कॅट'स इन द क्रेडल...

हॅरी चॅप्लिनच्या "कॅट'स इन द क्रेडल" या मूळ इंग्लिश गाण्यावर मनसोक्त स्वातंत्र्य घेऊन मी केलेला गद्यरुप अन्याय :

.................................................................................................................

एके दिवशी अचानकच माझं पोर जगात आलं..नेहमीसारखंच अन न चुकता याच जगात आलं..
इकडे माझ्या चार्टवर आखलेल्या बिझनेस फ्लाईट्स अन एअरमाईल्स..
तिकडे ते एकटं एकटं चालायलाही लागलं..
माझ्याच नकळत बोलायलाही लागलं..

वाढता बोलता पोरगं म्हणायचं .."मी बाबासारखा मोठ्ठा होणार..बाबासारखा मोठ्ठा होणार.."

..

उबदार घरात बाळाची गादी..
त्याला आणला होता चांदीचा चमचा अन चांदीचीच वाटी..
बाळाच्या डोळ्यात पेटलेले हिरे.. अन वाट पाहणारे अश्रू...
अश्रू टिपणारे अभ्र्याचे धागे..
बाबा कुठे गेला? पळणार्‍या चंद्रामागे..??

"...बाबा तू परत कधी येणार?"
जाताजाता प्रत्येक वेळी याची एकच भुणभुण सुरु...
आणि माझं उत्तर..
"माहीत नाही रे बेटा..पण भेटलो की नक्की मज्जा करु.."

...पण भेटलो की नक्की मज्जा करु..

पोरगं पाचचं झालं..ऑर्डर केलेल्या सायकलची होम डिलिव्हरी झाली..
"बाबा तू कित्ती छान..बेस्ट बाबा इन द वर्ल्ड.."चं प्रमोशन..
अन मग..
"कधी शिकवशील मला सायकल? माझ्यामागे पळशील ना? सोडणार नाहीस ना?"
..अशी पुढची केआरए लिस्ट आली..

"खूप खूप काम आहे बेटा.. आज नाही.. उद्या..ओक्के?"

"ओक्के.." हसत हसत पळताना त्याच्या डोळ्यात तेच हिरे चमकत होते..
म्हणत होते.." मी बाबासारखा मोठ्ठा होणार..बाबासारखा मोठ्ठा होणार.."

बाबाने कष्टाने इतकं जमवलं की पोरगं मेडिसिन म्हणता मेडिसिनला गेलं..
बाबाने दिलेला अजून एक चांदीचा चमचा, तोंडात न दिसणारा..
पोरगं देखणं उंचनिंच झालं अन एकदा चक्क घरात दिसलं..
तेव्हा जरा जवळ बस म्हटलं..
"यू आर अ हँडसम बॉय माय चाईल्ड...कोणी पोरगी आहे काय मागे तुझ्या..?"
कसनुसं मला तोडत तो म्हणाला.."बाबा जरा लवकर गाडीची चावी द्या.."
दिली तेव्हा म्हणाला.."थँक्स बाबा. भेटू उद्या.."

बोटाभोवती चावी फिरवत बेफिकिर झुलपं उडवत तो जाताजाता एकदाच वळला..
तितक्यातही झटकन ते डोळ्यातले हिरे म्हणाले.." मी बाबासारखा मोठ्ठा होणार..बाबासारखा मोठ्ठा होणार.."

कापरासारखा काळ उडाला अन कापसासारखा मी शुभ्र म्हातारा झालो.
आता पोरगं फोनवरच..म्हणून म्हटलं फोनच करु....
"ये रे बेटा एकदा.. भेटून.. बसून..एकेक पेग भरु.."
"यायचंय हो बाबा.. पण काय करु..
ओपीडीचा क्यू अन त्यात बाळाला फ्लू..
..फोनवर बोलूच.. अन भेटलो की नक्की मज्जा करु.."

..."अन भेटलो की नक्की मज्जा करु..."

फोन खाली ठेवला अन माझाच मला आवाज आला..
पोरगा अगदी बाबासारखा झाला..
पोरगा अगदी बाबासारखा झाला..
.....

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

:( :( :(

... !!!!

तुफान गवि, केवळ तुफान....

हे हॅरी चॅपिनच्या मूळ गाण्यासाठी....

या दुव्यासाठी तुला दुवा रे प्रासभाऊ.. थोडी हेवी मेटल वर्गातली व्हर्शन "अग्ली किड जो"ची सुद्धा आहे. ती मूडशी जास्त जुळणारी आणि झपाटणारी आहे..

अरे, आधीच्या विडिओमध्ये हॅरी चॅपिनचा मुलगा नि बायको त्याच्याबद्दल अणि त्या गाण्याबद्दल बोलत आहेत म्हणून मी हे लिंक दिली. त्याचप्रमाणे शेवटी हॅरीचं गाणं त्याच्याच आवाजात ऐकलेलं केव्हाही चांगलंच ना.... :-)

बाकी, तू म्हणतोस त्या अग्ली किड जोंचं वर्जनही काहीसं हेवी मेटल टाईप असल्याने ठीकच आहे पण माझी हॅरीचं वर्जन ही वैयक्तिक आवड आहे.

असो. हे घे अग्ली किड जो चं वर्जन...

आनंद घ्या.... :-)

नाही.. तुझा दिलेला व्हिडीओ इथे ब्लॉकच आहे त्यामुळे तो नंतर पाहणार. तो अप्रतिमच असेल यात शंका नाही.
अग्ली किड जो ची व्हर्शन कर्कश होत असली तरी त्या कर्कशतेमुळे एक "त्रास" होतो ना प्रास.. तो गाण्यातल्या "त्रासा"शी सुसंगत आहे.

मूळ रुप अर्थात सर्वात चांगलं आहेच..

अग्ली किड जो ची व्हर्शन कर्कश होत असली तरी त्या कर्कशतेमुळे एक "त्रास" होतो ना प्रास.. तो गाण्यातल्या "त्रासा"शी सुसंगत आहे.

सहमत आहे.

तरी, तुझ्या या गाण्याच्या रुपांतराने जाणवणारी तगमगही तितकीच प्रखरपणे कळते आहे रे....

मस्त, अन् नेमके!

मस्तच...!

हर्ट टचिंग वैगेरे!

प्रकाटाआ

काळजाला हात घालणारे...

अगदी चुकीच्या वेळी तुमचं हे लेखन आलंय हो :(

बाळाच्या डोळ्यात पेटलेले हिरे.. अन वाट पाहणारे अश्रू...
अश्रू टिपणारे अभ्र्याचे धागे..

हे आजच घरातून निघताना अनुभवलंय. त्या रडवेल्या झालेल्या हिर्‍यांना विसरण्याचा प्रयत्न आता तर अजूनच अपुरा पडणार..

छान जमली आहे.

!!!!!

:(

आजच दोन वर्षाचा भाचा पाहिला. ए बी सी डी च्या पिढीच पहिल पोर ! दोघही आपापल्या करिअरमुळ त्याला तिन महिन्यापासुन डे केअर मध्ये ठेवताहेत. अन संध्याकाळी परत आल्यावर दोघांकडेही तेव्हढा स्टॅमिना नसतो याची बडबड वा दंगा सोसण्याचा. खर सांगते, जीव तुटला माझा. अश्या वेळी मी घेतलेला , "तुझ्या कमाईत घर चालतय ना? मग मला मनमुराद आई होउ दे " हा निर्णय मला आजही योग्य वाटतो . अर्थात तरीही पोरांना "पप्पा" एकदम भारी वाटतो, अन आई 'रोजचीच ' वाटते, हे वेगळ!

गवी नेहमी सारखच सुरेख, पण हे काव्य कस निर्मळ वाटल.

"तुझ्या कमाईत घर चालतय ना? मग मला मनमुराद आई होउ दे " हा निर्णय मला आजही योग्य वाटतो

_/!\_

- ( आपल्या निर्णयाचा आदर असलेला ) सोकाजी

अवांतरः गविंच्या लेखनाविषयी क्या केहेने! नेहमीप्रमाणेच मस्त काळजाला भिडणारे आणि ह्यावेळी चेन्नैत एकटाच असल्याने ते जास्त जाणवले :cry:

मनापासून दंडवत....

"तुझ्या कमाईत घर चालतय ना? मग मला मनमुराद आई होउ दे - +१०० या स्वभावाला, खुप खुप आवडला हा स्वभाव.

खरंच हे सगळं जगतोय सध्या, मागं एकदा पोराच्या शाळेत काहीतरी कार्यक्रम होता, नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामामुळं जाउ शकलो नाही, दुस-या दिवशी पोराची शाळेची डायरी पाहिली, त्यात बाईंनी लिहिलं होतं ' आई -बाबांना घेउन या ', आणि मी गेलो नाही म्हणुन पोरानं त्यातल्या बाबावर क्रॉस केला होता चिडुन, त्यानंतर मात्र रजा काढुन प्रत्येक वेळेला त्याच्या शाळेत जातो, अगदी न चुकता.

गवि, मराठी गाणंही छान जमलय. शेवटी वाईट वाटलं.
अपर्णा, अभिनंदन! त्याबद्दल लिही ना.

टचिंग!

इंग्लिश गाण्यांच्या वाटेला जात नाही. पण मराठी भावानुभव आवडला.

भावानुवाद आवडला

सगळीकडे बाप आणि मुलं सारखीच! मग भारत असो की अमेरिका.

+१

+१

हल्ली स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी सर्वच आई-वडिलांना (पूर्वीच्या मानाने) ताकदी बाहेर शारीरिक आणि मानसिक परिश्रम करावे लागतात. परिणामतः त्यांना पराकोटीचा थकवा येतो. शारीरिक थकवा नसेल तरी अनुत्साह तर सतत पाठपुरावा करतो. हे कुठल्याही प्रकारचे समर्थन नाही. आयुष्यातील प्राथमिकता ठरवून, तसेच बाप-मुलं, आई -बाप आणि आई-मुलं ही नाती जपताना, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही ह्या विचारांवर मन एकाग्र करून ह्या नात्यांना रोजच्या जीवनात महत्त्व दिलेच पाहिजे. भले मग त्यासाठी काही सहससाध्य (पण अनावश्यक) गोष्टींचा त्याग करावा लागला तरी तो करावा.

काका, अगदी पटते हे सगळे. यावर वाद घालणे, दुसर्‍याला पटवून देणे सोडले आहे. शेवटी आपल्याला चूक ठरवून मोकळे होतात. बरोबर गोष्टींना चूक ठरवणे ही फ्याशन झालिये आजकाल. म्हणूनच अपर्णाला म्हटलं की लिही काहीतरी. :)

अनुवाद आवडला...

अनुवाद भावुक करुन गेला.

भावानुवाद आवडला.

यावरूनच अजून १ कोट आठवली,
'enjoy the little things in life for one day you'll look back and realize they were the big things'

छान . अगदी छान . हेच सायकल सकारात्मक बाजूने ऐकायचे असेल तर हे ऐका............

आता याचेही भाषांतर करा.............

http://www.youtube.com/watch?v=xZbKHDPPrrc

खूप छान जमलयं

भावानुवाद खूप सुरेख!
स्वाती

हॅरी चॅप्लिनच्या "कॅट'स इन द क्रेडल" या मूळ इंग्लिश गाण्यावर मनसोक्त स्वातंत्र्य घेऊन मी केलेला गद्यरुप अन्याय :>>>>

आम्हाला मात्र एक नवीच अनुभूती देऊन समृद्ध केले आहेत. वेचा आवडला. मूळ कविताही नक्कीच आवडलीच असती.

अशाच उत्तमोत्तम अभिव्यक्तींकरता हार्दिक शुभेच्छा!

हा धागा कसा काय नजरेतून सुटला ब्वा?

बाकी भावानुवाद सुरेखच.