ट्रोजन युद्ध भाग ३.४- लाकडी घोडा ऊर्फ ट्रोजन हॉर्स आणि ट्रॉयचा समूळ विनाश.

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जनातलं, मनातलं
12 Mar 2014 - 8:10 pm

भाग १

भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ भाग २.५

भाग ३.१ भाग ३.२ भाग ३.३

प्रस्तावना

हा भाग सर्वांत नाट्यपूर्ण, थरारक अन तितकाच करुण आहे. अख्ख्या कथेचा क्लायमॅक्स या भागात पहावयास मिळतो. ओडीसिअसचे लोकोत्तर चातुर्य, ग्रीकांची अपरिमित हाव आणि क्रूरता तसेच ट्रोजनांची त्यांच्या दुर्दैवाने उडालेली दैना हे सर्व या भागात एकवटलेले आहे. पोस्टहोमेरिकामधील बुक क्र. ११ ते १३ मधील, तर ग्रीक एपिक सायकलमधील लिटल इलियड व इलियू पर्सिस या दोन काव्यांमधील कथाभाग यात येतो.

फायनल लढाया, अनिर्णित शेवट.

आता पॅरिस मेला होता, पण तरीही त्याच्या थडग्यापाशी जाऊन शोक करायला ट्रोजन स्त्रिया धजावत नव्हत्या. साहजिकच आहे म्हणा- ट्रॉयच्या मजबूत दगडी भिंती ओलांडून बाहेरच्या गोमगाल्यात कोण कशाला जाईल फुक्कट मरायला? ग्रीकांचा आवेश तर कमी व्हायचे नाव घेत नव्हता.

अकिलीसपुत्र निओटॉलेमस फुल फॉर्मात आला होता. पहिल्यांदा त्याने लाओदामस नामक ट्रोजनाला ठार मारले. त्याच्या लगत पाठोपाठच निरस नामक ट्रोजनाच्या जबड्यातून आरपार भाला खुपसला. तो जबडा, जीभ पूर्ण आरपार भेदून पुढे घुसला. निरस जागीच कोसळला. कसातरी भेसूरपणे किंचाळत तो मरत असताना त्याच्या तोंडातून भळभळ रक्त वाहू लागले. त्यानंतर त्याने भाला फेकून एव्हेनॉर नामक ट्रोजनाचं यकृत बाहेर काढलं. त्यानंतर त्याने इफितिऑन आणि हिप्पोमेदॉन नामक ट्रोजनांनाही लगेच यमसदनी धाडले.

इकडे एनिअसनेही ब्रेमॉन आणि अँद्रोमाखस नामक ग्रीकांना लोळवले. दोघांना रथातून खाली ओढले. ब्रेमॉनच्या गळ्यात भाला खुपसून त्याला ठार मारले, तर अँद्रोमाखसच्या कपाळावर एक मोठ्ठा धोंडा फेकून त्याची कवटीच फोडली. त्या दोघांच्या रथांचे घोडे घाबरून सैरावैरा धावू लागले. एनिअसच्या सहकार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले.

ग्रीक धनुर्धारी फिलोक्टॅटेसने पिरासुस नामक ट्रोजनाला तो पळायच्या तयारीत असताना त्याच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूवरील स्नायूवर बरोब्बर नेम धरून बाण मारला आणि त्याला जायबंदी केले. ते पाहून एका ग्रीकाने तलवारीने पिरासुसचे डोकेच उडवून टाकले. ते उडवलेले डोके फुटबॉलसारखे दूर पडले. त्याचे ओठ शेवटपर्यंत विलगच राहिले.

हेक्टरचा भाऊ अन नेहमी शहाणपणाचा सल्ला देणारा पॉलिडॅमस यानेही आज पराक्रम चालवला होता. युरिमॅखस आणि क्लिऑन नामक ग्रीकांना त्याने भाल्याच्या सहाय्याने लोळवले.

इथाकानरेश ओडीसिअसनेही आपल्या तलवारीने पॉलिडोरस तर भाल्याने एइनस या ट्रोजनांचा बळी घेतला. स्थेनेलस या ग्रीक योद्ध्याने आबास नामक ट्रोजन योद्ध्याला खांद्यात भाला फेकून ठार मारले. डायोमीडने लाओदोकस नामक ट्रोजनाचा प्राण घेतला, तर आगामेम्नॉनकडून मेलियस नामक ट्रोजन योद्धा मरण पावला. प्रिआमपुत्र डेइफोबसने आल्किमस आणि द्रिआस या ग्रीकांना ठार मारले, तर आगेनॉर या ट्रोजनाने हिप्पासस नामक ग्रीकास हेदिससदनी पाठवले. थोआस या ग्रीकाने लिंकस आणि लामुस या ट्रोजनांना मारले, तर मेरिओनेस आणि मेनेलॉस या दोघांनी अनुक्रमे लिकॉन आणि आर्किलोखस या ट्रोजनांना ठार मारले. थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ अन श्रेष्ठ धनुर्धारी ट्यूसरकडून मेनोएतेस नामक ट्रोजन योद्धा वीरगतिस प्राप्त झाला. युरिआलस नामक डायोमीडच्या सहकार्‍याने एक भलामोठा धोंडा घेऊन तो ट्रोजन सैन्यावर फेकला. ट्रोजन सैन्यात फुल खळबळ उडाली आणि मेलेस नामक ट्रोजनाच्या हेल्मेटवर त्याचा जोरात आघात होऊन तो जागीच कोसळला.

अशाप्रकारे सगळीकडे नुसती बोंबाबोंब चालू होती. ट्रोजनांची पिछेहाट होतेय असे वाटत असतानाच एनिअस आणि युरिमाखस हे दोघे ट्रोजन योद्धे एकदम फॉर्मात आले. इतके पेटले की ग्रीकांचे त्यांच्यापुढे काहीच चालेना. ग्रीक सैन्य पाय लावून पळत सुटले. पण तेवढ्यात एक ग्रीक योद्धा शत्रूशी मुकाबला करायला त्याच्याकडे वळला. तो पुढे येणार एवढ्यात आगेनॉर नामक ट्रोजनाने त्याच्या खुब्यात भाला खुपसून त्याचा हातच तोडला आणि त्याला ठार मारले. पण त्याच्या हाताने जो लगाम पकडला होता त्याची पकड इतकी घट्ट होती, की तो जरी मेला तरी घोड्याच्या लगामाला तो हात तसाच घट्ट पकडून धरलेला होता. ते भेसूर दृश्य पाहून सर्वांना कळायचं बंद झालं.

इकडे एनिअसने फेकलेला भाला आन्थालस नामक ग्रीकाच्या बेंबीतून आत घुसला. असह्य वेदनेने किंकाळी फोडत आंथालस कोसळला. त्याची आतडी बाहेर आली. ग्रीक आता लैच घाबरले होते. जुवाखाली बैल दबावेत तसे दबून गेले होते. तेवढ्यात अकिलीसपुत्र निओटॉलेमस ओरडला, "भित्रटांनो! जरा मर्दागत वागा! काय लाज आहे की नाही आँ?"

त्याने घातलेल्या शिव्या ऐकून ग्रीक पेटले. निओटॉलेमस आणि मॉर्मिडन सैन्य एखाद्या वादळागत झंझावाती कत्तल करीत सुटले होते. निओटॉलेमस आणि एनिअस यांचा सामना न होता, दोहोंनी एकमेकांचा नाद सोडून अनुक्रमे ट्रोजन आणि ग्रीकांची यथेच्छ कत्तल केली.

त्यानंतरही अव्याहत लढाई सुरुच राहिली, पण मग एकदम वादळ आले त्यात कोण आपला, कोण परका काहीच कळेना. जो जवळ येईल त्याला मारायचे इतकेच धोरण सर्वांनी ठेवले. जवळ ग्रीक आहे की ट्रोजन याची पर्वा न करता दोन्ही बाजूंच्या लोकांनी लै लोक मारले. सर्वांना कन्फ्यूजननं कळायचं बंद झालं होतं. काही वेळ असाच गेल्यावर मग वादळ विरले आणि शत्रू-मित्र सर्व काही धडपणे दिसू लागले. मग पुनरेकवार नव्या जोमाने कत्तलखाना सुरू राहिला. ग्रीकांची हळूहळू सरशी होत होती. ट्रोजन्स मागे हटू लागले. त्यांतले काही थोडेच धडपणी ट्रॉयमध्ये आत शिरले. त्यांच्या जखमांना जळवा लावून त्या नीट धुतल्या गेल्या, गरम पाण्याने आंघोळ करायची व्यवस्था केली गेली आणि शांतपणे त्यांना निजवले गेले. ग्रीकही आपल्या जहाजांकडे परतले.

ट्रॉयमध्ये घुसण्याचा ग्रीकांचा प्रयत्न अयशस्वी ठरतो.

दुसर्‍या दिवशी पुन्हा लढाईला तोंड लागले. ट्रॉयला इडायन आणि स्कीअन असे दोन दरवाजे होते. त्यातल्या स्कीअन दरवाज्यासमोर कापानेउसपुत्र आणि डायोमीडने हल्ला चालवलेला होता. त्याला विरोध करायला डेइफोबस आणि पॉलितेस हेही तत्पर होते. इडायन दरवाजासमोर अकिलीसपुत्र निओटॉलेमसचा दंगा चालला होता. त्याला अडवण्याची हेलेनस आणि आगेनॉर हे दोघे पराकाष्ठा करीत होते. दरवाजे तोडून घुसण्याची ग्रीकांची खटपट चालली होती- आज पहिल्यांदाच ग्रीक सैन्य ट्रॉयच्या इतक्या जवळ इतक्या बहुसंख्येने येऊ शकले होते. त्यांच्या मदतीस ओडीसिअस, युरिआलस आणि ट्यूसर हे होते, तर भिंतींवरून दरवाजांचे रक्षण करण्यासाठी एनिअस झगडत होता. बाण, भाले, यांचा दोन्ही बाजूंनी हिमकणांसारखा वर्षाव होत होता.

त्यात ओडीसिअसने आपल्या बेरकी डोक्यातून एक शक्कल लढवली. बर्‍याच योद्ध्यांना त्याने एकत्र केले आणि प्रत्येकाने आपापली ढाल आपल्या डोक्याच्या बरोब्बर वरती धरायला लावली. त्यामुळे ढालींचे एक छतच तयार झाले. तशा पोझिशनमध्ये ते ट्रॉयच्या बुरुजापाशी आले. वरून ट्रोजनांनी ते छत भेदायचा आटोकाट प्रयत्न केला. लै बाण मारले, कितीतरी भाले फेकले, पण ढालींचे कवच अभेद्य राहिले. ते पाहून आगामेम्नॉन आणि मेनेलॉस दोघेही आनंदले. सर्व योद्ध्यांनी एकत्र एका दमाने ट्रॉयच्या दरवाजाला धडक दिली, पण दरवाजा काही तुटला नाही. त्यांना बॅटरिंग रॅमची कन्सेप्ट माहिती नसावी, नैतर असला यावनी प्राणायाम केला नसता. शेवटी हा प्रकार एनिअसच्या नजरेला पडलाच. त्याने धोंड्यांमागून धोंडे ग्रीकांच्या ढालींवर फुल वेगाने एकदम जीव खाऊन मारायचा सपाटा लावला. साहजिकच ग्रीकांची फाटली आणि ते पळू लागले. दगडांच्या मार्‍याने ति फळी पूर्णच मोडून पडली. पळणार्‍यांचा पाठलागही एनिअसने एकदम कुतून केला अन लै ग्रीक मारले.

इकडे धाकटा अजॅक्सही आपल्या धनुर्विद्येने बहुत ट्रोजनांस हेदिससदनी धाडता जाहला. त्याचा एक लोक्रियन सैनिक आल्किमेदॉन एकदम जोशात आला. त्याने सरळ एक शिडी घेतली आणि ट्रॉयच्या तटाला लावली. हातात एक भाला घेऊन तो शिडी चढू लागणार एवढ्यात दूरवरून एनिअसने ते पाहिले आणि त्याच्या डोक्यावर एक भलाथोरला धोंडा असा काही फेकून मारला, की आल्किमेदॉन जागीच खलास झाला. त्याच्या मेंदूचे तुकडे खाली मैदानात इतस्ततः विखरून पडले. आपल्या सहकार्‍याची अशी अवस्था पाहून लोक्रियन सैनिक घाबरले.

ते पाहून ग्रीक अश्वत्थामा फिलोक्टॅटेसने एनिअसवर नेम धरून एक बाण सोडला, परंतु तो त्याच्या चिलखताला चाटून गेला. जाता जाता तो मेदॉन नामक एका ट्रोजनाला लागून तो बुरुजावरून खाली कोसळला. आपला मित्र मेला हे पाहून एनिअसने एक धोंडा वरून खालि फिलोक्टॅटेसच्या दिशेने फेकला, परंतु तो त्याला न लागता तोक्साएख्मेस नामक त्याच्या एका सहकार्‍याला लागून त्याची कवटी फुटली अन तो गतप्राण झाला. तेव्हा चिडून फिलोक्टॅटेसने एनिअसला समोरासमोर युद्ध करण्याचे आव्हान दिले, पण एनिअस काही बोलला नाही. त्या दिवशीचे युद्ध लै रेंगाळले. बराच वेळ कुणालाही कसलीच विश्रांती मिळाली नाही.

ओडीसिअसचे जबरी डेरिंग, वेषांतर करून ट्रॉयमध्ये प्रयाण.

इतके युद्ध करूनही ट्रोजन्स काही बधेनात. ग्रीकांना कळायचं बंद झालं. शेवटी शक्तीऐवजी युक्ती वापरावी असा निर्णय घेतला गेला. त्यातच ग्रीकांच्या पथ्यावर पडणारी एक गोष्ट घडली. पॅरिस मेल्यानंतर हेलेनबरोबर लग्न करण्यासाठी हेलेनस आणि डेइफोबस या दोघा भावांमध्ये चुरस सुरू झाली. त्यात डेइफोबससी सरशी झाल्यावर हेलेनस चिडून ट्रॉयच्या बाहेर निघून गेला. हे कळल्याबरोब्बर ओडीसिअसने दबा धरून इडा पर्वताजवळ त्याला पकडले, व त्याची फुल धुलाई करून त्याच्याकडून माहिती काढून घेतली. तोही चांगला भविष्यवेत्ता होता. त्याने सांगितल्याप्रमाणे ट्रॉयमध्ये अथीना देवीचा लाकडी पुतळा (Palladium) जोपर्यंत होता तोपर्यंत ग्रीकांना जय नव्हता.

मग ओडीसिअस वेषांतर करून एका भिकार्‍याच्या वेषात ट्रॉयमध्ये गेला. गेला तो डैर्रेक्ट हेलेनपर्यंतच गेला.

"भिक्षा वाढा हो माई!"

हेलेनने त्याला पाहताक्षणी ओळखले.

"अय्या ओडीसिअस तू! इथे काय करतोयस?"
"चूप गं हेलेन, जरा हळू! ट्रोजनांना कळालं मी इथं आहे तर मला भाजून खातील."
"अरे किती वर्षांनी आपण भेटतोय! इथं ट्रॉयमध्ये इतकी वर्षं राहून आता कंटाळा आलाय. पॅरिसही मेला, मला आता घरची आठवण येतेय."
"बरं मला सांग ते अथीना देवीचं पॅलाडियम कुठंय?"
"...."

ओडीसिअस आणि डायोमीड पॅलाडियम चोरतात.

त्याचा ठावठिकाणा ओडीसिअसने माहिती करून घेतला. हेलेनचे या कामी त्याला चांगलेच सहकार्य मिळाले. वाटेत काही ट्रोजनांना ठार मारून तो परत जहाजांकडे आला. नंतर एका गुप्त मार्गाने ओडीसिअस आणि डायोमीड परत आत शिरले. वाटेतील ट्रोजनांना गुपचूप ठार मारले अन तसेच कुणाला पत्त्या लागू न देता परत जहाजांकडे आले.

ट्रोजन हॉर्स

पॅलाडियम तर चोरलं. आता मुख्य बेत आखायचा होता. इथेही ओडीसिअसच मदतीला धावून आला. त्याने आपली बेरकी युक्ती सांगितली. "ट्रोजनांना गंडवायचं असेल तर मी सांगतो तसं करा. एक मोठ्ठा लाकडी घोडा बनवा आणि त्यात आपले जगातभारी योद्धे आत बसतील अशी व्यवस्था करा. आपण परत ग्रीसला निघून गेलो असे भासवा, सगळे तंबूबिंबू जाळा आणि जवळच्या टेनेडॉस बेटाकडे चला. म्हणजे ट्रोजनांना इथून आपण दिसणारही नाही आणि आपल्याला जवळच बसताही येईल. अन मग ट्रॉयमध्ये आजिबात माहिती नसलेल्या कुणा एका ग्रीकाला घोड्यापाशी ठेवा. त्याच्या अंगात मात्र डेरिंग पाहिजे. ट्रोजनांनी कितीही त्रास दिला तरी त्याने फक्त इतकंच सांगायचं की ग्रीकांनी परतीच्या प्रवासासाठी म्हणून देवांना हा घोडा अर्पण केलाय आणि मला सोडून गेलेत. ट्रोजनांनी तो घोडा ट्रॉय शहरात नेईपर्यंत त्याने त्यांना कन्व्हिन्स केलंच पाहिजे. अन एकदा का तो घोडा ट्रॉयमध्ये गेला, की मग आतले वीर त्यातून उतरून तटबंदीवर चढतील आणि मशालींनी सिग्नल देतील. ते पाहून आम्ही ट्रॉयकडे येऊ अन रात्रीच्या अंधारात शिरून बेसावध ट्रोजनांची चटणी उडवू."

हा प्लॅन ऐकल्यावर सर्व ग्रीकांनी "पॉली काला!" अर्थात "लै भारी" च्या गर्जनांनी आसमंत दुमदुमविला. सर्वांना प्लॅन लैच पसंत पडला होता. काल्खसभट्टाने ओडीसिअसची लैच प्रशंसा केली. पण अकिलीसचा मुलगा निओटॉलेमस मात्र लढाईसाठी अजून फुरफुरतच होता. "लढणे हाच शूरांचा धर्म असतो. ट्रोजनांना घाबरल्यामुळे चालल्यात गमजा गंडवायच्या! अरे सरळ बोला की, घाबरलाय म्हणून!"

यावर ओडीसिअस उत्तरला, "पोरा, लै फुरफुरू नको. तुझा बाप इतका जगातभारी असला तरी त्यालाही ट्रॉय उध्वस्त करणं जमलं नाही. त्यामुळं गप मी सांगतो ते ऐक. काल्खस म्हणतोय तसं आपण आता जहाजांकडे जाऊ आणि इडा पर्वतावरून लाकूडफाटा आणून इथे टाकू. एपियस हा आपल्याकडचा सर्वश्रेष्ठ सुतार आहे, त्याला हा घोडा बनवायला देऊ. तो छान घोडा बनवेल."

तरीही निओटॉलेमस अन फिलोक्टॅटेस दोघेही लढाईसाठी फुरफुरतच होते-त्यांनी आपल्या सैनिकांना ट्रॉयकडे जाण्यास फर्मावले. ते गेलेही असते, पण आकाशात विजांचा लखलखाट झाल्याने हा झ्यूसचा निषेध समजून ते गप्प बसले.

दुसर्‍या दिवशीची पहाट झाली. आगामेम्नॉनने इडा पर्वतावर चपळ लाकूडतोडे पाठवले. त्यांनी मोठी अन छोटी अशी सर्वप्रकारची अनेक झाडे तोडली. ते ओंडके वाहून आणताना खेचरांच्या अन त्यांना आवरता आवरता ग्रीकांच्या पाठी भरून आल्या. एपियसच्या नेतृत्वाखाली काम जोरात सुरू झाले. कोणी ओंडक्यांवरच्या लहानसहान फांद्या छाटू लागले, कुणी ओंडके तासून नीट आकारात आणू लागले तर कोणी त्यांच्या फळ्या बनवू लागले. फळ्यांना रंधा मारून अंमळ गुळगुळीत करू लागले. करवतींच्या आवाजांनी आसमंत भरून गेला. यथावकाश तासलेल्या लाकूडफळ्यांचा ढीग तयार झाला. कुशल एपियसने मग पहिल्यांदा घोड्याचे भक्कम चार पाय तयार केले. नंतर त्याचे पोट अन मागील भाग त्या पायांवर नीट उभा राहील अन पूर्ण चिलखतासकट ग्रीक योद्ध्यांचे वजन पेलू शकेल इतके भक्कम व तेवढेच मोठे बनवले. नंतर मग गळा, डौलदार मान आणि त्याचे डोके हे बनवले. अथीना देवीच्या कृपेने घोडा वट्ट तीन दिवसांत बनून तयार झाला. अन एकदम खर्‍याखुर्‍या घोड्यागत देखणा दिसू लागला. मग एपियसने त्याच्या रक्षणासाठी अथीना देवीची प्रार्थना केली. सर्व ग्रीकांनी तो घोडा पाहून एपियसची लैच प्रशंसा केली. हा एपियस अकिलीस अन पॅट्रोक्लसच्या फ्यूनरल गेम्समध्ये बॉक्सर म्हणून नावाजलेला आहे.

आता घोडा तयार झाला. पण त्या घोड्यापाशी थांबून ट्रोजनांना गंडवणार कोण? हे काम अतिशय महत्त्वाचे होते. याच्या यशावरच ग्रीकांची भिस्त होती. हा फार मोठा जुगार होता. लागला तर जॅकपॉट, पण नै लागला तर क्रॅकपॉटच होणार होता. मग सर्वांना बोलावून ओडीसिअस म्हणाला, "ग्रीकहो, नीट ऐका. हा क्षण हुमदांडगेपणा करण्याचा नाही, तर डोक्याने विचार करण्याचा आहे. धाडस आणि चातुर्याच्या बळावरच आपल्यापेक्षा ताकदवान शत्रूलाही धूळ चारता येते. इतकी वर्षे आपल्या घरादारापासून दूर आपण आलो आहोत ते ट्रॉयचा खातमा करण्यासाठीच. उतावळा विचार केलात, तर मेलात. मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीजण घोड्याच्या आत बसा, एकजण बाहेर थांबेल अन बाकीचे टेनेडॉस बेटावर जा आणि आमची वाट बघा. घोड्याच्या बाहेरच्याचे काम सर्वांत महत्त्वाचे आहे. काही केल्या त्याने ट्रोजनांना आपला खरा हेतू कळू देता कामा नये."

यावर सिनॉन नामक एक ग्रीक शिपाई पुढे आला. "हे इथाकानरेश ओडिसिअस, हे काम मी करीन. जरी त्यांनी माझे हालहाल केले, जरी मला आगीत फेकले, तरी मी त्यांना आपले रहस्य कळू देणार नाही."

सिनॉनच्या या धाडसाची सर्व ग्रीकांनी तोंड भरून प्रशंसा केली. हे काम करायला तयार होणे म्हणजे खरोखर लोकोत्तर धाडसाचेच काम होते.

आता घोड्यात कोणी बसायचे हे ठरणार होते. यवनभीष्म नेस्टॉरने आवाहने केले, "ग्रीकहो, आपल्या पराक्रमाला सिद्ध करण्याची याहून अधिक चांगली संधी ती कुठली असणार? मी अजून तरणा असतो तर मीही बसलो असतो. पण माझं वय झालं, ती ताकद नाही राहिली आता."

त्यावर अकिलीसच्या मुलाने-निओटॉलेमसने त्याची प्रशंसा केली आणि घोड्यात बसणार्‍यांपैकी पहिला व्हॉलंटिअर आपण असल्याचे जाहीर केले. नेस्टॉर त्याला कौतुकाने म्हणाला, "अगदी बापाचा पोरगा शोभतोस खरा!" मग त्यांत अजून जरा परस्परस्तुती होऊन निओटॉलेमस त्या घोड्यात जाऊन बसला. पाठोपाठ अनेक ग्रीक वीर त्यात जाऊन बसले. क्विंटस स्मिर्नियसप्रमाणे ट्रोजन हॉर्समध्ये शिरलेले ग्रीक खालीलप्रमाणे:

अकिलीसपुत्र निओटॉलेमस,मेनेलॉस, ओडीसिअस, स्थेनेलस, डायोमीड, ग्रीक अश्वत्थामा फिलोक्टॅटेस, मेनेस्थेउस, अँटिक्लस, थोआस, पॉलिपोएतेस, धाकटा अजॅक्स, युरिपिलस, नेस्टॉरपुत्र थ्रासीमिदेस, क्रीटाधिपती इडोमेनिअस, मेरिओनेस, वैद्यराज अन भालाईत पॉदालिरियस, युरिमॅखस, थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ धनुर्धारी ट्यूसर, इआल्मेनस, थाल्पियस, अँटिमाखस, लेओन्तेउस, युमेलस, युरिआलस, अँफिमाखस, देमोफून, आगापेनॉर, अकॅमस, मेगेस, अन घोडा बनवणारे सुतारभौ बॉक्सर एपियस.

(काही ठिकाणी ३०, काही ठिकाणी ५० तर नंतर स्टँडर्डाईझ्ड लिस्ट मध्ये ४० अशी संख्या दिलेली आहे.)

एपियसलाच ठाऊक होते की घोड्यात ओपनिंग कुठे आहेत आणि कसे खोलता येईल इ.इ. त्यामुळे तो सर्वांत शेवटी चढला आणि त्याने आपल्यामागे घोड्याचा दरवाजा बंद केला.

(मिकोनॉस नामक बेटात सापडलेला हा बुधला. इसपू ६७०.)

मग बाकीचे ग्रीक सैन्य कामाला लागले. लगबगीने आपले तळ गुंडाळले, तंबूंना आगी लावल्या आणि जहाजांत बसून आगामेम्नॉन व नेस्टॉर यांच्या अध्यक्षतेखाली टेनेडॉस बंदरात पोहोचले व ग्रीक सैन्याकडून सिग्नल कधी येतो याची शांतपणे पण अधीरपणे वाट बघत बसले.

ट्रोजन हॉर्स ट्रॉयमध्ये नेला जातो. लाओकून अन कसांड्राचा संशय व अपशकुन.

इकडे ट्रोजनांनी हेलेस्पाँट खाडीजवळ धूर येत असलेला पाहिला. पण काय आश्चर्य! रोज त्यांच्या काळजात धडकी भरवणारी शेकडो ग्रीक जहाजे आज कुठेच दिसत नव्हती. एक मोठ्ठा लाकडी घोडा आणि त्याजवळ एक गरीब भासणारा एक ग्रीक शिपाई तेवढे शिल्लक होते. परम आश्चर्य वाटूनही ते जस्ट इन केस म्हणून सशस्त्रच घोड्याकडे गेले. सिनॉनला पाहताक्षणी ट्रोजनांनी त्याच्याभोवती कडे करून त्याला ग्रीकांबद्दल विचारले. सुरुवातीला सरळपणे विचारले अन नंतर धमक्या देणे सुरू केले तरी त्याचा आपला एकच हेका सुरू. आगीचे चटके दिले, चाबकाचे फटकारे दिले, नाकातून रक्त काढले तरीही तो एकच सांगत राहिला-"ग्रीक सैन्य ट्रॉय सोडून गेलेय अन परतीच्या प्रवासासाठी त्यांनी हे पोसायडन देवाला अर्पण केलेय. हा सगळा ओडीसिअसचा बेत आहे. मलाही बळीच देणार होते पण मी तिथून कसाबसा पळालो अन इथे आलो."

अखेरीस त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. पण लाओकून नाकम ट्रोजनाला संशय आला होता. "हे फार मोठं फ्रॉड आहे! हरामखोर ग्रीक इतक्या सहजासहजी ट्रॉय सोडून जाऊच शकत नाहीत. हा घोडा लौकरात लौकर जाळून टाका!" असे म्हणत असताना जणू देवीचा कोप व्हावा तसे झाले अन अचानक लाओकून आंधळा झाला. त्याची ती अवस्था बघून ट्रोजनांना त्याची दया आली. सिनॉनलाही त्यांनी ट्रॉयमध्ये आत नेले. लाकडी घोड्याच्या पायांखाली एपियसने लाकडी रोलर्स अगोदरच बसवले होते, त्यामुळे दोरखंड लावून त्याला ट्रॉयमध्ये ओढत नेताना ट्रोजनांना कसलीच अडचण पडली नाही. त्यांनी तो घोडा ट्रॉयमध्ये नेला, फुलांच्या माळांनी तो सजवला. ट्रोजन स्त्रियांनी आनंदाच्या चीत्कारांनी त्याचे शहरात स्वागत केले.

(लाओकून आणि त्याचे दोन मुलगे.)

पण तरीही लाओकून ओरडून सांगतच होता की घोड्याला जाळून टाका म्हणून. त्या घोड्याभोवती जमलेल्या गर्दीत अचानक दोन साप आले आणि त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली.सगळे ट्रोजन्स सैरावैरा पळू लागले आणि फक्त लाओकून व त्याचे दोन मुलगे एवढेच तिथे राहिले. सापांनी दोघा मुलांना दंश करून खाऊन टाकले अन ते आले तसे गुप्त झाले. सर्व ट्रोजन्सना कळायचं बंद झालं. ते घाबरून गट्ट झाले. लाओकून पुरता स्तंभित झाला होता. त्याच्या अश्रूंना खळ नव्हता. मग ट्रोजनांनी त्यांचं थडगं बांधलं आणि लाओकूनसकट सर्व ट्रोजन्स तिथे विलाप करू लागले.

आता इथे असा शोक चालला असताना बाहेर सर्व अपशकुन होत होते, पण आत ट्रोजनांना त्याची गंधवार्ताही नव्हती. त्यांनी जोशात अपोलोला बळी अर्पण करण्याचा सपाटा लावला खरा, पण आज त्यांचं काही खरं नव्हतं. वाईन अर्पण केली तर तिचं रक्त झालं, देवाच्या मूर्तीतून रक्त येऊ लागलं. हे अपशकुन पाहून अर्व ट्रोजन विलाप करू लागले. आकाशात ढग नसतानाही तार्‍यांभोवती आवरण तयार झाले. कोल्हे व लांडगे ट्रॉयच्या दरवाजांजवळ येऊन रडू लागले. वातावरण मोठं भेसूर झालं होतं.

पण प्रिआमची मुलगी कसांड्रा बधली नाही. तिने सर्व ट्रोजनांना शिव्या घातल्या, "मूर्खांनो, तुम्हांला इतकीही अक्कल कशी काय नाही? तो ग्रीक घोडा आत गावात आणल्यामुळेच एवढे सगळे अपशकुन होताहेत हे तुम्हांला कळत कसं नाही? तुम्हीस अर्वजण फुकट मरणार."

हे ऐकून एक ट्रोजन तिला म्हणाला, "आली मोठी शहाणपणा सांगणारी. तुला काय कळतं गं याच्यातलं? तो लाओकूनही असाच ओरडत होता, त्याचं काय झालं पाहिलंस ना?" त्यापाठोपाठ अनेक ट्रोजनांनी शिव्या घालून तिला गप्प केले. घोड्यात बसलेल्या ग्रीकांना आनंद झाला, पण त्याचबरोबर कसांड्राला आपला बेत कसा कळाला याचे आश्चर्यही वाटले.

आपले कोणीच ऐकत नाही हे पाहून कसांड्रा तिथून पळत सुटली आणि अथीनाच्या देवळात जाऊन बसली.

ट्रॉयचा विनाश.

ग्रीक सैन्य अखेर ट्रॉयपर्यंत पोचते आणि गाफील ट्रोजनांच्या कत्तलीचा सपाटा सुरू होतो.

लाओकून आणि कसांड्रा यांच्या सुचवणीनंतरही ट्रोजन्स त्यांच्याकडे लक्ष न देता नाचगाणे-मेजवानीत दंग होऊन गेले. "मूर्ख ग्रीक अखेर एकदाचे पळाले!" म्हणत वाईनचे अँफोरेच्या अँफोरे रिचवले जाऊ लागले. अख्खे ट्रॉय शहर फुल झिंगून झोपले.

तेव्हा सिनॉनने ट्रॉयच्या तटबंदीवर जाऊन मशाल पेटवून टेनेडॉस बेटात बसलेल्या ग्रीकांना संदेश दिला. ग्रीक सैन्य लगबगीने जहाजे वल्हवू लागले. सिनॉनने हळूच मग ट्रोजन हॉर्स ऊर्फ लाकडी घोड्यात बसलेल्या ग्रीक सेनापतींना हाका मारल्या. पहिल्यांदा घोड्याच्या फासळ्यांतून ओडीसिअस बाहेर आला. त्याबरोबर लढाईस आतुर असलेले बाकीचे लोकही उतरले आणि लगबगीने दरवाजांकडे गेले. झोपा काढत असलेल्या द्वारपालांना ठार मारले आणि तिथले मोर्चे सांभाळले.

काही वेळाने ग्रीक सैन्यही टेनेडॉस बेटाकडून ट्रॉयच्या किनारी लागले. हळूहळू जहाजांमधून बाहेर येत गुपचूप ट्रॉयपर्यंत पोचले. ट्रोजन हॉर्समधील लोकांनी अगोदरच ट्रॉयमध्ये पेटवापेटवी सुरू केलेली होती, त्यात परत यांनीही दंगा सुरू केला. हजारोंच्या संख्येने ट्रोजन्स मरू लागले. त्यांच्या प्रेतांचा जमिनीवर खच पडला होता. कुणाचे डोकेच धडावेगळे केले होते, तर कुणाची आतडी बाहेर आलेली होती. स्त्रीपुरुष, म्हातारेकोतारे, लहाण बाळे- कुणाचीही त्या विनाशातून सुटका नव्हती. त्यांच्या करुण किंकाळ्यांनी ट्रॉय दुमदुमले. इकडे ट्रोजनांनीही तोपर्यंत काही ग्रीकांना ठार मारलेले होते. पण प्रत्येक ग्रीकाने रात्रीच्या अंधारात नीट दिसावे म्हणून हातात मशाल घेतलेली असल्याने ट्रॉयभर नुसते आगीचे साम्राज्य होते.

त्या हल्ल्यात डायोमीडने कोरोएबस, युरिडॅमस, इलिओनेउस आणि युरिकून या चारांना ठार मारले. धाकट्या अजॅक्सने अँफिमेदॉनला मारले, तर आगामेम्नॉनने दामास्तर नामक ट्रोजनाच्या पुत्रास हेदिससदनी पाठविले. क्रीटाधिपती इडोमेनियसने मिमास याला तर मेगेसने देइओपितेस या ट्रोजनाला ठार मारले.

ट्रॉयनरेश प्रिआमचा अंत.

अकिलीसपुत्र निओटॉलेमसने पॅम्मॉन, पॉलितेस व अँटिफोनस या प्रिआमपुत्रांना ठार मारले. आगेनॉर नामक ट्रोजन योद्ध्यासही मारले. अखेरीस तो ट्रॉयचा वृद्ध राजा प्रिआमसमोर आला. प्रिआमने त्याला बघताक्षणी ओळखले अन म्हणाला,"हे अकिलीसपुत्रा, मला ठार मार अन या जगण्यातून माझी मुक्तता कर. माझ्या डोळ्यांदेखत माझे मुलगे मेले, माझे राज्यही गेले. आता जगायची मला आजिबात इच्छा नाही. उगीच दया वगैरे दाखवू नकोस."

हे ऐकून निओटॉलेमसने तलवारीच्या एका फटक्यात प्रिआमचे डोके धडावेगळे केले. ते गडगडत जाऊन दुसरीकडे पडले. त्याचे ओठ अजूनही हलत होते. प्रिआमचे धड तसेच अन्य ट्रोजनांच्या गर्दीत जाऊन पडले. तलवारीच्या एका घावानिशी ट्रॉयसारख्या महाशक्तिशाली नगरीचा राजा प्रिआम झ्यूसला प्यारा झाला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

हेक्टरपत्नी अन हेक्टरपुत्राची दयनीय दशा.

हेक्टरपत्नी अँद्रोमाखी अन हेक्टरपुत्र अ‍ॅस्टियनिक्स हे दोघेही दिसताच निओटॉलेमसने अ‍ॅस्टियनिक्सला खसकन आईपासून ओढून वेगळे काढले. तो अजून लहान बाळ होता, धड रांगतही नव्हता. त्याला निओटॉलेमसने ट्रॉयच्या तटावरून खाली फेकले. पुढे तो मोठा झाला तर बापाचा बदला घेण्याचा नक्की प्रयत्न करेल, ती ब्याद नको म्हणून आत्ताच उचललेले हे पाऊल! धड सूर्यही न पाहिलेली अशी शेकडो बाळे तेव्हा मारली गेली. अ‍ॅस्टियनिक्सचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर अँद्रोमाखी अतीव दु:खाने शोक करू लागली. नवरा मेला, आता मुलगाही मेल्यावर तिची अवस्था निव्वळ दयनीय झाली होती. पण तिला विचारतो कोण? तत्कालीन रिवाजाप्रमाणे निओटॉलेमसला ती बहाल करण्यात आली.

असा विध्वंस चाललेला असताना अँटेनॉर नामक ट्रोजन योद्ध्याच्या महालाजवळ ग्रीक सैन्य आले. त्याला मात्र ग्रीकांनी जिवंत सोडले, कारण पूर्वी मेनेलॉस अन ओडीसिअसची योग्य खातिरदारी त्यानेच केलेली होती. एनिअस हा ट्रोजनही आपल्या वृद्ध बापाला खांद्यावर घेऊन, तसेच छोट्या मुलाचा हात धरून जिवाच्या कराराने तिथून निसटला.

हेलेन मेनेलॉसला परत मिळते.

हेलेनच्या महालाजवळ मेनेलॉस गेला असता त्याला हेलेनचा नवा पती डेइफोबस दिसला. त्याला खच्चून शिव्या घालून त्याने भाल्याने ठार मारले. नंतर त्याला हेलेन दिसली. इतक्या वर्षांनी तिला पाहताना मेनेलॉसची प्रथम प्रतिक्रिया तिला ठार मारावे अशीच होती. साहजिकच आहे म्हणा, गेली दहा वर्षे इतकी उरस्फोड करावी लागली ते कारण समोर दिसल्यावर तसे वाटणारच. पण तिचे सौंदर्य पाहून गडी पाघळला. त्यात परत आगामेम्नॉननेही त्याची समजूत काढली,"नको मारूस तिला. लग्नाच्या बायकोला मारणे बरोबर नाही. दोष तिचा नव्हता, तर त्या पापी पॅरिसचा होता. तो विव्हळत मेलाय तेव्हा राग आवर."

कसांड्रावर धाकटा अजॅक्स बलात्कार करतो.

(पाँपेई येथील चित्र, इ.स. पहिले शतक)

इकडे ट्रॉयचा असा विनाश चाललेला असताना प्रिआमची मुलगी कसांड्रा अथीना देवीच्या देवळात आर्ततेने प्रार्थना करीत बसली होती.तिला बघून कामज्वराने पागल झालेल्या धाकट्या अजॅक्सने तिच्यावर देवळातच बलात्कार केला. ग्रीक त्यावर लै चिडले, पण अथीनाच्या मूर्तीची कसम वैग्रे दिल्याने शांत झाले, नैतर तो तिथल्या तिथेच मेला असता. हा प्रसंग ट्रोजन युद्धाच्या अतिशय प्रसिद्ध आख्यानांपैकी एक आहे.

ग्रीकांनी कैक ट्रोजन स्त्रिया स्वतःसाठी गुलाम म्हणून ठेवून घेतल्या. असले जिणे नको म्हणून कैकांनी आपल्या बायकापोरांना स्वतः ठार मारून मग आत्महत्या केली. अनेक स्त्रिया भयाने इतस्ततः पळत सुटल्या होत्या, त्यांना घरीच राहिलेल्या बाळांची आठवण आली तेव्हा घरे जळू लागली होती. बाळांबरोबर मग त्याही अग्निसात झाल्या. आगीत जळालेल्या आपल्या बायकापोरांची नावे आळवत कैक ट्रोजन पुरुष इकडे तिकडे फिरू लागले. कैक जण भाजून तसेच मरण पावले.

प्रिआमची मुलगी लाओदिकी हिने गुलामीचे जिणे जगण्यापेक्षा भूमी दुभंग होवो अशी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेला यश येऊन भूमीने तिला आपल्यात सामावून घेतले.

आणि अशाप्रकारे एकेकाळी अख्ख्या जगात सर्वशक्तिमान असलेले ट्रॉय नगर दहा वर्षांच्या वेढ्यानंतर भस्मसात अन बेचिराख झाले.

(क्रमशः)

मांडणीविचार

प्रतिक्रिया

तिमा's picture

12 Mar 2014 - 8:31 pm | तिमा

हे शेवटचे वर्णन ऐकून मति गुंग झाली.
लेखन एकदम पॉली काला! का कुणास ठाऊक, पण लहानपणापासून ही स्टोरी ऐकल्यावर ट्रोजनांविषयी कायम सहानुभूति वाटली होती.
आत्ता हे वाचताना देखील ग्रीक हरावेत असेच वाटत होते.

चित्रगुप्त's picture

12 Mar 2014 - 9:02 pm | चित्रगुप्त

वा छान.
आता सावकाशीने वाचतो.
यावेळी खूपशी चित्रे टाकलीत हे फार आवडले. लाओकूनचे शिल्प मिशेलअँजेलोच्या सांगण्यावरून पोपने व्हॅटिकनसाठी घेतले होते, असे वाचल्याचे आठवते.
आत्ताच नवा "३०० राईज ऑफ अ‍ॅन एम्पायर" बघून आलो. जबरदस्त आहे.

टिका झाली. यावेळी ती कसर सर्वकश सूत्रधार हुशारिने अथेनियं दाखवून भरुन काढली .

बाकी स्ट्राइक ब्याक सिरिअल मधेच यातील हिरोने प्रचंड दंगा केल्या असल्याने हां300 बघ्णार्च होतो. अन्यथा तोंडात मावा दाबुन ठेवल्या प्रमाने डोय्लोग बोलताना चेहरा करणारा हिरोंचे चित्रपट तसेही फ़ाट्यावरच मारल्या असता

प्रचेतस's picture

12 Mar 2014 - 9:17 pm | प्रचेतस

जबरदस्त.
कत्तलीचे वर्णन लै भयानक आहे.
अश्वत्थाम्याने केलेल्या रात्रीच्या कत्तलीची आठवण झाली. ह्या ट्रोजन हॉर्सच्या लढाईत ग्रीकांची कितपत हानी झाली? ग्रीकआंचे कोणी नामवंत सेनानी ह्या लढाईत मारले गेल्याचे दिसले नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Mar 2014 - 9:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा भागही जबरदस्त !!!

भरपूर चित्रांनी अजून जास्त मजा आली ! पुभाप्र.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2014 - 10:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जबरदस्त...!!!

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 10:57 pm | आत्मशून्य

फारच भयानक रक्तपात. ट्रोजन हॉर्स मात्र निव्वळ अफलातुन.

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 1:54 am | बॅटमॅन

तिमा सरः बहुत धन्यवाद! ट्रोजनांबद्दल सहानुभूतीच वाटते खरी. पण यापुढच्या भागात ग्रीकांची कशी वाताहत झाली ते तपशीलवारपणे येणारच आहे.

चित्रगुप्तः धन्यवाद! लाओकूनबद्दल सहमत आहे. बरीचशी चित्रे टाकली कारण हा कथाभाग सर्वांत फेमस अन इन्स्पिरेशनल आहे.

३००-राईज ऑफ अ‍ॅन एंपायर मीही आजच पाहून आलो. पूर्ण पिच्चरभर किमान २०००-३००० लिटर रक्त सांडलेले आहे. तसा चांगला, पण मूळ इतिहास थोडा वाचल्याने त्यातल्या असंख्य अतिढोबळ चुका डोक्यात गेल्या. त्या सर्व लढायांबद्दल तपशीलवारपणे लिहावयाचे म्हणजे ट्रोजन युद्धासारखीच मोठी एक ग्रीको-पर्शियन युद्धाची सेरीज होईल. वेळ मिळेल तेव्हा तो इतिहास जमेल तसा मांडायचा विचार आहे.

आत्मशून्यः धन्यवाद!

वल्ली: धन्यवाद! या लढाईत ग्रीकांचे कोणी महत्त्वाचे माणूस मेले नाही. त्यांची मनुष्यहानी पुढील भागात विस्ताराने येईल. अश्वत्थाम्याने केलेल्या कत्तलीचे वर्णन आता मुळातून वाचावयाची इच्छा झालीये. :)

मन उधाण वार्याचे अन इस्पीकचा एक्का: भौत धन्यवाद :)

प्रचेतस's picture

13 Mar 2014 - 9:06 am | प्रचेतस

धन्स रे.
पुढच्या भागाबद्दल लैच उत्सुकता आहे.
अश्वत्थाम्याने कत्तलीचे वर्णन इथे वाच.
http://sacred-texts.com/hin/m10/m10008.htm

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 12:19 pm | बॅटमॅन

परफेक्ट मॅच आहे. अगदी अस्सेच.

प्रचेतस's picture

13 Mar 2014 - 12:35 pm | प्रचेतस

:)

भयानक कत्तल आहे. तिथेही आणि इथेही.

अजया's picture

13 Mar 2014 - 9:59 am | अजया

पु.भा. प्र.

मंदार दिलीप जोशी's picture

13 Mar 2014 - 10:41 am | मंदार दिलीप जोशी

नेहेमीप्रमाणेच अप्रतीम. पुढचा भाग लवकर आणा पाहू :)

मस्त वाटले सकाळी सकाळी वाचन करुन हे.

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 11:34 am | बॅटमॅन

अजया आणि मंदारः धन्यवाद :)

मीता's picture

13 Mar 2014 - 12:46 pm | मीता

एकदम भारी झाली आहे लेखमाला .

इरसाल's picture

13 Mar 2014 - 1:09 pm | इरसाल

पुन्हा एकदा लै भारी.
जरा लव्कर लवकर टाका भाग. नायतर मौसम तुटतो ना भौ !
लेखचित्रमाला जबराट

जाम भारी चालु आहे लेखमाला...एक-एक वर्णन अगदी चित्तथरारक आहेत... होऊ दे लिखाण!

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 4:16 pm | पिलीयन रायडर

मी तुझे सगळे लेख एकदमच काय ते वाचणार आहे हे सांगायला हा प्रतिसाद...

युद्धात कोणी कुणाला कसे मारले, वगैरे इतके तपशीलवार वर्णन कसे काय उपलब्ध झाले असेल? की हे सर्व कल्पनेने लिहिलेले असेल? या सर्व घटना खरोखर घडलेल्या आहेत का?

या सर्व घटना खरोखर घडलेल्या आहेत का?

सद्यस्थितीत धडपणे काही सांगता येणार नाही.

पण एका दुसर्‍या सारख्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. ट्रॉय, महाभारत, इ. गोष्टी लैच जुन्या, सुमारे ३००० वर्षांपूर्वीच्या. तुलनेने शिवाजीमहाराज अगदी परवापरवाचे. त्यांच्या वेळचे जे काव्य उपलब्ध आहे- विशेषतः पोवाडे- त्यात बर्‍यापैकी तपशीलवार वर्णन सापडते. त्यामुळे सर्व काही अगदीच काल्पनिक असेल असे म्हणवत नाही.

निव्वळ तपशील जास्त आहेत म्हणून काल्पनिक नाही असेही नाही. लॉर्ड ऑफ द रिंग्ज काय नैतर हॅरी पॉटर काय, सगळे काल्पनिक पण प्रचंड तपशीलवार. पण ट्रोजन युद्धाशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे सापडलेले आहेत, तस्मात कल्पना नसावी असे वाटते.

तत्कालीन प्रथेप्रमाणे मोरल बूस्टर म्हणून २-४ शाहीरही सैन्याबरोबर असावेत असे वाटते. त्यांनी काही कवने एकदम फ्रेशलि रचली असावीत अन मग तीच पुढे कंटिन्यू झाली असावीत. अर्थातच त्यात कल्पनेचे मिश्रण असणारच, उदा. एखाद्या कवितेतले कच्चे दुवे म्ह. अनएक्स्प्लेन्ड भाग काही वर्षांनी पुढच्या पिढीला उमगले की मग त्यांचे काव्यात्मक स्पष्टीकरण करणे इ.इ. प्रकार सुरू होऊन काही नावे घुसडली गेली असणे अगदी शक्य आहे. पण किमान मुख्य वर्णने तरी कन्सिस्टंट असावयास हरकत नसावी असे वाटते.

इशा१२३'s picture

13 Mar 2014 - 6:03 pm | इशा१२३

ट्रोय पुर्ण नष्ट झाले....पण तिथे गाडल्या गेलेल्या अगणित सोन्यासाठी ,खजिन्यासाठी उत्खनन होउन असंख्य वस्तू,.सोन्याचे मुखवटे,हिरे इ.सापडले.यातील बरेचसे अथेन्स(अ‍ॅगामेम्नन चा सुवर्णमुखवटा दखील) म्युझियम मधे आहे.एवढे वैभवशाली रज्याची वाताहत वाचुन कसेसेच वाटले.बाकी ट्रोयच्या शोधासंदर्भात तपशील वार माहीती असल्यास जरुर लिहा.

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 6:13 pm | बॅटमॅन

धन्यवाद इशा. :)

ही लेखमाला आत्ता ४०% पूर्ण झालीये फक्त. यानंतर ग्रीक लीडर्स घरी परत जाणे, ओडीसिअसचा १० वर्षांचा प्रवास हे येईल. हे झाल्यावर कथाभाग संपेल.

कथाभाग संपला, की मग तुम्ही म्हणताहात ते उत्खनन इ.सगळेच येईल. तसा बराच वेळ लागेल या सर्वांना, पण येईल हे नक्की.
हेन्रिख श्लीमान, विलियम डोर्पफेल्ड, कार्ल ब्लेगन, आर्थुर ईव्हान्स या चार लोकांचे काम जमेल तितक्या डीटेलमध्ये देण्याचा विचार आहे.

पिलीयन रायडर's picture

14 Mar 2014 - 5:46 pm | पिलीयन रायडर

४० % आहे हे एवढं??? बापरे.. मग मी आत्तच वाचायला सुरु करते..

:)

तरी यू आर इन लक, आत्ता वाचणे सुरू केले तर कमीतकमी एक पूर्ण स्टोरी एकसंध वाचायला मिळेल ते एक बरेच आहे. यापुढे रिटर्न्स आणि ओडिसी हा कथाभाग वेगळा आहे.

विवेकपटाईत's picture

13 Mar 2014 - 7:58 pm | विवेकपटाईत

कुणाला ही कीव येईल पण त्या काळी असंच चालायचे. प्रभास क्षेत्री सर्व यादव ही असेच नष्ट झाले होते. त्यांच्या बायका पोरांना अहीर लुटारूंनी आपल्या ताब्यात घेतल......बाकी कथा सुंदर रंगविली आहे....

drsunilahirrao's picture

14 Mar 2014 - 6:38 pm | drsunilahirrao

सुरेख, उत्कंठावर्धक !

शुभेच्छा!

अर्धवटराव's picture

14 Mar 2014 - 6:49 pm | अर्धवटराव

एका नादान राजकुमारापाई हकनाक बळी गेला एव्हढ्या सुंदर राज्याचा :(
आणि बॅट्या तर अगदी संजय बनुन युद्धाचं वर्णन करतो. आता ग्रीकांची वाट कशी लागली याची उत्सुकता लागली आहे.

एका नादान राजकुमारापाई हकनाक बळी गेला एव्हढ्या सुंदर राज्याचा

यावर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. म्हणजे समजा पॅरिसने हेलनीस पळवले नसते, तर हे युद्ध झालेच नसते का? की युद्धाची अन्य कारणेही होतीच, त्यात हेलनचे अपहरण एक निमित्त घडले, असे आहे ?

महाभारताप्रमाणेच विविध घटनांची कारणमीमासा दैवी शाप-वरदान उदा. पॅरिसने आफ्रोदितीची निवड करणे वगैरे होमरच्या काव्यात आहे का?
जजमेंट ऑफ पॅरिस हा चित्रकारांचा आवडता विष्यः

.
१. चित्रकारः Sandro Botticelli (1445–1510)

.
२. चित्रकारः George Frederick Folingsby (1828 – 1891, Irish)

,
३. चित्रकारः Claude Lorrain, c. 1645-1646

.
४. चित्रकारः John Flaxman (1755 – 1826).

.
५. चित्रकारः Angelica Kauffman (1741–1807)

ग्रीक पुराणकथांवरील अनेक सुंदर रेखाचित्रे खालील दुव्यावर बघा:
http://www.maicar.com/GML/000PhotoArchive/ScenesIliad/index.html

रेखाचित्रांच्या दुव्याबद्दल अनेक आभार.

जजमेंट ऑफ पॅरिस हे आदिकारण म्हणून मानले जातेच. युद्धाचे दैवी स्पष्टीकरण म्हणून ते सांगतातच. तदुपरि हेलेन हे एक निमित्त ठरले असे म्हणायला वाव आहे खराच. ग्रीसवर राज्य करणारे मायसीनी इथले ग्रीक राज्य (आगामेम्नॉनचा राजवंश), तुर्कीच्या पश्चिम किनार्‍यावरील शहरांचे एक फेडरेशन आणि मुख्य तुर्कीवर वर्चस्व असलेले हिटाईट साम्राज्य यांमध्ये कायम लढाया होत असत. तशा समकालीन लिखित नोंदी आहेत.

त्यांपैकीच एक लढाई म्हणजे ही असावी-रादर लै लांबलेले युद्ध असावे. त्यासंबंधी कैक विखुरलेले पुरावे सापडतात पण एकच एक युद्धाबद्दल असे सापडत नाहीत. तत्कालीन राजकीय परिस्थितीसंदर्भात पाहिल्यास, ट्रॉयचे लोकेशन अतिशय मोक्याचे होते. समुद्र तिथे अगदी अरुंद होता आणि त्यामुळे ब्लॅक सी मध्ये जाणार्‍या सर्व जहाजांपासून टोल टॅक्स इ. घेऊन ट्रॉय अतिशय प्रबळ झाले होते. त्या ट्रेड रूटवर कब्जा करणे हे महत्त्वाचे कारण त्यामागे असू शकते. हेलेनचे निमित्त पुढे करून तिथे अख्ख्या ग्रीसची आर्मी ओतून त्यावर कब्जा करणे हा उद्देश बर्‍यापैकी पटण्यासारखा वाटतो.

त्या परिसरात अविरत चाललेल्या उत्खननाचा परिणाम म्हणून समकालीन शेकडो लिखित पुरावे सापडलेले आहेत. हिटाईट साम्राज्याचे अख्खे फॉरेन करस्पाँडन्स आर्काईव्ह सापडले आहे. तिथे ग्रीसबरोबरच्या कैक मिशन्सचा लेखाजोखा दिलेला आहे. ट्रोजन लेखमालेच्या अखेरच्या पर्वात याचा शक्य तितक्या डीटेलवारी समावेश केला जाईल.

सध्या इतकेच सांगतो, की पॅरिस, प्रिआम यांच्या नावाचे लिखित पुरावे शिलालेखांतून सापडलेले आहेत. एतेओक्लेस नामक एक राजा, झालंच तर खुद्द आगामेम्नॉनच्या बापाच्या-आत्रेउसच्या नावाचे शिलालेखही सापडलेले आहेत.

इजिप्तमध्ये तिथल्या देवळांच्या शिलालेखांतून समुद्री चाच्यांमध्ये ग्रीकांचे नावही आहे. अन सरतेशेवटी खुद्द ग्रीसभर लिनिअर बी लिपीत अन मायसीनियन ग्रीक भाषेत लिहिलेल्या मातीच्या टॅबलेट्समधून तत्कालीन देवांची, सर्वसामान्य नागरिकांची अन गुलामांची नावेही कैक सापडतात. हे देव म्हणजे झ्यूस, अथीना, अपोलो, इ. च आहेत. अन तत्कालीन नावांत एका धनगराचे 'अकिलीस' नावही सापडते. त्यावरून ते तत्कालीन खरेच नाव होते याची खात्री पटते.

ट्रोजन युद्धाचा तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या संदर्भात आढावा पुढे एकदा घेतला जाईल तेव्हा हे सर्व मुद्दे ब्रीफलि तिथे येतीलच.

इशा१२३'s picture

14 Mar 2014 - 7:01 pm | इशा१२३

म्हणजे अजून भरपूर वाचायला मिळनार..मस्तच...पु.भा.प्र..
.

सस्नेह's picture

16 Mar 2014 - 5:15 pm | सस्नेह

वाचून पानिपताची आठवण आली.

अर्धवटराव अन स्नेहांकिता: धन्यवाद! अजून पुष्कळ म्हणजे पुष्कळ बाकी आहे, लौकरच सादर केल्या जाईल. :)

विवेकपटाईत अन सुनील अहिरराव: बहुत धन्यवाद!

पैसा's picture

28 Mar 2014 - 6:08 pm | पैसा

सगळी कत्तल वाचताना शहारे येत होते. हेलनमुळे ट्रॉयचा विनाश झाला याची तुलना महाभारत आणि रामायणातील द्रौपदीचा अपमान आणि सीताहरण यांच्याशी केलेली वाचली आहे. पण हेलन पॅरिस जिवंत असेपर्यंत खुशीने ट्रॉयमधे रहात होती असं दिसतं. सीता आणि द्रौपदी यांची हेलनबरोबर तुलना होऊ शकत नाही.

बॅटमॅन's picture

28 Mar 2014 - 6:50 pm | बॅटमॅन

बहुत धन्यवाद!

हेलनला फारसा विधिनिषेध असल्याचे दिसत नाही हे तर खरेच आहे. ट्रोजन हॉर्समधील वीरांना तिने गाईड केले असाही एक उल्लेख आहे, पण तो तितका विश्वसनीय न वाटल्याने इन्क्लूड केला नाही.

सीता अन द्रौपदीची केस जरा वेगळी आहे.

जेपी's picture

27 Sep 2014 - 7:05 pm | जेपी

पुढचा भाग कधी ????????????????????????????????????????????

प्रसाद गोडबोले's picture

24 Sep 2015 - 4:51 pm | प्रसाद गोडबोले

पुढे काय झाले ?

बाकीचं वर्णन तर काय सांगणार? पाॅली काला!ही आख्खी सीरिजच पाॅली काला झालेली आहे.

पद्मावति's picture

25 Sep 2015 - 5:48 pm | पद्मावति

अप्रतिम लेखमालीका.
काल हा धागा वरती आल्यापासून एका मागोमाग एक असे सर्व भाग वाचून काढले. अफाट डीटेलिंग. ट्रोजन युद्धाविषयी इतक्या व्यापक प्रमाणावर माहिती मी तरी कधीच ऐकलेली, वाचलेली नव्हती. ही प्रचंड माहिती इतक्या इण्टरेस्टिंग लेखन शैलीत आमच्या समोर सादर केल्याबद्दल बॅटमॅन तुमचे खुप आभार. खिळवून टाकणारं चित्रदर्शी वर्णन. शेवटी ट्रॉय चा नाशाचं वर्णन वाचून तर खुप हळहळ वाटली.
पुढचा भाग वाचण्याची खूप उत्सुकता लागलीय.

बॅटमॅन's picture

25 Sep 2015 - 7:22 pm | बॅटमॅन

जेपी, प्रगो, बोकाशेठ अन पद्मावति: अनेक अनेक आभार!!!!

पुढच्या भागांकरिताचे मट्रियल तयार आहे, परंतु आंजावर लिहिण्याचा प्लॅन सध्या तरी नाही. नीट काय ते ठरले की नक्कीच कळवेन.

प्रचेतस's picture

25 Sep 2015 - 7:43 pm | प्रचेतस

खाटुक सरांनी लेखमाला अशी अर्धवट सोडू नये, त्यांनी परत लिहितं व्हावं अशी त्यांना त्यांच्या समस्त चाहत्यांतर्फ़े आग्रहाची विनंती.

चित्रगुप्त's picture

25 Sep 2015 - 8:49 pm | चित्रगुप्त

ट्रोजन युद्धाचा तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या संदर्भात आढावा पुढे एकदा घेतला जाईल

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. आता मनावर घ्याच पंत.

.
हेलनचे अपहरण

नया है वह's picture

29 Jun 2017 - 4:20 pm | नया है वह

अप्रतिम लेखमालीका+११११

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2020 - 1:54 am | अमरेंद्र बाहुबली

सर्व भाग वाचले. लै भारी