बापाचा दिवस

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
19 Jun 2010 - 8:05 am

जून महिन्याचा तिसरा रविवार अख्ख्या जगाने बापजाद्यांच्या उत्सवासाठी राखून ठेवलाय. एरव्ही बापाचा दिवस सहसा कोणताही पोट्टा 'साजरा' करतांना दिसत नाही. मात्र बापाचा 'दिवस घालायला' सगळी चिरंजीव मंडळी न चुकता हजर होतात. कारण त्याच दिवशी इस्टेटीच्या लॉटरीची सोडत असते!
असो. त्यामुळे काही फादर्स डे चं महत्व कमी झालेलं नाहीये. 'पप्पा वेडुल्या' मुली आजही मोठ्या उत्साहाने आपल्या डॅड करिता काहीतरी 'हटके' भेटवस्तू खरेदी करण्यासाठी गिफ्ट आर्टिकल्सची अनेक दुकाने या दिवशी पालथी घालतांना दिसतात.
मातृदिनाइतका प्रतिसाद पितृदिनाला मिळत नसतो हे मात्र खरे. मुळात मातेविषयी अपत्यांना जन्मजात वाटणारे ममत्व पित्याप्रति अपुरेच ठरते. बाप म्हणजे स्वैर पोरांना वठणीवर आणणारे हत्यार अशी कुटुंबाची एकंदर समजूत असते, धारणा असते. बापाचा दरारा, भिती, दडपण यांमुळे 'म्हाताऱ्‍या'चा दिवस आवर्जून साजरा केला जात नसावा. त्याउलट 'म्हातारी'चा मदर्स डे खूपदा गौरविला जातो. याला कारण म्हणजे म्हातारी मोठ्या कामाची असते. पोरंटोरं सांभाळणे, घरकामाला हक्काची बाई, घरादाराला राखण असे आईचे खूप फायदे आहेत. त्यातुलनेत 'बा' म्हणजे भुईला भारच ठरतो. म्हणूनच बहुदा गृहस्थाची श्रमपूर्वक कामे करून थकलेला बाप त्याच्या 'पडत्या काळात' वृद्धाश्रमात पाठविला जातो. अशी काही उदाहरणे मी माझ्या डोळ्यांदेखत अनुभवली आहेत...
आमच्या गल्लीतील मोडकळीस आलेल्या मंदिरात असे तीन चार अगतिक म्हातारे त्यांच्या पोरांनी बेवारशी अवस्थेत सोडलेले पाहिले आहेत. एकेकाच्या करूण कहाण्या ह्रदय हेलावून टाकणाऱ्‍या. ती आंधळी, लुळी, पांगळी 'बापमाणसं' अगदी लाचार होऊन देवळापुढे येणाऱ्‍या जाणाऱ्‍याला भीक मागून जगायची. गल्लीच्या प्रत्येक घरातल्या शिळ्या टुकड्यांचे 'धनी' ही म्हातारी माणसं असायची. काय ह्यांच्या सुशिक्षित पोरासोरांना फादर्स डे ही संकल्पना माहीत नसेल? ही चिंता मला सतावते. कोठे त्या फादर्स डे च्या पाश्चात्यांच्या जंगी पार्ट्या अन् कोठे ही आपली म्हातारी कोतारी माणसं? प्रत्येक भारतीय 'फादर'चा डे शेवटी असा तसाच जाणार की काय? हाही प्रश्न उभा ठाकतो.
बाकी आम्हांला आमच्या बापजाद्यांविषयी नितांत आदर आहेच म्हणा. त्यांनी आम्हांला फक्त काटेकोर शिस्तच लावली असे नाही तर जगात चालायचं कसं, वागायचं कसं हेही शिकवलं. प्रत्येक गोष्ट मूळापासून समजावून दिली. म्हणून त्यांच्या बद्दल असणारी आपुलकी अशा फादर्स डे नामक भपकेबाजीच्या माध्यमातून व्यक्त करायलाच हवी हे मात्र पटत नाही.
अर्थात् बापाचा दिवस साजरा करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी फादर्स डे च्या निमित्ताने आम्हीही आता जोरात ओरडू शकतोच की, 'बापमाणसांचा विजय असो!'

समाजजीवनमानअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

शशिधर केळकर's picture

19 Jun 2010 - 2:09 pm | शशिधर केळकर

विषय आणि मुक्तक आवडले. चिंतनीय असा विषय आहेच. पण फार व्यक्तिगत असाही हा विषय आहे. म्हणजे, व्यक्ती तितक्या प्रकृती - या न्यायाने, प्रत्येकाची मते थोड्या थोड्या फरकाने वेगवेगळी असू शकतात असा हा विषय आहे. प्रत्येकाची आपापल्या बापाबद्दल, दुसर्‍याच्या बापाबद्दल, आणि बाप माणसांबद्दल मते भिन्न असू शकतात.

या संदर्भात एक छान लेख आहे हा.

गणपा's picture

19 Jun 2010 - 3:36 pm | गणपा

बाकी आम्हांला आमच्या बापजाद्यांविषयी नितांत आदर आहेच म्हणा. त्यांनी आम्हांला फक्त काटेकोर शिस्तच लावली असे नाही तर जगात चालायचं कसं, वागायचं कसं हेही शिकवलं. प्रत्येक गोष्ट मूळापासून समजावून दिली. म्हणून त्यांच्या बद्दल असणारी आपुलकी अशा फादर्स डे नामक भपकेबाजीच्या माध्यमातून व्यक्त करायलाच हवी हे मात्र पटत नाही.

सहमत..

'बापमाणसांचा विजय असो!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jun 2010 - 3:48 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख आवडला. केळकरसाहेब आणि गणपाशेठ म्हणतात ते ही पटले.

बिपिन कार्यकर्ते

डावखुरा's picture

19 Jun 2010 - 3:53 pm | डावखुरा

तिसरा नाही दुसरा रविवार..... ----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

मदनबाण's picture

19 Jun 2010 - 9:55 pm | मदनबाण

लेख आवडला...

मदनबाण.....

"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg

शानबा५१२'s picture

19 Jun 2010 - 11:15 pm | शानबा५१२

मदर्स डे प्रमाणे फादर्स डे चीही जाहीरात व्हावी अस मनापासुन वाटत.(म्हण्जे आता वाटायला लागल).

डॉक्टर आपले मनापासुन आभार आपण काहीतरी जाणीव करुन दीलीत.

पण .............

'बाप हा बाप असतो व आई ती आईच' हे माझ मत कधीच बदलणार नाही!!!!!!

Pain's picture

20 Jun 2010 - 4:31 am | Pain

सहमत

@शानबा५१२

बाप हा बाप असतो व आई ती आईच
ती वस्तुस्थिती आहे.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

20 Jun 2010 - 6:18 am | डॉ.श्रीराम दिवटे

फादरर्स डे जूनच्या तिसऱ्‍या रविवारी असतो तर मदर्स डे मे च्या दुसऱ्‍या रविवारी.

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

आनंद घारे's picture

20 Jun 2010 - 9:01 am | आनंद घारे

सकाळी उठल्याउठल्या मुलाने फोन करून 'हॅपी फादर्स डे' चे शुभचिंतन केले. अर्थातच हा महिन्याचा तिसरा रविवार असणार.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

आनंद घारे's picture

20 Jun 2010 - 9:01 am | आनंद घारे

सकाळी उठल्याउठल्या मुलाने फोन करून 'हॅपी फादर्स डे' चे शुभचिंतन केले. अर्थातच हा महिन्याचा तिसरा रविवार असणार.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

डॉ.श्रीराम दिवटे's picture

20 Jun 2010 - 3:03 pm | डॉ.श्रीराम दिवटे

तुमचे अभिनंदन झाले, बरे वाटले.

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

आनंद घारे's picture

20 Jun 2010 - 7:31 pm | आनंद घारे

शुभचिंतन केले. आम्ही इतर विषयांवरसुद्धा नेहमीप्रमाणे बोललोच.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/