कामाच्या ठिकाणचे स्नेहसंबंध

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
15 Dec 2010 - 2:34 am

केवढी गरज असते व्यक्तीला समाजाभिमुख रहाण्याची, अन्य लोकांशी निकट स्नेहसंबंध वृद्धींगत करण्याची. आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते. तीच गोष्ट भेटवस्तूंची. मला भेटवस्तू मिळाली तर मी आनंदतेच पण मी जेव्हा कोणाला भेटवस्तू देते आणि ती व्यक्ती, ती भेट स्वीकारते तेव्हा, त्या व्यक्तीचा आनंद पाहूनच, माझा आनंद द्विगुणीत होतो.
नोकरी करणार्‍या व्यक्तींबद्दल मला नेहमी एक जाणवतं ते म्हणजे केवळ नोकरीच्या निमित्ताने त्यांना मिळणारी - समाजाभिमुखता आणि लोकसंग्रह. नोकरीमुळे पैसा मिळणे हा फयदा होतोच होतो पण मला विचाराल तर अजून एक महत्त्वाचा फयदा होतो तो म्हणजे - मानसिक स्वास्थ्य उत्तम रहाणे. अर्थात हे जर चांगले सहकारी मिळाले आणि बाँडींग झालं तरच. परस्पर-संबंध (सोशल इंटरॅक्शन) ही अर्थातच दुधारी तलवार असते. "वळलं तर सूत नाही तर भूत" असे सहकारी देखील क्वचित मिळतात. पण प्रत्येक संबंधामधून सामाजिक पैलू (सोशल नॉर्म्स) हे शिकायला मिळतातच मिळतात.
समाजात वावरताना, आपल्या नकळत आपण समोरच्या व्यक्तीला जोखत, मापत असतो, त्याचवेळेला तिचे चांगले गुण आत्मसात करत असतो, वाईट गुणांवर शिक्कामोर्तब करून त्या व्यक्तीचे गुणांकनही करत असतो. खरच आपला मेंदू या सर्व क्रिया एकाच वेळी, भरभर, सुसूत्र रीतीने पार पाडत विधायक कामात गुंतून रहातो ही मोठी नवलाची गोष्ट नाही का?
आज हे सर्व आठवण्याचं कारण आज, एकीचा वाढदिवस आम्ही साजरा केला. तिने आम्हाला पार्टी दिली वगैरे वगैरे पण त्याहूनही- आज अजून एका मैत्रिणीच्या मुलीला डिसलेक्सिया आहे ही बातमी कळली. अनेक महीन्यांनी ही मैत्रिण ओपन अप झाली. तिचे हे दु:ख ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले. पण अर्थात तिला बोलायला तर आम्ही आहोत हाच त्यातल्या त्यात दिलासा. दुसर्‍या एकीला मूलच नाही. तिला हवं आहे पण होत नाही. प्रत्येकीचं काही ना काही.
तर असे हे निकटचे स्नेहसंबंध, अपल्या गरजेचे आणि कामाच्या ठिकाणी सहज रीत्या फलद्रूप होणारे. प्रत्येकालाच याची गरज असते नाही का?

नोकरीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Dec 2010 - 2:47 am | जाई अस्सल कोल्हापुरी

हो ग्...शुचि छान लिहिलयस.
आणि फक्त कामाच्याच ठिकाणी नाही तर्...इतरहि ठिकाणी वावरताना socially built काहि नाती गुंफत जातो आपण.
त्यामध्ये रक्ताच नसल किंवा काहि ठराविक नाव जरी नसेल ना एखाद्या नात्याला..तरिहि ती छान develop होत जातात.
...

अगदी खरंय!!
आपण आपल्याही नकळत अशी नाती गुंफत जातो.. आणि मग त्यातूनच एक भावनिक बंध तयार होतात जे सुख आणि दु:ख दोन्ही पातळीवर सारखेच असतात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Dec 2010 - 3:11 am | निनाद मुक्काम प...

मेंदू विधायक कामात गुंतला असतो. हीच आपल्या मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे .मला स्वताला कामामध्ये व्यावसायिकता जपायला आवडते .पण स्वभोवतालच्या व्यक्ती मधील वल्ली हुडकायला जाम आवडते .
एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागे त्यांची मानसिकता त्यांचे संस्कार व कारणीभूत असतात .जेवढा आपण त्यांच्याशी संवाद साधतो .तेवढे एक नवीन अनुभवाचे गाठोडे उलघडत जाते .दुसर्याला सल्ला देतांना त्याच्या अनुभवानातून /कथनातून एखाद्या वाक्यातून /शब्दातून आपल्या समस्येचे समाधान मिळू शकते .लोकांच्या समस्या समजून घेतल्या . स्वताच्या सांगितल्या. मनातील विचार बोलून दाखवले .तर मन हलक होतो .वर्किंग इन सेफ आणि हेल्दी वातावरणावर काम केल्याने टीम वर्क करताना टीम मधील प्रत्येक सहकार्याशी रेपो चांगला जमतो व रिझल्ट अप्रतिम येतात .त्यामुळे एका मर्यादेपार्यात ओपन असण्यास काहीच हरकत नाही .

केवढी गरज असते व्यक्तीला समाजाभिमुख रहाण्याची, अन्य लोकांशी निकट स्नेहसंबंध वृद्धींगत करण्याची.

गरज नंतर निर्माण झालेली असते. ती मूलभूत असत नाही, त्यामुळे ती गरज असतेच अशी सर्वसामान्य अपेक्षा/ नियम नसावा.

आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते.

सहानुभूतीपूर्वक ऐकणारा माणूस असेल तर मन उघडं होतं, अन्यथा नाही. विकास समोरच्या व्यक्तीचा असो की स्वतःचा ती सापेक्ष बाब आहे; त्यामुळे वाटण्याला किंमत नाही. फक्त माझं निरिक्षण मांडलय - माझ्याबाबतीत तरी सर्व प्रकारची गरज शून्य आहे.

तीच गोष्ट भेटवस्तूंची. मला भेटवस्तू मिळाली तर मी आनंदतेच पण मी जेव्हा कोणाला भेटवस्तू देते आणि ती व्यक्ती, ती भेट स्वीकारते तेव्हा, त्या व्यक्तीचा आनंद पाहूनच, माझा आनंद द्विगुणीत होतो.

कुतूहल.

नोकरी करणार्‍या व्यक्तींबद्दल मला नेहमी एक जाणवतं ते म्हणजे केवळ नोकरीच्या निमित्ताने त्यांना मिळणारी - समाजाभिमुखता आणि लोकसंग्रह. नोकरीमुळे पैसा मिळणे हा फयदा होतोच होतो पण मला विचाराल तर अजून एक महत्त्वाचा फयदा होतो तो म्हणजे - मानसिक स्वास्थ्य उत्तम रहाणे. अर्थात हे जर चांगले सहकारी मिळाले आणि बाँडींग झालं तरच. परस्पर-संबंध (सोशल इंटरॅक्शन) ही अर्थातच दुधारी तलवार असते. "वळलं तर सूत नाही तर भूत" असे सहकारी देखील क्वचित मिळतात. पण प्रत्येक संबंधामधून सामाजिक पैलू (सोशल नॉर्म्स) हे शिकायला मिळतातच मिळतात.

या खूप जटील गोष्टी वाटतात.

समाजात वावरताना, आपल्या नकळत आपण समोरच्या व्यक्तीला जोखत, मापत असतो, त्याचवेळेला तिचे चांगले गुण आत्मसात करत असतो, वाईट गुणांवर शिक्कामोर्तब करून त्या व्यक्तीचे गुणांकनही करत असतो. खरच आपला मेंदू या सर्व क्रिया एकाच वेळी, भरभर, सुसूत्र रीतीने पार पाडत विधायक कामात गुंतून रहातो ही मोठी नवलाची गोष्ट नाही का?

आपला मेंदू हा शब्द चपखल वापरला आहे.

आज हे सर्व आठवण्याचं कारण आज, एलनचा वाढदिवस आम्ही साजरा केला. तिने आम्हाला पार्टी दिली वगैरे वगैरे पण त्याहूनही- आज अजून एका मैत्रिणीच्या मुलीला डिसलेक्सिया आहे ही बातमी कळली. अनेक महीन्यांनी ही मैत्रिण ओपन अप झाली. तिचे हे दु:ख ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले. पण अर्थात तिला बोलायला तर आम्ही आहोत हाच त्यातल्या त्यात दिलासा. एलनला मूलच नाही. तिला हवं आहे पण होत नाही. प्रत्येकीचं काही ना काही.

डिसलेक्सीया हा गंभीर आजार नसावा. उलट डिसलेक्सीया असलेल्या मुलांचा मेंदू इतरांच्यापेक्षा अत्यंत वेगळा चालतो असा " तारे जमीन पर" पाहुन अंदाज झाला आहे.

तर असे हे निकटचे स्नेहसंबंध, अपल्या गरजेचे आणि कामाच्या ठिकाणी सहज रीत्या फलद्रूप होणारे. प्रत्येकालाच याची गरज असते नाही का?

यात हा धागा वगळता फलद्रूप काय झालंय बुवा ? मैत्रिणीच्या मुलाचा डिसलेक्सीया बरा झाला तरी त्याला अनंत अडचणी येतीलच. एलनला मूल होईल अथवा होणार नाही. दत्तक मुल हा ट्रेंड बनतोय हळूहळू.

सामंतकाकांची उणीव भरुन निघत आहे

टारझन's picture

15 Dec 2010 - 11:12 am | टारझन

कृपया नानांनी प्रो. देसाईं ची उणिव भरुन काढावी.

बाकी लेखिका इतका पॉझिटिव्हली विचार करते हे तिच्यासाठी नेहमीच चांगले राहिल असे वाटत नाही. कळत नकळत समोरच्या (आजुबाजुच्या) लोकांकडुन खुप अपेक्षा आहेत. बाकी अमेरिकेतले लोकं अ‍ॅटिट्युडवाले असतात आणि ते लवकर कोणात मिसळत नाहीत असे आमचे स्त्रोत सांगतात ...
जिवाभावाच्या मैत्रीणी मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मैत्रिणीला सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जमल्यास ब्यु डार्ट किंवा डीएचएल ने केक पाठवता आल्यास बघा.

-( मित्रांसाठी जिगरी मित्रं आणि शत्रुंचा कर्दनकाळ ) टारझन

भाऊ पाटील's picture

15 Dec 2010 - 12:36 pm | भाऊ पाटील

+१
सामंत काकांची उणिव भरुन निघत आहे.
-१
विडंबनांची उणिव जाणवत आहे

-(विडंबनांचा जिगरी मित्रं आणि 'स्वांतसुखाय' शत्रुंचा कर्दनकाळ) चारझण ;)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2010 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार

गेला बाजार प्रि. वैद्यांची उणीव नानाने भरुन काढावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे. तळे मिळाले नाहीतर विहीरीवर फिरायला जावे पण उणीव भरुन काढावी.

आरे टार्‍या ह्या नविन वर्षी तुमच्या ऑफिसमधुन नविन डायर्‍या मिळतील ना रे तुला? काही इथल्या मित्रांना पण दे ना. म्हणजे मिपाच्या सर्व्हरवरचा ताण थोडा कमी होईल. आणि वेळ मिळाला तर एक ब्लॉग कसा काढावा ह्याचे मार्गदर्शन करणारा लेख लिही बरे.

पर्नल नेने मराठे's picture

15 Dec 2010 - 11:47 am | पर्नल नेने मराठे

शुचे मस्त लिहितेस ग ..माझ्याही मनात बरेच असते पण कागदावर उतरवता येत नाही :(
नानाकडे त्युशनला जाइन म्हणतेय ;)

वेताळ's picture

15 Dec 2010 - 11:58 am | वेताळ

मला नाना ची खुप काळजी वाटायला लागली आहे.

यशोधरा's picture

15 Dec 2010 - 12:13 pm | यशोधरा

चांगलं लिहिलं आहेस शुचि.

गवि's picture

15 Dec 2010 - 12:38 pm | गवि

इथे भारतात सहकार्‍यांमधे "ओपन अप" होण्याला जास्त वेळ लागत नाही असं तुमचा हा अनुभव वाचून जाणवलं.

उदा डिसलेक्सिया.. इथे एखाद्याच्या पोराचा आणि काही प्रॉब्लेम असेल्..पण तो बर्‍याचदा सगळ्या हपीसला माहीत असतो आणि त्याचं फार हुळहुळं स्वरूप करण्यात येत नाही.

याचा उलटही परिणाम दिसतो. मगितल्याशिवाय मुबलक सल्ले मिळतात. तुमच्याइथे अमेरिकेत ते मागितल्यावरच आणि खूप जवळीक झाल्यावरच दिले जात असावेत असं वाटतं.

लेख चांगला.

अवांतरः यशवंता..वाक्यावाक्याची ही नीटस तपशिलवार चिकित्सा कुठल्या थेरपीतली ? ..बाराक्षार चिकित्सा, नाडीपरीक्षा इ इ?? ;)

यकु's picture

15 Dec 2010 - 2:06 pm | यकु

नॉडीरिडींग ~!!! ;-)

शुची,
कदाचित माझा हा प्रतिसाद भरकटलेला वाटला तर मला माफ करा.

वैयक्तिकतेचा अतिआग्रह माणसांच्या मनाची कवाडे बंद करत आहे. अहो कार्यालयातील मोकळेपणा सोडाच, सामाजिक पातळीवरही खेळकरपणा लुप्त होत चालला आहे. अलिकडे एका लग्नाला गेलो असताना आलेला हा अनुभव. आमच्या पंगतीला औपचारिक आग्रह करण्यासाठी नवपरिणीत दाम्पत्य आले. सहज कुणीतरी म्हटले, ' नाव घे की ग' त्यावर नववधू म्हणाली, 'श्शी! मला नाही ते तसले बालीश प्रकार आवडत' आणि नवरा मुलगाही गंभीर चेहर्‍याने म्हणाला, 'असं बघा. आपण योग्य वेळी योग्य जागी असावं, हे उत्तम' (माझा शेजारी बसलेला मित्र कानात पुटपुटला, 'च्यायला! लग्नात नाही तर मग हे लोक कुठल्या योग्य जागी नाव घेणार असतील रे?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Dec 2010 - 8:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाव घेण्यात (किंवा न घेण्यात) नक्की काय सामाजिक खेळकरपणा आहे? किंवा नाव न घेणारी व्यक्ती मनाची कवाडं बंद करणारीच असते का?

चारचौघांत स्वतःच्या नवर्‍याचा उल्लेख 'पगडी' असा करणार्‍या सौ. टिळकांची पिढी आणि नवर्‍याला नावानेच हाक मारणार्‍या मुली/स्त्रियांची पिढी यांच्यात सामाजिकरित्या (आणि सर्वच बाबतीत) कोणाला खेळकरपणा दाखवण्याचं जास्त स्वातंत्र्य आहे.

योगप्रभू's picture

15 Dec 2010 - 10:21 pm | योगप्रभू

हे बघा अदिती,
त्या प्रसंगावरुन मला जे वाटले ते सांगितले. जेव्हा जीवनातील छोट्या छोट्या खेळकर गोष्टी लुप्त होऊन त्याची जागा कोरडेपणा किंवा दिखाऊ औपचारिकता घेते तेव्हा माणसे हळूहळू आत्ममग्न होऊ लागतात. स्वतःभोवती कोष विणतात आणि त्यात मोकळेपणाला वाव नसतो. म्हणूनच नोकरीच्या ठिकाणी जिगरी दोस्त मिळत नसावेत, असे सुचवायचा माझा हेतू होता.

एका बिंदूतून सगळ्या दिशांना जाणार्‍या रेषा काढता येतात.

बाकी जीवनातल्या छोट्या छोट्या खेळकर गोष्टी लुप्त होण्यावर बोलण्याएवढी मी मोठी झालेले नाही, तरीही उगाच आमच्या वेळेला काय गंमत होती नाहीतर आत्ताचं जग याची आठवण झालीच.

प्राजक्ता पवार's picture

15 Dec 2010 - 2:08 pm | प्राजक्ता पवार

छान लिहिलयस शुचि :)

गणेशा's picture

15 Dec 2010 - 2:18 pm | गणेशा

बरोबर आहे

कवितानागेश's picture

15 Dec 2010 - 2:22 pm | कवितानागेश

हल्ली कामाच्या ठिकाणी खरे तर स्पर्धेलाच जास्त तोंड द्यावे लागते.
'विद्यार्थी' या पातळीवर असेपर्यंत निकोप मैत्री शक्य असते. पण ऑफिसात पण तुला चांगल्या मैत्रिणी मिळू शकत असतील, तर तू खरच 'लकी' आहेस!

५० फक्त's picture

15 Dec 2010 - 2:50 pm | ५० फक्त

कार्यालयात मॅत्री या व अशा भ्रामक कल्पनांवर विसंबुन आपले नुकसान करुन घेउ नये, भारत असो किंवा अमेरिका नाही तर नायरेजिया कुठेही प्रत्येक जण फक्त आपला फायदा पाहतो. दुस-याकडे मन मोकळे करणे वगॅरे पर्सनल मार्केटिंग टेक्निक असतात.
जे पुर्वी बॉर्न टु विन होतं आता ते बॉर्न टु किल झालेलं आहे. दुस-याला जिंकण्यापेक्षा त्याला मारणं जास्त सोपं असतं.

एकदा हरणारा पुन्हा पलट्वार करणार नाही कशावरुन, त्यासाठी जरा सांभाळुन रहा.

हर्षद.

आत्मशून्य's picture

18 Dec 2010 - 7:01 pm | आत्मशून्य

दो पल मील्ते हाय अन साथ साथ चाल्ते है, जब मॉड आये तो बच्के नीकल्ते है. बाकी शूचीतै म्हणतात ना परीकथा रम्यः तसेच हे आहे... its Mirror of Erised.

ईमोशन आणि प्रोफेशन ह्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवणे चांगले असते. दोन कारणं सांगू शकतो.
१. आपले सगळे मित्र इथ आहेत ह्या समजुतीमुळं कंपनी सोडताना ईमोशनल अत्याचार होऊ शकतो
२. प्रोफेशनमध्ये परिस्थिती मित्राला तुमचा प्रतिस्पर्धी बनवू शकते ( मग ती व्यक्ती मुळात कितीही चांगली असो). त्यावेळी अरे मी ह्याला मित्र समजत होतो आणि आता माझाच गळा कापायला निघालाय असा विचार करून त्रास होतो.
तुम्ही तुमच्या सहकार्यांना जी मदत करताय किंवा सहानुभुती दाखवताय ती माणुसकीच्या नात्यानं दाखवा. चांगल काम करण्यात चुक काहीच नाही. पण मैत्रीखातीर केलं अशा भावनेन करणार असाल तर त्याचा त्रास होउ शकतो.

ती चैन नाही हो परवडत इथे परदेशात. मैत्रीला वेगळे, कामाला वेगळे, घरचे वेगळे. नाही इतके मिळत लोक.

रन्गराव's picture

15 Dec 2010 - 9:11 pm | रन्गराव

हे लक्षातच नाही आलं. :( असो तुम्हाला तुमच्या मित्रांना प्रतिस्पर्धी म्हणून सामोरं जायला न लागो एवढीच प्रार्थना करतो. आणि तशी वेळ आल्यास कोणीतरी कृष्ण आपल्याला मार्ग दर्शक म्हणून मिळो.

टिउ's picture

15 Dec 2010 - 9:14 pm | टिउ

सोन्याचे भाव इतके वाढलेत, कशी परवडणार चैन?
पण तुम्ही परदेशात राहता, तुम्हाला काळजीचं कारण नाही...

असो, लेख वाचला नाही पण तुम्ही लिहिलाय म्हणजे चांगलाच असेल...

स्वानन्द's picture

15 Dec 2010 - 9:02 pm | स्वानन्द

पटलं.

इंटरनेटस्नेही's picture

16 Dec 2010 - 1:54 am | इंटरनेटस्नेही

लेख आवडला. शुचिताई छान लिहितात!

ह्म्म... हल्ली चांगले मित्र मिळण तसेही कठीणच झालं आहे, कामाच्या ठिकाण असो वा जालावरचे मित्र असो तुम्हाला तुमच्या भावना इतरांच्या पर्यंत पोहचवाव्या वाटतात,आणि यात काही चूक नाही. माणुस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि त्याला त्याच्या इच्छा,विचार,भावना व्यक्त करण्यासाठी दुसरा माणुस लागतोच लागतो.
अजुन पर्यंत मी कोणत्याही माणसाला गेंड्याशी गप्पा-टप्पा मारताना पाहिले नाहीये... हा गेंड्यांच्या कातडी पाघंरणारी माणसे मात्र नक्कीच पहायला मिळतात...
भावनांना वाट करु दिली नाही तर त्यांचा कोंडमारा होतो, आणि शेवटी त्याचा तुम्हालाच त्रास होतो.यावर सोपा उपाय म्हणजे उत्तम मित्र शोधणे त्यांची संख्या वाढवणे आणि वायझेड आणि विक्षिप्त लोकांपासुन लांब राहणे.
आता कामाच्या ठिकाणच्या लोकांशी बोलणे गैर आहे का ? नक्कीच नाही. ती देखील माणसेच आहेत आणि त्यांना देखील तुमच्या सारखे मन आणि भावना आहेत.
जेव्हा अयोग्य लोकांबरोबर आपण आपल्या भावना शेयर करतो तेव्हा ते त्याचा फायदा उचलतात किंवा तुम्हाला त्याप्रकारे त्रास देखील देउ शकतात्...पण योग्य माणसे तुम्हाला त्यांना शक्य होइल तितकी मदत करतात.
एक लक्षात ठेवा :--- ज्या प्रमाणे साध्या माणसाला डँबिस माणुस कोण हे कळते, त्याच प्रमाणे डँबिस माणसाला देखील साधा माणूस कोण हे बरोबर कळत असते.

जाता जाता :--- No man is an island इति :--- John Donne

स्वानन्द's picture

16 Dec 2010 - 6:08 pm | स्वानन्द

व्वा! बाणा. मस्त लिहीलं आहे.

>>वायझेड आणि विक्षिप्त लोकांपासुन लांब राहणे
यातून बाणाला काही मोलाचा सल्ला द्यायचा असेल काय?? :)

टारझन's picture

16 Dec 2010 - 6:21 pm | टारझन

बाणाचा प्रतिसाद वाचणखुण म्हणुन साठवण्यासारखा आहे ;)

अवलिया's picture

16 Dec 2010 - 6:23 pm | अवलिया

सहमत. मी तर म्हणतो सोनेरी अक्षरांनी लिहुन फ्रेम करुन ठेवावा...

जियो !!बाणा जियो!!! ... देव तुझे कल्याण करो !!