माझाही 'सर्पानुभव'

वर्षा's picture
वर्षा in जनातलं, मनातलं
24 Apr 2010 - 7:09 am

आज मीनलताईचा सापावरचा लेख वाचला आणि माझ्याही सर्पानुभवाच्या स्मृती जाग्या झाल्या. त्याविषयी मागे लिहिलं होतं तेच इथे परत देतेय. :)
************
अनुभव गाठीशी जमावा म्हणून केलेल्या नोकर्‍याच कधीकधी आपल्याला काही अविस्मरणीय अनुभव देतात. साडेपाच कधी वाजतायत याकडे डोळे लागलेले असायचे त्या चाकरमानी कालखंडातलीच ही गोष्ट. तेव्हा एका जपानी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मी भाषांतरकार/दुभाषी म्हणून नोकरी करत होते. यंत्रसामुग्री तयार करणारी ती एक इंजिनीयरींग कंपनी होती. साहजिकच एखाद्या फॅक्टरीला असणारी सर्व वैशिष्ट्ये (आणि वर जपानी शिस्त!) तिथेही होती. उदाहरणार्थ सर्व स्टाफला (टेक्निकल असो वा नसो) युनिफॉर्म अनिवार्य असणे, लंचटाईम किंवा शिफ्टची वेळ अधोरेखित करण्यासाठी शाळेसारखी बेल होणे वगैरे वगैरे. एक सकाळी नऊची बेल झाली की मग दुपारी लंच अवरची आणि मग संध्याकाळी पहिली बेल ५:२० ला आणि शेवटची बेल ५:३०ला असा सिलसिला असायचा. (५:२०ची बेल अशासाठी की युनिफॉर्म बदलून घरी जाता यावे म्हणून. यासाठी १० मिनिटे उदार मनाने देण्यात आली होती. पण केवळ ऑफिस ते घर इतक्या अंतरासाठी युनिफॉर्म बदलण्याचा मला प्रचंड कंटाळा यायचा त्यामुळे ५:२०लाच मी सर्वांच्या आधी घरी जायला तयार असायचे. युनिफॉर्म मुळे 'अनेक वर्षे एकाच यत्तेत नांदणार्‍या' प्रजेतलीच मी एक असा सर्वांचा समज होण्याची शक्यता नाकारता येत नसे. पण मला त्याची पर्वा नसायची. (अशीच एक समविचारी मैत्रिण तिथे होती. त्यामुळे या युनिफॉर्म न बदलण्याच्या बाबतीत आमच्या दोघींचं 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना' हे मत ठाम असायचं.) कंपनीचा प्लांट एमआयडीसीतल्या त्या मोठ्या भूभागावर दिमाखात पसरला होता. आजूबाजूस लांबवर नुसतीच पडीक जमिन होती. पावसाळ्यामध्ये दूरवर दिसणारे निळसर डोंगर धुक्याच्या चादरीतून खुणावायचे तर सभोवतालचं हिरवकंच गवत दिवसेंदिवस उंच आणि दाट वाटायचं. या गवतात 'जनावरं' आहेत इथपासून ते मशिनमध्ये जनावर सापडलं अशा अनेक सुरस कथा ऑफिसमध्ये ऐकल्या होत्या. आजूबाजूचा माहौल पाहता ते अगदीच खोटंही वाटायचं नाही.

ऑफिस ते स्टेशन अशी कंपनीची बस सुविधा होती. येताजाता बसमधून ते मनोहर दर्शन भरभरुन घेता यायचं. या कॉन्ट्रॅक्ट बसेस संध्याकाळी पाच वाजताच गेटपाशी हजर असायच्या. ५:२०पासून एकेकजण यायला सुरुवात व्हायची. बहुतेक वेळेस बसमध्ये प्रथम चढणा्र्‍या मी आणि माझी मैत्रिणच असायचो. सर्वजण साडेपाचपर्यंत आले तर ठीक नाहीतर जे हजर आहेत त्यांना घेऊन बस ठीक ५:३०ला सुटायची. मग कोणी जीव घेऊन धावत येताना दिसला तरी थांबायची नाही. शिस्त म्हणजे शिस्त.

त्यादिवशीसुद्धा नेहेमीप्रमाणे आम्ही बसपाशी आलो. हवेत मस्त गारवा होता. थोडंस उनही पडलं होतं. त्यामुळे खूपच प्रसन्न वातावरण झालं होतं. आम्ही बसमध्ये आमच्या नेहेमीच्या जागी म्हणजे ड्रायव्हरभाऊंच्या ओळीतल्या पुढून तिसर्‍या सीटवर जाऊन बसलो. आता आमच्या गप्पा चालू झाल्या. बसमधल्या मागील जागांवर आणखी एक-दोघेजण आधीच येऊन बसले होते. साडेपाच वाजत आले तसे सर्वजण भराभर येऊ लागले आणि बस भरत चालली. रोजच्यासारख्या गप्पाटप्पा, हास्यविनोद वगैरे चालू झाले. आता साडेपाचला अर्धाएक मिनिट राहिलं होतं. बसमधल्या शेवटून दुसर्‍या की तिसर्‍या सीटवर बसलेल्या एकाला दुसरा म्हणाला, 'ते तुझ्या डोक्यावर काय आहे रे?'
"कुठे काय?" पहिल्याने डोक्यावर हात फिरवला.
"अरे डोक्यावर म्हणजे वर...त्या रॅकवर...काहीतरी आहे....नीट कळत नाहीये काय आहे ते.." दुसरा.
"अरे क्लीनरचं फडकं राहिलं असेल" पहिला. आणि त्याने वर पाहिलं. दुसर्‍याची नजरही त्या गोष्टीवरच होती. आणि ती गोष्ट हलली!

दोघांनाही ब्रम्हांड आठवलं. विशेषत: पहिल्याला. कारण त्याच्या डोक्याच्या बरोब्बर वर, बॅग ठेवण्यासाठी जो रॅक असतो त्याच्या दांडीला एक वेटोळं होतं. इतका वेळ वर कोणाचंही लक्ष गेलं नव्हतं. आणि ते वेटोळंही स्तब्ध होतं त्यामुळे कसलीच हालचाल जाणवली नव्हती कोणालाच. बरं ज्याचं आधी लक्ष गेलं त्यालाही ते नक्की काय आहे याचा अर्थबोध न झाल्याने त्याने तसं विचारलं होतं. आता मात्र त्यांची चांगलीच तंतरली.

इकडे तेव्ह्ढ्यात साडेपाच वाजल्याची रखवालदाराने शिट्टी मारली होती आणि ड्रायव्हरभाऊंनी सरसावून बस सुरु केली. बस चालू झाली पण हा गदारोळ पुढच्याच क्षणी कानावर आल्याने ती चार पावलं चालून थांबली. बसचा दरवाजा मगाशीच सर्वजण चढल्यावर क्लीनरने बंद केला होता.

आता आतमध्ये हल्लकल्लोळ माजला होता कारण सर्पमहाराज पूर्ण जागृतावस्थेत आले होते. बसमधली ड्रायव्हरच्या बाजूची म्हणजे उजवीकडची ओळ, मग मध्ये उभं रहायला जागा आणि मग डावीकडची ओळ, यापैकी डावीकडच्या बॅग ठेवायच्या रॅकवर साप मुक्काम ठोकून होता. एकंदरीत बसमधे वाढलेल्या माणसांच्या वावराने आणि बस सुरु केल्यावर होणार्‍या थरथरीने सापाने वेटोळं सोडून सळसळायला सुरुवात केली. लगेच डाव्या बाजूचे सर्वजण उजव्या बाजूस आले. डोकं वाकवून जो तो स्वत:ला सापापासून दूर ठेवू पहात होता. हो नाहीतर सापाशी दृष्टिभेटच व्हायची! कहर म्हणजे दरवाजा बंद होता. तो उघडायला सुद्धा चटकन कोणी धजावेना. शेवटी धीर करुन क्लीनरने चटकन तो उघडला आणि सर्वांना जरा बरं वाटलं. पण पुढे काय?

मी बसच्या पुढील भागात आणि तेही उजव्या बाजूस असल्याने माझ्यापासून साप तसा दूर होता पण त्याचं दर्शन निश्चितच भीतीदायक होतं. हातभर लांबीचा, बारीक आणि पोपटी रंगाचा साप होता तो. आता तो उपद्रवी की निरुपद्रवी, विषारी की बिनविषारी असल्या शंका तेव्हा येणं शक्यच नव्हतं. तो साप आहे एव्हढी 'फॅक्ट' घाबरायला पुरेशी होती.

पण आता साप दांडीवरुन सरपटत पुढे पुढे आणि अगदी दारापर्यंत येऊन पोचला. म्हणजे माझ्यापासून अगदी एक हात अंतरावर. आता मात्र घाबरगुंडी उडाली. झुरळ, पाल, टोळसदृश जमाती आणि आता हा साप....अशापैकी काहीही माझ्यासमोर असलं की दोन गोष्टी माझ्या मनात कायम असतात. एकतर त्या प्राण्याची नजर फक्त माझ्यावरच आहे ही एक माझी ठाम समजूत असते आणि दुसरं म्हणजे त्याने अचानक माझ्या दिशेने उडी घेतली तर माझं कसं होणार? :)

आमच्या बरोबरच्या एकीला त्या दर्शनाने अतिप्रभावित झाल्यामुळे चक्कर आली. अशी अजून एखादी पुनरावृत्ती होण्यापेक्षा सर्वांनी आम्हा मुलींना बसच्या मागच्या भागात जायला सांगितलं. एव्हाना बाहेर रखवालदारांना सर्व प्रकार कळला होता. त्यातला एकजण दांडुका घेऊन पुढे दरवाजापाशी आला. साप आता अजूनही रॅकच्या दांडीवरच पण दारापासून अगदीच जवळ होता. सापाला दंडुक्यावर उचलण्याच्या सुरुवातीच्या अनेक प्रयत्नांना सापाने अजिबात दाद दिली नाही. जिभल्या चाटत तो परत दांडीवरुन मागे तर येणार नाही ना अशी शंका मनात दाटत असतानाच रखवालदाराला त्याला दंडुक्यावर उचलणे शक्य झाले आणि एका झटक्यात त्याने त्याला बसबाहेर फेकले.

सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अर्थात त्या परिस्थितीतही विनोदबुद्धी शाबूत असणार्‍या वल्ली तिथे होत्याच. कंपनीतले नागेश, नागराज वगैरे नावांचे मालक बसमध्ये होते त्यांना 'आप इसको आसानीसे पकड पाओगे' वगैरे म्हणत छळणं चाललं होतं. पुढे अनेक दिवस ऑफिसमध्ये चघळायला विषय चांगला मिळाला होता. सुदैवाने कोणालाही दुखापत वगैरे काहीच झाली नाही. पण राहून राहून मनात एकच विचार यायचा.....नशीब साप वरती, रॅकवर होता. कुठल्या सीटच्या खाली असता तर?!!!

नोकरीप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

24 Apr 2010 - 9:12 am | प्रकाश घाटपांडे

छान वर्णन केलय! आमच्याक लईच शोदुन बी साप सापडला नाही तर मंग शिंगाड्याचा ( बैलाची साळलेली (तासलेली) शिंगे) जाळुन त्याचा धुर करायचे. म्हंजी वासानी आसन तितुन पळून जाईन! सुडीत ( वैरणीची चिंचोळा ढीग) हमखास साप निघायचा! असो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

यशोधरा's picture

24 Apr 2010 - 10:45 am | यशोधरा

बापरे!

Pain's picture

24 Apr 2010 - 2:42 pm | Pain

कोवाइ हेबी :S

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Apr 2010 - 2:50 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! रंजक आठवण. :)

बिपिन कार्यकर्ते

मीनल's picture

24 Apr 2010 - 6:32 pm | मीनल

हा तर माझ्या अनुभवापेक्षाही भन्नाट होत अनुभव.
माझ्या बाबतीत सिच्युएअश निदान माझ्या हातात होती.
तू बस मधे पळून तरी कूठे जाऊ शकणार होतीस?

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 8:57 pm | मदनबाण

मस्त अनुभव वर्णन... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

दिपाली पाटिल's picture

24 Apr 2010 - 9:10 pm | दिपाली पाटिल

बापरे...

दिपाली :)