मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..
शाळेत विषयच नव्हता..
यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय…
म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं..
मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा..
आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो..
आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?” म्हणजे “चहा की कॉफी?” ..
“मुकंदर ऑर सिकंदर ?”.. मेक युअर चॉईस…
कुर्बानी “पिच्चर” मध्ये आप जैसा कोई हे मस्त डिस्को गाणं आलं..
मूळ अर्थ कळत नसल्यानं जे ऐकू येईल ते खरं..
“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो बाप बन जाये..”
सीरीयसली असंच वाटायचं..जोक करायचा म्हणून नव्हे..
मग थोड्या दिवसांनी..
“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो वापस जाये..”
असं…
“तोहफा तोहफा..लाया लाया..”असं गाणं सुपरहिट्ट एकदम..
मला त्यात (शिवाजी महाराजांची असते तशी) “तोफ” हा शब्द दिसून मनापासून कोणीतरी युद्धासाठी तोफा घेऊन आलाय आणि तसं गाऊन श्रीदेवीला सांगतोय असं वाटायचं..
“तोफा तोफा लाया लाया..” काय चूक आहे त्यात?
पाण्याच्या टाकी विषयी माहिती देणारं “टाकी ओ टाकी ओ टाकी टाकी टाकी रे..” असंही एक सुंदर गीत होतं..
“प्यार करनेवाले प्यार करते है ‘शाम’ से..” असंही ढिंगचॅक गाणं माझं लाडकं..
‘शान’से हे नंतर कळलं..
पण संध्याकाळपासूनच चौपाटीवर जागा पकडून बसलेली गुटर्गू मंडळी बघून हा माझा अजाण वयातला अर्थही आता बरोबरच वाटतो..
माझा चाळीतला चाळूसोबती मला सिनेमाची स्टोरी सांगत होता..
“….अरे तो प्रेम चोप्रा ना मीनाक्षी शेशाद्रीवर बलात्कार करतो..”
“म्हणजे काय करतो नक्की ?” मी ज्ञानलालासेनं विचारता झालो..
तो थोडा विचारात पडला..
मग …”अरे बलात्कार..म्हणजे हिकडे तिकडे हातबीत लावून सतावतो तिला तो..”
हलकेच मला समजावत तो वदला..
दोघेही तिसरीत होतो..असो..
मराठी, संस्कृत वगैरे मध्येही ऐकून अर्थ लावण्याची बोंबच होती..
“सा विद्या या विमुक्तये” हे शाळेचं बोधवाक्य मला “चावी द्याया विमुक्तये” असं ऐकू यायचं..
अर्थ नाहीच कळायचा..पण चावी किंवा किल्लीशी संबंधित..चावी द्यायला हवी आहे..किंवा तत्सम काहीतरी वाटायचं..
“सदाचार हा थोर सांडू नये तो” हे मला “सदाचार हा थोर सांडून येतो” असं ऐकू यायचं..म्हणजे “मी जरा जाऊन सदाचार सांडतो आणि येतोच परत लगेच..”
”आज ये अंगणा पाहुणा गोजिरा..” अशी कविता होती..
त्यात “श्रावणी न्हातसे..अश्विनी गातसे..” अशी ओळ होती..
मला आमच्या वर्गातल्या त्याच नावाच्या मुली अनुक्रमे नहात आणि गाणं गात आहेत असं डोळ्यासमोर यायचं..
“आली आली सर ही ओली..” हे गाणं ऐकलं की आमच्या रत्नागिरीच्या धुवांधार पावसात भिजून ओले झालेले साळवी सर (सर्वात कडक्क सर..!!) वर्गाच्या दारात आलेत असं वाटायचं..
गंजका खिळा,पत्रा वगैरे लागला की धनुर्वात होतो असं ऐकलेलं..आम्ही एकमेकांना सांगायचो..”अरे पत्रा लागलाय ना तुला..आता तुला धनुर्विद्या होणार”.. की बिचारा कापलेला पोरगा गळफटायाचा..
नगरपालिकेच्या व्यायामशाळेत दर शनिवारी शेंदूर लावून आम्ही सगळे हनुमान स्तोत्र म्हणायचो..
तालीम मास्तर खड्या आवाजात “भीमरूपी महारुद्रा” सुरु करायचे..
खोब-याच्या आशेनं आम्ही उभे असायचो..
त्यात एका ठिकाणी “हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी..” अशी ओळ यायची..
मला एकदम वाटायचं की श्लोक संपले आणि मास्तर काहीतरी “हे धर” म्हणून सांगताहेत..म्हणून एकदा मी “धरायला” पुढेही झालो होतो..
पुढे हायस्कूल सुरु झालं..बरंच काही नीट समजायला लागलं..जमिनीवर टाकून बसायची बस्करं गेली आणि लाकडी बेंच आली..
मग चुपचाप समोरच्या डेस्कात कर्कटकानं खोदखोदून आरपार भोकं पाडण्याची वर्षं सुरु झाली..
मज्जा..!!
प्रतिक्रिया
24 Nov 2010 - 11:39 pm | शुचि
ही ही मस्त लेख : )
फ्रेन्च च्या बाई शिकवत असताना मला सारखं "सतश्री अकाल" ऐकू यायचं देवाशप्पत!!!
असं होतं खरं.
25 Nov 2010 - 12:28 pm | जागु
मस्तच. खुप असले.
अस प्रत्येकाच होत. मलाही असच काहीपण ऐकायला यायच.
24 Nov 2010 - 11:53 pm | मस्त कलंदर
हाहाहा.. मी त्या तोहफा तोहफा गाण्याला -खोचा खोचा खोचा म्हणायचे म्हणे.. आधी वाटायचं माझ्या कानपुरात हडताल म्हणून होत असेल. आता कळलं, मी एकटीच अशी नव्हते.
बाकी, हिंदी न येणं आणि मराठी येणं याच्यातून घडलेला प्रसंग आठवला.
मी पहिलीत असताना कथाकथनाच्या आणि गायनाच्या(?) स्पर्धेत भाग घेतला होता. कथा होती इसापनीतीतली चंडोल पक्ष्याची आणि गाणं मात्र मास्तरांनी हट्टाने अनुप जलोटांचं 'तुम चंदन हम पानी' घ्यायला लावलं होतं. त्या गाण्यात 'जैसे सोनेपे खिलत सुहागा' अशी ओळ होती. मी गाणं पाठ तर केलं, पण देवाच्या गाण्यात असा शब्द???? तेव्हा तर त्या अर्थाचा एकच शब्द माहित, आणि तो कमी की काय म्हणून त्याला एक 'सु' पण लावून ठेवलेला!!!!! आता तो मी खरंच स्पर्धेत सगळ्यांसमोर म्हणायचा का हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न होता. मी तर त्या ठिकाणी बसणारा दुसरा शब्दही शोधायच्या मागे लागले होते. आईने शेवटी 'मला त्याचा अर्थ माहित नाही, पण काहीतरी चांगलाच आहे आणि तो तू देवाच्या गाण्यात म्हणू शकतेस' असं सांगितल्याने तो नाद सोडला!!!
25 Nov 2010 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कहर आहे हा ... नशीब मला एवढ्या बालवयात हिंदी नाही शिकवलं कोणी!
आता उदाहरणं आठवत नाहीयेत, पण सक्तीने पाठ करून घेतलेल्या अनेक संस्कृत स्त्रोत्रादिंनीही माझ्या बालमनावर भलभलते परिणाम केले होते.
25 Nov 2010 - 12:10 am | यकु
मला झेरॉक्स आणि एक्स-रे वाले यांच्यातल्या फरकाबद्दल अजूनही भानगड होते. म्हणजे झेरॉक्स काय आहे आणि एक्स-रे काय आहे ते माहितीय पण मेंदूत पक्क्या झालेल्या डाटामध्ये अजूनही कन्फ्यूजन आहे.
माझ्या एक्स-रे टेक्नीशियन मित्राची दुसर्याला ओळख करून देताना माझ्या तोंडून सतत हे जातं -
"हा अमुकतमुक हा अमक्या ढमक्या ठिकाणी झेरॉक्स काढतो"
आणि मग मी त्या मित्राच्या शिव्या खातो.
26 Nov 2010 - 10:24 am | गवि
>"हा अमुकतमुक हा अमक्या ढमक्या ठिकाणी झेरॉक्स काढतो"
आणि मग मी त्या मित्राच्या शिव्या खातो.
नॅचरली..
25 Nov 2010 - 1:41 am | प्राजु
खूप खूप आहेत माझ्या आशा आठवणी.
यशोदाका नंदलाला ब्रीज का उजाला है.. हे गाणं मी नेहमीच यशोदा का नंदलाला निजका उजाला है असं म्हणायचे
आज माझ्या लेकाला.. प्रेम की नय्या है राम के भरोसे च्या ऐवजी प्रेम की 'मैय्या' है राम के भरोसे.. हे गाताना ऐकते तेव्हा माझ्या या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येतात. :)
25 Nov 2010 - 1:48 am | रेवती
खी खी खी....
मलाही असे बरेच शब्द वेगळेच ऐकू यायचे.
'जसे शेपटीच्या झुबक्याने झाडून जाईल फार' (खारच्या ऐवजी)
असे बरेच आहेत पण तुमचे 'तोफा' आणि 'प्यार करते है शामसे' मात्र भारी!
25 Nov 2010 - 8:37 am | आनंद घारे
त्याला पुढे 'सुव्वरा' असे का म्हणतात?
"काय करू मी ते सांगा" यानंतर "ह... पांडुरंगा" ही काय भानगड आहे?
लहानपणी पडलेले प्रश्न!!
26 Nov 2010 - 10:34 am | गवि
घारेजी, मी आपला ब्लॉग अधूनमधून ऑलरेडी वाचतोच.
"निवडक आनंदघन"मधल्या विमानांवर असलेल्या लेखाला प्रतिक्रिया दिली (ल्या) होत्या. नंतर बराच काळ आपल्या उत्तराची वाटही पाहिली.
खूपच अभ्यासपूर्ण असतात आपले लेख..
25 Nov 2010 - 9:28 am | स्पा
आमच्या शाळेत सकाळी सकाळी भक्तीगीत लावलेली असायची.......
त्यातल्या "थकले रे नंदलाला" ची मुलं "थुकले रे नंदलाला" अशी वाट लावायचे.......
25 Nov 2010 - 9:27 am | स्पा
आप जैसा कोई मेरी जिंदगी मी आये तो " बाप" बन जाये.......
असं ऐकू यायचं....
अनुमोदन......... ;)
25 Nov 2010 - 12:08 pm | विलासराव
मेरी जिंदगी मी आये तो " बाप" बन जाये.......
असं ऐकू यायचं....
+१ .
अनुमोदन.
25 Nov 2010 - 12:10 pm | विलासराव
.
25 Nov 2010 - 9:39 am | स्पंदना
हो आम्ही पन 'बाप' च म्हणायचो !
त्याच्या पुढ जाउन वात्रट पोर 'लैला मै लैला' च्या पुढ ' चड्डी काढ पैला ' म्हणायची. तेंव्हा हसु यायच चार लोकात चड्डी हा शब्द म्हंटला म्हणुन आज्....जाउ दे !
आमच धनी आज पत्तोर ' गालावरती गुलाब जामुन आई म्हणाली काय घडले? ' असच गाण म्हनत्यात.
19 Mar 2016 - 2:12 am | खटपट्या
लोळतोय....
25 Nov 2010 - 9:49 am | नंदू
मलाही 'या गडे नाचुया' हे गाणं वेगळंच ऐकू यायचं. :-)
25 Nov 2010 - 10:53 am | गवि
हो.. जाम मजा.
न.मा.न. या मराठी सचिनपटात चला ना गडे गाणं आहेच..
9 Feb 2013 - 6:22 pm | आदूबाळ
"या गडे हासू या, या गडे नाचूया" हे गाणं "दिल तो पागल है" आणि "संदेसे आते है" या दोन्ही चालींवर म्हणता येतं! प्रयत्न करून पहा...
25 Nov 2010 - 10:14 am | राजा
रोते रोते हसना सि़खो या गाण्यात एका ओळीत असे होते बस यहि छोटीसि अपनी सारी दुनिया पण मी मात्र बस मे हो तो टिसी अपनी सारी दुनिया असे म्हणायचो.
तसेच रात्र काळी घागर काळी याचे रात्रपाळी असे म्हणायचो कारण शेजारचे काका कामावर रात्रपाळी ला जायचे
25 Nov 2010 - 10:50 am | गवि
राजेसाहेब,
बस विषयीचं तुमचं वाचून हसलो खूपच कारण मला ज्यूलीमधलं ते "ना कुछ तेरे बस में ज्यूली, ना कुछ मेरे बस में" आठवलं.
अर्धवट हिंदी समजायला लागलेलं. आणि तुझ्या बसमधे काही नाही आणि माझ्याही बसमधे काही नाही असं म्हणत दोघे वेगवेगळ्या बसने (मुलींची वेगळी, मुलांची वेगळी) असे ट्रिपला चालले आहेत असं काही दृश्य या गाण्याच्या वेळी सिनेमात असेल असं वाटायचं.
25 Nov 2010 - 10:40 am | योगी९००
सर्वांचे किस्से वाचून मला माझे लहानपण आठवले..असे बरेचसे किस्से आहेत..
करूणाष्टके म्हणताना "रघुपती मती माझी आपुलीशी करावी" हे मी कायम "आपुली शी करावी" असे म्हणायचो..एकदोनदा मार पण खाल्ला पण फार उशिरा कळले की ते "आपुलीशी" असे आहे. शिकवणारे मास्तर मात्र एकदम सिरीयस होऊन हा श्लोक म्हणायचे. मलाच आश्चर्य वाटायचे की त्यांना कसे काय हसू येत नाही ते..
आपजैसा कोई चा किस्स तसाच. हो आम्ही पण 'बाप' च म्हणायचो ! त्याचे मराठी रुपांतर कोठे तरी ऐकले होते..येताजाता तेच गुणगुणायचो (म्हणजे बोंबलायचो) ..काहीतरी असे होते "तुमच्यावाणी कोणी माझ्या जिंदगीत येईल तर लई झ्याक होईल.." बहुतेक एका पॅरेडी साँगमध्ये होते ते..पण त्यात मुळ गाण्याची मज्जा नाही.
असे किस्से हल्ली पण होतात..काही हिंदी गाणी तशी येताजाता किंवा टिव्हीवर झलक अशी पाहिलेली असतात त्यामुळे पटकन त्याचे शब्द कळत नाहीत्..."मधुबन में कन्हैया किसी को पी के मिले" असे ऐकल्यावर चाटच पडलो होतो..वाटले होते की आता मोर्चे निघणार..पण नीट कान देवून ऐकल्यावर लक्षात आले की "किसी गोपीको मिले" असे आहे.
25 Nov 2010 - 10:46 am | गवि
..."मधुबन में कन्हैया किसी को पी के मिले"
27 Dec 2012 - 5:36 pm | Mrunalini
बापरे...
मला आता पर्यंत वाटत होत कि ते खरच पी के आहे...
मला वाटले होते कि काहितरी उद्रु मधे शब्द असेल पी के वेगरे...
:D
10 Feb 2013 - 10:15 pm | आनन्दिता
उद्रु???? हे काय आहे..?. हिब्रु ऐकलं होतं... हे काही नविनच!!
25 Nov 2010 - 10:54 am | मस्त कलंदर
मधल्या गोष्टीत रात्रीपेक्षा सकाळी जास्त शहाणपण सुचतं त्याच धर्तीवर मला आता आठवलेले काही नमुने:
१. माझी एक छोटी मैत्रिण मैने प्यार किया मधल्या 'मैं लडकी हूँ' च्या गाण्यात 'रिश्ता नहीं है दोनोंमे फिरभी'च्या ठिकाणी 'दिसता नहीं है दोनोंको फिरभी' म्हणायची
२. एकदा बसमध्ये वेडा चढला होता तो दिलमधल्या 'जाने कहाँ दिल खो गया'च्या गाण्यातल्या 'करवट'ला पर्बत बनवून 'पर्बत बदल बदलके रात बिताऊं मैं' गात होता. माझी मात्र त्याला रात्री झोप येत नाही म्हणून तो इकडचा पर्वत तिकडे करत बसलाय हे व्हिज्युअलाईज करून हसून हसून पुरेवाट झाली.
३. पुढचे किस्से अस्मादिकांचेच. 'देव माझा विठू सावळा, मान त्याची माझी आवळा' हे गाणं मी अजूनही अस्संच म्हणते.
४. 'जेव्हा तिची नि माझी' कधीतरी लहान असताना ऐकलं आणि ते 'केसातल्या जुईच्या केरात गंध होता' असंच ऐकू आलं. मग 'केरात गंध कसा काय असेल' डोक्यात प्रश्नही माझाच आणि 'सुकलेला गजरा सकाळी काढून केरात फेकला असावा बहुधा' हे उत्तरपण माझंच!!!!
25 Nov 2010 - 11:08 am | गवि
'रिश्ता नहीं है दोनोंमे फिरभी'च्या ठिकाणी 'दिसता नहीं है दोनोंको फिरभी' म्हणायची
:-)
दोघांनाही दिसत नसेल तर "रस्सी"ने एकमेकांना बांधून (हाताला हात) चालणं आवश्यकच आहे.
रच्याक. तुमच्या कॉमेंट्सच्या या ओघात आणि आठवलं:
"मारे हिवडा में नाचे मोर" (चू.भू.द्या.घ्या.)
ऐवजी
"मारे हिजडा में नाचे मोर"
असं मी कॉलेजमधेही म्हणायचो..आणि मित्र खवटायचे.
"मारे हिवडा में नाचे मोर" चा अर्थ अजूनही माहीत नाही..लॉजिकली "अंगण" किंवा "छप्पर" असावं. कारण मोर अशा ठिकाणी नाचू शकेल.
आणि
"मारे हिजडा में नाचे मोर" या माझ्या व्हर्शनला तरी असा काय अर्थ होता..?!
25 Nov 2010 - 1:56 pm | मस्त कलंदर
हिवडा म्हणजे हृदय असावे. 'मोरनी बागामां बोले' मध्ये 'मारे हिवडेमे लग गयी कटार रे' अशी ओळ आहे. त्यावरून असं निदान मला तरी वाटतंय
27 Dec 2012 - 5:28 pm | समीरसूर
'देव माझा विठू सावळा, मान त्याची माझी आवळा'
ऑस्सम्म्म्म्म.....हसून माझ्या डोळ्यात पाणी आलं बघा...
'परबत बदल बदल के...'
जबरा!! :-)
काही काही गाणी असतात अशी. 'अवचिता परिमळू, जुळकरा अळू माळू' हे मला कधीच यायचं नाही. मी म्हणताना नेहमी 'अवचिता परिमळू, अळी मिळी गुप चिळी...' असलं काहीतरी बडबडायचो.
आणि 'स्पायडरमॅन स्पायडरमॅन मंदबुद्धी स्पायडरमॅन...' हे तर ठरलेलं...
'आय एम अ डिस्को डान्सर...जिन्दगी मेरा कांदा..." म्हटलं च्यायला याची जिंदगी कांदा कशी काय? जिंदगी काय कधी कांदा, बटाटा असते काय? नंतर कळलं, ते गाना होतं.
'दम दम मस्त है, ये कैसी जस्त है....' अजून जड जातं म्हणतांना...जस्त काय जस्त?
प्रतिसाद वाचून मजा येतेय...
सुरेख धागा...
27 Dec 2012 - 5:34 pm | गवि
आँ???
"झुळकला" असं आहे ना? %)
27 Dec 2012 - 5:44 pm | समीरसूर
अजून कन्फ्युजन आहे...असेल असेल झुळकला असेल...मला अजूनही कळलेलं नाही. पण झुळकला म्हणजे काय? किंवा जुळकरा म्हणजे तरी काय? आणि आळू माळू...काय कळत नाही...जाणकारांनो...प्रकाश टाका..
27 Dec 2012 - 6:09 pm | गवि
हे पहा, माझा अंदाज असा आहे, किंवा होता, की परिमळु म्हणजे सुगंध असावा, आणि तो झुळकला म्हणजे वार्यासोबत दरवळला अशा अर्थाने "झुळुकेसारखा" काहीसा शब्द असावा.
जुळकराचा अर्थ काय हे माहीत नाही. हात जोडण्याशी संबंधित असावा.
हे राम..
25 Nov 2010 - 11:07 am | sneharani
मस्त लेख!
शाळेत असताना प्रार्थना होती
"सर्वात्मका शिवसुंदरा
स्विकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे
प्रभु आमुच्या जीवना"
त्यातील तिमिरातुनी तेजाकडे हे मी" तुम्ही रहा तुम्ही तेज्याकडे" असं म्हणायची अर्थात त्याचा अर्थ मला लागायचाच नाही अन् सगळेजण असेच म्हणतात असं वाटायचं. म्हणून मी पण त्यांच्या सुरात सूर मिसळून असचं म्हणायची.
नंतर पाठ्यपुस्तकात ही कविता बघून माझी म्हणण्याची पध्दत बदलली.
25 Nov 2010 - 11:28 am | गवि
अत्तिशय अनपेक्षित पण छान वाटणारे डिट्टो अनुभव दिसताहेत सर्व मिपाकरांचे.
"तिमिरातुनि तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना" ऐवजी "तिमिरातुनि ते ज्याकडे प्रभु आमुच्याने जीवना"
यात ज्याकडे म्हणजे कुणिकडे बुवा? काहीतरी अपूर्ण दिसतंय असंही वाटायचं. आणि आमुच्याने जीवना म्हणजी लिटरली "माझ्याने, माझ्याच्याने, आमच्याने" आता नाही बुवा हे काम किंवा जीवन ओढवत यापुढे असं विचित्र अर्धवट काहीतरी वाटायचं.
मूळ अर्थ समजून घ्यायची इच्छा होती कुठे आणि प्रयत्न तरी कधी केला म्हणा.
सगळंच थोपलेलं. सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं आपणही.
25 Nov 2010 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार
चान चान.
कधी कधी मला मिपावर आलोय का तुमच्या ब्लॉगवर हेच कळत नाही. ;)
25 Nov 2010 - 11:53 am | Pain
कोण बोलतय बघा!
तरी बर हे संपूर्ण लेख टाकतात नाहीतर तू...अर्धवटराव!
क्रमशः क्रमशः करून फरार होतोस.
25 Nov 2010 - 12:55 pm | गवि
परासाहेब,
मी काहीही लिहिलं तरी आपली प्रतिक्रिया मिष्किलच पण आता एकाच प्रकारची येऊ लागली आहे म्हणून हा खुलासा. :-)
स्पष्टच आहे की मी माझ्या ब्लॉगावरून उचलून लेख इथे टाकतोय. म्हणून ते भराभर येताहेत. कधीतरी खास मिपासाठी लिहीनही.
सर्वांना जुन्या ब्लॉगपेजेस वर व्हिजिट करायला लावण्यापेक्षा इथे आणून टाकले की सगळ्यांनाच बरं पडतं.
मिपावर
१. स्वतःच्याच जुन्या ब्लॉगवरून पोस्टे टाकणे.
२. दिवसाला ठराविक / आठवड्याला ठराविकपेक्षा जास्त टाकणे.
असे चालत नसेल तर मला सांगावे..टाकणार नाही..आपला शब्द प्रमाण मानण्यात येईल..
25 Nov 2010 - 5:02 pm | सविता
हे बघा गवि साहेब..... लेख चांगला आहे की नाही हे सगळ्या वाचकांच्या प्रतिक्रियेवरून ठरवा... एका नाही....
मिपा ला संपादक मंडळ आहे.... ज्याचे परा सदस्य नाहीत...
पुर्वी मिपा कुणाच्या तरी खाजगी मालकीचे होते.... ते पुर्वाश्रमीचे मालकही श्री परा नाहीत....
त्यामुळे काय चालते आणि काय नाही हे कॄपया संपादकांना विचारावे.
25 Nov 2010 - 5:16 pm | गवि
तसे नव्हे.
इथे खोचकपणा नाही हे सर्वांना पटणं खरोखरच अवघड जाणार आहे. पण :
१)पोस्ट टाकणार नाही असं म्हणून माझ्या इथल्या लिखाणाविषयी मला कसलाही भाव खायचा नाही.
२) मला बर्याचशा वाचकांचा पाठिंबा आहे असं सिद्ध करून आपली जागा अधिक पक्की करायची नाही.
३) मला मेजॉरिटीच्या नियमाने इथे लिहीत रहायचे नसून प्रत्येक वाचकाला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. मला सर्वांनी वा वा अप्रतिम, छान असं म्हणावं तरच मी लिहीत राहीन असं नसून अगदी विरोधात बोलणार्यांचंही मनापासून स्वागत आहे.
मात्र इथे हा प्रस्तुत विरोध (किंवा गंमत, खेचाखेची वगैरे) कोणत्याही एका लेखाला, किंवा त्यातल्या मुद्द्याला नसून एकूणच माझ्या लिहीण्यालाच आहे. म्हणून त्याची अशी दखल घेऊन शब्द प्रमाण मानला जाईल असं म्हटलंय.
हे एक मित्रमंडळ आहे. इथे एकालाही दुसर्याचं अस्तित्व नकोसं असेल (एखाद दोन लेख न आवडणं नव्हे.) तर त्याला काही अर्थ नाही आणि मजाही नाही.
आणि मजेशिवाय दुसरं काही शोधायला मी इथे आलोच नाहीये.
26 Nov 2010 - 12:04 am | विश्वनाथ मेहेंदळे
मी हल्ली मिपा वर येतो ते असे चांगले लेख वाचायला आणि अनुभव ऐकायला. पाचकळ विडंबने, डावी-उजवी सोंड, मारुतीची शेपटी, कंपूबाजी हे सगळे बघायला नाही. ते प्रकार जेवणातील मीठाप्रमाणे असावेत, किंचित चवीपुरते. कधीतरी वाचायला बरे.
त्यामुळे तुम्ही लिहित रहा. कुणाचे ऐकायचे आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचे(मिपाच्या भाषेत फाट्यावर मारायचे) हे कळेल काही दिवसांनी तुम्हाला. तूर्तास काही लोकांना इनो ची जोरदार खरेदी करू देत.
अवांतर :- इनो बनवणारी कंपनी कुठली, शेअर खरेदी करून ठेवीन म्हणतो :-)
26 Nov 2010 - 12:05 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>हे एक मित्रमंडळ आहे
सहा महिन्यांनी बोलूया या वाक्याबद्दल
25 Nov 2010 - 11:42 am | राजा
आता तरी देवा मला पावशिल का सुख ज्याला म्हणत्यात ते दावशिल का तर मी सुख ज्याला म्हणत्यात ते दावशिल का च्या एवजी तुप ज्याला म्हणत्यात ते लावशिल का असे म्हणायचो
25 Nov 2010 - 9:21 pm | स्वैर परी
मी देखिल हेच म्हणयचे!
25 Nov 2010 - 11:49 am | Pain
हाहाहा..लेख आणि प्रतिक्रिया आवडल्या :)
25 Nov 2010 - 11:49 am | डॉ.श्रीराम दिवटे
मस्तच!
सर्वांचे प्रतिसादही वाचनीय...
25 Nov 2010 - 1:06 pm | तिमा
'उध्दवा आजोबा पुढे सरका' असं ऐकू यायचं.
राधे 'विणते' मंथन चाले, याचा अर्थ राधा मंथन चालू असताना विणत आहे असा वाटायचा.
डीव्ही पलुस्करांचे 'चालो मन गंगा जमुना तीर' हे सॉलोमन गंगा ...... असे ऐकू यायचे.
25 Nov 2010 - 1:21 pm | मृत्युन्जय
हाहाहा. बालपणी आमच्या आयुष्यात पण हिंदी इंग्रजी येत नसल्यामुळे बर्याच गमती घडल्या आहेत.
४थी तुन ५वीत जाताना बाबांची बदली सातार्याहुन इंदौरला झाली. त्यामुळे ५वीला मी हिंदी माध्यमाच्या शाळेत होतो. ४थी पर्यंत हिंदी अजिबात येत नव्हते आणि इंग्रजी सुद्धा नाही. इंदौरला मात्र शाळाच हिंदी माध्यमाची होती आणि इंग्रजी सुद्धा पहिलीपासुन होते.
इंग्रजीच्या मिसनी (इंग्रजीच्या तेवढ्या मिस बाकी सगळ्या दीदी) एकदा शिकवत असताना मला विचारले "what is our schools motto?" एका महिन्यात what is our schools हे चार शब्द मी चांगले शिकलो होतो पण motto य शब्दावर गाडी अडली. motto हा शब्द माझ्या कंबरेच्या घेरावरुन वापरला असावा असा समज झाला.
दुसर्या एका प्रसंगात नेमकी उलटी परिस्थिती होती. आमचे रिक्षावाले काका एकदा माझ्यावर कुठल्यातरी कारणाने भडकले होते. तेव्हा तेरी अकल भी तेरे जैसे मोटी है अश्या शब्दात त्यांनी माझी प्रशंसा केली. आता अकल मोटी म्हणजे मोठी म्हणजेच जास्त असा अर्थ मी घेतला आणि तोंड वर करुन खीखी हसलो. रिक्षावाले काका अजुनच भडकले.
बाकी तो तोहफा चा प्रसंग तर हिट्ट अगदी. मला पण ते तोफा असेच वाटायचे.
हिंदी पिक्चर मध्ये एक प्रसंग असायचा. असतो. हवालदार कुठल्यातरी चोराला पकडतो आणि त्याला म्हणतो चलो ठाने. आता हे ठाने म्हणजे ठाणे नावाचे गाव आहे असा माझा अगदी ठाम समज होता. त्यामुळे बाबांची जेव्हा ठाण्याला बदली झाली तेव्हा माझ्या हृदयात धडकी भरली की ज्या गावात सगळ्या चोरांना एकत्र करतात त्या गावात जायचे. भारतातल्या सगळ्या चोरांना ठाण्यालाच का नेतात आणि कसे नेतात हा प्रश्न मला बरेच दिवस सतावत होता.
25 Nov 2010 - 1:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता सुटला असेल नै! ;-)
25 Nov 2010 - 2:09 pm | मृत्युन्जय
ठाण्यात पोचल्या पोचल्या २-३ महिन्यातच सुटला तो प्रश्न :)
25 Nov 2010 - 4:52 pm | योगी९००
मी पुर्वी एक किस्सा मि.पा.वर कोठेतरी लिहीला होता...तोच परत लिहीतो..
मी सहावीत असताना एका मास्तरांनी .."रेल्वेस्थानक पर एक घंटा" असा निबंध लिखो असे सांगितले.. मी पण "घंटा" चा अर्थ "तास" असा न घेता , वाजणारी घंटा असा घेऊन काही टेपा लावल्या..."परसो मै स्टेशनपर गया था | वहा मैने एक घंटा देखी| वो टण टण बजती थी|" वगैरे वगैरे....
मास्तरांनी तो निबंध वर्गात वाचून दाखवला होता..(पहिल्यांदा मला कळलेच नव्हते की पोरं का हसत आहेत ते..)
25 Nov 2010 - 4:53 pm | गवि
:-)
25 Nov 2010 - 5:25 pm | स्वानन्द
हा हा... एकदम निरागस!
25 Nov 2010 - 10:10 pm | विलासराव
तुमचा निबंध खुप आवडला.
कधीचा हसतोय.
25 Nov 2010 - 2:08 pm | सविता
लय भारी
25 Nov 2010 - 2:10 pm | गणेशा
मस्त लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया ही ..
वाचुन वाचुन पुरे वाट पार ...
माझ्याकडे ही बरेअचसे असे अनुभव आहेत .. अआणि यातले पण काही किस्से सेम आहेत ...
मजा आली ...
25 Nov 2010 - 4:58 pm | स्वाती२
:D
25 Nov 2010 - 5:18 pm | अविनाशकुलकर्णी
मी पण् किति दिवस् "मति मंद् झाल्या तारका" म्हणत् होतो..
नंतर सखी असे कळाले कळाले...सखीने समजावल्या वर
तसेच रघुपतीं राघव राजाराम..सबको संतती दे भगवान असे गुणगुणायचो..
गांधि जयंतिच्या वेळी निट गाणे ऐकले व स्न्मति ऐकुन मलाच हसु फुटले
तसेच श्रीमंता घरच्या काहि पोरींना भिकेचे डोहाळे लागतात..व ड्रायव्हर वगैरे आवडायला लागतो त्यावर अमिर खानचा एक टुक्क्क्क्क्कर सिनेमा होता
त्यातल्या गाण्यातले शब्द पलदेसी पलदेसी असे बोबडे आहेत का परदेसी परदेसी असे आहेत हे अजूनही कळाले नाहि
25 Nov 2010 - 5:22 pm | गवि
पलदेसी पलदेसी असं डोक्यात बसण्याचं कारण मुख्यतः हे असावं की ते भिकार्यांचं चोजन वन साँग होतं.
ते अशा बोबड्या टोन मधे म्हणायचे.
बाकी मति मंद तारका..!!
खी खी खी.
25 Nov 2010 - 6:06 pm | सविता
"मति मंद तारका..!!"
25 Nov 2010 - 6:09 pm | मेघवेडा
आजोबांना "नाचत ना गगनात नाथा" गाणं खूप आवडायचं. जवळजवळ दररोज ऐकायला बसत ते. मला दुसरी-तिसरीत वगैरे असताना गाणं पाठ झालं होतं. पण शेवटच्या कडव्यात "तीही वरची देवाघरची दौलत लोक पहात नाथा.." चं मी नेहमी "टीव्हीवरची देवाघरची..." असंच म्हणायचो!
"दिलबर दिल से प्यारे..दिलबर " या गाण्यात मला नेहमी "बिरबल"च ऐकू येई!
"विठ्ठल आवडी प्रेमभावो" गाण्यात "विठ्ठल नामाचा रेटा हो!" म्हणजे काय हे फार मोठं कन्फ्युजन होतं!
बरेच जण "संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे.." म्हणतात. गणपती काय संकष्टीलाच पावावा का? तसेच, शंकराची आरतीसुद्धा बरेच जण "लवलवती विक्राळा" अशी सुरू करतात! ही सुद्धा ऐकण्यात झालेली चूकच असणार.. पिढ्यानपिढ्या पुढे ट्रान्स्फर झालेली!
25 Nov 2010 - 6:36 pm | गवि
मेवे, ते संकटी पावावे असं असेल काय?
आणि "साई विवाद करता पडलो प्रवाही तेथुनि भक्तालागे" असंही कायसंसं एका आरतीत..:-)
25 Nov 2010 - 11:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे
१) गवि, तुमचे बरोबर आहे. ते संकष्टी नसून संकटी आहे. गणपती विघ्नहर्ता असल्याने संकटात त्याची आठवण येणे साहजिक आहे.
२) ते लवलवती नसून लवथवती आहे. लवथवणे हे क्रियापद अजून कुठे वापरलेले मी ऐकले नाही. त्याचा निश्चित अर्थही माहित नाही मला.
३) ते साई विवाद नसून साही आहे, देवीच्या आरतीतील त्या ओळीचा अर्थ शोधायचा थोडा प्रयत्न केला होता. कुणीतरी मला "चारी श्रमले" म्हणजे चार वेदांचा संदर्भ आहे, आणि साही म्हणजे सहा रिपू असे काहीसे सांगितले होते. पण पूर्ण अर्थ नक्की तेव्हाही नव्हता कळला. पण ते साई नाही हे नक्की. साई हे प्रस्थ गेल्या काही वर्षात वाढले आहे.
४) "तेथुनि भक्तालागे" हे वाक्य "ते तू भक्तालागी" असे आहे माझ्यामते.
26 Nov 2010 - 12:42 am | मेघवेडा
चारी श्रमलो परंतु न बोले काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही
हे देखील विनोदीच! देवीची आरती चालू झाली की मी नेहमी मजा बघतो या ओळींच्या वेळी! माझ्यामते पुरूषांनी स्त्रीलिंगी क्रियापद कसं वापरायचं म्हणून 'श्रमले', 'पडले' चं 'श्रमलो', 'पडलो' झालं असावं. आणि आता पिढ्यानपिढ्या ज्ञानप्रदानातून ते आजच्या पिढीकडे आलं असावं. कारण मी बर्याच ठिकाणी श्रमलो, पडलोच ऐकलेलं आहे. चुकून कुठे श्रमले, पडले ऐकलं की फार बरं वाटतं कानाला! ते अख्खं कडवं नीट वाचल्यास 'श्रमले' नि 'पडले'च योग्य आहे हे कळते.
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडले प्रवाही
तें तू भक्तांलागी पावसि लवलाही
यात 'चारी श्रमले' ला वर मेहेंदळ्यांनी म्हटल्याप्रमाणे वेदांचा रेफरन्स आहे. तुझं गुणगान करता चारही वेद श्रमले, थकले. त्यांच्याकडून आता काही बोलवत नाही. 'साही विवाद करिता पडले प्रवाही' ला भारतीय तत्त्वज्ञानातील षडदर्शनांचा (वैशेषिक, न्याय, मीमांसा, सांख्य, योग नि वेदांत) संदर्भ आहे. ही षडदर्शने वेदांना मानतात. (वेदप्रामाण्य - अधिक माहितीसाठी नानाश्रींशी संपर्क साधावा.) त्यामुळे वेदांच्या संदर्भांनंतर त्यांचा संदर्भ सयुक्तिक आहे. तर हे दुर्गे, तुझं गुणगान गाता गाता चतुर्वेदही थकले नि सहाही पंथ - तीच षडदर्शने - विवाद करता प्रवाहात पडले (मात्र अजून त्यांनाही दुर्गचं खरं रूप, तिची शक्ती वर्णिता आलेली नाही). मत्र बरेच जण आपणच श्रमलो नि प्रवाहात पडलो, देवीच काही बोलत नाही अशा अर्थाने श्रमलो, न बोले, पडलो असं म्हणतात!
असो. मी शक्य तितक्या जणांना सांगत असतो योग्य रूपं. लोक चुकीचें म्हंणतांत म्हणून आपण मजा घेंत हसण्यांपेक्षा तेवढेंच जरा प्रबोधनाचें पुण्य प्राप्त करून घेतलेलें बरें! कसें? ;)
अशीच आणखी एक मजेदार ओळ म्हणजे विठ्ठलाच्या आरतीत - "राही रखमाबाई राणी या सकळा, ओवाळितीं राजा विठोबा सावळां." या ओळीत बरेच जण सरळ "ओवाळितो राजा विठोबा सावळां.." म्हणतात! म्हणजे काय? विठोबा ओवाळतो की काय राहीबाई, रखमाबाईंना? हल्ली स्त्री-पुरूष समानतेच्या युगात बायका घेतील करून असं नवर्यांकडून पण त्या काळी, देवादिकांकडून अशा अपेक्षा ठेवण जरा अतिच नाही का? ;)
26 Nov 2010 - 5:30 am | रेवती
छान प्रतिसाद रे मेवे!
26 Nov 2010 - 6:18 am | गवि
+1
26 Nov 2010 - 4:33 pm | सूड
मेवे ....__/\__
26 Nov 2010 - 4:19 pm | यशोधरा
साई विवाद करता पडलो प्रवाही तेथुनि भक्तालागे
http://www.misalpav.com/node/15584#comment-261485 - मस्तच लिहिलं आहेस मेव्या, तुझा प्रतिसाद पाहिला नव्हता. ग्रेट! :)
25 Nov 2010 - 6:38 pm | डावखुरा
गविसाहेब.............भन्नाट लिहिलय आणि त्यावरील प्रतिक्रिया पण छान आल्यात...
पुलेशु...
25 Nov 2010 - 7:54 pm | मदनबाण
मस्त लेखन... :)
चाळूसोबती हा शब्द प्रयोग लयं आवडेश... :)
25 Nov 2010 - 9:31 pm | स्वैर परी
गगनविहारी साहेब , तुम्ही दिलेल्या अनुभवांपैकी काही अनुभव अगदी तंतोतंत माझ्यासारखेच आहेत! विशेषतः
१. आप मेरी जिन्दगी
२. ना कुछ तेरे बस मे जुली
३. तोफा तोफा!
इथे ऑफिस मधल्या लोकांना अजुन माहित नाहिए कि मी इतक्या जोरजोरात का बरं हस् तेय! :)
25 Nov 2010 - 11:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
"ऐरणीच्या देवा" हे गाणे मी कित्येक दिवस "पैरणीच्या देवा तुला थंडी थंडी वाजू दे" असे ऐकत होतो. आता थंडीच्या दिवसात पैरण घातली तर थंडी वाजणारच ना, स्वेटर घालावा ना सरळ. पण तरीही देवाला असा शाप का देते आहे ती बाई हे कळत नव्हते.
26 Nov 2010 - 11:13 am | गवि
पैरणीच्या देवा..
हे जाम धमाल आहे..
26 Nov 2010 - 10:43 am | satish kulkarni
दो दिवाने शहर मै... रात मै और दोपहर मै... साबुदाना ढुन्डते है... असे वाटायचे...
आणि गणपतीच्या आरतीत.. दास रामाचा वाट पाहे सजणा असे ..
26 Nov 2010 - 11:09 am | गवि
साबुदाणा..
हेहेहे.. :-)
वाट पाहे सजणा असंच आहे ना?
??
कन्फ्यूज झालो.
26 Nov 2010 - 1:03 pm | कानडाऊ योगेशु
वाट पाहे सदना असे आहे.
(पण थोडा वेळ मी ही कन्फ्युज झालो.आरती म्हणुन पाहीली आणि 'सजणा' च तोंडात यायला लागले.)
(गणेशभक्त) योगेश
26 Nov 2010 - 1:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>पण थोडा वेळ मी ही कन्फ्युज झालो.आरती म्हणुन पाहीली आणि 'सजणा' च तोंडात यायला लागले
माझेही असेच झाले. मलाही पटकन खरे काय आहे ते आठवेचना. खरी ओळ चारदा म्हटली पाहिजे. पुढील आरतीला घोळ नको व्हायला :-)
26 Nov 2010 - 11:56 am | योगप्रभू
शालेय वयात शब्दाच्या अपभ्रंशाने केलेली पांचट विडंबने म्हणून इतरांना हसवण्याची सवय मला लागली होती. बहुधा या ओळींचे कर्ते निराळे असत. आम्ही आपले शाहिराचे काम करायचो. पुन्हा, लोक हसतात म्हणून आणखी चेव यायचा. त्यातील काही काव्ये अशी होती
या गडे नाचुया, करुया मंगलगान (नागडे नाचुया, करुया जंगल घाण )
पार्वतीपते हर हर महादेव (पार्वती पळाली, धर धर महादेव)
अजुन तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे गं..कवळे गं (अजुन तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे गं...टवळे गं)
काटा रुते कुणाला (काटा रुते कुल्याला)
ताटी उघडा ज्ञानेश्वरा (ताटी उचला ज्ञानेश्वरा) ..... ताटी = तिरडी
वादळ वारं सुटलं गं, वार्यानं तुफान उठलं गं (वादळ वारं सुटलं गं, चड्डीचं बटण तुटलं गं)
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे (घेऊन एक वाटी, खातो कबीर पोहे)
नाविका रे वारा वाहे रे (नाभिका रे वारा वाहे रे)
'छू कर मेरे मन को किया तुने क्या इशारा' या गाण्याची चाल तीच पण शब्द मात्र बदलून 'शू कर जरा लवकर, मला जायचंय तुझ्या नंतर' असे म्हणल्यावर पब्लिक हमखास हसायचे.
शब्दात श्लेष हुडकण्याच्या या खोडीपायी मी एकदा वडिलांचा मार खाता खाता वाचलो. ते माझ्याकडून श्रीसूक्त म्हणवून घेत होते. त्यात एक श्लोक आहे, 'आर्द्रायः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनी'. मी हसल्याचे पाहाताच वडिलांनी कारण विचारले. मी आचरटपणे म्हटलो. 'इथे पण हेमामालिनी आलेली दिसते.' बापरे! पिताश्री काय भडकले म्हणून म्हणता! माझ्यावर फेकण्यासाठी त्यांनी सहाणेवरचे चंदनाचे खोड उचलून हातात घेतले. काहीतरी बोलणार पण होते, पण प्रेमस्वरुप आई लेकराच्या मदतीला धावली. ती म्हणाली, ' तुम्ही दोघांनी आधी पूजेकडे लक्ष द्या. भांडामारी मागाहून करा.' त्या गडबडीत वडील तो विषय विसरुन गेले. पण नंतर मात्र 'चिरंजीव. आपलं वय वाढतंय. जरा तारतम्य ठेवा' असं म्हणाले.
गगनविहारींच्या लेखामुळे गाभुळलेल्या किशोरवयाची आठवण आली... :)
26 Nov 2010 - 12:08 pm | गवि
शालेय वयात शब्दाच्या अपभ्रंशाने केलेली पांचट विडंबने
हा तर एक नवाच मस्त विषय आहे.
आपल्या या रचनांमधे माझ्याकडून एक पाकळी:
पुंडलीक वरदे हरी विठ्ठल्..श्री ज्ञानदेव तुकाराम्..(पुंडलिकान मारली इटकर्..ती लागली तुकारामाला..)
(भा. दु. घे. न.)
बादवे..सहाणेवरचं चंदनाचं जे खोड होतं, त्याची साईझ काय होती हो..?
26 Nov 2010 - 12:51 pm | योगप्रभू
गगनविहारी,
माझ्या आईकडच्या आजोळी परड्यात चंदनाची दोन तीन झाडे होती. आजीने ती तोडून त्याच्या खोडांचे तुकडे घरी जपून ठेवले होते. घरचे चंदन म्हणून आम्हालाही ती भेट मिळाली. दीड वीत लांब आणि एका हाताच्या पकडीत न मावणारे असे ते चंदनी खोड होते. तुम्हाला एक अवांतर माहिती देतो. चंदनाचे खोड कापल्या कापल्या त्याचा सुगंध येत नाही. खोडाचे तुकडे ओलसर मातीत गाडून ठेवावे लागतात. काही काळानंतर ते खोड आतून मऊ पडते. वरची साल तासल्यावर आत उरते ते मनमोहक सुगंधाचे चंदन. आता चंदन इतके महाग झाले आहे, की बाजारात बोटभर लांबीचेच तुकडे मिळतात. सहाणीसुद्धा बशीच्या आकाराच्या उरल्या आहेत.
असो. आपल्या प्रश्नाचे सोपेसे उत्तर म्हणजे त्या खोडाचा साईझ माझा कपाळमोक्ष घडवण्याइतका पुरेसा होता :)
27 Dec 2012 - 5:39 pm | समीरसूर
योगप्रभू जी,
विडंबनं खूप सरस!!!
शू कर जर लवकर्....जम्या! :-)
गाभुळलेले किशोरवय! चपखल शब्दप्रयोग!
26 Nov 2010 - 1:13 pm | कानडाऊ योगेशु
तिसरी/चौथीत असताना मराठीच्या पेपरवर "हस्ताक्षर सुवाच्य असावे" अशी काहीशी सुचना होती कुणा मित्राने बाईंना विचारले 'हस्ताक्षर" म्हणजे काय आणि मी पचकलो "अक्षर वाचुन हसता यायला हवे"... बाईंनी भर वर्गात कान पकडला होता. :(
26 Nov 2010 - 2:04 pm | इन्द्र्राज पवार
जाहिरातीच्या धाग्यापाठोपाठ आलेल्या या "सुमधुर" गाण्यांनी मनमुराद हसण्याचा आनंद दिला आहे, हे नि:संशय ! याच यादीत अगदी फिट बसणारी काही हिट ~~
"मानसीचे चित्र काढतो, तुझे निरंतर चित्र काढतो..." हे गाणे,
ऐकू यायचे मात्र "मानसीचे चित्र काढतो, तुझे मी नंतर चित्र काढतो...".
"एक लडकी को देखा तो ऐसा लगा...."
आम्ही समजत असू "एक लडकी को देखा तो आरसा लगा..." (चष्मा या अर्थाने)
"...आजकल पाँव जमीं पर नही पडते मेरे...." या गाण्याच्या श्रवणावेळी असे वाटायचे की ही बया "पाव" जमिनीवर पडत नाही म्हणून का कोकलते? पाव ही खाण्याची वस्तू आहे ना?
आशा भोसले यांचे 'गुलजार' लिखित एक प्रसिद्ध गाणे...."मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..."
इथे संध्याकाळी रूमवर मित्रांसमवेत पैज लागायची "तिच्या सामानाची यादी" तयार करायची. सर्वात मजेशीर 'सामान' जो लिहिल त्याच्या जेवणाचे बिल इतर तिघांनी भरायचे. एक संध्याकाळ मी विजयी ठरलो....माझ्या सामानाच्या यादीत होती "दाताची कवळी....!"
.....असेच एकदा कॉलेजमधीलच एका गायिकेला तिची मजा करावी म्हणून तिने निवडलेल्या गाण्याची ओळ "हा महाल कसला....सख्या रे घायाळ मी हरिणी..." ऐवजी "हा हमाल कसला...." करून दिली होती.
इन्द्रा
26 Nov 2010 - 2:14 pm | गवि
जबरदस्त धमाल करायचात हो..
झकास..
26 Nov 2010 - 2:08 pm | इंटरनेटस्नेही
मस्त लेख.. जुण्या आठवनी जाग्या झाल्या! :)
26 Nov 2010 - 2:17 pm | सुत्रधार
शेंगदाणे खातच र्हावे, भाजुन बारिक कूटुन घ्यावे
साखर टाकून खावे.....
26 Nov 2010 - 3:42 pm | ज्ञानराम
मजा आलि............ पोटभर हसले...................
18 Mar 2016 - 10:31 pm | मन्जिरि
खुप हसले
26 Nov 2010 - 8:46 pm | कापूसकोन्ड्या
माझा मुलगा तेव्हाचे वय अडीच तीन वर्षे. माझे मित्र मैत्रिणी घरी आलेल्या असताना त्याला गाणे म्हणून दाखवायला.सांगितले असताना त्याने माला डी हे नेहमी दूरदर्शनवर लागणारे जिंगल (??) सारखे तेवढ्याच ताकदीने म्हणले.
चांगला रिस्पौन्स मिळाल्यामुळे तो आणखी चेकाळल्याप्रमाणे ते म्हणतच राहला. त्याला वय पाहता रागवता पण आले नाही.
3 Dec 2010 - 7:31 pm | भाग्यश्री कुलकर्णी
शाळेत असताना गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकीत "रांजणगावाला गावाला ..........." हे गाणे म्हणायचे होते त्या गाण्यातल्या चला पहाटे पहाटे देव केंव्हाचा जागला ह्या ओळीवर मी त्या दिवशी जाम हासुन फुटत होते.बिचारा देव केंव्हाचा जागा झालाय अन त्त्याला ज्याम जोराची लागलीय त्यामुळे पहाटे पहाटे लवकर लवकर चाला असे काहिसे चित्र माझ्या समोर सारखे येत होते(गणपती हातात टमरेल घेउन चालला आहे असे सारखे समोर दिसत होते)तेंव्हा आमच्या खेड्यात असेच जावे लागे.
3 Dec 2010 - 8:16 pm | धमाल मुलगा
अरे काय कल्पना आहे! _/\_