क्रोमबुक्स - एक झलक...

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
23 Feb 2014 - 10:01 pm

लॅपटॉपची खरेदी करताना त्यासाठीची संगणक प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) म्हणजे विंडोज असे समीकरणच आपल्या मनात पक्के झालेले असते. मात्र मायक्रोसॉफ्टच्या स्पर्धकांचे या क्षेत्रातली मायक्रोसॉफ्टची अनिर्बंध मक्तेदारी मोडून काढण्याचे प्रयत्नही सुरू असतात. आजवरचे असे प्रयत्न एकतर अयशस्वी ठरलेले आहेत किंवा त्यांना माफक प्रमाणात यश मिळालेले आहे. असाच एक प्रयत्न क्रोमबुक्स बाजारात आणून गुगलनेही केलेला आहे.

क्रोमबुकमागची मूळ संकल्पना:

सर्वसाधारणपणे मनोरंजन, संपर्काचे एक माध्यम आणि थोडेफार काम अशा वापरासाठी लॅपटॉप विकत घेणारे ग्राहक त्याचा उपयोग आंतरजालावर किती वेळ करतात आणि ऑफलाईन असताना किती वेळ करतात? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी आंतरजालावरचा वापर आणि अत्यंत नगण्य असा ऑफलाईन वापर असे कित्येक ग्राहक देतील. क्रोमबुकची संकल्पना याच गृहीतकावर आधारलेली आहे. गुगलने पूर्णपणे आंतरजाल केंद्रित क्रोम संगणक प्रणाली तयार केलेली आहे. ही प्रणाली लिनक्सवर (क्रोमियम या लिनक्सच्या एका प्रकारावर) आधारीत आहे. क्रोम प्रणालीत गुगलने संगणकाचा ऑफलाईन वापर करण्यासाठी लागतात त्या सगळ्या घटकांना जवळजवळ पूर्णपणे वगळलेले आहे. त्यामुळे ही प्रणाली अत्यंत हलकीफुलकी (लाईटवेट), वापरायला सोपी (युजर फ्रेंडली) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत (रोबस्ट) झालेली आहे.

क्रोमबुकचे काही फायदे:

क्रोमबुक सुरू केल्यानंतर वापरण्यासाठी तयार व्हायला जेमतेम पाच दे दहा सेकंद लागतात ('बूट' होण्यासाठी फार वेळ लागत नाही). क्रोमबुकवर आपले 'गुगल' खाते वापरूनच प्रवेश करता येतो. माहितीचा साठा करण्यासाठी क्रोमबुकबरोबर गुगल ड्राईव्हवर १०० जीबी इतकी जागा दोन वर्षांसाठी मोफत मिळते. ही जागा आपल्यासाठी क्लाउडवर राखीव ठेवलेली असते. गुगल खाते ही आपली एकमात्र ओळख ठरत असल्याने आपल्या इ-मेल्स, फोटो, गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेल्या फाईल्स अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित संच आपल्याला सहज उपलब्ध होतो. गुगल खाते वापरून आपली ओळख पटवून प्रवेश केला (सिंगल साईन ऑन) तर हाच संच इतर संगणक प्रणाली आणि स्मार्टफोन, टॅबलेटवरूनही उपलब्ध होतो.

क्रोमबुक्सच्या बांधणीचा दर्जा (बिल्ड क्वालिटी) तितक्याच किंमतीच्या अन्य लॅपटॉपशी तुलना केली असता बराच उजवा असतो. क्रोमबुक दिसायलाही सर्वसाधारण लॅपटॉपच्या श्रेणीतले न दिसता अ‍ॅपलच्या मॅकसारखेच आकर्षक दिसते. क्रोमबुकची अंतर्गत रचना बहुतांशी गणनप्रक्रिया सर्व्हरवर व्हावी अशा प्रकारची असल्याने क्रोमबुकने पुरवलेल्या सगळ्या सुविधा क्रोम वेब ब्राउझरमधूनच उपलब्ध होतात. क्रोमबुकची संगणक प्रणाली स्वतःचेच परीक्षण करून काही संशयास्पद घडलेले दिसले तर पुन्हा स्वतःची नव्याने बांधणी करायला सक्षम असते. असे होत असताना क्लाउडमधल्या आपल्या माहितीच्या साठ्याला धक्का लागत नाही. त्यामुळे क्रोमबुकसाठी अँटिव्हायरसची गरज नसते. अँटिव्हायरसवरचा खर्च वाचतोच, व्हायरसमुळे होणारा मनस्ताप किंवा माहितीचे नुकसानही संभवत नाही.

क्रोमबुक्समधे इंटेलच्या 'हॅजवेल' तंत्रज्ञानावर आधारित सेलेरॉन प्रोसेसरचा वापर होतो. त्यामुळे एकदा चार्ज केलेली बॅटरी सर्वसाधारण वापर चालू असेल तर सातआठ तास आणि मोठ्या प्रमाणावर मल्टिमिडीयाचा वापर करूनही सहा तासावर सहज टिकते. क्रोमबुक्सची किंमत लक्षात घेता हे बॅटरी लाईफ उत्तमच म्हणावे लागेल. क्रोम प्रणालीत अनावश्यक फापटपसारा कमी केलेला असल्याने आंतरजालाचा वापर करताना सामर्थ्य (पॉवर) आणि वेग (डाउनलोड/ अपलोड स्पीड) दोन्ही बाबतीत उत्तम अनुभव मिळतो. क्रोमबुकची मूळ प्रणाली आणि तिला पूरक असलेले सॉफ्टवेअर अज्ञयावत ठेवण्याची जबाबदारी वापरकर्त्याची ('एंड युजर) नसते. आवश्यक ते सगळे 'अपडेट्स' आंजावरून उतरवून घेणे आणि त्यांना परिणामकारक पद्धतीने वापरता येईल अशी त्यांची रचना करणे (कॉनफिगरेशन) हे काम आवश्यकतेनुसार आपोआप होत राहते.

क्रोमबुकच्या मर्यादा:

क्रोमबुकवर सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरता येत नाही, उदा. 'जावा' प्रणालीवर आधारीत सॉफ्टवेअर वापरता येत नाही. मायक्रोसॉफ्ट ऑफिस, स्काईपसारखे कित्येकांच्या सवयीचे झालेले सॉफ्टवेअर वापरता येत नाही. मात्र त्यासाठी पर्यायी असे गुगलचे सॉफ्टवेअर सहज उपलब्ध असते. पुरेशा वेगाने आंतरजालाचा वापर करता येत नसेल, तर क्रोमबुकचा वापर 'पेपरवेट' सारखा करावा लागतो असा प्रचार गुगलचे विरोधक करतात. हा आक्षेप फारसा खरा नाही. क्रोमबुक्सवर ऑफलाईन वापर करण्यासाठी गुगलने पुरवलेल्या आंजावरच्या संग्रहात (ऑनलाईन स्टोअर) गुगल डॉक्स, जीमेल आणि गुगल ड्राईव्हसारखे बरेच सॉफ्टवेअर तसेच कित्येक 'गेम्स' मोफत उपलब्ध आहेत. मात्र 'हाय एंड गेमिंग' साठी क्रोमबुक्सचा वापर करता येत नाही.

एकंदर सगळ्या बाबी लक्षात घेता मनोरंजन, संपर्काचे माध्यम आणि थोडेफार जुजबी स्वरूपाचे काम इतकाच लॅपटॉपचा वापर असेल, तो बहुतांशी आंतरजालावर होत असेल आणि चांगले वायफाय कनेक्शन उपलब्ध असेल अशांनी क्रोमबुक्स घेण्याचा विचार अवश्य करावा. घरात एखादा संगणक किंवा विंडोज/ लिनक्स लॅपटॉप असेल, आणि 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाति' अशा पद्धतीने हाताळण्यासाठी आणखी एका लॅपटॉपची गरज असेल तर क्रोमबुक हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. गुगल ड्राईव्हवरच्या आपल्या खजिन्याशी थेटपणे जोडली जाणारी क्रोमबुक आणि अँड्रॉईड टॅबलेट अशी जोडगोळीही खूप उपयुक्त ठरू शकते.

हाय एंड गेमर्स, पॉवर युजर्स आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा स्काईपला पर्याय नाही अशा पद्धतीने विचार करणारे युजर्स यांनी क्रोमबुकच्या फंदात न पडणेच बरे.

पुरवणी -

अलीकडेच उपलब्ध झालेल्या एचपी आणि तोशिबा क्रोमबुक्सची एक झलकः

क्रोमचा थोडक्यात परिचयः

जीवनमानतंत्रप्रकटन

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

23 Feb 2014 - 10:48 pm | कवितानागेश

वाचतेय. मस्त आहे माहिती. :)

पैसा's picture

23 Feb 2014 - 10:55 pm | पैसा

यात काय चांगलं आहे आणि काय मर्यादा आहेत हे व्यवस्थित सांगितलंस. क्रोमबुकवरून हा लेख तर नीट टाईप झाला आहे!

मात्र मला गूगलवर सतत लॉग्ड इन राहणे आवडत नाही. शिवाय आपली सगळी माहिती ते भविष्यात सुरक्षित ठेवतीलच असं मानण्यात अर्थ नाही. अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईलवरूनही सतत लॉग्ड इन रहावे लागते. यावर उपाय म्हणून लिनक्सवर आधारित मोबाईल कधी येतो आहे याची वाट बघत आहे.

सुहास झेले's picture

23 Feb 2014 - 11:12 pm | सुहास झेले

Ubuntu Touch

वापरून बघितलेत मी, पण आता गुगलची तर भीतीच वाटायला लागलीय.. मोबाईल त्यांचा.. ब्राऊजर त्यांचा.. इमेल त्यांचा.. ड्राईव्ह त्यांचाच... आपला सगळा डेटा त्यांचाच :-|

सुहास झेले's picture

23 Feb 2014 - 11:15 pm | सुहास झेले

क्रोमबुक्स वापरून बघितलेत मी*

मदनबाण's picture

24 Feb 2014 - 9:24 am | मदनबाण

वापरून बघितलेत मी, पण आता गुगलची तर भीतीच वाटायला लागलीय.. मोबाईल त्यांचा.. ब्राऊजर त्यांचा.. इमेल त्यांचा.. ड्राईव्ह त्यांचाच... आपला सगळा डेटा त्यांचाच
अगदी १००% असेच वाटते. आपण सर्वांनाच गुगल ने त्यांची चांगली सवय लावली आहे, उध्या अचानक गुगलने त्यांच्या पॉलिसी बदलल्या,काही सर्व्हीस पेड केल्या आणि काही सव्हीस बंद केल्या तर त्याचा फटका त्यांच्या वापरकर्त्यांना म्हणजे आपल्यालाही बसेल.
मेगाअपलोड ही फाईल शेअरींगसाठी प्रसिद्ध असलेली साईट कायद्याच्या कचाट्यात अडकुन अशीच बंद झाली. अमेरिकेच्या कायद्याचा वापर करुन गुगलवर नियंत्रण मिळवणे, त्यांच्या युजर्सच्या डेटा पडताळणीसाठी मागणे इं. आणि अनेक शक्यता निर्माण होउ शकतात.
स्नोडेन प्रकरणा नंतर अनेक देशांनी त्यांच्या आयटी आणि त्या संदर्भात असलेल्या कायद्यात अनेक सुधारणा केल्या तसेच गुगल सारख्या इंतरनेट जायंट्स ना दंड देखील करण्याची क्षमता त्यांनी विकसीत केली आणि त्याची अंमलबजावणी देखील केली.
संदर्भ :- France fines Google over data privacy

Google forced to advertise £125,000 fine on its French homepage after court rules search giant violated users' privacy
स्नोडेन प्रकरणा नंतर अनेक देश या बाबतीत अधिक जागॄत झाले आहेत्,त्यात अगदी ब्राझील सारखा देश सुद्धा आहे.
ब्राझील ने तर त्यांच्या देशातील लोकांच्या डेटा बद्धल इतका विचार केला आहे की त्यांच्या देशातील लोकांचा फेसबुक,गुगलचा डेटा त्यांच्याच देशात असावा आणि त्यासाठी या कंपन्यांची डेटा सेंटर्स त्यांच्याच देशात उघडावीत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.
संदर्भ :- Brazil Legislators Bear Down on Internet Bill
Brazil May Require Google, Facebook to Store Data Locally

या सर्व बाबतीत आपण किती जागरुक आहोत ? आपल्या देशातले राजकारणी किती जागरुक आहेत ? आणि सर्वात महत्वाचे आपण आपल्या डेटा बाबत किती जागरुक आहोत ?

नविन टेक्नॉलॉजीबद्दलची माहीती आवडली.

मुक्त विहारि's picture

24 Feb 2014 - 8:20 am | मुक्त विहारि

धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

24 Feb 2014 - 12:08 pm | धर्मराजमुटके

ही सर्व माहिती आंतरजालावर आहेच. तुम्ही मराठीतून दिल्याबद्दल आभार. मात्र कोणी प्रत्यक्ष वापरत असेल तर त्याचे अनुभव वाचायला आवडतील.
क्रोमबुकचे एकंदरीत फायदे बघता तोटे जास्त जाणवतात. ते खालीलप्रमाणे.
१. भारतात मोबाईल इंटरनेट कनेक्टीव्हीटी / ३जी /४जी तितकीशी वेगवान व नियमित चालणारी नाहिये. त्यामुळे
ऑनलाईन वापरावर मर्यादा येतात. जर घरचेच इंटरनेट वापरायचेय तर क्रोमबुक कशाला ?
२. जे एकेकाळी मायक्रोसॉफ्टबद्दल म्हणता येत होते (एकाधिकारशाही) तीच परिस्थीती गुगलबाबत काही काळाने होण्याची
शक्यता. गुगलचे पेज उघडत नसेल तर इतर संकेतस्थळे वापरुनही शोध (सर्च) घेता येतो हे नव्या पिढीला माहित
असेल की नाही हा धोका. (आता ह्सण्यासारखे वाटतेय पण असे होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात आहे.)
३. खाजगी माहितीचा दुरुपयोग - मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये घुस़खोरी करणे (Hacking) सहज शक्य आहे तेच तत्त्व अँड्रॉईड प्रणालीला लागू होते. तुमची खाजगी माहिती कधीही चोरीला जाण्याचा / दुरुपयोग होण्याची शक्यता.
मी स्वतः घेत असलेली काळजी.
१. बँकांशी संबंधीत व्यवहारासाठी जीमेलऐवजी दुसरा कमी प्रमाणात प्रसिद्ध इमेल सर्विस प्रोवायडर निवडला.
२. बँकांशी सबंधीत भ्रमणध्वनी क्रमांक साध्या हँडसेट वर हलविला.
३. जनरल वेबब्राऊजींग एका ब्राऊजरवर आणि बँकांशी सबंधीत संकेतस्थळे वेगळ्या ब्राऊजरवर उघडणे.
वरील उपाय हास्यास्पद वाटत असतील तरी ते निश्चितच सुरक्षित आहेत. (मात्र कोणताही उपाय १००% सुरक्षित नाही.)

लंबूटांग's picture

26 Feb 2014 - 12:31 am | लंबूटांग

मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये घुस़खोरी करणे (Hacking) सहज शक्य आहे तेच तत्त्व अँड्रॉईड प्रणालीला लागू होते. तुमची खाजगी माहिती कधीही चोरीला जाण्याचा / दुरुपयोग होण्याची शक्यता.

हे कशावरून ठरवलेत?

तुमच्या उपायांपैकी ३ नं. ठीक आहे पण पहिल्या २ चे प्रयोजन कळले नाही. खास करून पहिल्या उपायाचे. तुमचे इमेल सर्वच इमेल प्रोव्हायडर्स वाचू शकतात, गूगलने इतक्या वर्षांत अतिशय उत्तम सिक्युरीटी आणि एन्क्रीप्शन प्रस्थापित केले आहे.

इतके सगळे उपाय लिहीलेत पण सर्वात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे घरचे वाय फाय पासवर्ड ने सिक्युअर करणे हे सर्वात पहिले केले पाहिजे

धर्मराजमुटके's picture

26 Feb 2014 - 11:19 am | धर्मराजमुटके

घुस़खोरीचा सर्वात जास्त धोका हा त्या त्या काळात प्रसिद्ध असणार्‍या सर्वच सिस्टीमला लागू होतो. अँड्रॉईडवर इन्स्टॉल होणारी मोफत अ‍ॅप्स तुमची खाजगी माहिती जमा करतात हे आता सिद्ध झाले आहे.
मी ठरवलेल्या उपायांचे प्रयोजन :
१. बँकांशी संबंधीत व्यवहारासाठी जीमेलऐवजी दुसरा कमी प्रमाणात प्रसिद्ध इमेल सर्विस प्रोवायडर निवडला.
जीमेल वर तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला ज्या विषयासंबंधी मेल आली असेल तर लगेच त्या त्या विषयाच्या अनुषंगाने जाहिराती दिसतात. उदा. जर मला आयसीआय बँकेने क्रेडीट कार्ड चे स्टेटमेंट इमेल केले असेल तर लगेच त्या मेलच्या पानाच्या बाजूला क्रेडीट कार्डच्या ऑफर्स झळकतात. गुगलवर तुम्ही मला लॅपटॉप खरेदीसाठी सर्च मारला तर नंतरचे कित्येक दिवस मी कोणतेही पान उघडले की त्या अनुषंगाने जाहिराती दिसतात. ही बाब मला व्यक्तीशः खटकते.
दुसरे आजकाल ९० ते ९५% लोकांचा एक तरी जीमेल आयडी असतोच. मार्केटींग करणार्‍या व्यक्तीला, संस्थेला तुमचे नाव आणि आडनाव माहित असेल तर तुमच्या जीमेल आयडीवर नको असलेले मेल्स मोठ्या प्रमाणावर येतात. एमेल आयडी गेस करणे बर्‍यापैकी सोपे जाते. उदा. तुमचे नाव रमेश देव असेल तर खालीलपैकी एखादा इमेल आयडी तुमचा असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतील.
उदा.
ramesh.dev@gmail.com
ramdeshdev@gmail.com
rameshdeo@gmail.com
deoramesh@gmail.com
devramesh@gmail.com
तुलनेने याहू / रेडीफ / हॉटमेलवर कमी ग्राहक असल्याने त्रास कमी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. बँकांशी सबंधीत भ्रमणध्वनी क्रमांक साध्या हँडसेट वर हलविला.
अँड्रॉईडवर इन्स्टॉल होणारी मोफत अ‍ॅप्स तुमची खाजगी माहिती जमा करतात हे आता सिद्ध झाले आहे.
ऑनलाईन ट्रान्जॅक्शनचे ओटीपी (वन टाईम पासवर्ड) हे इमेल आणी एसएमएस याद्वारे येतात. मोबाईल हॅक होऊन हा महत्वाचा विदा चोरीला जाऊ नये म्हणून ही जुनी पद्धत अवलंबली. (साधा हँडसेट म्हणजे एकदम बेसीक. ज्यात फक्त कॉलींग सुविधा असेल. नो इंटरेनट)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इतके सगळे उपाय लिहीलेत पण सर्वात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे घरचे वाय फाय पासवर्ड ने सिक्युअर करणे हे सर्वात पहिले केले पाहिजे
ही दुसरी पायरी आहे. तुम्ही तुमच्या वायफाय चा पासवर्ड बदलला तरी माझ्यासारखा थोडेसे हार्डवेअर आणि नेटवर्कींगचे सामान्य माहिती असणारा तुमच्या नेटवर्कमधे घुसखोरी करतो. कसे ते सोदाहरण स्पष्ट करतो.
उदा. तुम्ही घरी एक वायफाय मॉडेम लावलेय आणि वायफाय कनेक्शन सेक्युअर करण्यासाठी पासवर्ड दिला. security@lambutang@2015
१०० तील ९९ लोक ही खबरदारी घेतच असतात पण ते चोर घरात येऊ नये म्ह्णून घराच्या खिडक्या बंद करत असतात. दरवाजे सतात उघडे असतात.
तुम्ही तुमच्या मॉडेमचा डिफॉल्ट युजर आयडी पासवर्ड आणि आयपी अ‍ॅड्रेस बदललाय का ?
१०० पैकी ९० टक्के मॉडेम म्यॅनुफॅक्चरचा आयपी असतो 192.168.1.1
user name : admin
passowrd : password
OR
user name : administrator
passowrd : blank (म्हणजे कोणताही पासवर्ड नाही).
मी व्यक्तीशः ८० ते ९०% लोकांनी ह्या सेटींग्स बदललेल्या बघीतल्या नाहित. एकदा मॉडेम / राऊटरच्या मेनुमधे घुसले की तुमचा वायफाय पासवर्ड शोधणे कितीसे अवघड ?

आत्मशून्य's picture

26 Feb 2014 - 1:58 pm | आत्मशून्य

त्यावेळी नोकीयाचा - इ६३ वापरायचो वाफाय एनेबल करायचो आणी भेटलत्या अ‍ॅक्सेस्स पॉइंटवरुन सर्फींग सुरु करायचो. कुल वाटायचे. मोफत इंट्रनेट.

एक गंमत सांगतो भारतात दरवर्षी एक इवेंट होत असतो(शहर व इंव्हेंट जाहिर करत नाही) अर्थातच पंचतारांकीत हॉटेलमध, तेथे मायक्रॉसॉफ्टचे प्रतिनीधी एक नेट बेस्ड प्रॉडक्टचा डेमो देणार होते म्हणून हॉटेल व्यवस्थापनाने वायफाय अ‍ॅक्सेस एनेबल करुन उपस्थितांनाही पडताळा घेता यावा म्हणून युजर लिमीट असलेली एक कॉमन की देण्यात आली होती. जी वापरुन (उपस्थीतांमधील) एकाचवेळी अनेक पीसी (लेप्टोप/मॅक वगैरे वगैरे) युजर लिमीट एक्सीड होत नाही तो पर्यंत अंजाला केनेक्ट होउ शकत.

वाय फाय एनेबल्ड मोबाइल फोनची एक गंमत आहे/होती, तुम्ही त्या मोबाइल मधुन जेथे वायफाय लॉगीन केले त्यावर दुसरा पिसी नेट वापरु शकत नाही, अगदी "की" शेअरींग केलेले असुनही लॉगीन/कनेक्ट होते पण प्रत्यक्ष ब्राउजिंग शक्य होत नाही.

आम्हाला "की" दिल्या दिल्या मी ताबडतोप वायफाय ऑन करुन मी मोबाइल वर ब्राउजिंग सुरु केले. तिकडे प्रेजेंटेशन चालु होते हे असे आहे ते तसे आहे हे शक्य होइल ते ओप्टीमाइज होइल वगैर वगैरे वगैरे आणी वगैरे. त्याचा सहकारी शेजारीच लॅपटॉप घेउन वायफायवरुन नेट एनेबल करायचा कसोशीने खुडखुड करत होता वीवीध तज्ञांची त्यासाठी सतत येजा चालु होती. १०- मिनीटे झाली- २० मिनीटे झाली - ३० मिनीटे झाली १ दीड तास होउन गेला दर वेळी त्यांचे सहकारी/व्यवस्थापन दहा मिनीटात नेट चालु होइल व आपणास आता जे सांगीतले त्याचे प्रात्यक्षीक बघता येइल असे बजावत होते. आता उपस्थितजनही चुळबुळु लागले अन मी अधुन मधुन फोनमधे रिफ्रेश मारत होतो. शेवटी त्यांनी आम्हाला लेखी पत्ता दिला की घरी गेल्यावर कृपया या ठीकाणी जावा (संस्थळ) व दिलेल्या सुचना फॉलो करा :) आणी आत्ता जे प्रेजेंटेशन दिले आहे ते कसे काम करते याचे प्रात्यक्षीक स्वतःच बघा :)

लंबूटांग's picture

26 Feb 2014 - 6:19 pm | लंबूटांग

बाकी चर्चा खरडवहीत करू

पण माझा आक्षेप "सहज शक्य आहे" ह्या विधानाला होता.

अ‍ॅन्ड्रोईड वर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना त्या अ‍ॅपला कोणत्या कोणत्या परमिशन्स आवश्यक आहेत हे दाखवतात. त्यामुळे ते बघूनच अ‍ॅप डाउनलोड करावीत. बँकांचे अ‍ॅप सामान्यपणे सिक्युअर असतात त्यामुळे की लॉगर अथवा तत्सम अ‍ॅप असेल तरच धोका आहे. असो बेटर टु बी सेफ दॅन सॉरी.

बाकी जीमेल चे स्पॅम फिल्टर माझ्यामते तरी सर्वोतकृष्ट आहे आजमितीला. भारतातील माहिती नाही पण अमेरिकेत तरी प्रत्येक मार्केटिंग कंपनीला अन सबस्क्राईब लिंक देणे कायद्याने अत्यावश्यक आहे. जीमेल लवकरच त्यांच्या ईमेल च्या इनबॉक्स मधेच ही लिंक दाखवणार आहे. त्यामुळे मग इमेल उघडण्याचीही गरज पडणार नाही.

गूगल मधे ह्या जाहिराती नको असतील तर गूगल अकाऊंट मधून लॉग आउट करून सर्च करा. इनकॉग्नीटो मोड वापरा. असो.

माझे म्हणणे एकच आहे की सर्वच वेबसाइट्स आपला ह्या ना त्या रूपाने माग ठेवतातच. माझ्या दृष्टीने हा डेटा सर्वात सिक्युअर कोण ठेवतो त्याला महत्त्व आहे आणि आजमितीला तरी गूगल हे काम अतिशय उत्तम रितीने करते आहे. दुसरी गोष्ट, फेसबुक वगैरे तुमचा डेटा थर्ड पार्टी ला विकू शकते, गूगल अजूनतरी तो डेटा केवळ तुमच्या प्रोफाईल ला मॅच होणार्या अ‍ॅड्स दाखवण्यासाठीच करत आहे.

प्रत्येकाला आपला चॉइस आहेच, मला फक्त त्यामागची कारणमीमांसा पटली नाही म्हणून हा खटाटोप.

वाय फाय च्या डीफॉल्ट पासवर्ड बद्दल सहमत.

मदनबाण's picture

26 Feb 2014 - 9:27 pm | मदनबाण

आजमितीला तरी गूगल हे काम अतिशय उत्तम रितीने करते आहे.
सहमत आहे. परंतु मध्यंतरी {२५-०१-२०१४ अंदाजे संपूर्ण कालावधी १५- २५ जानेवारी} ला गुगलच्या एकणुच अ‍ॅप्सना फटका बसला होता ज्यामुळे अनेक लोकांच्या जी-मेलचा डेटा उडाला होता. गुगलच्या म्हणण्यानुसार 0.2 टक्केच युजर्सना त्याचा फटका बसला होता.
गुगलच्या अ‍ॅप स्टेटस बोर्डवर त्या दिवशीची स्थिती पाहता येइल :-
http://www.google.com/appsstatus#hl=en&v=status&ts=1390674599000
अर्थात गुगल ने हा डेटा बॅकअप घेतला असल्याने तो रिस्टोअर झाला.

मूकवाचक's picture

25 Feb 2014 - 6:53 pm | मूकवाचक

प्रतिसाद देणार्या आणि लेखाशी संबंधीत विषयावर महत्वाचे मुद्दे मांडणार्या मिपाकरांना मन:पूर्वक धन्यवाद.

विकास's picture

25 Feb 2014 - 8:47 pm | विकास

सर्व प्रथम माहिती चांगली सांगितली आहे पण असे रेस्ट्रीक्टेड प्रकरण आवडत नाही. असो.

तुमच्या प्रतिसादातील रविंद्रनाथांचे वाक्य आजच्या काळासाठी बदलून सांगावेसे वाटत आहे...

Clouds come floating into my life, no longer to carry rain or usher storm, but to add files, folders, mp3, jpgs and movies.

बॅटमॅन's picture

26 Feb 2014 - 6:28 pm | बॅटमॅन

Clouds come floating into my life, no longer to carry rain or usher storm, but to add files, folders, mp3, jpgs and movies.

ठ्ठो =)) =)) =))

जबरीच.

मूकवाचक's picture

26 Feb 2014 - 7:00 pm | मूकवाचक

(क्लाउडविषयीचे वक्तव्य ही माझी स्वाक्षरी होती. प्रतिसादाचा भाग नाही.)

श्रीरंग_जोशी's picture

26 Feb 2014 - 11:00 am | श्रीरंग_जोशी

मी गूगल डॉक्सचा भरपूर वापर करत असल्याने क्रोमबुक माझ्यासाठी उपयोगी ठरेल अशी आशा आहे. माझा ४ वर्षे जुना विंडोजवर चालणारा लॅपटॉप अधून मधून धापा टाकत असला तरी अजून मान टाकत नसल्याने क्रोमबुकची खरेदी पुढे ढकलली जात आहे. बहुधा त्याचे देहावसान होण्यापूर्वीच क्रोमबुकला आणून जुन्या लॅपटापचे आयुष्य अधिक वाढवावे लागणार असे दिसत आहे.

वर काही लोकांनी शतप्रतिशत गूगल या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. माझ्या मते किमान चतुरभ्रमणध्वनीमध्ये अद्ययावत सुविधा मिळवून सुरक्षिततेमध्ये तडजोड नको असल्यास ब्लॅकबेरी १० प्रणाली सर्वोत्तम पर्याय आहे. कालच ब्लॅकबेरी झेड १० ची भारतातली किंमत निम्म्यावर आली आहे. मी गेल्या अकरा महिन्यांपासून झेड १० वापरतोय. ब्लॅकबेरी १० बाबत कुणास काही प्रश्न असल्यास अवश्य विचारावे.

एक विनंती - अजून काही महिन्यांनी तुम्हाला क्रोमबुकच्या प्रत्यक्ष वापरातून जाणवलेले फायदे तोटे या धाग्यावर परतून लिहा.

चतुरभ्रमणध्वनीमध्ये अद्ययावत सुविधा मिळवून सुरक्षिततेमध्ये तडजोड नको असल्यास ब्लॅकबेरी १० प्रणाली सर्वोत्तम पर्याय आहे.
ह्म्म... हो. हे अगदीच चूक ठरु नये ! ब्लॅकबेरीचे जवळपास सगळेच सर्व्हरस त्यांच्या बेसलोकेशनला म्हणजे कॅनडात आहेत्.आपल्या सरकारने दबाव टाकुन इथल्या ऑप्रेटरस जी ही सेवा देत आहेत त्यासाठी भारतात सेटअप सांगण्यास सांगितले त्याप्रमाणे रिलायन्सने {RIM}मुंबईत उभारले आहेत्.बाकीच्या सर्व्हिस प्रोव्हाडरच्या बाबतीत काय परिस्थीती आहे ते माहित नाही.
संदर्भ :- RIM finally sets up BlackBerry server in Mumbai

जाता जाता :- मी जेव्हा माझ्या पहिल्या क्लायंटसाठी सर्व्हर मॉनिटरिंगचे काम करायचो तेव्हा मला सुद्धा ब्लॅकबेरी सर्व्हरस वर अ‍ॅक्सेस दिला गेला नव्हता, कारण अर्थातच सिक्युरिटी.

पण अ‍ॅन्ड्रॉइडमधे ज्या प्रकारची सुविधा वापरकर्त्याला मिळते तितकी ती ब्लॅकबेरीवर मिळत नाही,म्हणुनच अ‍ॅन्ड्रॉइड अजुनही मार्केट लिडर आहे.टायझेन ने यात किती बदल घडेल हे येणार्‍या काळात कळेलच.

तुषार काळभोर's picture

28 Feb 2014 - 5:49 pm | तुषार काळभोर

रिलायन्स आणि RIM या शब्दांचा काही संबंध नाही. RIM=रिसर्च इन मोशन (ब्लॅकबेरी बनवणारी कंपनी)

ऋषिकेश's picture

26 Feb 2014 - 12:02 pm | ऋषिकेश

लेख वाचुन मिपावरचा एक खूप जुना लेख आठवला. क्रोम येण्यापूर्वीचा, शिवाय हा विकास यांचा लेखही त्याच अंगाने जाणारे होता.

शिवाय गुगर्लशी लग्न हा ब्लॉगही आठवला

भाते's picture

26 Feb 2014 - 1:40 pm | भाते

ब्लॅकबेरीच्या नविन ओएस १०.२.१ मध्ये गुगल प्ले स्टोअरमधुन सर्व अ‍ॅन्ड्रॉइड एप्स आणि गेम्स टाकता येतात.
वरती श्रीरंग जोशी यांनी म्हणल्याप्रमाणे गेल्या वर्षी ४३,५०० ला आलेला झी१० आता एका वर्षानंतर १९,००० हजार रुपयांत मिळतो आहे. पण कालच जाहिर झालेला २०० डॉलर्सचा झी३ हा फोन लवकरच आपल्याकडे १४/१५ हजारात मिळेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Feb 2014 - 10:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

खरे सांगु का? हे फुकट प्रकरण एकुणातच फार महागात पडते कधी ना कधी

जो तुम्हाला फुकटात काहीतरी सेवा देउ करतो (उदा. गुगल,फेसबुक) तो दुसर्या कुठल्यातरी मार्गाने पैसा मिळवायला त्या डेटाचा कधी ना कधी वापर करणारच.
खरेतर हा ओपन स्सोर्स विरूद्ध प्रोप्रायटरी(कंपनीशी बांधील) असा संघर्ष आहे..त्याच बरोबर स्वस्त,जलद,सहज उपलब्ध,असुरक्षित सेवा की महाग,रिस्ट्रिक्टेड,सुरक्षित सेवा (अँड्रोईड वि. ब्लॅकबेरी) असाही पैलु आहेच

एकेकाळी दिवसरात्र फेसबुक वर पडीक आसणारे लोक्स आता अकाऊंट डिलीट करताना बघितलेत यापायी.
सायबरक्राईम ही एक मोठी ब्रॅंच बनली आहे पोलिस,वकील आणि बर्‍याच लोकांसाठी

सुनील's picture

28 Feb 2014 - 9:40 am | सुनील

चांगली माहिती.