अनभिषिक्त जगज्जेता!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
6 Jun 2008 - 2:32 am

"काकांनी जिंकण्याची संधी गमावली!" लहानग्या पॉलच्या उद्गारासरशी बुद्धीबळाचा डाव मांडून बसलेल्या काका आणि वडिलांनी त्याच्याकडे चमकून बघितले! त्यांना हे माहीत नव्हते की ते एका भावी जगज्जेत्याचे बोलणे ऐकत आहेत.
६-७ वर्षांच्या पॉलला डावपेच तर सोडाच पण मोहोर्‍यांच्या हालचाली तरी नीट माहीत असतील की नाही अशी शंका येऊन त्यांनी आव्हान दिले, "सांग बघू कधी ते?"
त्यासरशी पॉलने संपलेल्या डावातली मोहोरी काही खेळ्या मागच्या स्थितीत मांडून चक्क विश्लेषण करुन सांगितले की त्याचे काका कसे जिंकू शकत होते!!
१९ व्या शतकात जगात जे काही मोजके महान बुद्धीबळपटू होऊन गेले त्यातला हा 'पॉल मॉर्फी'!

अमेरिकेच्या दक्षिणेकडल्या लुईझियाना प्रांतातल्या न्यू ऑर्लीन्स (न्यू.ऑ.) ह्या शहरात एका श्रीमंत उमराव घराण्यात पॉलचा जन्म झाला ते साल होतं १८३७ (म्हणजे अमेरिकन सिव्हिल वॉरच्या आधी ३४ वर्षे!).
त्याचे वडील एक प्रसिद्ध वकील होते. तसेच ते लुईझियानाचे लोकनियुक्त सभासद होते (एम्.एल्.ए.) आणि शिवाय त्यांनी ऍटर्नी जनरल आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अशीही पदे भूषविली होती. त्याची आई संगीताची जाणकार होती आणि तिला तिच्या फ्रेंच क्रिओल वंशाची असण्याचा अभिमान होता!
अशा उच्चपदस्थांच्या घरातला रविवारचा मोकळा वेळ हा संगीत मैफिली आणि बुद्धीबळात व्यतीत होत असे.
पॉलला खेळाची गोडी लागली ती अशीच लोकांचा खेळ बघत बघत. वर दिलेल्या अनुभवानंतर मात्र त्याच्या आवडीकडे थोडे गांभीर्याने बघितले गेले आणि त्याच्या खेळाला पोषक वातावरण मिळेल ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाऊ लागले. ह्याचा परिपाक म्हणून वयाच्या ९ व्या वर्षी तो न्यू. ऑ. मधला सर्वोत्तम खेळाडू बनला.

१८४६मधे अमेरिकेचे सरनेनानी, दस्तुरखुद्द विनफील्ड स्कॉटने न्यू.ऑ.ला भेट दिली.
हा माणूस अमेरिकन इतिहासातला सर्वात प्रदीर्घ अनुभव असलेला सेनापती आजही समजला जातो. त्याला बुद्धीबळाचा नाद होता, एवढेच नव्हे तर तो स्वतःला एक कसलेला खेळाडू मानीत असे.
भेटीदरम्यान विरंगुळा म्हणून त्याची गाठ उत्तम खेळाडूशी करून द्यायची ह्या हेतूने एके रात्रीच्या जेवणानंतर पॉलला त्याच्यासमोर नेले. ९ वर्षाच्या पॉलकडे बघताच ही मस्करी आहे असे समजून स्कॉट रागावला पण कसेतरी बाबापुता करुन त्याचे मन वळवले.
आणि पॉलने एकदा नव्हे तर चक्क दोनदा स्कॉटला धुतले! दुसर्‍या डावात तर केवळ सहा चालीत जबरदस्तीने मात केली (बिचारा स्कॉट :(). साहजीकच अपमान सहन न होऊन स्कॉटने खेळातून माघार घेतली आणि तो पॉलशी आयुष्यात पुन्हा कधीही खेळला नाही! (शहाणा होता. आपण होऊन पुन्हा लाथा कोण खाणार!! :P )

हंगेरियन व्यावसायिक बुद्धिबळपटू जोहान लोवेंथल हा १८५० मधे न्यू.ऑ.ला भेट द्यायला आलेला असताना पॉल बरोबर खेळण्याचा प्रस्ताव नाकारणार होता. कारण तो अनौपचारिक सामना होता आणि त्याला असे वेळ वाया घालवणारे सामने पसंत नसत! बर्‍याच आढेवेढ्यांनंतर तो खेळायला आला आणि त्याने पॉलच्या डोक्यावर सहानुभूतीने हात फिरवला (कदाचित त्याच्या मनात असे असेल "की हरलास तरी रडू नकोस हो बाळा, मी सांभाळून घेईन!"त्याला अंदाज नव्हता की हे बेनं डावात त्याच्या डोक्यावरुन हात फिरवणार आहे :) )
पहिल्याच सामन्यात बाराव्या खेळीला पॉलने अशी काही खेळी केली की जोहान समजून चुकला की हे प्रकरण काही तरी वेगळेच आहे!
न्यू.ऑ.च्या त्याच्या मुक्कामात तो १२ वर्षाच्या पॉलशी एकूण तीन डाव खेळला आणि तीनही हरला!!

वयाच्या २० व्या वर्षी पॉल कायद्याची पदवी वगैरे मिळवून उच्चशिक्षित झाला पण त्याचे वय अजून वकिलीची सनद मिळण्याएवढे नव्हते. फावल्या वेळात काय करायचे म्हणून त्याने १८५७ च्या 'अमेरिकन चेस काँग्रेस्'मधे भाग घेतला. त्यावर्षी न्यूयॉर्कला झालेल्या स्पर्धेत त्याने त्याच्या एकूणएक प्रतिस्पर्ध्याना खडे चारले. त्यात शेवटल्या फेरीत त्याने प्रसिद्ध जर्मन खेळाडू लुई पोल्सेनला देखील हरवले. त्याचा तो डाव इथे खेळून बघता येईल. चेसमधली ओपनिंग्ज, विशिष्ठ मोहर्‍यांच्या ठराविक हालचाली वगैरे त्याकाळात अजून विकसित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे हा खेळ बघायला अनवट वाटतो. १७ व्या खेळीत पॉलने त्याच्या वजिराचा बळी देताना १२ मिनिटे विचार केला अशी टिप्पणी सापडते. असे धाडसी बलिदान करताना पुढल्या डझनभर खेळ्यात आपण जिंकणारच ह्याची खात्री त्याने त्या १२ मिनिटात केलेली असणार. पोझिशनल प्रेशर हे राजाविरुद्धच्या निर्णायक हल्ल्यात कसे परिवर्तित करायचे ह्याचा सुंदर वस्तुपाठ हा डाव देतो!

पॉलने १८५८ मधे यूरोपला भेट दिली. खरेतर इंग्लंडमधल्या स्पर्धेत तो खेळायला गेला होता पण त्याऐवजी वेगवेगळ्या इंग्लिश मास्टर्सना अनौपचारिक सामने खेळून पराभूत करण्याचे सत्र त्याने सुरु ठेवले. त्याच्या प्रवासा दरम्यान त्याला आतड्याच्या संसर्गाने घेरले आणि खूप रक्तस्राव होऊन तो आजारी पडला. उभेही राहता न येण्याच्या स्थितीत त्याने दुसरा प्रसिद्ध जर्मन खेळाडू ऍडॉल्फ अँडरसन ह्याच्याशी ११ सामन्यांची मालिका खेळली आणि ७-२-२ (७ विजय, २ बरोबरी, २ हार) अशी जिंकली!
ह्याच प्रवासात त्याने त्याचा आणखी एक अविस्मरणीय सामना खेळला. तो आजही 'ऑपेरा गेम' म्हणून प्रसिद्ध आहे. कारण तो फ्रान्समधल्या एका इटालियन ऑपेरा हाऊसमधे खेळला गेला होता. ह्या खेळाचं वैशिष्ठ्य असं की पॉल मॉर्फी विरुद्ध एकाचवेळी दोन खेळाडू खेळत होते! एक होता जर्मन ड्यूक ऑफ ब्रुन्सविक आणि दुसरा होता फ्रेंच अमीर आसामी काऊंट इसोअर्ड. आजही हा सामना अनेक बुध्दिबळ शिक्षक उदाहरण देऊन सांगतात कारण मोहर्‍यांचा वेगाने विकास कसा करावा, एकामागून एक धमक्या देत राहून प्रतिस्पर्धी मोहोर्‍यांना खिळवून कसे ठेवावे ह्याचा उत्तम नमुना बघायला मिळतो. ह्या खेळात त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या चुकाही भरपूर आहेत, त्याचा फायदा पॉलला झालाच पण त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या शैलीचे महत्त्व कमी होत नाही!
यूरोपातल्या वास्तव्यात एकाच वेळी आठ खेळाडूंशी ब्लाईंडफोल्ड खेळून त्याने सर्वांना पराभूत करण्याचा पराक्रम अनेक प्रदर्शनीय सामन्यात केला होता!
त्यावेळी जागतिक विजेता ठरवण्यासाठी कोणतीही औपचारिक स्पर्धा नव्हती पण पॉलने जवळजवळ सर्व नामांकित खेळाडूंना हरवले होते त्यामुळे १८५९ साली पॅरिस आणि लंडन येथे त्याचा जगज्जेता म्हणून सत्कारही करण्यात आला. व्हिक्टोरिया राणीच्या खाश्या मेहेमानांमधे समावेश करुन त्याला बोलावले होते.
अमेरिकेत परतल्यावरही त्याचा न्यूयॉर्क आणि बॉस्टन येथे सत्कार करण्यात आला. हेन्री लाँगफेलो हा कवीही त्याच्या बॉस्टनमधल्या सत्काराला उपस्थित असल्याचा मनोरंजक उल्लेख आहे.

सर्व जगात कोणीही तुल्यबल खेळाडू नाही असे नक्की झाल्यावर पॉलने बुद्धीबळ खेळणे सोडले! एक चाल आणि एक प्यादे कमी घेऊन (ऑड्स ऑफ पॉन अँड अ मूव्ह) मगच मी खेळेन अशी विचित्र प्रतिज्ञा त्याने केली. त्यात तसा गर्विष्ठपणा नव्हता कारण ती वस्तुस्थितीच होती!
१८६१ मधे अमेरिकन सिव्हिल वॉरला तोंड फुटले आणि पॉलचे वकिली करण्याचे स्वप्न तसेच राहिले. तो दक्षिणेकडच्या राज्यातला असूनही त्याने युद्धात भाग घेतला नाही. युद्धादरम्यान काही काळ तो न्यू.ऑ.ला राहिला आणि उरलेला काळ त्याने पॅरिस आणि हवाना, क्यूबा येथे व्यतीत केला.
विरोधी भूमिका घेतल्याने युद्धानंतरही त्याची वकिली म्हणावी तशी चालली नाही.
बुद्धीबळ ह्या खेळाला व्यावसायिक स्वरुप अजून आलेले नसल्याने त्याने पूर्णवेळ तो खेळ व्यावसायिकपणे खेळण्याचे नाकारले. (व्यावसायिक पणे खेळणार्‍यांचा खेळ जुगार्‍यांचा म्हणून ओळखला जाई! ;) )

१८८७ मधल्या एका दुपारी आपल्या प्रासादतुल्य घरात टबबाथ घेण्यासाठी म्हणून पाण्यात उतरलेल्या पॉलला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्याचे निधन झाले. त्याच्या उत्तरीय तपासणीत गरम हवेत भरपूर चालून एकदम थंड पाण्यात उतरल्याने त्याला झटका आल्याचे निदान झाले. अशा रीतीने एका प्रतिभावान खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला.
पुढे पॉलचे राहते घर "द मॉर्फी मॅन्शन" हे १८९१ मध्ये विकून टाकले गेले. आजचे न्यू ऑर्लिन्स मधले प्रसिद्ध 'ब्रेन्नान्स' रेस्टॉरंट ती हीच इमारत!

पॉलच्या खेळाबद्दल - त्याचा खेळ हा मुख्यत्वे 'ओपन पोझिशन' तत्वावर आधारलेला होता. मोहर्‍यांची फार गर्दी आणि कोंडी करुन खेळत राहण्यापेक्षा चटकन मारामारी करुन डाव सुटसुटीत करुन घेण्याकडे त्याचा कल असे. वजिराचा बळी देऊन पुढच्या काही खेळ्यात मात करणे ह्यात त्याचा हातखंडा होता. पण तसा तो इतर किचकट डावातही चांगला खेळ करीत असे. विशेषतः परिस्थितीचे अत्यंत वेगाने विश्लेषण करुन त्यातला कच्चा दुवा हुडकून योग्य खेळी शोधणे ह्यात तो वाकबगार होता. त्याकाळच्या बुध्दिबळ खेळातला एकूण विकास पाहता ही त्याची झेप कितीतरी काळाच्या पुढे होती. त्याने स्पर्धेत ऑफिशियली खेळलेल्या ५९ डावांपैकी ४२ जिंकले, ९ बरोबरी आणि ८ हरला! बॉबी फिशरच्या मते तो जगातला पहिल्या क्रमांकाचा खेळाडू होता. त्याच्या आणि कॅपाब्लांकाच्या खेळात काही साम्य आपल्याला आढळून येते. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.

चतुरंग

क्रीडामाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

शितल's picture

6 Jun 2008 - 2:43 am | शितल

चतुर॑गजी,
नेहमी प्रमाणे छान माहिती सा॑गितली आहे.

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 5:55 am | विसोबा खेचर

क्या बात है रंगा!

अरे तुझ्यामुळेच आम्हाला अश्या कलंदर बुद्धीबळपटूंची ओळख होते आहे!

पॉलसाहेबांना आपला सलाम...

आपला,
(नेहमी हारणारा) तात्या.

धनंजय's picture

6 Jun 2008 - 9:22 am | धनंजय

खेळ बघितले, मजा आली.

मॉर्फी यांची ओळख करून दिल्याबाबत धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2008 - 4:11 pm | भडकमकर मास्तर

छान लेख ...
मजा आली वाचून...
असेच येऊदेत लेख...
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

6 Jun 2008 - 12:05 pm | स्वाती दिनेश

लेख खूप आवडला, अजून असेच अनेक येऊ देत ह्या मास्तरांच्या म्हणण्याशी सहमत.
स्वाती

रामदास's picture

6 Jun 2008 - 10:40 pm | रामदास

भांडवली बाजारात एक धुरंधर ह्या प्रकारच्या खेळ्या करायचे.
हर्षद मेहेताने त्यांना काटशह दिला.
पुढची कहाणी सगळ्यांना माहिती आहे.
अजय क्यान अजूनही आहे.

चतुरंग's picture

6 Jun 2008 - 10:47 pm | चतुरंग

भांडवली बाजारात एक धुरंधर ह्या प्रकारच्या खेळ्या करायचे.

म्हणजे नेमके काय? प्रतिसाद नीटसा समजला नाही.
थोडे अधिक विश्लेषण आवडेल.

चतुरंग

वरदा's picture

6 Jun 2008 - 11:41 pm | वरदा

किती अभ्यासपुर्ण आहे..
तुमच्यामुळे किती नवीन बुद्धीबळपटूंची ओळख होतेय्...अजुन येऊ द्या....

चकली's picture

6 Jun 2008 - 11:42 pm | चकली

असामान्य लोकांविषयी वाचायला आवडते.

चकली
http://chakali.blogspot.com

लिखाळ's picture

7 Jun 2008 - 3:45 pm | लिखाळ

बुद्धीबळपटुंविषयीचे माहितीपूर्ण लेख वाचायला आवडत आहेत. अजून अशीच ओळख करुन द्या...
थेवटच्या परिच्छेदात जी माहिती आहे ती अजूनही जास्त विस्ताराने द्यावी. खेळ समजण्यास त्याचा उपयोग होईल.
सुंदर लेख.
--लिखाळ.

नंदन's picture

7 Jun 2008 - 7:51 pm | नंदन

म्हणतो. लेख आणि संबंधित दुवे आवडले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रशांतकवळे's picture

7 Jun 2008 - 6:08 pm | प्रशांतकवळे

खरच सुंदर,

तुमच्या मुळे नवीन नवीन जगज्जेत्यांची ओळख होतेय..

अजुन येऊ द्या

प्रशांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2008 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरच सुंदर,

तुमच्या मुळे नवीन नवीन जगज्जेत्यांची ओळख होतेय..

अजुन येऊ द्या

छोटा डॉन's picture

7 Jun 2008 - 6:40 pm | छोटा डॉन

दरवेळी तुमचे लेख वाचतो पण त्यावर प्रतिक्रीया काय द्यावी हे समजत नाही ....
"बुद्धीबळा" इतका रस मला अजून कुठल्या खेळात नाही ....

आपण जे लेख देता व खास करुन त्याबरोबर असणारे गेम्सचे दुवे म्हणजे "सिंपली ग्रेट " ...
अशीच नव्या नव्या खेडाळूंची माहिती करुन द्या व शक्य सतील तर त्यांच्या प्रसिद्ध गेम्सच्या दुव्यांची संख्या वाढवा ...

मला भविष्यात "बॉबी फिशर, वासीली इवानचुक, विश्वनाथन आनंद, क्रॅमनीक " यांच्याबद्दल वाचायला आवडेल ...
"बॉबी फिशर" म्हणाजे त्याकाळची जिवंत अख्यायीका ...

असो. लगे रहो ... आम्ही वाचतो आहोत ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग's picture

7 Jun 2008 - 8:22 pm | चतुरंग

आपल्या सर्वांच्या भरभरुन प्रतिसादाने पुढे लिहीत राहण्याची इच्छा प्रबळ आहे.
सध्याचे नामवंत खेळाडू जवळपास बर्‍याचजणांनी ऐकलेले असतात त्यामुळे आधी काही पूर्वीचे, विस्मृतीत गेलेले, अनवट खेळाडू दाखविण्याचा प्रयत्न राहील.
त्यानंतर सध्याचे प्रसिद्ध खेळाडू घेईन. शोध सुरु आहे. लिहित राहीनच.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!

चतुरंग