खाद्यभ्रमंती - भाग ३

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
3 Aug 2010 - 6:30 pm

माझ्या लिहिण्याचा वेग माझ्या खाण्याच्या वेगाएवढा चांगला असला असता तर बहार आली असती (न पेक्षा किमान खाण्याचा वेग लिहिण्याचा वेगाएवढा कमी असला असता तरी चालले असते किमान पोटाच नगारा झाला नसता). किमान पहिल्या लेखानंतर दुसरा लेख जरा लवकर टाकता आला असता. पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही म्हणा, असेही कोणी वाचत पण नाही. त्यात हे टायमिंग प्रचंड चुकीचे आहे. २ ज्वलंत लेख चर्चेत आहेत त्यामुळे हा लेख फारसा कोणी वाचणार देखील नाही (ही आमची मनाची समजुत. एरवीसुद्धा कोणी वाचावे एवढे चांगले आपण लिहीत नाही हे माहीत असुनसुद्धा मनाची अशी समजुन घातली की बरे वाटते). तरी हा तिसरा भाग लिहीत आहे. (मला लेखाला लिंक देता येत नाही त्यामुळे तुम्ही न वाचलेल्या पहिल्या २ लेखांची लिंक इथे देता येत नाही आहे.)

इतर लेखांमुळे माझा हा लेख कोणीही वाचणार नाही असे जे मला वाटते आहे तसेच काहीसे माझे सातार्‍याच्या बाबत झाले. कोल्हापुर आणि इंदोर या २ चविष्ट शहरांमध्ये मी सातार्‍याबद्दल लिहायचे पुर्ण विसरलो कारण लिहिण्यासारखे काही आहे असेच मुळात वाटले नाही. सात तार्‍यांनी (तार्‍यांनी - टार्‍यानी नव्हे. कृपया गैरसमज करुन घेऊ नयेत) वेढलेल्या या गावात दुर्दैवाने खाण्याच्या बाबतित नाव काढु शकतील अश्या ७ जागा देखील नाहीत (किंवा मी तिथे असताना नव्हत्या).

या सार्‍यांची कमतरता भरुन काढतील अश्या २ गोष्टी मात्र गावात नक्की आहेत. एक आहे कंदी पेढे. पुण्यात जागोजागी (यात चितळे, काका हलवाई आणि घोडके देखील आले) मिळतात त्याला कंदी पेढे म्हणणे म्हणजे अगदी जीवावर येते. हे म्हणजे स्नेहा उल्लाळला (Lucky - No time for Love fame) ऐश्वर्या राय म्हणण्यासारखे आहे. कंदी पेढे खावेत ते केवळ सातरलाच आणि ते देखील केवळ मोदी किंवा लाटकर यांच्याकडें. यातील लाटकरांचे दुकान बहुधा पोवई नाक्यावर आहे आणि मोदींचे मोती चौकात. चु.भु.द्या.घ्या. कदाचित चुकीचे पत्ते असतील कारण बर्‍याच वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. पण चव मात्र अजुनही जिभेवर रेंगाळत आहे. तलतचे किंवा मन्ना डे चे एखादे गाणे कसे कानात रेंगाळत राहते तशीच काहीशी गोष्ट या पेढ्यांबद्दल होते. खमंग या शब्दाचा अर्थ समजुन घ्यायचा असेल किंवा गोड पदार्थांचे वर्णन करताना हा शब्द चपखल बसत नाही असे वाटत असेल तर आयुष्यात एकदा तरी हा पेढा खाऊन बघणे मस्ट आहे. खवा भाजताना तो अगदी योग्य प्रमाणात भाजुन पेढा कसा बनवायचा हे अनुभवायचे असेल तर फक्त मोदी किंवा लाटकर यांचा पेढाच खावा लागेल. जीभेपासुन जठरापर्यंत हा पेढा असा काही अवर्णनीय आनंद देऊन जातो की ज्याचे नाव ते.

सातार्‍याची दुसरी खासियत म्हणजे पालेकर. एखादी बेकरी जीभेला एव्ह्ढा आनंद देऊ शकेल असे मला कधीच वाटले नव्हते. दुर्दैवाने कालौघात पालेकर स्वत:चा दर्जा कायम राखु शकले नाही आहेत असे मात्र म्हणावे लागेल. १० वर्षांपुर्वीचे पालेकर आणि आत्ताचे पालेकर यांमध्ये जमीन अस्स्माचा फरक आहे. आणि तरीदेखील पालेकरांच्या टोस्ट्ला टक्कर देऊ शकेल अश्या फारश्या बेकर्‍या भारतात (हो भारतात) नाहीत असेच मी तरी म्हणेन. दुधाचे प्रमाण वाढवुन केले की टोस्ट चांगले होतात असे वाटणार्‍यांनी एकदा पालेकरांचे टोस्ट् खाऊन बघावेत. जास्त दुध न घालता सुद्धा किंवा कदाचित त्यामुळेच त्यांचे टोस्ट एकदम खमंग होतात. सातार्‍याबाहेर जाउन स्वतःची उत्पादने विकु शकण्याइतपत पालेकर प्रसिद्ध आहेत यावरुनच सगळे आले. "बटर" हा ज्या काळात कुत्रांच्या खाण्याचा पदार्थ होता त्या काळात यांनी त्याची सवय माणसाला लावली हे यांचे अजुन एक वैशिष्ट्य.

मंगळवार तळ्याजवळच्या गुजर आळीतील काटदरे हे अजुन एक प्रसिद्ध नाव. मसाल्यांसाठी काट्दरे हे एकेकाळी समानार्थी नाव होते. दुर्दैवाने नंतर केप्र, प्रवीण, कामधेनु यांच्या लाटेत काटदरे मागे पडले. एरवी पेढ्यांच्या या गोड शहराचा तिखट्पणा काटदर्‍यांनीच सांभाळला होता.

रजताद्री हॉटेल पुर्वी शहराचा हायलाईट होते. पण कालौघात आता हॉटेलची पुर्वीची शान नष्ट झाली आहे हेच खरे. कालाय तस्मै नमः अजुन काय?

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणपा's picture

3 Aug 2010 - 6:53 pm | गणपा

राधेया छान लिहिलयस रे :)

मृत्युन्जय's picture

3 Aug 2010 - 7:00 pm | मृत्युन्जय

धन्यवाद

वसुषेण उर्फ सुर्यपुत्र :)

स्वप्निल..'s picture

3 Aug 2010 - 7:03 pm | स्वप्निल..

चांगला लेख आहे .. कधी गेलो त्या भागात तर भेट देता येईल अशा जागा माहिती होताहेत :)

स्वाती दिनेश's picture

3 Aug 2010 - 7:19 pm | स्वाती दिनेश

कंदी पेढ्यांची काय आठवण काढता राव? आता किती दिवस/महिने वाट पहावी लागणार त्यासाठी? ह्म्म्म..
स्वाती

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2010 - 7:26 pm | प्रसन्न केसकर

सातार्‍यात मला आवडलेल्या जागा म्हणजे मोदी, लाटकर आणी हायवेवरचे कणसे!

रेवती's picture

3 Aug 2010 - 8:58 pm | रेवती

कंदी पेढ्याबद्दल फार ऐकलय!
कधी योग येणार कोणजाणे.:(
पुढची खाद्यभ्रमंती लवकर येउ दे!

पक्या's picture

4 Aug 2010 - 1:24 am | पक्या

सुंदर लेख.
कंदी पेढे मस्तच.
आधीच्या लेखाचे पण दुवे द्याना.