झणझणीत सातारी कोंबडी

सानिकास्वप्निल पाककृती
सुधा मायदेव ह्यांच्या लाजवाब मालिकेतल्या चिकन ह्यामधील ही पाककृती आहे.पाककृतीचे प्रमाण मी आमच्या आवडी व चवीप्रमाणे बसवले आहे. साहित्य: अर्धा किलो कोंबडीचे तुकडे हळद + मीठ लावून ठेवलेले २ कांदे उभे चिरलेले ५-६ लसुण + १ इंच आले ठेचून ३ टेस्पून कांदा-लसूण मसाला (हा मसाला खूप तिखट असतो , थोडी चव घेऊन बघा व त्याप्रमाणे घालावा) २ टेस्पून सुके खोबरे १ टेस्पून पांढरे तीळ १ टेस्पून खसखस १ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १/२ टीस्पून हळद मीठ चवीप्रमाणे ३ लसूण पाकळ्या बारीक चिरलेली कोथींबीर तेल . पाकृ: एका पॅनमध्ये तीळ, खसखस व सुके खोबरे कोरडेच सोनेरी रंगावर भाजून घ्या. भाजलेले जिन्नस वेगळ्या ताटलीत काढून घ्या. पॅनमध्ये १ टेस्पून तेल घालून ३ लसूण पाकळ्या परतून घ्या. लसूण सोनेरी-तांबूस रंगावर परतल्यावर त्यात उभे चिरलेले कांदे घालून लालसर रंगावर परतावे. थोडे गार झाले की खसखस, तीळ, सुके खोबरे, परतलेले कांदा+लसूण एकत्र करून, थोडे पाणी घालून वाटून घ्या. . जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉन-स्टीक भांड्यात ४ टेस्पून तेल गरम करावे व त्यात आले+लसूण ठेचा घालून परता. खमंग परतले की त्यात वरील वाटण घाला. त्यात लाल तिखट, हळद, कांदा-लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता. आता त्यात चिकनचे तुकडे व मीठ घालून परता व गरजेनुसार पाणी घालून, झाकून उकळी आणा. . चिकन शिजले की वरुन थोडी कोथींबीर घाला. झणझणीत सातारी कोंबडी गरमा-गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा. . नोटः मुळ पाककृतीत एक किलो कोंबडीचे प्रमाण दिले आहे मी अर्धा किलोच्या व आमच्या आवडीप्रमाणे प्रमाण बसवले आहे. मुळ पाककृतीत आल्याचा वापर अजिबात नव्हता, मी आले घातले, चांगले लागले. लसणाचा वापर जास्तं आहे पण इथे मिळणारे लसून मोठं असतं म्हणून पाकळ्या त्याप्रमाणे घेतल्या आहेत, तुम्ही जास्तं घेऊ शकता. कांदा-लसूण मसल्यात ही मिरच्या व इतर मसाले असल्यामुळे तो तसा झणझणीत असतो, म्हणून घालताना आवडीप्रमाणे कमी-जास्तं घालावे.

64 टिप्पण्या 25,388 दृश्ये

Comments

प्यारे१ नवीन

In reply to by तुषार काळभोर

भाकरी चे अनेकवचन 'भाकरी'च आहे. धन्यवाद. सामिष खात नसल्याने अम्मळ कमी श्या देण्यात आलेल्या आहेत. प्रेझेन्टेशन्साठी आहेतच. ;)

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by प्यारे१

असहमत. भाकरीचे अनेकवचन भाकर्‍याच आहे. आठवा "लष्कराच्या भाकर्‍या भाजणे"

रेवती नवीन

काय म्हणावं फोटूला? भारी, अगदी भारी. शाकाहारी असल्याने हा पदार्थ खाता येणार नाही पण चवदार झाला असणार असे वाटत आहे.

सानिकास्वप्निल नवीन

In reply to by यशोधरा

हॅ हॅ ते आपले काम नाही सासूबाई गावावरुन आणून ठेवतात आणी मी तो सरळ घेऊन येते ;) मसाले घरी बनवणे वगैरे अजूनतरी कधी केले नाही मी.

इरसाल नवीन

In reply to by सानिकास्वप्निल

सासूबाई गावावरुन आणून ठेवतात आणी मी तो सरळ घेऊन येते
आयतोबा कुठली ? उम्म्म्म (गाल फुगवुन भुवया उडवुन डोळे फिरवणारी बाहुली कल्पावी )

सस्नेह नवीन

In reply to by यशोधरा

यशो, तुला हवे असल्यास साहित्य, प्रमाण अन कृती व्यनी करते. पण फटू गिटू नही है अपनके पास !

स्मिता चौगुले नवीन

In reply to by यशोधरा

कांदा-लसूण मसाल्याची (गावराण) पाकृ देवु शकते. आई कदुन शिकले आहे ते. आम्ही तो १ किलो वैगेरे करतो एकदाच. त्याचे प्रमाण मी देवू शकते पण फोटो वैगेरे नाहित हा कांदा-लसूण मसाला(आम्ही त्याला मसला तिखट/काळे तिखट असे म्हणतो) फार झणझणीत असतो, थोडासाही पुरे होतो. मस्त तर्रीवाले मटण्-चिकण होते आणि हे वापरुन भाजी केली तर इतर मसाल्याची गरज ही नसते

अर्धवटराव नवीन

लाभले भाग्य आम्हा, वाचतो सानिकेचे पाकृ. धन्य झालो. अर्धवटराव

लॉरी टांगटूंगकर नवीन

फोटो फार फार जीवघेणे आहेत.

चिंतामणी नवीन

तों.पा.सु. शेवटचा फोटो पाहून खपलो. बाकी काही लिहायची गरज नाही. तु सातारकरांची सुन आहेस म्हणल्यावर सगळेच त्यात आले.

प्रभाकर पेठकर नवीन

शक्यतो माझे मसाले मीच बनवितो. म्हणजे, पुस्तकात किंवा आंतरजालावर पाहून आणि आपल्या आवडीनुसार त्यातील जिन्नस कमीजास्त करून हवी तशी चव आणण्याचा प्रयत्न करतो. कालच भारतातून कोणी झणझणीत कांदालसूण मसाला सँपल म्हणून आणून दिला आहे. तो वापरून त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे. आता ह्या पाककृतीनुसार 'सातारी कोंबडी' करून पाहतो. शेवटचे छायाचित्र खतरनाक आहे.

धमाल मुलगा नवीन

एक जरा तो शेवटचा फोटू बघितला आणि डायरेक्ट सर्गात जाऊन पोचलो राव! काय छळ लावलाय रे? आँ? :) ह्या सातारी रश्श्यावरुन आठवण आली ती आमच्या म्हमईतल्या दिवसांची. हापिसातल्या शेट्टी केटरर्सनी दुपारच्या जेवणाची सोय लावली (चाल- वाट लावली) होतीच. संध्याकाळचं काय? ह्या प्रश्नानं भांडूप पालथं घालायला सुरुवात केली अन अचानक एक दिवस एक आडबाजूला असलेल्या सातारी खानावळीचा शोध लागला. त्या मावशी सातारच्याच. पोरगा म्हमईत 'अजिंक्यतारा' ट्याक्सी चालवायचा अन मावशी पोराच्या संसाराला मदत म्हणून खानावळ! देवाऽऽ....काय चिकन करायच्या त्या..ओहोहो!!! खानावळ म्हणजे काय, एक टपरीसदृश दुकान, त्यासमोर मांडलेले चार मळकट बाक..बस्स! पण चव काय होती...सातारी पध्दतीच्या खान्याचं वेड लागलं ते इथूनच. आजूबाजूला सातारकडचे रिक्षावाले, टॅक्सीवाले बसलेले असायचे अन त्यांच्यात 'ऑड म्यान आउट' मी! मस्त डाव्या उजव्या हातानं भाकरी कुस्करायची, तीवर तो झणझणीत रस्सा ओतायचा अन तो काला हाणायचा..आहाहाहाहा....काय याद जागी करवून दिलीत सानिकाताई तुम्ही! बाकी, ते कांदा-लसूण तिखट जगात भारी शोध आहे बरं का. कधी असा प्रकार करुन बघा- कांदा-लसुण तिखट - बचकभर तेल - कांदालसुण तिखट कालवलं जाईल इतपत. लवंगी मिरच्या - चार-सहा (काळपट रंगावर गेलेल्या ) दही - वाडगाभर कादा - नग १ (बुक्कीनं फोडलेला) भाकरी - आपापल्या तबियतीनुसार. :) मीठ - चवीपुरतं. बास्स! हे एव्हढंच. पक्वान्नं झक्क मारतात की हो हेच्यापुढं :)

चिंतामणी नवीन

In reply to by धमाल मुलगा

मस्त डाव्या उजव्या हातानं भाकरी कुस्करायची, तीवर तो झणझणीत रस्सा ओतायचा अन तो काला हाणायचा..आहाहाहाहा...
हिच खाण्याची खरी पध्दत. भले असे खाणा-याला मागासलेला समजोत.

सुमीत भातखंडे नवीन

त्या भाकरीने जीव घेतला राव. शाकाहारी असलो तरी शेवटचा फोटो पाहून जाम त्रास झाला

इरसाल नवीन

तुमचा जाहीर निषेध करत आहे. आज उपवासाच्या दिवशी असले खतरनाक फोटो ते ही मांसाहाराचे (शिव शिव शिव) कुठे फेडाल हे पाप ? (उद्या खावु घालुन अर्थात....बघा बरं नाहीतर कढईचा कान तोच तो फोटोत दिसणारा ..तुटेल....माझ्या जिभेवर तीळ आहे म्हणे :)) )

दिपक.कुवेत नवीन

फोटो पाहुनच खपलो. हाय भाकरी खाये एक अरसा हो गया! खरं तर भाकरीची लज्जत चिकन, मटन, अंडा करी अश्या रस्सेवाल्या पाकॄ बरोबरच खुलते. ह्या वेळच्या भारतवारीत आण्यायच्या लीस्ट मधे कांदा-लसूण मसाला अ‍ॅड केला गेला आहे आणि ह्या पाकॄची वाचनखुण साठवुन ठेवतोय.

प्रसाद गोडबोले नवीन

मस्तच ... पाककृती !! तोंपासु !! गावाची आठवण झाली ! मला लहानपणा पासुन वाटायचं की सातार्‍याच्या २ च गोष्टी प्रसिध्द १) कंदी पेढे २) सातारी जर्दा पण सातार्‍याची झणझणीत कोंबडीही प्रसिध्द आहे हे पाहुन फार आनंद झाला ( मला ... कोंबडीला नाही )

भावना कल्लोळ नवीन

त्यामुळे सासूबाईची मर्जी झाली कि मिळते आम्हाला अशी मेजवानी वीकांताला. तरी पण फोटो पाहून या विकांताला स्पेशल फर्माईश करते सासूबाई कडे आणि खाते वरपून.

परिकथेतील राजकुमार नवीन

गवताळ असल्याने फकस्त फटू साठी धागा उघडून पाहिला. तृप्त झालो.

वामन देशमुख नवीन

फारंच मस्त पाकृ आणि सादरीकरण! शेवटच्या फोटोतल्या भाकरी खरोखरच्या आहेत कि प्लास्टिकच्या?:) (हघ्याहेवेसांन) -(मराठवाड्यातला, टाळकी ज्वारीच्या भाकरी हादडणारा) वामन

तुमचा अभिषेक नवीन

मोठमोठ्या अन महागड्या हॉटेलात पदरचे पैसे खर्च करून जावे तरीही असे काही बघायला मिळत नाही तिथे तुमच्या हातचे असे खतर्रनाक कोंबडी मटणाचे जेवण चापणार्‍यांचा हेवा वाटून गेला क्षणभर...

ganu नवीन

झणझणीत दिसतय कोंबडी रस्सा आणि तांदळाच्या भाकर्‍या!!! पण सातार्याला जाणार कोण कोंबडी आणायला? फारंच मस्त पाकृ आणि सादरीकरण! कोंबडीचे तुकडे हळद + मीठ + भाजलेले धणे पावडर + जिरे पावडर लावून ठेवले असते तर अजुन मस्त झाले असते असे मला वाट्त.

निनाद मुक्काम … नवीन

फोटो पाहून जीव वेडापिसा झाला. अस्सल घरगुती चव असलेले मांसाहारी जेवणाची चव पंचतारांकित हॉटेलात सुद्धा येत नाही , व घरी करत नसल्याने कोणाकडे घरी आमंत्रण आल्यावर न चुकता जायचो. सध्या मात्र उकडलेले लिबलिबीत अन्न गौर्मेट म्हणून खाल्ले जाते. अश्यावेळी असा धागा उघडून पहिले की जीव कासावीस होतो. Hungry

अमेय६३७७ नवीन

कोंबडी भाकरीचे फोटो आणि कृती खूप आवडली

garava नवीन

तुमची हि पाकृ फेसबूक वर वाचली, 'स्वादिष्ट' नावाच्या ग्रुपमध्ये. तुमचं नाव नव्हतं तिथे. पुरुषोत्तम देशमुख नावाच्या व्यक्तीने दिली होती.

आयुर्हित नवीन

काय सही रेसिपी आहे, व्वा. तोंडाला पाणी सुटले माझ्या. तील, खोबरे,खसखस म्हणजे नक्कीच वेगळी टेस्ट असणार! चला उद्याच करून बघतो. धन्यवाद, आपला मिपास्नेही : आयुर्हीत