खाद्यभ्रमंती - भाग २

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
15 Jun 2010 - 2:52 pm

मागच्या भागात (त्यात लक्षात ठेवण्यासारखे काहीच नसल्यामुळे मुद्दाम आठवण करुन देणे क्रमप्राप्त आहे) मी नंदुरबार आणि कोल्हापुरच्या माझ्या स्वदिष्ट आठवणी लिहिल्या होत्या. कोल्हापुरहुन आम्ही थेट इंदौरला पोचलो आणि माझ्या जिभेला मोकळे कुरणच मिळाले. सुटलेले पोट हे संपन्नतेचे लक्षण असते हे मी तिथे पोचल्यानंतरच बोलायला शिकलो.

इंदौर म्हणजे खाद्यप्रेमींसाठी साक्षात स्वर्ग. कुठलेही भारतीय व्यंजन तिथे मिळाले नाही असे होणारच नाही. आणि जे मिळते त्यात नावे ठेवायला जागाच नाही. इंदौरमध्ये एकतर तुम्हाला रुचकर पदार्थ मिळतील किंवा खुप रुचकर. बेचव असे काहीच नाही. इंदौरी माणसाची पहाट पोहे खाण्यापासुन सुरु होते. पोहे आणि जिलेबी. हे पहाटे हादडण्यासाथी एक जबरद्स्त कोम्बिनेशन आहे हे प्रत्यक्ष खाल्ल्याशिवाय पचनी पडत नाही. गरमागरम पोह्याचा ढीग ते सुद्ध पहाटे ६ वाजता आणि जोडीला तेवढीच गरम जिलेबी ६ वाजता (बर्‍याच ठिकाणी ५ वाजता सुद्धा मिळायची) खाण्याची गंमत वेगळीच आहे.

इंदौरचे पहाटेचे पोहे आणि रात्रिची कचोरी या दोन्हीना त्रिखंडात तोड नाही. तशी कचोरी दिवसभर मिळते आणि इंदौरमध्ये सगळीकडे मिळते आणि सगळीकडेच खुप सुंदर असते पण संध्याकाळी बाजार बंद झाल्यावर सराफ्यामध्ये दुकानांच्या बाहेर जे काही मिळते ते सगळेच इतके अप्रतिम असते कि त्याबरोबर "विजय्"च्या कचोरीची चव अजुन खुलते. टम्म फुगलेली गरमागरम कचोरी (आम्ही हिला टुणटुण सारखी फुगलेली म्हणायचो. नंतर इंदौरच्या खाद्यपदार्थांच्या क्रुपेने आमच्यासारखी फुगलेली असे म्हणायची वेळ आली) आणी त्यात दिलदारपणे भरलेले सारण आणि वरती प्रेमाने सोडलेली चटणी. जन्नत अगर कही है तो यही है असे जो माणुस काश्मीर बद्दल म्हणाला होता त्याने इंदौरची कचोरी खचीतच खाल्ली नसणार. विजय मध्येच नितांत सुंदर पॅटीस सुद्धा मिळायचे. स्वस्ताईचे दिवस होते ते. तेव्हा कचोरी केवळ सव्वा रुपयाला मिळायची. तिथेच बाजुला एक समोसा वाला असायचा. कुठला मसाला वापरायचा माहीत नाही. पण चव एक्दम वेगळी. त्याला इंदौरी समोसा म्हणणेच योग्य होइल. दुर्दैवाने मला त्याची चव शब्दात सांगता येणार नाही. सराफ्यातच सुंदर घट्ट, गाढी आणि चविष्ट रबडी मिळायची. ५ रुपयात द्रोण भरुन. तशीच ती शिवकैलाश मध्ये पण मिळायची (बहुधा राजवाड्याजवळ). दोहोंपैकी डायट साठी कुठली जास्त पापकारक होती नाही सांगता येणार. शिवकैलाश मध्ये आटीव दुध देखील खुप सुंदर असायचे. त्यातही तो मलई घालण्यात अजिबात कंजुषपणा नाही करायचा. आणि वर पिस्ते आणि बदामाची पखरण पण असायची. ग्लासभर दुध केवळ अडीच रुपयात. या किमती तेव्हाच्या मानाने सुद्धा खुप कमी होत्या. कारण मुळात १ शेरभर दुधच ५ रुपयात मिळायचे.

चुडीबाजारात एक हलवाई होता (नाव आठवत नाही). त्याच्याकडे शाही सामोसा मिळायचा. शाही म्हणजे गोड. खव्याचा. काजु, बेदाणे, बदाम, पिस्ते आणि केशर घालुन केलेला एक अप्रतिम पदार्थ. इतर कुठल्याही पदार्थाचा हा शाही अवमान मला अमान्य आहे. पण हा समोसा स्वर्गीय सुख देउन जायचा.

तुम्ही जर डायटवर असाल तर पहाटेचे पोहे आणि संध्याकाळचा सराफा यातील अंतर भरुन काढण्यासाठी देखील इंदौर मध्ये अनेक लालूचं आहेत. या सर्वांचा राजा म्हणजे "दाल बाफले". आपल्याकडे राजस्थानी थाळी होटेलांत दाल बाटी मिळते. बाफले मात्र मिळत नाहीत. आणि आपल्याकडच्या होटेलांतली दाल इन्दौरच्या पासंगाला देखील पुरणार नाही. डायट्प्रेमींसाठी बाफला म्हणजे अमेरिकेसाठी ओसामा. तसे इंदौर एकूणच डायटवाल्या कमनशिबी लोकांसाठी नाही. एका बैठकीत ४ बाफली खाणे हे येरागबाळ्याचे काम नाही. बाफले मुळातच तुपात बनवतात. त्यानंतर ते तुपातच भिजवतात आणि नंतर कुस्करुन वरती थोडी तिखटगोड दाल आणि वरुन परत तुपची धार. हे खाउन मग एका पायावर उभे राहून ब्रह्मदेवाची उपासना केली तरी वजन वाढेल.

याशिवाय इंदौरचे नमकीन देखील खुप प्रसिद्ध आहेत. आकाश आणि प्रकाश असे दोघेजण आहेत. बहुधा भाउबंद असावेत. (हे मी फक्त यमक जुळते म्हणुन म्हणालो. सत्यपरिस्थिति माहित नाही) अर्थात एवढे सगळे वजन वाढवणारे पदार्थ खाउन तुमच्या पोटात जर दुपारीच कावळे ओरडायला लागले तरी चिंता नसावी. सरळ मंडई गाठावी. नाही मी तुम्हाला भाजी विकत घेउन स्वयंपाक करायला सांगत नाही आहे. मंडईमध्ये पुर्वी खुप सुंदर मक्याचा खीस मिळायचा. आता मिळतो की नाही ते माहीत नाही आणि त्याबरोबर गराडु सुद्धा खुप छान असायचे. गराडु इम्दौर सोडल्यानंतर परत कधी बघायला मिळाले नाहीत.

आणि हे सर्व वाचल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की एका शहरात याहुन जास्त काही असु शकत नाही तर तुम्ही सपशेल चुकीचे आहात. अजुन ५६ दुकान तो बाकी हे मेरे दोस्त. ५६ दुकान हा एक अजब प्रकार आहे. इथे ओळीने ५६ खाण्यापिण्याची दुकाने आहेत. चाट, पिझ्झा, होट्डोग, बर्गर, कचोरी, समोसा, कोंटिनेंटल, चायनीज,मोगमोई, साउथ इंडिअन, पोहे, जिलेबी, फाफडा, नमकीन इथे सर्व काही मिळेल. हे खाउ की ते खाउ असा प्रश्न पडेल. त्यामुळे ३ दिवसांचा उपास करुन तिथे जावे हेच उत्तम.

एकुणात इंदौरमध्ये एकच गोष्ट खुप वाईट. डायट करता येत नाही.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

जागु's picture

15 Jun 2010 - 3:02 pm | जागु

मृत्युंजय - आहो इंदौर काय मला इथेही डाएट नाही जमत.

बद्दु's picture

15 Jun 2010 - 5:21 pm | बद्दु

वा ...
मला पण हा अनुभव घेता आला...फार पूर्वी..रात्री ११.०० नन्तर सराफा बाझार असा काही फुलतो कि बस्स्स्स्स..
खा, खा आणि खा...( चरैवति ..चरैवति..म्हणजे ..चरत रहा..चरतच रहा...)