उस सिक्सर की गूंज!

Primary tabs

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
6 Mar 2013 - 12:05 am

पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी...

गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही! काही तुरळक अपवाद वगळता १९८५ पर्यंत फारसे काही इंटरेस्टिंग नव्हते.

आधी मुळात १९८३ मधे वर्ल्ड कप जिंकेपर्यंत कोणी वन डे पाहातच नव्हते (आणि दूरदर्शनही दाखवत नव्हते, लोकांना काडीचा इंटरेस्ट नसलेल्या इतर अनेक गोष्टी होत्या त्यांना दाखवायला :) ). टेस्ट्स सोडा, पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमधेही ज्यांची रेकॉर्ड्स धरली जात नसत (अजूनही नाहीत) असे हे सामने, त्याची वेगळी रेकॉर्ड्स नंतर ठेवली जातील असे कोणाला वाटलेही नसेल. भारत-पाक काही सामने झाले पण कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. ८३ नंतर लोक जागे झाले. मग प्रत्येक कसोटी दौर्‍यात ३-४ वनडे ही होऊ लागले. आत्तासारखे बोलर्सना जखडून टाकणारे नियम नसल्याने लोक २२५-२३० धावा करत. ५ चे अ‍ॅव्हरेज म्हणजे एकदम सेफ!

त्यात भारत पाक म्हणजे एकदम तुल्यबळ! कारण दोन्हीही संघ तितकेच वाईट होते. अनेक ढेरपोटे, आरामशीर खेळणारे खेळाडू, अफाट क्षेत्ररक्षण कौशल्य, "एकवेळ जिंकलो नाहीतरी चालेल, पण हरता कामा नये" या मनोवृत्तीतून खेळलेल्या डिफेन्सिव्ह मॅचेस वगैरे त्यामुळे बघायलाही मजा येत नसे. ऑस्ट्रेलियाने डेनिस लिलीच्या बोलिंगवर ९ खेळाडून स्लिप मधे लावले ते आक्रमकतेमुळे. आपण कपिलच्या किंवा पाक ने इम्रानच्या वेळेस असे ७-८ लावले असते तर ते कोणीच दुसरीकडे फिल्डिंग करायला तयार नसल्याने असते :)

पण १९८५ मधला ऑस्ट्रेलियातील बेन्सन अॅण्ड हेजेस कप आला, आणि मॅचेस चे कव्हरेज किती सुंदर असू शकते हे दिसले. तेव्हा मॅचेस पाहिलेल्यांना पहाटे उठून ५ वाजल्यापासून अतिशय स्पष्ट व सुंदर प्रक्षेपणात भारताने मिळवलेले विजय आठवत असतील. वर्ल्ड कप फायनल प्रमाणे महत्त्व आलेल्या त्या मॅच मधे भारताने पाक ला दणदणीत हरवले, लगेच शारजा मधे फक्त १२५ रन्स जिंकायला हवे असताना पाकला ८७ मधे उखडून मॅच जिंकली. असे एक दोन लक्षात राहण्यासारखे सामने सोडले तर विशेष काही नव्हते.

मात्र शारजामधे झालेल्या मॅचेसच्या लोकप्रियतेमुळे तेथे अजून स्पर्धा भरवल्या जाऊ लागल्या. त्यातीलच एक- एप्रिल १९८६ ची ऑस्ट्रेलेशिया कप स्पर्धेची फायनल.

अजून ती मॅच आठवत आहे. आपण मारलेल्या २४५ तेव्हाच्या जमान्यात बर्‍यापैकी होत्या. त्याला उत्तर देताना पाकी गडबडले होते आणि आस्किंग रेट नेहमीच जास्त होता. पण नेहमीप्रमाणे मियाँदाद आउट होत नव्हता. तो आपल्याविरूद्ध तेव्हा चांगला खेळत असे हे खरे पण त्यात तेव्हाचे आपले कॅप्टन्स त्याला तसाच ठेवून दुसरीकडचे लोक आउट करायच्या मागे लागत (१९९२ च्या वर्ल्ड कप मॅच मधे मियाँदाद सहज रन आउट होउ शकत असताना- बहुधा तो पोहोचला असेल हे गृहीत धरून- किरण मोरेने खाली सलीम मलिकला आउट करायचा प्रयत्न केलेला खालच्या लिन्कमधे दिसेल, ). त्यामुळे त्याला बराच मोकळा सोडला जाई.

या मॅच मधे शेवटच्या ओव्हरपर्यंत मागे मागे राहून सुद्धा मियाँदाद खेळत राहिला आणि पळून रन्स काढत राहिला. ११६ मधले तब्बल ८६ रन्स त्याने पळून काढलेले आहेत! कपिलचे प्लॅनिंग गडबडल्यामुळे शेवटची ओव्हर चेतन शर्माकडे आली आणि शेवटच्या बॉलला ४ रन्स हवे आहेत अशी अवस्था झाली. खरे म्हणजे अगदी त्या ओव्हर पर्यंत भारतच जिंकणार याची खात्री होती, पण शर्मासाहेबांनी तो बॉल फुलटॉस दिला, मियाँदादने तो बाउण्ड्रीबाहेर मारला आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी भारतीय खेळाडूंवर "मनोवैज्ञानिक दबाव" टाकला! :)

नंतर पुढचा काळ भारत-पाक क्रिकेट म्हणजे 'राजा शिवछत्रपती' मधल्या "तीनशे वर्षांची काळरात्र" वाचताना जसे पुढे अनेक पाने काही सुखद वाचायला मिळणार नाही असे वाटते तसे काहीसे होते. त्या एका सिक्स ने तोपर्यंत असलेला भारत-पाक सामन्यांचा बॅलन्स पार उधळला. त्यानंतर अनेक वर्षे आपण त्यांच्याविरूद्ध जिंकू असे कधीच वाटले नाही. पुढच्या काही सिरीजमधे तर त्यांची अवस्था कितीही अवघड असली तरी कोणीही येउन बॅटी फिरवून किंवा विकेट्स काढून त्यांना जिंकून देई आणि आपले लोक हताश अवस्थेत पाट्या टाकत. मला ८६ च्या दौर्यातील एक मॅच आठवते- ती भारताच्या खिशात असताना सलीम मलिकने उभे आडवे पट्टे फिरवून साधारण ३६ बॉल्स मधे ७२ मारले आणि कोणताही बोलर ते थोपवू शकला नाही - प्रेक्षक आणि फिल्डर्स यात काही फरक नव्हता तेव्हा तेथे. साधारण असेच चालू होते. अपवाद फक्त वर्ल्ड कप मॅचेसचा - तेव्हा जणू वेगळाच संघ पाक विरूद्ध खेळत असे. त्याव्यतिरिक्त एखादा ढाक्यातील १९९८ चा ३१५ चेस करून जिंकलेला विजय व टोरांटो मधले काही सामने सोडले तर भारत पाक मॅचेस बघायला बसणे म्हणजे उगाच दिवस वाया घालवण्यासारखेच होते.

या मॅच नंतर पुढच्या १७ वर्षांत भारताचा पाक विरूद्ध स्कोर २२ विजय व ४४ पराभव. याचा परिणाम कसोटीतही झाला होता. बहुतेक मॅचेस म्हणजे वाघ वि. शेळी असेच सामने!

मग एप्रिल १९८६ च्या त्या षटकारानंतर खूप नवीन खेळाडू आले, जुने निवृत्त झाले तरी ९० च्या दशकात यात फारसा फरक पडला नाही. वासिम अक्रम, वकार, सकलैन मुश्ताक, अकीब जावेद व नंतर शोएब अख्तर... सारखे बोलर्स किंवा सईद अन्वर, आमिर सोहैल, इजाज अहमद, सलीम मलिक, इंझमाम सारखे बॅट्समन... कोणीहे सहज मॅचेस फिरवत असे. २००० पर्यंत आपले लोक त्यांच्याविरूद्ध दबूनच खेळायचे.

त्यानंतर २००० पासून २००३ पर्यंत मधे मॅचेसच झाल्या नाहीत. २००३ ची १ मार्चची लढत सुमारे एक वर्ष आधीपासूनच माहीत होती लोकांना, कारण सचिनच्या म्हणण्यानुसार तो जेथे जाईल तेथे लोक त्याला आठवण करून देत. तोपर्यंत भारताने ३ पैकी ३ वेळेस पाक ला वर्ल्ड कप मधे हरवले होते, यावेळेस काय होणार याची उत्सुकता होती. सुरूवातीला चाचपडणारा आपला संघ या मॅचपर्यंत स्थिरावला होता, तर पाक या मॅचपर्यंत इतर मॅचेस हरल्याने 'हरले तर बाहेर' स्थितीत होता, म्हणजे जास्त डेंजरस, ते "कॉर्नर्ड टायगर्स" वगैरे!

पाक ने पहिल्यांदा बॅटिंग करून २७३ मारल्यावर त्यांच्या कोणीतरी भारताला उद्देशून काहीतरी कॉमेंट मारली आणि ते ऐकल्यावर नंतर बॅटिंग ला जाताना "I am going to get these guys" म्हणून खेळायला गेलेला तेंडुलकर त्यादिवशी शोएबला तीन वर्षांनंतर खेळत होता. त्याअधी त्याने कलकत्यात सचिनला पहिल्या बॉलला काढले होते. तेव्हाच्या एक दोन सिरीज मधे आपले लोक शोएबला भलतेच घाबरून खेळले होते. तेव्हा होत असलेल्या पाठदुखीमुळे सचिनही आक्रमक खेळला नव्हता १९९९-२००० मधे. मात्र या मॅचमधे ते सगळे भरून निघाले. येथे सचिन वेगळ्याच अवतारात होता. पहिल्या दोन तीन ओव्हर्सनंतरच पाकची हवा निघून गेल्याचे दिसू लागले. नंतर सेहवाग व गांगुली लागोपाठ आउट झाल्यावर निर्माण झालेली आशा सचिनने आणखी झोडपून घालवली. पाकला इतके निराश क्वचित पाहिले होते त्याआधी. शोले मधला सुरूवातीचा गब्बर व शेवटी भेदरून ठाकूर कडे बघणारा गब्बर, एवढा फरक.

ही मॅच जिंकण्यात सचिन इतकाच द्रविड-युवराज च्या भागीदारीचाही हात होता हे नक्की. अर्थात सचिन आउट होईपर्यंत पाक टीम मानसिकरीत्या पूर्ण खचली होती हे अगदी दिसत होते. पण तेव्हा अजून १०० रन्स करायचे होते आणि पूर्वी पाकला अशा वेळेस १५-२० रन्स सुद्धा पुरत :)

ही मॅच हरल्यावर पाक स्पर्धेतून बाहेर गेले. या मॅचनंतर शोएबची बद्दलची सगळी भीतीच गेली. सेहवाग पासून इतर सर्व जण त्याला हुकमी मारू लागले. तो पुन्हा भारताविरूद्ध उठून दिसण्याएवढा यशस्वी कधीच झाला नाही. अक्रम व वकार दोघेही निवृत्त झाले. अब्दुल रझ्झाक व सकलैन मुश्ताक- ज्यांनी पूर्वी भारताविरूद्ध एकहाती मॅचेस जिंकून दिल्या होत्या, ते ही नंतर कुचकामी ठरले.

ज्यांनी ८० च्या दशकात भारत पाक मॅचेस पाहिलेल्या असतील त्यांना चांगले लक्षात असेल की "एकवेळ इतर कोणत्याही संघाला आपण त्यांच्या घरी हरवू शकतो पण पाकला कधीच नाही", असेच नेहमी वाटायचे. कधी त्यांचे खेळाडू, कधी अंपायर्स व बहुतेक वेळेस कसलाच किलर इन्स्टिंक्ट न दाखवणारे आपले खेळाडू (या मॅच मधे साधारण २८-२९ मिनीटांमधे श्रीनाथला फोर मारल्यावर त्याची बॉडी लँग्वेज पाहा) यामुळे तेथे जाऊन आपण कधी जिंकू असे वाटलेच नाही. या मॅच नंतर पुढच्याच वर्षी आपण तेथे कसोटी व वन डे मालिका जिंकल्या. आता पाक विरूद्ध मॅच म्हणजे काहीच दडपण दिसत नाही. युवराज, कोहली सारखे लोक तर उद्या एखाद्याने उर्मटपणा केला तर आणखी दुप्पट उर्मटपणा करतील असे आहेत.

८६ मधल्या मियाँदादच्या सिक्सची सचिनच्या २००३ मधल्या सिक्सने तितकीच जोरदार परतफेड केली! एखादी मॅच पूर्ण संघाच्या मनावर किती जोरदार परिणाम करू शकते हे २००१ च्या कोलकत्याच्या मॅचमुळे आपल्याला माहीत आहे, माझ्या मते २००३ ची ही मॅचही तशीच होती!

आस्वादलेखक्रीडा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

6 Mar 2013 - 12:25 am | आदूबाळ

अप्रतिम लेख, फारएन्ड!

'वह सिक्सर' हा भारत-पाक सामन्यांतला "टिपिंग पॉईंट" होता हे नक्की. त्यापुढील वर्षांत पाक संघाची एकुणातच वाताहत झाली.

सचिनने मारलेल्या छ़कडीच्या क्लिपमध्ये कॉमेंटेटर रमीज राजाच्या आवाजातला अविश्वास लपत नाही. तो पहिल्यांदा म्हणतो "शोएबने विड्थ दिली" - सूर असा की असले चेंडू पडल्यावर असा फटका कोणीपण मारेल. नंतर त्याची त्यालाच लाज वाटली असावी बहुदा - "हॅट्स ऑफ" वगैरे सारवासारवी करतो.

असले शॉट खरं तर सेहवागची खासियत (होती?) सचिन इथे दाखवून देतो डैडी कोन आहे ते!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2013 - 12:27 am | अत्रुप्त आत्मा

मस्त...जबरदस्त...!!! मजा आली वाचताना :-)

उपास's picture

6 Mar 2013 - 12:35 am | उपास

भारत पाक क्रिकेट संदर्भात दोन गोष्टी -
१. अमिर सोहेलचा वेंकटेश प्रसादने काढलेला लकडा.. दिलेले जशास तसे उत्तर.. माज उतरवला त्याने.. भारताचा कॉन्फीडस वाढला तो अशा फाईट बॅक वृत्तीमुळे!
२. राजेश चौहानने साकलेन मुश्ताकला (चु भू द्या घ्या) शेवटच्या बॉलवर सिक्स मारुन विजय मिळवून दिला होता असं आठवतय..

मोदक's picture

6 Mar 2013 - 12:43 am | मोदक

कानेटकरला विसरलात..?

ऐन भरात असलेल्या सकलेनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोन बॉलमध्ये तीन रन हव्या असताना फोर मारून मॅच जिंकवली होती पठ्ठ्याने!!!

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2013 - 9:21 am | श्रीरंग_जोशी

# मोदक - ॠषिकेश कानिटकरला एकदम नाटककार करून टाकलेस!!

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2013 - 12:55 am | श्रीरंग_जोशी

तो तर १९९७ मध्ये पाकिस्तानातील सामन्यात मारला होता. फक्त शेवटच्या चेंडूऐवजी शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मारल होता.

या लेखाद्वारे रोमांचित करणार्‍या अनेक जुन्या आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल फारएन्ड यांचे आभार.

लौंगी मिरची's picture

6 Mar 2013 - 12:40 am | लौंगी मिरची

ये लगा सिक्सर !

टायिप लेखन . वाचकांची नजर खिळवुन आणि लक्ष पकडुन ठेवणारा लेख . तुमच्याकडुन अजुन वाचायला आवडेल वेगवेगळ्या विषयातलं लेखन .
लिहित रहा .

थोडसं अवांतर पण -
कुणाकडे बाळ पंडित, संत, व्ही. व्ही. करमकर ह्यांनी मराठीत केलेल्या धावत्या समालोजनाची ध्वनिफीत वगैरे कुठे मिळू शकेल काय?
"पुढचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर.. किंचित खोलवर टप्पा.. " असे शब्द कानावर आदळतायत :)

चौकटराजा's picture

6 Mar 2013 - 12:57 pm | चौकटराजा

आता निकी सलढाणा टिळक रस्त्याच्या बाजूने गोलंदाजीला आले आहेत. त्यांच्या साठी कानिटकर यानी दोन स्लीप....एक गली...

एरवी कांगा क्रिकेट मधे दादर युनियन कडून रणजी मधे मुम्बईकडून, दुलीपमधे पश्चिम विभागाकडून खेळणार्‍या फक्त पाच फूट चार इंच उंची असलेल्या सुनील मनोहर गावस्कर याने पहिल्याच षटकात स्क्वेअर लेग व मिडविकेटकडे एक एक धाव व नंतर पाचव्या चेंडूवर समोर द्णकेबाज स्ट्रेट ड्राएव्ह मारला त्यावेळी तीस हजार मुबईकराना १९४६ चा विजय मर्चंट यांच्या खेळीची आठवण निश्चिततच झाली असेल. ( हे पेपरातील समालोचन कोणाचे असेल बरं ??? )

निमिष ध.'s picture

6 Mar 2013 - 12:59 am | निमिष ध.

लेख अत्यन्त आवडला. उपास ने सान्गितल्या प्रमाणे वेंकटेश प्रसादची आठवण झाली.

उपास's picture

6 Mar 2013 - 1:14 am | उपास

फारेंण्डा, तू जी एक मार्चची मॅच म्हणतोयस त्यात द्रविड युवी नाही तर कैफ - युवी खेळले होते असं आठवतय..शोधायला हवं!

पैसा's picture

6 Mar 2013 - 9:16 am | पैसा

कैफने महत्त्वाची इनिंग खेळली होती ३५ धावांची पण पाकिस्तानला पोचवण्याचे काम द्रविड आणि युवराजने पार पाडले होते.

http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/65268.html

इथे पूर्ण धावफलक आणि कॉमेंटरी उपलब्ध आहे.

फारेण्डाचे लिखाण मस्तच! सचिन पाकिस्तानसाठी नेहमीच स्पेशल राखून ठेवतो. पण "फक्त पाकिस्तानविरुद्ध आउट झालो तर चालायला लागणार नाही" आणि "आपल्यावर हल्ले करणार्‍या पाकिस्तानविरुद्ध अजिबात मॅचेस खेळू नका" म्हणणार्‍या गावस्करचा ख्डूसपणा मला जास्त आवडतो.

उपास's picture

6 Mar 2013 - 7:43 pm | उपास

धन्यवाद पैसाताई!

तुमचा अभिषेक's picture

6 Mar 2013 - 9:38 am | तुमचा अभिषेक

अप्रतिम लेख, सकाळीसकाळी मजा आली वाचायला.
भारत-पाकिस्तानच्या सर्वात कटू आठवणी शारजाच्या सामन्यात भरल्या असाव्यात, तसेच शुक्रवारी आपण त्यांच्याशी हरायचोच हरायचो. ८०-९० च्या दशकातील तो काळ खरेच भारत-पाक सामना बघणे नकोसे वाटायचे असे लाजिरवाणे हरायचो. पाकिस्तानी खेळाडूंची जिद्द मानायला हवी हा तेव्हाचा ठरलेला डायलॉग. पण आपण त्यांच्याबरोबर पुचाट खेळायचो याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. उलट सुलट बरेच लिहिता येईळ इथे. बर्‍याच आठवणी जागवल्या या लेखाने. माझा सर्वात आवडता खेळाडू दादा गांगुली याने टोरेंटोमध्ये पाकिस्तानची लावलेली वाट निव्वळ अविस्मरणीय. मात्र सचिनच्या त्या इनिंगने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची लावलेली वाट हा खरेच एक टर्निग पॉईंट होता कारण भारतीय क्रिकेट रसिक जगात कोणावर मी जळत असतील तर ते पाकी वेगवान गोलंदाजांवर. पुढे द्रविड आणि युवराजच्या भागीदारीचा उल्लेखही योग्यच. ती देखील तितकीच महत्वाची, कारण तिथे घाण केली असती आणि रडतखडत जिंकलो असतो तर त्या सामन्याचा तितका इंम्पॅक्ट राहिला नसता. आज २०-२० च्या जमान्यात मात्र आक्रमकता हाच सर्वात मोठा गुण झाल्याने सगळी परिमाणेच बदलली आहेत. त्यामुळे युवराज-कोहली सारख्यांच्या उद्धटपणाबद्दल केलेली टिप्पणीदेखील योग्यच.

पिंपातला उंदीर's picture

6 Mar 2013 - 9:55 am | पिंपातला उंदीर

अप्रतिम लेख. भारतीय वृत्तीत झालेल्या या बदलाच श्रेय सौरव गांगुली ला द्यायला हवे. दादाने आपली देह्बोलिच (ऑन द ग्राउंड आणि ऑफ द ग्राउंड) बदलून टाकली. पाकिस्तान तर पाकिस्तान या दादाने ऑस्ट्रेलिया ला पण आपला हिसका दावला. तसेच भारताचा क्रिकेट मधला आर्थिक वाटा खूप वाढला. त्याचा परिणाम पण आपले मनोबल वाढण्यात झाला.

वेल्लाभट's picture

6 Mar 2013 - 10:47 am | वेल्लाभट

क्लास ! मस्तच लिहिलंय.

चावटमेला's picture

6 Mar 2013 - 11:10 am | चावटमेला

सुंदर आठवणी, प्रसाद ने सोहेल ची वाकविलेली दांडी तर अप्रतिमच.

या सामन्याच्या आधी सचिनने टेनिस बॉलवर रात्री उशिरापर्यंत षटकार मारण्याचा सराव केला होता असे ऐकले आहे

बॅटमॅन's picture

6 Mar 2013 - 12:55 pm | बॅटमॅन

काय आठवणी जागवल्या या लेखाच्या निमित्ताने!!!!! दिल क्रिकेट क्रिकेट हो गया :)

फारएंड साहेब, अतिशयित धन्यवाद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2013 - 1:14 pm | निनाद मुक्काम प...

सचिनची सिक्सर म्हटली की डोळ्यासमोर येतो
अब्दुल कादीर
धूर्त कोल्हा
ज्याचा गुगली खुद खुदा सुद्धा सांगू शकत नाही की कधी फलंदाजाला डसेल.
त्याने १६ वर्षाच्या मुलाला सांगितले , तुला तुझे नाव करायचे असेल तर मला ह्या ओवर मध्ये सिक्सर मारून दाखव ,
पुढे मुलाखतीत कादीर म्हणाला देखील माझ्या सारख्या विख्यात गोलंदाजाला सिक्सर मारली तर त्याचे नक्कीच नाव झाले असते, म्हणून मी त्याला तसे म्हणालो.
पण अल्ला कसम मी त्याला एकाही चेंडू सहज टाकला नव्हता.
त्याने लागोपाठ च्या सिकस मारल्या त्याने पाकिस्तानी स्टेडियम मध्ये मरणप्राय शांतता पसरली. इतना सन्नाटा क्यो हे भाई असा प्रश्न विचारायची पाळी आली.
ह्या आधी एवढा आक्रमक पणा ह्या आधी कोणालाच जमला नव्हता.
नाही म्हणायला ऐन उमेदीत इंग्लंड विरुद्ध फोलो ऑन टाळण्यासाठी कपिल ने सलग ४ सिक्सर मारले होते ,
पण पाकिस्तान विरुद्ध मात्र सगळ्यांची गात्र शिथिल व्हायची.
गावस्करचा वारसा चालवणार असे म्हणणारे सचिन चे त्यावेळचे चाहते व समीक्षक ह्यांनी आता एक नवीन वारसा नवे पर्व सुरु झाल्याचे मान्य केले.
आक्रमता व कलात्मकता ह्यांचा अभूतपूर्व संगम
चेतन असो किंवा कादिर
एक सिक्सर आदमी का करियर तबाह कर देता हे.
हेच सिद्ध झाले

एक सिक्सर आदमी का करियर तबाह कर देता हे.

अजून दोन उदाहरणे - हेन्री ओलोंगा आणि क्रेग मॅकडरमॉट

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2013 - 9:43 pm | श्रीरंग_जोशी

मनोज प्रभाकर - १९९६ विश्वचषकाआधी अष्टपैलू म्हणून ओळखला जाऊ लागला होता कारण सलामीला येऊन शतक केले होते. त्याच्यासारखे यॉर्कर आजही इतर भारतीय गोलंदाज टाकू शकत नसावेत. मर्यादित गुणवत्ता असली तरी एक उपयुक्त गोलंदाज नक्कीच होता.

पण १९९६ च्या विश्वचषकातील लंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात सनथ जयसुर्याने त्याची अशी काही धुलाई केली की अचानक मध्यम-द्रुतगतीवरून त्याला फिरकी गोलंदाजी करावी लागली. अन तो त्याचा अखेरचा सामना ठरला.

लाल टोपी's picture

6 Mar 2013 - 2:06 pm | लाल टोपी

अतिशय उत्त्म लेख ते दिवस पुन्हा आठवले. हल्ली बहुधा अति क्रिकेट मुळे तो रोमांचच हरवला आहे.

तर्री's picture

6 Mar 2013 - 3:51 pm | तर्री

जाम आवडला.
अशीच एक खेळी इंग्लंड वल्ड कप मध्ये "गांगुली -द्रविड " ने श्रीलंकेविरुद्ध केली होती. दोघांनी कुटून काढले होते.

फारएन्डा तुझे हे असले लेख म्हणजे आम्हा वाचकांसाठी मेजवानीच. :)

हा लेख म्हण्जे क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी.... अजुन असेच यउ द्यात.

मी-सौरभ's picture

6 Mar 2013 - 7:59 pm | मी-सौरभ

तुफान जमलाय लेख..

चौकटराजा's picture

6 Mar 2013 - 8:08 pm | चौकटराजा

भारतीय शालेय संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला होता. माझ्या आठवणीप्रमाणे त्यात सईद किरमाणी , सुरिंदर अमरनाथ हे होते.एका सामन्यात जिंकायला ११ धावा हव्या होत्या व फक्त दोन चेंडू बाकी असताना सुरींदरने दोन षटकार मारून विजय खेचून आणला.

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2013 - 8:12 pm | श्रीरंग_जोशी

हे मोहिंदरचे बंधू आहेत का?

पैसा's picture

6 Mar 2013 - 8:16 pm | पैसा

लाला अमरनाथचे ३ मुलगे. सुरिंदर विकेटकीपर, मोहिंदर अष्टपैलू आणि तिसरा राजिंदर बहुधा बॉलर होता. मोठे दोघे कसोटी खेळले. धाकटा रणजी खेळाडू.

चौकटराजा's picture

6 Mar 2013 - 8:19 pm | चौकटराजा

ते जरी फार कसोटी क्रिकेट खेळले नाहीत तरी आपल्या पहिल्याच कसोटीत शतक करणार्‍या भारतीयात ते समाविष्ट आहेत.

आपल्या पहिल्याच कसोटीत शतक करणार्‍या भारतीयात ते समाविष्ट आहेत.

आणि पुढे कधीच कसोटी शतक न करणार्या भारतीयांत...

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2013 - 8:25 pm | श्रीगुरुजी

षटकारांनी बरीच धमाल केलेली आहे. अलिकडच्या काळात २००७ मध्ये इंग्लंडच्या मॅस्कॅरॅन्हासने युवराजच्या एका षटकात ५ षटकार मारले होते. युवीने त्याचा बदला २००७ मध्येच ट-२० च्या विश्वचषकात स्टूअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारून घेतला होता.

काही आठवड्यांपूर्वी विंडीजच्या सुनील नारायणने कांगारूंच्या मॅक्सवेलच्या एका षटकात लागोपाठ ४ षटकार मारले होते.

१९८३ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत भारत इंग्लंडच्या २१३ धावांचा पाठलाग करताना ३९ षटकात २ बाद १०९ वर पोचला होता. धावा अतिशय संथ होत होत्या (प्रत्येक षटकात जेमतेम २-३ धावा निघत होत्या). शेवटच्या २१ षटकात १०५ धावा हव्या होत्या (तो सामना ६० षटकांचा होता). प्रतिषट्क ५ धावा हा त्या काळात खूप मोठा रनरेट होता. ४० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यशपाल शर्माने विलीसचा चेंडू फ्लिक करून स्क्वेअर लेगला षटकार मारल्यावर फटक्यांची दिवाळी सुरू झाली. नंतर संदीप पाटिल व कपिलने विलीसच्या एका षटकात ४-४ चौकार मारून शेवटी ६ षटके राखून सामना भारताला जिंकून दिला. यशपाल शर्माच्या षटकारानेच पुढच्या फटक्यांची बत्ती लावली होती.

मुक्त विहारि's picture

6 Mar 2013 - 8:47 pm | मुक्त विहारि

मजा आली वाचतांना..

मदनबाण's picture

6 Mar 2013 - 9:22 pm | मदनबाण

सुंदर लेखन...
पण... एके काळी प्रचंड आवडणारा हा खेळ आता पहावा सुद्धा वाटत नाही ! :(

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2013 - 10:29 pm | निनाद मुक्काम प...

शारजा मध्ये क्रिकेट चा फड रंगू लागला.
डी आपल्या बॉलीवूड सहकार्‍यांच्या सोबत तमाम भारतीयांना टीव्ही वर दिसायला लागला. अरुण गवळी व मुंबई पोलिस त्याला दुबईत गाठायचा कसा ह्या विचारात मग्न होते , मियादाद ने सिक्सर मारला तेव्हा डी चक्क मैदानात धावत आला व मियादाद ला घट्ट मिठी मारली.
बहुदा तेव्हाच त्याला आपला नातेवाईक करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली असेल.
मग सुरु झाला पैशाचा खेळ , जुगार
आणि अझर , मोंगिया , जडेजा आणि संशयित कपिल व प्रभाकर अशी नावे काळाच्या ओघात आपल्या समोर आली
शेवटी भारताने गल्फ मध्ये क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला.
त्याकाळात पाकिस्तान १३ खेळाडू सह आपल्याविरुद्ध खेळायचा,
अकिब जावेद ची हेटत्रिक आठवते,
सचिन सह एल बी डब्ल्यू अक्षरशः ढापले होते.

संदीप चित्रे's picture

6 Mar 2013 - 11:47 pm | संदीप चित्रे

बघता - बघता दहा वर्षं झालीही?
अजूनही असं वाटतंय की कालच तो सामना पाहिला होता :)

'बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस'मधे पहाटे पहाटे चुरचुरत्या डोळ्यांनी मॅच बघताना कपिलने स्विंगिंग यॉर्करवर मुदस्सर नझरचा त्रिफळा उडवलेला आठवतोय :)

सुमीत भातखंडे's picture

7 Mar 2013 - 10:39 am | सुमीत भातखंडे
सुमीत भातखंडे's picture

7 Mar 2013 - 10:40 am | सुमीत भातखंडे

अप्रतिम लेख

नाखु's picture

24 Nov 2015 - 8:55 am | नाखु

हा लेख कसा नजरेतून सुटला तेच कळत नाही...
सचिन-लक्ष्मण-द्रवीड कायम बॅट्नेच उत्तर देत आणि अचूक हल्ला करीत,

पंचकडीचा पंखा