आठवण

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
9 May 2012 - 1:53 pm

आम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या "मेरी मा" हे "तारे जमीन पर" ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या "प्रेमा स्वरूप आई" ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती. तरी सुद्धा घटकाभर आई स्वैयंपाकघरात वावरत असल्या सारखे वाटून, बायकोला म्हणालो, "बऱ्याच दिवसात कांद्याच्या पातीची भाजी खाल्ली नाही गं, एकदा करना". कांद्याच्या भाजीचे नाव ऐकून शेजारी बसलेल्या माझ्या मुलाने भुवया उंच करत वेडेवाकडे तोंड केले. मी दुर्लक्ष केले. हल्लीच्या पिझ्झा व नूडल्स संस्कृती मध्ये मुलांसमोर पडवळ, दुधीभोपळा, लालभोपळा, घोसाळी, दोडकी, कार्ली, शेपू, लालमाठ अशा भाज्यांची नावे काढायची सुद्धा लाज वाटते. भाज्यांना सुद्धा जणू काही हल्ली स्टेटस आलेला आहे. त्यात मश्रुम्स, पनीर, फ्लॉवर असले वरिष्ठ आधीकारी पंगतीला हजर राहायला लागले आहेत. कांद्याच्या भाजीचा माझा प्रस्ताव मंजूर झाला व दोनचारच दिवसात जेवणात कांद्याच्या पातीची भाजी खायला मिळाली. छान चविष्ट झाली होती. मी बायकोचे भरभरून कौतुक करून आभार मानले. महाराष्ट्राबाहेर बरेच दिवस काढल्यावर कळते की अशा भाज्या बाजारात नेहमी मिळतातच असे नाही आणि म्हणूनच त्यांचे एवढे अप्रूप. मी कांद्याच्या पातीची भाजी बोटंचाटत खाल्ली, मुलाने तोंडंकरत खाल्ली.

जेवण झाल्यावर पेपर वाचत गादीवर पडलो होतो. मनात विचार आला, आजची भाजी छान झाली होती, पण मला लहानपणी आवडायची तेवढी आज आवडली नव्हती. माझ्या लहानपणीची ती मजा नव्हती. मी नकळत आईच्या केलेल्या भाजीची चव शोधत होतो, ती सापडत नव्हती. आईची कांद्याच्या पातीची भाजी काही अफलातून व्हायची नाही. पण आई भाजी करायची, त्याची चव अंगवळणी पडली होती व आवडायची. साधाच आमटी, भाजी भात पोळ्यांचा स्वयंपाक रोज असायचा, ठरलेल्या वेळी गोड्यामसाल्याचा वास यायचा, कुकरच्या शिट्ट्या होऊन भात शिजल्याचा वास यायचा. कधी कधी "कुकर बंद कर रे" अशी आईची हाक यायची. अभ्यास करता करता आम्ही असल्या हाकांची वाटच बघायचो. त्यानिमित्ताने पुढची दहा मिनिटे अभ्यासातून मोकळीक. दुपारी बाराची शाळा असायची व आम्ही अकरा वाजता जेवायला बसायचो. सोबत किडमूड्या रेडिओवरून विविधभारतीवरच्या "रंगतरंग" कार्यक्रमात लागलेली मराठी किंवा हिंदी गाण्यांची रेलचेल ऐकायला मिळायची. घर छोटे असल्या कारणाने आमचा अर्धा वेळ स्वैयंपाकघरातच जायचा. आईच्या बांगड्यांचा पोळ्या लाटताना येणारा आवाज सगळे ठीक चालले आहे ह्याची मनातल्या मनात ग्वाही द्यायचा. अभ्यास करताना एक कान स्वयंपाकघरात घडणाऱ्या गोष्टींवर व नाक भाजी शिजल्यावर सुटणाऱ्या वासावर सतत असायचे. आज खरेतर कांद्याच्या पातीच्या भाजीच्या चवीपेक्षा मला त्या लहानपणच्या दिवसांची आठवण येत होती. लहानपणाचे ते घरातले वातावरण व ती चव मनाच्या कोपऱ्यात बसली होती व आजच्या भाजीत मी तीच चव पुनः शोधायचा प्रयत्न करत होतो. भाजीची चव जरी मिळतीजुळती होती तरी, पूर्वीचे ते वातावरण मिळतेजुळते नव्हते. आजच्या जेवणात खाल्लेली कांद्याच्या पातीची भाजी मनापासून आवडली नाही ते बरेच झाले, त्यामुळे मला काळात मागे जाऊन पूर्वीच्या त्याच स्वयंपाकघरात आईच्या हातचे जेवण जेवून, तृप्त होऊन परत येता आले होते.

आपण राष्ट्रव्रत घेतले का?

राहणीमौजमजालेखअनुभव

प्रतिक्रिया

भरुन आल्यासारखे झाले. अगदी ..

मुक्त विहारि's picture

9 May 2012 - 2:07 pm | मुक्त विहारि

ह्याच सत्य गोष्टीवर एक कथा वाचलेली आठवते.

प्रविण दवणे ह्यांची , नांव आठवत नाही पण, "आणि कणभर प्रेम" असे काहीसे नाव आहे.

प्यारे१'s picture

9 May 2012 - 3:20 pm | प्यारे१

>>>लहानपणाचे ते घरातले वातावरण व ती चव मनाच्या कोपऱ्यात बसली होती व आजच्या भाजीत मी तीच चव पुनः शोधायचा प्रयत्न करत होतो. भाजीची चव जरी मिळतीजुळती होती तरी, पूर्वीचे ते वातावरण मिळतेजुळते नव्हते. आजच्या जेवणात खाल्लेली कांद्याच्या पातीची भाजी मनापासून आवडली नाही ते बरेच झाले, त्यामुळे मला काळात मागे जाऊन पूर्वीच्या त्याच स्वयंपाकघरात आईच्या हातचे जेवण जेवून, तृप्त होऊन परत येता आले होते.

काही गोष्टींचं विश्लेषण न केलेलंच चांगलं...!
चितळेबुवा,
नो ऑफेन्स, पण सगळ्याच जणांना आपापला भूतकाळ 'युनिक' वाटत असतो. आपापली बालपणं, आपापली शाळा, मित्र मैत्रिणी, गप्पाटप्पा, आपापली बॅच नि आपण स्वतः . ;) स्वतःबद्दल पण आपण आश्चर्य करतोच की! :)
लहानपणी खाल्लेली 'भाजी चपाती' आजच्या पंचपक्वान्नांच्या तोंडात मारते ते ह्याच कारणाने.

खूप हृद्य आठवण.
चवीपेक्षा आठवणीमुळेच भाजीचा स्वाद तुमच्या मनात राहिला, रणजितभाऊ. ते वातावरण, तो निवांतपणा अन आईची माया यांचाच स्वाद तो. आज पुन्हा कसा अनुभवता येईल ?

रणजित चितळे , खरच अतिशय सुंदर लेख झाला आहे.
वाचताना कधी ह्या लेखात मी गुंतत गेलो ते कळलच नाही.
हल्ली मी जे चांगले व सुंदर लेख वाचले आहेत त्यातला हा तुमचा लेख आहे.
खरच अतिशय सुंदर लेख आहे हा. व गवि साहेब म्हणतात तसे, गहिवरुन आल्या सारखे वाटले.

प्रभाकर पेठकर's picture

9 May 2012 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर

मस्त जुन्या आठवणी जागवणारे लेखन, मनापासून आवडले. आईच्या हातच्या जेवणा इतकेच त्या काळचे वातावरण, आपलं वय आणि वयानुरुप 'बेताब' भूक पंचेंद्रियांना अचूक संवेदनक्षम बनविते. त्या आठवणी सुवर्णाक्षरात मनात कोरल्या जातात.

चौकटराजा's picture

9 May 2012 - 3:45 pm | चौकटराजा

भाज्याच काय अनेक गोस्टी लुप्त हुन लागल्या आहेत.
गाण्यामधून दादरा केरवा तीनताल ( झपलालाचे बोलूच नका)जाण्याचे मार्गावर (रुपक गजलांमुळे टिकून आहे.)
कपड्या मधून पायजमा , पटयापट्याची अंडर वेअर जाण्याच्या मार्गावर आहेत.
थोरांबदद्द्ल चा आदर ???? ( या बद्द्ल न लिहिलेले बरे )

रणजित चितळे's picture

9 May 2012 - 3:54 pm | रणजित चितळे

थोरांबदद्द्ल चा आदर ???? ( या बद्द्ल न लिहिलेले बरे )

खरे आहे अगदी.

पैसा's picture

9 May 2012 - 3:46 pm | पैसा

वाचताना गळ्याशी एक आवंढा आला. चितळेसाहेब, तुम्ही अशा साध्या अकृत्रिम भाषेत नेहमी लिहिता, आणि लिहिता लिहिता मधेच एखादं वाक्य असं लिहून जाता, की थोड्या शब्दात खूप भावना लख्ख दिसतात. तुमच्या राजाराम सीताराम मालिकेतही हे खूपदा अनुभवलं आहे.

आईच्या बांगड्यांचा पोळ्या लाटताना येणारा आवाज सगळे ठीक चालले आहे ह्याची मनातल्या मनात ग्वाही द्यायचा.

हे फार आवडलं.

बारिकसारिक डिटेल्स छान टिपले आहेत ..
ऊदा..
भाज्यांना सुद्धा जणू काही हल्ली स्टेटस आलेला आहे.
आईच्या बांगड्यांचा पोळ्या लाटताना येणारा आवाज सगळे ठीक चालले आहे ह्याची मनातल्या मनात ग्वाही द्यायचा.

.. स्वयंपाक झाला कि जेव्हा स्टोव्ह्ची शिट्टि आई बंद करीत असे .. तेव्हा तो आवाज हळूहळू थांबून एकदम शांतता होत असे .. मग थोडा वेळ कुणीच काहि बोलायचे नाहि .. ती शांतता हि .. एकदम त्या भाज्यांच्या चवीसारखीच ..

सहज's picture

9 May 2012 - 3:54 pm | सहज

शेवटच्या परिच्छेदातून सकाळची वेळ, अभ्यास, शाळेत जायच्या तयारीत दप्तर भरणे, कुकरची शिट्टी, स्वयंपाकघरातून येणारा सुगंध, आकाशवाणी/विविधभारती, पोळी भात भाजी आमटी जेवण, सगळी टोटल छान लागली.

नॉस्ट्यॅलजीक हो गया रे बाबा! बोत अच्छा लिखा! (जॉनी लिव्हरच्या आवाजात)

स्मिता.'s picture

9 May 2012 - 5:00 pm | स्मिता.

लेख वाचतानाच मन भूतकाळात गेले. जरी सगळ्यांचाच भूतकाळ थोड्याफार फरकाने असाअच आनि रम्य असला तरी प्रत्येकाचं त्यात आपलं विशेष असं असतंच. ते अगदी कांद्याच्या पातीच्या भाजीतही सापडतं हेच खरं. लेख आवडला :)

उदय के'सागर's picture

9 May 2012 - 6:05 pm | उदय के'सागर

नेहमी प्रमाणे एकदम हृदयस्पर्शी लिखाण केलंत तुम्ही. अगदी बालपणात त्या जुन्या घरातच नेउन आणलत तुम्ही :)

मी लहान असतांना (मी अगदी ८-९ वी मधे असे पर्यंत) आम्ही अंघोळिचं पाणी स्टोव्ह वरच तापवत असु. तो स्टोव्ह चा अवाज आणी मधे मधे आईच्या बांगड्यांचा आवाज त्याला पंप मरतांनाचा.. ह्या आवाजांनी सकाळ सुमधुरच व्हायची... का कोणास ठाऊक खुप प्रसन्न वाटायचं त्या अवाजाने...मग त्यापुढे अगदी लतादिदी चे काय आणि भिमसेन जोशींचे काय सगळ्याचेच सकाळचे ते अवाज /अभंग फिके पडायचे.. :)

आई स्टोव्ह्वर पोळ्या करत असली कि तिच्या समोरच्या बाजुला मी गप्पा मारत बसायचो आणि त्या गरम गरम पोळ्या आई तेल/मीठ लावुन रोल करुन द्यायची ... अहाहा काय चव होती हो त्याला...आणि लहान असलोतरी अश्या कितीतरी पोळ्या गट्टम करायचो..... नंतर कित्यकदा 'आठवण' आली कि तसे रोल करुन खाल्ले .... पण.... छे :(

भुतकाळात स्वतः अनुभवलेल्या काहि गोष्टींचा स्वतःलाच हेवा वाटावा इतकं सुंदर चित्र म्हणजे 'आठवणी' ....

शित्रेउमेश's picture

9 May 2012 - 7:07 pm | शित्रेउमेश

आई च्या हातच्या मेथीची आठवण झाली अगदी....

यकु's picture

9 May 2012 - 7:16 pm | यकु

आमच्या आईच्या अशा सांगण्‍यासारख्‍या आठवणीच नाहीत. म्हणजे आई आहेच.

चुलीमुळे काळ्याकुट्ट काजळी चढलेल्या भांड्‍यात पाणी तापवून ठेऊन आई माझ्‍या मागे हातपाय धुवून घे, हातपाय धुवून करीत लागायची. तेवढंच आठवतंय.

आजीच्या खूप आठवणी आहेत. शिळी भाकरी ताजी करुन दे म्हणून तिच्या मागे लागायचो - मग ती मला शिळी भाकरी पुन्हा एकदा तव्यावर गरम करुन द्यायची.
आजी मला उत्थल्या म्हणायची. म्हणजे काय हो मिपावरच्या आज्यांनो??

तुमचा लेख लहानपणात घेऊन गेला. आवडला.

५० फक्त's picture

9 May 2012 - 8:00 pm | ५० फक्त

बरं वाचलं वाचुन, धन्यवाद.

सुधीर१३७'s picture

9 May 2012 - 9:42 pm | सुधीर१३७

मस्तच..............

बालपणीच्या आठवणी परत जाग्या केल्यात........................ :)

कपिल काळे's picture

10 May 2012 - 11:48 am | कपिल काळे

एक दम नॉस्टॅलजिक करुन टाकणारे अगदी तरल लेख न!!

स्वातीविशु's picture

10 May 2012 - 12:21 pm | स्वातीविशु

लेख फारच आवडला. वाचता वाचता मन पुन्हा भुतकाळात गेले. बालपणीचा काळ सुखाचा........

वर बांगड्यांच्या किणकिण आवाजाचा उल्लेख अनेकांच्या आठवणीत आला आहे. पुलंचं एक ध्वनिमुद्रित भाषण, मला वाटतं अमेरिकेतल्या कोण्याश्या कार्यक्रमात महाराष्ट्र मंडळापुढे असावं, त्यात त्यांनी "आपलं माणूस" या शब्दाविषयी बोलताना म्हटलं आहे आपला माणूस म्हणजे ज्याला थालीपीठ म्हणजे काय हे समजावावं लागत नाही.

थालीपीठ हा नुसता एक पदार्थ नाही. "थालीपीठ" शब्द म्हटला की आपल्याला आपलं लहानपण, लहानपणी ज्या पाटावर बसून थालीपीठ खाल्लं तो पाट, थालीपीठावरचा शुभ्र लोण्याचा गोळा, थालीपीठ थापतानाची आईच्या हातच्या बांगड्यांची किणकिण, घरभर पसरलेला तो खमंग वास असं सगळं वातावरण आपल्यासमोर उभं राहतं. (नाकात वास, बोटांना स्पर्श, कानांना आवाज असं सर्व इंद्रियांनी फील होईल असा एकूण माहोल) .

आणि "थालीपीठ" शब्द म्हटल्यावर ज्याला असाच आपल्यासारखा अनुभव येतो तो "आपला माणूस"..

सुरमईश्याम's picture

11 May 2012 - 5:09 pm | सुरमईश्याम

आईच्या हातचा मसालेभात आठवला......ति चव आता मिळने अस्समभव.