1

का...का...का....काकस्पर्श!

Primary tabs

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
6 May 2012 - 7:03 am

'एक विलक्षण प्रेमकहाणी' म्हणून बराच गाजावाजा झालेला, जाहिरातींतून उत्सुकता चाळवणारा 'महेश वामन मांजरेकर' दिग्दर्शित 'काकस्पर्श' काल पाहिला. ( हे 'महेश वामन मांजरेकर' म्हणजे 'वास्तव'वादी महेश मांजरेकरच का? बहुदा असावेत.) अडीच-तीन तास कुठेतरी काढायचे होते, बाहेर मनस्वी उकडत होते. चित्रपटगृह चांगले, वातानुकूलित होते. या सबबी वाचकांसाठी नसून मी माझ्या 'मना सज्जना' ला सांगितलेल्या आहेत. मन हे ( 'काकस्पर्श' सारखे ) विलक्षण असते. ते हा चित्रपट बघून झाल्यावर पुन्हापुन्हा म्हणत होते, नुसताच मॉलमध्ये फिरला असतास, 'तेज' बघीतला असतास, 'विकी डोनर' बघीतला असतास...
स्वातंत्र्यपूर्व काळातले कोकणातले एक खेडे. त्यातील ब्राह्मणाचे एक कुटुंब. हरी हा कुटुंबप्रमुख. कणखर, तत्वनिष्ठ वगैरे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या समर्थ,बळकट वगैरे खांद्यांवर पेलणारा. कुटुंब म्हणजे बायको, पोरे, लहान भाऊ आणि एक सोवळी आत्या. या काळातले चित्रपट, मालिका यांमध्ये केशवपन केलेली. लाल अलवणातली, भेसूर दिसणारी एखादी जुनी आत्या, मावशी वगैरे नसेल तर त्यांना सेन्सॉरचे सर्टिफिकेट मिळत नसावे. स्वातंत्र्यपूर्व काळ, पण एकंदरीत या चित्रपटात काळाची, पात्रांच्या भाषेची, वेशभूषेची रचना करताना धारपांच्या कथेत पडतो तसा मितींना एक पिळा पडला आहे. या पात्रांची भाषा कधी सानुनासिक, पुस्तकी, ब्राह्मणी होते तर कधीकधी ती पात्रे - म्हणजे अगदी आपला हरीसुद्धा - बोलताबोलता 'अच्छा..' असा शब्द वापरुन जातो. हरीचा मुलगा पुढे पॅन्ट-शर्ट असा पोषाखात वावरतो, पण डोक्याला घेरा आणि शेंडी आहेच. असो, तर हा हरी आपल्या धाकट्या भावाचे दुर्गीशी लग्न ठरवतो आणि फलशोभनाच्या (हा शब्द या चित्रपटातली सर्व पात्रे 'फलशोधन' असा उच्चारतात. हरेच्छा!) रात्रीच तो भाऊ मरण पावतो. मग पुढचे काही लिहायलाच नको. ढसढसा रडणार्‍या कुटुंबियांमध्ये शून्य चेहर्‍याने बसलेली त्याची पोरगेलेशी बायको, तिला सोवळी करा असा अट्टाहास धरणारी ती आत्या (आणि गावातले कर्मठ ब्राह्मण), तिच्या लांबसडक केसांवर वस्तरा चालवण्याच्या एक सेकंदभर तेथे आलेला हरी, त्याने मग तो वस्तरा त्या नाव्याच्या हातून हिसकावून फेकून देणे (त्या न्हाव्याचे नावही... बरोबर ओळखलेत! शांतू!), गावाने हरीवर बहिष्कार घालणे, हरीने एखाद्या कातळासारखे सगळ्या आपत्तींना तोंड देत आपल्या धाकट्या भावजयीला या जालिम जमान्यापासून वाचवण्यासाठी उभे रहाणे, पुढे हरीची बायको गंभीर आजारी होणे, मग.. वगैरे वगैरे वगैरे...
तर अशी ही 'काकस्पर्श' ची शोकांतिका. चित्रपटाच्या नावापासूनच तो खास ब्राह्मण प्रेक्षकांना आकर्षित करुन घेण्यासाठी बनवलेला आहे हे स्पष्ट होते. एक निर्माता म्हणून अगदी फक्त व्यावसायिक दृष्टीकोनातून बघीतले तरी हे धाडसाचेच काम आहे. निर्माता-दिग्दर्शकाचे या चित्रपटात धाडस म्हणून काही असेल तर ते हे एवढेच. बाकी पन्नास -साठ-सत्तर वर्षांपूर्वीची कोकणी पार्श्वभूमीवरची कोणतीही एक कादंबरी घ्या, कोणीही एक शांतारामी ढोबळ सांकेतिकी दिग्दर्शक घ्या, थोडे फडकाळलेले-खांडेकरी संवाद लिहा. पाचदहा बाराबंद्या, साताठ धोतरे, नऊवारी लुगडी, पगड्या आणि नथी घ्या, उमेदवारी करणारे काही कलाकार घ्या आणि सुरु करा शूटिंग! झाला 'काकस्पर्श'! हाय काय आन नाय काय...
असल्या दाणादाण पडापडीत सचिन खेडेकर आणि केतकी माटेगावकर हे (आपले मराठी वगैरे..) कलाकार ध्यानात राहतात. सचिन खेडेकरचे काम सरासरीत चांगलेच असते. 'काकस्पर्श' मध्ये त्याने आपले टपोरे, भावपूर्ण डोळे, आपला आवाज आणि आपली शरीरयष्टी यांचा उत्तम वापर करुन घेतलेला आहे. केतकी माटेगावकरचा 'स्क्रीन प्रेझेन्स' ताजा, गोड आहे. 'शाळा' मध्ये ही ती इतक्याच प्रसन्नपणे वावरली होती. बाकी कलाकार या चित्रपटात आहेत इतकेच. पण ते तरी काय करणार बिचारे!
आपल्या भावाचे पिंडदान करणारा हरी या दृष्यापासून 'काकस्पर्श' हा चित्रपट सुरु होतो. पुढे याच दृष्यात कावळे पिंडाला शिवत नाहीत तेंव्हा कावळ्यांना बोलावण्यासाठी हरी मोठमोठ्याने 'का...का...का..' अशा हाका मारतो. साक्षात विधात्याला विचारलेला हा प्रश्नच जणू! चित्रपट संपला आणि मी बाहेर आलो. विलक्षण भूक लागली होती. पोटात कावळे ओरडत होते असे म्हटले तरी चालेल. डोक्यात बाकी तोच प्रश्न होता. का? का? का?

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

6 May 2012 - 8:21 am | चौकटराजा

बोलताबोलता 'अच्छा..' असा शब्द वापरुन जातो.
मागे सविता प्रभुणे यानी सांगितलेला एक किस्सा- एका ऐतिहासिक नाटकात चुकून एक पात्राच्या म्यानाचे टोक गडबडीत दुसर्‍या पात्राला लागते. भूमिकेत गेलेली व्यक्ती वास्तवात येते व पटकन त्या दुसर्‍या पात्राला म्हणते " अरे सॉरी हं "

आपले परिक्षण वाचून मार्मिकच्या शेवटच्या पानावरच्या सिने प्रिक्षानची आठवण झाली.

बरं झालं लिहीलंत. मी हा चित्रपट बघायला जायचा विचार करत होतो. ( फक्त केतकी माटेगांवकर आहे म्हणून पैसे वाया घालवण्यात पॉईंट नाही. ;))

शुचि's picture

6 May 2012 - 9:42 am | शुचि

थोडा जालावर शोध घेतला असता असे वाचनात आले की "हरीदादा हा असे आश्वासन देतो की तो दुर्गा (लग्नानंतरची उमा) हिला परपुरषाचा स्पर्श होऊ देणार नाही आणि लगोलग पिंडास कावळा शिवतो" ........ मग नंतर उमा आणि हरीदादा यांची भावनिक गुंतवणूक होते का वगैरे वगैरे ......
.
.
.
.
मला तर हा आसक्ती-विरक्ती चा संघर्ष फारच रोचक वाटतो आहे. जमल्यास मी हा चित्रपट जरूर पाहीन.
कथाबीज सशक्त आहे असे माझे मत आहे. मांडणी तितकी प्रभावी वठली आहे का हे पाहूनच ठरवेन.
.
.
.
सचिन खेडेकर म्हणजे काम चांगलेच असणार.

चिरोटा's picture

6 May 2012 - 9:07 am | चिरोटा

चला ,म्हणजे बघायचा नाय तर. टी.व्ही.वर कधी लागला तर आस्वाद घेऊ.

तिमा's picture

6 May 2012 - 10:10 am | तिमा

नांव, जाहिरातीतील पात्रे, हे सगळे बघितल्यावरच काहीशी प्रतिकूल प्रतिक्रिया मनांत आली होती. एकूण सिनेमात काय असेल याची अटकळ रावांच्या परीक्षणाने तंतोतंत खरी ठरली. त्याबद्दल रावांस धन्यवाद. परीक्षणातील सर्वच मतांशी सहमत.
पैसे वाचले, असे म्हणणार नाही कारण अशा चित्रपटांचा वीट येऊन आता उरलेल्या आयुष्यात केवळ हलकेफुलके सिनेमेच बघायचे आधीपासूनच ठरवले आहे.

मुंबईत पावभाजी प्रसिद्ध झाली म्हणताना तमाम शेट्ट्यांनी आपापल्या हाटेलाच्या प्रवेशालगत तवा टाकला. भले चव पावभाजीची नसेल पण जे चालते ते आपल्या मेनू कार्डात असावे हा व्यवहार.

सध्या जुना काळ, वाडे, आलवणे वगैरेची छोट्या पडद्यावर चलती आहे म्हणताना चित्रपट निर्माते - दिग्दर्शकांनी असा चित्रपट न काढला तरच नवल. तुमच्या वर्णनानुसार केशवपन प्रसंग 'सुवासिनी' नामे (अर्थातच भिकार व बिनडोक) मालिकेतुन 'कापा - चिकटवा' केलेला दिसतो. असो. या चित्रपटासाठी जोड्या जुळवा अशी स्पर्धा मिपावर घ्यायला हरकत नाही.

हा आमचा शिन तर द्या तुमची जोडी!

ता क -रावसाहेब, गरम होते आणि वेळ काढायचाच आहे म्हणुन असे काही भलते सलते करण्याऐवजी ते दोन तास आणि पैसे सत्कारणी लावायचे होते हो. मस्त दोन बिअर मारायच्यात. एक तुमची आणि एक माझ्या नावे:)

सन्जोप राव's picture

6 May 2012 - 8:22 pm | सन्जोप राव

गरम होते आणि वेळ काढायचाच आहे म्हणुन असे काही भलते सलते करण्याऐवजी ते दोन तास आणि पैसे सत्कारणी लावायचे होते हो. मस्त दोन बिअर मारायच्यात. एक तुमची आणि एक माझ्या नावे:)
बळवंतराव, इतके जर आमचे डोके चालत असते तर... तर शिमला नसतें म्हणालें आमच्या गांवास? जाऊ द्या, पुढच्या वेळी हे नक्की करतो!

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2012 - 11:36 am | अत्रुप्त आत्मा

आमचे पैसे वाचवल्या बद्दल धन्यवाद :-) प्रोमोजमधे प्रीयाताई बापटकाकूंना पाहुन काढलेला अंदाज खरा ठरला ;-)

भडकमकर मास्तर's picture

6 May 2012 - 11:41 am | भडकमकर मास्तर

शब्दशोधन :

_________________________________
फलशोभन
http://books.google.co.in/books?id=MihC19PIejcC&pg=PA202&lpg=PA202&dq=%E...

हिन्दी राऊस्वामी याकादंबरीत फलशोभन शब्द सापडला...
" बहुरानी को हमारी पास आये अभी पांच वर्ष हुए है/ अब अधिक से अधिक एक वर्ष में उसका फलशोभन समारोह भी करना होगा

____________________

फलशोधन म्हणजे ग्रामोद्योग विभागात मुरंबा आणि लोणचे जेली या संदर्भात वापरलेला शब्द आढळला...
http://fe.jag.in.g1.b.yahoo.com/news/local/uttarpradesh/4_1_8968991_1.html
छात्रों को ग्रामोद्योग विभाग के तकनीकी प्रशिक्षकों द्वारा अगरबत्ती, मोमबत्ती, फलशोधन अचार, मुरब्बा, जैम, जैली बनाकर छात्रों को दिखाया गया।
_________________________
http://www.ranjeetparadkar.com/ या ब्लॉगवरती फलशोधन असाच शब्द वापरला आहे.. :) :) :) शिवाय खाली त्याचा अर्थही दिला आहे...

फलशोधन* = पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न लहान वयात होत असे. मुलगी वयात येईपर्यंत मुलास तिच्याजवळ जाण्यास पाबंदी असे. मुलीला जेव्हा पहिल्यांदा वयात आल्याची जाणीव होई (Menstruation Cycle ची सुरुवात होई) तेव्हा 'फलशोधना'ची यथासांग पूजा केली जात असे व त्यानंतर खऱ्या अर्थाने मुलगा व मुलगी एकत्र येत असत.
_________________________________

आणखी दोनशे वर्षांनी , " त्या काळात फलशोभन ता अर्थाने " फलशोधन असा शब्दही वापरला जात असे , असे लोक खात्रीने सांगतील..आणि मांजरेकर यांनी सिनेमातही तो शब्द वापरला आहे, म्हणजेच शंका नको असेही म्हणतील...

शिवाय उत्सुकता अशी की मूळ कथेत काय शब्द वापरला असेल?

भडकमकर मास्तर's picture

6 May 2012 - 11:51 am | भडकमकर मास्तर

काकस्पर्श पाहिला नाहीये.. सिनेमागृहात पाहणार नाही.... टीवीवर आला की पाहीन..
रावांचे परीक्षण नेहमीप्रमाणेच भारी...


बाकी पन्नास -साठ-सत्तर वर्षांपूर्वीची कोकणी पार्श्वभूमीवरची कोणतीही एक कादंबरी घ्या, कोणीही एक शांतारामी ढोबळ सांकेतिकी दिग्दर्शक घ्या, थोडे फडकाळलेले-खांडेकरी संवाद लिहा. पाचदहा बाराबंद्या, साताठ धोतरे, नऊवारी लुगडी, पगड्या आणि नथी घ्या, उमेदवारी करणारे काही कलाकार घ्या आणि सुरु करा शूटिंग! झाला 'काकस्पर्श'! हाय काय आन नाय काय..

अग्गाग्गाग्गा..... एका वाक्यात तथाकथित ज्येष्ठ श्रेष्ठांवर सपासप चालवलेल्या लेखणीने थक्क झालो आहे...
काकस्पर्शाने अंमळ अधिक ताप दिलेला दिसतो... :) :)

चिंतामणी's picture

6 May 2012 - 1:19 pm | चिंतामणी

>>>अग्गाग्गाग्गा..... एका वाक्यात तथाकथित ज्येष्ठ श्रेष्ठांवर सपासप चालवलेल्या लेखणीने थक्क झालो आहे..

ह्याचे कौतुक वाटले मास्तर तुम्हाला??? :(

कोणाचिही खिल्ली उडवणा-या या महाभागांचे कर्तुत्व काय तर की बोर्ड बडवणे एव्हढेच ना?

सन्जोप राव's picture

6 May 2012 - 8:26 pm | सन्जोप राव

कोणाचिही खिल्ली उडवणा-या या महाभागांचे कर्तुत्व काय तर की बोर्ड बडवणे एव्हढेच ना?
अगदी, अगदी. हेच खरे. बोर्ड न बडवता लिहिलेला हा प्रतिसाद आणि त्यातला 'कर्तुत्व' हा शब्द अगदी पटला.

अविनाशकुलकर्णी's picture

6 May 2012 - 12:01 pm | अविनाशकुलकर्णी

काकस्पर्श'

परंपरा, वचन, सोवळे-ओवळे यांत एकेकाळी
रमणारा महाराष्ट्र म्हणजे स्त्रीसाठी तिच्या भावना मारणारा, प्रसंगी
तिच्या शरीर, मानसिक जाणिवांशी क्रूर खेळ करणारा होता याचे प्रत्यंतर
पुन्हा एकदा त्याच पारंपरिक चौकटीत राहून 'काकस्पर्श' या चित्रपटाने दिला.
हा चित्रपट पाहताना पूर्वीच्या रुढींचा मनस्वी राग यायला लागतो तो
मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या उमाच्या निरागस रूपामुळे व जाणिवांच्या
आक्रोशामुळे. चित्रपटाला साधारणपणे स्वातंत्र्यापूर्वीची पार्श्वभूमी आहे.
गावातल्या देवीच्या उत्सवाचा अधिकार असणार्‍या हरिदादांच्या घरात त्याच्या
धाकट्या भावाची पत्नी म्हणून दुर्गा घरात येते. दुर्गाची नंतर उमा होते.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच उमाचा नवरा तापाने फणफणून देवाघरी जातो. पिंडाला
कावळा शिवण्यासाठी परपुरुषाचा स्पर्श उमाला होऊ देणार नाही, असे वचन
हरीदादा देतो अन् पिंडाला कावळा स्पर्श करतो. मग तिथून खरा संघर्ष सुरू
होतो तो समाजाशी आणि परंपरांशी. हा काकस्पर्श व्हावा म्हणून उमाची
हरिदादामध्ये होणारी गुंतवळ, हरिदादाही यात गुंततो का? हे चित्रपट पाहूनच
ठरवावे.

चित्रपट का पाहावा

सचिन खेडेकरने रंगवलेल्या हरिदादा, केतकी माटेगावकर आणि प्रिया बापटने
रंगवलेल्या तारुण्यातल्या उमेसाठी हा चित्रपट नक्की पाहावा.
स्वातंत्र्यपूर्व काळामधील परंपरांमध्ये जखडलेला महाराष्ट्र, सनातन म्हणवत
धर्माच्या नावाखाली स्वार्थ जोपासणार्‍या षंढाचे प्रतीकात्मक चित्रण फक्त
एका कुटुंबाच्या कॅन्व्हासचा आधार घेऊन या चित्रपटाने सुरेख केले आहे. 'सखे
तुला का गं नाहणे आले' यासारखी सूचक गाणी पूर्वीच्या स्त्रियांच्या बाबतीत
पाळल्या जाणार्‍या परंपरा नेमकेपणाने अधोरेखित करतात.

मध्यंतरी सलग चार दिवस घरी होतो तेव्हा सहज म्हणून चॅनल सर्फींग करत असे. संध्याकाळची वेळ ही रीअ‍ॅलिटी शोज आणि त्यांच्या नौटंकीसाठी राखीव असायची. दिवसा मात्र दुरदर्शनच्या सार्‍या वाहीन्यांवर बायकांवर आधारीत सिरियल्सचं वर्चस्व. हिचं त्याच्याबरोबर लफडं, तिचं ह्याच्याबरोबर लफडं, ही तिच्या जीवावर उठलेली, ती हिला घरातून बाहेर काढायला टपलेली असं एक सामायिक कथासुत्र.

थोडंसं या अनुषंगानं वाचन केल्यावर जाणवलं की या मालिका एका विशिष्ट प्रेक्षकवर्गासाठी ल़क्ष ठेवून बनवलेल्या असतात. बाकी दुनिया काय शंख करते याच्याशी त्यांना शष्प देणं घेणं नसतं.

तुमचा हा प्रतिसाद वाचल्यानंतर जाणवलं की असे चित्रपटही एका विशिष्ट प्रेक्षक वर्गासाठी बनवलेले असतात ज्यांना भुतकाळ कुरवाळत "अयाई गं, किती हाल व्हायचे ना त्यांचे" म्हणत चार घटका "दर्जेदार टाईमपास" करायचा असतो.

त्या "आम्हाला गर्व आहे..." वाल्या सिनेमातही काही वेगळं नव्हतं. अरे साला असा उठसुठ तुमचा चाळीत, मच्छीमार्केटला वगैरे अपमान करायला ही काय मोगलाई आहे काय? आणि तुम्ही बरा खपवून घ्याल एका "फालतू" मच्छी विक्णार्‍या बाईकडून तुमचा असा अपमान, आणि तोही केवळ मराठी आहात म्हणून.

थोडक्यात काय तर काल्पनिक अन्याय आणि अपमान वापरुन तुम्हाला भावनिक करायचं आणि आपला गल्ला भरायचा असं हे तंत्र असतं. आणि आपण त्याला पुरते फसतो हे तुमच्या या प्रतिसादावरुन दिसून येते. :)

भडकमकर मास्तर's picture

6 May 2012 - 12:14 pm | भडकमकर मास्तर

हा काकस्पर्श व्हावा म्हणून उमाची
हरिदादामध्ये होणारी गुंतवळ
,

गुंतवळ??
गुंतवळ शब्द वेगळ्या अर्थाने पूर्वी वापरत असत....

चिंतामणी's picture

6 May 2012 - 1:11 pm | चिंतामणी

त्याना "हरिदादामध्ये होणारी गुंतणुक" असे म्हणायचे असेल हो.

समजुन घ्या.

योगप्रभू's picture

6 May 2012 - 1:16 pm | योगप्रभू

संजोप,
तुमच्या सर्व स्वातंत्र्यांबाबत आत्यंतिक आदर बाळगूनही मी किंचित नापसंतीची एक छटा व्यक्त करतो. (ह. घ्या)

परीक्षण वाचल्यानंतर काही मिपाकरांनी 'बरे झाले. आम्ही हा चित्रपट पाहाणार नाही. आमचे पैसे वाचले' अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ग्रंथ असो, की चित्रपट, परीक्षण करणार्‍याने वाचकांना/प्रेक्षकांना त्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करु नये, असे मला वाटते. त्यातून मराठी चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर आता कुठे मराठी चित्रपटसृष्टी काही ऑफबीट विषय धाडसाने हाताळू लागलेली आहे. समाजातील खदखदणार्‍या प्रश्नांना थेट भिडू लागली आहे. मराठी चित्रपट चालत नाहीत कारण मराठी लोकच ते बघत नाहीत, असे उपहासाने वारंवार म्हटले जाते. समीक्षकांचा निगेटिव्ह टोन, हेही एक कारण असू शकते.

धडपड करणार्‍यांना समाजानेच प्रोत्साहन नाही दिले तर मग कोण देणार?

यशोधरा's picture

6 May 2012 - 5:05 pm | यशोधरा

संयत भाषेतली निषेधाची पोस्ट अतिशय आवडली.

शुचि's picture

6 May 2012 - 5:46 pm | शुचि

परीक्षण एकांगी वाटले. कलाकृतीवर पक्षी सर्व संबंधीत कलाकार, मान्यवरांवर अन्यायकारक वाटले.

परिकथेतील राजकुमार's picture

6 May 2012 - 7:35 pm | परिकथेतील राजकुमार

प्रभुदेवाशी सहमत.

माझ्या चित्रपटाच्या टिचभर ज्ञानावर आणि बोटभर अभ्यासावरती येवढेच सांगू शकतो की प्रत्येकाने एकदा तरी 'काकस्पर्श' अनुभवावाच.

परिक्षण आले असल्याने पुन्हा ते लिहिण्यात काही अर्थच नाही, म्हणून येवढेच सांगून प्रतिसाद संपवतो.

कपिलमुनी's picture

7 May 2012 - 12:10 pm | कपिलमुनी

परा,
तुमची परीक्षणे छान असतात ..
तु मचा दृष्टीकोन पण कळू द्या .
"प्रत्येकाने एकदा तरी 'काकस्पर्श' अनुभवावाच." पण का ?? हे लोकांपर्यंत पोचवा..नाहीतर एकांगी परीक्षण वाचून लोक ह्याला वंचित रहातील

रमताराम's picture

6 May 2012 - 8:13 pm | रमताराम

योगप्रभूंशी सहमत.

चित्रपटातील कच्चे दुवे (कदाचित सारा चित्रपटच कच्चा आहे असे तुम्ही म्हणत असाल, तर तसे समजू) लेखात दाखवणे, तुमचे मत मांडणे हा तुमचा हक्क आहेच. तो मान्यच केला आहे. आता आमचे मत मांडण्याचा हक्क बजावतो.

मी चित्रपट पाहिला नाही आणि तुमच्या तपशीलांवर विश्वास न ठेवण्याचे काही कारण नाही. प्रश्न आहे तो हे कच्चे दुवे इतके महत्त्वाचे आहेत का की त्यामुळे चित्रपटाचा घाऊक तिरस्कार करणारे असे परिक्षण टाकावे? माध्यम म्हणून चित्रपटातील चुका दिसल्या हे मान्य. पण चित्रपटाचा गाभा असलेली कथा तुम्हाला काहीच सांगून गेली नाही का? की ती आज कालबाह्य आहे नि केवळ विशिष्ट समाजाशी संबंधित म्म्हणून तुम्ही तिला झिड्कारून टाकले?

असे असेल तर प्रत्येक साहित्य हे त्याचे त्याचे डोमेन, त्याचे त्याचे परिप्रेक्ष्य घेऊनच येत नाही का? कथेलाही तिची पार्श्वभूमी असतेच की. मग (उदा. ) मुंबई-एखाद्या कथेत फक्त पुण्या-मुंबईची पात्रे आहेत नि पुण्या-मुंबईचे लोक आम्हाला कमी लेखतात म्हणून विदर्भाच्या लोकांनी ती कथाच क्षुद्र मानावी का?

कथालेखकाच्या बाबत कथावस्तू नि चित्रपटाच्या बाबतीत पटकथा ही 'त्याला काय सांगायचे आहे ' यावर आधारित असते. त्याला काय सांगायचे आहे हे तुम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न केलात की नाही? त्यात तुम्हाला काय बरे-वाईट सापडले याबाबत तुम्ही काहीच लिहिले नाही. का ते अगदीच बिनमहत्त्वाचे वाटले तुम्हाला?

शांतारामांबद्दल जाताजाता केलेली टिप्पणी अनावश्यक वाटली. माफ करा पण हल्लीच्या 'पाश्चात्य-प्रभाव-पीडीत' (प्रभूंना हे वाचून आश्वर्याचा झटका येणार बहुतेक) समीक्षकांप्रमाणेच देशी चित्रपटांबद्दल तुम्ही तुच्छता बाळगता की काय नकळे. शांताराम हे पाश्चात्य फूटपट्टीने असोत नसोत पण ते सरसकट थिल्लर - उथळ अथवा मनोरंजक चित्रपट काढणारे असे म्हणून त्यांना बाजूला टाकणे हे थोडेसे अज्ञानमूलक असावे का असा प्रश्न पडला आहे. उदाहरणे देऊ शकेन पण एकतर तुम्हाला शांताराम चांगलेच ठाऊक आहे हे आम्हाला ठाऊक आहे हे नि दुसरे, एकदा मतभेद आहेतच म्हटल्यावर पुन्हा लठ्ठालठ्ठी कशाला. फडके, खांडेकर हे देखील तुमच्या लेखी उत्तम लेखक नसतील पण त्या त्या काळात समाजाच्या काही हिश्शांना त्यांनी प्रभावित केले, त्या समाजघटकाला ते आपले वाटले हे खरे आहे. त्यांनाही सरसकट 'फडकाळलेला' वगैरे म्हणणे जरा अगोचरपणाचेच वाटते. मुद्दा तुमचे मत काय आहे हा नाही मुद्दा आहे तो ती जी तुच्छता दाखवत आहात त्याचा. पुन्हा तुम्ही म्हणाल हा आमचा प्रश्न आहे, तर तेही मान्यच. फक्त आमची असहमती नोंदवून ठेवतो इतकेच.

'तेज' बघीतला असतास, 'विकी डोनर' बघीतला असतास...' हा उल्लेख एकतर हे दोन्ही चित्रपट आपण पाहिले नसल्याचा अथवा काकस्पर्श बद्दल शक्य तितके वाईट्ट लिहिण्याचा (कदाचित पूर्वग्रहदूषित?) पूर्वसंकल्प असल्याचेच लक्षण आहे असा आमचा समज झाला आहे.

अवांतरः आम्ही ओळखतो ते सन्जोप राव हे नाहीत. का हा सोशलाईज होण्याचा प्रयत्न आहे? ;)

ता.क. : हा चित्रपट आम्ही अद्याप पाहिलेला नाही. त्यामुळे यावरून चित्रपटाबद्दलचे आमचे मत काय असावे हा निष्कर्ष काढू नये (अशा ढुश्क्लेमर्सचा फारसा उपयोग नसतो तरीही लिहिला नाही असे वाटू नये म्हणून लिहिला इतकेच.)

माझीही शॅम्पेन's picture

6 May 2012 - 10:31 pm | माझीही शॅम्पेन

शेजारचे काका-काकु हा चित्रपट बघून आल्या नंतर इतके गहिवरुन गेले होते , एक खूप चांगला चित्रपट पहिल्याचे समाधान चेहर्यावार होते , ते नक्किच खोट नव्हत..

अर्थतच परीक्षण आवडले नाही !

योगप्रभू साहेब, अतिशय योग्य बोललात एकदम सहमत.

परिक्षण बरचस एकांगी व पक्षपाती झाल आहे अस वाटत.

सन्जोप राव's picture

6 May 2012 - 8:34 pm | सन्जोप राव

मतभेद व्यक्त करणार्‍या मित्रांपैकी कोणीही अद्याप 'काकस्पर्श' पाहिलेला नाही, त्यामुळे प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडत नाही.
अवांतरः आम्ही ओळखतो ते सन्जोप राव हे नाहीत. का हा सोशलाईज होण्याचा प्रयत्न आहे? Wink
हा आरोप बाकी तीव्र निषेधासकट अमान्य! एकवेळ तुम्ही सन्जोप रावांना ओळखतच नाही असे मान्य करु!

अँग्री बर्ड's picture

6 May 2012 - 9:16 pm | अँग्री बर्ड

चित्रपट आजच पाहिला आहे. तेव्हाचा काळ छानरित्या दाखवला आहे. सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स, कलाकार, संगीत , पटकथा, दिग्दर्शन ह्या सर्व कसोटींवर हा चित्रपट सरसच आहे. तेव्हाच्या काळातल्या जाचक रुढींचा परिणाम पडद्यावर पाहता मन हादरते आणि स्त्रियांवर अश्या जाचक प्रथा लादल्याविरुद्ध ज्या समाजसुधारकांनी आवाज उठून त्या प्रथांचे निर्मुलन केले त्यांचे खरेच खूप उपकार आहेत ह्या समाजावर ह्याची जाणीव होते. " जन्म बाईचा ग बाईचा " हे गीत तर निव्वळ सुंदर आहे.
"विहीर" चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शन केलेला माझा मित्र माझ्यासमवेत आला होता, त्याचेही मत हेच आहे. Film and Television Institute of India - Pune मध्ये मी काही दिवस व्यतीत करत तिथे देशोविदेशीचे चित्रपट पहिले, काही दिग्दर्शकांशी चर्चा करण्याची संधी मिळाली, सिनेमा पडद्यावर येण्याआधीची धडपड जवळून पहिली, ह्या सगळ्यात जे ज्ञान मिळाले त्यावरून हा चित्रपट चांगलाच आहे असे म्हणतो. चार स्टार देण्यास हरकत नसावी. फक्त ती कथा १९३०-५० ह्या काळातली असल्याने आजच्या काळातली परिमाणे त्या त्या पात्रांच्या वागण्याला लाऊ नका असे म्हणतो. शिवाय योगप्रभूंच्या मताशी संमत. चित्रपट पाहिला देखील नसता काही मिपाकर पैसे वाचले पैसे वाचले असे म्हणत ५०-१०० रुपये वाचवून कुठे बंगला बांधायला जाणारेत ते देवच जाणे. पूर्वग्रहदुषित मन ठेऊन जर चित्रपट बघणार असाल तर मग अवघड आहे. परीक्षण किती सुमार असू शकते ह्याचे प्रत्यंतर आले, एकंदरीत मिपा बरेच काही शिकवते.

सन्जोप राव's picture

7 May 2012 - 5:39 am | सन्जोप राव

अगदी अपेक्षेबरहुकुम प्रतिसाद. चित्रपट बघून मग प्रतिसाद दिल्याबद्दल - आमचे मित्र प्रा. डॉ. बिरुटेसरांच्या शब्दांत सांगायचे तर 'धन्स'.
हा चित्रपट बघताना गिरीश कुलकर्णी आणि अमोल पालेकर माझ्याबरोबर होते. त्यांचेही माझ्यासारखेच मत आहे. शून्य किंवा वजा एक स्टार द्यावेत असे गिरीश म्हणाला. एवढे काही नको, शून्य ते अर्धा इतके स्टार द्यावेत असे पालेकर म्हणाले.
असे जर काही मी लिहिले तर त्याने तो चित्रपट श्रेष्ठ होतो का? कुणाबरोबर चित्रपट पाहिला, त्याची क्वालिफिकेशन्स काय यापेक्षा काहीतरी स्वतःचे लिहिता आले तर पहा. स्त्रियांवर अश्या जाचक प्रथा लादल्याविरुद्ध ज्या समाजसुधारकांनी आवाज उठून त्या प्रथांचे निर्मुलन केले त्यांचे खरेच खूप उपकार आहेत ह्या समाजावर ह्याची जाणीव होते.
याचा अर्थ तुम्ही पाहिलेला व मी पाहिलेला चित्रपट वेगळा आहे असा होतो. की आपल्याला असा संदेश दिसू शकणारा एखादा तिसरा डोळा आहे? काय ते गजानन महाराज जाणोत!
एकंदरीत मिपा बरेच काही शिकवते.
असे? आपल्या वर्तनातून तर तसे वाटत नाही!
ज्या महाराष्ट्रात गवतांना भाले फुटतात त्याच गवतात फितुरीचे फुले देखील फुलतात. त्यामुळे होशियार
हे जाम आवडले आहे. फितुरीचे फुले ! क्या बात है! फितुरीचे आंबेडकर का नाही?

अँग्री बर्ड's picture

7 May 2012 - 9:51 am | अँग्री बर्ड

हा चित्रपट बघताना गिरीश कुलकर्णी आणि अमोल पालेकर माझ्याबरोबर होते. त्यांचेही माझ्यासारखेच मत आहे. शून्य किंवा वजा एक स्टार द्यावेत असे गिरीश म्हणाला. एवढे काही नको, शून्य ते अर्धा इतके स्टार द्यावेत असे पालेकर म्हणाले.
असे जर काही मी लिहिले तर त्याने तो चित्रपट श्रेष्ठ होतो का? कुणाबरोबर चित्रपट पाहिला, त्याची क्वालिफिकेशन्स काय यापेक्षा काहीतरी स्वतःचे लिहिता आले तर पहा.

तुमच्या दृष्टीकोनातून जर तो चित्रपट वाईट ठरतो तर मग ह्यांनी तो नावाजला तर काय गैर आहे ? एकाला चित्रपटातले ज्ञान असेल ,तो त्यातलाच एक भाग असेल आणि त्याने जर एका कलाकृतीवर मत नोंदवले तर ते निश्चितच ग्राह्य धरले पाहिजे, त्यालाच तर जाणकार म्हणतात. शिवाय चित्रपटाबद्दल माझे मत काय हे मी आधी स्पष्ट केलेले आहे.

याचा अर्थ तुम्ही पाहिलेला व मी पाहिलेला चित्रपट वेगळा आहे असा होतो. की आपल्याला असा संदेश दिसू शकणारा एखादा तिसरा डोळा आहे? काय ते गजानन महाराज जाणोत!

आणि अगदी बरोबर, इतर लोकांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मनात अढी ठेउनच चित्रपट बघितलाय त्यामुळे तो तुम्हाला वेगळाच भासणार. तुम्हीच कबूल केल्याने बरे झाले.

एकंदरीत मिपा बरेच काही शिकवते.
असे? आपल्या वर्तनातून तर तसे वाटत नाही!

तुमच्यासारख्या लोकांकडे बघून तुमची "बद तो हुआ नाम तो सही" ही वृत्ती बघून काही लोकांना नकारात्मक प्रसिद्धीची देखील आवड असते हे मिपाकडूनच कळाले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2012 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वप्रथम चित्रपट पाहिलेला नसल्यामुळे चित्रपट परीक्षण किती उत्तम उतरलं आहे, त्याबाबतची मोकळी दाद देता येत नाही. पण, चित्रपटाची थोडक्यात करुन दिलेली ओळख आवडली. विलक्षण प्रेम कहाणीच्या जाहिरातीही पाहात असल्यामुळे चित्रपटाची उत्सूकता आहेच. फक्त -

'''बाकी पन्नास -साठ-सत्तर वर्षांपूर्वीची कोकणी पार्श्वभूमीवरची कोणतीही एक कादंबरी घ्या......'' पासूनचा मुद्दा तितकासा व्यक्तिगत मला पटला नाही. सर्वांनीच कथा-कादंबर्‍यामधून किंवा वैचारिक लेखनामधून असे विषय समजून घेतले आहेत असे समजण्याचे काही कारण नाही. उलट, चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज, धर्ममार्तंडाचा पाखंडीपणा आणि पुरोगामी विचारसरणीच्या मंडळींचा संघर्ष किती समर्थपणे उतरला आहे. आजच्या पिढीला ते समजून घेता येते का ? वगैरेवर चित्रपटाच्या निमित्तानं भाष्य केलं असतं तर ते अधिक उत्तम ठरलं असतं, असे वाटले. .

परीक्षण खुसखुशीत करण्याच्या नादात मूळ विषयापासून चित्रपट परीक्षण दूर तर गेलं नाही ना, असा विचार सारखा येत होता, हेही नम्रपणे नमूद करतो.

-दिलीप बिरुटे

बरं झालं आधीच समजलं.
जालावर आल्यानंतरही वेळ जाईनासा झाल्यावर चित्रपट पाहणेत येईल.
संजोपरावांचे आभार, आमचा वेळ वाचवल्याबद्दल.

आबा's picture

7 May 2012 - 12:21 am | आबा

हम्म, छान आहे...

बाकी पन्नास -साठ-सत्तर वर्षांपूर्वीची कोकणी पार्श्वभूमीवरची कोणतीही एक कादंबरी घ्या, कोणीही एक शांतारामी ढोबळ सांकेतिकी दिग्दर्शक घ्या, थोडे फडकाळलेले-खांडेकरी संवाद लिहा. पाचदहा बाराबंद्या, साताठ धोतरे, नऊवारी लुगडी, पगड्या आणि नथी घ्या, उमेदवारी करणारे काही कलाकार घ्या आणि सुरु करा शूटिंग! झाला 'काकस्पर्श'! हाय काय आन नाय काय...

चालायचच हो, सगळीकडेच लागू आहे हे !

जीएंची शैली घ्या, "अठ्याळ - राखुंडे" असले पेश्शल शब्द वापरा, दोन चार दिग्गजांना उगाच चिमटे काढा (हो चिमटेच ! आसूड - कोरडे,वगैरे ओढायचे दिवस संपले आता), जुन्या मासिकांमध्ये येणारी परिक्षणातली वाक्ये कापून इकडे-तिकडे जोडा, झालं "परिक्षण" ! हाय काय आन नाय काय...

सन्जोप राव's picture

7 May 2012 - 5:42 am | सन्जोप राव

वा, वा.. आबा. जुना दोस्त भेटल्याचा आनंद झाला. नाहीतर इतके जुने संदर्भ कुणाला माहिती असणार? फार्फार बरे वाटले. धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2012 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीएंची शैली घ्या, "अठ्याळ - राखुंडे" असले पेश्शल शब्द वापरा, दोन चार दिग्गजांना उगाच चिमटे काढा (हो चिमटेच ! आसूड - कोरडे,वगैरे ओढायचे दिवस संपले आता),

आबा, आपण कंच्या गावचे म्हणायचे. :)

-दिलीप बिरुटे

आबा's picture

7 May 2012 - 5:37 pm | आबा

इथलाचं आहे की, आणि कुठला ?

प्रीत-मोहर's picture

7 May 2012 - 10:29 am | प्रीत-मोहर

एवढा अप्रतिम पिक्चरमधे तुम्हाला एवढच दिसल सन्जोपराव?

माझ मतः बर्‍याच दिवसात काहीतरी छान पाहिल. प्रत्येकान आवर्जुन बघावा असा चित्रपट.

असे बरेच चित्रपट येउन गेलेत की ज्या बद्दल दोन टोकांची मतांतरे असलेली परिक्षणे/ स्वानुभव वाचनात आली आहेत.
अश्यावेळी रसिकाने ती चित्रकृती पाहुन स्वत:च निर्णय घेणे योग्य असते असा स्वानुभव आहे. (काही परिक्षण वाचुन चित्रपट न पहाण्याचे निर्णय, मी नंतर दुसरी परिक्षणं वाचुन बदलले आहेत. आणि मला त्याचा पश्चाताप झाला नाही.)

समिक्षकाने नवीन चित्रपटाची ओळख/ परिक्षण करुन देताना वाचकांची उत्सुकता एका अंशावर ताणत न्यावी आणि मग निर्णय त्यांच्यावरच सोडुन द्यावा. (आता चित्रपट एकदमच टुकार असेल तर त्या बद्दल परिक्षण लिहिणार्‍यास तरी का दोष द्यावा. पण अश्या चित्रपटांबद्दल (अ‍ॅड्या सारखी) काही काळाने परिक्षण पाडावी. तोवर बरेच जणांनी तो चित्र्पट पाहिलेला असतो. आणी धागा हिट्ट होतो. ;))

चित्रपट का पाहु नये ते सन्जोप रावांच लिखाण वाचुन कळलं. आता हाच चित्रपट का पहावा ते एखाद्या दुसर्‍या समिक्षकाच लेखन वाचुन कळावे हीच इच्छा. (पराला एक विनती आहे. दुसरा धागा काढायचा नसल्यास त्याने इथेच सविस्तर प्रतिसाद द्यावा.)

(तसही हा किंवा दुसरा कुठलाही मराठी चित्रपट सिनेमागृहात जाउन पहाण्याचे भाग्य आमच्या नशीबी नाही. हिंदी चित्रपटांचा प्रश्नच नाही. ते आम्ही घरीच पहतो. ;))

मुक्त विहारि's picture

7 May 2012 - 3:47 pm | मुक्त विहारि

ह्या लेखावर दिलेला प्रतिसाद आवडला.

अतिशय संयत भाषेत आणि योग्य शब्दांचा वापर करून दिला आहे प्रतिसाद.

शाहिर's picture

7 May 2012 - 2:26 pm | शाहिर

लेखाला सरळ सरळ ब्राम्हण द्वेषाचा वास येतो आहे ..आणि खालील प्रतिसादामधल्या ओळींनी तर जास्त !!

>>ज्या महाराष्ट्रात गवतांना भाले फुटतात त्याच गवतात फितुरीचे फुले देखील फुलतात. त्यामुळे होशियार
हे जाम आवडले आहे. फितुरीचे फुले ! क्या बात है! फितुरीचे आंबेडकर का नाही?

बाकी
>>चित्रपटाच्या नावापासूनच तो खास ब्राह्मण प्रेक्षकांना आकर्षित करुन घेण्यासाठी बनवलेला आहे हे स्पष्ट होते.

काकस्पर्श ह्या नावात ब्राह्मण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासारखे काय आहे ??

आता चित्रपटांची नावे आणि आर्कषित झालेल्या जाती असाही लेख लिहा ..म्हणजे आपले जातीय अभ्यास किती चांगला आहे ते कळेल..

लेखाला सरळ सरळ ब्राम्हण द्वेषाचा वास येतो आहे

नशिब चित्रपट काढणारे दिग्दर्शक मांजरेकर आणि कलाकारही "आपलेच" आहेत :-)

नाहि तर साला ... सगळी फिल्म इंडस्ट्रीच 'ब्राह्मणद्वेषी' आहे असे खापर फुटता फुटता राह्यलं ना :-)

अवांतर : चित्रपटाचा विषय आहे म्हणून आठवले, अलिकडेच चित्रपटसृष्टीचे जनक फाळके नसून तोरणे आहेत असे वाचण्यात आले.

अन्या दातार's picture

7 May 2012 - 3:21 pm | अन्या दातार

अवांतर : चित्रपटाचा विषय आहे म्हणून आठवले, अलिकडेच चित्रपटसृष्टीचे जनक फाळके नसून तोरणे आहेत असे वाचण्यात आले.

या मुद्द्याचा विविध ठिकाणी उहापोह झाला असून फाळकेच चित्रपटसृष्टीचे जनक असल्याचे सप्रमाण सिद्ध केल्या गेले आहे.

अजातशत्रु's picture

8 May 2012 - 10:06 am | अजातशत्रु

या मुद्द्याचा विविध ठिकाणी उहापोह झाला असून फाळकेच चित्रपटसृष्टीचे जनक असल्याचे सप्रमाण सिद्ध केल्या गेले आहे

म्हणजे इथे (मिपा पुरते )मिपावर का होईना सिद्ध तरी झाले ?
संबंधित चर्चा वाचली, एकही प्रतिसाद अभ्यासपुर्ण नाही.
सगळा पांचटपणा, :tired:

लोकांनी त्यांचे वादासाठी (उदा. काश्मिर/ बाबरी मस्जिद प्रश्न वगैरे) न्यायपालिका/लवादाकडे जाऊन दाद
मागण्यापेक्षा इथे मिपावर का मागत नाहित याचे कोडे पडले आहे .:sad:


अवांतरः समस्त ब्रिगेडी जमातीला फाशी द्यावि म्हणतो , त्या संदर्भात इथे खटला चालविला तर?
अर्थात अपेक्षित निकालच लागेल याची खात्री आहे :-)

इस्पिक राजा's picture

8 May 2012 - 11:23 am | इस्पिक राजा

म्हणजे इथे (मिपा पुरते )मिपावर का होईना सिद्ध तरी झाले ?

एवढा देशहिताचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही सुप्रिम कोर्टात का नेत नाही. या ब्राह्मणांची चांगली जिरवा तुम्ही तिथे,

संबंधित चर्चा वाचली, एकही प्रतिसाद अभ्यासपुर्ण नाही.

खरे की काय? ऐकावे ते नवलच. त्याहुन जास्त अभ्यासपुर्ण प्रतिसाद तुम्ही द्या की मग

सगळा पांचटपणा,

तुम्ही तुमचेच जुने प्रतिसाद तर नाही ना वाचले?

लोकांनी त्यांचे वादासाठी (उदा. काश्मिर/ बाबरी मस्जिद प्रश्न वगैरे) न्यायपालिका/लवादाकडे जाऊन दाद
मागण्यापेक्षा इथे मिपावर का मागत नाहित याचे कोडे पडले आहे .

खरे आहे तुमाच्यासारखे ज्येष्ठ श्रेष्ठ नि:पक्षपाती न्यायनिष्ठुर न्यायमूर्ती इथे असताना इतर ठिकाणी जावे कशाला म्हणतो मी? सालं ती बाबरी मस्जिद ब्राह्मणांनीच पाडली म्हणुन एकदा जाहीर करुन टाका बरे. आणी काश्मिर मधील दहशतवादाला सुद्धा महाराष्ट्रातीला ब्राह्मण अतिरेकीच जबाबदार आहेत म्हणुन ओकुन टाका बरे एकदा.

अवांतरः समस्त ब्रिगेडी जमातीला फाशी द्यावि म्हणतो , त्या संदर्भात इथे खटला चालविला तर?
अर्थात अपेक्षित निकालच लागेल याची खात्री आहे

सापाला दगडाने चेचावे लागते. फाशी देउन उपयोगाचे नाही. अर्थात तुमच्यासारखे ज्येष्ठ श्रेष्ठ ............. इथे असताना अपेक्षित निकालच लागेल याची खात्री आहे

जय हिंद, जय भीम

इस्पिक राजा's picture

7 May 2012 - 3:25 pm | इस्पिक राजा

हा ब्राह्मणद्वेषाचा पूर अधुनमधुन येत असतो काय? आणि अजातशत्रूदेखील वास आला की बरोबर येतात माग काढत.

ब्रिगेडींची नेहमीची स्टाइल आहे काय असे मुद्दाम वाद उकरुन काढणारे प्रतिसाद द्यायचे २-३ धाग्यांवर. मग पेटवुन द्यायचे. भांडणे लावायची आणि मग फिदीफिदी हसत बसायचे.

इतरवेळेस प्रतिसाद देइनात का, पण अश्यावेळेस हमखास बरे अवतीर्ण होतात ब्रिगेडी चहूबाजूंनी.

मज्जा आहे ब्वॉ.

बादवे तो फाळके तोरणे वाद निकालात निघाला आहे. तुम्ही तो परत उकरुन काढण्यासाठीच आला आहेत हे न कळायला लोक मुर्ख नाहीत असे वाटते,

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2012 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार

अहो त्यांचे नाव का नाही 'अ जात शत्रु' असे आहे. निट लिहा बरे त्यांचे नाव.

शाहिर's picture

7 May 2012 - 3:55 pm | शाहिर

या या !!
नुसते वाचण्यापेक्षा अक्कल लावत जा..तोरणे कि फाळके कळेलच..
आणि लेख वाचायचे कष्ट घेतले असते तर प्रतिसादाचा अर्थ कळला असता ..
पण समजून न घेता ( कळफलक) बडवत बसायचे ...

अशी वृत्ती आहे तुमची..

अजातशत्रु's picture

7 May 2012 - 4:49 pm | अजातशत्रु

:-)
इथे फाळक्यांवर चर्चा झाली हे ज्ञात नव्हते, साधे विचारले तरी अंगावर येता हा गुणधर्म अजूनहि शिल्लक आहे ?

अय्या !
हे बाकी जाम भारी ,अगदि साजेसे ;)


.
.
.
.
.

( :tired: )

इस्पिक राजा's picture

7 May 2012 - 5:50 pm | इस्पिक राजा

तुम्हा लोकांची ही खाजुन अवधान आणण्याची , उगा दुसर्‍यांच्या खोड्या काढायची, बाष्कळ बडबड करण्याची आणि नसते किडे करण्याची सवय अजुन शिल्लक आहेच की.

अमोल केळकर's picture

8 May 2012 - 9:56 am | अमोल केळकर

या सिनेमातील गाण्यांबद्दल चार वाक्य ऐकण्यास उत्सूक आहे :)

अमोल