सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

दिलीप प्रभावळकरांचा !

Primary tabs

दिपोटी's picture
दिपोटी in जनातलं, मनातलं
22 Nov 2011 - 5:02 pm

गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक आणि रंगभूमीला दिलेल्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार या दोन अत्यंत मानाच्या पुरस्कारांपाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते-लेखक श्री दिलीप प्रभावळकर यांना आता त्यांच्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी गेल्या सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या अभिनयकारकीर्दीचा घेतलेला हा धांडोळा ... नोव्हेंबर २०११ मध्ये प्रसिध्द झालेल्या 'हितगुज'च्या २०११ दिवाळी अंकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर काही दिवसांपूर्वी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व याच वर्तमानपत्राच्या मुंबई-पुणे शहर आवृत्त्यांत संक्षिप्त रुपात छापला गेला आहे. प्रभावळकरांच्या प्रतिभेला सलाम ठोकण्यासाठी लिहिलेला हा लेख पूर्ण स्वरुपात 'मिपा'च्या वाचकांसाठी येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.
--------------------------------------------------------------------------

'सुयोग' प्रकाशित व 'नाट्यसुमन' निर्मित 'वा गुरु!' या नाटकाचा प्रयोग पहाण्याचा योग नुकताच जुळून आला. नाटकाच्या जाहिरातीत 'सुयोग' या नाट्यसंस्थेबरोबरच लेखक चंद्रशेखर फणसळकर व दिग्दर्शक विजय केंकरे अशी नावे पाहून नाटकाच्या दर्ज्याविषयी जी एक अटकळ वा अपेक्षा एकंदरीत मनाशी बांधली-ठेवली होती, तिला व्यवस्थित खतपाणी घालून न्याय देण्याची चोख कामगिरी नाटकातील इन-मीन-चार कलाकारांनी फारच इमानेइतबारे पार पाडली. फार दिवसांनी एक उत्तम व नेटका नाट्यप्रयोग पहाण्याचा पुरेपूर आनंद मिळाला. मिच आल्बम नामक अमेरिकन लेखकाच्या 'ट्युसडेज् विथ मोरी' या गाजलेल्या सत्यकथेवर या नाटकाचे कथानक आधारले आहे. समाजशास्त्राचा एक निवृत्त व वयोवृध्द प्राध्यापक व त्यांचा एक आवडता जुना विद्यार्थी यांच्यात प्रदीर्घ कालावधीनंतर परत एकदा होणार्‍या नियमित भेटीगाठी आणि या गुरु-शिष्याच्या गप्पांतून जीवनातील वेगवेगळ्या अनुभवांवर-विषयांवर होणार्‍या प्राध्यापक-महाशयांच्या कधी मिश्किल तर कधी गंभीर अशा टिप्पणी असा या कथानकाचा विषय आहे. 'देमार' विनोदी मराठी नाटकांच्या सद्य लाटेच्या पार्श्वभूमीवर या नाटकाचा हा विषय काहीसा 'हटके' वाटला तरी प्रारंभापासूनच प्रेक्षकाला गुंतवून-खिळवून ठेवण्यात लेखक, दिग्दर्शक व कलाकार कमालीचे यशस्वी ठरले आहेत.

एका अतिदुर्धर आजारामुळे सदैव व्हीलचेअरला जखडलेल्या व मृत्यूची स्पष्ट चाहूल लागूनही येणार्‍या प्रत्येक दिवसाला प्रसन्नपणे सामोरे जाणार्‍या प्राध्यापक सप्रे यांच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर या गुणी अभिनेत्याने अतोनात रंग भरला आहे. एकीकडे प्रकृती हळूहळू ढासळत असल्यामुळे दिवसागणिक अंत जवळ येणे व दुसरीकडे या आपल्या शिष्याची छोट्या-छोट्या गोष्टींत जगण्यातील आनंद घेण्या-शोधण्याची शिकवणी हसतखेळत चालू ठेवणे या दोहोंतील विरोधाभासी छटा त्यांनी एकदम समरस होऊन रंगवल्या आहेत. मृत्यूनंतर होणार्‍या शोकसभेत होणारी स्तुतीपर भाषणे मृत व्यक्तीस कधीच ऐकायला मिळत नाहीत म्हणून उत्साहाने आपल्या हयातीतच आपली शोकसभा आयोजित करणार्‍या या अचाट प्राध्यापकाची एकंदरीतच अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची जिद्द व प्रसन्न सकारात्मक विचारप्रणाली भावून जाते. विद्याधर पै या विद्यार्थ्याच्या भूमिकेत अतुल परचुरे हा कलाकार देखील तितक्याच समर्थपणे व प्रभावीपणे तोडीस तोड उभा राहिला आहे. नोकरी-व्यवसायातील कामाच्या धबडग्यात जगणेच विसरुन गेलेला व त्यामुळे तयार झालेला गुंता-तिढा सोडवून त्यातून बाहेर येऊ पहाणारा आजच्या तरुण पिढीचा प्रतिनिधी या नटाने मोठ्या ताकदीने व आत्मविश्वासाने साकारला आहे. गिरीजा काटदरे व पूर्णिमा तळवलकर या दोन सहअभिनेत्रींनी सुध्दा संहितेला व एकूणच प्रयोगाच्या आखीव-रेखीव प्रवाहाला कोणतीही बाधा न आणता उत्तम साथ दिली आहे. 'सुयोग'चा आजवरचा इतिहास पहाता प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना व अशोक पत्की यांचे पार्श्वसंगीत या दर्जेदार नाटकाला साजेसे व पूरक नसते तरच नवल!

हा देखणा नाट्यप्रयोग पहाताना प्रभावळकरांच्या अभिनयक्षमतेचं कौतुक वाटल्यावाचून रहावत नाही. कोणत्याही अभिनेत्याला हेवा वाटावा अशी या रंगकर्मीची गेल्या कित्येक वर्षांची दमदार वाटचाल राहिली आहे. त्यांचा 'चिमणराव' पाहिलेला कोणता अस्सल मराठी माणूस ही अविस्मरणीय मालिका विसरेल? चिमणराव-गुंड्याभाऊ या जोडगोळीबरोबरच काऊ, मोरु, मैना, राघू या सर्वांनी उडवलेली मनसोक्त धमाल आजही कित्येकांच्या मनात कोरली गेली असेल. मात्र चिंवि जोश्यांच्या मूळ पुस्तकांइतकीच प्रचंड व उदंड लोकप्रियता लाभलेल्या या मालिकेमुळे फक्त विनोदी कलाकाराचाच शिक्का आपल्यावर बसू नये म्हणून त्यानंतर स्वीकारलेल्या-साकारलेल्या भूमिका कोणत्या प्रकारच्या असाव्यात यावर त्यांनी कटाक्षाने नियंत्रण ठेवल्याचे दिसून येते. मतिमंद मुलाच्या - बच्चूच्या - भवितव्याच्या काळजीने ग्रस्त असलेला व त्यासाठी चार पैसे गाठीशी असावेत म्हणून स्वतःची सर्व हौस-मौज दडपून दिवसरात्र फावल्या वेळात केवळ टाईपरायटर बडवणारा 'नातीगोती'मधील केविलवाणा बाप काटदरे, पोरांच्याच नव्हे तर थोरांच्याही छातीत धडकी भरवणारी 'अलबत्या गलबत्या'तील कपटी व दुष्ट कारस्थानी चेटकी, पुनरुज्जीवित 'बटाट्याची चाळ'मधील तर विक्षिप्त सोकाजीराव त्रिलोकेकर व धांदरट कोचरेकर मास्तरांसकट विविध चाळकरी, 'सूर्याची पिल्ले'तील फकीर-छाप कलंदर विरक्त ब्रम्हचारी डॉ रघुराया, 'एक हट्टी मुलगी' मधला बेधडक व बिनदिक्कत राजरोस फसवणारा तात्या, 'एक झुंज वार्‍याशी' मधला शोषितांवरील अन्यायाविरुध्द व सत्यासाठी प्रस्थापित सत्तेशी एकहाती लढणारा निनावी सामान्य माणूस, 'संध्याछाया' मधला परदेशस्थ मुलाच्या आठवणी काढत जगणारा वृध्द नाना, 'कलम ३०२'मधला पक्का धूर्त व खलनायकी प्रवृत्तीचा नायक, 'अप्पा आणि बाप्पा'मधील विक्षिप्त अप्पा - अशा कित्येक वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारल्या आहेत. भूमिकेचा गाभा व आवाका समजावून घेऊन आणि त्या भूमिकेत अक्षरशः शिरुन त्यातील सूक्ष्म बारकाव्यांनिशी व लकबींसह प्रत्येक व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. खरं तर नाटकाच्या प्रयोगानंतर या अशा आव्हानात्मक भूमिकांमधून बाहेर पडून 'दिलीप प्रभावळकर' या आपल्या स्वतःच्या 'भूमिके'चं बेअरिंग सापडणंच त्यांना त्यांच्या अभिनयकारकीर्दीतील आरंभकाळात कठीण होत असे अशी त्यांची नोंद सुध्दा वाचल्याचे आठवते.

'हसवाफसवी' या त्यांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या नाटकातील सहा बहुरंगी व विविधढंगी भूमिकांमधून तर या बहुरुपी कलावंताच्या अभिनयाविष्काराला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते. सोललेल्या कोंबड्यांचा इरसाल व्यापारी नाना पुंजे ते बसक्या डोळ्यांचा चिंगपाँग देशाचा राजपुत्र ते अगदी दीप्ती प्रभावळकर-लुमुंबाचा स्त्रीपार्ट अशा सहा पूर्णतः भिन्न व्यक्तीरेखा साकारुन त्यांनी उभ्या नाटकवेड्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. यातील कृष्णराव हेरंबकर ही शेवटची भूमिका म्हणजे तर या सहा भूमिकांतील कळस असे म्हणायला हरकत नाही. बोळक्या तोंडाचा-ओठांचा चंबू, अतिजाड भिंगांचा चष्मा, डोक्यावर काळी टोपी, धोतर-कोट अशा आपल्या वेषभूषे-केशभूषेमधूनच नव्हे तर आपल्या जिवंत अभिनयशैलीतूनसुध्दा आपल्या सर्वांच्याच रोजच्या परिचयातील एखादे वयस्कर आजोबा - त्यांच्या पूर्ण ढबी-लकबींसह - या तरुण कलावंताने आपल्या डोळ्यांसमोर हूबेहूब उभे केले होते. यावरुन पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा एक किस्सा आठवला तो असा - 'नाट्यदर्पण रजनी'चा कार्यक्रम ऐन रंगात आला होता. षण्मुखानंद सभागृह तुडुंब भरले होते. मध्यंतर होण्याआधी सूत्रधाराने 'आज हा कार्यक्रम बघायला आपल्यामध्ये संगीत नाटकांतून गेली कित्येक वर्षे रंगसेवा केलेले वयोवृध्द गायक-नट कॄष्णराव हेरंबकर आले आहेत, त्यांचा सत्कार करणार आहोत' असे निवेदन केले. थोड्याच वेळात प्रेक्षकांतून काठीचा आधार घेत-घेत व दोन तरुण मुलींच्या सहाय्याने कृष्णराव हेरंबकर विंगेतून हळूहळू मंचावर आले. शाल-श्रीफळ प्रदान समारंभ झाल्यानंतर व श्रीफळ चक्क हलवून-तपासून पाहिल्यानंतर कृष्णरावांनी 'आजकाल पूर्वीसारखा आवाज लागत नाही हो' असे म्हणून शेवटी सूत्रधाराच्या आग्रहाखातर आपल्या कातर स्वरात 'प्रिये पहा'च्या चार ओळी गाऊन दाखवल्या. खाली प्रेक्षकांत परत जाताना जयवंत वाडकर व विजय पाटकर ही तरुण जोडगोळी आधारासाठी आली असता त्या दोघांकडे किलकिल्या नजरेने बघत कृष्णरावांनी 'थोड्या वेळापूर्वी होत्या त्या मुली कुठे गेल्या?' असा कापर्‍या आवाजात हळूवार प्रश्न केला. नंतर 'नाहीतर नको, मी एकटा जातो' असे ते म्हणताक्षणी सभागृहात उडालेला प्रचंड हास्यकल्लोळ आजही कानात घुमतो आहे. हे हेरंबकर आजोबा म्हणजे तेव्हा नुकतेच प्रसिध्द झालेले 'चिमणराव' प्रभावळकर होते हे या प्रसंगापूर्वी वा नंतरही कित्येक प्रेक्षकांच्या ध्यानात लगेच आले नाही ही प्रभावळकरांच्या अभिनयकौशल्याला मिळालेली दाद वा पावतीच समजायला हवी. हेरंबकर या त्यांनीच निर्मिलेल्या-कल्पिलेल्या पात्राचा जन्म हा असा या कार्यक्रमात झाला.

मतकरी-दळवी-तेंडुलकर-एलकुंचवार यांच्यासारखा एखादा प्रतिभावान व सिध्दहस्त नाटककार, चंद्रकांत कुलकर्णी - वामन केंद्रे - विजय केंकरे यांच्यासारखा एखादा कल्पक सृजनशील दिग्दर्शक आणि नाटककाराने चितारलेल्या व दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेल्या व्यक्तिरेखेचा प्रत्येक पैलू मायबाप प्रेक्षकांसमोर नेमका मांडण्यासाठी प्रभावळकरांसारखा एखादा अभिजात व कसलेला अभिनेता असा त्रिकोणी योग साधल्यावर नाटकाचा दर्जा उंचावतो यात शंका नाही. कित्येक भाविक नाट्यरसिकांसाठी तर एखाद्या प्रसन्न रविवार दुपारी एखाद्या जवळच्या नाट्यमंदिरात रंगदेवतेची मनोभावे आराधना करणार्‍या प्रभावळकरांसारख्या रंगभूमीच्या पुजार्‍याचं – तिकीट काढून का असेना - भक्तिभावाने घेतलेलं 'दर्शन' हे एखाद्या मंगळवारी सिध्दीविनायक गणपतीच्या अथवा शनिवारी पिकेट रोडच्या मारुतीच्या घेतलेल्या दर्शनाइतकंच मंगलमय व आनंददायी ठरत आलं आहे. 'अलबत्या गलबत्या' सारखं बालनाट्य असो, 'आरण्यक' सारखं मुक्तछंदी प्रायोगिक नाट्य असो, 'नातीगोती' किंवा 'संध्याछाया' यासमान हृदयस्पर्शी नाटक असो, अगदी 'पळा पळा कोण पुढे पळे तो' वा 'वासूची सासू' सारखा एखादा धमाल फार्स असो किंवा 'कलम ३०२' सारखा थरारक थ्रिलर असो - रंगभूमीवरील अपार प्रेमाने व श्रध्देने आलेल्या कोणत्याही नाट्यभक्ताला या नटश्रेष्ठाने रंगमंदिरातून कधी निराश करून विन्मुख परत पाठवलं नाही.

सर्वसाधारण व्यक्तीमत्वावर असाधारण अभिनयशैलीने मात केल्याची अशी इतर उत्तम उदाहरणे फार कमी सापडतील. वाचिक अभिनय हा प्रभावळकरांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक विशेष. आवाजाची पट्टी, संवादांची फेक वा प्रोजेक्शन, भूमिकेच्या गरजेनुसार खर्जातल्या आवाजापासून ते थेट संयत-संयमित नि:शब्द पॉजपर्यंत केलेली व्हेरिएशन्स्, शब्दांना-संवादांना दिलेलं महत्त्व, संवादांची सांभाळलेली लय, अचूक शब्दोच्चार, उत्तम टायमिंग - या सर्वांचा त्यांच्या आजवरच्या भूमिका परिणामकारक व्हायला मदत झाली आहे. भूमिका निवडताना त्यातील वैविध्यावर - आणि खरं तर वैचित्र्यावर देखील - दिलेला भर हा दुसरा विशेष. अगदी सरळसोट भोळा-भाबडा मध्यमवर्गीय व कुटुंबवत्सल सामान्य माणूस - जणू आरके लक्ष्मण यांचा 'कॉमन मॅन' - ते थेट एखादा बेरकी पाताळयंत्री खलनायक वा बनेल मुरब्बी राजकारणी अशा विविध व प्रसंगी सर्वस्वी परस्परविरोधी भासणार्‍या पात़ळ्यांतून त्यांचा सहज व मुक्त संचार होत आला आहे. नोव्हेंबर १९९७ मध्ये 'मुखवटे आणि चेहरे' सादर करण्यासाठी झालेल्या त्यांच्या ऑस्ट्रेलिया-भेटीत त्यांच्यातील अव्वल अभिनेत्याबरोबरच त्यांच्यातील एक अत्यंत साधा, अहंकाराचा लवलेशही नसलेला व जमिनीवर भरभक्कमपणे पाय रोवून असलेला माणूसही येथील त्यांच्या चाहत्यांना दिसला.

अभिनयाच्या व साहित्याच्याही क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार, राष्ट्रीय पारितोषिक, पु.ल. बहुरुपी सन्मान, विष्णुदास भावे गौरव पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, चिंतामणराव कोल्हटकर स्मृती पुरस्कार, कित्येक महाराष्ट्र राज्य पुरस्कार व नाट्यदर्पण मानचिन्हे, मटा सन्मान असे अगणित मानाचे पुरस्कार-सन्मान-किताब मिळवून सुध्दा हा ज्येष्ठ व चतुरस्त्र नाट्यधर्मी चाळीस वर्षांच्या अखंड व प्रदीर्घ रंगसेवेनंतर आजही नवनव्या भूमिका पूर्वी इतक्याच जोमाने करताना व त्यातील नवनवीन बारकावे तितक्याच उत्साहाने शोधताना आढळतो.

कालच्या 'दूरदर्शन'साठी गुंफलेल्या 'गजर्‍या'तील विविध प्रहसनांतून वा आजच्या 'श्रीयुत गंगाधर टिपरे'मधील आबा या लोकप्रिय भूमिकेद्वारे छोट्या पडद्यावर, तर 'चौकट राजा'मधील मतिमंद तरुण नंदू किंवा 'सरकारनामा'तील महत्वाकांक्षी मंत्री अण्णा सावंत अशा कित्येक भूमिकांमधून मराठी चित्रसृष्टीमध्ये आणि 'एन्काउन्टर - द किलिंग' मधील विलक्षण पुनप्पा आवडे, 'मुन्नाभाई'मधील गांधी वा 'सरकार राज'मधील रावसाहेब या व अशा इतर बर्‍याच व्यक्तीरेखांद्वारे हिंदी चित्रसृष्टीत पोहोचून झेंडा रोवल्यावर सुध्दा या कलाकाराचा जीव मात्र शिवाजी, दीनानाथ, बालगंधर्व वा तत्सम एखाद्या नाट्यगृहाच्या रंगमंचावरच सुखावतो असे निश्चितच प्रकर्षाने जाणवते. अशा कित्येक नाटक-मालिका-चित्रपटांत उत्तम अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणार्‍या या मराठी रंगभूमी-चित्रसृष्टीच्या अनभिषिक्त सम्राटाला तमाम प्रेक्षकवर्गातर्फे सलाम! आजच्या या मुखवट्यांच्या जगात एक हाडाचा सच्चा कलावंत म्हणूनच नव्हे तर एक दिलाचा सच्चा माणूस म्हणून देखील मराठी मनाशी नातं जोडणारा हा दिलीप आता फक्त प्रभावळकरांचा राहिला नसून अवघ्या महाराष्ट्राचा - वा महाराष्ट्रीयांचा - झाला आहे असे कोणी म्हणाल्यास वावगे ठरु नये.

--------------------------------------------------------------------------
छायाचित्रे सौजन्य : केदार प्रभावळकर

नाट्यचित्रपटलेखआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

लेख जमून आलाय.
चिमणराव काही बघण्यात आले नाही. ते प्रसारित व्हायचे तेव्हा अगदिच लहान होतो.

मदनबाण's picture

22 Nov 2011 - 5:26 pm | मदनबाण

सुंदर लेख...
दिलीप प्रभावळरांनी साकारलेल्या कोणत्या भूमिका जास्त आवडल्या असे जर मला विचारले तर त्याला माझ्याकडे उत्तर नाही...कारण सर्वच भूमिका या अवलिया कलाकाराने उत्तम वठवल्या आहेत. :)
मला त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची एकदा संधी मिळाली होती,कोल्हापुरच्या शालिनी सिनेटोन या चित्रपट नगरीत त्यांना व निळु फुले यांना भेटता आले होते.त्या वेळी सांगलीला नाटकाचा प्रयोग करण्यासाठी दिलीप प्रभावळकर निघाले होते...त्यावेळी पटकन भेटुन त्यांची स्वाक्षरी मी घेतली होती...पण ते पुस्तक कुठे तरी हरवले, कायमचे ! :(

दत्ता काळे's picture

22 Nov 2011 - 5:25 pm | दत्ता काळे

दिलीप प्रभावळकरांना "बहुढंगी भूमिकांचा बादशहा" असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आजन्म स्मरणात राहील असा चिमणराव आणि 'हसवाफसवी'तली सगळीच पात्रे हे त्यांच्याखेरीज दुसरा कुणीही नट ताकदीने करु शकेल असे वाटतच नाही. त्यावर त्यांचा कायमचा ठसा आहे.

वसईचे किल्लेदार's picture

22 Nov 2011 - 5:51 pm | वसईचे किल्लेदार

हसवाफसवी ची आठवण करुन दिलीत हो.
आता परत पहावा लागणार ना ... हं हे घ्या ... ईथे पहा.

मिळेल त्या भुमिकेच सोनं करणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे दिलीप प्रभावळकर.
चिमणरावांपासुन त्यांना आजतागत पहात आलोय. टिपरे बंद झाली तेव्हा फार हळहळ वाटली होती.
टिनपाट मालिकांच्या वाळवंटात आबा टिपरे हे एक मृगजळ होतं.

लेख आवडला हे वे सां न ल.

दादा कोंडके's picture

22 Nov 2011 - 8:39 pm | दादा कोंडके

मिळेल त्या भुमिकेच सोनं करणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे दिलीप प्रभावळकर.

असेच म्हणतो. हसवाफसवीची तर पारयणं केली आहेत. पुर्वी साळसुद म्हणून एक मालिका लागायची. त्यात प्रभावळकरांनी खतरनाकच काम केलं होतं. गंगाधर टिपरे मधे सुद्धा अगदी साधी कौटुंबिक कथानक पण त्यांनी सुंदर फुलवलं होतं.

प्रचेतस's picture

22 Nov 2011 - 9:39 pm | प्रचेतस

श्री. ज. जोशी लिखित साळसूद जबरीच होती. दिलीप प्रभावळकरांनी त्या भूमिकेचे अक्षरशः सोने केलेय. लुबाडणूक करणारा इरसाल म्हातारा सहीच रंगवलाय

सुहास झेले's picture

23 Nov 2011 - 3:10 am | सुहास झेले

मिळेल त्या भुमिकेच सोनं करणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे दिलीप प्रभावळकर.

उत्तम लेख... खूप खूप आवडला :) :)

प्यारे१'s picture

23 Nov 2011 - 10:28 am | प्यारे१

दिलीप प्रभावळकर ग्रेटच.
साळसूद अक्षरशः चीड आणायचा.
'कोण कुणास्तव जगतो मरतो...' असं काहीसं शीर्षकगीत.
अनुदिनी लोकसत्ता मधे येत होती तेव्हापासूनच आवडायला लागलेली.

इतर बर्‍याच भूमिका चांगल्याच आहेत.
माणूस म्हणूनही खूप चांगले.

अभिनंदन आणि शुभेच्छा....!

अन्या दातार's picture

22 Nov 2011 - 6:50 pm | अन्या दातार

मस्त लेख. खेळियाच्या कारकिर्दीचा आढावा घेणे हे काही सोपे काम नक्कीच नाही. आपण हे आव्हान चांगले पेललेत.

लेख झक्कास ..

पैसा's picture

22 Nov 2011 - 7:39 pm | पैसा

प्रभावळकरांच्या कारकीर्दीचा झक्क आढावा घेतलाय. एकापाठोपाठ एक असे हे ३ ही पुरस्कार अगदी योग्य माणसाला मिळाले आहेत यात काय संशय!

लेख आवडला.
मी प्रभावळकरांची जबदस्त फ्यान आहे.

५० फक्त's picture

22 Nov 2011 - 9:44 pm | ५० फक्त

जबरा, चिमणराव हे पुस्तक मालिका बघुन लिहिलं आहे अशी शंका यायची, कारण मालिका लागायची तेंव्हा पुस्तकं वाचण्याएवढी अक्कल नव्हती.

मराठे's picture

22 Nov 2011 - 10:02 pm | मराठे

'झोपी गेलेला जागा झाला' ही मालिका लागायची त्यातही दिलीप प्रभावळकरांनीच काम केलं होतं ना? मी फारच लहान होतो त्यामुळे आठवत नाही. ह्या सगळ्या जुन्या मालिका दूरदर्शनने उपलब्ध करून दिल्या तर शेकडो लोकांचा दुवा मिळवतील.

विशाखा राऊत's picture

22 Nov 2011 - 10:16 pm | विशाखा राऊत

खुप छान लिहिले आहे. एकदम झक्कास

'सरकार राज' मधील अण्णा हजारे

चतुरंग's picture

23 Nov 2011 - 7:17 am | चतुरंग

'साहित्य अकादमीचा बाल साहित्य' पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप प्रभावळकरांचे अभिनंदन!

'चिमणराव' ह्या पात्राकरवी दिलीप प्रभावळकरांशी पहिली ओळख झाली ती टिपरे आजोबांपर्यंत कायम घट्ट होत गेली. अतिशय ताकदीचा अभिनेता असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत ते स्वत:ची सिग्नेचर सोडतात. अतिशय निगर्वी, प्रसिद्धीपराड्मुख आणि साधे असे व्यक्तिमत्व आहे.
मी त्यांचा फ्यान आहे. आता 'वा गुरु!' हे नाटक बघायची उत्सुकता लागून राहिली आहे.

(चिमणरावप्रेमी) रंगराव

साबु's picture

23 Nov 2011 - 9:42 am | साबु

'साहित्य अकादमीचा बाल साहित्य' पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप प्रभावळकरांचे अभिनंदन!

अतिशय साधे व्यक्तिमत्व..
छक्के - पन्जे, एक डाव भुताचा, सररकारनामा,रात्र-आरम्भ, झपाटलेला मधील तात्या विन्चु, हसवा-फसवी, वासुची सासु, चौकट राजा... अशी कितीतरी नावे आहेत... एकदम बेश्ट काम केलय त्यानी.

- मी त्यांचा फ्यान आहे. आता 'वा गुरु!' हे नाटक बघायची उत्सुकता लागून राहिली आहे.
असेच म्हणतो...

अमोल केळकर's picture

23 Nov 2011 - 10:01 am | अमोल केळकर

मस्त लेख
रोज सकाळी ७.३० वाजता नियमीत टिपरे अजोबांचे दर्श्न अजुनही झी मराठीवर होते :)

अमोल केळकर

उदय के'सागर's picture

23 Nov 2011 - 4:56 pm | उदय के'सागर

दिलिप प्रभावळकर - एक देव माणुस, कलेचा साक्षात दैवी अवतार. 'बोक्या सातबंडे' ह्या पुस्तक मालिकेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन!

'बोक्या सातबंडे' ह्या दुरदर्शन मालिकेचे संग्रहित व्हिडीओ कुठे मिळतील का?

चैतन्य दीक्षित's picture

23 Nov 2011 - 6:43 pm | चैतन्य दीक्षित

लेख छान जमला आहे.

शीर्षक तेवढं 'कम्प्लीट' लिहा की हो.
दिलीप प्रभावळकरांचा काय?

अहो चैतन्य ते शीर्षक "कम्प्लीट" च आहे.

त्यांनी ते "प्रभावळकरांचा दिलीप" ह्या अर्थाने पण जरा वेगळ्या पद्धतीने लिहीलं असावं. जर ते "दिलीप, प्रभावळकरांचा!" असं लिहीलं असतं (मधे स्वल्पविराम) तर असं "कन्फ्युजन" झालं नसतं कदाचीत.

दिपोटी's picture

24 Nov 2011 - 3:44 pm | दिपोटी

चैतन्य दीक्षित,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

वर अधाशी उदय यांनी लिहिल्याप्रमाणे हे शीर्षक पूर्णच आहे. थोडाशी गंमत म्हणून शीर्षक तसं थोडं संदिग्धच ठेवलं ... वाचकांना थोड्या संभ्रमात पाडावं, थोडी त्यांच्या विचारांना चालना द्यावी असा थोडा काहीसा हेतू होता.

सरळ गद्यात वाचलं तर 'दिलीप प्रभावळकरांचा' हे अपूर्ण वाटतं, पण थोडंफार पद्यमय करुन वाचलं तर 'प्रभावळकरांचा दिलीप' ला फिरवून 'दिलीप प्रभावळकरांचा' असंही वाचता येईल (poetic liberty?).

आता, उदाहरणार्थ, तुम्ही 'गोष्ट जन्मांतरीची' या नाटकाच्या नावाला 'गोष्ट जन्मांतरीची काय?' असा प्रश्न विचारीत नाही - तर तसेच आहे. मान्य की मा॑झ्या या लेखाच्या शीर्षकात घोळ होण्याचा संभव अर्थात जास्त आहे, परंतु - वर लिहिल्याप्रमाणे - तो संभव हेतु:पुरस्सर तसाच ठेवला आहे. तसेच 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाचे नाव 'गोष्ट, छोटी डोंगराएवढी' असेही लिहिता येईल, पण माझ्या मते असे केल्यास त्यातील लय निघून जाते.

- दिपोटी

सुधांशुनूलकर's picture

23 Nov 2011 - 6:55 pm | सुधांशुनूलकर

लेख मस्त जमलाय. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणं हे काही सोपं काम नाही. तुम्ही ते छान केलंय. मिपावर हा धागा टाकल्याबद्दल आभार.

माझेही अत्यंत आवडते कलावंत. नातीगोतीमधले काटदरे, चौकट राजामधला नंदू, वासूची सासू आणि नाना पुंजे-कॄष्णराव हेरंबकर हे आपल्या डोक्यात फिट्ट बसलेले..... अविस्मरणीय ! 'फिनिक्स' या चित्रपटातही त्यांची भास्करची भूमिका सुंदर आहे, हा चित्रपटगृहात फारसा प्रदर्शित झाला नाही.

त्यांच्या सर्व भूमिकांमधे त्यांनी आपला चेहरा अनेक प्रकारे बदलला आहे. प्रत्येक भूमिकेचा सखोल अभ्यास करून त्या भूमिकेचं सोनं केलं. त्यामुळे कोणत्याही भूमिकेत ते 'दिलीप प्रभावळकर' कधीच वाटत नाहीत, तर त्या भूमिकेतलं पात्रच असतात.

मी-सौरभ's picture

23 Nov 2011 - 8:12 pm | मी-सौरभ

मराठी कलावंतांमधला एक चतुरस्त्र आणि तुलनेने कमी प्रसिद्ध अश्या या कलावंताची पुर्ण कारकीर्द फार व्यवस्थित मांडली आहे.

साळसूद मधली त्यांची 'अरे क्रिष्णा' ही हाक अजूनही कानात रेंगाळतेय...

मोहनराव's picture

23 Nov 2011 - 8:29 pm | मोहनराव

लेख खुप आवडला!!
दिलीप प्रभावळकरांची कोणतीही केलेली भुमिका अतुलनीय आहे. आजही त्यांची टिपरे मालीका फार आवडीने पाहतो. हसवाफसवी नाटक तर आपले ऑल टाईम फेवरेट आहे.

दिपोटी's picture

25 Nov 2011 - 3:55 pm | दिपोटी

सर्व प्रतिसादकर्त्यांना मनापासून धन्यवाद!

- दिपोटी