आज बरेच दिवसांनी चेस्.कॉमवर जरा निवांत भटकत होतो. मला परमप्रिय असलेल्या मिखाईल तालचा एक डाव नजरेस पडला. मग तिथून जरा तंद्री लागली आणि थोडी शोधाशोध करुन तालचाच आणखी एक प्रसिद्ध डाव हाती लागला. पेश करतोय मिखाईल ताल वि. बेंट लार्सन.
"सम सॅक्रिफायसेस आर साऊंड, अदर्स आर माईन!" मिखाईल ताल!!
बुद्धिबळाच्या इतिहासात अतिशय कमीकाळ तेजाने तळपून जे तारे लुप्त झाले त्यात तालचा क्रमांक अतिशय वरचा लागेल. हा माणूस प्रतिस्पर्ध्याला कधीही स्वस्थ होऊ देत नसे. कधी एकदा बलिदान करायला मिळतंय याची त्याला जणू घाईच लागलेली असे! त्याचं आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे डाव कमितकमी खेळ्यात संपवणे. त्याचे बरेच डाव जेमतेम ३५ खेळ्यात आटोपलेले असत. १९६५ मधे बेंट लार्सन विरुद्ध खेळला गेलेला हा डाव म्हणजे त्याचा एक अद्वितीय डाव आहे.
डावाची सुरुवात सिसिलिअन बचावाच्या ताल प्रकाराने होते.
1.e4 c5
2.Nf3 Nc6
3.d4 cxd4
4.Nxd4 e6
5.Nc3 d6
6.Be3 Nf6
7.f4 Be7
पहिल्या खेळ्या मोहोर्यांची बढत आणि डावाच्या मध्यात वर्चस्व ठेवण्याच्या प्रयत्नात गेल्या आहेत.
8.Qf3 O-O
9.O-O-O Qc7
दोन्ही राजांचा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किल्लेकोट झालाय. काळा वजीर बाहेर यायला बघतोय.
10.Ndb5 ताल संधी सोडत नाही घोडा वजिराच्या अंगावर घालून त्याला आठव्या पट्टीत रेटतो!
Qb8
11.g4 राजाच्या बाजूची प्यादी पुढे ढकलून जास्त जागा काबीज करण्याचा तालचा प्रयत्न
a6 त्या घोड्याला तिथून हुसकावून लावलाच पाहिजे नाहीतर काही खरं नाही म्हणत लार्सनने प्यादे रेटले!
12.Nd4 तालने घोडा मागे नेला
Nxd4 संपवूनच टाकूयात घोड्याच्या उड्या म्हणत लार्सनने घोडा मारला!
13.Bxd4 तालच्या उंटाने घोडा मारला
b5 वजिराच्या बाजूने आक्रमण करणार हे लार्सनच्या पुढे आलेल्या प्याद्याने जाहीर केले!
14.g5 जी पट्टीतले प्यादे घोड्याला हुसकावून लावते Nd7 बिचारा घोडा मागे सरकला!
15.Bd3 उंटाची बढत. पटावरचा एकेक महत्त्वाचा कर्ण धरुन ठेवायचे काम उंट करतात. इथे तालचे दोन्ही उंट काळ्या राजाच्या रोखाने मोर्चे लावून बसले आहेत!
b4 प्यादे आणखीन पुढे टाकून लार्सनने घोड्याला मागे रेटायचा प्रयत्न केला.
16.Nd5! झाले भलतेच. घोड्याला प्याद्यासमोर बळी चढवले तालने!!
exd5 घोडा खाल्ला लार्सनने.
17.exd5 तालने ते प्यादे मारले. आता काय काय झालंय बघा. तालचे दोन्ही उंट थेट राजाच्या प्याद्यांबर डोळे लावून आहेत. e5, e6 ही दोन्ही घरे तालच्या प्याद्यांनी धरली आहेत. e स्तंभ मोकळा झालाय तिथे तालचा हत्ती येणार! पटाच्या उजव्या बाजूला पांढर्याची फौज आक्रमणाच्या तयारीत आहे. त्यामाने काळ्याची मोहरी फारशी विकसित नाहीत. त्याचे दोन्ही उंट आणि वजीर कुचंबलेले आहेत. त्यामुळे हत्ती अडकून बसलेत आणि दोन्ही हत्तींचा समन्वय होऊ शकत नाहीये. एकेक कमकुवतपणा डावाच्या शेवटात घेरुन येणार आहे!
f5 हल्ला हा सर्वोत्तम बचाव ह्या तत्त्वाला अनुसरून लार्सन प्यादे पुढे सरकवून उंटाच्या वाटेत अडथळा आणतो.
18.Rde1 तालला घाई नाहीच. हत्ती सावकाश e पट्टीत आणून तो पट्टीचा ताबा घेतोच शिवाय एकट्या असलेल्या बिनजोर उंटावर हल्ला सुद्धा करतो!
Rf7 काळ्याचा हत्ती पुढे येऊन उंटाला जोर लावतो.
19.h4 प्याद्यांची मोर्चेबांधणी सुरु झाली.
Bb7 उंट मोठ्या कर्णात आणून लार्सनने पांढरा वजीर आणि त्यामागचा कोपर्यातला हत्ती यांच्यावर रोख धरला.
20.Bxf5 तालला काहीही फरक पडलेला नाही त्याने उंटाने प्यादे मारले.
Rxf5 हत्तीने उंट खाल्ला.
21.Rxe7 तालचा हत्ती सातव्या पट्टीत घुसला उंट मारून, शिवाय काळ्या घोड्यावर हल्लाही झाला. प्यादी ही राजाच्या पुढचा पहिला बचाव असतो तालने त्यांची फळीच मोडून काढायचा चंग लावलाय. सातव्या पट्टीतला हत्ती म्हणजे धोक्याची निशाणीच असते! आता हत्तीने उंटाच्या जोरात g7 हे प्यादे मारुन राजाला शह देण्याची तालची धमकी आहे.
Ne5 घोडा पुढे ढकलून लार्सनने हत्तीचा मागे यायचा मार्ग बंद केला, उंटाचा g7 प्याद्यावरचा जोर तोडला आणि वजिरावर हल्ला केला. पांढर्या प्याद्याने घोडा मारता येत नाही कारण हत्तीने तालचा वजीर मारला जाईल. लार्सनला आता हायसे वाटले असावे की कशी चतुर खेळी केली!
22.Qe4 ताल लार्सनचे बारसे जेवलाय. त्याने वजीर हत्तीवर घातला.
Qf8 वजिराला हत्तीच्या मदतीसाठी पळत यावे लागले.
23.fxe5 आता प्याद्याने घोडा खाल्ला तालने. लार्सनने जर तालचा हत्ती मारला तर ताल लार्सनचा हत्ती मारेल फिट्टंफाट!
Rf4 वजिरावर चढाई हत्तीची.
24.Qe3 वजीर मागे आला.
Rf3 हत्ती पुन्हा पुढे चाल करुन.
25.Qe2 पुन्हा वजीर मागे. यशस्वी खेळाडूला माघार कधी घ्यायची हे माहीत असते!
Qxe7 हत्ती मारला काळ्याने.
26.Qxf3 तालने फिट्टंफाट केली.
dxe5 काळ्याने तालचे प्यादे मारुन उंटावर हल्ला केला.
27.Re1 हत्तीने प्यादे काळ्या वजिराला पिन केले.
Rd8 काळा हत्ती d5 मधल्या प्याद्यावर आला.
28.Rxe5 हत्तीने काळे प्यादे मारले, स्वतःच्या प्याद्याला जोर केला आणि वजिरावर हल्ला सुद्धा केला.
Qd6 वजीर सुद्धा आणला डावात लार्सनने. आता प्याद्यांसाठी युद्ध सुरु आहे.
29.Qf4! अप्रतिम खेळी. काय काय झालंय बघा. आता उंटाने पांढरे प्यादे मारले तर तालचा हत्ती आठव्या पट्टीत जाऊन राजाला शह देतो. शह काढण्यासाठी हत्ती मारला तर जोर जाऊन काळा वजीर पडतो!! डावाच्या प्रत्येक स्थितीत प्रतिस्पर्ध्याची मोहरी पिन करत पुढे जाणे हे तालच्या डावाचे वैशिष्ठ्य नजरेत भरण्याजोगे आहे! आता तालकडची दोन जादाची प्यादी डावाच्या शेवटी वरचढ ठरणार.
Rf8 वजिरावर हल्ला.
30.Qe4 वजीर बाजूला घेतला.
b3 प्यादी पुढे नेऊन राजाला डावात खेचायचा लार्सनचा प्रयत्न.
31.axb3 प्यादे मारले
Rf1+ हत्तीने पांढर्या राजाला शह.
32.Kd2 राजा दुसर्या पट्टीत सरकला.
Qb4+ वजिराने शह
33.c3 प्यादे पुढे सरकवून शह काढला
Qd6 वजीर गुपचुप पुन्हा जागेवर येऊन बसला!
आता डावात काळा वजीर अजूनही महत्त्वाची भूमिका बजावतोय आणि काळा हत्तीदेखी सक्षम आहे. पांढर्याला पूर्ण वरचष्मा मिळवण्यासाठी अजून काहीतरी करावे लागणार आहे. ताल काय करतो बघा.
34.Bc5 उंट वजिरासमोर बलिदान दिला! क्या बात है!! एकच खेळी आणि अचूक वर्मावर घाव. वजिराची अवस्था बिकट आहे. जायला जागा भरपूर आहेत पण सगळ्या कुचकामी. राजा कोपर्यात अडकलाय त्याच्या मदतीला तो जाऊ शकत नाहीये.
Qxc5 बिचारा काळा वजीर, उंट खाल्लान त्याने.
35.Re8+ हत्तीचा शेवटच्या पट्टीतून राजाला शह.
Rf8 शह काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे हत्ती मधे घालणे.
36.Qe6+ तालच्या वजिराने शह दिला. मगाचच्या उंटाच्या बलिदानाचा अर्थ आता समजेल. उंट मारताना काळा वजीर d पट्टीतून cपट्टीत गेला त्यामुळे आत्ताच्या खेळीला पांढरा वजीर e6 मधे येऊन शह देऊ शकला. अन्यथा वजिरांची मारामारी होऊन डाव मोकळा झाला असता!!
Kh8 राजाला पर्यायच नाहीये कोपर्यात तोंड लपवण्याखेरीज!!
37.Qf7 वजीर हत्तीवर नेला. शेवटचा दणका. आहाहा, काय खेळी आहे!! काळ्या हत्तीला वजीर मारता येत नाही कारण तो राजाला पिन झालाय, पुन्हा एकदा पिन!! आणि वजीर सोडून दुसर्या कोणाचा आधार हत्तीला मिळणार नाहीये. पुढच्याच खेळीत शह, मात!!
पांढर्या राजाला सतत शह देत राहून डाव बरोबरीत नेता येणे हा एक मार्ग असू शकतो पण काळा वजीर कसा अडकवलाय तालने ते बघा. त्याला कुठूनच राजाला शह देता येत नाहीये. फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे d5 मधले प्यादे मारुन शह देणे. पण त्यानेही वजिरावजिरी होऊनही मात टळत नाहीच.
काळ्याने डाव सोडला. 1-0
हा संपूर्ण डाव इथे खेळून बघता येईल.
काय खेळलाय ताल!! वा वा वा!! बलिदानाची एकेक खेळी म्हणजे नजाकत आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी नेमके काय करावे लागेल ह्याचा अचूक अंदाज दिसतो त्याच्या खेळात. घणाघाती खेळ्या, वेग आणि बलिदाने ही तीन्ही त्याच्या डावाची वैशिष्ठ्ये होती!
डेविड ब्रॉन्स्टीनने म्हणून ठेवलंय
Tal develops all his pieces in the center and then sacrifices them somewhere!!
('ताल'प्रेमी) चतुरंग
प्रतिक्रिया
12 Feb 2012 - 10:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिखाईल तालच्या खेळाची आणि त्यांच्या बहारदार चालींची ओळख करुन दिल्याबद्दल धन्स.
एचटीएमएलचा दुवा तिकडून इकडे डकवून मूळ लेखात चालींच्या नजाकती नै पाहता येणार का हो ?
-दिलीप बिरुटे
12 Feb 2012 - 10:29 pm | पैसा
एखाद्या चालू असलेल्या मॅचचं धावतं समालोचन बघतोय असं वाटलं!
13 Feb 2012 - 10:48 am | विसोबा खेचर
रंगा, बुद्धिबळातला तुझा अभ्यास आणि आवड थक्क करणारी आहे..!
तात्या.
13 Feb 2012 - 10:48 am | मन१
सध्या वरवर चाळलाय. फुर्सतीत खेळून पाहिन म्हणतो.
तुमच्या लाडक्या तालवर नेहमीच लिहिता, तसच आमच्या लाडक्या फिशरचे डावही समजावून द्या की अजून. त्याला कशाला एक्-दोन लेखांत उडवलात?
13 Feb 2012 - 10:57 am | राघव
रंगदा, तुमची बुद्धीबळाची आवड तुमच्या लेखनातून जाणवतेय! आता दुव्यावरून पूर्ण डाव तुमचे समालोचन वाचता वाचता खेळून बघतो!! :)
राघव
13 Feb 2012 - 11:48 am | कपिल काळे
सुंदर डावाचे तितकेच सुंदर वर्णन. ह्या बुद्धीबळाच्या डावाच्या समालोनाची तुलना- पहाटे उठून एकलेल्या, ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या क्रिकेट सामन्याच्या, रिची बेनॉ, टोनी ग्रेग किंवा इयान चॅपेलने केलेल्या समालोचनाशी, केली तरी हरकत नाही !!
13 Feb 2012 - 3:28 pm | गणपा
समालोचन केवळ मैदानी वा इनडोअर खेळांचंच होऊ शकते (थोडक्यात बैठ्या खेळांच नाही) या माझ्या धारणेस शह-मात दिलीत रंगाशेट.
नावाला जागणारा लेख.
13 Feb 2012 - 3:35 pm | असुर
रंगाकाका,
मस्त लेख. खेळून पाहीला काल रात्रीच. २१व्या चालीला (ताल लार्सनचं बारसं जेवतो तिथपासून) माझ्या चाली चुकल्या. पुन्हा कंट्रोल+झेड करुन ४-५ चाली मागे जाउन परत खेळत आलो तरी चुकलो. मी हुकतोय का? कसा, कुठे?? Qe4 व्हायला, माझा वजीर e4 च्या कुठल्याच लायनीत नसतो.
पुढला खेळ लेख म्हणून वाचला, तरीपण जाम मजा आली. एकदम स्पीडी गेम. फुटबॉलचा सामना बीबीसी रेडीओवर ऐकताना मजा येते त्याप्रमाणेच.
-- (रंगाकाकांचा शागीर्द) असुर
13 Feb 2012 - 3:52 pm | चतुरंग
खरंतर काही कारण दिसत नाही डाव चुकायचं.
मी लेखात दिलेला दुवा पुन्हा तपासून बघितला, दिलेला डाव बरोबर आहे.
तोच दुवा एका खिडकीत उघडून खेळून बघितलात का?
२२ व्या चालीला तालचा वजीर Qe4 असा खेळतो.
-रंगा
13 Feb 2012 - 4:03 pm | असुर
नाही. मी मूळ डाव उघडून नाही पाहीला. तुम्ही मस्त एक्सप्लेन केलाय, ओरिगिनल डावात काय लिहीलंय वाचायची गरजच पडली नाही. आणि इंग्रजी अजिबात वाचता येत नसल्याने इंग्रजी वेबसायटींवर जाणे टाळतो. ;-)
मी नक्की कुठेतरी डाव हुकवला मध्येच. आता आज हापिसातून घरी जाऊन पुन्हा खेळून पाहतो. आज दिवसभरात हायकमांड डाव खेळून बघणार आहेत, त्यांना समजला तर प्रश्नच नाही. नाहीतर तुमचं डोकं खाईन मी परत. :-)
-- असुर
13 Feb 2012 - 3:51 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त ओळख.
अधे मधे असे लिहित रहावे की माणसाने.