बाजीप्रभूंचा पोवाडा – पावनखिंड बलिदानाचा आज ३५०वा स्मृतीदिन – तेजोनिधी सावरकर

अर्धवट's picture
अर्धवट in कलादालन
13 Jul 2010 - 10:04 pm

१२ जुलै १६६० च्या रात्री महाराज, बाजीप्रभू आणी सहाशे मावळे जीवावर उदार होऊन, सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी बाहेर पडले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला आज ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.
या प्रसंगावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात, स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. तो पोवाडा आज आपल्यासाठी देतो आहे. काही ठिकाणी तत्कालीन भाषा थोडी साधी करून घेतली आहे, हे काव्य समजायला सोपं आणि भाषा सहज असल्यामुळे रसग्रहण केलेल नाहीये. तरीही काही शंका आल्यास अवश्य विचारा..

जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥
स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥
चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।
प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥
तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।
निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥
जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।
दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥
स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।
या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥

लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।
लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥
लक्ष्मीचे मृदु कमल शारदासुंदरिचा वीणा ।
स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥
अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।
करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥

बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे । जाशि त्याकडे ।
जीवंत धरुं तरि साचा ।
जीवंत पवन धरण्याचा ।
अभ्यास आधिं कर याचा ।
खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।
हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥
शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।
दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥
शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।
उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥

ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला । परस्पर वदला ।
अजि खान, खानखानाजी ।
हुए शिकस्त मराठे आजी ।
फिर लढना क्यौंकर आजी ।
चलो शराब उडायें ताजी ।
आप लेवजी, नहीं आप लेवजी ।
आप गाजि आप तो रणगाजी ।
झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

गुंगवुनी अरि-सर्प शिवा गारुडी गडावरि तो ।
प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥
कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।
गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥
अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।
बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥
भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।
भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥

वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला । हटविणें त्याला ।
रिपु तुडवित व्हा व्हा पार ।
चौक्यासि तुम्हा दावील ।
काजवा चोर कंदील ।
गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।
‘अब्रह्मण्यम्’ कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥
अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।
आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥
साप विखारी देश-जननिला ये घ्याया चावा ।
अवचित गांठुनि भुलवुनि ठकवुनी कसाही ठेचावा ॥

ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् । तथैव; श्रीमान् ।
भारतीं कृष्ण वदला हें ।
अधमासि अधम या न्यायें ।
रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।
राष्ट्ररक्षका सावध रे रिपु हुडकित तुज आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।
गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥
राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।
अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥
जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला |
कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥
चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।
तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥

वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या । करुनियां वाया ।
स्वातंत्र्य-कृष्ण-चिन्मूर्ती ।
जा घेउनि अपुल्या हातीं ।
गड गोकुळांत नांदो ती ।
गडीं चालला शिव तो खिंडित ‘दीन’ शब्द उठला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥

तो हर हर एकचि झाला । वदति रे चला । म्लेंछ हा हटला ।
चला चढवा नेटाचा हल्ला ।
वीरश्रीचा करा रे हल्ला ।
निकराचा चालु द्या हल्ला ।
मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥

म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।
श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥
गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।
तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥
त्या बाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।
पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥

रघुराया रावणहरणा । कंसमर्दना । भो जनार्दना ।
लाडक्या देश जननीचे ।
स्वातंत्र्य रक्षणीं साचे ।
हे प्राण दान जरि अमुचे ।
पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।
झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥
दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।
भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥
हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।
नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥

कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।तोलुनी धरिला ।
रणिं रंग पुन्हा ये साचा ।
गर्जती मराठे रिपुचा ।
घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।
त्याचा मस्तक चेंडू साचा ।
समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।
जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥
तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।
वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥
तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।
धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥
खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।
रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥

तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काली । मर्मिं ती शिरली ।
श्री बाजी विव्हळ पडला ।
मागुती तत्क्षणी उठला ।
बेहोष वीर परि वदला ।
तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।
हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥
जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।
रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥
खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।
ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥
भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।
प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥

होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची । खिंड लढवावी ।
फेडाया ऋण या भूचें ।
अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।
द्या मुद्दल मोजुनि साचें ।
व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।
शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥
लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।
रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥
शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।
मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥
देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।
वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥

तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।हास्य मुख केलें ।
हा पहिला बार शिवाचा ।
हा दुसरा निजधर्माचा ।
हा तिसरा निजदेशाचा ।
हा चवथा कर्तव्याचा |
बार पांचवा धडाडला हर बोला जय झाला ।
चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥

दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।
रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥
ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।
प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥
भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।
असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥
स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।
उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥

श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती । आपुल्या रथीं ।
गंधर्व तनन तैं करिती ।
दुंदुभी नभीं दुमदुमती ।
श्री बाजी स्वर्गा जाती ।
करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।
पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथे ॥
श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।
म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥
अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।
स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी? ॥

विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।
स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

- पोवाडा समग्र सावरकर साहित्य खंड – ८ मधून साभार.
मूळ पोवाड्यात एकुण १८ चौक (चरण) आहेत, मी फक्त १४ चौक लिहिले आहेत.
हेच काव्य आंतरजालावर काही ठिकाणी उपलब्ध आहे पण, बराच पाठभेद असल्यामुळे मी छापील प्रत, मूळ मानली आहे. काही मोजक्या ठिकाणी आजच्या काळात प्रचलित असणारे पण छंदवृतात बसणारे पर्यायी शब्द घातले आहेत.

संस्कृतीइतिहासकविता

प्रतिक्रिया

विकास's picture

14 Jul 2010 - 12:33 am | विकास

ह्या पोवाड्याबद्दल ऐकून होतो पण वाचनात प्रथमच आला.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

जे.पी.मॉर्गन's picture

14 Jul 2010 - 5:36 pm | जे.पी.मॉर्गन

अफाट पोवाडा.... ह्याची कुठलीही रेकॉर्ड असेल का? राष्ट्रीय कीर्तनकार हा पोवाडा गातांना एक-दोनदा ऐकलाय पण तेव्हा रेकॉर्ड नाही करता आला.

जे पी

स्वाती२'s picture

14 Jul 2010 - 6:01 pm | स्वाती२

धन्यवाद!

धमाल मुलगा's picture

14 Jul 2010 - 6:16 pm | धमाल मुलगा

धन्यवाद सायबा. :)

फारच अप्रतिम काम केलं तुम्ही. पुन्हा धन्यवाद.