द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग ३ (अंतिम)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
13 Jun 2010 - 6:10 pm

डिस्क्लेमर
या कवितेत कवीने काहीसे भडक लैंगिक शब्द वापरले आहेत. अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे राम, लक्ष्मण, सीता वगैरेंसारख्यांच्या बाबतीत परिचित रामकथेत नसलेली काही विधानं केलेली आहेत. ती नावं ही रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये.

द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग १
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग २
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग ३

द्रोण

या सगळ्याचा अर्थ काय? कवीला नक्की काय सांगायचं आहे?

त्यासाठी पुन्हा एकदा या साहित्यप्रकाराला काय म्हणावं असा विचार करावा लागतो. म्हटलं तर हा वैचारिक लेख आहे. एक विषय घेऊन त्याबद्दल टिप्पणी करणारा. म्हटलं तर ही एक रूपककथा आहे. म्हटलं तर छंदबंधनं झुगारून देणारी दीर्घ कविता आहे. मी हिला कविताच म्हणेन कारण तीत आलेली रूपकांची रेलचेल, एक अज्ञात, बोट न ठेवता येणारी लय यामुळे. कुठल्या बरणीत भरून ठेवावं व तीवर लेबल काय लावावं हे तितकंसं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की या रचनेतून काय प्रकारचा आकारबंध डोळ्यासमोर येतो? मला तरी असं वाटतं की या कवितेला एखाद्या विचारप्रवाहाचं रूप आहे. एखाद्या साध्या कवितेत किंवा वैचारिक लेखात बऱ्याच वेळा एक सरळसोट धारा असते. द्रोण मध्ये त्या धारेचं स्वरूप एखाद्या नदीसारखं आहे. अनेक उपनद्या तिला मिळतात, काही कालवे झरे वेगळ्या वाटांनी जातात, आणि प्रवाह पुढे जातो. महाकाव्यात काही आख्यानं येऊन जावीत तशा काही टिप्पणी येऊन जातात.

कवितेचा विषय आहे संस्कृती म्हणजे काय, व ती पसरते कशी? कोलटकरांची प्रतिभा अशी की ते संस्कृती हा शब्द एकदाही वापरत नाहीत. केवळ रूपकांतच बोलतात. हेच त्यांनी तक्ता मध्ये केलेलं आहे. वर्णव्यवस्थेबाबत बोलताना ते तक्त्याचं (वर्णमालेचं) रूपक वापरतात, व चौकटींविषयी बोलतात. त्या रूपकाचा अर्थ वाचकाने लावायचा असतो. मला कोलटकरांची कविता आवडते ती याच कारणामुळे. कवीला जे सांगायचं आहे त्यासाठी वाच्यार्थ वापरला तरी सुंदर कविता करता येते. पण रूपकांचा वापर हा कवितेला एक गहिराई प्राप्त करून देतो. रूपकांच्या वापरातून निर्माण होणारी आशयघनता हे कवितेचं शक्तीस्थान आहे.

तेव्हा प्रथम आपण रूपकांकडे बघू. कथा रामायणाची आहे, तेव्हा राम हे प्रमुख रूपक असावं हे उघड आहे. पण राम केवळ उल्लेखानेच या कथेत येतो. काहीसा पार्श्वभूमीला उभा असणारा - पार्श्वभूमी घडवणारा. राम हा आदर्श राजा आहे. पण आदर्श राजा म्हणजे नक्की काय? तर प्रजेला आदर्श वाटेल असा. आदर्श असणं आणि वाटणं यात फरक आहे. प्रजेसाठी निष्कलंक चारित्र्याची प्रतिमा ठेवली की राज्यकारभार, शत्रूंशी लढाया करून त्यांच्यावर विजय प्राप्त करणं यातही त्याच्या प्रजेसाठी आदर्श राहाणं म्हणजे लंकेवर विजय मिळवला की तिची संपत्ती हरण करून ती अयोध्येला बहाल करणं आलंच. हे करण्यासाठी, अयोध्यावासी ज्यांचं तोंडदेखील पहाणार नाहीत अशा वानरांशी मैत्री करणं (वालीचा कपटाने वध करूनही) हे त्याचं कर्तव्यच आहे. पण हे करतानाही वानरांना त्यांच्या जागीच ठेवणं हेही कर्तव्यच आहे. वर्णव्यवस्था वापरून घेणं आणि त्याचबरोबर ती जपणं ही रेषा चालायला सोपी नाही. कवितेतल्या रामाने त्यावर तात्पुरता तोडगा काढलेला आहे. वानरांना माणसांचं रूप काही काळपर्यंत, लंकेसारख्या दूरच्या भूमीत दिलं तर सगळेच खूष. ही व्यवस्था कोणी मोडू नये म्हणून लक्ष्मणाच्या कोपाचा बडगा तो बाळगून आहेच. प्रस्थापित व्यवस्था पददलितांना कमीतकमी 'मोबदला' देऊन वापरून कशी घेते याचं हे चपखल उदाहरण आहे. ब्रिटिशांना जेव्हा भारताचं शोषण करण्याच्या योजना राबवण्यासाठी भारतातल्याच वानरांची गरज पडली तेव्हा त्यांनी इथल्या नेटिव्हांना शिकवलं, पण तेवढ्यापुरतंच. त्यांना अर्थातच गोऱ्यांचं स्थान मिळालं नाही. जेते आणि जीत, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.

रामाचं आणि वानरांचं रूपक तसं समजायला सोपं आहे. सगळ्यात गूढ गहन रूपक आहे ते सीतामाईचं. राम हा पार्श्वभूमीला असतो तर सीतामाई प्रत्यक्ष सहभाग घेते. कोलटकरांच्या चिरीमिरीमधल्या काही कवितांतही विठ्ठल- रखुमाई अशी रूपकाची जोडी येते. तिथे विठ्ठल हा कधी प्रस्थापित व्यवस्थेचा धारक म्हणून येतो, तर इतर (बऱ्याच) वेळा तो जीवनाच्या वारीचं अंतिम ध्येय म्हणून येतो. रखुमाई मात्र विठ्ठलाच्या पुरुषाची जोडीदार प्रकृती बनून येते. इथे सीतामाईची देखील तीच भूमिका आहे. सीतामाई ही धरतीची कन्या असल्यामुळे इथे हे रूपक अधिक चपखल बसतं. नुकत्याच शिकून सवरून शहाण्या झालेल्या वानरांनी आसपास बघितलं तर त्यांना ही परिस्थिती दिसते. आसपासच्या निसर्गात, माणसांत, जमिनीत अमाप वैभव (untapped potential) असतं. अज्ञानामुळे आत्तापर्यंत ते वापरलेलं नसतं इतकंच. त्या झाडाच्या पानांपासून, नवनिर्माणाच्या प्रतीकांपासूनच हे द्रोण बनतात. हे द्रोण म्हणजे शक्ती, सामर्थ्य... पहिल्या द्रोणाचं जहाज बनल्यावर वानरांचा प्रमुख डोकं ताळ्यावर ठेवून अठरा जहाजांच्या आरमाराचा हिशोब करतो. पण सगळी तयारी व्हायच्या आतच तो शंख फुंकला जातो. आणि क्षुल्लक ठिणगी पडून पूर्ण तयारी आधीच विस्फोट व्हावा, क्रांतीसाठी सशस्त्र चळवळ व्हावी, 1857 सारखा उठाव व्हावा तशी ती शक्ती आपसूकच उद्रेक होऊन बाहेर पडते.

हा शंख हे कवीचं सर्वात जिव्हाळ्याचं रूपक आहे असं वाटतं. ही आंतरिक साद भल्याभल्यांना भुरळ पाडते. तिचा आवाज साजणगहिरा आहे. कानांना ऐकू येणाऱ्या आवाजाच्या अलिकडल्या व पलिकडल्या वलयांचा, सरळ मनालाच भिडणारा. नाविकांना झपाटून टाकणाऱ्या सागरकन्यांचा - सायरेन्सचा. हा आवाज कानांवर पडला की चेटूक होतं. जुनं, शिळं फेकून देऊन नवीन, कोवळं, ताजं शोधण्याच्या मानवाच्या ओढीचा हा आवाज आहे. गतानुगतिकांच्या वाटेने जायचं तर या शंखाचा, सायरेन्सचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून कानात उपदेशांचे बोळे भरण्याचा समाज प्रयत्न करतो. शेवटी प्रस्थापितांचा जाच, हा आतला आवाज आणि समाजातल्या व परिस्थितीच्या शक्तीची जाणीव झाली की संस्कृती नवीन माती शोधते, पसरते, फळते, फुलते...

इंग जिथे गेला तिथे नवीन संस्कृती वसवून जुन्या संस्कृतीला दडपण्याचं एक चक्र पूर्ण झाल्यानंतर त्याच मुळांचा शोध घेण्यासाठी जॉन येतो. हा इंगचा वंशज. त्याला इथेच राहाणाऱ्या, आपली आदीम ओळख जपलेल्या वानराचा वंशज भेटतो आणि खरा इतिहास सांगतो. शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात. कायमच्या जुळण्यासाठी अर्थातच नाही. संस्कृतीच्या गाण्यातली एक सुंदर सम साधण्यासाठी फक्त.

कविताआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

वाचक's picture

13 Jun 2010 - 8:08 pm | वाचक

सुरेख रसग्रहण आणि विवेचन.
लेखकाची रसिक दृष्टी, कवितेवरचे (कोलटकरांच्या?) प्रेम, आणि रुपकांमागच्या अंतःप्रेरणा जाणून घेण्यासाठीची पूर्वतयारी (वाचन, मनन) वाक्यावाक्याला जाणवते आहे.

'द्रोण' कविता वाचायला मिळाली असती तर ह्या रसग्रहणाचे सौंदर्य अधिक उत्कटतेने जाणून घेता आले असते :(

नीधप's picture

13 Jun 2010 - 11:04 pm | नीधप

द्रोण ही दीर्घकविता पुस्तकरूपाने सध्या उपलब्ध आहे.
पुण्यात पाथफाइंडरमधे आजच बघितलेय.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

शुचि's picture

13 Jun 2010 - 8:45 pm | शुचि

काय बोलू? इतकं सुंदर, प्रभावी विवेचन. माझ्या अंगावर काटा आला वाचून या काव्यातील अद्भुतता, सखोलता. मला वाचताक्षणी जाणवलेला पैलू या कवितेचा म्हणजे - "चेंज मॅनेजमेंट". ह्या कवितेला टेकू आहे पुराणकाळातला पण तिचा रोख पूर्ण आधुनिक काळाशी सुसंगत वाटतो. घासकडवींनी जे उकलून दाखवलय केवळ त्यामुळे मी या निष्कर्षाप्रत येऊ पोचले.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नीधप's picture

13 Jun 2010 - 11:03 pm | नीधप

अधाशासारखे तिन्ही भाग वाचून काढले.
दोनच महिन्यांपूर्वी द्रोण विकत घेऊन वाचून काढली होती ते गारूड उतरायचे आहेच आणि आता इतके मस्त रसग्रहण...
वा.
टंग ने चिक ला भोक पडावे इतके इन.... :)

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

14 Jun 2010 - 1:30 am | भडकमकर मास्तर

घासकडवी, मजा आणलीत...
कविता वाचून समजून घ्यायला मजा येतेय...
अवांतर : साजणगहिरा शब्द मस्त .. कुठेतरी वाचल्यासारखा वाटतोय... कुठं बरं :?

इन्द्र्राज पवार's picture

14 Jun 2010 - 10:20 am | इन्द्र्राज पवार

रसग्रहणाचे तिन्ही भाग वाचल्यानंतरच (आणि एक पूर्ण दिवस थांबून) लिहित आहे, याला कारण म्हणजे लेखकांने अत्यंत डोळसपणे "द्रोणा"कडे पाहिले आहे आणि जरी मी 'अरुण कोलटकर' वाचला असेल, समजावून घेतला असेल, नगर वाचन मंदिरात झडलेल्या आस्वाद बैठकीत या विषयावर प्रत्य़क्ष-अप्रत्यक्ष भाग घेतला असेल, पण तरीही श्री.घासकडवी यांच्या या तीन अंकांनी द्रोण समजावून घेण्यास नि:संशय मदत झाली/होईल आणि यापुढे गावात जर या विषयावर एकत्रीत चर्चा झाली तर यातील विवेचनाचा मी नक्कीच उपयोग करेन, जेणेकरून जे लोक संस्थळावरील अशा विषयाचा लाभ घेऊ शकत नाहीत (आणि अशांची संख्या निर्विवादपणे खूप आहे...) त्यांनाही या लेखाचा आनंद देईन.

श्री.कोलटकर हे नेहमीच "जरा हट के" स्वरूपाचे कवी असल्याने त्यांच्या तुलनेत समकालिन तर राहु देच, पण एकूणच मराठी कवीइतिहासात त्यांच्या सादरीकरण पध्दतीचा दुसरा कवी नाही (गद्यात त्यांच्याजवळ जावू शकणारे एकच नाव म्हणजे श्याम मनोहर...असो.), असे असूनही श्री.कोलटकर यांच्यापाशी या विषयाला आवश्यक असणारी पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टी आहेच आहे. तसेच ते हे दोन्ही घटक केवळ घटनासापेक्ष ठेवत नाहीत तर ते वर्तमानाशी निगडित ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. भाषेतील, प्रदेशातील, परंपरेतील, संस्कृतीतील समग्र उलथापालथीचे भान आपल्या अंतरंगात ठेवून श्री.कोलटकर यांनी कायम काव्यलेखन केले आहे. सर्वार्थाने श्री.अरुण कोलटकर हे खरेखुरे परंपरासमृध्द आहेत्/होते; आणि त्यांना आपल्या कालसापेक्ष आणि समकालीन स्थानाची यथार्थ जाणीव होती. श्री.घासकडवी यांनी आपल्या समर्थ शब्दांनी श्री.कोलटकरांच्या "द्रोणा"चे अंतरंग त्यातील भावावे मोहुन जाऊन असे उभे केले आहे की, ज्यांना "अरुण कोलटकर" हे अद्भुत रसायन काय आहे हे माहित नव्हते त्यांच्या मनात नक्कीच तो समजावून घेण्याची चेतना जागविली आहे.

श्री.राजेश घासकडवी यांचे हार्दिक अभिनंदन...!

(थोडेसे विषयांतर ~~ श्री. घासकडवी यांनी लेख लिहिण्यापूर्वी जे "डिसक्लेमर" दिले आहे, त्याबद्दल >> ....त्याची खरेच काही जरूरी होती का?

मी त्यांना विनंतीपूर्वक विचारीत आहे की, ज्या अरुण कोलटकरांवर त्यांनी इतक्या आत्मियतेने लिहिले आहे त्यांना अशा बिनकिमतीच्या डिसक्लेमर्सची कधी जरूरी भासली होती का? "मला अमुकतमुक विषय भावला आहे, आणि तीवर मी तमुकामुक लिहीले आहे..." संपला त्यांच्यापुरता तो विषय, मग वाचणारे वाचतील...कौतुक करणारे करतील, नापसंती व्यक्त करणारे करणारच....शिवाय न वाचणारे त्या गल्लीत फिरणारदेखील नाहीत; मग असे जर असेल तर त्याबद्दल "सजग" करणे कितपत त्यांना मानवले असते. आज श्री.अरुण कोलटकर हयात नाहीत, पण असते तर त्यांनाही श्री.कडवी यांची "रसिकास चेतावणी" रूचली नसती.

करू नका अशा डिसक्लेमर्सनी तुमच्या स्वत:च्याच लेखनाची अवहेलना ! तुमचे नाणे मूळचेच खणखणीत आहेच, ते चांगले आहे हे सांगण्यासाठी त्याला पारा कशाला लावायचा ?)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नीधप's picture

14 Jun 2010 - 2:18 pm | नीधप

(गद्यात त्यांच्याजवळ जावू शकणारे एकच नाव म्हणजे श्याम मनोहर...असो.),<<
नाही हो..
कोलटकर चार शब्दात बरंच मोठं काही मांडून जातात. श्याम मनोहर एकाच गोष्ष्टीचे किती तरी वळसे घालत रहातात.
तिरकटपणा म्हणाल तर कदाचित थोडंफार जवळपास... पण तरी नाहीच. :)

>>करू नका अशा डिसक्लेमर्सनी तुमच्या स्वत:च्याच लेखनाची अवहेलना ! तुमचे नाणे मूळचेच खणखणीत आहेच, ते चांगले आहे हे सांगण्यासाठी त्याला पारा कशाला लावायचा ?)<<
याबद्दल सहमत
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

राजेश घासकडवी's picture

14 Jun 2010 - 2:38 pm | राजेश घासकडवी

उत्तेजनार्थ प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

जे "डिसक्लेमर" दिले आहे, त्याबद्दल >> ....त्याची खरेच काही जरूरी होती का?

डिस्क्लेमर हे मुख्यत्वे चर्चा मर्यादित ठेवण्यासाठी लिहिलं होतं. संस्थळांवरचं लेखन व त्यावरच्या चर्चा कुठे कशा भरकटतील हे सांगता येत नाही. एखाद्या विभूतीविषयी थोडे वेगळे शब्द आले तर मूळ विषय बाजूला राहून चर्चा वाटेल तिथे जाऊ शकते.

ज्या अरुण कोलटकरांवर त्यांनी इतक्या आत्मियतेने लिहिले आहे त्यांना अशा बिनकिमतीच्या डिसक्लेमर्सची कधी जरूरी भासली होती का?

त्यांनी डिस्क्लेमर्स लिहिली नाही, पण त्यांच्या चिरीमिरीतील काही कवितांतून अश्लीलतेचा आक्षेप घेणार्‍यांवर टीका केलेली दिसते. (ती त्या लोकांना किती कळली ही गोष्ट वेगळी!) कोलटकरांना माझ्या डिस्क्लेमर्स मधला खवटपणा पसंत पडला असता असं वाटतं.

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Jun 2010 - 9:08 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री पवार आपला प्रतिसाद पुस्तकी वाटला. श्री कोलटकरांची कविता हा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे.

ज्यांना "अरुण कोलटकर" हे अद्भुत रसायन काय आहे हे माहित नव्हते त्यांच्या मनात नक्कीच तो समजावून घेण्याची चेतना जागविली आहे.

रसग्रहणाने "अरुण कोलटकर" या रसायनापेक्षा 'द्रोण' या कवितेला वाचण्याची चेतना जागविली आहे.

....

'बिनकिमतीचे' डिसक्लेमर मलातरी अत्यावश्यक वाटले. नको त्या लोकांनी संदर्भ सोडून नसते आक्षेप घेतल्यास त्यामुळे लेखमालेचा मूळ उद्देश्य दुर्लक्षित होऊ नये म्हणून या डिसक्लेमराला बरीच किंमत आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Jun 2010 - 8:33 am | अक्षय पुर्णपात्रे

कविता वाचायलाच हवी.

शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात.

रसग्रहणाचा अतिशय चपखल शेवट. द्रोणाचा अर्थच उलगडतो. पानाच्या दोन बाजू जोडल्या जातात. सामावू शकणार्‍या.

इन्द्र्राज पवार's picture

15 Jun 2010 - 10:16 am | इन्द्र्राज पवार

नीधप, राजेश घासकडवी आणि अक्षय पुर्णपात्रे यांना एकत्रित प्रतिसाद देत आहे.

१. नीधप ~~ श्याम मनोहर यांच्या बाबतीतील आपले मत मी विचारात घेत आहे; पण असे असले तरीही कोलटकर आणि श्याम मनोहर यांची जातकुळी मात्र एकाच मुशीतील आहे या मताशी मी चिकटून आहे. मी तर असे म्हणतो की विषयाची तार झंकारावयाची असेल तर या दोघांचे वाद्य एकच आहे, पण जर फरक असेल तर तो विषय चितारणार्‍या दोन चित्रकारात जितका असेल तितकाच; उदा. रेम्ब्राँटचे ऑईल्स हे डीप सेपिया, चारकोल ब्लॅक, आणि ब्लड रेड अशा उग्र रंगाचा वापर केलेले असल्याने त्याच्या कलाकृतीसमोर वॉटर कलर ने केलेली कलाकृती ही केजी गोइन्ग स्कूल विद्यार्थ्यासारखीच दिसणार.... नेमका हाच फरक वरील दोन लेखकात आहे (किंबहुना दोघेही एकाच रस्ताने पंढरीच्या वारीला जाणारे प्रवासी आहेत.)

२. राजेश घासकडवी ~~ डिस्क्लेमर्स मागील तुमची भूमिका मी समजून घेतली आणि त्यातील मताशी मी अंशतः सहमत आहे, कारण अशा खुल्या संस्थळ व्यासपीठावर जेव्हा आपण लेखन करतो त्यावेळी इथे टपकणार्‍या प्रतिसादावर निश्चीत्तच आपले बंधन असू शकत नाही, त्यामुळे तुम्ही म्हणता तसे एखाद्या विभूतीवर चाललेल्या चांगल्या, अभ्यासू, आणि गंभीर चर्चेच्या राजधानी एक्स्प्रेसचे रूळ अकारण बार्शी लाईट कडे घेतले जातात आणि तो विषय सुरु करणार्‍याचे त्यातील स्वारस्यच निघून जाते.

"अरुण कोलटकरांना" तुमचे डिस्क्लेमर्स प्रकटन पसंत पडले असते असे तुम्ही म्हणता. तसेही झाले असते पण म्हणून काही वाचकाचा 'सुरुवातीसच' अनुनय करावा असे त्यांनी कदापीही म्हटले नसते. ('चिरीमिरी' त त्यांनी तसे जरूर उल्लेख केले आहेत, पण मूळ कलाकृती प्रसिध्द झाल्यानंतर झडलेल्या चर्चेवर....)

एलुआर्ड या फ्रेंच कवीचे एक वाक्य आहे : "A poet should never write about his own heart; other people should be his mirror." याच न्यायाने मी असे म्हणतो की, तुम्ही "द्रोण" वर लेख लिहिला ना, then let readers judge its merit on their own cognizance.

३. श्री.अक्षय पुर्णपात्रे ~~ "श्री कोलटकरांची कविता हा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे." ~~ इथे थोडा गोंधळ आहे असे वाटते. श्री.घासकडवी यांच्या मनी (लेख लिहिण्यापूर्वी...) कवीविषयी कोणताही पूर्वग्रह नव्हता असे म्हणणे धाडसाचे होईल. याला कारण असे की, लेखक ज्यावेळी एकाद्या कवितेचे, कथेचे, कादंबरीचे वा तत्सम साहित्यावे रसग्रहण करायला घेतो त्यावेळी त्याच्या/तिच्या मनी मूळ लेखकाबद्दल भल्याबुर्‍या मताचा एक ओला कोपरा असतोच असतो; आणि त्याचे प्रत्यंतर त्या लेखात नैसर्गिकरित्या उमटतेच. (श्री.घासकडवी यांचे या बाबतीतील मत विचारात घ्यावे लागेल. असो.)

"डिस्क्लेमर"च्या अनावश्यकतेबाबत मात्र मी ठाम आहे. तुम्ही म्हणता, "नको त्या लोकांनी संदर्भ सोडून नसते आक्षेप घेतल्यास त्यामुळे लेखमालेचा मूळ उद्देश्य दुर्लक्षित होऊ नये म्हणून ..." पण तुम्हाला असा विश्वास कशाच्या आधारे वाटतो की, असे आवाहन केले तरच संदर्भशून्य प्रतिसाद येण्याचे थांबतील? (मी व्यक्तीशः असा कटु अनुभव घेतला आहे, पण त्याची चर्चा इथे नको.)

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

राजेश घासकडवी's picture

15 Jun 2010 - 10:22 am | राजेश घासकडवी

प्रतिसाद शब्द डिस्क्लेमरविषयी... डिस्क्लेमरने जे टाळायचं होतं तेच झालं शेवटी... हम्म्म्म्म...

चला दुसरं काही तरी बोलू.

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Jun 2010 - 3:03 pm | अक्षय पुर्णपात्रे

अर्थातच श्री घासकडवी यांच्या मनात कवीविषयी काहीएक पूर्वग्रह होता पण कवितेविषयी नव्हता. उदा. पहिल्या लेखातील हे वाक्य पहा: केवळ कोलटकरांनी लिहिलंय म्हणून तिला कविता म्हणायची का? असाही प्रश्न पडतो. तरीही माझ्या वाक्यात थोडा बदल करत आहे. (बदल ठळक अक्षरांत)

केवळ श्री कोलटकरांची कविता असा पूर्वग्रह न ठेवता वरील रसग्रहण केले गेले आहे हे ध्यानी घ्यावे.

...............

तुमच्या प्रतिसादात मात्र श्री कोलटकर हे अमुक प्रकारचे कवी आहेत, त्यांना अमुक अमुक दृष्टी आहे, त्यांची तुलना फलाण्या लेखकाशी करता येईल अशा छापाची विधाने आहेत. ज्यांचा 'द्रोण' या कवितेच्या रसग्रहणाशी फारसा संबंध नाही. कोलटकरांवर चर्चा करायची असल्यास नवा धागा काढता येईल पण या लेखमालेसाठी तो प्रतिसाद अस्थानी वाटला.

....................

आतापर्यंत या धाग्यावर संदर्भशून्य प्रतिसाद आलेले नाहीत. उगीच कोणी संदर्भशून्य बरळू लागल्यास डिस्क्लेमराकडे बोट दाखवता येते.

मुक्तसुनीत's picture

15 Jun 2010 - 5:24 pm | मुक्तसुनीत

कोलटकरांच्या कवितेवरील धाग्यात एकंदर कोलटकरांवरचा दृष्टीक्षेप अस्थानी नव्हे असे मला वाटते. उदाहरणार्थ मला "द्रोण" पेक्षा बळवंतबुवाच्या कविता फारच जास्त आवडल्या आहेत. दोन्ही संग्रहांमधे संकल्पनेच्या "एकत्वा"बद्दल, रचनेबद्दल साम्यस्थळे आहेतच - आणि अर्थातच महत्त्वाचे भेदसुद्धा. दोन्हींचा परिणाम वेगळा होतो. अशा वेळी मी द्रोण बरोबर बळवंतबुवाबद्दल बोलायला लागलो तर ते अस्थानी ठरणार नाही.

थोडक्यात, अन्य धाग्यांवर चाललेल्या अवांतरापेक्षा येथे होणारे अशा स्वरूपाचे अवांतर मला फारच आवडते.

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Jun 2010 - 6:14 pm | अक्षय पुर्णपात्रे

कोलटकरांच्या कवितेवरील धाग्यात एकंदर कोलटकरांवरचा दृष्टीक्षेप अस्थानी नव्हे असे मला वाटते.

हे योग्यच आहे. असा दृष्टीक्षेप व्यक्त करायचा असल्यास त्याचा प्रस्तुत कवितेशी संबंध जोडला जावा इतकेच. केवळ नावांची जंत्री असू नये असे माझे मत आहे.

श्री पवार यांना 'द्रोण' व कोल्हटकरांच्या इतर कविता यावर विस्तृत भाष्य करता येईल असे वाटते. त्यांनी तसे न करता एखाद्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर असतो तशा छापाचा प्रतिसाद लिहिला आहे. जो मला अस्थानी वाटतो.

राजेश घासकडवी's picture

15 Jun 2010 - 10:46 pm | राजेश घासकडवी

मी कोलटकरांची पहिली कविता चार महिन्यांपूर्वी वाचली. (धन्यवाद मुसु) त्यानंतर आणखीन एक दोन कविता वाचल्या (धन्यवाद मुसु, अक्षय) त्यात काही वेगळेपण जाणवलं. विशेषतः त्यांची रूपकांत बोलण्याची पद्धत. त्यानंतर द्रोण व चिरीमिरी वाचले. त्यात कवीच्या लेखनाचा, प्रतिभेचा आवाका जाणवत गेला. तो काय लिहितो व का लिहितो हे कळतंय असं वाटायला लागलं. काही कोडी उलगडत गेली. जितकं जास्त व जास्त वेळा वाचतो तसं अधिक गवसल्यासारखं वाटतं.

यालाच कवीविषयी पूर्वग्रह म्हणता येईल का? कवी आणि कविता वेगळी काढता येते का?

मुक्तसुनीत's picture

15 Jun 2010 - 10:54 pm | मुक्तसुनीत

इथे करंदीकरांचे प्रसिद्ध विधान आठवते : "कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !"यामधे एकंदरीत पूर्वग्रहाना बाजूला ठेवून सामोरे जाण्याबद्दल सूचन आहे असे वाटते.

हे सर्व कठीण आहे खरे. विशेषतः काव्यसंग्रहावर कवीचे नाव असताना, त्याच्याच कविता एकामागोमाग एक वाचताना आपली दृष्टी क्रमाक्रमाने संस्कारित होत जाते. शैली अंगवळणी पडत जाते. आपण नकळत कंडिशन्ड बनत जातो.

यादृष्टीने सुचलेले अवांतर : म्हणूनच दिवाळी अंकांबद्दल अजूनी उत्सुकता वाटते. एकेका लेखक/कवीची "एकल" कृती आपण अनुभवतो. अनुभवांमधे सुटेपणा, स्वायत्तता असते.

पुनःपुन्हा वाचनानंतर उलगडण्याबाबत राजेशने येथे बोलावे हा योगायोग खरा. कोलटकर आपल्या कवितेची प्रसंगी दोन-दोनशे परिष्करणे करत असा प्रवाद होता.

नीधप's picture

16 Jun 2010 - 9:21 am | नीधप

वा मस्त क्वोट. आणि एकदम चपखल.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jun 2010 - 5:27 pm | बिपिन कार्यकर्ते

मला असा वाचक होत येईल का असा विचार करतो आहे. राजेश, खूपच सुंदर रसग्रहण.

मूळ दीर्घकविता वाचली नाहीये. त्यामुळे बाकी काहीच टिप्पणी नाही.

बिपिन कार्यकर्ते

इन्द्र्राज पवार's picture

15 Jun 2010 - 6:40 pm | इन्द्र्राज पवार

"...आतापर्यंत या धाग्यावर संदर्भशून्य प्रतिसाद आलेले नाहीत. उगीच कोणी संदर्भशून्य बरळू लागल्यास डिस्क्लेमराकडे बोट दाखवता येते...."

हे मान्य. पण इथे झाले नाही म्हणजे यापूर्वी झालेले नाही असा अर्थ होत नाही, आणि तसे झालेले आहेच, त्यामुळेच डिस्क्लेमर्सची सूचना घेणारा किती गांभिर्याने घेईल किंवा घेतो याबद्दल वादच आहे. पण असो...निदान जे काही १०-१२ प्रतिसाद आहेत ते नक्कीच भरकटलेले नाहीत.

आता तुमचा मुद्दा ~~ "कोलटकरांवर चर्चा करायची असल्यास नवा धागा काढता येईल पण या लेखमालेसाठी तो प्रतिसाद अस्थानी वाटला." ~~ नाही...., कोणत्याही वाङ्मयीन चर्चेत त्या त्या लेखकाची/कवीची पूर्वपिठीका येणे अपरिहार्य असते. जरी श्री.राजेश घासकडवी यांनी निव्वळ 'द्रोण' वर आपले कलम केन्द्रीत केलेले असले तरी प्रतिसाद देणार्‍यांनी द्रोणाभोवतालीच घुटमळावे असे काही बंधन नसते. श्री.अरूण कोलटकरावर चर्चा करत असताना त्यांच्या प्रतिभेचा आवाका ल़क्षात घेता समकालीन संदर्भ घेतले जातातच, त्यात आ़क्षेपार्ह काही नसते. खुद्द श्री.घासकडवी नंतर त्याच प्रस्तावनेत म्हणतात की, "त्या ओळी वाचताना आपणही तीबरोबर भरारी घेतो. आपण आधी शंका घेतली याबाबत आपण मनोमन कोलटकरांची क्षमा मागतो." म्हणजेच "क्षमा मागण्याइतपत" ते मनाचा मोठेपणा दाखवतात याचाच अर्थ असा की, 'द्रोण'पूर्वीचेदेखील कोलटकर त्यांना भावलेले आहेत, इतकेच माझे म्हणणे.

श्री. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे काहीवेळा त्या त्या कवीच्या गुणदोषाबाबत अपरिहार्यपणे होणारी अवांतर चर्चा ही मूळ लेखाला पूरक तर असते पण अप्रत्यक्षरित्या त्या लेखकाच्या (पक्षी : श्री.राजेश घासकडवी...) अभ्यासाला दिलेली प्रशंसेची पावती असते.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Jun 2010 - 7:27 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री.अरूण कोलटकरावर चर्चा करत असताना त्यांच्या प्रतिभेचा आवाका ल़क्षात घेता समकालीन संदर्भ घेतले जातातच, त्यात आ़क्षेपार्ह काही नसते.

हे बरोबरच आहे. वर श्री सुनीत यांना लिहिलेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या संदर्भांना संदर्भ म्हणता यावेत इतपत बळ पुरविले जावे, निव्वळ शेरेबाजी नसावी.

मनिष's picture

15 Jun 2010 - 7:59 pm | मनिष

मराठी आंतरजालावर इतके समृध्द करणारे लिखाण अपवादानेच आढळते. इतक्या सुंदर लेखाबद्द्ल राजेश घासकडवी यांचे अभिनंदन. हा लेख वाचून द्रोण वाचायची इच्छा झाली आहे.

अभिज्ञ's picture

15 Jun 2010 - 10:55 pm | अभिज्ञ

मनिषशी पुर्णतः सहमत.
असे लेख जालावर कमी सापडणे हे खरोखर दुर्दैवच.
मिपावर देखील आजकाल फारसे "वाचनीय" लेख येत नाहित ह्याची खंत वाटते.

अभिज्ञ.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jun 2010 - 3:13 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो.

धागा वाचनखूण म्हणून साठवला आहे. राजेश, मुसु, अक्षय, इंद्रराज यांना खास धन्यवाद. खाली जंतुंचा एक प्रतिसाद दिसतोय. ते पण या चर्चेत उतरले तर दुधात साखर.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

16 Jun 2010 - 9:31 am | सहज

त्या झाडाच्या पानांपासून, नवनिर्माणाच्या प्रतीकांपासूनच हे द्रोण बनतात. हे द्रोण म्हणजे शक्ती, सामर्थ्य...

जेम्स कॅमेरानच्या अवतार सिनेमाची आठवण झाली. :-)

पुन्हा एकदा द्रोण हे प्रतिक व नक्की सामर्थ्य कसे यावर काही ओळी लिहाव्या ही विनंती.

राजेश घासकडवी's picture

16 Jun 2010 - 12:14 pm | राजेश घासकडवी

पुन्हा एकदा द्रोण हे प्रतिक व नक्की सामर्थ्य कसे यावर काही ओळी लिहाव्या ही विनंती.

एखाद्या समाजात, टोळीत, राष्ट्रात जेव्हा प्रस्थापित व्यवस्था एका गटाला दडपत असते तेव्हा त्यांच्यापुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे व्यवस्थेविरुद्ध लढून ती बदलणे. दुसरा म्हणजे तीपासून दूर जाऊन (स्वातंत्र्य मिळवून) सवतासुभा बनवणे. इथे दुसर्‍या मार्गाविषयी लिहिलं आहे. यासाठीही काही भांडवल लागतं. हे कुठून मिळणार, तर निसर्ग व आसपासच्या परिस्थितीतून. त्याच गटातील लोक हेही या परिस्थितीचा भाग असतात. या सर्वांचं प्रतीक म्हणून सीता येते. ती रामाच्या अधीन असली, तरी या वानरांना देखील काही देणं लागते. तिच्याकडून घेतलेली शक्ती म्हणजे हे द्रोण. यांचीच पुढे गलबतं होतात - त्यांच्याच जोरावर ही वानरं दूरवर जाऊ शकतात.

सहज's picture

16 Jun 2010 - 1:20 pm | सहज

महात्मा गांधीना द. अफ्रिकेत भारतीय व्यापारी, मजुरांची मदत, लगान मधील मेमसाबची मदत वगैरे आठवले.

"द्रोण" किती साली लिहले होते?

चिंतातुर जंतू's picture

16 Jun 2010 - 2:03 pm | चिंतातुर जंतू

महात्मा गांधीना द. अफ्रिकेत भारतीय व्यापारी, मजुरांची मदत, लगान मधील मेमसाबची मदत वगैरे आठवले.

"द्रोण" किती साली लिहले होते?

कोणत्याही शोषणाधारित व्यवस्थेमध्ये शोषक व शोषित यांची एक मोठी साखळी असते, असं मला वाटतं. त्या साखळीतले काही दुवे वरच्यांचं शोषण सहन करून खालच्यांचं शोषण करतात. उदा: जमीनदाराकडे पिढ्यान् पिढ्या राबणारा एखादा शेतमजूर घरी येऊन बायकोला मारझोड करत असू शकतो. इथे सीता व वानरं दोन्ही शोषित आहेत, पण सीता (रामाची बायको असल्यानं) साखळीत वानरांपेक्षा वर आहे. सीतेचं वर्तन याउलटही होऊ शकलं असतं - म्हणजे सासूकडून सासुरवास भोगल्यावर एखादी स्त्री आपल्या सुनेचा आणखीच छळ करून वड्याचं तेल वांग्यावर काढते तसं. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की अशा शोषितांच्या साखळीतले भले-बुरे दुवे हे खूप वैश्विक आहेत, कारण ते वेगवेगळ्या प्रकारांच्या शोषणांत सापडतात.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

राजेश घासकडवी's picture

16 Jun 2010 - 11:01 pm | राजेश घासकडवी

या कवितेत सीता ही रामाची अंकित आहे. राम हा तिचा स्वामी आहे. राजाचं राज्याच्या संपत्तीवर ज्या अर्थाने स्वामीत्व असतं त्या. पण ती त्याच बरोबर दयाळू व थोडीशी तटस्थ, आपल्या सृजनतेमध्ये मग्न आहे. म्हणून ती समाजाचा अगर व्यवस्थेचा एक घटक असण्याऐवजी या सर्वांच्या पार्श्वभूमीला असलेली शक्ती आहे. जीवर हा सर्व व्याप चालतो ती ऊर्जा आहे. म्हणजे शेतात पिकणारं धान्य, जनतेची कष्ट क्षमता व बुद्धी.

त्यामुळे ती मला साखळीचा भाग अगर दुवा वाटत नाही. साखळी बनवू शकणारी भट्टी, ऐरण व घणाचे घाव ती आहे.

इन्द्र्राज पवार's picture

16 Jun 2010 - 3:23 pm | इन्द्र्राज पवार

"....यांचीच पुढे गलबतं होतात - त्यांच्याच जोरावर ही वानरं दूरवर जाऊ शकतात....."

बरोबर. "द्रोण" हे गलबताचं प्रतीक असून त्यातून सामर्थ्य आले (किंवा वाहुन नेले) असे कवीला वाटते. कोलटकरांना 'द्रोण' हे ‘Container’ म्हणून अभिप्रेत आहे. सर्वसाधारणतः आपण "द्रोण' शब्द उच्चारतो तो पत्रावळीच्या संदर्भात, त्यामुळे कविता वाचताना काहीसा गोंधळ होतो. पण जसजसे प्रतिके समजत जातात तसतसे धुक्याचे पडदे दूर होण्यास सुरुवात होते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

चिंतातुर जंतू's picture

16 Jun 2010 - 6:43 pm | चिंतातुर जंतू

"द्रोण" हे गलबताचं प्रतीक असून त्यातून सामर्थ्य आले (किंवा वाहुन नेले) असे कवीला वाटते. कोलटकरांना 'द्रोण' हे ‘Container’ म्हणून अभिप्रेत आहे.

द्रोण सीता बनवते, हेही महत्त्वाचं आहे. स्त्रीची सर्जनशीलता काहीतरी सामर्थ्यवान घडवते. ते मुळात अस्तित्वात नव्हतं. द्रोणाचा आकारही खोलगट म्हणजे काहीतरी सामावून घेणारा असतो. टोकदार शस्त्रं वगैरे पुरुषी सामर्थ्य दर्शवणार्‍या प्रतिकांपेक्षा हा सामर्थ्यवान आकार सौम्य, शांत आणि म्हणून सीतेला अधिक साजेसा आहे.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

आळश्यांचा राजा's picture

17 Jun 2010 - 12:59 am | आळश्यांचा राजा

छान चर्चा आहे. आम्हाला कवितेतले मुळात काही फारसे कळत नाही. 'द्रोण' वाचलेली नाही. त्यामुळे यावर काही टिप्पणी करण्याची लायकी नाही. पण काही शंका आहेत.

प्रस्थापित व्यवस्था पददलितांना कमीतकमी 'मोबदला' देऊन वापरून कशी घेते याचं हे चपखल उदाहरण आहे. ब्रिटिशांना जेव्हा भारताचं शोषण करण्याच्या योजना राबवण्यासाठी भारतातल्याच वानरांची गरज पडली तेव्हा त्यांनी इथल्या नेटिव्हांना शिकवलं, पण तेवढ्यापुरतंच. त्यांना अर्थातच गोऱ्यांचं स्थान मिळालं नाही. जेते आणि जीत, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.

वानर शोषित कसे काय? रूपक आहे हे समजले. पण रामायणाचे रूपक घ्यायचे तर त्या कथानकाच्या आत्म्याला धक्का लावून सोयीप्रमाणे रूपक बनवायचे का?

वर वाचलं की इंग्रज राज्यकर्त्यांनी इथल्या नेटीव्ह लोकांना (वानरांना) त्यांच्यासारखं बनवून आपल्या फायद्यासाठी वापरून घेतलं. पण रामानं रावणाशी युद्ध करण्यासाठी वानरांना माणसाचं रूप दिलं नव्हतं. जर ते तसं रामानं केलं असतं, आणि आपलं काम झाल्यावर पुन्हा त्यांना वानर बनवून टाकलं असतं तर म्हणता आलं असतं की बिचार्‍या वानरांचं शोषण झालं. शिवाय रामानं किष्किंधेचं राज्य ना स्वतः घेतलं होतं, ना त्याने कुठला रिमोट कंट्रोल ठेवला होता. किष्किंधेतून कर वसूल करून ना तो आपल्यासाठी काही घेत होता ना अयोध्येला काही पाठवत होता. मग वानर हे भरडले जाणारे पददलित कसे काय ठरतात? मुळात ते पददलित नव्हतेच. त्यांचं स्वतःचं राज्य होतं. त्यांच्यात नल नील यांसारखे तज्ञ शिल्पी होते. त्यांचे युद्धशास्त्र पुढारलेले होते, आणि म्हणून तर ते रावणाच्या त्रिखंडजेत्या सेनेशी लढू शकले. मारूती तर श्रेष्ठ आध्यात्मिक व्यक्ती होता. त्याला बुद्धीमंतांचा अग्रणी म्हटलेले आहे. तर असे हे वानर ना पददलित होते, ना भरडलेले होते. तसेच राम काही परकीय राज्यकर्ता वगैरे नव्हता. ना तो जेता होता, ना वानर हे जित.

कवितेतली ही पार्टी कुठे झाली? लंकेत की अयोध्येत? जितांच्या अवशेषांवर आणि 'लुटी'वर झाली म्हणजे लंकेतच झाली असावी. वानरांना माणूस होण्याची संधी देऊन इतर माणसांच्या बरोबरीला आणले म्हणजे तिथे माणसं होती तरी किती? राम, लक्ष्मण आणि सीता सोडलं तर तिथं कुणी माणूसच नव्हता. वानरांना माणूस करायची गरजच नव्हती. कुठल्या वानरानं आपल्याला पाच मिनिटांसाठी माणूस होता आलं तर किती बरं होईल असाही विचार केला असण्याची शक्यता वाटत नाही. लंकादेखील लुटली वगैरे जाण्याचे कुठे संदर्भ वाचण्यात आलेले नाहीत.

रामाच्या संस्कृतीनं इंगाच्या संस्कृतीला भरडलं, त्यावर उपाय म्हणून रामाच्याच संस्कृतीच्या एका आस्पेक्टनं इंगाला सामर्थ्य दिलं. ते वापरून तो बाहेर पडला. तिथं मोठा झाला. मग त्याचे वंशज म्हणजे इंग्रज जणू सूड घेतल्याप्रमाणे परत रामाच्या संस्कृतीला भरडायला आले. आणि वर्तुळ पूर्ण झाले म्हणे. पटत नाही. कवीला काहीतरी वाटत असते, ते रूपकामध्ये बसवण्यासाठी एखाद्या सेट झालेल्या कथानकाची उगीच मोडतोड करायची काय गरज आहे?

विचार चांगला आहे. जेते, जित, अन-ट्यापड रिसोर्सेस, नवीन तंत्रज्ञानाचे बळ, संस्कृतींचा संघर्ष इत्यादि. चर्चाही चांगली चाललेली आहे. बरेच नवीन मुद्दे समोर येत आहेत. स्त्रीची समावेशक सृजनता, पुरुषांची आक्रमक विध्वंसक वृत्ती. सीता म्हणजे शक्ती, जनतेची एकत्रित सामायिक उपलब्धी, इत्यादि.

राम लय भारी वगैरे होता, आदर्श मर्यादा पुरुषोत्तम होता, की शंबूकाला मारणारा, सीतेला नाकारणारा टिपिकल व्यवस्थारक्षक होता या वादात मला पडायचे नाही. तसेच पंचतंत्रात सिंह कसा बोलेल, सिंहाला बोलता येतं का, असल्या शंकाही काढायच्या नाहीत.

पण

रूपक चुकीचे वापरले आहे असे आमचे स्पष्ट (आणि अडाणि) मत आहे.

(अडाण्यांचा) राजा

भडकमकर मास्तर's picture

17 Jun 2010 - 2:30 am | भडकमकर मास्तर

वरचा प्रतिसाद पुन्हापुन्हा वाचला...
( तसंही इथे लिहिलेलं सगळंच मला तरी पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कळत नाहीच म्हणा..ते असो..)
आणि सेट कथेची मोडतोड झालेली आहे असे मलाही वाटले...
( दिवसातून तीनचार वेळा या धाग्यावर येऊन प्रतिसाद वाचतो, नवीन माहिती चर्चा थोडीफार समजते, बरीचशी कळत नाही... आपल्याला कविता नक्की आवडेल की नाही याचा काही अंदाज येत नाही....आपल्याला नक्की काय वाटतेय , हे सालं शब्दांत सांगताही येत नाही असा चरफडेश अनुभव घेण्याची गंमत अनुभवत राहतो..)

एकूण वरच्या आळश्यांच्या राजा यांच्या प्रतिसादाने चर्चेला अधिक वेगळे आणि विधायक वळण लागावे अशी अपेक्षा...

प्रियाली's picture

17 Jun 2010 - 3:12 am | प्रियाली

सर्वप्रथम थोडासा वेगळा भासणारा आपला प्रतिसाद आवडला हे नमूद करते.

पण रामायणाचे रूपक घ्यायचे तर त्या कथानकाच्या आत्म्याला धक्का लावून सोयीप्रमाणे रूपक बनवायचे का?

कथानकाला जाणूनबुजून धक्का लावायचा हेतू असेल/ नसेल किंवा रूपक वापरले/ नाही वापरले तरीही महाकाव्यांतून स्फुरलेले साहित्य निर्माण करताना मूळ गाभ्याला धक्का लागतो असे दिसून येईल. उदा. जांभुळाख्यानात द्रौपदी कर्णावर भाळते असे दाखवले आहे. साध्वी समजली गेलेली द्रौपदी परपुरुषावर भाळते यातही कथानकाच्या आत्म्याला, लोकांच्या समजुतीला धक्का आहे. खुद्द उत्तर रामायण प्रक्षिप्त मानले आणि मूळ वाल्मिकी रामायणातील नाही असे पकडले तर रामायणाच्या उत्तरार्धाला किंवा रामाच्या प्रतिमेला काहीजणांच्यामते धक्का पोहोचतो. मलाही राम आदर्श/ चूक की बरोबर यात पडायचे नाही.

एकदा कवीने किंवा रसग्राहकाने जाहीर केले की ही कथा वाल्मिकी रामायणातील नाही की मग पुढील प्रश्न - पार्टीला मानव कसे/ किती असतील? पार्टी लंकेतच झाली का? वगैरे बाद ठरतात. राहतो फक्त राम हा राजा/ आदर्श पुरुष, सीता ही त्याची पत्नी, वानर हे त्याचे सोबती/ अंकित/ मदतकर्ते हा मूळ ढांचा. त्या ढाच्यात बसणार्‍या कथेला नंतर हवे तसे वाकवता येते, रंगवता येते. अनेक लोककथा आणि लोककाव्यांतही असे केल्याचे आढळते.

थायलंड मधील रामायणात सीता ही रावण आणि मंदोदरीची मुलगी असल्याचे सांगितले जाते. हाही धक्काच. आता कथा अशी बदलल्यावर तिला मूळ वाल्मिकी रामायणाचे संदर्भ लावण्यापेक्षा तिचा आहे त्या स्थितीत आस्वाद घेणे मला योग्य वाटते. म्हणून मला हे रसग्रहण आवडले.

वानर शोषित कसे काय?

वानरांना रामाने बरोबरीचे स्थान दिलेले नाही हे निश्चित आहे. तसे ते मूळ रामायणातही आढळते. एवढेच नाही तर श्रेष्ठत्वाचा आणि कनिष्ठ दर्जा देण्याचा प्रयासही दिसतो. कनिष्ठांचे शोषण कसे होते, येथे वानर शोषित कसे आणि त्या अनुषंगाने विचारलेल्या इतर प्रश्नांची उत्तरे राजेश देतील असे समजू. मीही वाचण्यास उत्सुक आहे.

राजेश घासकडवी's picture

17 Jun 2010 - 11:24 am | राजेश घासकडवी

खाली प्रियालींनी छान उत्तर दिलेलं आहे.

एकदा कवीने किंवा रसग्राहकाने जाहीर केले की ही कथा वाल्मिकी रामायणातील नाही की मग पुढील प्रश्न - पार्टीला मानव कसे/ किती असतील? पार्टी लंकेतच झाली का? वगैरे बाद ठरतात. राहतो फक्त राम हा राजा/ आदर्श पुरुष, सीता ही त्याची पत्नी, वानर हे त्याचे सोबती/ अंकित/ मदतकर्ते हा मूळ ढांचा. त्या ढाच्यात बसणार्‍या कथेला नंतर हवे तसे वाकवता येते, रंगवता येते.

कुठच्याही कलाकृतीबद्दल असे आक्षेप घेता येतात. खर्‍या मुंबई शहरात तुम्ही बटाट्याची चाळ शोधायला गेलात तर तुम्हाला ती सापडणार नाही. पण त्या लेखनाने मुंबई शहराच्या आत्म्याला धक्का पोचतो का? हे थोडंसं टोकाचं उदाहरण झालं. कारण पुलंनी खर्‍या मुंबईत केलेला बदल हा खूपच मामूली आहे. पण नावेतील तीन प्रवासी मध्ये मिरासदारांनी महाराष्ट्रात एक नवीनच नदी तयार केलेली आहे. ते धक्का लावायला पुरेसं आहे का?

मुद्दा असा आहे की साहित्यात येणार्‍या 'खर्‍या' गोष्टी या संदर्भापुरत्या येतात. शहराला पुणे, काळ पेशव्यांचा, आणि तिथला कारभारी नाना फडणवीस म्हटलं की लेखकाला चित्रनिर्मिती करणं सोपं जातं. इतर सर्व संदर्भ त्या रेफरन्स फ्रेमशी जोडले जातात. पण कथेत जे येतं ते खरं तर 'पुण्यासारखं शहर, काळ पेशव्यांच्या कालासारखा, तिथला कारभारी नाना फडणवीसासारखा' असंच असतं. त्यापलिकडचं सगळं लेखकाचं. हे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ करता न आल्यामुळेच घाशीराम वर अनैतिहासिकतेचे आरोप झाले. `म्हणून आत्म्याला धक्का, सेट कथेची मोडतोड वगैरे आक्षेप बाद होतात.

कोलटकरांनी वानर हे रूपक वापरताना 'वानरांना माणसं खालच्या प्रतीची समजत' हे गृहित धरलेलं आहे. माकडापासून (प्रगत होऊन) माणूस झाला ही समजूत देखील त्यांनी वापरली आहे.

रामाच्या संस्कृतीनं इंगाच्या संस्कृतीला भरडलं, त्यावर उपाय म्हणून रामाच्याच संस्कृतीच्या एका आस्पेक्टनं इंगाला सामर्थ्य दिलं. ते वापरून तो बाहेर पडला. तिथं मोठा झाला. मग त्याचे वंशज म्हणजे इंग्रज जणू सूड घेतल्याप्रमाणे परत रामाच्या संस्कृतीला भरडायला आले.

यातलं 'उपाय' व 'जणू सूड' हे शब्द बरोबर वाटत नाहीत. संस्कृतींच्या विजयाचे वारे कधी इथून तिथी तर कधी तिथून इथे वाहातात इतकंच.

आळश्यांचा राजा's picture

17 Jun 2010 - 12:43 pm | आळश्यांचा राजा

वातावरणनिर्मिती साठी रामायणाचा संदर्भ घेऊन एक रूपक बनवलेले आहे. कथानकाची मोडतोड हा मुद्दा ग्राह्य नाही. मान्य. वानर शोषित होते, हे एक गृहीतकच, काय सांगायचे आहे याच्या सोयीसाठी, हेही मान्य. मग वेगळीच गोष्ट लिहिता आली असती. रामायणाचे रूपक वापरायचे तर त्यात रामायण असले तर पाहिजे. त्यात रामायणच नाही तर ते कसले रूपक? असो. हे वानरांनी लिहिलेले रामायण आहे असे लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले आहेच. शिवाय हे रूपक म्हणजे काही रामायणाचे इंटरप्रिटेशन नाही. घाशीराम कोतवाल ला झालेल्या विरोधा स्टाईल काही विरोधही इथे मांडायचा नाही. या मोडतोडीमुळे कवीला काय सांगायचे आहे ते थोडे सुलभ होते हेपण मान्य. त्यामुळे या मुद्याची चर्चा मी बंद करतो. माझे शंकासमाधान झालेले नाही हा भाग वेगळा. साहित्याच्या थोड्या अभ्यासाची गरज आहे बहुदा!

अजून एक मुद्दा. रसग्रहण फार विचारपूर्वक लिहिले आहे, ओरिजिनल विचार मांडले आहेत यात वादच नाही. मजा आली वाचताना. कविता वाचायची उत्सुकता वाढली आहेच आहे. अजून एक विचार मनात आला, शेवटच्या काही ओळी वाचून- अर्थात मी ती कविता वाचलेली नसल्यामुळे माझे वाटणे संदर्भाला सोडून असू शकते. -

आणि पृथ्वीचा पचका करणार होत्या,
हे त्याला कसं माहीत असणार?
विनाकारण हळहळत

तो तसाच बसून राहिला तिथे वाळूत.
आपण किती भाग्यवान आहोत
हे त्याला समजलेलंच नव्हतं

शेपटीचं गतवैभव
त्याला परत मिळालेलं होतं
निरुपयोगी नाकाच्या बदल्यात.

इथे पाचवं सर्ग व कविता संपते. कवीचं मत पहिल्यांदाच व्यक्त करत. नंतर राहातो तो उपोद्घात.

कवीचे मत असे, की माणूस न होता वानरच राहिलेला वानर भाग्यवान. शेपूट हे त्याचे वैभव. नाक निरूपयोगी. म्हणजे, निसर्गाने जसं घडवलं, तसं राहणं परवडलं, पण निरूपयोगी 'नाक', अर्थात बाह्य सौंदर्य आणि त्या अनुषंगाने येणारी 'प्रगत' संस्कृती, तिने केलेला पृथ्वीचा पचका नको. सीतामाईनं फार मोठं बळ दिलं, समावेशकता दिली. पण झेपली का ती वानरांना? पृथ्वीचा पचकाच केला.

गड्या आपुला गाव बरा, जुने ते सोने, या प्रकारचा एक "luddite" विचार दिसतो. काही विचारवंत वानर पूर्वी म्हणालेले असतात - थोडा वेळ गंमत म्हणून हे माणूस होणं ठीक आहे. अज्ञाताची भीति, नवीन गोष्टींविषयी संशय या भावना यात येतात.

शेवटच्या सर्गात आपले मत व्यक्त करून कवीने सुचवलेले आहे, की ते विचारवंत वानर बरोबरच होते.

असे वाटते.

आळश्यांचा राजा

राजेश घासकडवी's picture

17 Jun 2010 - 7:48 pm | राजेश घासकडवी

कवीचे मत असे, की माणूस न होता वानरच राहिलेला वानर भाग्यवान. शेपूट हे त्याचे वैभव. नाक निरूपयोगी.

कवीचं मत त्या बाजूला झुकतंय असं वाटतं खरं. सुसंस्कृतपणा बरोबर जर सीतामाईच्या आईलाच काळीमा फासण्याची जबाबदारी येत असेल तर त्याऐवजी मुळात सीतेकडून दान न घेणंच बरोबर, असं कवी म्हणतोयसं दिसतं. त्यात वर आलेलं नाक हे शिष्ठपणाचं प्रतीक असावं, तर शेपूट हे निसर्गाशी असलेल्या धाग्याचं प्रतीक असावं. किंवा शेपूट हे माणसाने जे गमवलं आहे त्याची गोळाबेरीज असेल.

पण पुन्हा हे काव्य वानरांनी लिहिलेलं आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते खरोखरच कवीचे विचार आहेत की त्याने 'पपईमुख' चे विचार नोंदवले आहेत हे कळणं कठीण आहे.

राजेश