झणझणीत सातारी कोंबडी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
17 Apr 2013 - 10:00 pm

सुधा मायदेव ह्यांच्या लाजवाब मालिकेतल्या चिकन ह्यामधील ही पाककृती आहे.पाककृतीचे प्रमाण मी आमच्या आवडी व चवीप्रमाणे बसवले आहे.

साहित्य:

अर्धा किलो कोंबडीचे तुकडे हळद + मीठ लावून ठेवलेले
२ कांदे उभे चिरलेले
५-६ लसुण + १ इंच आले ठेचून
३ टेस्पून कांदा-लसूण मसाला (हा मसाला खूप तिखट असतो , थोडी चव घेऊन बघा व त्याप्रमाणे घालावा)
२ टेस्पून सुके खोबरे
१ टेस्पून पांढरे तीळ
१ टेस्पून खसखस
१ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
३ लसूण पाकळ्या
बारीक चिरलेली कोथींबीर
तेल

.

पाकृ:

एका पॅनमध्ये तीळ, खसखस व सुके खोबरे कोरडेच सोनेरी रंगावर भाजून घ्या.
भाजलेले जिन्नस वेगळ्या ताटलीत काढून घ्या.
पॅनमध्ये १ टेस्पून तेल घालून ३ लसूण पाकळ्या परतून घ्या.
लसूण सोनेरी-तांबूस रंगावर परतल्यावर त्यात उभे चिरलेले कांदे घालून लालसर रंगावर परतावे.
थोडे गार झाले की खसखस, तीळ, सुके खोबरे, परतलेले कांदा+लसूण एकत्र करून, थोडे पाणी घालून वाटून घ्या.

.

जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉन-स्टीक भांड्यात ४ टेस्पून तेल गरम करावे व त्यात आले+लसूण ठेचा घालून परता.
खमंग परतले की त्यात वरील वाटण घाला.
त्यात लाल तिखट, हळद, कांदा-लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता.
आता त्यात चिकनचे तुकडे व मीठ घालून परता व गरजेनुसार पाणी घालून, झाकून उकळी आणा.

.

चिकन शिजले की वरुन थोडी कोथींबीर घाला.
झणझणीत सातारी कोंबडी गरमा-गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा.

.

नोटः

मुळ पाककृतीत एक किलो कोंबडीचे प्रमाण दिले आहे
मी अर्धा किलोच्या व आमच्या आवडीप्रमाणे प्रमाण बसवले आहे.
मुळ पाककृतीत आल्याचा वापर अजिबात नव्हता, मी आले घातले, चांगले लागले.
लसणाचा वापर जास्तं आहे पण इथे मिळणारे लसून मोठं असतं म्हणून पाकळ्या त्याप्रमाणे घेतल्या आहेत, तुम्ही जास्तं घेऊ शकता.
कांदा-लसूण मसल्यात ही मिरच्या व इतर मसाले असल्यामुळे तो तसा झणझणीत असतो, म्हणून घालताना आवडीप्रमाणे कमी-जास्तं घालावे.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

17 Apr 2013 - 10:05 pm | यशोधरा

मार डाला टाईपचे फोटो आहेत! करुन पाहीन बहुतेक.

सुहास झेले's picture

17 Apr 2013 - 10:08 pm | सुहास झेले

भन्नाट.... शेवटचा फोटो तर क्या बात.. क्या बात !!! :) :)

पैसा's picture

17 Apr 2013 - 10:17 pm | पैसा

रंगावरून चिकन चांगलं झालेलं असणारच. पण भाकर्‍या तर जबरदस्तच दिसत आहेत!

तुषार काळभोर's picture

18 Apr 2013 - 10:37 am | तुषार काळभोर

स्साला...काय चंद्रासारख्या शुभ्र भाकर्‍या आहेत!!

भाकरी चे अनेकवचन 'भाकरी'च आहे.
धन्यवाद.

सामिष खात नसल्याने अम्मळ कमी श्या देण्यात आलेल्या आहेत. प्रेझेन्टेशन्साठी आहेतच. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Apr 2013 - 3:45 pm | llपुण्याचे पेशवेll

असहमत. भाकरीचे अनेकवचन भाकर्‍याच आहे. आठवा "लष्कराच्या भाकर्‍या भाजणे"

पुण्यात भाकर्‍या म्हणतात पण ते चूक आहे.
असो.
असहमतीबद्दल सहमती.

तुषार काळभोर's picture

19 Apr 2013 - 1:51 pm | तुषार काळभोर

पुण्यात आम्ही जे बोलतो, ती प्रमाण भाषा असते.
:-)

काय म्हणावं फोटूला? भारी, अगदी भारी. शाकाहारी असल्याने हा पदार्थ खाता येणार नाही पण चवदार झाला असणार असे वाटत आहे.

अक्षया's picture

18 Apr 2013 - 9:38 am | अक्षया

+ १

चावटमेला's picture

17 Apr 2013 - 10:25 pm | चावटमेला

ह्या वीकांताला करूनच पाहतो.

३ टेस्पून कांदा-लसूण मसाला - तयार मिळतो का कुठेही?

पैसा's picture

17 Apr 2013 - 10:35 pm | पैसा

अंबारी कंपनीचा मी इथे गोव्यात पण विकत घेते.

सानिकास्वप्निल's picture

17 Apr 2013 - 10:45 pm | सानिकास्वप्निल

मी सासरच्या गावचा (सातार्‍याचा)घरगुती मसाला वापरलाय
तिथे मसाला ऐवजी कांदा-लसूण चटणी असे म्हणतात.

मग कसा बनवायचा तेही लिहा ना :)

सानिकास्वप्निल's picture

17 Apr 2013 - 11:21 pm | सानिकास्वप्निल

हॅ हॅ ते आपले काम नाही
सासूबाई गावावरुन आणून ठेवतात आणी मी तो सरळ घेऊन येते ;)
मसाले घरी बनवणे वगैरे अजूनतरी कधी केले नाही मी.

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 12:04 am | यशोधरा

अग्गो! साबांना विचारुन लिही की :D

इरसाल's picture

18 Apr 2013 - 1:46 pm | इरसाल

सासूबाई गावावरुन आणून ठेवतात आणी मी तो सरळ घेऊन येते

आयतोबा कुठली ? उम्म्म्म (गाल फुगवुन भुवया उडवुन डोळे फिरवणारी बाहुली कल्पावी )

यशो, तुला हवे असल्यास साहित्य, प्रमाण अन कृती व्यनी करते.
पण फटू गिटू नही है अपनके पास !

कोंबडीचे नव्हे हो, कांदा-लसूण मसाल्याचे ! a
(कॉलिंग स्वसंपादन-सुविधा..)

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 3:50 pm | यशोधरा

कर कर.

यशोधरा's picture

17 Apr 2013 - 10:49 pm | यशोधरा

इथे पाहते मिळतो का ते.

स्मिता चौगुले's picture

18 Apr 2013 - 4:02 pm | स्मिता चौगुले

कांदा-लसूण मसाल्याची (गावराण) पाकृ देवु शकते. आई कदुन शिकले आहे ते. आम्ही तो १ किलो वैगेरे करतो एकदाच.
त्याचे प्रमाण मी देवू शकते पण फोटो वैगेरे नाहित

हा कांदा-लसूण मसाला(आम्ही त्याला मसला तिखट/काळे तिखट असे म्हणतो) फार झणझणीत असतो, थोडासाही पुरे होतो. मस्त तर्रीवाले मटण्-चिकण होते आणि हे वापरुन भाजी केली तर इतर मसाल्याची गरज ही नसते

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 4:06 pm | यशोधरा

लिहा पटकन :)

स्मिता चौगुले's picture

18 Apr 2013 - 5:23 pm | स्मिता चौगुले

कांदा लसूण मसाल्याच्या पाकृचा धागा काढला आहे

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 8:35 pm | यशोधरा

मनापासून आभार मानले आहेत :)

स्मिता चौगुले's picture

19 Apr 2013 - 11:43 am | स्मिता चौगुले

:)..

इरसाल's picture

18 Apr 2013 - 3:49 pm | इरसाल

तुम्हीपण अन्नपुर्णा सातपुते का ?

मी_देव's picture

17 Apr 2013 - 10:30 pm | मी_देव

खल्लास,,,,,,,,,,,,,,,,

अर्धवटराव's picture

17 Apr 2013 - 10:35 pm | अर्धवटराव

लाभले भाग्य आम्हा, वाचतो सानिकेचे पाकृ.
धन्य झालो.

अर्धवटराव

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Apr 2013 - 10:43 pm | लॉरी टांगटूंगकर

फोटो फार फार जीवघेणे आहेत.

घरात कांदा-लसुण मसाला आहेच... आता ह्या वीकेन्डला करुन बघते. बाकी चेपु वर बोलले तेच... कोणीतरी माझा जीव घेणारे. ;) :D

चिंतामणी's picture

17 Apr 2013 - 11:49 pm | चिंतामणी

तों.पा.सु.

शेवटचा फोटो पाहून खपलो.

बाकी काही लिहायची गरज नाही. तु सातारकरांची सुन आहेस म्हणल्यावर सगळेच त्यात आले.

कोंबडी तर उत्तम झाली आहेच पण त्या भाकरीने आधी जीव गेला.

मराठे's picture

18 Apr 2013 - 12:03 am | मराठे

किलर!

काहीच्या काही किलर फोटो टाकू नका बुवा!!!

प्रभाकर पेठकर's picture

18 Apr 2013 - 4:03 am | प्रभाकर पेठकर

शक्यतो माझे मसाले मीच बनवितो. म्हणजे, पुस्तकात किंवा आंतरजालावर पाहून आणि आपल्या आवडीनुसार त्यातील जिन्नस कमीजास्त करून हवी तशी चव आणण्याचा प्रयत्न करतो.

कालच भारतातून कोणी झणझणीत कांदालसूण मसाला सँपल म्हणून आणून दिला आहे. तो वापरून त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे. आता ह्या पाककृतीनुसार 'सातारी कोंबडी' करून पाहतो.

शेवटचे छायाचित्र खतरनाक आहे.

स्पंदना's picture

18 Apr 2013 - 4:47 am | स्पंदना

रस्सा अस्सा मस्स्त दिस्सतो आहे की बस्स!!
खल्लास्स्स!

धमाल मुलगा's picture

18 Apr 2013 - 5:55 am | धमाल मुलगा

एक जरा तो शेवटचा फोटू बघितला आणि डायरेक्ट सर्गात जाऊन पोचलो राव! काय छळ लावलाय रे? आँ? :)

ह्या सातारी रश्श्यावरुन आठवण आली ती आमच्या म्हमईतल्या दिवसांची. हापिसातल्या शेट्टी केटरर्सनी दुपारच्या जेवणाची सोय लावली (चाल- वाट लावली) होतीच. संध्याकाळचं काय? ह्या प्रश्नानं भांडूप पालथं घालायला सुरुवात केली अन अचानक एक दिवस एक आडबाजूला असलेल्या सातारी खानावळीचा शोध लागला. त्या मावशी सातारच्याच. पोरगा म्हमईत 'अजिंक्यतारा' ट्याक्सी चालवायचा अन मावशी पोराच्या संसाराला मदत म्हणून खानावळ! देवाऽऽ....काय चिकन करायच्या त्या..ओहोहो!!! खानावळ म्हणजे काय, एक टपरीसदृश दुकान, त्यासमोर मांडलेले चार मळकट बाक..बस्स! पण चव काय होती...सातारी पध्दतीच्या खान्याचं वेड लागलं ते इथूनच. आजूबाजूला सातारकडचे रिक्षावाले, टॅक्सीवाले बसलेले असायचे अन त्यांच्यात 'ऑड म्यान आउट' मी! मस्त डाव्या उजव्या हातानं भाकरी कुस्करायची, तीवर तो झणझणीत रस्सा ओतायचा अन तो काला हाणायचा..आहाहाहाहा....काय याद जागी करवून दिलीत सानिकाताई तुम्ही!

बाकी, ते कांदा-लसूण तिखट जगात भारी शोध आहे बरं का. कधी असा प्रकार करुन बघा-
कांदा-लसुण तिखट - बचकभर
तेल - कांदालसुण तिखट कालवलं जाईल इतपत.
लवंगी मिरच्या - चार-सहा (काळपट रंगावर गेलेल्या )
दही - वाडगाभर
कादा - नग १ (बुक्कीनं फोडलेला)
भाकरी - आपापल्या तबियतीनुसार. :)
मीठ - चवीपुरतं.

बास्स! हे एव्हढंच. पक्वान्नं झक्क मारतात की हो हेच्यापुढं :)

चिंतामणी's picture

18 Apr 2013 - 10:42 am | चिंतामणी

मस्त डाव्या उजव्या हातानं भाकरी कुस्करायची, तीवर तो झणझणीत रस्सा ओतायचा अन तो काला हाणायचा..आहाहाहाहा...

हिच खाण्याची खरी पध्दत. भले असे खाणा-याला मागासलेला समजोत.

दीपा माने's picture

18 Apr 2013 - 9:32 am | दीपा माने

मस्त झणझणीत दिसतेय कोंबडी.

स्पा's picture

18 Apr 2013 - 9:38 am | स्पा

अगायायाया

....

..
...
.................................

झकास्स्स्स्स्स्....कोंबडी रस्सा आणि तांदळाच्या भाकर्‍या बघुनच खपलो...!!!
ह्या रविवारीच बेत करायला हवा आता.

सुमीत भातखंडे's picture

18 Apr 2013 - 10:48 am | सुमीत भातखंडे

त्या भाकरीने जीव घेतला राव.
शाकाहारी असलो तरी शेवटचा फोटो पाहून जाम त्रास झाला

इरसाल's picture

18 Apr 2013 - 10:59 am | इरसाल

तुमचा जाहीर निषेध करत आहे.
आज उपवासाच्या दिवशी असले खतरनाक फोटो ते ही मांसाहाराचे (शिव शिव शिव)
कुठे फेडाल हे पाप ? (उद्या खावु घालुन अर्थात....बघा बरं नाहीतर कढईचा कान तोच तो फोटोत दिसणारा ..तुटेल....माझ्या जिभेवर तीळ आहे म्हणे :)) )

दिपक.कुवेत's picture

18 Apr 2013 - 11:55 am | दिपक.कुवेत

फोटो पाहुनच खपलो. हाय भाकरी खाये एक अरसा हो गया! खरं तर भाकरीची लज्जत चिकन, मटन, अंडा करी अश्या रस्सेवाल्या पाकॄ बरोबरच खुलते. ह्या वेळच्या भारतवारीत आण्यायच्या लीस्ट मधे कांदा-लसूण मसाला अ‍ॅड केला गेला आहे आणि ह्या पाकॄची वाचनखुण साठवुन ठेवतोय.

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2013 - 12:39 pm | प्रसाद गोडबोले

मस्तच ... पाककृती !! तोंपासु !!

गावाची आठवण झाली ! मला लहानपणा पासुन वाटायचं की सातार्‍याच्या २ च गोष्टी प्रसिध्द
१) कंदी पेढे २) सातारी जर्दा

पण सातार्‍याची झणझणीत कोंबडीही प्रसिध्द आहे हे पाहुन फार आनंद झाला ( मला ... कोंबडीला नाही )

भावना कल्लोळ's picture

18 Apr 2013 - 1:06 pm | भावना कल्लोळ

त्यामुळे सासूबाईची मर्जी झाली कि मिळते आम्हाला अशी मेजवानी वीकांताला. तरी पण फोटो पाहून या विकांताला स्पेशल फर्माईश करते सासूबाई कडे आणि खाते वरपून.

केदार-मिसळपाव's picture

18 Apr 2013 - 1:10 pm | केदार-मिसळपाव

निव्वळ अप्रतीम....

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2013 - 1:12 pm | परिकथेतील राजकुमार

गवताळ असल्याने फकस्त फटू साठी धागा उघडून पाहिला.
तृप्त झालो.

वामन देशमुख's picture

18 Apr 2013 - 1:13 pm | वामन देशमुख

फारंच मस्त पाकृ आणि सादरीकरण!
शेवटच्या फोटोतल्या भाकरी खरोखरच्या आहेत कि प्लास्टिकच्या?:) (हघ्याहेवेसांन)

-(मराठवाड्यातला, टाळकी ज्वारीच्या भाकरी हादडणारा) वामन

गौरीबाई गोवेकर's picture

18 Apr 2013 - 1:18 pm | गौरीबाई गोवेकर

मस्तच फोटू. भाकरी क्लास.

कच्ची कैरी's picture

18 Apr 2013 - 5:15 pm | कच्ची कैरी

झक्कास आणि झण्झणीत !!!!!

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 8:34 pm | तुमचा अभिषेक

मोठमोठ्या अन महागड्या हॉटेलात पदरचे पैसे खर्च करून जावे तरीही असे काही बघायला मिळत नाही तिथे तुमच्या हातचे असे खतर्रनाक कोंबडी मटणाचे जेवण चापणार्‍यांचा हेवा वाटून गेला क्षणभर...

झणझणीत दिसतय कोंबडी रस्सा आणि तांदळाच्या भाकर्‍या!!!
पण सातार्याला जाणार कोण कोंबडी आणायला? फारंच मस्त पाकृ आणि सादरीकरण!
कोंबडीचे तुकडे हळद + मीठ + भाजलेले धणे पावडर + जिरे पावडर
लावून ठेवले असते तर अजुन मस्त झाले असते असे मला वाट्त.

पोस्ट चा विषय वाचल्यावर पोस्ट उघडून न बघणं शक्य नव्हतं. एकदम टेम्प्टिंग आहे!

सानिका ऑनलाईन कुकींग कोर्स सुरु करा. मी येते शिकायला. ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Apr 2013 - 1:54 am | निनाद मुक्काम प...

फोटो पाहून जीव वेडापिसा झाला.
अस्सल घरगुती चव असलेले मांसाहारी जेवणाची चव पंचतारांकित हॉटेलात सुद्धा येत नाही , व घरी करत नसल्याने कोणाकडे घरी आमंत्रण आल्यावर न चुकता जायचो.
सध्या मात्र उकडलेले लिबलिबीत अन्न गौर्मेट म्हणून खाल्ले जाते.
अश्यावेळी असा धागा उघडून पहिले की जीव कासावीस होतो.
Hungry

अमेय६३७७'s picture

20 Apr 2013 - 8:04 pm | अमेय६३७७

कोंबडी भाकरीचे फोटो आणि कृती खूप आवडली

विसोबा खेचर's picture

27 Apr 2013 - 6:19 pm | विसोबा खेचर

.....................

जयवी's picture

30 Apr 2013 - 10:21 pm | जयवी

अहा...........कातिल दिसतेय तुझी सातारी कोंबडी :)

तुमची हि पाकृ फेसबूक वर वाचली, 'स्वादिष्ट' नावाच्या ग्रुपमध्ये. तुमचं नाव नव्हतं तिथे. पुरुषोत्तम देशमुख नावाच्या व्यक्तीने दिली होती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Dec 2013 - 7:09 am | कैलासवासी सोन्याबापु

मुख त्स्युनामी!!!!

आयुर्हित's picture

11 Jan 2014 - 2:59 pm | आयुर्हित

काय सही रेसिपी आहे, व्वा. तोंडाला पाणी सुटले माझ्या.
तील, खोबरे,खसखस म्हणजे नक्कीच वेगळी टेस्ट असणार!
चला उद्याच करून बघतो.

धन्यवाद,
आपला मिपास्नेही : आयुर्हीत