वनराणी..२

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
18 Jan 2011 - 8:42 am

वनराणी १

आज.. काहीतरी विपरीत घडलं. मला उशिर झाला की मातंग ऋषी लवकर आले ध्यान धारणेसाठी?? .. आज झाडलोट करून कुटीमध्ये आले.. तर पाठोपाठ हे ऋषी!!! प्रसन्न चेहरा.. धारदार नाक.. आश्वासक डोळे, जटा पाठीवर सोडलेल्या... विलक्षण तेजस्वी रूप!! माझी कुटी उजळून निघाली. एका भिल्लिणीच्या घरी असा योगी!!! हा योगायोग होता की नशिबाचा भाग?

********************** पुढे..

मी नुसतीच बघत राहिले त्यांच्याकडे. असं वाटतंय की मला माझा मार्ग मिळाला आहे. ती अज्ञात शक्ती म्हणजे हे मुनी तर नव्हेत!! आज.. हो आज.. कार्तिकातली पौर्णिमा आहे. माझ्या कुटीत चंद्र-सुर्य यांचं एकत्रित तेज घेऊन हे मुनी प्रकटले आहेत. त्यांचे डोळे.. इतके अथांग.. काय म्हणायचं असेल यांना..? माझ्यावर कोप तर नसेल झाला यांचा? मी.. मी काय करू.. असं झालं तर.. मी कुठे जाऊ.. धरणी तरी मला आधार देईल का? मला शाप दिला काही तर.... मी.. मी.. काय करू??
अरे.. हे काय मी नुसतीच त्यांच्याकडे बघत उभी आहे.. आणि मुनी.. चक्क माझ्याकडे बघून स्मित करताहेत!! हा भास आहे का??.. यांच्या दिव्य तेजाने माझे डोळे दिपून गेले आहेत..खरंच हे मुनी माझ्याकडेच बघून हसताहेत का? की.. हाही भास आहे?? .. अरे.. हे काय होतंय.. सगळं विश्व माझ्याभोवती फ़िरतं आहे..सगळं धूसर होतंय.. मी कुठे निघाले आहे...? डोळे जड झाल्यासारखे वाटताहेत.. माझा माझ्यावरचा ताबा सुटतो आहे... आणि.. हे काय..मुनी.. कुटी... पायवाट.. झाडलोट... मा' बा'... चंपा.......!

आई गं!! काय पडलं हे थंडगार?? पाणी!! कोणी सांडलं हे?? कुठे आहे मी? कुटी.. माझीच आहे!! मग... मुनीराज!! मी.. मी.. हे काय झालं मला? झोप लागली होती?? की मुर्छा?? तेच तेजस्वी डोळे.. मुनीराजांची प्रसन्न मुद्रा... नक्की काय झालं काहीच कळत नाहीये.

"बालिके, मी मातंग मुनी. मुर्छित झाली होतीस तू. आहेस कोण तू आणि आमच्या सरोवराकडे जाणार्‍या पायवाटेची स्वच्छता का करतेस तू.. ते ही केवळ हाताने?? इथे अरण्यात एकटी राहतेस?? आणि अशी लपून का राहतेस? बोल मुली बोल." मुली!!! मा' कशी आहेस गं तू?? मुनींच्या या मायेच्या बोलांनी डोळे पाणवले आहेत. काय सांगू यांना? ऐन लग्नाच्या वेळी मांडव सोडून पळून आलेय असं सांगू? की माझ्या लपून राहण्याचे कारण मी क्षुद्र आहे.. हेच आहे, असे सांगू? खूप दिवसांनी मायेने कोणीतरी पाठीवर हात फ़िरवला आहे. बा' तुमची आज खूप आठवण येतेय. घराची आठवण येतेय. कितीतरी दिवसांनी मा'ची माया मिळतेय! अरे.. हे काय..!! नाही.. रडायचं नाही.. नको.. नको...!! खूप दिवसांनी वाट मिळाल्यामुळे हे अश्रू आज ऐकत नाहीयेत... हुंदका अडकला... आणि.. मी.. मुनींच्या पायावर कोसळले.

"मुनीवर...........! मला क्षमा करा...!" मला काही बोलणंही अवघड वाटतंय. माझ्या खांद्याला धरून मुनीवर मला उठवताहेत. पण मी.. मी तर क्षुद्र आहे.
"मला.. हात नका लावू मुनीवर.. मी क्षुद्र आहे. माझी सावली पडली तरी विटाळ होईल तुम्हाला. मी... मी शबरी. भिल्ल पाड्यावरची." रडत रडत थोडी मागे सरकत बोलतेय मी. एरवी कोणी तपस्वी दिसला तरी पट्कन बुजुन जाणारी मी.. आज हे बोलण्याचं धैर्य कसं आणि कुठून आलं?

"उठ मुली. तू या अरण्यातली कंद आणतेस ना काढून? फ़ळ-फ़ुलं आणतेस ना? त्या वृक्ष लतांना स्पर्श करतेस ना? त्यांना होतो तुझा विटाळ? ही सरिता... पूर्णा.. ती कधी म्हणाली तुला.. की माझे पाणी घेऊ नकोस.. स्नान करु नकोस?? नाही ना! या परमेश्वराने चराचराची उत्पत्ती करताना मनुष्या मनुष्या मध्ये नाही फ़रक केला... तर आपण कोण आहोत उच्च -नीच ठरवणारे? नि:संकोचपणे बोल." मुनींच्या या बोलण्याने मन खूप हलकं झालंय. अगदी हलकं. पारव्याच्या पिसासारखं. मा' तू असायल हवी होतीस गं! एक स्त्री.. ती ही भिल्ल.. तिचा इतका सन्मान!! हे स्वप्न नक्किच नाहिये. ज्या दिव्य शक्तीची मला आस होती ती हीच तर नसेल?? हे तर साक्षात प्रभूचं रूप आहे. यांच्या चरणाशी अख्खा जन्म काढेन मी. हे मला शिष्या म्हणून स्वीकारतील?? मनांत किती प्रश्नांची वादळ आहेत माझ्या मनांत!!

"शबरी!! बोल मुली. तुझं मायेचं घरदार सोडून, लग्न मोडून या अरण्यात एकटीने राहण्याचं प्रयोजन काय?" अरे!! यांना कसं समजलं मी लग्न मोडून आलेय ते? मुनी शांत नजरेने आणि मार्दव भरल्या आवाजात विचारत आहेत मला,... चेहर्‍यावर तेच स्मित आहे, मागाशी होत अगदी तसंच.
"मला समजलंय सगळं. तू नेमकी कशासाठी घराबाहेर पडली आहेस याची तुला कल्पना नाहीये बाळा! नेमकं काय शोधते आहेस? ईश्वराला? तो तर तुझ्यातच आहे! त्याची प्रचिती मात्र लगेचच येईल असं नाही. " मुनी बोलत आहेत आणि माझे प्राण कानांत गोळा झाले आहेत. ज्या मार्गावर जाण्यासाठी मी धडपडत होते त्याच दिशेने मुनी मला इशारा करत आहेत. म्हणजे मी आजपर्यंत ईश्वराला शोधत होते?? माझं घर सोडणं, भोराशी विवाहाला नकार देणं , मा'ला आणि बा'ना जन्मभराच्या यातना देऊन मी बाहेर पडले ते ईश्वराच्या प्राप्तीसाठी!! जी गोष्ट मलाच नव्हती समजली ती मुनींना समजली. मुनींच्या चरणाशी राहीले तर माझ्या जन्माचं सार्थक होईल. मला मुनींसोबत जायल हवं.

"मुनीराज, मला आपल्या चरणी आश्रय द्या. पडेल ते काम करेन मी, म्हणाल तशी राहिन. मला आश्रय द्या. ईश्वर जर माझ्यातच आहे म्हणताय तर मला माझ्या ईश्वराशी भेट घडवून द्या मुनीवर. मार्ग कितीही खडतर असुद्या.. मी नाही आता मागे हटणार. माझ्या ईश्वराची भेट झाली तरच मला मोक्ष मिळेल. जन्मभर दासी म्हणून राहीन मी तुमची. मला आश्रय द्या."
नक्की काय घडतंय हे कळायच्या आत मी हे सगळं बोलून गेले!! पण मुनींचा चेहरा असा चिंताग्रस्त का झाला? ते नकार देतील का? तसं झालं तर मी कय करू? इथेच अशीच अधांतरी भटकत राहू? माझ्या मनाला कशाची आस आहे हे आत्ता तर समजलं मला! इतके दिवस मला नक्की काय हवंय हेच समजत नव्हतं. आणि आता समजलं आहे तर.. हे मुनी मला सोबत न्यायला तयार नाहीत?? कशी लाभेल मला मन:शांती..?

माझं मलाच समजलं नाही मी मुनींच्या चरणी कधी कोसळले. वरती मान करून काही बोलवं असा विचार करतेय..
"शबरी...! चल! माझ्यासोबत चल. माझ्या आश्रमात चल. उठ बालिके. जे व्रत घेतलं आहेस ते पुर्ण कर. " अतिशय गंभीर आणि निर्णायक आवाजात हे काय ऐकतेय मी!! आनंदाने डोळे भरून आलेत...
"मुनीवर.. मुनीवर.. मी आपली..." अरे!! हे काय!! मुनीवर... मुनीवर... !! मुनीवर अरण्याकडे चालू लागले!! मलाही जायला हवं. ....मलाही जायला हवं....

"थांबा मुनीवर! मुनीवर थांबा.. मी येतेय.. थांबा मुनीवर.. थांबाऽऽऽऽऽ...."

क्रमशः

कथासाहित्यिकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

18 Jan 2011 - 9:29 am | स्पंदना

आज दोन्ही भाग वाचले.

शबरीची ही कथा माहित नव्हती प्राजु. धन्यवाद. अतिशय आवडली.
आता मला माहित असलेली शबरी ची पुढील जन्मीची कथा 'काव्यात' लिहिते.

प्राजु ताई,

आवडली शबरीची कथा. आधी कधी वाचण्यात अ‍ॅकण्यात आली नव्हती. शबरी म्हणलं की बोरं आणि राम असंच माहीती होतं. त्या मागचं काहि माहित नव्हतं.

अतिशय धन्यवाद.

हर्षद.

मुलूखावेगळी's picture

18 Jan 2011 - 10:54 am | मुलूखावेगळी

छान आहे कथा
धन्यवाद तुमच्यामुळे कळली

नन्दादीप's picture

18 Jan 2011 - 12:14 pm | नन्दादीप

हेच म्हणतो...

मीसुद्धा ही कथा पुर्वी कधी ऐकली नव्हती.
शेवटी क्रमशः टाकायच राहिलय का गं?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jan 2011 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार

खुप सुरेख लिहिले आहेस प्राजुतै.

उठ मुली. तू या अरण्यातली कंद आणतेस ना काढून? फ़ळ-फ़ुलं आणतेस ना? त्या वृक्ष लतांना स्पर्श करतेस ना? त्यांना होतो तुझा विटाळ? ही सरिता... पूर्णा.. ती कधी म्हणाली तुला.. की माझे पाणी घेऊ नकोस.. स्नान करु नकोस?? नाही ना! या परमेश्वराने चराचराची उत्पत्ती करताना मनुष्या मनुष्या मध्ये नाही फ़रक केला... तर आपण कोण आहोत उच्च -नीच ठरवणारे?

हे तर खासच.

तू (क्रमशः) लिहिले नाहीयेस म्हणुन तुझे लेखन पुर्ण झाले असे समजुन थोडी भर घालतो.

शबरीला आपल्या आश्रमात मातंग ऋषींनी दिलेला आश्रय त्यांच्या कोणत्याच शिष्याला पसंत नव्हता, आजुबाजुच्या इतर ऋषींनी तर मातंग आणि त्यांच्या आश्रमावर बहिष्कारच घातला होता. मातंग ऋषी मात्र ठाम होते. काही वर्षांनी देह सोडण्याच्या आधी त्यांनी शबरीला 'तुला श्रीरामाच्या रुपात तुझ्या देवाचे दर्शन मिळेल' असे सांगीतले. पुढे पुढे तर श्रीरामाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेली शबरी अरण्यातल्या प्रत्येक झाडाला, फुलाला, पानांना "श्रीराम प्रभु कधी येणार ?"असे विचारत असे. आणि जेंव्हा श्रीराम खरच चित्रकुटात अवतरले तेंव्हा ह्या सगळ्यां पाना-फुलांनी "श्रीराम आले, शबरीचे श्रीराम आले" असा ओरडून गजर केला.

मातंगाच्या शिष्यांकडून श्रीराम आल्याचे कळल्यावर शबरी धावत त्यांना भेटायला निघाली. वाटेत तिची धडक एका ऋषीवरांना बसली. खालच्या जातीतल्या स्त्रीचा स्पर्ष झाल्याने नुकतेच स्नान करुन येणारे ऋषी संतापले आणि त्यांनी शबरीला 'तुला किडे पडतील ' असा शाप दिला. शबरीचे तिकडे लक्षच न्हवते. शबरीच्या स्पर्शाने अपवित्र झाल्याची भावना धरुन हे ऋषी पुन्हा स्नानाला तळ्यात उतरले आणि गंमत म्हणजे त्यांचा स्पर्श होताच पुर्ण तळे किडे आणि आळ्यांनी भरुन गेले. देवाच्या भक्तीत लिन झालेली शबरी अशा पदाला पोचली होती की तीला दिलेला शाप उलट त्यांच्यावरच उलटला होता.

पुढे श्रीरामाने आपल्या दर्शनाला आलेल्या सर्व ऋषींना सांगीतले की आता केवळ शबरीच्या स्पर्शानेच हे पाणी पुन्हा शुद्ध होऊ शकेल.

खुप सुंदर गोष्ट आहे. तू खरेतर पुर्ण लिहायला हवी होतीस. तुझ्याकडून वाचताना मजा आली असती.

स्पंदना's picture

18 Jan 2011 - 3:03 pm | स्पंदना

किती सुन्दर गोष्ट आहे. परा तुमच्या शब्दात ही छान च वाटते.

प्राजु's picture

18 Jan 2011 - 7:10 pm | प्राजु

हो परा. क्रमशः राहिले आहे..
कथा अजून अपूर्णच आहे.
अजून किमान २ भाग तरी होतील.

ही माहिती मला मायबोलीवर "शबरीधाम" वर मंदार जोशी यांनी लिहिलेल्या एका प्रवास वर्णनात वाचायला मिळाली आणि तेव्हापासून कथा डोक्यात घोळू लागली.
आणि जसा साचा बनत गेला तशी मी लिहित गेले आहे. अजून २ भाग होती किमान.
आपणा सर्वांची मी मनापासून आभारी आहे.
या अशाप्रकारच्या लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे माझा. गेली ३ वर्षे सांभाळून घेतलंत.. आताही सांभाळून घ्याल अशी आशा आहे.

मुलूखावेगळी's picture

18 Jan 2011 - 3:01 pm | मुलूखावेगळी

अरे वा धन्यवाद परा
तु ती स्टोरी पुर्ण केलि आहेस

आत्मशून्य's picture

18 Jan 2011 - 4:56 pm | आत्मशून्य

संपली नसावी अशी अपेक्षा आहे कारण शबरीचा पूढील प्रवास कसा घडला याबाबत जाणून घ्यायची फार ऊत्सूकता आहे.

शुचि's picture

18 Jan 2011 - 8:18 pm | शुचि

कथा मस्तच फुलते आहे.

स्वाती दिनेश's picture

18 Jan 2011 - 10:07 pm | स्वाती दिनेश

हा भागही छान झाला आहे प्राजु,
स्वाती

मितान's picture

18 Jan 2011 - 11:34 pm | मितान

असेच म्हणते !

खूप छान ! पुढचा भाग ?