ग्रेस

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
8 Apr 2012 - 11:00 pm

मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल

स्वत:च्या संपूर्ण मालकीची आणि केवळ स्वत:ची अशी अत्यंत सुंदर भाषा, लयकारीचा जीवघेणा नखरा आणि प्रतिमांची गूढ आणि नितांत रम्य मांडणी म्हणजे ग्रेस.

ग्रेसनी कवितेला दिलेल्या योगदानाप्रती अत्यंत हार्दिक कृतज्ञता व्यक्त करून; सृजनाची प्रक्रिया, सृजनातली दुर्बोधता आणि ग्रेसच्या कवितेतून आपण काय घेऊ शकतो हे विशद करणारा हा लेख सादर करतो.

______________________________

सृजनाची संपूर्ण प्रक्रिया अशीये:

हिज इनिशीयल चॉइस ऍट द बिगिनींग ऑफ अ वर्क ऑफ आर्ट इज थिऑरिटिकली कंप्लीटली ओपन. ही इंपोजेस ऑन हिमसेल्फ अ हायली रेसट्रिक्टेड फॉर्म

एनी फॉर्म विल डू सो लाँग ऍज इट कंटेन्स द पोटेंशिअल फॉर अ कॉंप्लेक्स सेट ऑफ वेरीएशन्स.

द क्वालिटी ऑफ ब्यूटी विल डिपेंड ऑन हाऊ ही मॅनेजेस तू अवॉइड द मोस्ट ऑबवियस अँड क्लम्झी ऑफ पॉसिबल वेरीएशन्स अँड हाऊ ही कंट्राइव्ज टू मेक डेअरींग, सटल, अम्युझिंग ऑर सप्रायझींग वेरीएशन्स ऑफ द थीम विदाउट ऍक्शुअली डिस्ट्रॉइंग इट.

(आपण मूळात निराकार असल्यानं, कोणत्याही अभिव्यक्तीपूर्वी) अभिव्यक्तीच्या असंख्य संभावना आपल्याला उपलब्ध आहेत पण अभिव्यक्त होण्यासाठी आकृतिबंधाची गरज आहे.

हा आकृतिबंध कोणताही असू शकेल (कविता, लेखन, चित्रकला, नृत्य, गाणं, नाटक, सिनेमा किंवा वक्तृत्व) फक्त त्या आकृतिबंधात अभिव्यक्तीच्या अनेकानेक संभावना हव्यात. इट इज ऑल्सो द अदर वे, अभिव्यक्तीचा आकृतिबंध निश्चित झाल्यावर, स्वीकारलेल्या विषयात अभिव्यक्तीच्या अनेकानेक संभावना हव्यात, म्हणजे कलाकारानं गायन हा अभिव्यक्तीचा फॉर्म स्वीकारला तर त्याला यमन सारखा (किंवा तत्सम) अभिव्यक्तीच्या अनेक संभावना असणारा रागविषय निवडायला हवा.

आविष्काराचं सौंदर्य कलाकार मग, सरधोपट आणि कंटाळवाणी वेरीएशन्स चुकवत; साहसी, तरल, मोहक आणि उत्कंठापूर्ण वेरीएशन्स कशी करतो आणि ती करताना स्वीकारलेल्या फॉर्मशी इमान कसं राखतो यावर अवलंबून असतं.

_______________________________________

ग्रेसची कविता दुर्बोध होण्यामागे कारण असंय की त्याची कविता शब्दसौंदर्य आणि लयकारीशी नि:संशय इमान राखते पण तिच्या सर्व वेरीएशन्सचा मध्यवर्ती काव्यविषयाशी एकसंध संबंध राहत नाही.

म्हणजे यमन सुरू केल्यावर सर्व वेरीएशन्स यमन मधलीच हवीत; ताल आणि लय तीच ठेवून तुम्ही इतर रागातली वेरीएशन्स निदान तो राग संपेपर्यंत तरी घेऊ शकत नाही आणि तसं कुणी गायलं तर ते गाणं सौंदर्यपूर्ण असेल पण ऐकणाऱ्याला दुर्बोध होईल तसं ग्रेसच्या कवितेचं झालंय.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

इथपर्यंत ग्रेस आपल्या बरोबर असतो,

हे झरे चंद्र सजणाचे, ही धरती भगवी माया,
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

इथे त्याची प्रतिभा, रूपकं, त्यानं निर्माण केलेल्या प्रतिमा आणि त्याच्या जाणीवेची संवेदनाशीलता आपल्याला थक्क करते, पण

गात्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

इथे ‘तिच्या स्मरणाचं चांदणं’ आणि ‘गात्रात गुणगुणणारं दु:ख’ यांचा मेळ मोठ्या मुश्किलीनं मानावा लागतो पण तिथून पुढे ग्रेस अनाकलनीय होत जातो.

संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवति रिंगण, घालती निळाईत राने

किंवा

त्या वेळा नाजूक भोळ्या, वाऱ्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

आणि

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरूंची राई

इथे येईपर्यंत ग्रेसचा हात आपल्या हातातून पूर्णपणे सुटलेला असतो.

कवी उत्तराला बांधील नाही पण विषयाला आहे आणि ग्रेसला ते मान्य नाही.

दारी उभा गे साजण
नको त्याच्या पुढे जाऊ
त्याने यात्रेत भेटल्या
कुण्या पोरीच्या देहाला
दिले आभाळाचे बाहू

हे आपण समजू शकतो, पण पुढे

हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण
तिने जीव दिला तरी
त्याने वाहत्या पाण्याचे
इथे आणले पैंजण

हा ग्रेसचा अत्यंत व्यक्तीगत अनुभव आहे पण ग्रेस त्याचं स्पष्टीकरण देईल तर तो लेख होईल आणि रसिकाला तो अनुभव काय आहे याची कल्पना नसल्यानं मग ग्रेस दुर्बोध होतो

ती गेली तेव्हा रिमझीम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता

या मांडणीला तुम्ही बेदखल करू शकत नाही, जरी पुढच्या प्रत्येक कडव्याची दुसरी ओळ कळली नाही तरी पहिली ओळ वेड लावतेच

ती आई होती म्हणूनी घनव्याकूळ मीही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

काय असेल कारण या दुर्बोधतेचं? तर ग्रेसची ‘ती’ नक्की कोण याचा शेवटापर्यंत उलगडा होत नाही. कवितेनं प्रश्न सोडवायला हवे (किंवा उत्तर द्यायला हवं) असं नाही पण अभिव्यक्तीचा निर्देश सतत काव्याच्या मूळ विषयाशी हवा हे ग्रेसला मंजूर नाही म्हणून ग्रेसची कविता वाचून रसिकाला एका विषयाचा एकसंध अनुभव येत नाही.

दुसरं कारण असंय की ग्रेसचं मूळ काव्यविषयाशी जेव्हा सतत तादात्म्य असतं (राजपुत्र आणि डार्लिंग) तेव्हा ते अनुभव इतके व्यक्तीगत असतात की रसिकाला लयीचं आणि शब्दांचं सौंदर्य शेवटापर्यंत मोहवत राहतं पण तो त्या अनुभवाशी रिलेट होऊ शकत नाही आणि परिणामी ग्रेस दुर्बोध होतो.

ग्रेसच्या दुर्बोधतेचं कारण कळल्यावर आपण ग्रेसकडून काय घ्यायचं ते पाहू.
_______________________________

ग्रेसची कविता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा कोणत्याही एका मूडची ती सलग मांडणी नाही आणि जर असलीच तर तिच्यात त्याचे अत्यंत व्यक्तीगत अनुभव आहेत त्यामुळे तुम्हाला त्याच्या कवितेचा आनंद घ्यायचा असेल तर कवितेची दुर्बोधता मंजूर करावी लागेल.

एकदा ही दुर्बोधता मंजूर केल्यावर ग्रेसची सौदर्यदृष्टी, त्याच्या शब्दांची आणि रूपकांची मोहवणारी दुनिया, त्यांची नादमयता, त्याचं लयीवरचं अफलातून प्रभुत्व, त्याच्या जाणीवेची तरलता आणि कवितेचा गूढ माहौल तुम्हाला थक्क करेल. त्याची कविता तुमच्या अंर्तमनात लपलेल्या कवितेला जागं करेल आणि तीच ग्रेसची खरी जादू आहे.

एम एफ हुसेन वादग्रस्त आहे पण त्याच्या रेषेत जबरदस्त रिदम आहे, त्याच्या मांडणीत कमालीचा तोल आहे, रंगात जादू आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून एक रम्य गूढता आहे, ग्रेसच्या कवितेचं अगदी तसंच आहे.

एम एफचं व्यक्तीगत जीवन कसंही असो त्याचा काहीही संबंध मध्ये न आणता त्या चित्रातनं, आपण आपल्याला असलेलं रंग, रेषा, आकार, मांडणी, सहजता आणि गूढत्व यांचं आकर्षण जागवू शकतो. अगदी तसंच ग्रेस कितीही दुर्बोध असला तरी त्याच्या कवितेशी बेशर्त एकरूप होऊन आपण शब्द, त्यांची नादमयता, लयकारी, सौदर्यदृष्टी, जाणीवेची तरलता आणि त्यातून निर्माण होणारी रम्य गूढता आपल्या अभिव्यक्तीत आणू शकतो आणि ती ग्रेसला खरी श्रद्धांजली आहे.

संजय

(पूर्वप्रकाशित)

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

दुर्बोधता मंजूर करावी लागते हे पटलं नाही. मुळात (ग्रेसची कविता सोडा ) 'दुर्बोधता' असते हेच मला मान्य नाही. आपल्या हाती काही पडतं ती स्थिती, आपण त्या गोष्टीकडे नेमके कोणत्या परिस्थितीत कसे पहातो, त्यावेळची मनस्थिती आणि एकूण मूड जुळून येतो तेव्हा सुबोध -दुर्बोध असं काही न रहाता आपण कुठेतरी पोचतो काहीकाळ..
ते काही शब्दातच मांडवं लागत नाही, गरज पण नाही .. पण ग्रेसची कविता वाचून काय कळलं ते सांगायला गेलं तर ग्रेसच्या चाहत्यांमधूनच नवे आणि 'दुर्बोध' ग्रेस उभे रहातील. ;-)

मुळात जो दुर्बोधता मानूनच बसलाय तो कशाला ग्रेसच्या वाट्याला जाईल? आणि दुर्बोधता मान्य करुन त्यातलं सौंदर्य समजून घ्यायला कुणी राजी होईल हेही अशक्यच.

शैलेन्द्र's picture

9 Apr 2012 - 12:48 am | शैलेन्द्र

+११११

होईल हेही अशक्यच.

= असं नाहीये, कवितेची लय, तिचं शब्दसौंदर्य आणि संपूर्ण कळला नाही तरी दुर्लक्ष करता येत नाही असा अर्थ संवेदनाशील मनाला मोहवतोच.

हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण
तिने जीव दिला तरी
त्याने वाहत्या पाण्याचे
इथे आणले पैंजण

या ओळी समजल्या नाहीत तरी लयबध्द आहेत, पहिल्या कडव्याशी सुसंगत आहेत आणि काव्य म्हणून अप्रतिम आहेत.

ग्रेसचा तो व्यक्तीगत अनुभव असल्यानं आपण त्याच्याशी रिलेट होऊ शकत नाही पण ज्याला कविता करायचीये तो असा पाच ओळींची लय साधणारा पॅटर्न बघून हरखून जातो आणि दुर्बोध आहे म्हणून सोडून देऊ शकत नाही.

म्हणून मला वाटतं की : `ग्रेस कितीही दुर्बोध असला तरी त्याच्या कवितेशी बेशर्त एकरूप होऊन आपण शब्द, त्यांची नादमयता, लयकारी, सौदर्यदृष्टी, जाणीवेची तरलता आणि त्यातून निर्माण होणारी रम्य गूढता आपल्या अभिव्यक्तीत आणू शकतो आणि ती ग्रेसला खरी श्रद्धांजली आहे.'

जरी पुढच्या प्रत्येक कडव्याची दुसरी ओळ कळली नाही तरी....

मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता

रिमझीम पाऊस निनादत होता म्हणजे वातावरण ढगाळ होते म्हणजे त्या ढगांमधून चुकार किरणे जमिनीपर्यंत पोहोचत होती असा, वातावरणाचे वर्णन करणारा अर्थ असावा. आणि प्रखर सूर्यालाही कृष्ण ढग झाकोळून टाकतो तद्वत त्या दु:खद घटनेने कवीचे आयुष्य, तात्पुरते का होईना, झाकोळून गेले होते असाही असू शकतो.

त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता

अशा प्रसंगी भयानक दु:खाचे वातावरण असते. जमलेले आप्तस्वकियही अत्यंत हळू आवाजात बोलत असतात. कवीला त्याच्या आईच्या मृत्यूच्या दु:खात निसर्गही सहभागी वाटतो आहे. म्हणूनच वारा अत्यंत सावधपणे, हळूवारपणे वाहात आहे हे दर्शविणारी ती ओळ आहे.

खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

परमप्रिय आईच्या मृत्यूने कवीचे भविष्यातील भावनिक आयुष्यही अस्पष्ट, धुरकट झाल्यागत वाटते आहे. धुरकट कंदीलाच्या प्रकाशात(?) आजूबाजूचा परिसर अस्पष्ट, धूसर दिसतो ते इथे रुपक म्हणून वापरल्याचे जाणवत आहे.

ग्रेसची ‘ती’ नक्की कोण याचा शेवटापर्यंत उलगडा होत नाही

ती आई होती म्हणूनी घनव्याकूळ मीही रडलो

ते तर कवीने स्पष्ट केले आहे.

मी लेख लिहीला तेव्हा तो संदर्भ उपलब्ध नव्हता (म्हणजे कवितेतली ओळ `ती आई होती म्हणूनी घनव्याकूळ मीही रडलो' होती) पण स्वतःची आई (परपुरुषाबरोबर) निघून गेल्यावर ग्रेसनं स्वतःच्या मनःस्थितीचं वर्णन केलंय हे मला नंतर कळलं.

आता असे प्रत्येक संदर्भ रसिकाला उपलब्ध होणं अशक्य आहे कारण त्यासाठी ग्रेसच्या व्यक्तीगत जीवनाची माहिती हवी.

इतर कवींच्या बाबतीत असं होत नाही. उदा. संदीप खरेची (विरहाच्या मनःस्थितीचं वर्णन करणारी) `नसतेस घरी तू जेंव्हा' ही कविता अपल्याला शब्दन्शब्द कळते, आपण काव्याशी रिलेट होऊ शकतो .

किंवा, त्याची `अताशा असे हे मला काय होते' ही विमनस्कतेचं वर्णन करणारी कविता (मग ती विमनस्कता कशाही मुळे असो) आपल्याला कवीच्या जीवनाविषयी काहीही माहिती नसली तरी उलगडते, आपल्याला तो आपलाच अनुभव काव्यात्मक झालयं असं वाटतं पण ग्रेसचं तसं होत नाही आणि असं असलं तरी ग्रेसचं कवित्व नाकारता येत नाही असं मला म्हणायचं आहे.

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2012 - 1:02 pm | प्रभाकर पेठकर

स्वतःची आई (परपुरुषाबरोबर) निघून गेल्यावर ग्रेसनं स्वतःच्या मनःस्थितीचं वर्णन केलंय हे मला नंतर कळलं.

ही नविन माहिती आहे. ह्या विधानाचा स्रोत कुठून आहे? काही लिंक आहे का?
माझ्या माहितीनुसार ही कविता आईच्या मृत्यूनंतरच लिहीली आहे. कवितेतील शब्दही तेच सुचवितात.

खटासि खट's picture

11 Apr 2012 - 2:10 pm | खटासि खट

यु ट्यूबवर लिंक उपलब्ध आहे. गूगळले तर सापडेल. ग्रेस यांनी खूप दिवसांपूर्वी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांची कविता त्यांनी फक्त अशाच लोकांना समजावून सांगितली ज्यांना खरोखर त्या निर्मितीमागील रहस्य जाणून घ्यायची इच्छा आहे असं त्यांना वाटलं. प्रयत्न सुद्धा न करता दुर्बोध असा शिक्का मारणा-यांची ग्रेस यांनी पर्वा केली नाही.

लहान मुलाची आई निघून गेल्यावर त्याचं भावविश्व उद्ध्वस्त होतं त्याचे संदर्भ बदलत जातात. वाईट गोष्टीपासून लहान मुलांना लांब ठेवायचा प्रयत्न केला जातो तीच एखाद्याच्या वाटेला आली तर कुणी त्यातून जगावर सूड उगवेल, कुणी लाचार बनेल.. ग्रेस चिंतनशील बनले. आई असं का वागली याचा विचार (प्रगल्भता आल्यावर) केला असता ती एक स्त्री आहे हे त्यांना उमगलं आणि ती जशी मनस्विनी आहे तशीच देहस्विनी आहे हे त्यांना खूप लवकर कळलं. याचे दाखले त्या व्हिडिओतच पहावेत. आणि मग नर आणि मादी यांच्या आदीम स्वरूपापर्यंत जातानाचं त्यांचं चिंतन त्यांच्या कवितेत येतं. त्यात येतात प्रतिमा, काही वैयक्तिक अनुभव आणि दुंखाचे सोहळे. पुढे त्यातून अज्ञाताबद्दलचं चिंतन येत गेलं. हे विषयच अनझेपेबल असल्याने कविता समजत नसेल तर त्याचा दोष कवीकडे जात नाही. अनेक जणांनी अध्यात्मावर लिहीलेलं असंच दुर्बोध वाटू शकतं पण त्याला कुणी दुर्बोध म्हणत नाही, ग्रेस यांच्यासाठी या शब्दाची निर्मिती व्हावी याची शब्दांच्या या जादूगाराला जितकी चीड होती तितकीच ग्रेस यांना समजून घेणा-यांनाही.

अर्थात समजून घेतलं तर या कविता समजतातच.

वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता

या ओळीचं द भि कुलकर्णी यांनी परवा स्पष्टीकरण दिलं. त्यांचं तर्कशास्त्र मानलंच पाहीजे. कवितेचा एक असा अर्थ असू शकत नाही असं जुन्या (दुर्बोध?) कवींनी सांगून ठेवलं आहे. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रामधल्या प्रतिमा या भावनांचं प्रकटीकरण असतं. कलाकार कोणत्या घटनेतून या अनुभवाला सामोरा गेला हे महत्वाचं नसतं. त्याला आलेली अनुभूती त्या प्रतिमेतून तो पलिकडे पोहोचवत असतो. दुसरा एखादा जेव्हां त्या अनुभवातून जातो तेव्हां त्याला त्या प्रतिमांमधून जी काही अनुभूती येईल त्याच्यासाठी तोच त्या चित्राचा अर्थ. ग्रेसचं काव्य हे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्ट आहे. उगीच लोकांना वेड लागलं नाही.

वस्त्रात द्रौपदीच्या हे ग्रेस यांनी छान समजावलं आहे.

मूल हे पुरूष असतं तेव्हां आई मधली स्त्री त्याच्याकडून पालनपोषणाची फीज सुद्धा घेत असते. स्त्री च्या आदिम रूपाच्या शोधात त्यांना द्रौपदी भेटते. कृष्णाच्या रूपातला सखा (मोठा अर्थ आहे) तिला वस्त्र पुरवत असतो. पण हाच कृष्ण जेव्हां बाळकृष्ण असतो तेव्हां याच आदिम स्त्री साठी तो कुठल्याही विकाराने (वस्त्र नसलेला = नागडा ) ग्रस्त नसलेला एक स्वतःच्या अपेक्षेत लपेटलेला ( वस्त्रात द्रौपदीच्या ) अबोध, निरागस पुरूष असतो.

या ओळीचे दाखले ब-याच ठिकाणी पाहीले. द भिं पेक्षा ग्रेस यांची विद्वत्ता दैदीप्यमान आहे. चिंतनशील आहे हे इथं दिसून येतं.

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 3:54 pm | प्रभाकर पेठकर

असही कविता ह्या साहित्यप्रकाराशी माझा संबंध फार दूरुनच आला आहे. दुर्बोधतेचे जे विश्लेषण आपण केले आहे ते ग्राह्य मानता माझी समज फार छोटी आहे हे पहिल्या प्रथम कबूल करतो.
पण, कवी ग्रेस ह्यांच्या मृत्यू नंतर ज्या दिग्गजांच्या मुलाखती झाल्या त्यात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी एक प्रसंग सांगितला. ह्या (कि दुसर्‍या कुठल्यातरी) कवितेला संगितबद्ध करण्याआधी अर्थ समजावून घ्यावा म्हणून त्यांनी कवी ग्रेस ह्यांना काही ओळींचा अर्थ विचारला असता ते म्हणाले,'तुम्हाला जाणवेल तो'.
आता पंडित हृदयनाथ मंगेशकरांनाही तो अर्थ कळला नाही (आणि तो त्यांना कळावा असे कवी ग्रेस ह्यांना वाटले नाही) तिथे माझा काय पाड? त्यामुळे कवी ग्रेस ह्यांची कविता मला कळली नसेल तर त्याचे दु:ख नाही. किंवा जसे स्वतः कवी ग्रेस ह्यांनी म्हंटले आहे त्यानुसार 'तुम्हाला जाणवला तो अर्थ'. तर मी आनंदी आहे, अधिक खोलात मी शिरू इच्छित नाही.

ग्रेस यांनी खूप दिवसांपूर्वी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांची कविता त्यांनी फक्त अशाच लोकांना समजावून सांगितली ज्यांना खरोखर त्या निर्मितीमागील रहस्य जाणून घ्यायची इच्छा आहे असं त्यांना वाटलं.

पंडीत हृदयनाथांनाही त्यांनी कविता उलगडून सांगितली नाही तेंव्हा त्यांनाही निर्मिती मागील रहस्य जाणून घ्यायची इच्छा नाही असे कवी ग्रेस ह्यांना वाटले असेल का? एवढ्या मोठ्या गायक/संगितकाराबद्दल असे वाटले असेल तर ते सयुक्तिक होते का? मी साशंक आहे.

आई असं का वागली याचा विचार (प्रगल्भता आल्यावर) केला असता ती एक स्त्री आहे हे त्यांना उमगलं आणि ती जशी मनस्विनी आहे तशीच देहस्विनी आहे हे त्यांना खूप लवकर कळलं. हे सत्य जर खुप लवकर त्यांना कळलं होतं तर त्याचं दु:ख का मानावे. आणि मग,

'ती आई होती म्हणूनी घन व्याकुळ मीही रडलो'

हे कशा करीता? तिच्या वागण्यामागील सत्य त्यांना जाणवले होते आणि ते नैसर्गिक आहे हे त्यांनी स्विकारले होते, मग दु:ख कसले?

हे विषयच अनझेपेबल असल्याने कविता समजत नसेल तर त्याचा दोष कवीकडे जात नाही.

जी कविता स्वतः साठी (स्वांतसुखाय) लिहीली जाते त्या बाबतीत वरील विधान मान्य होइल. पण जर कविने आपली एखादी कविता प्रकाशित केली, चित्रपटाला दिली तर ती आम जनते साठी खुली केलेली असते. तेंव्हा जर ती कळली नाही तर दोष कवीकडे जात नाही असे म्हणून रसिकाच्याच पदरी निर्बुद्धतेचा दोष टाकणे अन्यायकारक वाटते.

ग्रेस यांच्यासाठी या शब्दाची निर्मिती व्हावी याची शब्दांच्या या जादूगाराला जितकी चीड होती तितकीच ग्रेस यांना समजून घेणा-यांनाही.

'दुर्बोध'तेचा शिक्का कोणी एकाने मारलेला नाही तर अनेक साहित्यिकांनी त्याला दुजोरा दिला आहे. तसेच, प्रयत्न सुद्धा न करता दुर्बोध असा शिक्का मारणा-यांची ग्रेस यांनी पर्वा केली नाही. ह्या विधानाच्या पार्श्वभूमीवर कवी ग्रेस आणि त्यांना समजुन घेणार्‍यांनाही राग यावा हा विरोधाभास पचनी पडत नाही.

मूल हे पुरूष असतं तेव्हां आई मधली स्त्री त्याच्याकडून पालनपोषणाची फीज सुद्धा घेत असते. स्त्री च्या आदिम रूपाच्या शोधात त्यांना द्रौपदी भेटते. कृष्णाच्या रूपातला सखा (मोठा अर्थ आहे) तिला वस्त्र पुरवत असतो. पण हाच कृष्ण जेव्हां बाळकृष्ण असतो तेव्हां याच आदिम स्त्री साठी तो कुठल्याही विकाराने (वस्त्र नसलेला = नागडा ) ग्रस्त नसलेला एक स्वतःच्या अपेक्षेत लपेटलेला ( वस्त्रात द्रौपदीच्या ) अबोध, निरागस पुरूष असतो.

कवी ग्रेस हे महान होते हे मान्यच आहे. पण वरील प्रमाणे अर्थ लावायचे झाले तर गल्लीतल्या एखाद्या कुडमुड्या कवीच्या कवितेतूनही असे महान अर्थ शोधता येतील.

खटासि खट's picture

12 Apr 2012 - 10:26 am | खटासि खट

असही कविता ह्या साहित्यप्रकाराशी माझा संबंध फार दूरुनच आला आहे. दुर्बोधतेचे जे विश्लेषण आपण केले आहे ते ग्राह्य मानता माझी समज फार छोटी आहे हे पहिल्या प्रथम कबूल करतो.

सुरूवातीलाच तुम्ही विनयशीलता दाखवलीत पण मग संबंध आला नाही तर असहमती दर्शवायचं प्रयोजन काय ? पिकासोची चित्रं आपल्याला पाहताक्षणीच कळतात का ? व्हॅन गॉगच्या चित्रांचा अर्थ सांगता येऊ शकेल काय ( कुणाचं विश्लेषण वाचले नसल्यास ).

हृदयनाथ मंगेशकरांची मुलाखत मी पाहिली त्यात त्यांनी असं म्हटलं होतं कि ज्या वेळी मी ही कविता गाण्यासाठी निवडली तेव्हां काही जणांनी कशाला ती कविता घेता असं विचारलं होतं. गाणं आणि कविता यात फरक असतो. गाणं हे लोकांसाठी लिहीलं जातं तर कविता हे आत्मचिंतन असतं हे हृदयनाथ सांगतात. सारेगम मधे त्यांनी ग्रेसजींच्या कवितांचा अर्थ उलगडून सांगितला. त्यांना जो भावला तोच. आरती प्रभुंच्या कवितेचा अर्थ उलगडून सांगतानाही हृदयनाथ हेच म्हणाले होते कि त्यांच्या कवितेचा अर्थ ज्याला भावेल तो.

तुम्ही जर जुन्या कवींचा अभ्यास कराल तर त्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे. ग्रेस यांनी नव्याने काहीही सांगितलेलं नाही. केवळ ग्रेस यांनी सांगितलं तर ते चुकीचं अशी धारणा असेल तर पुढे बोलण्यासारखं काही उरत नाही.

कवी ग्रेस हे महान होते हे मान्यच आहे. पण वरील प्रमाणे अर्थ लावायचे झाले तर गल्लीतल्या एखाद्या कुडमुड्या कवीच्या कवितेतूनही असे महान अर्थ शोधता येतील.

कुडमुडे कवी कोण ? कुसुमाग्रजांकडे तुमचा रोख आहे का ? आपण ही पोस्ट लिहीण्याआधी ग्रेस यांची यु ट्युब वरील मुलाखत पाहिली असावी अशी आशा करतो. आणि पाहीली नसेल तर ही भाषा मागे घ्या ही विनंती करतो. लिंक शोधून घ्यावी ही विनंती. मला नेट अ‍ॅक्सेस लिमिटेड आहे.

कवी बी यांची चाफा बोलेना ही कविता आहे, किंवा बा भ बोरकर यांची रस्त्यात कोणसा आंधळा गातो या कवितांचा अर्थ आपण सांगू शकाल काय ? इथं एक लिंक दिलेली आहे त्यामधे विचारल्याप्रमाणे मुंगी उडाली आकाशी या मुक्ताईच्या कवितेचा अर्थ सांगता येऊ शकतो का ? अशा अनेक कविता आहेत ज्या गुढ आहेत. ज्याला अध्यात्माचं ज्ञान आहे कदाचित त्याला ते सोपं वाटेल. मग ज्यांना अध्यात्म कळत नाही त्यांनी या कविता दुर्बोध ठरवायच्या का ?

कुठल्याही कवीला जाणून घेतल्याशिवाय त्याची कविता कळाली असं म्हणताच येत नाही. ही चर्चा व्यवस्थित चालू राहीली तर अनेक जुन्या कवींचे दाखले देता येतील. त्यासाठी थोडा वेळ लागेल. ग्रेस यांना दुर्बोध ठरवण्याने त्यांची कविता जशी लहान झाली नाही तशीच आयुष्याच्या शेवटी पुरस्कार मिळाल्याने महान झाली नाही. ती स्वतःच महान झाली होती. पहिल्या काव्यसंग्रहापासूनच त्यातलं वेगळेपण चर्चेचा विषय ठरले.

व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून ते लोकांच्यात मिसळले नाहीत. त्यामागचं कारणही आता उघड झालं आहे. उतारवयात ते फक्त ग्रेसला जाणणा-या मित्रांच्यात रमले. माणिक गोडघाटेंना ओळखणा-या आप्तस्वकियांकडे का गेले नाहीत हे ही कोडंच. ते ग्रेस म्हणूनच जगले आनि ग्रेस म्हणूनच उरले हे नक्की.

आणि तुम्ही चर्चा भरकटू दिली नाहीत याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार!

प्रभाकर पेठकर's picture

12 Apr 2012 - 1:35 pm | प्रभाकर पेठकर

सुरूवातीलाच तुम्ही विनयशीलता दाखवलीत पण मग संबंध आला नाही तर असहमती दर्शवायचं प्रयोजन काय ?

संबंध आला नाही असे नाही तर, दूरुनच आला असे मी म्हंटले आहे.

पिकासोची चित्रं आपल्याला पाहताक्षणीच कळतात का ? व्हॅन गॉगच्या चित्रांचा अर्थ सांगता येऊ शकेल काय.

पण ती चित्र 'मला कळली नाहीत' म्हणजे माझ्यासाठी 'दुर्बोध'च आहेत न? 'दुर्बोध'चा अर्थ मी खालील प्रतिसादात दिला आहे.

गाणं आणि कविता यात फरक असतो.

मला वाटतं 'निवडुंग' चित्रपटातले हे गाणे आहे. गाण्याचे आणि कवितेचे शब्द तेच आहेत. कवितेचे गाण्यात रुपांतर करताना, ती सर्वांना 'सुबोध' वाटावी, समजावी म्हणून काही बदल केले आहेत असे वाटत नाही.

त्यांना जो भावला तोच........... अर्थ ज्याला भावेल तो.

त्यावर वाद नाहीच आहे. मला भावलेला, समजलेला अर्थ मी मुळ प्रतिसादात सांगितलाच आहे.

कुसुमाग्रजांकडे तुमचा रोख आहे का ?

कुसुमाग्रजांकडे???? बापरे! मला वेड लागलेले नाही. 'कुडमुड्या' म्हणजे उद्या मी एखादी कविता केली तर ती कुडमुड्या कवीची कविता होईल.

ही भाषा मागे घ्या ही विनंती करतो.

भाषा मागे घ्या? का बरं? असं काय वाईट, आक्षेपार्ह मी लिहीलं आहे? आणि तसे काही असेल तर संपादक मंडळ आहे कारवाई करायला. तुम्ही फार फार तर संपादक मंडळाला तशी विनंती करू शकता.

कवी बी यांची चाफा बोलेना ही कविता आहे, किंवा बा भ बोरकर यांची रस्त्यात कोणसा आंधळा गातो या कवितांचा अर्थ आपण सांगू शकाल काय ? इथं एक लिंक दिलेली आहे त्यामधे विचारल्याप्रमाणे मुंगी उडाली आकाशी या मुक्ताईच्या कवितेचा अर्थ सांगता येऊ शकतो का ? अशा अनेक कविता आहेत ज्या गुढ आहेत. ज्याला अध्यात्माचं ज्ञान आहे कदाचित त्याला ते सोपं वाटेल. मग ज्यांना अध्यात्म कळत नाही त्यांनी या कविता दुर्बोध ठरवायच्या का ?

ह्या जगात मला 'न समजणार्‍या' (पक्षी: दुर्बोध) लाखो, करोडो गोष्टी आहेत. त्या माझ्यासाठी 'दुर्बोध'च आहेत. राग नसावा.

हृदयनाथांना त्यांनी अर्थ सांगायला हवा होता यात वाद नाही पण याचा अर्थ गल्लीतल्या एखाद्या कुडमुड्या कवीच्या कवितेतूनही असे महान अर्थ शोधता येतील या निर्णयाप्रत येणं चुकीचं होईल.

सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रेस संपूर्ण दुर्बोध नाहीत!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

या रचनेत अत्यंत मोजक्या शब्दांनी तयार केलेलं वातावरण आणि मांडणीतली अफलातून सहजता केवळ ग्रेसच करू शकतो.

जरी तीनच कडवी समजली आणि चार समजली नाहीत, तरी जी समजली नाहीत ती तितक्याच प्रतिभेची आहेत.

इतकी सौंदर्यपूर्ण मांडणी आणि अनोळखी तरीही अर्थवाही आणि नादमय शब्दांची सहज लयबद्ध रचना करू शकेल असा कवी दुर्लभ आहे.

ग्रेस दुर्बोध वाटतो कारण न समजलेल्या कडव्यात त्यांचा व्यक्तीगत अनुभव आहे जो रसिकांना ज्ञात नाही इतकंच.

मला तर ग्रेसचं दुर्दैव वाटतं की त्यांनी रसिकांना त्या ओळीमागचा व्यक्तीगत अनुभव विशद केला नाही, जर ग्रेसनं तो केला असता तर ग्रेसची कविता मराठीच काय जगातल्या सर्व भाषातील कवितांमधे एक लॅंडमार्क आणि सर्व कवींसाठी मार्गदर्शक प्रणाली ठरली असती.

तुम्ही म्हणतायं `त्यामुळे कवी ग्रेस ह्यांची कविता मला कळली नसेल तर त्याचे दु:ख नाही' आणि माझं म्हणणंय इतक्या सृजनशील कवीवर केवळ त्याच्या स्वभावामुळे दुर्बोधतेचा शिक्का बसून इतकी अप्रतीम प्रतिभा वादात सापडली तर मृत्यूपश्चात का होईना प्रकाशात आलेल्या ग्रेसच्या कवितेशी ओळख होण्याची रसिकांची अत्यंत दुर्मिळ संधी हुकेल.

संजयजी

ग्रेस यांच्या कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा असावा याबद्दल काही अपेक्षा आहेत.

१. जर समजली असेल तर पूर्ण आनंद घ्यावा
२. थोडी फार कळत असेल पण दिशा सापडली असेल तर त्या दिशेने प्रयत्न करावा.
३. समजत नसेल तर कुणाला तरी अर्थ विचारावा. गूगल वर उपलब्ध असलेल्या मुलाखती, थोर संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि अन्य अनेक मान्यवर यांचं विश्लेषण वाचावं
४. इतका वेळ नसेल तर गेयता आणि माधुर्य यांचा आनंद घ्यावा.
५. कुठल्याही परिस्थितीत मला समजली नाहि म्हणजेच दुर्बोध असा पवित्रा कुणी घेऊ नये. तसं वाटत असेल तर ते मत खाजगी ठेवावं. त्यातून आपली विचार करण्याची पातळी समजून येते.

प्रभाकर पेठकर's picture

12 Apr 2012 - 11:44 am | प्रभाकर पेठकर

श्री. संजयक्षीरसागर,

आपला संयमीत प्रतिसाद आवडला. थोडाफार पटलाही.

'दुर्बोध' शब्दाचा अर्थ काय? ज्यातून काही 'बोध' होत नाही अशी रचना. जर मला (किंवा इतरांना) ग्रेस ह्यांच्या कवितेतून काही बोध झाला नसेल (किंवा १०० टक्के झाला नसेल, कमी झाला असेल) तर मी त्या कवितेला 'दुर्बोध'च मानणार नं? त्यात काही दूषण नाही. 'मला अर्थ कळला नाही' ह्यावाक्याच्या ऐवजी 'दुर्बोध' हा एक शब्द वापरला जातो. त्यात हिणकस काही नाही. त्यामुळे कवीला किंवा 'ग्रेस ह्यांची कविता ज्यांना समजते' त्यांना 'चीड' येण्यासारखं त्यात काही नाही असं मला वाटतं.

याचा अर्थ गल्लीतल्या एखाद्या कुडमुड्या कवीच्या कवितेतूनही असे महान अर्थ शोधता येतील या निर्णयाप्रत येणं चुकीचं होईल.

ह्यात कुठेही कवी ग्रेस ह्यांना मी गल्लीतल्या कुडमुड्या कवीच्या पातळीला आणून ठेवलेले नाही. मला म्हणायचे आहे की शब्दांना अनेक अर्थ असू शकतात त्यामुळे मुळ अर्थापेक्षा वेगळे अर्थ चिकटविता येतात. असो. माझेच वाक्य दुर्बोध झाल्यासारखे वाटते आहे.

ग्रेस दुर्बोध वाटतो कारण न समजलेल्या कडव्यात त्यांचा व्यक्तीगत अनुभव आहे जो रसिकांना ज्ञात नाही इतकंच.

वरील विधानाशी सहमत आहे. पण ज्यांना ग्रेस दुर्बोध वाटतो त्यांनी ग्रेस ह्यांची कविता अभ्यासलीच नाही, प्रयत्न केल्याशिवायच दुर्बोधतेचे आरोप केले, तो दोष कवीचा नाही (पर्यायाने कविता वाचणार्‍याचा आहे) ह्या खटासि खट ह्याच्या विधानाशी सहमत नाही.

'त्यामुळे कवी ग्रेस ह्यांची कविता मला कळली नसेल तर त्याचे दु:ख नाही'

ह्यातून मला असे म्हणायचे आहे की पंडित हृदयनाथांना जर कविता (किंवा त्याचा काही भाग) कळली नसेल तर, मी त्या कवितेचा रसस्वाद घेऊ शकलो नाही ह्याचे, माझ्या मनात शल्य नाही. पंडितजींच्या पेक्षा काव्यातील माझे ज्ञान नक्कीच कितीतरी पटीत तोकडे आहे.

श्री. खटासि खट

ग्रेस यांच्या कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा असावा याबद्दल काही अपेक्षा आहेत.

कोणाच्या आहेत ह्या अपेक्षा? सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याइतपत मी सर्वज्ञानी नाही. तसेही, कवी ग्रेस ह्यांच्याच का, न कळलेल्या (पक्षी: दुर्बोध) प्रत्येक रचनेकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाबद्दल असेच म्हणावे लागेल.

१. जर समजली असेल तर पूर्ण आनंद घ्यावा

माझ्या कुवतीनुसार मी त्याला अर्थ लावून आनंद घेतलाच आहे. श्री. संजयक्षीरसागर ह्यांना दिलेल्या पहिल्या प्रतिसादात मी ते म्हंटले आहे.

२. थोडी फार कळत असेल पण दिशा सापडली असेल तर त्या दिशेने प्रयत्न करावा.

तोच चालू आहे असे नाही का तुम्हाला वाटंत?

३. समजत नसेल तर कुणाला तरी अर्थ विचारावा. गूगल वर उपलब्ध असलेल्या मुलाखती, थोर संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि अन्य अनेक मान्यवर यांचं विश्लेषण वाचावं

अनेक मान्यवरांचेच, कवी ग्रेस ह्यांची कविता दुर्बोध असल्याचे, मत दूरचित्रवाणीवर मी पाहिले/ऐकले आहे. सबब, मुद्दा गैरलागू.

४. इतका वेळ नसेल तर गेयता आणि माधुर्य यांचा आनंद घ्यावा.

हे काय सांगणे झाले? तसा आनंद मी प्रत्येक कवितेत (अगदी मिपावरीलही) शोधत असतो आणि अनुभवत असतो. सबब, मुद्दा गैरलागू.

५. कुठल्याही परिस्थितीत मला समजली नाहि म्हणजेच दुर्बोध असा पवित्रा कुणी घेऊ नये.

एक रुपया कि सोळा आणे?, असं वरील विधान आहे. 'मला समजली नाही' म्हणजेच (माझ्या दृष्टीने) 'दुर्बोध'.

तसं वाटत असेल तर ते मत खाजगी ठेवावं.

मिपाच्या मुख्य फलकावर एखाद्या मुद्यावर चर्चा चालू असताना मी माझे मत 'खाजगी' का ठेवावे? चर्चेत दोन्ही बाजूंची मते समोर येतात. आलीच पाहिजेत. आणि 'मी माझे मत खाजगी ठेवावे' असे मत मुख्य धागाकर्त्यांनीही, श्री. संजयक्षीरसागर ह्यांनी, व्यक्त केलेले नाही. आपण का राग मानून घेता आहात?

त्यातून आपली विचार करण्याची पातळी समजून येते.

'विचार करण्याची पातळी' म्हणजेच एखाद्याची 'अक्कल' काढण्यासारखे आहे. हा अनावश्यक वैयक्तिक हल्ला आहे. संपादक मंडळ इकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे.

श्री. खटासि खट

ग्रेस यांच्या कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा असावा याबद्दल काही अपेक्षा आहेत.
कोणाच्या आहेत ह्या अपेक्षा? सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याइतपत मी सर्वज्ञानी नाही. तसेही, कवी ग्रेस ह्यांच्याच का, न कळलेल्या (पक्षी: दुर्बोध) प्रत्येक रचनेकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाबद्दल असेच म्हणावे लागेल.

माझ्या अपेक्षा आहेत या. मत म्हणू शकता हवं तर.. काही समस्या आहे का ?

१. जर समजली असेल तर पूर्ण आनंद घ्यावा

३. समजत नसेल तर कुणाला तरी अर्थ विचारावा. गूगल वर उपलब्ध असलेल्या मुलाखती, थोर संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि अन्य अनेक मान्यवर यांचं विश्लेषण वाचावं

अनेक मान्यवरांचेच, कवी ग्रेस ह्यांची कविता दुर्बोध असल्याचे, मत दूरचित्रवाणीवर मी पाहिले/ऐकले आहे. सबब, मुद्दा गैरलागू.

अनेक मान्यवरांनी वेळोवेळी त्यांची कविता उलगडून दाखवलेली आहे. मला तरी त्यांचीच संख्या जास्त वाटते. दुर्बोध वाटणे समजू शकते,

दूरचित्रवाणीवरही आणि अनेक कार्यक्रमांतूनही. अनेकदा ग्रेस पुण्यातही येऊन गेले. नागपुरातल्या त्यांच्या घरी जे जे कुणी गेलेत त्या सर्वांना त्यांनी त्यांची कविता समजावून घ्यावी हे सांगितलं आहे. ऑर्कुट वर ग्रेस यांच्याबद्दलची कम्युनिटी गेली अनेक वर्षं चालू आहे. तिथे लोकांचे अनुभव वाचावेत. २००० च्या वर सदस्य आहेत. इतक्या लोकांना त्यांच्या कवितेत रूची आहे ती दुर्बोध म्हणून का ?

४. इतका वेळ नसेल तर गेयता आणि माधुर्य यांचा आनंद घ्यावा.

हे काय सांगणे झाले? तसा आनंद मी प्रत्येक कवितेत (अगदी मिपावरीलही) शोधत असतो आणि अनुभवत असतो. सबब, मुद्दा गैरलागू.

५. कुठल्याही परिस्थितीत मला समजली नाहि म्हणजेच दुर्बोध असा पवित्रा कुणी घेऊ नये.

एक रुपया कि सोळा आणे?, असं वरील विधान आहे. 'मला समजली नाही' म्हणजेच (माझ्या दृष्टीने) 'दुर्बोध'.

तुमच्या दृष्टीने ठीक. पण फोरम वर आल्यावर प्रतिवादाचा हक्क आहेच हे विसरताय हेच वर सांगितलंय. पण दुर्दैवाने जेव्हां खाजगी मत ओपन फोरम मधेलिहीले जाते तेव्हां तुम्हाला दुर्बोध का वाटते कविता हे विचारणं आलंच हे मान्य केलं जात नाही. ती कविता दुर्बोध कशी नाही हे कुणी समजावून सांगायचा प्रयत्न केला कि कुणी कमळाच्या फुलात भुंगा गेला किंवा कुणी चिऊ काऊ ची गोष्ट सांगून आपले इरादे स्पष्ट करतो. थोडक्यात ग्रेस दुर्बोध आहेत हे मत त्यांना प्रचलित करायचेच असते... या प्रयत्नाच्या आड कुणी आले तर मग उपहासाचा सहारा घेतला जातो. माणूस उपहासाकडे कधी वळतो हे सांगायची गरज नाही. जेव्हां असे प्रयत्न होतात तेव्हां समजावून सांगणारा मनुष्य ते प्रयत्न सोडून देतो .. हेच तर हवं असतं असं मला वाटतं.

तसं वाटत असेल तर ते मत खाजगी ठेवावं.

मिपाच्या मुख्य फलकावर एखाद्या मुद्यावर चर्चा चालू असताना मी माझे मत 'खाजगी' का ठेवावे? चर्चेत दोन्ही बाजूंची मते समोर येतात. आलीच पाहिजेत. आणि 'मी माझे मत खाजगी ठेवावे' असे मत मुख्य धागाकर्त्यांनीही, श्री. संजयक्षीरसागर ह्यांनी, व्यक्त केलेले नाही. आपण का राग मानून घेता आहात?

मी वरही स्पष्ट केलंच आहे. रागाचा प्रश्न कुठे आला यात ? तुमच्या लक्षात खरंच येत नाहीय्ये का ? असेलही तसं.

त्यातून आपली विचार करण्याची पातळी समजून येते.

'विचार करण्याची पातळी' म्हणजेच एखाद्याची 'अक्कल' काढण्यासारखे आहे. हा अनावश्यक वैयक्तिक हल्ला आहे. संपादक मंडळ इकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे.

शब्दांना अर्थ असतात. यात कुणाचं नाव कुठं घेतलं गेलंय ? तसं तर मग ग्रेसयांच्या कवितेला दुर्बोध ठरवने हा ही वैयक्तिक हल्ला होईल.

प्रभाकर पेठकर's picture

12 Apr 2012 - 6:24 pm | प्रभाकर पेठकर

आपले विचार माझ्या समजण्या पलिकडे आहेत. साध्या सोप्या आणि आपल्या प्रत्येक मुद्याला वेगळ्या रंगांच्या अक्षरात दाखवून केलेला केलेला प्रतिवादही आपणास समजत नाहिए. कवी ग्रेस ह्यांना दुर्बोध हा शिक्का मी मारलेला नाही तर, अनेक दिग्गजांनी मारलेला आहे ह्या कडे सोयिस्कर दुर्लक्ष करून आपण केलेला प्रतिवाद आपले आणि माझे मुद्दे ह्यांची सरमिसळ होऊन दुर्बोध होत चालला आहे. आपली मते आपल्या जवळ माझी मते माझ्या जवळ.

माझ्या दृष्टीने आपल्याशी वाद घालण्यात स्वारस्य उरलेले नसल्याने हा माझा शेवटचा प्रतिसाद.

खटासि खट's picture

13 Apr 2012 - 10:22 am | खटासि खट

मला ही नेमकं तसंच वाटत होतं. दुर्बोध ठरवणं हा तुमचा हक्क आहे असा तुमचा ग्रह झालेला असल्याने या विषयावर मी ही वाद घालू इच्छीत नाही. मी तुम्हाला कवी ग्रेस स्वतः आपल्या कविता उल्गडून सांगतात तो व्हिडीओ पहा आणि मग आपले मत लिहा ही विनंती देखील तुम्हाला मान्य नाही. त्यांनी स्वतः सांगितलेलं न पाहता, न समजून घेता कुणीतरी एक दुर्बोध म्हणाले हे पालुपद मी का मान्य करावं ? मी स्वतः अनेक मान्यवरांना त्यांच्या कविता उलगडून सांगताना पाहीलेलं आहे म्हणूनच वेगळ्या रंगात लिहीणं आणि योग्य ते लिहीणं यात मी फरक करतो.

मला मोहम्मद रफी, किशोरकुमार यांची गाणी कळतात. पं भीमसेन जोशी यांच गायन मला अजिबात कळत नाही. पण मी ते दुर्बोध गायन असं म्हणणार नाही. मी त्याचा अभ्यास केलेला नाही म्हणून मला ते समजत नाही असंच मी म्हणेन. पिकासो किंवा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रांनाही हाच न्याय लावेन आणि संस्क्रूतमधील सुभाषितं, श्लोक यांच्याबाबतीतही असेच म्हणेन.

प्रभाकर पेठकर's picture

13 Apr 2012 - 8:23 pm | प्रभाकर पेठकर

:) :-) :smile:

संजयजी तुम्ही म्हणताय ते सत्य आहे हे जरी काही क्षणासाठी मानले तरीही ,
त्यांच्या कवितेतील खालील ओळी आईबध्द्ल काहीतरी वेगळेच सांगतात

घर थकलेले संन्यासी ,
हळुहळू भिंतही खचते ..
आईच्या डोळ्यांमध्ये,
नक्षत्र मला आठवते ..
ती नव्हती संध्या-मधुरा,
रखरखते ऊनच होते ..
ढग ओढून संध्येवाणी ,
आभाळ घसरले होते.
पक्ष्यांची घरटी होती ...
ते झाड तोडले कोणी?
एकेक ओंजळीमागे ,
असतेच झर्‍याचे पाणी ...

यावर काही प्रकाश टाकू शकाल का ?

अवांतर : तुम्ही त्यांच्या आईबध्द्ल सांगीतलेले वाक्य खरंच अनझेपेबल आहे :-(

घर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते

ही कविता मी वर लिहिलेल्या फॉर्ममधे आहे (तुम्ही लिहिलेल्या फॉर्ममधे एका ओळीच्या दोन झाल्या आहेत त्यामुळे अर्थबोध होणार नाही)

सकृद्दर्शनी ग्रेसनी ही कविता मृत्यूची चाहूल लागलेल्या स्वतःच्या देहाबद्दल लिहिली आहे. मी ग्रेसच्या व्यक्तीगत जीवनाविषयी माहिती जमा करतोयं. त्यांची आई, तिचं निधन, वडीलांनी केलेलं दुसरं लग्न, त्यांचं बालपण असे अनेक संदर्भ शोधावे लागतील कारण कविताचा शेवट :

मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई

असा आहे. संदर्भ जमा होऊन कविता पूर्ण समजली की प्रतिसाद देईन.

`ती गेली तेव्हा रिमझीम पाऊस निनादत होता' या कवितेची पूर्वभूमिका इथे आलेल्या सदस्यांच्या प्रतिसादांमुळे कन्फर्म झालीये आणि त्यातून कवितेचा अर्थही उलगडतो. वस्तुस्थिती एकदा मंजूर केली की अनझेपेबल असं काही रहात नाही.

जयंत कुलकर्णी's picture

11 Apr 2012 - 5:23 pm | जयंत कुलकर्णी

+ १११११ वरील सर्व प्रतिसादांना

वाहीदा's picture

10 Apr 2012 - 6:49 pm | वाहीदा

पण स्वतःची आई (परपुरुषाबरोबर) निघून गेल्यावर ग्रेसनं स्वतःच्या मनःस्थितीचं वर्णन केलंय हे मला नंतर कळलं.

हे असे विधान तुम्ही कोणत्या आधारावर करित आहात ? कोणाच्याही दु:खाचा असा घाणेरडा बाजार मांडणे अयोग्य वाटले .
क्षीरसागर महोदय ,
कोणाचीही का असेना, तुम्ही 'आई' बध्द्ल हे वाक्य लिहीत आहात तेव्हा शब्द अन वाक्य जपून वापरावेत हि नम्र विनंती अन वैयक्तीक आयुष्यावर शिंतोडे न उडविलेलेच उत्तम कारण ते किती खरे अन खोटे याची शहानिशा करण्यासाठी आता ती व्यक्ती हयात ही नाही.
~ वाहीदा

वहिदा यांच्याशी सहमत असूनही असे म्हणावेसे वाटते की,
क्षीरसागर यांना ग्रेस, त्यांची आई कुणासोबत निघून जाणे वगैरे बाबीत पडायचे नसावे.
ग्रेसच्या कविता दुर्बोध आहेत आणि श्री क्षीरसागर हे 'जगातलं आध्यात्म सोपं केलेला माणूस' मानतात (हे मी म्हणत नाहीये, ही त्यांचीच स्वाक्षरी होती कुठेतरी )
मग जगातलं आध्यात्म सोपं करणार्‍याला ग्रेसच्या कविता म्हणजे किस झाड की पत्ती? म्हणून ते इथे वाचकांना ग्रेसच्या दुर्बोध कविता सुबोध करुन सांगत असावेत..

काय हो क्षीरसागर साहेब बरोबर ना?

परिकथेतील राजकुमार's picture

10 Apr 2012 - 7:05 pm | परिकथेतील राजकुमार

ते विधान क्षीरसागर साहेबांचे नसून, सदर माहिती त्यांना कुठे मिळाली त्याचा दूवा त्यांनी खालती दिलेला आहे.

संजय क्षीरसागर's picture

10 Apr 2012 - 1:14 pm | संजय क्षीरसागर

http://www.aisiakshare.com/node/708

इथे तुफानी दंगा झालायं आणि ग्रेसची नजाकत बाजूलाच राहिलीये म्हणून उल्लेख करत नव्हतो

खरं आहे संजयजी....

मला माहीत असलेली या कवितेमगची स्टोरी पण हीच होती पण मी पण हे लिहिण्याचं टाळलं होत ,
ग्रेस यांच्या वडीलांनी जेव्हा अजून एक लग्न केलं तेव्हा नत्यानं ती ग्रेस यांची आई असली तरी वयानं त्यांच्याएवढीच होती आणि रोज ती तिच्या मित्राला भेटायला जायची ...तेव्हाचं हे लिखाण आहे....

पण मी संजयजींशी सहमत आहे की ही माहीती सगळ्यांना कशीकाय असू शकते?
आणि म्हणूनच ही किंवा अशा अनेक कविता अपल्यासाठी गूढ आहेत् , पण तितक्याच प्रगल्भ,परिपूर्ण आणि नजाकतीन भरलेल्या आहेत.
ग्रेस यांच्या नुसत्या कविताच नाहीत तर त्यांच इतर लिखाणही तितकच गूढ आहे,आणि बेचैन करणारं आहे.(अर्थ लागेपर्यंत जीवाला चैन नसतो खरच)
ग्रेस समजयला हा जन्म अपुराच पडेल.

संजय क्षीरसागर's picture

10 Apr 2012 - 5:28 pm | संजय क्षीरसागर

ही कविता वाचली तेव्हा पहिल्या दोन ओळीत ग्रेस आपल्या प्रेयसीविषयी लिहीतोयं असं वाटलं

ती गेली तेव्हा रिमझीम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता

आई गेल्यावर अशा ओळी कोण लिहील?

मग प्रेयसी आई इतकीच जवळची असल्यानं:

ती आई होती म्हणूनी घनव्याकूळ मीही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता

या ओळी देखील समजल्या सारख्या वाटल्या.

संदीपनी लिहीलंय:

ना अजून मोठा झालो ना स्वतंत्र झालो अजूनी
तुज वाचून उमगत जाते, तुज वाचून जन्मच अडतो

ग्रेसनं पुढे कवीमनाची व्यथा देखील सुरेख मांडलीये:

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

पण तुम्ही सांगीतलेल्या हकीकतीमुळे (...तेव्हा नात्यानं ती ग्रेस यांची आई असली तरी वयानं त्यांच्याएवढीच होती आणि रोज ती तिच्या मित्राला भेटायला जायची) संपूर्ण कविता एकदम उलगडली, मन:पूर्वक धन्यवाद!

तुम्ही ग्रेसच्या व्यक्तीगत जीवनाविषयी (जमल्यास कालक्रमानं) इथे काही लिहू शकाल का? किंवा मग व्य. नि. तून कळवा. मी `राजपुत्र आणि डार्लिंग' पुन्हा वाचून मग इथे लिहीन.

प्रीती's picture

11 Apr 2012 - 11:08 am | प्रीती

संजयजी , धन्यवाद...

पण मला ग्रेसच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल फारसं महीत नाही , मी वर सांगितल्या प्रमाणे ग्रेसचं लिखण बेचैन करतं आणि मग स्वत:ला चैन मिळवण्याच्या खटाटोपात कुठुन कुठुन ही अशी माहिती मिळत जाते.

या कवितेबद्दल म्हणाल तर माझा एक मित्र ह्रदयनाथ मंगेशकरांकडे गाणं शिकत होता,त्यामुळे हा अर्थ समजला.

पण मला त्यांच्या लिखाणावर चर्चा करायला नक्की आवडेल. कारण अशा चर्चेतुनच ग्रेस समजत जातो.

मला कळलं तर मी तुम्हाला सांगीन, तुम्हाला समजलं तर तुम्ही कळवा. पुनश्च धन्यवाद!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Apr 2012 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

फारच 'स्ट्रेस' आला बॉ वाचून.

संजय क्षीरसागर's picture

10 Apr 2012 - 6:19 pm | संजय क्षीरसागर

ग्रेसची नशा फार नजाकतदार आहे, समजेपर्यंत स्ट्रेस आहे,

शब्द म्हणजे तरी काय? नुसता वार्‍यावरचा फेस आहे ..पण

एकदा माहौल तयार झाला की मग ग्रेस म्हणजे ग्रेस आहे!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Apr 2012 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

मी कविता वेडा नाही, खरेतर मी ग्रेस वाचले वैग्रे आहेत असे देखील नाही. मात्र सध्या आंतरजालावरील आणि एकूण प्रिंट मिडिया मधली चर्चा बघता आम्हाला ग्रेसप्रेमींच्या ३ तर्‍हा जाणवल्या.

१) ग्रेस कसे दुर्बोध आहेत आणि त्यांच्या कविता सामान्य वाचकांच्या आकलनशक्ती बाहेर कशा आहेत, आणि त्या फक्त आम्हालाच कशा कळतात हे दाखवणारे.

२) ग्रेस दुर्बोध आहेत पण थोडा प्रयत्न केल्यास कविता समजणे शक्य आहे असे मानणारे.

३) ग्रेस ह्यांच्या कवितांचा मनाला भावेल तो सरळसोट अर्थ लावून आनंद मानणारे आणि कुठल्याही वादात न पडणारे.

शैलेन्द्र's picture

10 Apr 2012 - 9:19 pm | शैलेन्द्र

तिसरा पंथ सुखी.. पण दुसर्‍या पंथातले त्याला सुखाने जगु नाही देत..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2012 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पराशी सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

आता ग्रेसबद्दल. मला वाटतं कवीला जसं लिहायचं स्वातंत्र्य आहे तसं वाचकाला अर्थ लावायचं स्वातंत्र्य आहे. कोणतीही कलाकृती एकदा कलाकाराने लोकांसमोर ठेवली की ती लोकांची होते. मग जर हे कलाकाराला मान्य नसेल तर तो आपली कला लोकांसमोर ठेवणार नाही. इतर कोणत्याही वादात मला पडायचं नाही कारण इथे सगळेच थोडे थोडे तरी बरोबर आहेत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2012 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रेस यांची कविता उकलून दाखवण्याचा प्रयत्न आवडला. कवीच्या व्यक्तिगत आयुष्यातील घटना वाचकांना माहित असतील तर कवितेच्या जवळ थोडेसे पोहचता येते. जमलेच तर शब्दांमधून, रुपक, प्रतिमा, अलंकार, रचनाबंध यातून एक आशय शोधण्याचा प्रयत्न करावा, इतकेच मला समजते. नाहीच जमले तर अन्य वाचक कुठपर्यंत पोहचतात. आपल्याला तसेच जाणवते की अजून काही वेगळे असा एक साधक-बाधक शोध घ्यावा आणि शेवटी कविता त्या कवीवर सोडून मोकळे व्हावे, असे मला वाटते.

संजय, आपले मिपावर स्वागत आहे.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

10 Apr 2012 - 11:44 pm | संजय क्षीरसागर

एक, मी कुणी क्षीरसागर साहेब वगैरे नाही, मला फक्त संजय म्हटलं तरी चालेल.

आणि दोन, माझ्या आध्यात्मिक आणि ललित लेखनाची सरमिसळ करू नये ही विनंती.

आध्यात्मिक लिहीन तेव्हा तुम्हा सर्वांना उपयोगी होईल असंच लिहीन, आणि तेव्हा हेतू समजून घेऊन चर्चा व्हावी इतकीच अपेक्षा असेल

पण ललित लेखन वेगळंय, तो मूड वेगळा आहे, तिथे कल्पना आणि वास्तवाची जुगलबंदी आहे, तिथे अध्यात्म मधे आणलं तर मजा येणार नाही.

एक, मी कुणी क्षीरसागर साहेब वगैरे नाही, मला फक्त संजय म्हटलं तरी चालेल.

संजय म्हणण्याची मुभा दिल्याबद्दल आभारी आहे असे सांगतो, कारण मीच आपल्याला वर क्षीरसागर साहेब म्हटले आहे.

आणि दोन, माझ्या आध्यात्मिक आणि ललित लेखनाची सरमिसळ करू नये ही विनंती.

बिलकुल मंजूर. आपण आध्यात्मिक लिखाण कधी करताय याकडे डोळे लाऊन बसलो आहे!

आध्यात्मिक लिहीन तेव्हा तुम्हा सर्वांना उपयोगी होईल असंच लिहीन, आणि तेव्हा हेतू समजून घेऊन चर्चा व्हावी इतकीच अपेक्षा असेल

बिलकुल! हेतु शुद्ध असेल तर बिलकुल प्रतिक्रिया देणार नाही! पण मुदलातच घोळ असेल तर मात्र नक्की तथाकथित वैध मार्गाने चर्चा करीन !

पण ललित लेखन वेगळंय, तो मूड वेगळा आहे, तिथे कल्पना आणि वास्तवाची जुगलबंदी आहे, तिथे अध्यात्म मधे आणलं तर मजा येणार नाही.

ओक्के! आध्यात्म कधी घेताय त्या प्रतिक्षेत!

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2012 - 12:43 am | संजय क्षीरसागर

आध्यात्मिक लेखनाबद्दल बोलायचं झालं तर बहुतेकांचा संकेतस्थळावरचा अनुभव प्रदीर्घ आहे तेव्हा गेल्या तीन वर्षाहून जास्त काळ मी कुठे लेखन केलंय हे त्यांना माहिती असेल. तिथे बासष्ठ लेख प्रसिद्ध झालेत आणि सातशेहून जास्त प्रतिसादातून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली गेलीयेत. मी पुन्हा ते लेखन इथे प्रकाशित करणार नाही कारण त्यात जागा आणि काल दोन्हीचा अपव्यय होईल. ज्यांना रस असेल त्यांनी ते वाचलं आणि इथे व्य. नि. तून प्रश्न विचारले तर प्रामाणिक प्रश्नांची मी जरूर उत्तरं देईन.

या संकेतस्थळावर एखादा आध्यात्मिक विषय निर्माण झाला आणि प्रदीर्घ प्रतिसाद देण्यापेक्षा लेख लिहावासा वाटला तर मी नक्कीच नवा लेख लिहीन.

आध्यात्मिक लेखनाबद्दल बोलायचं झालं तर बहुतेकांचा संकेतस्थळावरचा अनुभव प्रदीर्घ आहे तेव्हा गेल्या तीन वर्षाहून जास्त काळ मी कुठे लेखन केलंय हे त्यांना माहिती असेल.

थँक्स टू अंतर्जाल, त्यामध्ये जुन्या काळी असायची तशी काशी, पैठण सारखी पीठं नाहियेत.
बाकी आपण कुठं (कुठं!) लेखन करता (करण्याचा प्रयत्न करता ) हे ज्यांना माहित असायचं त्यांना माहित आहेच.

तिथे बासष्ठ लेख प्रसिद्ध झालेत आणि सातशेहून जास्त प्रतिसादातून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली गेलीयेत. मी पुन्हा ते लेखन इथे प्रकाशित करणार नाही कारण त्यात जागा आणि काल दोन्हीचा अपव्यय होईल.

क्वाईट इंप्रेसिंग ! गुड.. गुड :)

ज्यांना रस असेल त्यांनी ते वाचलं आणि इथे व्य. नि. तून प्रश्न विचारले तर प्रामाणिक प्रश्नांची मी जरूर उत्तरं देईन.

प्रश्नाळू पब्लिक व्यनि करीलच. सध्या माझ्या तरी मनात एकही प्रश्न नाहीय त्यामुळे माझ्या व्यनिची प्रतिक्षा करु नये, अशी आगाऊ माहिती देतो :)

या संकेतस्थळावर एखादा आध्यात्मिक विषय निर्माण झाला आणि प्रदीर्घ प्रतिसाद देण्यापेक्षा लेख लिहावासा वाटला तर मी नक्कीच नवा लेख लिहीन.

आभारी आहे.
कृपया विषय निर्माण होण्याची प्रतिक्षा न करता लिहावे.

छळिले बहु संता, भगवंता , अंतरी भरली अहंता
पडता कानी ती इशकथा शूळ उठे मम माथा
अज्ञानांध असा प्रभू झालो - इह पर सौख्या मुकलो
आली घोर जरा मज खाया, उद्धरी गुरुराया ;-)

सुरुवातीला छळ तेवढा सहन करा, अर्थात तो तुम्हाला छळ वाटला तर :)

चौकटराजा's picture

11 Apr 2012 - 8:14 pm | चौकटराजा

नुकतीच गुणी व नेहमी आनंदी संगीतकार श्रीधर फडके याची एका वाहिनीवर मुलाखत झाली . त्यानीही ही सांगितले की तुला पाहिले मी नदीच्या किनारी ही कविता त्याना प्रथम कळलीच नाही.
मी प्रथमच सांगतो मी ग्रेस यांच्या कवितेचा अभ्यासक नाही . तेंव्हा त्यांच्या कवितेत किती प्रमाणात दुर्बोधता आहे हे मला नक्की माहिती नाही .एम एफ हुसेन यांच्या चित्राना मी पूर्णपणे दुर्बोध आहेत असे मानतच नाही. तेलरंगात मी आवडीने त्यांची एक दोन चित्रे रंगविली आहेत. ( कॉपी मारली ).चित्र आणि शब्द यांची तुलना करताना शब्द वापरण्यावर जास्त जबाबदारी आहे. कारण तो सरळ सरळ मांडलेला संवाद आहे. चित्रात
पोत , फटकारे, माध्यमे, त्रिमिती अशी अनेक साधने प्रयोगासाठी वापरता येतात. शब्दाचे तसे नाही. रंगाचे व्याकरण नसते.शब्दाचे नक्कीच असते. .

स्वानन्द's picture

12 Apr 2012 - 10:37 am | स्वानन्द

खूप सुंदर लेख. ग्रेस दुर्बोध वाटण्यामागचं कारण अगदी नेमकेपणाने सांगितलं आहे!

विशेषतः हे वाक्यः

ग्रेसची कविता दुर्बोध होण्यामागे कारण असंय की त्याची कविता शब्दसौंदर्य आणि लयकारीशी नि:संशय इमान राखते पण तिच्या सर्व वेरीएशन्सचा मध्यवर्ती काव्यविषयाशी एकसंध संबंध राहत नाही.

पण माझ्यामते तरी, कविता दुर्बोध असेल तर ती मला कविता म्हणून अनुभवायला मजा येत नाही. कारण कितीही सुंदर शब्दरचना, दाखले वापरले तरी ते जे सांगण्यासाठी म्हणून वापरले आहेत तो आशय दुर्बोध असेल तर ती कविता मला आपलीशी वाटत नाही. आणि मग मी त्या कवीला 'ग्रेट' मानू शकत नाही.

जसे अध्यात्माचा / किंवा स्वरुपाचा उलगडा झालेल्याला कदाचित उपनिषदांतील कमी शब्दांतील वचने जास्त आवडू शकतील... पण इतरांना उपनिषदे दुर्बोधच वाटत राहतील आणि त्यात 'ग्रेट' काय आहे असा ही प्रश्न पडेल.

संजय क्षीरसागर's picture

12 Apr 2012 - 4:00 pm | संजय क्षीरसागर

>पण माझ्यामते तरी, कविता दुर्बोध असेल तर ती मला कविता म्हणून अनुभवायला मजा येत नाही. कारण कितीही सुंदर शब्दरचना, दाखले वापरले तरी ते जे सांगण्यासाठी म्हणून वापरले आहेत तो आशय दुर्बोध असेल तर ती कविता मला आपलीशी वाटत नाही. आणि मग मी त्या कवीला 'ग्रेट' मानू शकत नाही

= कोणत्याही अभिव्यक्तीतला ग्रेटनेस दोन गोष्टींमुळे असतो; एक, सहजता आणि दोन, सौंदर्य.

ग्रेसच्या कवितेची मजा अशीये की ही दोन्ही परिमाणं त्यांच्या कवितेत नि:संशय आहेत पण काही वेळेस अर्थ कळतो तर कधी कळत नाही.

पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने

इथे अभिव्यक्तीतली सहजता, शब्दांचं सौंदर्य आणि लयीची नजाकत पाहा. जणू आपलाच अनुभव ग्रेसनं मांडलाय असं वाटतं.

डोळयात उतरले पाणी,पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा,या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना,ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा

अत्यंत संवेदनाशील रचना, साध्यासाध्या शब्दातून एकाच मूडची एखाद्या रागासारखी सलग मांडणी.

इथे तिसर्‍या कडव्यात ग्रेस पूर्ण उमजला नाही तरी चवथ्या कडव्यात ग्रेसनं परत महौल जमवलांय पण अशा रचना कमी आहेत.

आता ग्रेसचा ग्रेटनेस काय आहे? तर, तिसरं कडवं समजलं नाही तरी त्यातलं काव्य, त्याची मूळ मूडशी एकतानता आणि प्रतिमांची योजना कमालीची मोहक आहे.

आणि मग प्रश्न असायं की दुर्बोध म्हणून तुम्ही संपूर्ण कविता नाकारणार की (आता दुर्दैवानं शक्य नाही पण..) ग्रेसला बोलतं करून त्याच्या मनातला अर्थ समजाऊन घेणार?

अविनाशकुलकर्णी's picture

12 Apr 2012 - 6:03 pm | अविनाशकुलकर्णी

मेघात अडकली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता
///////////////////////////////////////////////

एक सुंदर आठवण
परवा चर्चेत एक सुंदर आठवण ऐकण्यात आली .
कै ग्रेस यांच्या मेघात अडकली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता ..
ह्या गाण्यात ह्या ऐवजी मूळ ओळ
मेघात मिसळली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता ..
... अशी होती
पण गाण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आला.
त्यांचे म्हणणे असे होते कि अडकलेले सोडवता येते पण मिसळलेले नाही..
मिसळले हा शब्द बदलल्याने त्यातली गूढता आशय घनता व दुर्बोधता गेली.

प्रीती's picture

12 Apr 2012 - 6:22 pm | प्रीती

क्या बात है!!......

प्रदीप's picture

13 Apr 2012 - 8:12 pm | प्रदीप

कविता 'समजणे' ह्याविषयी यकू व खटासि खट ह्यांचे प्रतिसाद आवडले. मला वाटते, कविताच काय, कुठलीही कलाकृति (माझ्यासारख्या नफफड माणसाला हिंदी फिल्मी गाणीही) समजण्याच्या अनेक पातळ्या असतात. एखाद्या फळाच्या पापुद्र्याप्रमाणे, जितके आपण कलाकृतिचा जास्त आस्वाद घेत रहावे, तितके त्यातील आंतील पापुद्रे 'उघडत' जातात. तसे ते उघडलेले आपले आपणांस जाणवावे. तो आनंद आपला आपणाशीच रहावा, अनुभवावा. तो इतरांना विशद करून सांगण्याचा प्रयत्नात 'राख बरबाद मुहब्बत की बचा रक्खी है, बारबार इसको जो छेडा तो मचल जायेगी' अशी स्थिती होण्याची भीति अधिक. तसले प्रयत्न शब्दबंबाळ होऊ शकतात.

आता प्रश्नः संजयक्षीरसागर अनेकदा ग्रेस ह्यांच्या कविता 'समजण्यासाठी' त्यांच्या जीवनात डोकावले पाहिजे असे बजावतात. ह्याची खरे तर काय जरूरी आहे? किंवा दुसर्‍या तर्‍हेने हेच विचारायचे झाले तर असे म्हणेन, की अशा तर्‍हेने कलाकाराच्या (इथे साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला वगैरे सर्वच अभिप्रेत आहेत) कलाकृतिची समज 'त्या शेवटच्या (वैयक्तिक संदर्भाच्या) पातळीवर न पोहोचताही करता यावी की! जी. एंच्या कथांचा आस्वाद घेण्यासाठी त्यांच्या खाजगी जीवनाविषयी काहीही माहिती नसले तरी चालेल; लताच्या गाण्याचा आस्वाद मी अनेकानेक वर्षे तिच्या खाजगी जीवनात न डोकावता घेत आलेलो आहे, तेच गुरू दत्त, बेनेगल, जांग यिमौ, कुरोसावा ह्यांचे चित्रपट, अथवा बीथोवनच्या सिंफनीविषयी अथवा शंकर- जयकिशनच्या संगीताविषयी, थिरखवॉ खाँसाहेबांच्या तबल्याविषयी! कलाकृतींतून कलाकाराच्या वैयक्तिक जीवनाविषयी काहीबाही अटकळ बांधता येते हे खरे आहे. पण हा आपल्या कलाकृतीच्या आस्वादाचा परिणाम झाला. मुळात त्याची आवश्यकता नसावी.

चौकटराजा's picture

14 Apr 2012 - 5:48 am | चौकटराजा

काही कलाकार यांच्या निर्मितीवर खाजगी जीवनाचा परिणाम घडत असेलही. पण कला़कृती समजण्यासाठी त्याना व्यक्ती म्हणून समजून घेतले पाहिजे हा आग्रह खुळा. पाडगावकरच एका मुलाखतीत म्हणाले होते काही कविता स्वानुभावाच्या तर काही परकाया प्रवेशाच्या ! वेश्येकडे न जाताही तिचे दु: ख मांडणारी कविता लिहिता येते. उदा. गदिमांची " जोगिया" ही कविता. भीमसेन जोशीनी साधना केली म्हणून ते उत्तम गायले पण त्यांच्या बाबतीत काही चाहते सुद्धा ते " घेतात" त्याचवेळी उत्तम गातात असे म्हणत असत. सत्याचा किती अपलाप करता येतो याचा हा नमुना.

संजय क्षीरसागर's picture

14 Apr 2012 - 8:41 am | संजय क्षीरसागर

>काही कलाकार यांच्या निर्मितीवर खाजगी जीवनाचा परिणाम घडत असेलही. पण कला़कृती समजण्यासाठी त्याना व्यक्ती म्हणून समजून घेतले पाहिजे हा आग्रह खुळा.

= ग्रेसच्या बाबतीत असं नाहीये. एक साधं उदाहरण घ्या एखाद्या चित्रकारानी एक अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटींग केलं (ती त्याच्या अनुभवाची अभिव्यक्ती असते) आणि कोणतही नांव न देता ते रसिकांसमोर ठेवलं तर प्रत्येकजण त्यातून वेगवेगळे अर्थ काढेल आणि प्रत्येकाला आपला अर्थ बरोबर वाटेल. अशा पेंटीगवर वर्षानुवर्ष चर्चा झाली तरी चित्रकारानं नेमकं काय व्यक्त केलंय यावर कधीही एकमत होणार नाही. आता हेच जर त्या चित्रकारानं स्वत: सांगीतलं तर मग ते "तसं व्यक्त झालंय की नाही" इतकाच वाद राहील आणि तरीही त्या वादाला एक आणि एकच दिशा राहिल. आता प्रत्येक रसिक त्या चित्राशी एक तर स्वत:चा अनुभव रिलेट करू शकेल किंवा करू शकणार नाही पण त्या असहमती किंवा सहमतीला प्रत्येकाचं व्यक्तीगत कारण असेल आणि त्या चित्रविषयाचं योग्य मूल्यमापन होऊ शकेल.

ग्रेसची कविता अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटींगसारखी आहे म्हणून खुद्द ग्रेस स्वत:ला काय व्यक्त करायचंय हे सांगत नाही तोपर्यंत त्याच्या कवितेचं यथार्थ मूल्यमापन होऊ शकणार नाही.

>पाडगावकरच एका मुलाखतीत म्हणाले होते काही कविता स्वानुभावाच्या तर काही परकाया प्रवेशाच्या ! वेश्येकडे न जाताही तिचे दु: ख मांडणारी कविता लिहिता येते. उदा. गदिमांची " जोगिया" ही कविता.

= हा अगदी उघड मुद्दा आहे. एखादा चंद्रावर न जाता त्या प्रवासाचं आणि चंद्राचं वर्णन करेल आणि स्वत: नील आर्मस्ट्राँग त्यानं केलेल्या चंद्रसफरीचं अनुभव कथन करेल. नील आर्मस्ट्राँगकडे अभिव्यक्तीची प्रतिभा नसली तरी तुम्हाला कुणाचं ऐकावंस वाटेल? आणि अभिव्यक्तीची प्रतिभा असली तर तो जी कमाल करू शकेल त्याच्यापुढे नुसतं काल्पनिक वर्णन कितपत तग धरेल?

>भीमसेन जोशीनी साधना केली म्हणून ते उत्तम गायले पण त्यांच्या बाबतीत काही चाहते सुद्धा ते " घेतात" त्याचवेळी उत्तम गातात असे म्हणत असत. सत्याचा किती अपलाप करता येतो याचा हा नमुना.

= कलेची साधना आणि अभिव्यक्ती या दोन्ही परस्परांशी निगडीत गोष्टी असल्या तरी अभिव्यक्तीच्या वेळी आवश्यक असलेली मन:स्थिती कशी साधायची (विषेशत: परफॉर्मिंग आर्टमधे) तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

आता योग्य मानसिक अवस्था (तरलता) साधल्यावर "अभिव्यक्ती" हा एकच क्रायटेरिआ रसिकांसाठी (म्हणजे ज्यांना तिचा आस्वाद घ्यायचाय किंवा त्यातून काही शिकायचय) ऊरतो असं माझं मत आहे.

तुम्ही या तिन्ही गोष्टी त्यांच्या योग्य परस्पेक्टिवमधे पाहिल्या तर मला काय म्हणायचंय ते कळू शकेल.

संजय क्षीरसागर's picture

16 Apr 2012 - 1:48 am | संजय क्षीरसागर

>आता प्रश्नः संजयक्षीरसागर अनेकदा ग्रेस ह्यांच्या कविता 'समजण्यासाठी' त्यांच्या जीवनात डोकावले पाहिजे असे बजावतात. ह्याची खरे तर काय जरूरी आहे? .......मुळात त्याची आवश्यकता नसावी

> आर्टचे दोन प्रकार आहेत: परफॉर्मिंग (वादन, गायन, नृत्य, नाट्य वगैरे जिथे रसिक कलाकारा समोर असतो) आणि नॉनपरफॉर्मिंग (साहित्य, चित्रकला, कविता, रेकॉर्डेड सुगम संगीत, चित्रपट वगैरे जिथे रसिक समोर नसतो).

परफॉर्मिंग आर्टमधे कलाकाराच्या व्यक्तीगत जीवनाची माहिती असण्याची आवश्यकता नाही कारण तो रसिकाशी प्रत्यक्ष संवाद असतो. नॉनपरफॉर्मिंग आर्टमधे देखील जिथे सरळ अर्थबोध होतो (उदाहरणार्थ, कवितेच्या संदर्भात, संदीप खरेच्या कविता) तिथेही तशी गरज नसते पण ग्रेससारख्या कवीच्या बाबतीत कवितेचा सरळ संदर्भ लागत नाही आणि मग कवीतेची भूमिका कवीकडून समजाऊन घेतल्याशिवाय पर्याय नसतो.

अर्थात, कुणी म्हणेल नाही ना समजत, जाऊ दे! पण मला तरी ग्रेसची कविता इतकी सहज नाकारता येत नाही कारण ग्रेसची कविता संवेदनाशिल मनाला मोहवतेच आणि इतरांनाही त्या कवितेचं ओझरतं का होईना दर्शन व्हावं म्हणून हा लेख.