नाताळची चाहूल!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
17 Dec 2010 - 3:58 am

आत्ता सगळीकडे ख्रिसमसचे वातावरण आहे,ते वातावरण सगळ्यांमध्ये वाटावेसे वाटले म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख -

नोव्हेंबर सरत आला की नाताळची चाहूल लागते.दुकानादुकानातून मोठीमोठी ख्रिसमसची झाडे सजू लागतात.दिव्यांच्या रोषणाईने करड्या,ढगाळ संध्याकाळी थोड्या रंगीत होतात,त्यात 'जान' आल्यासारखी वाटते.पोस्टातून भेटकार्डे, भेटपाकिटे पाठवण्यासाठी गर्दी होते.नाताळचे खास बाजार मैदानात,चर्चच्या आवारांत, नदीकाठी भरायला लागतात.हौशे,गवशे आणि नवशांची गर्दी तेथे व्हायला लागते.मेणबत्त्यांचे असंख्य प्रकार,चांदण्यांच्या आकाराचे आकाशदिवे, रेनडियरची वीजेवर लुकलुकणारी गाडी,दिव्यांच्या रंगीत माळा,फुगे, भेटकार्डे, नाताळभेटी देण्यासाठी आकर्षक डबे,रंगीबेरंगी भेटकागद, नाताळची चित्रे असलेले टी-सेट,पेले..काय नसतं तिथे? संध्याकाळी कळपाकळपाने लोक हिंडू लागतात‌. संगीताच्या तालावर सारेच डोलत,नाचत, खातपीत असतात. जणू जत्राच फुललेली असते!
खाद्यपेयांचे गाळे तर ठिकठिकाणी असतात.तिथली गर्दी पाहून वाटतं ह्या लोकांच्या घरी स्वैपाकघर आहे की नाही?खाण्यात मुख्य स्टॉल असतात वुर्ष्ट म्हणजे सॉसेजेसचे! अशा थंडीतही आइस्क्रीमच्या स्टॉलवर गर्दी असतेच. अनेक प्रकारचे बिअर आणि वाइन चे स्टॉल्स असतात.त्यातही नाताळच्या बाजारात मुख्य उठाव असतो तो ग्लु-वाइनला! रेड वाइन उकळवून त्यात विशिष्ट मसाले घालतात आणि कपातून गरम गरम पितात.इथली खासियत आहे 'एब्बेलवाय' म्हणजे ऍपलवाइन.ती ही लोक यावेळी गरम पितात.या गरम वाइन्समुळे आणि
उत्सवी वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी होत असावा!
नाताळच्या पूर्वसंध्येच्या आधीच्या चार रविवारांना 'आडव्हेंट झोनटाग' म्हणतात. पहिल्या रविवारी एक मेणबत्ती संध्याकाळी जेवताना लावतात,दुसऱ्या रविवारी पहिली अधिक एक असे चार रविवार एकेक मेणबत्ती वाढवतात आणि जेवताना लावतात.या रविवारपासून ते नाताळच्या पूर्वसंध्येपर्यंतचे 'आडव्हेंट कॅलेंडर' बाजारात दिसतेच पण कितीतरी उत्साही मंडळी ते घरी करतात.रोजच्या पानावर काही सुविचार,लेखकांची वचने,सुंदर कविता उद्धृत करतात.हा 'एर्स्ट आडव्हेंट' यायच्या आधीच घरं लख्ख होतात‌.तळघरातील कोठीच्या खोलीतल्या खास नाताळच्या वस्तू,ठेवणीतले टेबलक्लॉथ,ताटल्या, कपबशा बाहेर येतात.चांदीचे काटेचमचे चकाकू लागतात, शनिवारीच घरावर, अंगणातल्या ख्रिसमसच्या झाडावर दिव्यांच्या माळा लागतात,फराळाची तयारी सुरू होते.हे सगळं उत्सवी वातावरण आपल्या गणपती,दिवाळीच्या दिवसांची आठवण करून देतं.
बाजारातही आता नाताळच्या फराळांचे पुडे,डबे दिसायला लागतात. निरनिराळ्या प्रकारची आणि आकाराची बिस्किटे आकर्षक पिशव्यातून दुकानादुकानात दिसतात‌. 'ष्टोलन' हा यीस्टचा (बेकिंगपावडर नाही) रममध्ये भिजवलेले बेदाणे घालून केलेला,पीठीसाखरेत घोळवलेला, पूर्व जर्मनीतील ड्रेस्डनची खासियत असलेला केक फक्त आताच सगळीकडे मिळतो.तसेच बायरिश 'लेबकुकन' ही लवंग,दालचिनी,जायफळ घालून केलेली बिस्किटे सुद्धा याच सीझनला मिळतात.चॉकलेटांचा तर पूर आलेला असतो. पहिल्या आडव्हेंटच्या दिवशी सगळी लहान मुले लवकर उठून प्रवेशदाराकडे पळतात,तिथे त्यांच्यासाठी 'निकोलाऊस मान' रात्री खाऊ ठेवून गेलेला असतो! इथे 'सँटाक्लॉज' नाताळच्या दिवशी खाऊ देत नाही तर 'निकोलाऊस मान' मुलांना खाऊ पहिल्या आडव्हेंटच्या पहाटे देतो.आणि नाताळच्या भेटवस्तू 'वाईनाक्ट्स मान' आणतो.पहिल्या ऍडव्हेंटला 'निकोलाऊस मान' आमच्या दारापाशीही खाऊचा पुडा ठेवतो!अगदी पहिल्यांदा असा खाऊ दारातल्या मांडणीवर पाहून आम्ही आश्चर्याने गोंधळून गेलो होतो.निकोलाऊस मानने ठेवलेला खाऊ आवडला का? असं जेव्हा आकिम आजोबांनी डोळे मिचकावून विचारले तेव्हा उलगडा झाला.
इकडे आता त्सेंटा आजीची लगबग सुरू होते."आता वाइनाक्ट्स गेबेक (नाताळचा फराळ) करायला सुरुवात करायला हवी.."या तिच्या वाक्याने मी पटकन लहान होते, आठवतात आईची,आजीची वाक्यं "दिवाळी आठवड्यावर आली, डाळीचं पीठ,भाजण्या दळून आणायला हव्या,पोह्यांना उन्हं दाखवायला हवीत.." ह्या दोन्हीत काही फरक वाटत नाही! तीच लगबग,'फराळाचं' करण्याची तीच घाई! "बाजारात सगळं मिळतं ग,पण मी घरीच करते फराळ!" हे वाक्य एखाद्या रमाकाकू म्हणतील ना तश्शाच ठसक्यात आजी म्हणते.मग अनेक प्रकारची बिस्किटे,केक करायला सुरुवात होते. बाजारात कधीच न पाहिलेले बिस्किटांचे प्रकार सुद्धा तयार होतात."ही आकिमच्या आईची कृती,ती माझ्या आईची आणि ती काल केली ना आपण, ती बिस्किटे माझी आजी करायची!"मी आजीकडे अवाक होऊन पाहत असते. मग तीही हळवी होऊन आपल्या वहीतून पेन्सिलीने लिहिलेल्या आता पुसट झालेल्या पाककृतीतून आपल्या आईचे, आजीचे,सासूचे अक्षर दाखवते,हळूच डोळ्याच्या कडा टिपते.अशा वेळी काय करायचं ते मला कळत नाही.मग आकिमआजोबा आपल्या हातात सूत्र घेतात."चला,चला आता ही ताजी ताजी बिस्किटे मस्त गरम कॉफीबरोबर घेऊया.."
आपण जशी दिवाळीच्या फराळाची ताटं शेजाऱ्यांना,मित्रमंडळींना देतो तसे इथेही नाताळचे फराळ एकमेकांना देतात.८५ वर्षांचे विमेलमान आजीआजोबा हे आमच्या आजीआजोबांचे मित्र त्यांच्या सगळ्या ग्रुपबरोबरोबर आम्हालाही नाताळची बिस्किटे आणि आडव्हेंट कॅलेंडर देतात, आणि हे दोन्ही ते आजीआजोबा स्वतः घरी करतात!
गल्लीत इतर घराघरांतूनही ते परिचित गोड वास यायला लागतात.आपल्या कडे कसे लाडवासाठीचे बेसन भाजल्याचे वास दिवाळीच्या आधी सगळीकडून येतात,तसेच!
घरदार आता नाताळच्या स्वागताला सज्ज झालेले असते.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

शुचि's picture

17 Dec 2010 - 4:07 am | शुचि

>> आपल्या आईचे, आजीचे,सासूचे अक्षर दाखवते,हळूच डोळ्याच्या कडा टिपते.अशा वेळी काय करायचं ते मला कळत नाही.मग आकिमआजोबा आपल्या हातात सूत्र घेतात.>>
किती लोभस चित्र !!!!
डोळ्यात पाणी आलं. इथून तिथून मानवी स्वभाव सारखेच नाही का? हळव्या स्त्रिया आणि वरून कणखरपणा दाखवणारे पण आपल्या बायकोला जपणारे पुरुष जर्मनीतही असतात का स्वातीताई?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Dec 2010 - 4:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर लेख.
आजी-आजोबांना माझ्याकडून नाताळच्या शुभेच्छा पोहोचव गं स्वाती ताई!

वा! मस्त लेखन!
सगळा ख्रिसमस आणि आपली दिवाळी आठवून गेली.
अशीच नाही तरी अश्याप्रकारची तयारी आमच्या आजूबाजूला चालू आहे.
सगळेजण घरं सजवतायत. बाजारात भेटवस्तू म्हणून बरेच प्रकार आलेत तसे टिव्हीच्या जाहिरातीतून कळत असतात.
मुलांच्या शाळांमधले पिक्चर डेज कधीचेच होवून गेलेत. सगळ्या मुलांचे दिवसांपूर्वी फोटू आलेत ते आता नातेवाईकांना मिळतील. आमच्याकडेही ख्रिसमस ट्री सजवून झालय.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2010 - 5:19 am | निनाद मुक्काम प...

अप्रतिम लेख एवढी सुरेख व परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल
सध्या जर्मन भाषेची मुळाक्षरे गिरवत असल्याने माझी सासू कौतुकाने नाताळ व त्यांच्या परंपरा सांगत होती .साध्या सरळ सोप्या जर्मन भाषेत .ती कळल्याचा साभिनय मी उत्तम केला .पण त्या चार आठवडे व मेणबत्तीची तासेस सोलेमन भानगड आत्ताकुठे उमजली .बाकी नुकतचे सासुरवाडी जाऊन आलो .फराळ पूर्ण झाला होता .विविध प्रकारची कुकीज कॉफी बरोबर खरच मजा येते .गंमत म्हणजे हा कुकीजचा डबा सासूबाई लपवून ठेवतात कारण नाहीतर माझे सासरे दिवसभरात त्याचा फन्ना उडवतील .बाकी तरुण पिढी मात्र सहसा ह्या फराळ करायच्या फंदात पडत नाही .आपल्यासारखेच रेडीमेड मामला बेकारी जिंदाबाद .आता थंक गिविंग साठी सगळी तरुण पिढी आपल्या घरी परत येतील एकत्र नाताळ साजरा करायला .आम्ही हॉटेलवाले आमचा नाताळ हॉटेलात अमेरिकन भारतीय व उर्वरित जगातील महात्वाकांशी लोकांसमवेत जे सणासुदीला करियर ह्या गोंडस नावाखाली घराबाहेर असतात .अर्थात पापी पेट का सवाल है

त्याचा आणि आमचा . सासूने विविध प्रकारच्या कुकीज केल्या आहेत .त्याचा फोटो देतो .

मला पीठीसाखरेत घोळलेली, मधोमध चांदणी असलेली कूकी हवी तीही त्या पाईन कोनची कड असलेल्या नॅपकीनवर. आणि बरोबर दूधाचा कप (फॅट्फ्री नको).... यम यम!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2010 - 5:35 am | निनाद मुक्काम प...

सध्या मरणाची थंडी आणि बाहेर बर्फाचे साम्राज्य त्यामुळे जॉगिंग वैगैरे जास्त करता येत नाही .म्हणून गोड बेताने खा असा सल्लावजा धमकी सासू माझ्या बायकोला व तिच्या नवर्याला देते (आम्ही १२ सूर्य नमस्कार रोज )
तब्येत राखून असल्याने मला सूट. त्यामुळे आमचे कुटुंब भारतात जाम खुश असते .खाण्यावर बंधन नाही .सगळीकडून नुसते कौतुक प्रचंड खादाडी .
पाहूया कधी जमतेय ते जायला .बाकी लंडनची आठवण येत आहे .सारा मराठमोळा हॉटेलवाला कंपू जाम धमाल करायचो .

अरे वा!! तुम्हीपण का? मीही कमीतकमी बारा सूर्यनमस्कारवाली आहे.
चांगल्या सिझनला रोज एक तास मोकळ्या हवेत व्यायाम नक्की करते. तरी वार्षिक तपासणीत आमचे डॉ. रागवत असतात.
एखादे पौंड कमीजास्त झाले कि कपाळावर आठी येते (डॉ.च्या).;) नेहमी खाण्यावर लक्ष ठेवणे हे त्रासदायक वाटले तरी हिवाळ्यात करावेच लागते.

रेवती's picture

17 Dec 2010 - 7:07 am | रेवती

मला तर सगळेच प्रकार आवडलेत.
सुरेख दिसतायत.

प्राजक्ता पवार's picture

18 Dec 2010 - 1:02 pm | प्राजक्ता पवार

लेख आवडला :)

शाल्मली's picture

18 Dec 2010 - 6:55 pm | शाल्मली

तुम्हाला दोघांना आणि आजी आजोबांना नाताळच्या शुभेच्छा!

लेख मस्त ! लेख वाचून मलाही तिथल्या नाताळची आठवण झाली आणि राकलेटची सुद्धा.. ;)
आणि मिसळपाववरचा माझा हा लेखही आठवला..

आम्हालाही नाताळाबरोबर आपली आठवण झाल्याचे येथे नमूद केले आहे.;)