वारियाने कुंडल हाले

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
7 Oct 2010 - 7:07 am

श्री.ज्ञानेश्वर,नामदेव व तुकाराम यांच्या पदांनंतर आपण आज श्री. एकनाथ महाराज यांचे एक पद घेऊन संतांच्या कविता या मालिकेचा निरोप घेऊ.
एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणातील विविधता. गौळणी,भारुड आदी लोकवाङ्मय लिहावे तर एकनाथांनीच. इतर कवी या क्षेत्रांत त्यांच्या जवळपासही येऊ शकत नाहीत. त्यांची एक अतिशय लोकप्रिय गौळण म्हणजे :
वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले !
फ़णस जंबीर कर्दळी दाटा हाती घेऊन नारंगी फ़ाटा !
हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता ! !धृ!
राधा पाहून भुलले हरि बैल दुभवी नंदाघरी !!धृ!
ऐसी आवडी मिनली दोघा एकरूप झाले अंगा !
मन मिनलेसे मना एका भुलला जनार्दना ! !धृ!
जंबीर-- लिंबू, दुभविणे -- धार काढणे, मिनणे -- एकजीव होणे
मधुरा भक्तीने जें रूप बंगाल-ओरिसामध्ये अंगिकारिले ते महाराष्ट्रीय संतांना बिलकूल पसंत नव्हते. त्यांनी विठ्ठलाला माऊली म्हणून स्विकारले. फ़ारच कमी पदे अशी आहेत कीं ज्याना आज आपण अश्लील म्हणू. गाथा सप्तशतीतील गाथांशी नाते सांगणार्‍या या पदात दोन प्रेमिकांचे वर्णन आहे.दोघांचेही चित्त सैरभैर झाले आहे. खास ग्रामिण बाजामध्यें, नायिका ताक घुसळतीय; फ़क्त डेरा रिकामा आहे एवढेच ध्यानांत नाही! गोपाळाचीही तीच गत.बिचारा दूध काढावयाला बसला आहे खरा पण गाई ऐवजी बैलापाशी ! प्रेमाची एवढी एकरूपता झाल्यावर असे होणारच. पण प्रेमिकांची अशी अवस्था झाली तरी रसिकाने त्यांतच वाहून जाऊ नये म्हणून एकनाथ लगेच आसूड उगारल्यासारखे सांगतात " एका भुलला जनार्दना". अरे, हे प्रेम माझे माझ्या गुरुवर आहे तसे आहे.
खास ग्रामिण ढंग ही ह्या पदाची खासियत. राधा उघड उघड डोळॆ "मोडत" , नेत्र कटाक्ष टाकत नाही, चालली आहे, कानातले डूल वार्‍याने हलत आहेत असे म्हटले असले तरी आपण कल्पना करूं शकतो हा बहुदा ठुमकत चालण्याचा परिणाम असावा. दोघे एकमेकांना गल्लीमध्ये वा जास्त शक्यता म्हणजे गावाबाहेरच्या एखाद्या पायवाटेमध्ये भेटले असणार.दुसरी ओळ अशा झाडी जवळ असलेल्या वाटेचाच निर्देश करते, ( की ही संकेतमीलनाच्या वेळेचीच आठवण आहे ? नक्की कळत नाही,) पण त्याचा असर काय झाला त्याचे वर्णन मात्र दोघे आपापल्या घरी पोचल्यानंतरचे आहे. दोन ठिकाणी असूनही दोघेही एकजीव झालेले आहेत.
शृंगाररसामध्ये डुंबलेल्या लावणीफ़डावर आणि भक्तीरसांत चिंब झालेल्या भजनी मंडळात एकाच वेळी गायले जाण्याचे भाग्य अशा एखाद्याच रचनेला लाभते.
शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

>> मधुरा भक्तीने जें रूप बंगाल-ओरिसामध्ये अंगिकारिले ते महाराष्ट्रीय संतांना बिलकूल पसंत नव्हते. >>
हे मीदेखील ऐकून आहे. शृंगाराला रसांचा राजा म्हटलं जातं पण ज्ञानेश्वरी इतका अवीट गोडीचा ग्रंथ आहे की असं म्हणतात शांत रसाने शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला आहे.

आपण केलेलं विवेचन फारच रसाळ आहे.
>> हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता ! !धृ!
राधा पाहून भुलले हरि बैल दुभवी नंदाघरी !!धृ! >>
ही जी समसमान ओढ आहे ती काय वर्णावी.

आसूड उगारल्याचा बारकावा केवळ आपण सांगीतला म्हणून लक्षात आला बाकी. धन्यवाद.

विलासराव's picture

7 Oct 2010 - 8:25 am | विलासराव

सुंदर विवेचन आवडले.

पाषाणभेद's picture

7 Oct 2010 - 9:02 am | पाषाणभेद

छान लेखमाला आहे. जुन्या लेखांचीही लिंक येथे द्या ना.

स्पंदना's picture

7 Oct 2010 - 12:33 pm | स्पंदना

जितकी रसाळ ही पद आहेत तितकच रसाळ अन गाभ्याला अजिबात धक्का न लावता केलेल तुमच विवेचन.
सुन्दर हो भाउ. शेवटी शब्दांचे अर्थ देण्याची तुमची पद्धत तर आम्हाला फारच सोयीची वाटते.

श्रावण मोडक's picture

7 Oct 2010 - 6:05 pm | श्रावण मोडक

निरोप का? कविता संपल्या की काय? लिहित रहा. आम्ही वाचतो आहोत. रसास्वाद रंगतो आहे. इतक्यात लेखमालिका संपवायची म्हणजे पूर्ण भरात असलेल्या फलंदाजानं धावांच्या पंचविशीतच "बास्स आता" म्हटल्यासारखं होतं.

प्रदीप's picture

7 Oct 2010 - 6:33 pm | प्रदीप

म्हणायचे आहे. कवितांचे चालू राहूंदेत, शक्यतो एकेक कवि घेऊन.

राजेश घासकडवी's picture

7 Oct 2010 - 7:05 pm | राजेश घासकडवी

हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता ! !धृ!
राधा पाहून भुलले हरि बैल दुभवी नंदाघरी !!धृ!

या ओळींमधली रूपकं वापरून पांडू आणि गंगूविषयी सध्याच्या भाषेत लिहिलं तर संस्कृतिरक्षक त्यावर अश्लील म्हणून बोंब ठोकतील.

पांडूला पाह्यलं नि गंगी भुलली, घुसळते माठ तिचा खाली
गंगीला बगून पांडू यडा झाला, पिळून दूध काढी बैलाला

या ओळी दादा कोंडकेंच्या सिनेमातल्या गाण्याच्या म्हणून खपून जातील, व उच्च अभिरुचिचे लोक त्यांना पाचकळ म्हणतील. मग त्याच राधा कृष्णाच्या झाल्या की शृंगारिक आणि उच्च प्रतीच्या कशा होतात? की ही वाईन पाचेकशे वर्षं मुरायला लागते?

(यावर मिभो काय म्हणतील - आय टोल्ड यु सो!)

हरी, राधा, चित्त, नंदघर ही वातावरणनिर्मिती, भक्तीभाव जागृत करते.
जे आंडूपांडू करत नाही.

राजेश घासकडवी's picture

7 Oct 2010 - 8:59 pm | राजेश घासकडवी

पाचकळपणा + भक्तिभाव निर्माण करणारे शब्द = उच्च प्रतीचा शृंगार

असं गणित आहे का? मला तेवढंच वाटत नाही.

खालच्या ओळी शृंगारिक वाटतात की पाचकळ?

नंदाघरचा कृष्ण बोलतो 'प्रिय सखे राधे, की
अपुल्यामध्ये जेव्हा घडले धिनधिनकधिन ताकी
मग काय राहिले बाकी?'

मला तर वाटतं की शरद यांनी उद्धृत केलेल्या कवितेतली भाषा थोडी अनवट व लडिवाळ आहे त्यामुळे ती रूपकं पटकन कळत नाहीत - व ती अंगावर येत नाहीत. पण त्या काळच्या लोकांना ती कळली असणार. म्हणूनच मला वाटतं की, वात्रटपणात गुंतवायचं आणि मग पटकन त्यातून आध्यात्मिक अर्थ काढायचा अशी ट्रिक कवीने वापरली असावी. आपण आजच्या काळात त्या कवितेचा अर्थ लावताना ही नामदेवाने लिहिली आहे, त्यात राधा कृष्ण आहेत, आणि शेवटी आध्यात्मिक वाटणारा संदेश दिला आहे, हे सर्व लक्षात घेऊन अर्थ काढतो.

मिसळभोक्ता's picture

7 Oct 2010 - 9:58 pm | मिसळभोक्ता

धिनधिनकधिन ताकी

वा वा ! हे शब्द वाचून मला भक्तिरसाने उचंबळून आले !

बाकी,

राधा बदनाम हुई,
कान्हा तेरे लिये

असे भजन चालीसकट तयार आहे. इच्छुक भजनीमंडळांनी संपर्क साधावा.

पैसा's picture

7 Oct 2010 - 10:16 pm | पैसा

मला तर संतश्री जितेंद्र आणि श्रीदेवी यांचं एक पुराणं गाणं आठवलं

ताकी ओ ताकी ताकी ताकी रे
अब क्या रह गया बाकी!

नितिन थत्ते's picture

7 Oct 2010 - 10:38 pm | नितिन थत्ते

एक दुसरी शक्यता पण आहे.

मुळात चावटच अर्थ लिहिणारे आणि वाचणारे या दोघांनाही १२-१३व्या शतकात अभिप्रेत असेल.

पण १९च्या शतकाच्या उत्तरार्धात सार्वजनिक भाषाव्यवहाराचे सॅनिटायझिंग* झाल्यावर जेव्हा विसाव्या शतकातले प्राध्यापक ही रचना वाचतात तेव्हा "एकनाथ? आणि राधा आणि कृष्णाबद्दल असे कसे लिहितील?" असा प्रश्न पडून त्यावर मारूनमुटकून अध्यात्मिक अर्थ इम्प्यूट करीत असावेत.

*संदर्भ : Sexuality, Obscenity, Community (Women, Muslims and the Hindu Public in colonial India) - Charu Gupta-
"भले तरी देऊ कासेची लंगोटी" येथे तुकारामांनी "गांडीची लंगोटी" असे शब्द वापरले होते ते बदलून कासेची लंगोटी असा बदल केल्याचे वाचले आहे.

वेगळे उदाहरण द्यायचे तर आर्यभटाने पृथ्वी फिरते असा सिद्धांत मांडला होता पण ते मत प्रचलित मताशी जुळत नसल्याने "आर्यभटाला खरे तसे म्हणायचे नव्हते" अशी कसरत नंतरच्या टीकाकारांनी केली होती.

मिसळभोक्ता's picture

8 Oct 2010 - 7:56 am | मिसळभोक्ता

एकूण काय, की इतिहास हा भूतकाळातील लोक लिहितात, पण वर्तमानातील लोक वाचतात, आणि समजतात.

मिसळभोक्ता's picture

7 Oct 2010 - 10:01 pm | मिसळभोक्ता

(यावर मिभो काय म्हणतील - आय टोल्ड यु सो!)

हे बघा, म्हणतो:

आय टोल्ड यु सो !!!

नाना बेरके's picture

7 Oct 2010 - 7:18 pm | नाना बेरके

या ओळी दादा कोंडकेंच्या सिनेमातल्या गाण्याच्या म्हणून खपून जातील, व उच्च अभिरुचिचे लोक त्यांना पाचकळ म्हणतील. मग त्याच राधा कृष्णाच्या झाल्या की शृंगारिक आणि उच्च प्रतीच्या कशा होतात? की ही वाईन पाचेकशे वर्षं मुरायला लागते?
.. बरोबर आहे रा.घा. तुमचं. पण उच्च अभिरूचीवाल्यांचासुध्दा रुचिपालट झालाय आजकाल. 'मुन्नी तेरे लिये' गाण्यावर फारशी कडवी (नेहमीसारखी ) प्रतिक्रिया नव्हती आली पुण्याचा सकाळ मध्ये.

मेघवेडा's picture

7 Oct 2010 - 8:10 pm | मेघवेडा

सुंदर! छान रसग्रहण.

या मालिकेचा निरोप घेऊ.

का हो? फलंदाज पूर्ण फॉर्मात खेळत असताना असा मध्येच डाव घोषित करू नका! अजून येऊ दे! सुंदर मालिका आहे. :)

सुनील's picture

7 Oct 2010 - 9:44 pm | सुनील

खूप छान रसग्रहण. अजूनही लिहा, असे सांगावेसे वाटते.

एकनाथांच्या रचनेत मात्र किंचित शब्ददारिद्र्य जाणवते. मिनणे, पाहून भुलणे हे शब्द दुसर्‍यांदा वापरण्याऐवजी दुसरे समानार्थी शब्द वापरायला हवे होते.

मिसळभोक्ता's picture

7 Oct 2010 - 9:59 pm | मिसळभोक्ता

बैल दुभवी नंदाघरी

वाचून एक जोक आठवला. पण जाऊ द्या.

धनंजय's picture

7 Oct 2010 - 10:11 pm | धनंजय

एकनाथ कवी म्हणजे बहुधा अनेक सांकेतिक अर्थ असणार. कोणाला माहीत आहेत काय?

(देशावरती फणस-लिंबे दाटीवाटीने उगवतात का?)

(पांडू-गंगी यांचे वागणे प्रेमामुळे भ्रमिष्ट झाले आहे, यात फारसे अश्लील काही वाटत नाही. भंपक संस्कृतिरक्षकांनाही अश्लील वाटणार नाही असे वाटते. माठाच्या पोकळीत रवी घुसळणे, आणि बैलाला दोहणे या कृतींमधील मैथुनचिह्ने फारच पुसट आहेत. दादा कोंडक्यांनी आणखी गडद केली असती.)

मिसळभोक्ता's picture

7 Oct 2010 - 10:20 pm | मिसळभोक्ता

एकरूप झाले अंगा

हे पुसट की गडद ?

मुळात पुसट चिन्हे आधी लिहिली, आणि ती चिन्हे कुणाच्या चुकून लक्षात आली नसलीच, तर एक मोठ्ठी हिंट द्यायची, अशी योजना दिसते.

अगाथा ख्रिस्तीच्या कादंबर्‍यांत हा प्रकार हमखास दिसतो.

धनंजय's picture

8 Oct 2010 - 1:46 am | धनंजय

शरीरसंबंध हे आत्मा-परमात्मा संबंधासाठी रूपक पारंपरिक आहे. कवी कल्पक नसला तर अतिशय रटाळ वाटू शकते.
मैथुनाचा थेट उल्लेख ("एकरूप झाले अंगा") केल्यामुळे आध्यात्मिक अर्थ प्राथमिक रूपकातून कळून येतो.

पण येथे लक्षात घेतले पाहिजे : माठात घुसळणारी रवी हे जर मैथुनाचे [फिकट] रूपक मानले, तर आध्यात्मिक अर्थ चुलतरूपक म्हणून येते. त्यापेक्षा रिकाम्या माठात रवी घुसळण्याची क्रिया = भक्तीच्या तल्लीनतेमध्ये व्यवहारात हेळसांड होणे, हे रूपक थेट समजून येते. यात काही वाचकाचा मोठा कल्पनाविलास नाही.

(येथे रूपक-उपमा-उत्प्रेक्षा वगैरे सर्व तुलनात्मक अर्थालंकारांच्या संदर्भात एक "रूपक" शब्द वापरलेला आहे.)

एकनाथांना ठराविक अर्थचिह्ने वापरलेली भारुडे रचण्याची आवड होती. माठ=विश्व/लोक वगैरे चिह्ने त्यांच्यासाठी "नेहमीची" असू शकतील. (ज्ञानेश्वरांची "तीन मडकी" संदर्भ घ्या.) मात्र त्यांचे codebook माहीत असलेले जाणकारच याबद्दल सांगू शकतील.

मिसळभोक्ता's picture

8 Oct 2010 - 7:36 am | मिसळभोक्ता

शरीरसंबंध हे आत्मा-परमात्मा संबंधासाठी रूपक पारंपरिक आहे. कवी कल्पक नसला तर अतिशय रटाळ वाटू शकते.
मैथुनाचा थेट उल्लेख ("एकरूप झाले अंगा") केल्यामुळे आध्यात्मिक अर्थ प्राथमिक रूपकातून कळून येतो.

आता समजा मी (माझे नाव एकनाथ पैठणकर असे समजा) लिहिले:

रंगी रंगला श्रीरंग

तर कुणाला, ही रंगी कोण हा प्रश्नपडेल, किंवा कुणाला वाटेल की होळीतला रंग आहे, किंवा कुणाला काही आध्यात्मिक वाटेल. (रंग म्हणजे काहीतरी आतुन आलेले वगैरे).

आता, एकनाथ महाराजांच्या काळातल्या लोकांना काय वाटले असेल, हे जरा बाजूला ठेवू.

आत्मा म्हणजे माझा, आणि परमात्मा म्हणजे वरच्याचा. त्यांचे मीलन.

आता आत्म्यानेच नेहमी खालची भूमिका का घ्यायची ? असा प्रश्न ह्या काळच्या लोकांना पडत नसेल का ?

मग समज, जे प्रश्न त्या काळच्या लोकांना पडत नसतील, ते आज पडलेत, तर मग ते वाङ्मय कालबाह्य आहे असे म्हणायला नको का ?

(माझ्यामते, समजा हे वाङ्मय आता जसे विचार येतात तसे उफाळून आणत असेल, आणि जर कालातीत असेल, तर तेव्हाही तसेच विचार तेव्हाही उफाळून येत असावेत.)

राजेश घासकडवी's picture

8 Oct 2010 - 8:52 am | राजेश घासकडवी

आता आत्म्यानेच नेहमी खालची भूमिका का घ्यायची ? असा प्रश्न ह्या काळच्या लोकांना पडत नसेल का ?

हे बहुधा पुरुषप्रधान संस्कृतीचं द्योतक आहे. परमात्मा हा नेहेमी 'तो' असतो. माझा आत्मा राधा, परमात्मा कृष्ण वगैरे. त्यामुळे उच्चनीचतेच्या संकल्पना सामाजिक व लौकिक परंपरांना धरून राहातात.

पण मला या लिंग-भूमिकांमधून आणखीन काही गहन प्रश्न पडतात. या भूमिका, ही नाती नेहेमी भिन्न लिंगी आहेत असंच गृहित धरलं जातं. मात्र जुन्या काळात देखील केवळ भिन्न लिंगी संबंध होते हे पटत नाही. आत्ताच्या सामाजिक मानसिकतेत समलिंगी संबंध (कपाटात) लपवण्याची जी प्रवृत्ती दिसते तीतूनच या अर्थ काढण्याकडे बघता येतं. पण दृष्टीची ही मर्यादा दूर केली तर काव्याकडे नव्या दृष्टीकोनातून पहाता येतं.

मिभो, तसं केलं तर हे वर खालीच नेहेमी असेल असं वाटत नाही. इतरही आत्मिक संबंध अधोरेखित केले जातात.

अडगळ's picture

7 Oct 2010 - 10:58 pm | अडगळ

तत्कालीन अनेक लोककलावंत अशा शृंगारीक रचना करत होतेच. एकनाथ असे अनेक समकालीन घाट वापरतात.
कवी म्हणून कदाचित एकनाथांना हे रचना प्रकार आकर्षक , आव्हानात्मक वाटले असावेत.
एकनाथांनी असाच शृंगारीक घाट वापरून त्याला अध्यात्माची फोडणी दिली असावी.
एकनाथांच्याच "भांड" रचना आहेत , त्या बघाव्यात , त्या तुलनेत ही रचना म्हणजे पामेला समोर आशा काळे .
(संदर्भ : पामेलाचा नव्हे हो , "भांड" चा : मर्‍हाटी लावणी - म वा धोंड )

मिसळभोक्ता's picture

7 Oct 2010 - 11:00 pm | मिसळभोक्ता

एकनाथांच्याच "भांड" रचना आहेत , त्या बघाव्यात , त्या तुलनेत ही रचना म्हणजे पामेला समोर आशा काळे .

शरद ह्यांना विनंती, की त्यांनी निरोप न घेता, भांड विषयी काही लिहावे.

हुप्प्या's picture

8 Oct 2010 - 1:59 am | हुप्प्या

मूळ लेख आणि सगळ्या प्रतिक्रिया वाचनीय (होय खरंच!).
शरदराव पुढचा हप्ता येऊ द्या लवकर.
मिनली वगैरे रुपे ही मीलन या शब्दाचा अपभ्रंश आहे का?

मिसळभोक्ता's picture

8 Oct 2010 - 7:43 am | मिसळभोक्ता

वर ढगाला लागली कळं
पाणि थेंब थेंब गळं
चल गं राणी
गाऊ या गाणी
फिरू या
पाखरासंगं

ह्यात ढग म्हणजे भक्तिरसाचा स्रोत म्हणजे परमेश्वर, त्यातून कृपेचे जळ थेंब थेंब गळू लागलेले आहे, त्यामुळे राणी (संतांचा आपल्या इच्छाशक्तीवर अधिकार असतो, त्यामुळे तिला राणि असे संबोधले आहे), आपण भक्तिरसाची गाणि गाऊयात, स्वच्छंदी (प्रभुकृपेवर जगणार्‍या) पाखरांसंगे (म्हणजेच भक्तांसगे) उडूयात.

पुढे चढवा घासकडवीशेट. (रामाच्या माळ्यात उर्फ अयोध्येत.)

प्रभो's picture

8 Oct 2010 - 7:47 am | प्रभो

__/\__
संत श्री श्री श्री मिभोबाबा की जय!!!

धनंजय's picture

8 Oct 2010 - 11:30 pm | धनंजय

ता. क.

येथे "ता." म्हणजे "तारेवरची" आणि "क." म्हणजे "कसरत".

ह्यात ढग म्हणजे भक्तिरसाचा स्रोत म्हणजे परमेश्वर, त्यातून कृपेचे जळ थेंब थेंब गळू लागलेले आहे, त्यामुळे राणी (संतांचा आपल्या इच्छाशक्तीवर अधिकार असतो, त्यामुळे तिला राणि असे संबोधले आहे), आपण भक्तिरसाची गाणि गाऊयात, स्वच्छंदी (प्रभुकृपेवर जगणार्‍या) पाखरांसंगे (म्हणजेच भक्तांसगे) उडूयात.

यात अधोरेखिते तितकी अर्थपूर्ण बाकी संदर्भ मी सोडून देणार आहे.
जे पळू लागले आहे त्यास धर.
मिसळभोक्ता यांचे हे वाक्य वैद्यकशास्त्राबाबत आहे. येथे "पळणे" म्हणजे इंग्रजीतले "टु रन". यात मिसळभोक्ता यांचे बहुभाषिकत्व नजरेत येते. जे "रन" करते आणि धरले जाऊ शकते, ते काय असते? तर "नाक". नाकातून रक्त वाहू लागल्यावर नाक धरावे, ही वैद्यकीय सूचना मिसळभोक्ता देत आहेत.

गाळलेल्या अक्षरांच्या संदर्भासह वाचले, तर वरील अर्थ मुळीच लागत नाही. एकनाथांच्या साहित्याबरोबर ही कविता वाचली पाहिजे. अर्थात संदर्भ मुद्दामून विपरित करून वाचण्यातही गंमत आहे. पण संदर्भ सोडला तर त्या जागी हजारोनी वेगळे संदर्भ वापरता येतात. त्यातील काही रटाळ असतील, काही मनोरंजक असतील.

तरी ऐतिहासिक संदर्भ घेण्यात अनेक लोकांना रस असेल. त्या लोकांशी संवाद साधलाच पाहिजे, अशी सक्ती नाही. त्या लोकांशी संवाद साधायचा असेल, तर ऐतिहासिक संदर्भ घेतलेला बरा.

मिसळभोक्ता's picture

9 Oct 2010 - 12:17 am | मिसळभोक्ता

/\
/o\
||
/\

नितिन थत्ते's picture

8 Oct 2010 - 8:01 am | नितिन थत्ते

आत्ताच शुचितैंची ही कविता वाचली

मला लागली ग बाई घाईची
जाऊ कुठे जाऊ कुठे
लांब स्थळ विश्रांती
मला लागली ग बाई घाईची

आता यात वरवर जाणवणारा अर्थ 'निसर्गाच्या हाके'विषयी आहे. पण शुचितै असलं कधी लिहिणारच नाहीत ......
म्हणून यात लपलेला आध्यात्मिक अर्थ आम्ही शोधून काढला.

कवयित्रीला मोक्षाची ओढ लागलेली आहे. लवकरात लवकर मोक्ष गाठावा असे वाटत आहे. पण आयुष्याचा फेरा रटाळपणे चालू आहे आणि मोक्ष फारच दूर आहे असे दिसत आहे.

राजेश घासकडवी's picture

8 Oct 2010 - 10:05 am | राजेश घासकडवी

शुचिंची कविता असताना केवळ त्यातला आध्यात्मिक अर्थ दाखवणं हा त्यांच्यावर अन्याय वाटतो. त्यांची प्रतिमा ही मधुरा भक्ती परंपरेतलं लेखन करणारी अशीच आहे. तेव्हा कदाचित प्रियकराला उद्देशून हे काव्य असू शकेल असंही गृहित धरायला जागा आहे. शेवटी मीलनाची आस, मोक्षाची इच्छा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत नाही का? तुमच्या अर्थात मोक्षाच्या जागी प्रियकर ठेवला तरीही फिट्ट बसतो. आयुष्याचा फेरा साठी कल्पकता वापरावी. :)

हुप्प्या's picture

8 Oct 2010 - 10:29 pm | हुप्प्या

लांब स्थळ विश्रांती : अमेरिकेत स्वच्छतागृहाला रेस्ट रूम म्हणतात. त्याचा तर इथे काही संबंध नाही ना?
असो.

चिंतामणी's picture

8 Oct 2010 - 12:57 pm | चिंतामणी

भुतकाळातील आठवणीसुध्दा जाग्या झाल्या. स्नेहल भाटकरांच्या मृदु आवाजात रेडिओवर अनेकदा ही गवळण ऐकली होती.