यूं तो है हमदर्द भी....(४)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
4 Jan 2011 - 10:53 am

या आधीचे कथा भागः , आणि

....संजयकडे पाहत डॉ. गानू म्हणाल्या, "माझ्या लक्षात आहे, तुम्ही निघताय उद्या, काही काळजी करू नका, we will take care of her."

***********
संजय डियरफील्डला परतला आणि कामात गुंतला तरी भारतात रोज दोनदा फोन करून पद्माची आणि संपदाची खबरबात घेत असे. थोडे दिवस पद्माची प्रकृती छान असतांना सर्व जण अजिंठा-वेरूळ, नाशिक आणखी कुठे कुठे फिरून आले, त्यामुळे संपदाही खुषीत होती. आठवड्याभरानंतर पद्माला परत थकवा जाणवायला लागला. ठिकठिकाणचं बदलतं पाणी आणि इतका प्रवास तिला झेपला नसावा. पुन्हा ती डॉ. गानूंना भेटून आली.

तपासून झाल्यावर त्यांनी विचारलं, "पुण्याच्या त्या वैद्यांकडे गेला होतात?"

"नाही हो, काही न करता थोडं बरं वाटलं होतं म्हणून संपदाला घेऊन फिरून यावं असा विचार केला, या फिरण्यात राहूनच गेलं ते, जाईन आता उद्या-परवाच."

"हे पहा," डॉ. थोड्याशा खंबीर स्वरात म्हणाल्या, "तुम्हाला मी म्हणाले तसं immune modulators ची अतिशय गरज आहे, आणि विनाकारण महागडी allopathic औषधं देणं हे माझ्या तत्वात बसत नाही, म्हणूनच ज्याने गुण येऊ शकेल अशी आयुर्वेदिक औषधं तुम्ही वेळेवर घ्यावीत असं वाटतं, तुमची झोपही पुरेशी होत नाहीये आणि तुमचं वजनही कमी झालंय थोडंसं, तेही नॉर्मलला यायला पाहिजे."

"Sorry! जाते मी उद्याच," पद्मा म्हणाली.

तिने मग पुण्याच्या सप्रे वैद्यांचं औषध आणून सुरु केलं. आधी हळू हळू पण मग steadily तिचं वजन पूर्व पदाला पोहोचलं. थकवा पूर्ण पणे गेला नाही तरी कमी नक्की झाला. पण थोडं कामात लक्ष घातलं घरात किंवा कुठे बाहेर जाणं झालं की लगेचच पुन्हा थकव्याचा त्रास सुरु होत असे. विशेषत: एखाद्या दिवशी औषधाच्या वेळा चुकल्या की थकवा हमखास!

संजयचा फोन आला की म्हणायची "मी कंटाळलेय रे! किती दिवस हे असं औषध घेऊन जगणार? आज तर मला साधा वरणभाताचा कुकर लावता येईना उभं राहून, डोकं सरळ ठेवणं म्हणजे मानेवर मणामणाचं ओझं ठेवल्यासारखं होतं. केंव्हा एकदा पाठ टेकवते असं होतं."

"अगं मग झोपत जा."

"अरे सारखं कसं पडून राहणार? मोलकरणी असल्या तरी कामं असतातच ना घरात? आई बिचार्‍या करताहेत सगळं जमेल तसं, पण मला किती चोरट्यासारखं होतं? बरं पडून देखील झोप येतेच असंही नाही, सारखं डोक्यात नाही नाही ते विचार येतात..." तिच्या आवाजात कंप होता.

"कसले विचार, शोनू?"

शांतता.

"कसले विचार येतात राणी?"

तिला हुंदका फुटला, " अरे माझं काही बरं वाईट झालं तर आपल्या पिलाकडे कोण बघणार? केवढीशी आहे रे ती अजून!"

"ए, गप, येडाबाई! असले काही तरी फालतू विचार करत बसू नकोस! तू छान बरी होशील लवकर आणि येशील इकडे, मी वाट पाहतोय ना तुझी?"
**********

२-३ आठवडे असेच गेले, कधी दोन दिवस बरे, मग पुन्हा एक दिवस थकवा आणि ताप. मग फोन केला आणि ती बोलू शकली नाही की संजयची चीडचीड, "अगं आई, मी कामातून वेळ काढून हिला फोन करावा तर हिचं पुन्हा तेच!"

"अरे असं काय, होईल ती व्यवस्थित उद्यापर्यंत आणि बोलेल पुन्हा, आता संपदाशी बोल, पोरगी वाट पाहतेय केव्हाची."

संपदाशी बोलून तो थोडा शांत व्हायचा.

*********
"तुला खरं सांगू? मला काय होतंय ते मला नीट सांगताही येत नाहीये रे, कधी कधी असं वाटतं की मेंदू फझी झालाय, विचार स्पष्टपणे सांगणं हेही एक अवघड टास्क झालंय! साध्या साध्या गोष्टींनी गोंधळायला होतंय, आणि माझा विचारांचा गोंधळ तुला कम्युनिकेट करायचा म्हंटलं तर तुला समजून घ्यायला वेळ नाही."

"अगं वेळ आहे गं, पण साधं काही बोलशील तर ना तू? तू तर सारखं आजाराचंच बोलत राहतेस."

"मी रोज तुला सारखं माझं रडगाणंच सांगते आहे असं वाटतंय ना? I cannot blame you, you have a career to take care of."

शांतता.

"एक सांगू? मला सोडून दे तू!"

"पुन्हा तेच! एक तर हे टोक नाही तर ते टोक! अगं काय खुळी आहेस का तू वेडाबाई? सोडण्यासाठी हात धरला होता का तुझा? तू ऐक, त्या वैद्य बाईंचं औषध लागू पडतंय ते चालू ठेव, आणि इकडे ये बघू निघून आपली माझ्या जवळ."

"बघ हं, नीट विचार कर, तिथे आल्यावर सगळं तुलाच करायला लागेल मला नाही जमलं तर, कसं करणार तू? कुठे वेळ असतो तुला?"

"अगं होईल सगळं, मिळतील मेड सर्व्हिस वाल्या बायका, बाकी मी बघेन स्वयंपाकाचं."

ती हसली, "हो, उजेड 'मी बघेन' म्हणणाऱ्याचा, साधा कुकर धड लावता येत नाही तुला, एक तर पाणी जास्त नाही तर डाळ जळते!"

"ठीक आहे, ठीक आहे, तू ये तर, मग बघू!"

**********

(क्रमशः)

- बहुगुणी

कथाविचार

प्रतिक्रिया

अरे वा! पटापट भाग पोस्ट होत आहेत, ते उत्तम आणि आधीच्या भागांच्या लिंकाही दिलेल्या आहेत! धन्यचवाद.
वाचनाचाच वेग कमी पडला की. :) वाचते आता.

मस्तच जमलेत चारही भाग.

सविता's picture

4 Jan 2011 - 11:54 am | सविता

वाचतेय......

Nile's picture

4 Jan 2011 - 2:20 pm | Nile

वाट पाहतोय...

प्राजक्ता पवार's picture

4 Jan 2011 - 6:10 pm | प्राजक्ता पवार

वाचतेय .