मटणवाला

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
13 Aug 2017 - 8:46 pm

चाळीच्या समोरचा रस्ता ओलांडला की मटणवाल्याचे दुकान दिसायचे. मटणवाल्याला आम्ही अमजद खानच म्हणायचो. कोंबडी आधी की अंडं आधी ह्या यक्षप्रश्नाप्रमाणे अमजद खान आधी की मटणवाला आधी या प्रश्नाचे उत्तर मला कधी मिळायचेच नाही. मी लहान असल्यापासून त्याला उभा किंवा चालताना किंवा इतर क्रिया करतांना बघीतलेलं नव्हतं. जेव्हा बघावं तेव्हा तो मटणाचे तुकडे करण्याच्या लाकडी ओंडक्यासमोर बसलेला असायचा. अंगात बोकडाच्या रक्ताने लाल झालेलं आणि कधी काळी विकत घेतलं तेव्हा सफेद असावं असा संशय येण्याजोगं बनियान आणि खाली लाल चौकडयाची लुंगी असा त्याचा अवतार असे. शाकाहारी असल्यामुळे मला अगोदरच रक्त, मांस बघीतलं तरी पोटात उमदळून यायचं. पण चाळीतून बाहेर पडायचं तर दोनच रस्ते होते. एक रस्ता मटणवाल्याच्या दुकानावरुन जायचा तर दुसरा रामूच्या घरावरुन.
त्यामुळे कोठुनही बाहेर जायचं ठरलं तर आगीतुन जायच की फुफाट्यातून एवढे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्यातल्या त्यात मटणवाल्याच्या रस्त्यावरुन जायचा मार्ग सेफ होता. एकदा श्वास आत ओढून घ्यायचा, दोन मिनिटे नाकासमोर चालत रहायचं आणि मग रस्ता मोकळा होता. मात्र रामूच्या घरावरच्या रस्त्यावरुन निघालं आणी त्याने बघीतले की निदान तास अर्धा तासांची निश्चिंती असायची. त्यामुळे घरातून निघून कोठे पोहोचायचे असले की मी कमीत कमी १५ मिनिटे अगोदर निघत असे. यात रामूच्या हक्काची १५ मिनिटे धरावीच लागतं.

मटणवाल्याकडे एका वेळेस किती बोकड असत हे मला माहित नव्हते त्याचप्रमाणे त्याला नक्की किती पोरं होती हे देखील मला नक्की सांगता यायचं नाही. कदाचित ५-६ तर नक्कीच होती. एखादं जास्तच असेल मात्र कमी निश्चित नव्हतं. पोरी किती होत्या, होत्या की नव्हत्या ते काही शेवटपर्यंत कळालं नाही. मात्र बायको एकच होती हे नक्की.

एखाद्याची कार्टी उनाड असतील तर ते किस चक्की का आटा खातात असे विचारायची पद्धत होती. मात्र मटणवाल्याच्या पोरांना ते विचारायची सोय नव्हती. ते काय खातात हे उघडच दिसत होतं. त्यातल्या सर्वात मोठया पोराचं नाव सलीम. सलीम आणि एकूणच अमजदखानाची एकूणच पिळावळ डँबीस होती. दर ८-१५ दिवसांनी एकदा तरी ते एखाद्याला भर रस्त्यात बडवतांना दिसत. बरं अंगकाठी इतकी मजबुत की मार खाणारा माणूस आणि मटणवाल्याच्या कोयत्याखाली मरणारा बोकड / शेळी फळफळा मुतत असे. बरेच वर्ष एरीयावाल्यांना या पोरांचा धाक होता. काही जणांनी त्यांच्याशी अयशस्वी पंगा घेतला मात्र सहा पांडवांसमोर कोणाचे काही चालायचे नाही.

मात्र हीच कंपनी रविवार आला की दुकानावर उभे राहून जाणार्‍या येणार्‍याला 'आव सेठ आव' असे हसून पुकारत. एवढा ३६० अंशाचा बदल समजून घेण्याचे माझे वय नव्हते तेव्हा !

मग १९९२ साल आले. आम्ही ४-५ मित्र मंडळी कॉलेजवरुन घरी चालत येत होतो. बस स्टॉपवर उतरलो तर रस्त्याला सगळी सामसुम. कोणीतरी मस्जिद जाळली अशी बातमी कानावर पडली. आम्ही देखील उत्सुकतेने हे नक्की काय प्रकरण आहे हे बघायला गेलो. मशिदीच्या आजुबाजुला सगळ्या वखारी असल्यामुळे बरीच आग लागली असणार. मात्र हिरवी मस्जिद काळी पडण्याव्यतिरिक्त तिची बाहेरुन जास्त काही हानी झाल्यासारखे वाटले नाही. हिंदुंची टीचभर मंदिरे आणि भरभक्कम मशिद यातील फरक तेव्हा प्रकर्षाने जाणवला. मग कळाले की बाबरी मस्जिद पाडण्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदु मुस्लीम दंगल चालू झाली होती आणि हा त्याचाच एक भाग होता. नंतर दुसर्‍या दिवसापासून नवाकाळ मधे बाबरी मस्जिद पाडल्याची वर्णने यायला लागली. सोबत कृष्णधवल रंगातील मशिदीच्या घुमटावर चढलेले करसेवक असे चित्र ! मी चित्र बघीतले आणि बातम्या पण वाचल्या पण बाबरी मशीद पाडली गेली असेल यावर माझा विश्वास बसला नाही. मी प्रत्यक्ष बघीतलेली मशीद एवढे तांडव झेलुन उभी होती आणि ही तर फत्थरात बांधलेली. फार फार तर दोन चार दगड निखळले असतील. मात्र दोन दगड फोडणे काय आणि आख्खी मशीद पाडणे काय, ते प्रतिकात्मक असावे असे मला वाटले.

नंतर एरीयातले वातावरण तंग होत गेले. एके दिवशी आजुबाजुच्या वस्त्यांतले लोक धान्याच्या गोणी वाहताना दिसले. खाली रस्त्यावर जाऊन बघीतले तर 'बिसमिल्ला' चे दुकान लोकांनी फोडले होते. एक एक चीजवस्तू लांबवली होती. माझ्या माहितीतला 'बिसमिल्ल्लावाला' म्हणजे एकदम गरीब प्राणी. त्याच्याशी बोलताना त्याने कधीही कोणाकडे नजर उचलू बघीतलेले नव्हते की मापात पाप केलेले नव्हते. अशा माणसाचे दुकान लुटणार्‍यांचा मला फार राग आला पण काही करण्यासारखी परिस्थिती नव्हती. आपण या पापात सामिल झालो नाही हेच काय ते समाधान असा विचार करुन अस्वस्थ बसलो.

रोज नव्यानव्या बातम्या ! आज एकडे हल्ला झाला, तर उद्या तिकडे. जीव मुठीत धरुन बसलो होतो. एक चाळीतले सगळे धावत सुटले. विचारपुस केली तर कळाले की आज मटणवाल्याचा नंबर आहे. सगळी प्रजा हे लाईव्ह फुटेज बघायला धावत होती. कोणी त्याच्या सात पिढयांचा उद्धार करत होते. कोणी शटरवर दगड फेकत होते तर कोणी तलवारी नंग्या नाचवत होते. प्रचंड आरडाओरडा चालला होता. मला उरात धडधड व्हायला लागली. चित्रपटांमधे मर्डर बघणे वेगळे आणि हे वेगळे. तिथून पळून जावेसे वाटत होते पण सगळे रस्ते बंद होते. माघारीचा रस्ताच नव्हता. वेळ जाऊ लागला मात्र पब्लिकला आत घुसायला यश येत नव्हते. एवढे सगळे खुल्लेआम चालले होते पण पोलिस कोठे दिसत नव्हते. बकरे कापणारे आज स्वतःच कापले जाणार होते. अगदी टिपीकल सौदिंडीयन चित्रपटातील दृश्यच समोर होते.

अचाकन तिथे एक गाडी येऊन भस्कन थांबली. आमच्या एरीयाचे शिवसेनेचे नगरसेवक तिथे आले होते. त्यांनी हातात पिस्तुल घेऊनच गर्दीत प्रवेश केला. त्यांना बघताच बरेच जण मागे सरकले. त्यांनी सगळ्यांना मागे सरकवून घरातल्यांना बाहेर काढले आणि लगोलग मुसलमान मोहल्ल्यात नेऊन सोडले. समोर इतका प्रचंड जमाव, त्यातुन एका हिंदु ने एका मुसलमान कुटुंबाला बाहेर काढणे म्हणजे हिमतीची हद्द होती. अर्थात त्याचे फळ म्हणून नंतर तो नगरसेवक निवडणूकीत पडला. त्याचे ते कृत्य चुकीचे की बरोबर ? माहित नाही. पण लक्षात राहिली ती त्याची डेरींग !

नंतर मिलिट्री आली आणी कर्फ्यु लागल्यावर लोक बाहेर पडायचे बंद झाले. त्यानंतर मटणवाला कायमचा मुसलमान मोहल्ल्यात राहायला गेला. त्याची धश्चोट पोरं अगदी सरळ झाली. त्यानंतर ते कधीही मारामारी करताना दिसले नाही. एकाने तर सरळ जुना धंदा सोडून टेपरेकॉर्ड रिपेअर करण्याचे काम सुरु केले. जुन्या ओळखीमुळे मटणवाल्याची पोरं अजुनही माझ्याबरोबर नजरानजर झाल्यावर हसायची पण त्यांच्या हसण्यातला 'जगाची पर्वा न करण्याचा' तो भाव परत दिसलाच नाही. जमाना अच्च्छे अच्छों को बदल देता है हेच खरं ! नंतर कधीतरी मटणवाला नैसर्गीक मरणाने मेला.

मी देखील तो एरीया सोडून दुसरीकडे राहायला गेलोय. पण कधीतरी जुन्या घराच्या रस्त्याने जाताना आपसुक नजर त्याच्या दुकानाकडे जाते. आता ना तिथे मटणवाला आहे ना त्याचे दुकान ! पण नजर आपसुकच विचारते, 'अमजद खान कुठेय' ?

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2017 - 8:54 pm | श्रीगुरुजी

अनुभव चांगला लिहिला आहे. अजून लिहा.

बबन ताम्बे's picture

13 Aug 2017 - 9:01 pm | बबन ताम्बे

मस्त व्यक्तिचित्रण . प्रसंग डोळ्यासमोर उभा केलाय . अजून लिहा !!

अभिजीत अवलिया's picture

13 Aug 2017 - 9:08 pm | अभिजीत अवलिया

आवडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Aug 2017 - 9:08 pm | अमरेंद्र बाहुबली

छान

जव्हेरगंज's picture

13 Aug 2017 - 9:10 pm | जव्हेरगंज

चांगलं लिखाण!

छान लिहिलंय. तो काळ तणावाचा होता. आम्ही मुंबईतल्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली जाणून घ्यायला किती अधीर होतो, आणि शेवटी एकदाचा त्यांच्याशी संपर्क झाल्यावर जीव कसा भांड्यात पडला होता, हे सगळे आठवून गेले.

टर्मीनेटर's picture

13 Aug 2017 - 10:16 pm | टर्मीनेटर

मस्त.

रेवती's picture

13 Aug 2017 - 10:22 pm | रेवती

चित्रदर्शी लेखन आवडले.

थिटे मास्तर's picture

13 Aug 2017 - 10:27 pm | थिटे मास्तर

छान लिहीलय.

पैसा's picture

13 Aug 2017 - 10:28 pm | पैसा

अजून येऊ द्या.

अनुप ढेरे's picture

14 Aug 2017 - 10:45 am | अनुप ढेरे

खूप छान लिहिलय.

रघुनाथ.केरकर's picture

14 Aug 2017 - 10:58 am | रघुनाथ.केरकर

अजुन येउ द्या.

दुर्गविहारी's picture

14 Aug 2017 - 11:00 am | दुर्गविहारी

अफलातुन !!! अगदी चित्रदर्शी लिहीलय. येउ देत अजून.

मराठी_माणूस's picture

14 Aug 2017 - 11:01 am | मराठी_माणूस

प्रसंगाचे वर्णन शैलीदार आणि वाचनीय.
बाकी त्या नगरसेवकाचे कृत्य हे बरोबरच. निर्दोष माणसांचे प्राण वाचवणे, तेही अशा परिस्थितीत हे निश्चीतच प्रशंसनीय आणि धाडसाचे काम होते.

पगला गजोधर's picture

17 Aug 2017 - 8:47 am | पगला गजोधर

बरोबर रे भावा,

बाकी त्या नगरसेवकाचे कृत्य हे बरोबरच. निर्दोष माणसांचे प्राण वाचवणे, तेही अशा परिस्थितीत हे निश्चीतच प्रशंसनीय आणि धाडसाचे काम होते.

अश्या अनेक धड़साच्या कामांची तपशीलवार जंत्री, श्रीकृष्ण न्यायिक आयोगाच्या अहवालात, पाहता येतील.

गामा पैलवान's picture

17 Aug 2017 - 11:48 am | गामा पैलवान

प.ग.,

१८३४ पासून भारतात झालेल्या दंगलींचं ऑडीट उपलब्ध आहे का? असल्यास कुठे मिळेल?

विशेषत: १९४६ च्या जिनाने धमकी देऊन घडवून आणलेल्या डायरेक्ट अॅक्शनचं ऑडीट मला बघायचंय. कारण की त्यानंतर लगेच भारत निर्णायकरीत्या तोडण्यात आला.

आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

17 Aug 2017 - 1:02 pm | पगला गजोधर

श्रीकृष्ण आयोग, माझ्या माहिती प्रमाणे, स्वतंत्र भारतातील न्यायिक अहवाल आहे, कथेतिल मध्यवर्ती संकल्पनेशी संबंधित आहे.
तुम्ही उल्लेखलेल्या घटने बाबत कुठलेहि ऑडिट मला माहित नाही.

श्रीकृष्ण आयोगाचा ऑफिशियल अहवाल कुठे उपलब्ध आहे का? मी फक्त पायरेटेड / बूटलेग कॉपीज वाचल्या आहेत.

गामा पैलवान's picture

17 Aug 2017 - 11:57 pm | गामा पैलवान

प.ग.,

मुस्लिमांनी केलेल्या दंगलींचं ऑडीट तुम्हाला न मिळणं साहजिकच आहे. भले भारत तोडण्याच्या दंगली असूद्या. सध्यापर्यंत प्रत्येक दंगल मुस्लीम मोहल्ल्यांत सुरू व्हायची आणि हिंदू कसातरी प्रतिकार करायचे.

पण मुंबईच्या १९९२-९३ च्या दंगली आणि २००२ च्या गोधराकांडाच्या दंगली हे दोन सणसणीत अपवाद आहेत. यांत हिंदूंनी पुढाकार घेऊन दंगल सुरू केली. म्हणूनंच तुमच्यासारखे हिंदुद्वेष्टे सतत या दोन दंगलींचं भांडवल करंत असतात.

आ.न.,
-गा.पै.

पाटीलभाऊ's picture

14 Aug 2017 - 11:38 am | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय

सिरुसेरि's picture

14 Aug 2017 - 11:39 am | सिरुसेरि

छान व्यक्तीचित्रण .

वकील साहेब's picture

14 Aug 2017 - 11:52 am | वकील साहेब

छान

गामा पैलवान's picture

14 Aug 2017 - 12:45 pm | गामा पैलवान

अक्षरमित्र,

तुमचा लेख अंतर्मुख करून गेला. थोडासा खंतावलो. ९२-९३ च्या दंगलीत कचेरीतल्या एका मुसलमानाचं डोंगरी (मुंबई) इथलं घर जाळल्याची आठवण झाली. बिचारा येऊन आपली कर्मकहाणी सांगत होता. 'मै महाराष्ट्रीयन लोगोमें इतना मिक्स होता था फिरभी घर जलाया.' त्याच्या बोलण्यातही मकान शब्द नव्हता. घर असाच शब्द असायचा. हेसुद्धा फार लागून राहिलं! कारण की आपली मकान या शब्दाशी तितकीशी जवळीक नसते.

बाबरी नावाची कुठलीही मशीद नसतांना ती पाडल्याचा अपप्रचार करणारी तत्कालीन वृतपत्रे दंगली भडकावणारी आहेत.

आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

14 Aug 2017 - 4:15 pm | पगला गजोधर

छान लेख, आवडला. पु ले शु १+

ही प्रतिक्रियाही फार बोलकी वाटली.

विशेषतः "बाबरी नावाची कुठलीही मशीद नसतांना ती पाडल्याचा अपप्रचार करणारी तत्कालीन वृतपत्रे" हे तर लैच भारी...
वृत्तपत्रे कुठली सामना, नवाकाळ का ?

दंगल काय उसळते, कथेतील मुस्लिम मटणवाल्याला, शिवसेनेचा नगरसेवक येऊन, सुखरूप मुस्लिम लोकवस्तीत सोडवून येतो काय ! सारंच कसं रोमांचक वाटलं.
रच्याकने अवांतर : विजुभाऊंच्या एका धाग्यावर, बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, (चू भू दे घे )अश्या प्रकारचं वाक्य वाचल्याचे स्मरते, ते वरील नगरसेवकांच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने असावे काय ?
मग असे असेल, तर प्रतिक्रियेतील कार्यालयातील मुस्लिम सहकार्याचे घर, नक्की कुणी जाळले ?

भित्रा ससा's picture

14 Aug 2017 - 12:53 pm | भित्रा ससा

जुन्या ओळखीमुळे मटणवाल्याची पोरं अजुनही माझ्याबरोबर नजरानजर झाल्यावर हसायची पण त्यांच्या हसण्यातला 'जगाची पर्वा न करण्याचा' तो भाव परत दिसलाच नाही.
अप्रतिमच

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

14 Aug 2017 - 1:12 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मस्त ओघवतं लिहीता.पुलेशु.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2017 - 3:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरेख लिहिले आहे ! लिहित रहा. अजून काही वाचायला आवडेल.

दशानन's picture

14 Aug 2017 - 8:51 pm | दशानन

+1
असेच म्हणतो, लिहीत रहा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2017 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगलं लिहिलय. पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

arunjoshi123's picture

14 Aug 2017 - 4:31 pm | arunjoshi123

मस्त स्टोरी. १९९२ नंतर तणावपूर्ण गल्ल्या तणावहिन झाल्या हा स्वानुभव.

केडी's picture

14 Aug 2017 - 4:48 pm | केडी

आवडला...लिहीत राहा

Pradeep Phule's picture

14 Aug 2017 - 5:53 pm | Pradeep Phule

पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!

अभ्या..'s picture

14 Aug 2017 - 6:34 pm | अभ्या..

जब्बरद्स्त लिहिलंय.
बौध्दिक बैठका, चिंतन वगैरेंचा अशा प्रसंगात काही उपयोग नसतो. अशाच माणसांमुळे सेना आहे. राहणार आहे.

अभिदेश's picture

15 Aug 2017 - 11:08 pm | अभिदेश

अगदी बरोबर.

गामा पैलवान's picture

15 Aug 2017 - 1:16 pm | गामा पैलवान

पगला गजोधर,

१.

वृत्तपत्रे कुठली सामना, नवाकाळ का ?

तत्कालीन सगळीच वृत्तपत्रे दोषी आहेत. सामनाने बाबरी मशीदीच्या ऐवजी जुनं राममंदिर असा उल्लेख केलेला पाहायला मला आवडेल. खरंतर सर्वच वृत्तपत्रांनी असा उल्लेख केला पाहिजे.

२.

तर प्रतिक्रियेतील कार्यालयातील मुस्लिम सहकार्याचे घर, नक्की कुणी जाळले ?

माहीत नाही. बहुतेक तपास चालू असावा.

आ.न.,
-गा.पै.

कंजूस's picture

18 Jun 2023 - 8:39 am | कंजूस

उगाचच ललित, वैचारिक लेखनापेक्षा हे बरं.
भिडलं.

वामन देशमुख's picture

19 Jun 2023 - 12:41 am | वामन देशमुख

1. सलीम आणि एकूणच अमजदखानाची एकूणच पिळावळ डँबीस होती. दर ८-१५ दिवसांनी एकदा तरी ते एखाद्याला भर रस्त्यात बडवतांना दिसत.

2. जुन्या ओळखीमुळे मटणवाल्याची पोरं अजुनही माझ्याबरोबर नजरानजर झाल्यावर हसायची पण त्यांच्या हसण्यातला 'जगाची पर्वा न करण्याचा' तो भाव परत दिसलाच नाही. जमाना अच्च्छे अच्छों को बदल देता है हेच खरं !

जे झालं ते चांगलं झालं, नाही का?

प्राची अश्विनी's picture

19 Jun 2023 - 8:35 am | प्राची अश्विनी

छान लिहिलंय.