वय होईल तितके वडील मवाळ होत जातात हेही अर्थात पाहिले आहेच. इनफ्याक्ट कैक पुरुष म्हातारपणी बायकांपेक्षा जास्त हळवे होतात. त्याला अपवादही तितकेच पाहिलेत म्हणा. पण इन जण्रल हे निरीक्षण आहे.

मायेची व्याख्या तिच्या प्रकटीकरणाच्या प्रमाणावर अवलंबून केली की बापमुलाचे नाते त्यात मार खाणार हे ठरलेले आहे. असो.

दिव्यश्री's picture

26 Mar 2014 - 7:48 pm | दिव्यश्री

find Prince someday , but YOU will always be MY KING :)

पण जितके वय होईल तितके वडील मवाळ होत जातात हेही अर्थात पाहिले आहेच. >>>++++++++++++++++++++++ १ १११११११११११

माझ लग्न ठरल्यावर रोज सकाळी न चुकता माझी झोप मोड करायचे . मुद्दाम डोक्याजवळ येउन बसायचे , बर्याच खोड्या काढायचे . पण आई पेक्षा जास्त प्रत्येकवेळेस तेच रडले होते . अगदी मी माझ्या माहेराहून निघाले तरी किंवा मला भेटायला ते आले आणि निघाले तरीही . *cray2*
आमच्या कडे आई-बाबांचे वाद झाले कि आम्ही बाबांची बाजू घेतली कि मातोश्री अजून चिडायच्या कि या कार्ट्याणा कधीही आईची बाजू बरोबर वाटत नाही . :D ई. प्यांटवालं अजूनही आईची बाजू घेऊन त्यांच्या बाबांशी भांडतात . आहे कि नै गम्मत . :)

स्मिता चौगुले's picture

27 Mar 2014 - 9:27 am | स्मिता चौगुले

+१११ सेम टू सेम

राजकन्येचे वडिल झाल्याबद्दल अभिनंदन..

आतिवास's picture

24 Mar 2014 - 12:55 pm | आतिवास

अभिनंदन.

स्मिता श्रीपाद's picture

24 Mar 2014 - 1:38 pm | स्मिता श्रीपाद

किती गोड लेख आहे हा....
इतक्या वर्षांत मिपा वर वाचलेला सर्वात गोड लेख....
तुमचे खुप खुप अभिनंदन....
आणि छोटी ला खुप आशीर्वाद....

.... की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते

आता खरी सहजीवनाला सुरुवात झाली. एंजॉय..... आणि अभिनंदन!

नशिबवान आहे अभिषेक तुमची लेक..
तुमचा तिच्या जन्मावेळीचा हा लेख तिला भविष्यात वाचता येईल असा जपून ठेवा,धन्य होईल ती हे वाचून.
मस्त लिहिलय, अगदि वाक्यनवाक्य तुमच्या व्याकुळतेची साक्ष आहे.

प्यारे१'s picture

24 Mar 2014 - 2:39 pm | प्यारे१

हार्दिक अभिनंदन!

आता स्वाक्षरी बदला, मिपा नि इतर उद्योग कमी करा आणि अभि अभि आलेल्या अभि कन्येचं कौतुक करा.

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 2:50 pm | प्रसाद गोडबोले

अभ्या , लेका तुझा प्रत्येक लेख आवडायचाच ... हा तर लईच भारी आहे... शिवाय मीही नुकताच हा अनुभव घेतला असल्याने आय कॅन रीलेट टू इट !

सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते

सह्हीच !! लयच भारी लिहिले आहेस लेका !!

जियो !

मनिष's picture

24 Mar 2014 - 3:01 pm | मनिष

आमचाही अनुभव आठवला....तेंव्हा शब्दबद्ध करायचा होता, पण राहून गेला. तुमच्या ह्या लेखाच्या निमित्ताने त्या आठवणी ताज्या झाल्या!

जेपी's picture

24 Mar 2014 - 5:38 pm | जेपी

अभिनंदन अभि .
पहिली बेटी , धनाची पेटी . अशी म्हण आहे आमच्या गावात . भावना खुपच छान मांडल्यात . आता ती , मी , आणी ही सुख मंजे काय असते आशी लेखमाला होऊद्या

कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...

अगदी अगदी...एकदम चपलख वाक्य.

माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी मी देखील बाहेर असाच येराझार्‍या मारत होतो. सगळे व्यवस्थित होईल की नाही ही चिंता सतावत होती पण देवाच्या व डॉक्टरांच्या कृपेमुळे सगळे सुखरुप पार पडले. पहिल्यांदा मुलाला छातीशी कवटाळताना कोण आनंद झाला...शब्दांत वर्णन करणे अशक्य! एका क्षणात मी नवर्‍याचा बाप झालो होतो... :)

तुम्हा दोघा दांपत्याना लेकीच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी पॅरेंटीग...!!!

भटक्य आणि उनाड's picture

24 Mar 2014 - 6:15 pm | भटक्य आणि उनाड

कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...

अगदी अफलातुन वाक्य...

सखी's picture

24 Mar 2014 - 6:48 pm | सखी

अभिनंदन तुमचे आणि तुमच्या पत्नीचेही. भावना छान उतरल्यात. पुढचे वर्ष जितका जमेल तितका वेळ द्या दोघींसाठी आणि पुरेपुर आनंद घ्या, फार पटकन मोठी होतात ही मुलं. अनेक शुभेच्छा!

चिगो's picture

24 Mar 2014 - 7:23 pm | चिगो

अभिनंदन, अभिषेक.. अत्यंत सुंदर भावपुर्ण लेख.. आमच्या लेकीच्या जन्माच्या वेळची हाल(त) आठवली. आणि तो तिचा 'टँह्या' ऎकताक्षणी दाटलेला गहीवर आणि आनंदाश्रू..

पुनश्च अभिनंदन..

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2014 - 8:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

सुंदर लेख !

मस्त अनूभवकथन. अभिनंदन !!!

तुमचा प्रवास तुम्ही जसाच्य्या तस्सा आम्हाला घडवलात.... सुरेख वर्णन ! प्रसंग डोळ्यासमोर येत होते.

सुहास..'s picture

24 Mar 2014 - 8:45 pm | सुहास..

एकदम अस्सल रे अभि !!

त्रिवार अभिनंदन !!!

मदनबाण's picture

24 Mar 2014 - 8:55 pm | मदनबाण

अभिनंदन... :)

काय बोलावे फारसे सुचत नाहीये, एवढे सारे आणि भारी प्रतिसाद, माझ्या लेकीने मला स्टार बनवल्यासारखे वाटतेय. प्रत्येक प्रतिसाद लाखमोलाचा आहे कारण प्रत्येकात शुभेच्छा आणि माझ्या लेकीसाठी आशिर्वादच आहेत, वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे जर हा लेख तिच्यासाठी पुढे जाऊन छानसे गिफ्ट बनत असेल तर येथील प्रतिसाद देखील त्याच गिफ्टसेट मध्ये येतील. खरे तर माझी बायको बरेचदा मला बोलायची की आपली मुलगी आल्यावर (गर्भलिंगनिदान नाही केले हा, आम्हाला दोघांनाही मुलगीच हवी आणि होणार हि स्ट्रॉंग फीलींग होती) तर आपल्या बाबूवर तू वरचेवर काही ना काही लिहायचे. तिच्या आयुष्यातले स्पेशल दिवस लिहून काढ, तिचा एखादा फोटो काढला तर त्या मागे त्यासंबंधित आठवणी लिहून काढ, हवे तर दर विकांताला तिने आठवड्याभरात काय गोंधळ घातला याची डायरी लिहून काढ. जे ती मोठी झाल्यावर तिला वाचायला द्यायचे आणि आपण तिच्या चेहर्‍यावरचा आनंद बघत बसायचे. तो आनंद नशीबात असेल तेव्हा असेल, पण आज आताही मला हे सारे परत परत वाचताना कसला आनंद होतोय. याबद्दल कितीही धन्यवाद बोललो तरी तोकडेच. जेव्हा केव्हा माझी लेक इथे हे वाचायला येईल, ते देखील तिच्या स्वताच्या अकाऊंटमधून तेव्हा तिलाच तुम्हाला धन्यवाद बोलायला लावतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे प्रेम असेच राहू द्या. :)

बाकी वर काही सूचना सल्ले सजेशन आलेत त्या प्रत्येकांना वैयक्तिकरीत्या उत्तर आता देत नसलो तरी ते सारे टिपून घेतले आहेत.

आणि हो, हा माझ्या ब्लॉगवर प्रकाशित होणारा पन्नासावा लेख. हा निव्वळ योगायोग, पण लेकीने इथेही मुहुर्तच साधला म्हणायचे :)

उपास's picture

25 Mar 2014 - 12:01 am | उपास

मुलीस अनेक उत्तम आशीर्वाद, तिचं नाव काय ठेवलं हे नक्की सांगा इथे!
पुढचे सहा ते आठ महिने बायकोबरोबरीने उपभोगा मुलीसमवेत, रात्रीची जागरणं, दुपटी, पालथं पडणं/ रांगणं/ बोबडं बोलणं ह्या स्टेजेस, खुप मज्जा.. बेबीसेंटर सारखी एखादी वेबसाईट सबस्र्काईब केलीत तर उत्तम माहिती मिळेल, दर आठवड्याला वगैरे!
सुदैवाने मी मुलाच्या जन्मावेळी बायकोबरोबरच होतो ऑपरेशन थिएटर मध्ये, पहिल्यांदा बाळाला मी घेतलं हातात मग थोड्यावेळाने तिने.. त्या सुखाची (आणि सुटकेची) तुलना कशाचीच होऊ शकत नाही हे खरंच!

अनन्त अवधुत's picture

25 Mar 2014 - 2:31 am | अनन्त अवधुत

पुढील वर्षभर पुरेल इतकी झोप तुम्ही आधीच घेतली असेल अशी आशा आहे.

इन्दुसुता's picture

25 Mar 2014 - 5:50 am | इन्दुसुता

हार्दिक अभिनंदन !!
लेखन आवडले.

माझ्या लेकीने मला स्टार बनवल्यासारखे वाटतेय.

तुमच्या लेकीच्या मनात तुम्ही फॉरेव्हर स्टार असणार... ( बाहेर तुम्ही स्टार असेनात/ नसेनात). तिच्यासाठी नेहमीच " माय डॅडी इज द बिग्गेस्ट, स्ट्रॉन्गेस्ट, स्मार्टेस्ट मॅन इन द हो..ल वर्ल्ड" हेच कायम राहणार. तुमच्या तुलनेत तिच्यासाठी इतर कुणीही नेहमीच तुच्छ राहील.. :) एन्जॉय हिरो वर्शिप :)
इथे अनेक जणांना स्वतःच्या मुलांच्या ( अपत्यांच्या ) आगमनाच्या वेळेची आठवण झालीय हे स्पष्ट्च आहे. मला मात्र राहून राहून ( माझ्या ) बाबांची आणि अर्थातच आईचीही खूप आठवण आली.

थोडे अवांतर : लेख आवडला हे वर लिहिलेच आहे फक्तं

ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या

हे वाक्य मात्रं फारच खटकले ( तुम्हाला तुमची पत्नी तिच्या माहेरी होती हे सांगायचे होते हे लक्षात आले ). सुखाच्या क्षणी थोडी गड्बड व्हायचीच म्ह्णून इथे नोंद केली येव्हढेच!!! :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Mar 2014 - 9:48 am | ज्ञानोबाचे पैजार

अभिनंदन,

वेलकम टु फादर्स क्लब

या मोरपंखी दिवसांनंतर संयमाची, शांतपणाची आणि कधिकधि धिराची सुध्दा कसोटी लागण्याचे दिवस येतिल त्या वेळीही असेच संवेदनाशील आणि सजग रहावे लागेल.

त्या काळासाठी मनापासून शुभेच्छा.

लौंगी मिरची's picture

25 Mar 2014 - 9:54 am | लौंगी मिरची

अभिनंदन ! लेख अप्रतिम . मला माझ्या वडिलांची आठवण आली .माझा जन्म आईच्या माहेरी , गावी झाला . त्यावेळी बाबा मुंबईत होते .एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि आज्जी स्वभावाने थोडी स्ट्रिक्ट असल्या कारणाने बाबा घरातुन पिकनिक , ऑफीसच्या लोकांची मिळुन २ दिवसांसाठी ट्रीप चालली आहे असे कारण सांगुन ते आईच्या गावी मला पहायला आले होते . आई सांगते , बाबांना त्या दिवसाइतके आनंदी कधीच पाहिले नाही . नंतर खुप वेळा हा किस्सा आईकडुन ऐकला , जेवढ्या वेळा ऐकते बाबांवरचे प्रेम द्विगुनित होत रहाते . धन्यवाद अभिषेक . तुमच्यामुळे आज पून्हा जुन्या आठवणीना उजाळे मिळाले .

नि३सोलपुरकर's picture

25 Mar 2014 - 11:50 am | नि३सोलपुरकर

सुरेख वर्णन ! प्रसंग डोळ्यासमोर येत होते..

"जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता."-१००% खरे

अभिनंदन,रे मित्रा

वेलकम टु फादर्स क्लब

विटेकर's picture

25 Mar 2014 - 12:12 pm | विटेकर

सुरेख लेख !
वपुंचे एक वाक्य आठवले..
As you write more & more personal ,it becomes more & more universal.
आणि म्हणूनच प्रतिक्रियांचा धो - धो पाऊस पडला!

होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर

या एका गोष्टीमुळे आपण बायकोचे जन्मभर ऋणाईत होतो..
काही पर्यायच नाही हो ! सर्वत्र समान दृष्टी असणार्‍या बाप्पाने या बाबतीत असे का केले असावे कोणास ठाऊक !

होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर""या एका गोष्टीमुळे आपण बायकोचे जन्मभर ऋणाईत होतो."
या गोष्टीशी मी सहमत नाही.
माझी दोन्ही मुले लष्कराच्या रुग्णालयात एपिड्यूरल अनाल्गेसिया(epidural analgesia) म्हणजे कमरेत दुख् निवारक औषधे देऊन मुळीच न दुखता जन्माला आली. आतासुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी या पर्यायाचा जरूर वापर करावा असे माझे मत आहे.
माझी बायको सुद्धा डॉक्टर आहे आणि ती माझ्या मित्रांबरोबर( स्त्रीरोग तज्ञ) कळा देत असताना गप्पा मारत होती. तिला वेदना झाल्या नाहीत म्हणजे मी बायकोचा ऋणी असू नये असे नाही.
शिवाय गरोदरपणाचे स्त्रियांना होणारे फायदे कितीतरी आहेत. भूक लागते पाहिजे ते खाता येते वजन वाढले तरी कोणी विचारत नाही उलट वजन का वाढले नाही अशी विचारणा होते. डोहाळे आणि कोडकौतुक पुरवले जाते. सासू आणि नवर्याकडून पाहिजे तितके लाड करून घेत येतात. त्वचेचा पोत सुधारतो,
(माझी बायको तिच्या गर्भारपणा सर्वात जास्त सुंदर दिसत असे) केस गळणे थांबते इ इ.
(दुर्दैवाने मला लेबर रूम मध्ये आत जाऊ दिले नाही कारण त्यावेळी तशी पद्धत नव्हती)पण माझी दोन्ही मुले दहा बारा डॉक्टरांच्या उपस्थितीत(जे स्वतःहून कोलवर नसताना आले) राजेशाही पद्धतीने जन्माला आली.(हा डॉक्टर असण्याचा फायदा आहे).

विटेकर's picture

25 Mar 2014 - 3:05 pm | विटेकर

" या एका गोष्टिमुळे " च्या ऐवजी " या किमान एका गोष्टीमुळे तरी " असा वाक्यप्रयोग करायला हवा होता.

दुसरे असे की हे वेदनाशामक इन्जेक्श्न मग प्रचलित का नाही ? की फक्त लष्करी इस्पितळातच उपलब्ध असते?

सुबोध खरे's picture

25 Mar 2014 - 7:59 pm | सुबोध खरे

हे औषध कोणतेही खास औषध नाही आणि ते सहज सर्वत्र उपलब्ध आहे. यासाठी निष्णात भूलशास्त्र तज्ञ लागतो शिवाय तो भूल तज्ञ पूर्ण वेळ (सात ते आठ तास) तेथे हजर असावा लागतो. अशा साठी तेवढे जास्त पैसे द्यायला लागतात आणि त्याची तयारी बर्याच लोकांची नसते. (हिरानंदानी रुग्णालयात हा अनुभव घेतला आहे. शिवाय बायकांनी कळा काढल्या तर काय बिघडले अशा मनोवृत्तीची माणसे आहेतच). छोट्या खाजगी रुग्णालयात असे भूल तज्ञ सहज उपलब्ध नसतात हेही तितकेच खरे.
कळा दिल्या नाहीत तर तुम्हाला मुलाबद्दल कमी प्रेम वाटते किंवा तुमचे आईपण परिपूर्ण नाही /कमी आहे असे वेडगळ टोमणे आम्ही बरेच ऐकले आहेत. सिझेरियन झाले त्या बायका काय कमी दर्जाच्या आया असतात हा साधा प्रश्न विचारल्यावर त्या बायका निरुत्तर झाल्या हे अलाहिदा.
पण भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे ? हे वाक्य त्रिकाल अबाधीत सत्य आहे.
असो. या बद्दल माहिती कमी आहे आणि गैरसमज जास्त आहेत हि वस्तुस्थिती.

शिल्पा नाईक's picture

27 Mar 2014 - 11:01 am | शिल्पा नाईक

डो. खरे साहेब.
अगदी बरोबर. मला injection देउन पण एकही कळ आली नाही अन मग सी-सेक्शन कराव लागल्यावर सासुने असेच टोमणे मारले होते. अस्सा राग आला होता नं.... :D

सुबोध खरे's picture

29 Mar 2014 - 8:53 pm | सुबोध खरे

पण भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे ? हे वाक्य त्रिकाल अबाधीत सत्य आहे.
मी एवढ्या कळा काढल्या आणी हि आताची मुलगी हसत खेळत प्रसूत होते असं कसं चालेल.
म्हणून मग हे टोमणे येणारच.
हसून साजरे करावे

सखी's picture

25 Mar 2014 - 6:25 pm | सखी

(epidural analgesia) म्हणजे कमरेत दुख् निवारक औषधे देऊन मुळीच न दुखता जन्माला आली. --- ह्याने काही प्रमाणात त्रास कमी होत असला तरी पूर्णपणे न दुखता यावर (तुम्ही डॉक्टर आहात तरीसुद्धा) आक्षेप आहे. सरसकट सगळ्याच आयांची सुटका पटकन वा विनात्रासाची होत नाही हेही सत्य आहे. आणि कोडकौतुक वगैरे असले तरी ९ महीनेसुद्दा जसे आनंदी जाऊ शकतात तसेच उलट्या, पाठदुखी, नीट झोप न येणं, पायात गोळे येणं ह्या फक्त कॉमन गोष्टी) याने जिकीरीचेही जाऊ शकतात. इथे कोणालाही घाबरवायचा अजिबात उद्देश नाही, सगळ्या ताण, वेदना आणि त्रासातुन जाऊनसुद्दा माझ्या मुलांचा जन्माचे दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदी दिवस आहेत :)

सुबोध खरे's picture

25 Mar 2014 - 8:16 pm | सुबोध खरे

ह्याने काही प्रमाणात त्रास कमी होत असला तरी पूर्णपणे न दुखता यावर आक्षेप आहे.
यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? माझ्या बायकोने दोनही वेळा पूर्ण वेदनारहित प्रसूती केली आहे आणि ते १००% वेदनारहित असते हे सत्य आहे.शिवाय त्याच नलिकेतून वेदना शामक दिल्याने पुढचे २४ तास प्रसुतीच्या थकव्यातून बाहेर पडेपर्यंत वेदनारहित असल्याने माझी बायको आनंदात होती. (किंबहुना जर सिझेरियन करायला लागले तर त्याच वेदनारहित (epidural analgesia) अवस्थेत ते करता येते हा त्याचा आणखी एक फायदा आहे). आणि ज्यांना परवडते त्यांनी जरूर वेदनारहित प्रसूती करावी. उगाच कष्ट काढल्याने काही क्रांती होत नाही. आणि कोठेही कापल्याची जखम नसल्याने सिझेरियन सारखी नंतर कटकट होत नाही.
माझे म्हणणे एवढेच होते कि बायकोने कळा दिल्या तर तुम्ही तिचे ऋणाईत होता हे मान्य नाही. बायकोने मुलाला जन्म दिला म्हणुन तिचे तुमच्यावर उपकार झाले हे मला मान्य नाही. नवरा बायकोच्या नात्यात उपकार किंवा ऋण या शब्दाला माझा आक्षेप आहे. मग बाप मुलासाठी जे काही कष्ट काढतो त्याला न्यूनतेच्या पातळीवर आणले जाते.
याचा अर्थ ज्या दुर्दैवी स्त्रीला मुल होत नाही तिच्या नवर्याने काय तिच्यावर उपकार केले आहेत काय?अशा अनेक स्त्रिया मी रोज पाहत आलो आहे.
गरोदरपणात वेगवेगळे त्रास होतात त्याला कमी लेखणे हा हेतू नाही पण त्यात मिळणाऱ्या आनंदापुढे ते काहीच नव्हे.

सखी's picture

25 Mar 2014 - 9:03 pm | सखी

मला फक्त म्हणायचे होते की पूर्ण वेदनारहित प्रसुती होणे, तुमची पत्नी कळा देत असताना गप्पा मारत असणे सत्य असेलच, काही संशय नाही. पण हे सरसकट सगळ्यांना लागु होऊ शकत नाही (तुमचा तसा उद्देश नसेलही). तुम्हाला तुमचा अनुभव सांगायचा होता, तीच गत माझीही होती फक्त epidural घेतल्यावर मदत झाली पण सगळं काही कोप-यावरच्या दुकानातुन गोळ्या-बिस्कीटं आणण्याइतकं सोपही नाही इतकचं म्हणण आहे. आणि थोडेसेच वेगवेगळे त्रास मांडले कारण कोडकौतुकाचा उल्लेख होता अर्थात यातुन नव-याने कायम बायकोच्या उपकाराखाली रहावे हा अजिबात उद्देश नाही, हेवेसांनल.

नव्या नव्या आई-बाबांचे अभिनंदन !!!
नव्या परीस अनेकोत्तम आशिर्वाद.

vrushali n's picture

25 Mar 2014 - 2:20 pm | vrushali n

अभीनंदन!!!!

मधुरा देशपांडे's picture

25 Mar 2014 - 2:34 pm | मधुरा देशपांडे

अभिनंदन. सुंदर मांडल्यात भावना.