सरदार अजितसिंह यांना आदरांजली

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
15 Aug 2012 - 10:45 pm

ajit singh

सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खट्करकलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधु कुल म्हणजे साक्षात क्रांतिचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे.

आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली. ते युरोपियन अधिकाऱ्यांना उर्दु, हिंदी, पर्शियन व पंजाबी भाषा शिकवित असताना त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या चपरशांना हाताशी धरुन त्यांचा एक संघ बनविला होता, ज्यायोगे ते त्या अधिकाऱ्यांच्या बातम्या मिळवित असत. सरदार अजितसिंह संत अंबाप्रसाद यांच्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांच्या ’भारतमाता सोसायटी’ चे सदस्य झाले. सरदार अजितसिंह लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वानेही प्रभावित झाले होते.

१९०७ मध्ये जुलमी कॅनलायाझेशन ऍक्ट पंजाबात लागु केला गेला आणि असंतोषाचा भडका उडाला. या कायद्याच्या तरतूदी जाचक होत्या आणि त्यानुसार सरकारला शेतकऱ्याला नागवायचा जणु अधिकारच दिला गेला होता. १९०७ मध्ये मार्च महिन्यात पंजाबात उग्र आंदोलन उभे राहिले आणि त्याचे नेते होते हुतात्मा भगतसिंहांचे काका सरदार अजितसिंह. २२ मार्च १९०७ रोजी पंजाबात लायलपूर येथे सरदार अजितसिंह यांच्या पुढाकाराने ८००० शेतकऱ्यांचा मेळावा भरला. या प्रसंगी पंजाबचे लोककवी बॉंकेदयाल यांनी शेतकऱ्याच्या परिस्थितीचे वर्णन करणारी ’पगडी संभाल जट्टा, पगडी संभाल’ ही कविता म्हटली आणि ती सर्वत्र लोकप्रिय झाली.

सरकारच्या डोळ्यात खुपणारे सरदार अजितसिंह आणि लाला लजपतराय यांना सरकारने १८१८ सालच्या तिसऱ्या नियमनाच्या अंतर्गत २ जुन १९०७ रोजी अटक करुन मंडाले येथे हद्दपार करुन तुरुंगात डांबले. ते ७ नोव्हेंबर १९०७ रोजी सुटुन पंजाबात परत आले. सुटुन आल्यावर १९०८ साली लोकमान्य टिळकांनी सुरत कॉंग्रेस अधिवेशनासाठी निमंत्रित केले आणि त्यांचा सत्कार केला. मात्र परतलेल्या सरदार अजितसिंहंवर सरकारची करडी नजर होती. सरदार अजितसिंह यांनी देशभक्तिपर साहित्याच्या प्रकाशनास सुरुवात केली. त्यांच्या पेशवा या प्रकाशनावर सरकारने बंदी आणली. मात्र त्यांनी नावे बदलत आपला प्रचार भारत माता, सहायक इत्यादी नावांनी सुरूच ठेवला.१९०९ साली सरदार अजितसिंह देश सोडुन स्वातंत्र्य लढा बाहेरुन चालविण्यासाठी निघुन गेले. ते प्रथम इराणमध्ये व नंतर युरोपात गेले व त्यांनी अनेक देशांच्या सरकारांद्वारे आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाला मदत व पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. ते गदर उत्थानातही सहभागी होते. नेताजींच्या जर्मनीतील कालखंडात त्यांनी नेताजींचीही भेट घेतली होती. त्यानंतर ते ब्राजिलला गेले. १९४६ साली त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे ब्राजिलमधुन पत्र आले आणि कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांची पत्नी हरनाम कौर यांनी त्यांना आपला पुतण्या कुलतारसिंह याच्याकरवी पत्र पाठविले की ’आप तो परसो लौटनेका वादा करके गये थे, अभी तक आये क्यों नही? त्यांना सरदार अजितसिंहांचे उत्तर आले, ’प और ब मे दो नुक्तोंकाही बस फर्क है’ (उर्दु लिपीप्रमाणे). अखेर मार्च १९४७ मध्ये आपला देश स्वतंत्र होण्याचा संध्येवर ते हिंदुथानात परत आले आणि त्यांचा सर्वत्र सत्कार झाला, जवाहरलाल नेहेरुंनीही त्यांना आपले पाहुणे म्हणुन घरी नेले होते.

मात्र फाळणीची कल्पना ते सहनही करु शकले नाहीत. हिंदुस्थानचे तुकडे आणि फाळणीमुळे होणारा रक्तपात त्यांना अस्वस्थ करीत होता. आपण ज्या भूमीला कर्मभूमी मानले तिचा काही भाग आता आपल्या देशात राहणार नाही ही कल्पनासुद्धा त्यांना असह्य होती. एकीकडे स्वातंत्र्यप्राप्तिचा आनंद आणि दुसरीकडे फाळणीचे दुःख अशा अवस्थेत त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ च्या पहाटे चार वाजता आपले प्राण सोडले. त्यांनी आपले प्राण ज्यासाठी जन्मभर अट्टाहास केला त्या स्वतंत्र भारतात सोडले मात्र त्या देशाचे तुकडे झालेले पाहायला ते राहिले नाहीत.

आज सरदार अजितसिंहांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त सरदार अजितसिंह यांना विनम्र आदरांजली.

इतिहाससमाजलेखमाहिती

प्रतिक्रिया

संपत's picture

15 Aug 2012 - 11:24 pm | संपत

'पगडी संभाल जट्टा' ही कविता मला अजितसिंहचीच वाटत होती. भगतसिंगांवर आपल्या काकांचा खूप प्रभाव होता. त्यांच्याप्रमाणेच अजितसिंह देखील कम्युनिस्ट विचारसरणीचे होते काय ह्याची माहिती आवडेल.

अर्धवटराव's picture

15 Aug 2012 - 11:38 pm | अर्धवटराव

अजीतसिहांना आदरांजली. त्यांचा "याच साठी केला होता अट्टहास..." पूर्ण झाला म्हणायचा.

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

16 Aug 2012 - 8:00 am | अत्रुप्त आत्मा

:(

पुण्याचे वटवाघूळ's picture

16 Aug 2012 - 9:55 am | पुण्याचे वटवाघूळ

अजितसिंगांना आदरांजली.

पण या लेखाकडून असलेल्या अपेक्षा मात्र पूर्ण झाल्या नाहीत आणि तो थोडा विस्कळीत वाटला (लहान तोंडी मोठा घास घेत आहे. मला याच्या १% ही लिहिता येत नाही). तरीही या लेखातून नवे प्रश्न मात्र उभे राहिले आणि त्या प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडतील.

अजितसिंगांनी इंग्रज सैन्यामधल्या गुप्त बातम्या मिळविल्या पण त्याचा उपयोग स्वातंत्र्यकार्याला कसा झाला, त्यांचा भारतमाता संघ नक्की कोणते काम करत होता, अजितसिंग लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झाले होते मग त्यांनी ते विचार प्रत्यक्षात कसे आणले, कॅनलायाझेशन ऍक्ट विरूध्द ल्यालपूर (सध्याचे फैसलाबाद) येथे ८ हजार शेतकऱ्यांचा मेळावा भरला पण तो कायदा पुढे रद्द झाला का, पंजाबी लोककवी बाँकेदयाल यांचे लोकगीत 'पगडी संभाल जट्टा, पगडी संभाल' होते पण त्या लोककवींचा (आणि त्या गीताचाही) अजितसिंगांशी काय संबंध, इंग्रज सरकार सामान्यपणे मंडालेला ६ वर्षे धाडत असे मग अजितसिंगांची ५ महिन्यातच अचानक सुटका नक्की कोणत्या कारणाने झाली, अजितसिंगांनी देशभक्तीपर साहित्य प्रकाशनाला सुरवात केली पण त्यांचे एखादे प्रसिध्द पुस्तक/लेख/वचन कोणते (जसे भगतसिंगांचे इन्किलाब झिंदाबाद, सुभाषचंद्र बोसांचे तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा इत्यादी), अजितसिंग देशाबाहेर जाऊन स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले पण त्यांची नक्की भूमिका कशी आणि काय होती, लाला हरदयाळ, श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यासारखे पुढारी युरोपातील इतर देश आणि अमेरिकेत जाऊन क्रांतिकार्यात सहभागी होते (सावरकरही श्यामजी कृष्ण वर्मांचे सहकारी होते) त्याप्रकारेच अजितसिंगांनीही काम केले की अन्य कोणत्या प्रकारे केले, अजितसिंग ब्राझीलला कशाकरता गेले, त्यांच्या परदेशी वास्त्यव्यात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी नक्की कोणते प्रयत्न केले, गदरपार्टीशी ते संलग्न होते असे लिहिले आहे पण कशाप्रकारे, गदर पार्टीच्या एखाद्या महत्वाच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता का इत्यादी अनेक प्रश्न या लेखामुळे उभे राहिले आहेत.

अजितसिंगांची भगतसिंगांचे काका या व्यतिरिक्त अजून ओळख मला स्वतःला नव्हती. आणि या लेखातून (आणि लेखकाचे पूर्वीचे लेखन बघता) ज्या पध्दतीची माहिती मिळणे अपेक्षित होती ती मात्र मिळाली नाही. याविषयी काही लिहिल्यास चांगले होईल.

सर्वसाक्षी's picture

16 Aug 2012 - 10:32 am | सर्वसाक्षी

प्रतिक्रियेसाठी आपले आभार, मी आपल्या प्रतिक्रियेशी पूर्णतः सहमत आहे.

स्पष्ट कारण असे की माझा अभ्यास कमी पडला. सरदार अजितसिंह या विषयी संपूर्ण ग्रंथ असा एकही वाचला गेला नाही, जे काही वाचनात आले ते दुसर्‍या व्यक्तिमत्त्वाच्या/ क्रांतिघटनेच्या संदर्भात वा ओघात. जे प्रश्न तुम्हाला पडले आहेत रास्तच आहेत मात्र ठाम उत्तर माहित असल्याशिवाय अंदाजे उत्तर देणे योग्य नाही. काही संदर्भ मिळाले आहेत ज्यांयोगे अधिक माहिती मिळु शकेल, आणि ती मिळवायची इच्छा अवश्य आहे.

मात्र संपूर्ण माहिती नसताना केवळ भक्तिभावाने वा अंदाजाने कपोलकल्पित हकिकती लिहिणे मला योग्य वाटत नाही त्यामुळे लेख त्रोटक झाला आहे, क्षमस्व. मात्र इतक्या मोठ्या माणसाविषयी केवळ अधिक माहिती नाही म्हणुन त्यांची असलेली माहितीही न देता स्वस्थ बसणे बरे वाटले नाही, शिवाय जो दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणुन साजरा करतो त्या दिवशीची ही घटना लिहाविशी वाटली.

पुन्हा एकदा आभार.

वैनतेय's picture

16 Aug 2012 - 6:00 pm | वैनतेय

सरदार अजितसिंग, भगतसिंगांचे काका व एक क्रांतीकारक एवढीच ओळख होती. माहिती बद्दल धन्यवाद!

कवितानागेश's picture

16 Aug 2012 - 7:31 pm | कवितानागेश

अशी कुठलीच माहिती शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात का नसते?

उत्तम लेख !

अशी कुठलीच माहिती शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात का नसते?
कारण आपल्या राजकारण्यांना इतिहास काय होता त्यापेक्षा एखाद्या पुस्तकात छापलेल्या व्यंगचित्र्,कार्टुन वरुन वादंग कसा निर्माण व्हावा याची इच्छा असते. ;)

दोन चार प्रातिनिधीक नावं घेऊन अख्खा स्वातंत्र्यसंग्राम पब्लीकला कळला म्हणजे झालं... कशाला हवा इतर फाफट पसारा... शिवाय भूतकाळात जास्त मन गुंतु नये असाही हुच्च उद्देश असावा शिक्षण खात्याचा...

अर्धवटराव

नाना चेंगट's picture

17 Aug 2012 - 10:30 am | नाना चेंगट

आपण भविष्यात नजर लावलेली बरी असते. भुतकाळ सर्वांनाच सुखावह असतो असे नाही. सगळ्यांना घेऊन पुढे जायचे असेल तर मागचे बरेचसे विसरावे लागते. म्हणून खरेतर इतिहास हा विषय शाळेतून काढूनच टाकला पाहिजे. :)

पैसा's picture

17 Aug 2012 - 7:56 pm | पैसा

सरदार अजितसिंह हे भगतसिंहाचे काका एवढीच माहिती होती. १८८१ ते १९०९. म्हणजे वयाच्या २८ व्या वर्षी या सरदाराला मातृभूमी सोडून परागंदा व्हावं लागलं. त्यानंतर १९४७ पर्यंत म्हणजे पुढची तब्बल ३८ वर्षं ते वेगवेगळ्या देशांमधे आपलं कार्य करत होते. दरम्यानच्या काळात भगतसिंह विजेसारखे तळपून फाशी सुद्धा गेले.

लायलपूर म्हणजे फैसलाबाद. आज हा भाग पाकिस्तानात आहे. कधी कधी कुतुहल वाटतं. आपण क्रांतिकारकांना जे स्थान देतो, ते पाकिस्तानमधे शिकवल्या जाणार्‍या इतिहासात असेल का?

शिल्पा ब's picture

18 Aug 2012 - 10:48 am | शिल्पा ब

लेख अन प्रतिसाद आवडले.
<<<आपण क्रांतिकारकांना जे स्थान देतो, ते पाकिस्तानमधे शिकवल्या जाणार्‍या इतिहासात असेल का?

शक्यता कमीच आहे.

इतक्या लहान वयात देशापासुन दुर भटकंत देशासाठी काम करणारा मोठा माणुस !
मला यांच्याबद्दल माहीती नव्हती. :(