गुलमोहोर

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 May 2010 - 6:29 am

gulamohor
गुलमोहोराचे प्रत्येकाचे नाते काही वेगळेच असते. आंबा चिंच यांसारख्या राकट आणि जटाधारी वदीलधारे वडपिंपळ यांच्या धीरगंभीर गर्दीत एखाद्या चॉकलेट हीरोसारखे एकदम तुकतुकीत दिसणारे हे देखणे झाड काही वेगळेच भासते.
या झाडाची मोहिनी मला कधी पडली माहीत नाही.... आमच्या सातार्‍याच्या न्यू इंग्लीशस्कूलच्या आवारात गुलमोहोराची बरीच झाडे आहेत.... शाळा सुरु होण्याच्या सुमारास गोलमोहोराच्या पाकळ्यांच्या शाळेत अक्षरशः पायघड्या घातल्यासारखा सडा असायचा..... त्या केशरी पिवळ्या पाकळ्यांची शोभा काही वेगळीच वाटायची.....
शाळेत जायचे म्हणजे गुलमोहोरला भेटायला जायचे हे डोक्यात इतके फिट्ट बसले आहे की.अजूनही एखाद्या रस्त्यावर फुललेला गुलमोहोर पाहीला की त्या कोपर्‍यावरून कोणीतरी वर्गशिक्षक येतील असेच वाटत.

gulamohor2
त्या केसरी पाकळ्या पुस्तकात ठेवायचो...मग कधीतरी त्या पाकळीवरच्या रेशा न रेशा पुस्तकातल्या त्या पानावर उमटायच्या. पाकळीला एकदम कडक्क इस्त्री झालेली असायची पण त्याचा रेशमी स्पर्षाची जादू मात्र अजून टिकून असायची.
पुस्तकात ठेवलेल्या त्या पाकळ्यांमधून गुलमोहोर माझ्या कवितेत उतरला हे मला कळालेच नाही.... सांगलीच्या आमराईत भेटलेल्या गुलमोहोरावर केलेल्या एका कवितेने आपल्या कविता लोकाना आवडू शकतात..... त्या काव्यवाचन स्पर्धेत भरभरून दाद मिळवू शकतात हे जाणवले....तशी कविता मी आंब्याच्या किंवा पिंपळाच्या झाडावर लिहू शकलो नसतो.
सगळीच झाडे हिरवी असतात. पिंपळाच्या झाडाचा हिरवा रंग उगाच काहीतरी गूढ असल्याची जाणीव करून देतात.
जी एंच्या लिखाणाच्या प्रेमात होतो तेंव्हा उगाचच प्रत्येक कथा पिंपळाच्या झाडाखाली बसून वाचावी असे वाटायचे. आंब्याची ती हिरवी छटा उगाचच छापील शासकीय कागदाचा कोरदे पणा जाणवून देते.
पेरूच्या पानाची पोपटी छटा मोहवते पण पानाचा कठोरपणा लगेच दाखवते. निळ्या पांढर्‍या आकाशाच्या बॅकग्राउम्डवर नारळाच्या झावळ्यांचा हिरवेपणा थोडासा काळपटच वाटतो. एकदा चिनाराचे झाड पाहिले. त्याचा पसारा लक्षात येईपर्यन्त ते चिंचेचे झाडच वाटत होते..... त्याखालच्या बांधावर जर एखादी हिरवे नऊवारी कारभारीन उभी असती तर... कोल्हापुरात किंवा सातार्‍यात आहे असेच समजलो असतो चिंचेच्या हिरव्या तांबूस छटेत दात आंबवेल असा खट्यालपणा असतो. त्यात एक भारलेपणा असतो. चिंचेवर मुंजा रहातो......असे काहीतरी लहानापणी ऐकले होते...... पण मग आम्हाला दोन चिंचा खाल्या मुले होणारा खोकला त्याला का होत नाही...... किंवा पिंपळावरच्या मुंजाला खोकल्या मुळे हैराण होऊन झोप येत नसेल ना ......असे काहे प्रश्न विचारून पाठीत धपाटे खाल्याचा अनुभव गाठीशी होताच.
गुलमोहोराचे माझे नात एनक्की जुळले ते मला सांगता यायचे नाही पण ते मित्र सखा सुर्‍हूद या पलीकडचे होते. वक्त्याचे एखाद्या अलिप्ततेने ऐकणार्‍या एखाद्या जाणकार श्रोत्याचे असावे तसे.....
शाळेच्या सुट्टीच्या वेळेत गुलमोहोराखाली बसून मित्रांसोबत डबा खायचो.... गुलमोहोराच्या वाललेल्या शेंगानी शिवाजी औरंगजेब युद्ध खेलायचो... एकदम तरवारी चा फील देणार्‍या त्य शेंगा आम्हा प्रत्येकाच्या दप्तरात असायच्या... कधीतरी आईने दप्तर आवरले की त्याबद्दल जाब द्यावा लागत असे.
गुलमोहराचा बुंधा हा आमचा खेळताना दप्तरे ठेवण्याचा हक्काचा भोज्जा असायचा... तोच कधीतरी क्रिकेटचा ष्टंप व्हायचा . तर कधीतरी खोखो चा खांब व्हायचा.
पाकळ्यांचा लालसर तपकिरी पायघड्या घातल्यागत सडा असायचाच त्यामुळे गुलमोहोराखाली कोणी खेळताना पडले आणि त्याला खरचटले असे कधीच झाले नाही.
का कोणास ठाऊक झाडाना जर बोलता आले असते तर आंबा वगैरे झाडे ही तुमची विचारपूस करताना काय भो कस काय लै दिवसानी दिस्लात यंदा मुक्काम हाय ना....आपल्या बांधावरल्या झाडाला यंदा झक्कास मोहोर आलाय्....रायवळ हाय पन एकडावा हातावर पिळला की साकर एक्दम जणू..... अशी विचारपूस करतील....... हिरवीगार चिंच म्हणेल बसा जरा दमला असाल.... थंड व्हा... का घाई करताय जायची. अशी भाबडी नाते जपणूक करतील असे वाटते. गुलमोहोर थोडासा अलीप्त ...पण प्रेमळ विचारपूस करेल.... तुमच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करेल्..पण जाताय म्हणालात तर थोडे थांबला असतात तर बरे झाले असते वगैरे न बोलता.... आता तुम्हाला पाच ची एस्टी मिळेल..... नाक्यावर रीक्षा असेलच असही म्हणेल.... असेच वाटते
एवढी विचित्र वाटणारी कोकणस्थी अलिप्तता सोडली तर नाते संबन्ध जोडायला गुलमोहोर हा सर्वात मस्त.......
कडकडीत उन्हात स्वतःसोब्त तुम्हालाही फुलवणारा
gulamohor3

( क्रमशः)

वावरविचार

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

12 May 2010 - 8:29 am | शिल्पा ब

वाह!!!! पहिल्या फोटोतले झाड मस्तच ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मदनबाण's picture

12 May 2010 - 8:32 am | मदनबाण

इजुभाऊ वाचतोय...

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

स्पंदना's picture

12 May 2010 - 8:44 am | स्पंदना

मला त्या पाकळ्या खायला फार आवडतात, थोड्याश्या आम्बट, तुरट, मस्त!! लेख सुन्दर!

नम्बर १ चा फोटो खुप छान!!त्या झाडाखाली उभारुन कुणाची तरी हुरहुरत्या ह्रदयान प्रतिक्षा करावी असा! 8>

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

अरुंधती's picture

12 May 2010 - 12:57 pm | अरुंधती

गुलमोहोराच्या फोटोजनी मनातल्या गुलमोहोराला पुन्हा साद घातली! :-)

गुलमोहोराशी माझं शाळेपासूनचं नातं आहे.... शाळेच्या आवारात खो-खोच्या मैदानातला गुलमोहोर म्हणजे सखा सवंगडीच जणू! त्याच्या पायाशी, जमीनीत गाडलेल्या मुळांशी माझं जास्त जवळचं नातं! त्यांवर बसून मळक्या स्कर्टच्या खिशातला खाऊ चाखलाय, खिशातली अजब गोष्टींची गर्दी (काचेच्या सोंगट्या, सागरगोटे, पिसे, चॉकलेटच्या चांद्या, शंख-शिंपले, रंगीत दगड इ. इ. इ.) पुढ्यात ठेवून त्या गोष्टींशी खेळण्यात खूप आनंद घेतलाय! कधी त्या मुळांच्या ओबडधोबड विस्तारावरून अडखळून पडले आहे, कधी त्यांवर बूड कसेबसे टेकवत - आजूबाजूच्या मुंगळे-मुंग्यांपासून बचाव करत डबा खाल्ला आहे, कधी त्याच्या वाळक्या काटक्यांनी धुळीत चित्रे किंवा अक्षरे गिरवली आहेत, कधी त्याच्या पाकळ्यांचे लांबच लांब हार करून त्यांनी झाडाचा बुंधा सजवलाय.... कधी त्याच्या कळ्यांच्या पाकळ्यांच्या अंगठ्या करून पाचही बोटांमध्ये त्या घालायचा प्रयत्न केलाय, कधी त्याचा पुष्पगुच्छ बनवलाय.... कधी लाल पाकळ्या ठेचून लाल रंग बनवायचा प्रयत्न केलाय.....

वर्गाच्या खिडकीतून दिसणार्‍या गुलमोहराच्या हिरव्यागार फांद्या आणि लाल तुरे यांनी माझे कितीतरी तास बोअर होण्यापासून वाचवलेत! ;-) त्यावरून कविता, चित्रे, निबंध स्फुरले आहेत. मैत्रिणींशी त्या झाडाखाली बसून केलेलं गुफ्तगू, शेजारच्या जंगलजिमवर खेळण्यात घालवलेले असंख्य तास, चित्रकलेच्या तासाला त्या गुलमोहोराच्या सौंदर्याला कागदावर उतरवण्याचा प्रयत्न.....

म्हणूनच आजही माझा गुलमोहोर माझ्याबरोबर आहे. मनात आहे. त्याच्या स्मृतीवर अधुन मधुन फुंकर घालावी लागते खरी.... पण कधीही तो तसाच असतो... ताजा, टवटवीत, निरागस, आभाळ कवेत घेणारा, नि:शब्द आणि तरीही आश्वासक साथ देणारा....!!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

दत्ता काळे's picture

12 May 2010 - 1:04 pm | दत्ता काळे

अप्रतिम फोटोज् . . . आवडले.

पाषाणभेद's picture

12 May 2010 - 5:20 pm | पाषाणभेद

वा विजू भौ, माझ्या मनाची इच्छा पुर्ण केलीत. गेल्या आठवड्यापासून माझ्या येण्याजाण्याच्या रस्त्यातला गुलमोहोराचा फोटो काढण्याची इच्छा होत होती. ती तुम्ही पुर्ण केलीत. अन लेखही लिहीलात.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

स्वाती२'s picture

12 May 2010 - 6:27 pm | स्वाती२

मस्त फोटो!

प्राजु's picture

12 May 2010 - 8:33 pm | प्राजु

खास विजुभाऊ ट्च..
लेख सुरेख जमला आहे. आणि सध्या चालू असलेल्या रणधुमाळीत एकदम प्रसन्न छाया देणारा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/