फ्रोह वाईनाख्टन!!!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
21 Dec 2010 - 3:35 pm

आत्ता सगळीकडे ख्रिसमसचे वातावरण आहे,ते वातावरण सगळ्यांमध्ये वाटावेसे वाटले म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख -

या आधी- नाताळची चाहूल!

पहिला आडव्हेंट झाला की नाताळच्या मेजवान्यांची आमंत्रणं सुरू होतात. कितीतरी जण नाताळच्या बाजारात ग्लुवाईन पार्टी करतात.मित्रमंडळी आपसात नाताळचे जेवण घेतात.ऑफिसांतूनही नाताळमेजवानी आयोजित केली जाते.हा सण जर्मनीत मुख्यत्वे कुटुंबाबरोबरच साजरा करतात.आपले आईवडील आणि भावंडांबरोबरच नाताळ साजरा करण्याकडे सर्वांचा कल असतो.बाकी मित्रमंडळींबरोबर म्हणून तर पहिल्या आडव्हेंटनंतर मेजवान्या सुरू होतात. ख्रिस उल्मला त्याचे आईवडील आणि दोघी बहिणींबरोबर नाताळ साजरा करतो,तर सुझान मानहाईम जवळच्या एका छोट्या खेड्यात आपल्या आईबाबांबरोबर असते. रोमेन आपले नव्वदीचे आजोबा आणि आईवडीलांसोबत असतो तर श्वेनिया आपली पोझिशन बाजूला ठेवून आपल्या वडलांच्या बेकरीत केक आणि बिस्किटांची पाकिटे बांधायला उभी असते. ख्रिस्टियाना आपले बाबा नाताळभेट म्हणून"तुम्ही मुले अशीच प्रगती करा हेच दरवर्षी मागतात" हे ऐकल्यावर आईबापाचे हृदय स्थल, काल, धर्म, वंशाच्या पलीकडे जाऊन सारखेच आहे हे मनात आल्याशिवाय राहत नाही.

इथे नाताळच्या पूर्वसंध्येला 'हायलिश आबेंड' म्हणजे 'पवित्र संध्याकाळ' असे संबोधतात आणि मुख्य सण त्याच दिवशी साजरा करतात आणि २५,२६ तारखेला काका,मामा,आत्या,मावशी वगैरे इतर नातेवाईकांच्या,जवळच्या मित्रांच्या भेटी घेतात.आमचे आजीआजोबा नाताळची पूर्वसंध्या इथे साजरी करतात आणि मग दुसऱ्या,तिसऱ्या दिवशी त्यांचे सगळे कुटुंबीय आजीच्या बहिणीकडे,हेडीकडे जमतात.आमची ओळख जेव्हा नवीन होती तेव्हा एकदा सहज जर्मन नाताळबद्दल विचारलं होतं, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक नाताळ आम्ही आजीआजोबांबरोबर साजरा करतो. संध्याकाळी ५.३०,६ च्या सुमाराला चर्च मध्ये नाताळचा पहिला मास असतो आणि दुसरा रात्री ११ ला! आमच्या घरापासून रमतगमत चालत गेले तरी १० मिनिटाच्या अंतरावर चर्च आहे पण तरीही पावणेपाचच्या सुमाराला आजी सगळ्यांना घराबाहेर काढते आणि ५ च्या सुमाराला आमची फौज तिथे हजर असते. सगळे चर्च रिकामे असले तरी तिची विशिष्ट जागा आहे तिथेच बसण्याचा तिचा कल असतो.रस्त्याने जाताना दर वेळी लहानपणी दसऱ्याला घंटाळीच्या देवळात आईबाबांबरोबर जायचे त्याची हटकून आठवण होते.

चर्च मध्ये नाटकाचा पडदा वर जायची,तिसऱ्या घंटेची वाट पाहत असल्यासारखी स्थिती असते.लहान मुलं चांदण्यावाल्या चंदेरी काठ्या घेऊन उभी असतात.एक ताई त्यांना त्यांची 'एन्ट्री' समजावून देत असते,ऑर्गनवाला ऑर्गन जुळवून घेत असतो,येशूचा गोठा,मेणबत्त्या,माईक इ. गोष्टी व्यवस्थित आहेत ना हे कुणी पाहून जातो, सगळं ठीक आहे ना? हे एकदा पाद्रीबाबा पाहून जातो.आम्ही आपले त्या ठराविक जागेवर बसून ते सगळे पाहत आजीचे कुजबुजत्या आवाजातले धावते समालोचन ऐकत बसलेले असतो. हळूहळू लोक जमायला लागतात. लहान मोठे आबालवृद्ध सगळे यायला सुरुवात होते. चिमुकल्या ३,४ महिन्यांच्या बाळांनासुद्धा परड्यात घालून त्यांच्या आया घेऊन येतात. बाबागाड्यातूनही मुलांना आणतात.विशीबाविशीतली प्रेमी युगुलं येतात आणि आदल्याच दिवशी ९१ पूर्ण केलेली वेल्श आजीही असते,तर कुणी श्रावणबाळ चाकांच्या खुर्चीवरून आपल्या पित्याला घेऊन येतो.सगळे चर्च भरून जाते,लोक मग बाहेरच्या दालनातही जाऊन उभे राहतात.प्रतीक्षा असते आता येशूजन्माच्या सोहळ्याची..

वेळ झाली की फादर, त्याच्यामागे चांदण्या लावलेली चंदेरी काठ्या घेतलेली लहान मुलं आणि बाकीचा लवाजमा येतो.मंद प्रकाशातले दीप उजळले जातात.एक ताई मग मेणबत्ती घेऊन येते,आणि ज्योतीने ज्योत लावते.बायबल मधले काही उतारे वाचून दाखवते,ऑर्गनचे सूर वाजायला लागतात,सारे उठून उभे राहतात आणि प्रार्थनेला सुरुवात होते.धूपाच्या वासाने आणि ऑर्गनच्या मंद सुरांनी वातावरणात जणू मंतरलेपणा येतो. नाताळची प्रसिद्ध गाणी सारे गाऊ लागतात. "आज शुद्ध रात्र,पवित्र रात्र.. येशू जन्मला..." अशा अर्थाचे गाणे सुरू झाले की मला नेहमी " राम जन्मला ग सखी.." आठवतं. ख्रिस्त आणि कृष्णामधलं काही साम्यही आठवत राहतं.दोघेही मध्यरात्री जन्मले,जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत आले.एक गाईगुरांमध्ये वाढला तर दुसरा शेळ्यामेंढ्यांमध्ये..तिकडे गाणी सुरूच असतात, माझं मन असं कुठेही भरकटत राहतं. जन्मोत्सवाची गाणी झाली की पाद्रीबाबा सर्वांसाठी प्रार्थना करतो,छोटेसे प्रवचन देतो. या वर्षी "ख्रिश्चन,मुस्लिम, बौद्ध,हिंदू सगळे धर्म सारखेच!" असा संदेश दिल्याने जुन्या विचारसरणीच्या लोकांत थोडी खळबळ उडाली! मग फादर सर्वांना नाताळच्या शुभेच्छा देतो. फ्रोह वाईनाख्टन! फ्रोहेस फेस्ट! अशा नाताळच्या शुभेच्छा आपल्या आजूबाजूच्यांना देऊन झाल्या की फादरबाबा सगळ्यांना प्रसादाचे बिस्किट देतो.रांगेत एकेकजण त्याच्याकडे जातात, गुडघ्यात लवून अभिवादन करतात आणि प्रसाद घेऊन येतात. हा प्रसाद फक्त कॅथलिक ख्रिश्चनांनाच मिळतो.आजी कॅथलिक आणि आजोबा प्रोटेस्टंट! त्यामुळे आजी आपली एकटी एकटी जाऊन प्रसाद खाऊन येते.आजोबांना सुद्धा देत नाही याची आम्हाला फार गंमत वाटते.

फादरबाबा रुप्याच्या पेल्यातून रेड वाइन आणि प्रसादाचे बिस्किट त्याच्यामागे अर्धचंद्राकार उभ्या असलेल्या चर्चच्या पुजारीमंडळाला आणि चंदेरी काठ्या घेतलेल्या मुलांना देतो आणि सर्वात शेवटी स्वतः पितो.परत एकदा सर्वांना नाताळ शुभेच्छा देऊन लोकांची पांगापांग होते. गणपतीची आरास पाहावी तसे लोक मग येशूचा गोठा,नाताळझाडाची आरास पाहण्यात गुंग होतात.आम्हीही मग आरास पाहतो.आजी तिच्या मित्रमंडळींशी,फादरशी ओळख करून देते आणि रमतगमत आम्ही घरी येतो. ख्रिसबाऊम म्हणजे नाताळच्या झाडामागे भेटवस्तू दडवून ठेवलेल्या असतात. आम्हीही त्यांना द्यायच्या भेटी तिथे लपवतो.आजोबा मग टेपरेकॉर्डरवर परत नाताळगाणी लावतात. सार्वजनिक आरती झाली तरी घरच्या गणपतीची पूजा,आरती वेगळी असतेच ना,तसेच काहीसे!आजीचे नाताळझाड पारंपारिक पद्धतीने सजवलेले असते.झाडावर चिमुकले चमचमते सोनेरी,चंदेरी गोल लोलक,चांदण्या,यक्षकिन्नर असतात.येशूचा पाळणा,बाळयेशूची प्रतिमाही पायथ्याशी ठेवलेली असते.रंगीत मणी लावलेली बिस्किटे,चॉकलेटे आणि कलात्मकरीत्या मांडलेली नाताळफराळाची बिस्किटे चैत्रगौरीच्या आराशीची आठवण करून देतात.

बारा महिन्याच्या बारा मेणबत्त्या मग आजोबा लावतात,सगळे झाडासमोर उभे राहतात."रोजची मीठभाकर देणाऱ्या आकाशातल्या बापा,आम्हाला असेच सुखी,समाधानी,निरोगी ठेव."अशा आशयाची प्रार्थना म्हणतात. मग पितरांसाठी, जवळच्या मित्रमंडळींपैकी कोणी गेले असेल तर त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. माझ्या सासूबाई,बाबा गेल्यानंतर एक प्रार्थना त्यांच्यासाठीही होते,तेव्हा आम्हाला भरून येतं.एकमेकांच्या गळाभेटी घेऊन मग नाताळच्या शुभेच्छा देतात आणि वाईनाक्ट्समानने ख्रिसबाऊमखाली आणून ठेवलेली नाताळभेट लगेचच उघडून पाहतात आणि आवडलेल्या भेटीबद्दल त्याला धन्यवाद देतात.

सेक्ट म्हणजे जर्मन शँपेन मग फसफसते आणि नाताळची मुख्य मेजवानी सुरू होते.बऱ्याच ठिकाणी टर्कीचे महत्त्व फार असते पण इथे मात्र जेवणात टर्कीचे विशेष महत्त्व नसते तर बटाटयाचे विशिष्ट सालाद आणि उकडलेली अंडी वाईसवुर्ष्ट म्हणजे पांढऱ्या सॉसेजबरोबर खातात. जोडीला चीजबरोबर बेक केलेले बटाटे,पेअर आणि एक प्रकारचे मऊ चीज यांचा पदार्थ,विविध प्रकारचे पाव आणि बिस्किटे असतातच.दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ तारखेला एंट म्हणजे बदक किंवा गाजं म्हणजे बदक आणि टर्की यांच्यामधला (त्याच फॅमिलीतला)एक पक्षी जेवणात असतो. आजीचा आग्रह एकीकडे चालू असतो.गप्पांच्या नादात दोन घास जास्तच जातात. जेवणानंतर ऍपलपाय, ग्रीसपुडिंग,रोटंग्रुट्झ म्हणजे एक विशिष्ट बेरीफ्रुट्सची जेली यापैकी एखादे डेझर्ट असते. जेवणे झाली तरी हात वाळवत गप्पा मात्र चालूच असतात.विषय रूळ बदलत राहतात.मंद संगीत वातावरण जादूभरलं करत असते.मनात ते चित्र तसंच जपून ठेवून मग एका आठवड्याने येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागताला आम्ही उत्सुक होतो.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Dec 2010 - 3:50 pm | मदनबाण

मस्त वर्णन... :)
त्यात खाद्य पदार्थांचे वर्णन म्हणजे... खी खी खी. ;)
फार भूक लागली बघं...

अवांतर :---माई-ताई तू इतके मस्त मस्त आणि झकास पदार्थ बनवतेस, ते मला कधी खायला बोलवणार आहेस ते सांग पाहु ?हिंदुस्थान भेटीला आलीस ना की कळव... कसे ? ;)

(केक प्रेमी)... ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Dec 2010 - 4:57 pm | बिपिन कार्यकर्ते

ए१ !!! नेहमीप्रमाणेच चित्रदर्शी.

स्वातीताई, जमल्यास अशावेळी म्हणली जाणारी गाणी, हिम्स वगैरेच्या ध्वनिफिती चिकटव ना. जालावर असतीलच उपलब्ध.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त मस्त !

एकदम नाताळी लेखन गो :)

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 5:21 pm | छोटा डॉन

काय बोलायचे ?

एकदम सुरेख आणि एका लयीतला लेख !
लिखाण नेहमीसारखेच सुंदर, आवडला !

- छोटा डॉन

गणपा's picture

21 Dec 2010 - 5:26 pm | गणपा

अगदी चलचित्रासारख सगळ डोळ्यांपुढे उभ राहिल.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

21 Dec 2010 - 5:26 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मस्त !
:)
आणि पाकृ येउ देत अजुन्... डेझर्टच्या!
:)

स्वाती२'s picture

21 Dec 2010 - 5:41 pm | स्वाती२

सुरेख वर्णन!

रेवती's picture

21 Dec 2010 - 6:40 pm | रेवती

सुंदर लेखन!
रामनवमी, चैत्रगोरीसारख्या उत्सवी दिवसांशी केलेली तुलना फार आवडली.

सहज's picture

21 Dec 2010 - 7:34 pm | सहज

नाताळ सणाचे वर्णन एकदम सही!!

शुचि's picture

21 Dec 2010 - 7:41 pm | शुचि

का कोणास ठाऊक पण तुमचे लेख वाचताना, एक सुगंध जाणवतो. कदाचित जर्मनीतल्या, नाताळचा असेल पण खरच सुगंध मला जाणवतो.

मस्तच गं स्वातीतै. चित्रदर्शी वर्णन!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2010 - 8:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त वर्णन!
स्वातीताई, आजी-आजोबांशी तुमच्या असलेल्या नात्यामुळे आम्हालाही "ऑथेंटीक" जर्मन ख्रिसमसची सैर घडते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Dec 2010 - 8:43 pm | निनाद मुक्काम प...

अप्रतिम लेखन ह्यातील प्रत्येक शब्द हे एक चित्र डोळ्यासमोर उभे करते .परवा केसू व तुम्हा जोडप्याबरोबर नाताळ मार्केट मध्ये फिरताना खूप धमाल आली .स्थानिक खाद्य पदार्थ व गरमागरम ग्लू वाईन ह्यांच्या संगतीने गप्पा मारत बाजार फिरताना मजा आली . इथला सर्व बर्फ नुसता विदर्भ नि मराठवाड्यात नेला तरी जमीन ओलिताखाली जाईन.अशी एक खुळी कल्पना मनात आली .मिपा मुळे परदेशात मराठी माणसे व मन एकत्र आली म्हणून त्याचा मी ऋणी आहे .समर्थांचा संदेश मराठा तितुका मेळवावा .,महारष्ट्र धर्म वाढवावा हि उक्ती सार्थ ठरविण्यात मिपा चा मोलाचा वाटा आहे .परदेशातील इतर अनिवासी मिपा मंडळी सुध्धा एकत्र येऊन त्या त्या देशाचे वर्णन करतील अशी आशा बाळगतो .
बाकी भारतात असताना एकदा नाताळ वेळी ताज मध्ये आम्ही राबत होतो .तेव्हा माझ्या ख्रिस्ती कलीग मंडळीना नाताळ निमित सुट्टी नाही तरी क्रिसमस इव ला लवकर जायला मिळाले .तेव्हा काय करणार आता असे मी विचारले ? तेव्हा आता नटून थटून मैत्रिणीच्या घरी जाणार .तिच्या वडिलांकडून तिला बाहेर नेण्याची रीतसर परवानगी मागणार .मग चर्च मध्ये जाणार व नंतर मज्जा .......
च्यायला जबरदस्त असूया वाटली तेव्हा .दिवाळी अभ्याग स्नान करुन आमच्या डोंबिवलीत फडकेवर रोडवर अवधी तरुणाई /हिरवळ जमते . त्यादिवशी परदेशी किंवा बाहेरगावी किंवा मुंबईकर झालेले आमच्यासारखे आवर्जून हजेरी लावतात . त्यादिवशी फडके वर शाळा /कॉलेज व बालपणीचे कोणीही भेटू शकते . फ्रॉक मध्ये पाहिलेली एखादी बालमैत्रीण जेव्हा अचानक साडीत समोर येते .तेव्हा मनातील आनंद व हुरहूर काही औरच असते .पण आजही शाळेतील एका प्रेक्षणीय स्थळाकडे घरी जाऊन तिच्या तीर्थरूपांना तिला देवदर्शनाला घेऊन जातो व जशी नेली तशी परत आणतो( .कदाचित हद्याची अदलाबदल शक्य होती .)
अशी कल्पना सुध्धा मनात येत नाही .त्या शेवट पर्यत शाळेतल्या मैत्रिणी व ओर्कुट व फेस बुक मुळे आम्ही मामा बनल्याचे कळल्यावर आता वर्ग भगिनी झाल्या .
खरच परदेशात अति मोकळे पण पहिला पण त्यावेळी आजही फडके रोड वर एखाद्या मैत्रिणीशी (जीच्या बरोबर शाळेत क्वचित बोललो .तिच्याशी भर रस्त्यात बोलताना सारखे आजू बाजूला पाहत तिच्या नजरेत नजर न घालता गप्पा मारणे .
किंवा नाताळ निमित आमच्या आजूबाजूच्या बिल्डींग मधील मित्र मैत्रिणी सोबत गच्चीवर पार्टी करणे .एखादा सिनेमा (बहुदा भयपट हिंदी मध्ये रामसे ब्रदर ) रात्रीचा पाहणे मज्जे काय धमाल असायची .
गेले ते दिस गेले .

निनाद, स्वातीताई, दिनेशदा, केसू यांची भेट झाली? आँ?
निषेध!;)

पुष्करिणी's picture

22 Dec 2010 - 2:50 am | पुष्करिणी

मस्त वर्णन, छान वाटलं

अर्धवटराव's picture

22 Dec 2010 - 5:16 am | अर्धवटराव

छानच रंगला येशुजन्म सोहळा !!

अर्धवटराव

गुंडोपंत's picture

22 Dec 2010 - 5:41 am | गुंडोपंत

वा! मस्त वर्णन केलेत.
त्यातही हा सोहळा भारतीय सोहळ्यांशी साधर्म्य दाखवत रंगवल्याने जास्त छान वाटला.
तुमच्याकडे असे आजी आजोबा तेथे आहेत हे किती छान आहे.

सारे उठून उभे राहतात आणि प्रार्थनेला सुरुवात होते.धूपाच्या वासाने हे सारे अगदी कृष्ण जन्माचेच वर्णन आहे असे वाटले. कृष्ण आणि ख्रिस्त यात बरेच साम्य आहे.

जेवणे झाली तरी हात वाळवत गप्पा मात्र चालूच असतात.विषय रूळ बदलत राहतात. हे खास आवडले! नशीबवान आहात मनसोक्त गप्पा मारायला इतकी मंडळी तुमच्या बरोबर आहेत. अर्थात तुमचा स्वभावही तितकाच जिव्हाळ्याचा असणार, म्हणून हे सगळे आहे यात शंका नाही!
उत्तम लेखाबद्दल धन्यवाद!

अवलिया's picture

23 Dec 2010 - 1:52 pm | अवलिया

असेच म्हणतो

यशोधरा's picture

22 Dec 2010 - 3:21 pm | यशोधरा

>आईबापाचे हृदय स्थल, काल, धर्म, वंशाच्या पलीकडे जाऊन सारखेच आहे हे मनात आल्याशिवाय राहत नाही. >
>>माझ्या सासूबाई,बाबा गेल्यानंतर एक प्रार्थना त्यांच्यासाठीही होते,तेव्हा आम्हाला भरून येतं>>

:)

खूप सुरेख लिहिलं आहेस. ख्रिस्त आणि कृष्णाचे आणि रामजन्मामधली साम्यस्थळं शोधलीस, हे खूप भावले. आपल्याला जे आपले वाटते, जवळचे वाटते ते संदर्भ ताडून पाहिल्याशिवाय समधान होत नाही, असं असावं बहुतेक. खूप छान लिहितेस गं स्वातीताई. :)

स्वाती दिनेश's picture

23 Dec 2010 - 11:36 am | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद,
स्वाती

विलासराव's picture

23 Dec 2010 - 12:01 pm | विलासराव

>>>>>>>"आज शुद्ध रात्र,पवित्र रात्र.. येशू जन्मला..." अशा अर्थाचे गाणे सुरू झाले की मला नेहमी " राम जन्मला ग सखी.." आठवतं. ख्रिस्त आणि कृष्णामधलं काही साम्यही आठवत राहतं.दोघेही मध्यरात्री जन्मले,जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत आले.एक गाईगुरांमध्ये वाढला तर दुसरा शेळ्यामेंढ्यांमध्ये

लहानपणापासुन नाताळ म्हण्जे फक्त सुट्टी एवढेच माहीत होते. मागच्या वर्षी प्रत्यक्ष सहभाग होता नाताळ साजरा करण्यात. आपला लेख वाचुन आठवणी ताज्या झाल्या.असो.

मी ब्रम्हाकुमारीजचे एक प्रवचन ऐकले होते त्यात त्यांनी सांगितले की येशु ख्रिस्त वयाच्या १३-३३ ( वर्ष थोडेसे चुकीचे असु शकते नीटसे आठवत नाही) वर्ष कुठे होते हे अज्ञात आहे. बायबलमधेही यावर भाष्य नाही. तर याकाळात येशु भारतात होते आणी ते भगवत गीतेने फारच प्रभावीत झाले. नंतर ते परतल्यावर हेच ज्ञान त्यांनी तिकडे लोकांना सांगितले. याचे काही पुरावे मिळताहेत हे त्यांनी सांगितले. क्रिष्णनीती म्हनुनच त्यांनी तिकडे हे सांगितले पन काळाच्या ओघात क्रिष्णनीतीचे ख्रिस्चनीटी असे झाले असे त्या म्हणाल्या.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2010 - 10:29 pm | निनाद मुक्काम प...

क्रिष्णनीतीचे ख्रिस्चनीटी (तरीच मेले कुटनीती मध्ये एवढे खमके निघाले .नि जगभर वसाहती केल्या .)
मी लंडन मध्ये गेलो होतो काही काळ .ब्रम्हाकुमारीच्या अश्रामात
मनशांती मिळवण्यासाठीचा राजमार्ग

स्मिता.'s picture

25 Dec 2010 - 2:40 pm | स्मिता.

स्वातीताई, किती छान लिहिता तुम्ही!
पाकृ पण टाकता तर प्रत्येक पदार्थासोबत एक अनुभव, गोष्ट असतेच तुमच्याजवळ. ही तुमची हातोटी मला फार फार आवडते.
असं वाटतं की तुमची आणि त्या शेजारच्या आजी-आजोबांची भेट घ्यायला एकदा जर्मनीला यावं :)