एक हे विश्व, शून्य हे विश्व

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
16 Nov 2011 - 2:06 am

विश्व आहे कांद्यासारखे. त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते.

शून्य
कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही.
गाभा शोधायला गेले, तर कांदा असा नसतोच. म्हणजे "कांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. शून्य कल्पनेकरिता असलेला शब्दही शून्य. कांद्यासारखी कुठलीही गोष्ट घेतली, तरी असेच दिसते. "धनंजय"ची टोपी उतरवल्यावर राहातो तो "धनंजय". त्याचे केस कापल्यावर केस जातात केरात, राहातो तो "धनंजय". त्याचा श्वास आत-बाहेर होतो. बाहेर गेलेल्या श्वासाचा हिशोब खलास - मागे उरतो तो "धनंजय". अपघातात हात-पाय गमावले, तर हात-पायांचे सोडावेच. त्यांच्याविना राहातो तो "धनंजय". हार्ट ट्रान्स्प्लांट करा. मूळचे निकामी हृदय सोडून द्यायचे - राहातो तो "धनंजय". गाढ झोपेत बोलणे आणि विचार करणे ठप्प झाले. ते जाऊ द्या. ते नसतानाही तो "धनंजय". असे एक-एक अवयवाचे बघा. एका-एका विचाराचे बघा. हालचालीचे बघा. कुठलीच जरुरीची नाही. "धनंजय" कल्पनेचा गाभा शून्य आहे. "धनंजय" हे नाव शून्य कल्पनेसाठी आहे.
तर हे विश्व शून्य आहे.

एक
कोणी म्हणेल कांदा सोलायचा तर नाहीच. इतकेच काय, बोट दाखवून म्हटले - "हा घ्या कांदा", तर काहीच कल्पना येत नाही. खायचा कांद्याचा काय आणि निशिगंधाचा कांदा काय आणि फिरतीचा भोवरा काय. कांदा काय ते ज्ञान हवे? तो कुठे असतो, ते बघा. कसा असतो, ते बघा. कांद्याला मुळे असतात, आणि पाती असतात. त्या कळल्याशिवाय कांदा काय ते कळायचे नाही. कांद्याला स्वाद असतो नि रंग असतो. कांद्याचे पदार्थ लक्षात आले, तर मग कांदा कळेल. पण मुळे आणि पाती आणि पदार्थ समजायला हवेत ना? मुळे रुजतात भूमीत. पाती फोफायतात हवेत. शोषतात सूर्याचे तेज. म्हणजे कांदा नीट समजायचा, तर सूर्यमंडळ कवेत हवे. कांद्याचे रायते, कांद्याची फोडणी, व्हिनीगरचे कांदे... समजता समजता सगळे समाजशास्त्र कळायला हवे. कांदा खरोखरचा कळणे म्हणजे अवघे विश्व खरोखरचे कळणे. मग त्या विश्वाचे तुकडे-तुकडे केलेले ते खरे ज्ञान नाहीच. उगाच "कांदा" नाव तरी का द्या? तसेच "धनंजय" समजण्यासाठी सगळे विश्व समजणे भाग आहे.
तर सगळे विश्वच एक आहे.

दोन्ही कसे खरे?
आणि इतक्या संत-महंतांनी "शून्य" किंवा "एक" विचार आपल्याला सांगितला आहे. सांगता-सांगता आपल्याला पटला आहे. तर आपण आयुष्यात "शून्य" किंवा "एक" आचरणात का बरे आणत नाही? थोरामोठ्यांनी, आईवडलांनी समजावून सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. पटत नाहीत तरी आपण तसे वागतो. आणि "शून्य" आणि "एक" हे विचार तर पटतात!

दोन्ही विचारधारांमधली पहिली-पहिली पायरी तितकी अनुभवाने उपयोगाची असते. कधीकधी वस्तू उपयोगात आणण्यासाठी तिचे थोडेसे नकोसे भाग छाटायचे असतात. कधीकधी वस्तू उपयोगात आणण्यासाठी तिचे आजूबाजूचे भागही सामील करून घ्यायचे असतात. न्हाव्याच्या दुकानात माझे वाढून त्रासदायक झालेले केस छाटायचे असतात. केसांबरोबर कान छाटायचे नसतात. सणावारात माझ्याबरोबर कुटुंबालाही छानछान खायला मिळाले तरच मला आनंद मिळतो. पण जगाभराच्या तोंडात गोड पडण्याची वाट बघत नाही.

महत्त्वाचे काय?
कल्पना एकदा छाटून किंवा एकदा जोडून अधिक अर्थपूर्ण झाली, समजा. तर आणखी-आणखी छाटून किंवा जोडून फायदाच होईल का? खात्री नाही. जितपत कातरून-वधारून उपयोगी, तितपत कल्पना बदलावी. त्या उपयोगी कल्पनेला शब्द जोडावा.

बौद्धांच्या शून्यवादापासून वेदांत्यांच्या अद्वैत(एक)वादापर्यंत कितीतरी जणांनी "सोला" किंवा "जोडा" वादांना टोकापर्यंत नेले आहे. परंतु मग काय? आपले मत आपल्या वागण्यात लागू करून दाखवावे लागते. आणि वागणे असेच होते : अनेक व्यक्ती आहेत, अनेक वस्तू आहेत. त्यासाठी सोय करावी लागते. म्हणजे स्वतः सिद्ध केलेल्या सिद्धांताशी तडजोड करावी लागते.

उगाच तो तडजोडीचा व्याप. खरे तर व्यवहारासाठी "विश्व शून्य" किंवा "विश्व एक" असे टोकाशी न जाता उपदेश करता येतो. कपडे-धन-... वगैरे "मी"पासून सोला. किंवा आप्त-राष्ट्र-मानवता... वगैरे "मी"मध्ये जोडा. हे उपदेश व्यवहारात आणता येतात. आणि "विश्व शून्य" विरुद्ध "विश्व एक" या चक्रावणार्‍या वादामध्ये उगाच गुंततही नाही.

अगदी अंतिम सत्य काय आहे? काही दशके सबुरीने वाट बघितली, तर "धनंजय" शून्य होईल किंवा विश्वाशी एक होईल. "शून्य" खरे की "एक" खरे? सध्या त्याचा काही फरक पडत नाही. आणि मग तर सत्यच असेल, प्रश्नच पडणार नाही.

संस्कृतीराहणीविचार

प्रतिक्रिया

अन्यत्र प्रकाशनाचा दुवा.

लेखन आवडले.
कल्पना एकदा छाटून किंवा एकदा जोडून अधिक अर्थपूर्ण झाली, समजा.
तर ती आचरणात्/वापरात आणाण्यास योग्य होईल असे वाटते.
आणखी-आणखी छाटून किंवा जोडून फायदाच होईल का?
ही कालानुरूप केलेली तडजोड असू शकते पण मूळ कल्पनेशी फारकत होवून नवीन कल्पना तयार होवू शकतात आणि त्याच कशा बरोबर आहेत याचे पुरावेही मिळतात्........पण खूप काळाने ताळा जमत नसल्यास मूळ कल्पनेला शोधत जावे लागणार.

आत्मशून्य's picture

16 Nov 2011 - 3:17 am | आत्मशून्य

हे सगूण निर्गूण, यीन यांग, प्लस मायनसच विवेचन बरेच ठीकाणी वाचलयं, तूम्हाला त्यात काय भर घालायची आहे, स्पश्ट झालेलं नाही. असो लेख वैचारीक आहे यात शंका नाही.

(एक शून्य शून्य आवडीने पाहणारा - आत्मशून्य)

तसे नवीन काही नाही. रोजच्या व्यवहाराचेच वर्णन आहे.

पण सगुण-निर्गुण, यीन-यांग यांच्याशी संबंधित नाही. थेट संबंध तरी नाही. (प्लस-मायनस बाबत फारसे ऐकलेले नाही.) अनॅलिसिस विरुद्ध सिंथेसिस (विश्लेषण विरुद्ध संश्लेषण) करून अर्थ ठरवण्याबाबत आहे.

शून्यवादातली किंवा एकवादातली फक्त पहिली पायरी मला पटते, ते लेखात सांगितले आहे. आणि त्या पहिल्या पायरीत अंतर्गत विरोध नाही, हे सांगितले. पायर्‍या पुन्हापुन्हा घेण्याने अंतर्विरोध येतो.

शून्यवाद आणि एकवाद यांच्यातील काय पटत नाही तेसुद्धा सांगितले. लोक टोकाचे वाद जितक्या स्पष्टपणे मांडतात, तितक्या स्पष्टपणे रोजच्या व्यवहाराचे समर्थन आपण ऐकत नाही. म्हणून ते मांडले. नवीन असे काही नाही.

आत्मशून्य's picture

16 Nov 2011 - 4:20 am | आत्मशून्य

लोक टोकाचे वाद जितक्या स्पष्टपणे मांडतात, तितक्या स्पष्टपणे रोजच्या व्यवहाराचे समर्थन आपण ऐकत नाही

रोजच्या व्यवहाराचे समर्थन आपण ऐकत नाही या वाक्याशी सहमत का बरे व्हावे ? किम्बहूना हा आताचा वाद घातल्यानंतरही आपण जेवायला जाणार आहोतच. पोटा-पाण्याचे उद्योग करतोच त्यासाठी भलेबूरे मार्गही वापरतो. हे सगळ "व्यवहार ज्ञानाशिवाय" करतो का ? मग जी गोश्ट ऑब्वीअस आहे, रोजची आहे त्याबद्दल असं कीती बोलायच लिहायच ? आणी समजा जर तेही सारख बोलत राहीलो तर याचीही विरक्ती येतेच की (जास्तच प्रकर्षाने येते) ? म्हणजे रोजच्या व्यवहारात बरबटूनही प्रवास हा पून्हा शून्याकडेच धाव घेतो ना ?

मी जे म्हणालो तो आपला अनूभव असेल (होय नूसतं मान्य करून फायदा नाही, माझा मूद्दा अनूभव म्हणून मान्य असेल तरच अर्थ आहे) तर आता असं समजू की या शून्याकडच्या प्रवासात १० पायर्‍या आहेत (हायपोथेटीकल) तर ९,८,४,५,० अशा वेगवेगळ्या पार्‍यांवरील व्यक्तीचे विचार अनूभव , व ते एक्सप्रेस करणे यात फरक येणारच ना ? पण हा ही मूळ मूद्दा नाहीये. मूळ मूद्दा इतकाच आहे की शून्याबाबत लिखाण होते कारण "एक" बाबत अनासक्ती पून्हा पून्हा उफाळून येते तसं शून्याच होत नाही. मन निराश नसेल समतोल असेल तर या शून्याकडे त्याची धाव घेण्याची आसक्ती/गोडी लागली की ती वाढत जाते, अजून गहन होण्यास पराव्रुत्त करते , इतक की आपल्याला ही गोडी लागली होती याचा विसर पडू लागतो . बस हे असं आहे, म्हणूनच यावर जास्त लिखाण घडतं. व्यवहाराचे समर्थन टाळता येण अशक्य आहेच. पण त्याचा चक्रव्युव्ह नको बनायला. अथवा ९,८,४,५,० नंबरच्या पायर्‍यांवर असणार्‍यांची मतेही व्यवहारीक उदाहरणात नको मिसळायला. कारण यांची जी मते आहेत त्याबाबतची अनूभूती त्यांच्या पायरीवर जाऊन घ्यावी केवळ चर्चेने समोर मांडणे हा एक मनोरंजनाचा भाग आहे असे मी मानतो. मी नीराकार आहे म्हणून सिगारेटचा चटका बसल्यावर हात मागे घेण्यात हशील नाही. त्या नीराकारतेचा असा अनूभव घ्या की चटका जाणवला नाही पाहीजे. पण तो अजून अनूभव आला नाहीये म्हणून त्या नीराकरतेला फोल ठरवणे अथवा हल्ला चढवणेही योग्य वाटत नाही.

धनंजय's picture

16 Nov 2011 - 5:04 am | धनंजय

अनुभव कळणे चांगलेच. धन्यवाद.

चतुरंग's picture

16 Nov 2011 - 7:54 am | चतुरंग

शून्य आणि एकची सांगड व्यवहारातल्या गोष्टींशी घालणे महत्त्वाचे, ती सांगड इथे दिसते आहे. प्रत्येकाचा अनुभवाचा आवाका जसजसा बदलेल त्यानुसार पापुद्रे/जोड कमीअधिक होत जाणार.

(कांदा संस्थानचा राजा) चतुरंग

नगरीनिरंजन's picture

16 Nov 2011 - 8:37 am | नगरीनिरंजन

कल्पना एकदा छाटून किंवा एकदा जोडून अधिक अर्थपूर्ण झाली, समजा. तर आणखी-आणखी छाटून किंवा जोडून फायदाच होईल का? खात्री नाही. जितपत कातरून-वधारून उपयोगी, तितपत कल्पना बदलावी. त्या उपयोगी कल्पनेला शब्द जोडावा.

हे पटले आणि आवडले. तसेही सत्य काय आहे आणि काय दिसते यातही "एकता" असेल की नाही हेही आपल्याला माहित नाही. विश्व शून्य असून एक दिसते आणि काही म्हणतात तसे अनेकही दिसू शकेल. पापुद्रे कोण सोलत बसणार किंवा काय काय जोडत बसणार?

मदनबाण's picture

16 Nov 2011 - 9:36 am | मदनबाण

ह्म्म... चांगली चर्चा चालु आहे...
धनंजरांवांच्या नावावरुन मला गीतेतला हा श्लोक आठवला. !

मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय।मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव॥७- ७॥

अर्थात :---
मुझे छोड़कर, हे धनंजय, और कुछ भी नहीं है। यह सब मुझ से वैसे पुरा हुआ है
जैसे मणियों में धागा पुरा होता है।
संदर्भ:--- श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७वा श्लोक ७वा.

बाकी चर्चा चालु द्या...

अगदी पटले..

यावरुन पुलंचे खालील आठवले..

"तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल !"

पैसा's picture

16 Nov 2011 - 10:37 am | पैसा

सोप्या शब्दात सांगितल्याबद्दल धन्यवाद! मला इतकं माहिती आहे, शून्य आणि एक यांची स्वतःची किंमत खूप कमी, पण १ च्या पुढे शून्य वाढवत गेलं तर फार मोठी संख्या तयार होते.

मदनबाण's picture

16 Nov 2011 - 10:45 am | मदनबाण

ये लगा सिक्स्सर्र ! ;)

शिल्पा ब's picture

16 Nov 2011 - 11:21 am | शिल्पा ब

काय गोंधळ आहे समजलं नाही पण थोडक्यात म्हणजे आपल्यापरीने आनंदाने जगा. आहे त्याचा आनंद घ्या.

तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय?

पु ल देशपांडे :)

एक विचारप्रवर्तक लेख! लेखकाने मांडलेले मत प्रत्येकाला कधी ना कधी आपसुकच कळत असावे अशी अपेक्षा आहे.
पण त्या विचारांना योग्य असे मूर्त स्वरूप या लेखात मिळालेले आहे हे निश्चित.

जग म्हणजे काय? वस्तु म्हणजे काय? पदार्थ म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे काय?
हे आणि असले अनेक प्रश्न पूर्वापार चालत आलेले आहेत आणि आजही त्यांच्या उत्तरांचा शोध सुरूच आहे. कदाचित या प्रश्नांची पूर्ण सत्य उत्तरेच नसतील.
किंवा असली तरी ती मानवी बुद्धीच्या (उत्तरांच्या शोधकर्त्यांच्या) पलिकडे असतील.
जग हे एक आहे (अद्वैत) किंवा जग हे शून्य आहे (बौद्ध) ही बायनरी विचारप्रणाली झाली. पण जग हे दोन्ही धरून या दोहोंमध्ये आणि त्यापलिकडेही आहे.
जसे- एखाद्या संख्यारेषेवर ० आणि १ असतात आणि त्यांच्या दरम्यान, अलिकडे, पलिकडे असंख्य परिमेय आणि अपरिमेय संख्या असतात;
इतकेच काय पण त्या संख्यारेषेच्या प्रतलात आभासी (इमॅजिनरी) संख्यांचीही रेषा असते, या प्रतलावर असंख्य संयुक्त (कॉप्लेक्स) संख्या असतात - तसे.
या जगात फिरणार्‍या, संपर्क माध्यमांतून अनुभवणार्‍या, वाचन करणार्‍या आणि त्याबद्दल विचार करणार्‍या व्यक्तीच्या
शारिरीक आणि मानसिक आवाक्यात येईल तेवढेच आणि तेच त्याचे जग आणि त्याला गवसला तेवढाच त्या जगाचा त्याच्यापुरता अर्थ.

फारतर असे म्हणता येईल की संख्याप्रतलाचा मूळ बिंदू (ओरिजिन) आणि त्या प्रतलाची व्याप्ती त्या व्यक्तीच्या मेंदूपुरती असते.
***

लेखकाचे "काही दशके सबुरीने वाट बघितली, तर..." - हे वाक्य विनोदनिर्मिती करणारे आहे हे नमूद करतो.
काही जणांना मात्र ताबडतोब आणि तयार उत्तर हवे असते, ते त्यांना मिळते की नाही ते माहित नाही पण त्यांच्या डोक्यातले संख्याप्रतल मात्र ताबडतोब नाहीसे होते.