पु्स्तक परिचय - 'आशावादी अनुमान' - एक निराशा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
23 May 2010 - 2:07 pm

पुस्तकांचं पूर्ण नाव 'भारतीय लोकसंख्येचा शोध घेत केलेले माझे आशावादी अनुमान'
लेखक : डॉ. वसंत गोवारीकर.
अनुवाद : सुधा गोवारीकर.

सत्तरीच्या दशकात लोकसंख्येच्या स्फोटाच्या प्रश्नाने भारतातल्याच नव्हे तर जगातल्या विचारवंतांना भेडसावलं होतं. माल्थसने ज्या संकटाचं भाकित केलं ते लवकरच खरं होणार की काय असं अनेकांना वाटत होतं. भारतात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंबनियोजनाचा मोठा कार्यक्रम राबवला गेला. या पार्श्वभूमीवर डॉ. वसंत गोवारीकरांनी या समस्येचा अभ्यास करून नव्वदीच्या दशकात एक इंग्लिश पुस्तक लिहिलं, आय प्रेडिक्ट. त्या पुस्तकाचं हे संक्षिप्तीकरण.

खूप आशेने वाचायला घेतलं. एखाद्या प्रश्नावर मूलभूत विचार करण्याची गोवारीकरांची प्रतिमा डोळ्यासमोर होती. तिला अर्थातच तडा गेला नाही. पण एकंदरीत मांडणीमुळे रसभंग झाल्यासारखं वाटलं.

सुमारे पंच्याहत्तर पानाच्या पुस्तकात, पहिली साठ पानं हे लोकसंख्येच्या प्रश्नाची जटिलता मांडण्यात घालवली आहेत. शेवटच्या दहा पंधरा पानात आशावादी भाकित. बरं, ती जटिलता मांडताना देखील एक आवश्यक सूत्रबद्धता पाळलेली नाही. अभ्यासक व तज्ञ काय म्हणतात याचा तो एक विस्तृत लिटरेचर सर्व्हे आहे. त्यातही प्रत्येक अभ्यासक त्या मोठ्या प्रश्नाबाबत काय म्हणतो हे थोडक्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे वाचताना अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचे अगदी छोटे संक्षेप एकापाठोपाठ एक वाचल्यासारखं वाटतं. लोकसंख्यावाढ हा प्रश्न आहे का? असल्यास तो किती बिकट आहे? तो सोडवण्यासाठी आव्हानं काय आहेत? ती कशी सोडवता येतील? त्यात किती यश येतं आहे? आणि याचा आढावा घेऊन भविष्यातल्या आशावादाची कारणं काय? अशी संगती नाही. त्यामुळे वाचताना अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचे अगदी छोटे संक्षेप एकापाठोपाठ एक वाचल्यासारखं वाटतं.

पुस्तकात माहिती भरपूर आहे. र. धों. कर्वेंनी तत्कालीन वैचारिक वातावरणाच्या खूपच पुढे जाऊन लोकसंख्या नियंत्रणाचे विचार आग्रहाने कसे मांडले याविषयी माहिती येते. आकड्यांच्या पलिकडे जाऊन लोकसंख्यावाढ म्हणजे काय, ती कुठच्या टप्प्यांमधनं होते, विशेषत: भारतात तीमुळे काय अडचणी येतात (अन्न उत्पादनासाठी मर्यादा जमिनीची नसून पाण्याची आहे) तीवर मात करण्यासाठी काय पावलं उचलावी याबाबत वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार वाचायला मिळतात. पण पुन्हा एखादा हिरा फिरवून त्याचे वेगवेगळे पैलू एकामागोमाग एक, तुकड्यातुकड्यात दिसावेत तसं होतं. संपूर्ण हिरा एकदम प्रतीत होत नाही. ते चित्र तुकडे जोडून करावं लागतं.

गोवारीकरांचे विचार पटण्यासारखेच आहेत. थोडक्यात त्यांचं म्हणणं असं, की प्रगतीच्या टप्प्यावर प्रथम वेगाने मृत्यूदर कमी होतो. मग हळुहळू जन्मदर कमी होतो. तरीही मृत्यूदर कमी होतच असतो, जन्मदर कमी होण्याचं प्रमाण हळू असतं. पर्यायी लोकसंख्या वाढीचा दर वाढतच असतो. त्यानंतरची पायरी म्हणजे मृत्यूदर खूप कमी झाल्यामुळे तो अजून फारसा कमी होत नाही, किंवा हळुहळू कमी होतो. मात्र जनता सुजाण झाल्याने, नियमनाची साधनं व ती वापरण्याचं ज्ञान पसरल्यामुळे जन्मदर वेगाने कमी व्हायला लागतो. इथे आपल्याला प्रथम लोकसंख्यावाढीचा दर कमी होताना दिसतो. (लोकसंख्या अर्थातच वाढतच असते...) त्यांनी हे पुस्तक लिहिलं तेव्हा भारत या टप्प्यावर होता. याचा अर्थ प्रगती आखलेल्या मार्गाने चालू आहे, आणि असेच प्रयत्न चालू राहिले तर जन्मदर व मृत्यूदर एकाच पातळीवर येऊन लोकसंख्या स्थिरावते. काही दशकांनी हे भारतात होईल.

यामागे सरकारी योजनांचा हातभार आहेच, पण खरं श्रेय ते लोकांना देतात. नियमन करता येतं ही नवीन जाणीव, मोजकीच मुलं असतील तरी ती जगतील अशी खात्री, व नियमन करण्यात फायदा आहे हे गणित करण्याची क्षमता लोकांमध्ये असते. या जोरावर जशी सामाजिक आरोग्याची व साक्षरतेची परिस्थिती सुधारते तसतसे आपण होऊनच लोक पावलं उचलतात. म्हणजे हा प्रश्न केवळ जननक्षमतेचा किंवा अमुक एक संख्येत नशी बंद करण्याचा नसून अधिक विशाल, सामाजिक स्वरूपाचा आहे.

मात्र आशावादी अनुमानांत ते म्हणतात की
- पुढच्या पाच वर्षांत (1995 च्या आसपास) वार्षिक वृद्धीदर 1.42 टक्के इतका होईल. (2001 च्या जनगणनेत यापेक्षा अधिक दर होता असं मला आठवतं आहे)
- भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होणार नाही. (चीनसारखे कठोर नियम न अवलंबता)
- शेवटच्या टप्प्यात संक्रमण होऊन लवकरच वाढीचा दर जवळपास शून्यावर येईल.
- लोकशाही मार्गाने हे साध्य झालं हे दर्शवण्यात भारत यशस्वी होईल. (आणीबाणीतल्या काही घटना वगळता)

एकंदरीत आशावादी अनुमानं आकड्यांनी अचूक नसली गुणात्मकदृष्ट्या बरोबर वाटतात. पण पुस्तकाच्या मांडणीमुळे वा संक्षेपामुळे उत्तम माहिती ही तुटकरीत्या आली आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे असमाधानकारक असं वैचारिक कोलाज वाटतं.

समाजजीवनमानआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

Nile's picture

23 May 2010 - 2:52 pm | Nile

इंटरेस्टींग विषय (रोचक शब्द त्याच्या आंतरजालीय अर्थवलयामुळे गाळावा लागतोय! ;) )

काही दशके म्हणजे तरी कीती दशके असावीत असे गोवारीकरांना वाटते? फक्त लोकसंख्यावाढीचा प्रश्न काही द्शकात सुटला तरी त्यामुळे आताच निर्माण झालेले गभीर प्रश्न सुटतील का?अर्थातच हे या धाग्यास अवांतर आहे.

-Nile

डॉ.श्रीराम दिवटे's picture

23 May 2010 - 3:04 pm | डॉ.श्रीराम दिवटे

पुस्तकाबद्दल नकारात्मक सहसा लिहू नये म्हणतात. लेखनामागील श्रम, अभ्यास, असोशी यांचा विचार व्हावा हे अभिप्रेत असते.
तुम्ही केलेले पुस्तक परीक्षण उत्तम असून ते तुमचे वैयक्तिक मत असावे.

प्रकाश घाटपांडे's picture

23 May 2010 - 3:12 pm | प्रकाश घाटपांडे

हा समीक्षात्मक लेख आहे त्यात नकारात्मक येणारच. सगळच कस गुडी गुडी होणार?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

23 May 2010 - 5:09 pm | श्रावण मोडक

पुस्तकाबद्दल नकारात्मक का लिहू नये, हे मला कधीही कळलेलं नाहीये. सांगाल का.
पुस्तकाबद्दल नकारात्मक लिहू नये, म्हणजे वाचक अधिकाधिक पुस्तके घेतील आणि मराठी भाषा वाचेल, वगैरे प्रकाशकीय रडगाणे सोडून दुसरे काही कारण असेल तर त्यात रस आहे.

पाषाणभेद's picture

23 May 2010 - 10:23 pm | पाषाणभेद

>>> पुस्तकाबद्दल नकारात्मक लिहू नये,
हे वाचून एखाद्या मृत माणसाबद्दल निंदात्मक बोलू नये, चांगले बोलावे असे वाटले.

सोनिया गांधींवरचे चरित्रात्मक पुस्तकही चांगले आहे. मला ते घेतलेच पाहिजे. असो.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

बिपिन कार्यकर्ते's picture

23 May 2010 - 3:31 pm | बिपिन कार्यकर्ते

एका वेगळ्याच पण अतिशय निकडीच्या विषयावरील पुस्तकाचा उत्तम परिचय.

अवांतर: असे लेखन हे सहसा परिक्षणात्मक पेक्षा ओळख या प्रकाराच्या जास्त जवळ जाते. शिवाय, समीक्षणात्मक असले तरी नकारात्मक का लिहू नये? खरंच तसं असेल तर उगाच गुडी गुडी लिहावं? म्हणजे हे अगदीच 'सुपारी' समीक्षण झालं की.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

23 May 2010 - 8:35 pm | ऋषिकेश

ह्म्म्म.. बघु त्यांनी अनुमान केलेला काहि काळ गेला असल्याने (जसे २००१) भविष्यात डोकावण्याचा कालखंड कमी होत आहे.. तरी मिळालं तर वाचू

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

भडकमकर मास्तर's picture

23 May 2010 - 10:28 pm | भडकमकर मास्तर

परीक्षण चांगले झाले आहे...
नकारात्मक लिहू नये हेही काही पटले नाही....
...

एके ठिकाणी धोंडो केशव कर्वेंनी तत्कालीन वैचारिक वातावरणाच्या खूपच पुढे जाऊन लोकसंख्या नियंत्रणाचे विचार आग्रहाने कसे मांडले याविषयी माहिती येते.
असे वाक्य येते.. येथे र.धों. कर्वे म्हणायचे आहे की खरंच धों.के.कर्व्यांनीही याबद्दल काही लिहून ठेवले होते, याची उत्सुकता आहे...

राजेश घासकडवी's picture

24 May 2010 - 5:20 am | राजेश घासकडवी

चूक दुरुस्त केली आहे.

आळश्यांचा राजा's picture

23 May 2010 - 11:18 pm | आळश्यांचा राजा

याच विषयावर NBT ने Inevitable Billion Plus नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. मला वाटतं ते पण गोवारीकरांनीच लिहिलं होतं. असो.

वाढत्या लोकसंख्येकडे समस्या म्हणून न बघता संधी म्हणून बघणारे बरेच आहेत. मला वाटतं ते योग्यही आहे. समस्या लोकसंख्येची नसून नियोजन, अंमलबजावणीतल्या त्रुटी यांची आहे.

अन्न उत्पादनासाठी मर्यादा जमिनीची नसून पाण्याची आहे

हे विधान आपले आहे, की गोवारीकरांचे? इथेदेखील मर्यादा पाण्याची नसून पाण्याच्या नियोजनाची आहे. पाऊस खूप म्हणजे खूप पाणी देतो आपल्याला. भरपूर पगार मिळणारा माणूस किंवा भरपूर नफा मिळवणारा माणूस काहीच बचत न करता महिनाअखेरीला कफल्लक रहात असेल, तर त्याचा प्रश्न पैशांची टंचाई आहे असं म्हणावं का? आपला देश (सगळ्याच राज्यांत नाही म्हणा) पावसाळ्यात पुराची काळजी करतो, आणि उन्हाळ्यात पावसाची वाट पहात बसतो.

अवांतर - Inevitable Billion Plus माझ्या काही लक्षात राहिले नाही, म्हणजे तुम्ही या पुस्तकाबाबत म्हणता तसं गोवारीकर साहेबांनी त्यात भरपूर माहिती भरली असणार!

आळश्यांचा राजा

कानडाऊ योगेशु's picture

24 May 2010 - 2:51 pm | कानडाऊ योगेशु

भरपूर पगार मिळणारा माणूस किंवा भरपूर नफा मिळवणारा माणूस काहीच बचत न करता महिनाअखेरीला कफल्लक रहात असेल, तर त्याचा प्रश्न पैशांची टंचाई आहे असं म्हणावं का?

अ‍ॅनॉलॉजी (मराठी शब्द?) आवडली.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

धनंजय's picture

24 May 2010 - 6:11 am | धनंजय

लोकसंख्यात्मक संक्रमणाबाबत गोवारीकर यांच्या आशावादी मतांची ओळख आवडली.

(या ठिकाणी लोकसंख्येच्या संक्रमणाबाबतीत माझ्या लेखाचे इतिवाक्य देण्याचे मोह टाळता येत नाही.

पूर्वीच्या काळी प्लेग-कॉलेरासारख्या महामार्‍या लोकसंख्या सीमित ठेवत होत्या. महामार्‍या नाहिशा झाल्या तशा लोक म्हातारे होऊ लागले, वृद्धापकाळाचे जुनाट रोग आणि लोकसंख्या वाढ या समस्या आपल्या वाट्याला आल्या. पण त्या महामार्‍यांपेक्षा या नव्या समस्या परवडल्या असेच म्हणावे लागेल. जुन्या काळच्या सीमित पण अल्पजीवी लोकसंख्येबद्दल अपरिपक्व हळहळ आपण बाळगू नये. मोठ्या लोकसंख्येच्या या नव्या समस्यांशी भविष्याकडे तोंड करून लढण्यात आपल्या समाजाची परिपक्वता दिसेल.

)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 9:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुस्तकपरिचय आवडला.

अदिती

कानडाऊ योगेशु's picture

24 May 2010 - 2:49 pm | कानडाऊ योगेशु

पुस्तक परिचय आवडला.
कुठेतरी वाचले होते कि कुटुंब नियोजन प्रभावीपणे राबविले गेल्यामुळे चीन मध्ये वृध्दांची संख्या जास्त झाली आहे.
भारतामध्येही असे होऊ शकते का?
हम दो हमारा एक च्या जमान्यात जर मृत्युदर व जन्मदर दोन्हीही कमी राहीले तर काही काळानंतर भारताची २/३ जनता ही वृध्द असेल.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

धनंजय's picture

24 May 2010 - 10:52 pm | धनंजय

होत आहे, झालेले आहे. ("होऊ शकेल" या संदेहाऐवजी ऐवजी तथ्यदर्शक प्रयोग.)

मिसळभोक्ता's picture

24 May 2010 - 11:54 pm | मिसळभोक्ता

लोकसंख्या वाढीचे माल्थुस ने वक्तविलेले दुष्परिणाम चुकीचे ठरवले गेलेले आहेत.

पश्चिम युरोपियन देश, चीन, रशिया, कॅनडा हे म्हातार्‍यांचे देश म्हणून २०३० मध्ये ओळखले जातील.

प्रत्येक म्हातार्‍याला जीवंत ठेवण्यासाठी फक्त २ तरुण अशी परिस्थिती २०३० मध्ये ह्या देशांत येणार आहे.

भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, आणि पूर्व युरोपाचे देखील.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 9:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, आणि पूर्व युरोपाचे देखील.

किती काळापर्यंत हा प्रश्न आहेच ना? आज चीनचं वर्तमान उज्ज्वल आहे, उद्या भारताचं भविष्य! परवा??

अदिती