ऋग्वेदातील सुविचार

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
29 May 2017 - 9:38 am

आमची हि प्रस्तावना वाचलीच पाहीजे असे नाही.

मेघश्याम पुंडलिक रेगे ((मे.पुं. रेगे) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे एक वाक्य आहे. "..जे पुस्तक आपण वाचलेले नसेल तरी आपण ते वाचलेले असणार अशी ज्याच्याविषयी आपली समजूत असते त्या पुस्तकाला अभिजात पुस्तकाचा (classic) दर्जा प्राप्त झालेला असतो असे म्हटले गेले आहे..." अशीच काहीशी स्थिती वेदांबाबतही होते का ? नुसताच उदो उदो किंवा नुसतीच टिका पण त्यात प्रत्यक्षात काय लिहिले आहे हे उघडून पहाणारे कमी आणि त्यातलाच मीही एक. त्यात ऋग्वेदासारख्या ग्रंथांचे मोठे आकारमान, "पारदर्शक" अनुवादांच्या आंतरजालावर सुलभ उपलब्धतेचा अभाव अशा अडचणी असतातच. त्यात एकदा मनाचा मोठा हिय्याकरुन कव्हरपृष्ठावरील माहिती वाचून एक पुस्तक एका पुस्तक प्रदर्शनातून घेतले. त्यात ऋग्वेदाचा अनुवाद उपलब्ध असेल वाटले होते पण अंतरंग टिकेचे निघाले.

मी ग्रंथ अथवा शब्दपुजेचा समर्थक नाही. एखादा सुविचार हा सुविचार आहे म्हणून उल्लेखनीय असू शकतो, तो अमुक ग्रंथात आहे म्हणून श्रेष्ठ ठरतो असे नसावे. अर्थात एखादी उल्लेखनीय नोंद लक्षात घेताना संबंधीत ग्रंथ आणि लेखककविंना त्यांचे देय श्रेयही द्यावयास हवे असे वाटते. एखाद्या ग्रंथात काही स्पृहणीय भाग आहे म्हणजे त्या नाण्याला इतर बाजू नसतात असे नाही. खरेतर कोणत्याही ग्रंथा सोबत एक अभ्यासक टिकाकारांचे अभ्यासपूर्ण टिकांचा समावेश असलेले परीशिष्ट जोडलेले असावे आणि सोबत टिकेचा परामर्ष सुद्धा.

इथे टिकेचा उल्लेख केला असला तरीही या धाग्याचा उद्देश ऋग्वेद अथवा इतर वेदांवरील टिका नाही. या नंतरच्या एखाद्या धागाचर्चेतून दोनएक टिकाकारांच्या टिकेबद्दल उहापोह करण्याचा मोह आहे पण समर्थ रामदास म्हणतात कोणताही ग्रंथाचा पूर्ण अभ्यास केल्या शिवाय टिका करणे योग्य नव्हे. परंतु संस्कृत ग्रंथांचे आकारमानच एवढे मोठे असते कि एका व्यक्तीच्या एका जन्मातील वाचनाने पूर्ण कधी व्हावे आणि टिका करण्याची संधी कधी मिळावी ? आणि त्यात तुम्हाला ती भाषा पूर्णत्वाने आत्मसात नसेल तर तुम्ही आपसूक अनुवादकांवर अवलंबून असतात आणि अनुवाद आणि अनुवादकांच्या आपापल्या मर्यादा असतात. याला एक उपाय असा की त्या ग्रंथांची सकारात्मक बाजू आधी लक्षात घ्याव्यात आणि तदनंतर टिकेचा उहापोह करावा.

तसे ऋग्वेदात मुख्यत्वे ईश्वरस्तुती आणि काम्य म्हणजे कामनापुर्तीसाठी केलेल्या प्रार्थनांचा समावेश आहे (चुभूदेघे) पण ते या धाग्याच्या परिघात अभिप्रेत नाहीत. त्यामुळे निव्वळ सुविचार या मर्यादीत व्याख्येत बसणार्‍या ऋचा कदाचित कमी मिळतील पण ज्या काही आहेत त्यांचा शोध आणि जमल्यास बोध घेणे. तर एकुण या धागा लेखाच्या निमीत्ताने ऋग्वेदातील सामान्यपणे वैदिकेतरांनाही टिकाकारांना अथवा नास्तीकांनाही मान्य होईल अशा ऋग्वेदातील सुविचारांचे संकलन करणे हा आहे. त्यामुळे शक्यतोवर इश्वरस्तुती आणि काम्य म्हणजे कामनापुर्तीसाठी केलेल्या प्रार्थनांचा या धागा लेख चर्चेत शक्यतोवर समावेश नसावा असे वाटते. असो.


ऋग्वेदातील सुविचार

* ऋग्वेदातील एका सुविचाराकडे लक्ष जाते तो म्हणजे 'एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति' – सत्य एकच आहे पण विप्रवर त्याची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करतात.
-ऋग्वेद-1.64.46

*ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २१ (इंद्रसूक्त) - ६

इन्द्र॒ श्रेष्ठा॑नि॒ द्रवि॑णानि धेहि॒ चित्तिं॒ दक्ष॑स्य सुभग॒त्वम॒स्मे ।
पोषं॑ रयी॒णामरि॑ष्टिं त॒नूनां॑ स्वा॒द्मानं॑ वा॒चः सु॑दिन॒त्वमह्ना॑म् ॥ ६ ॥

इन्द्र श्रेष्ठानि द्रविणानि धेहि चित्तिं दक्षस्य सुभगऽत्वं अस्मे इति ॥
पोषं रयीणा अरिष्टिं तनूनां स्वाद्मानं वाचः सुदिनऽत्वं अह्नां ॥ ६ ॥
हे इंद्रा, अत्यंत श्रेष्ठ अशा ज्याच्या संपत्ति आहेत त्या आमच्या हातीं ठेव. आमच्या ठिकाणीं सुविचार असूं दे व कर्तबगारीनेंच जो भाग्योदय होतो तोच आम्हांस दे. आमच्या ठिकाणीं सर्व ऐश्वर्याचा उत्कर्ष कर, आमच्या शरीरांत आरोग्य, वाचेंत रसवत्ता, आणि हरएक दिवसामध्यें तुझी मंगल कृपा असूं दे. ॥ ६ ॥

अनुवाद संदर्भ

*'अनोखा परिचय ऋग्वेद आणि उपनिषदांचा' या मुख्यत्वे टिकात्मक दृष्टीतून लेखन करणार्‍या रघुनाथ दत्तात्रेय जोशी यांनी त्यांच्या परिशिष्ट-२ मध्ये ऋग्वेदातील पाचएक सुविचारांची दखल घेतली आहे. टिकाकाराने सकारात्मक दखल घेणे ही उल्लेखनीय बाजू

** ४|३३|११ या ऋचेत 'न ऋते श्रान्तस्य सख्याय देवा:' दमण्या एवढे श्रम केल्या शिवाय देव साहाय्यकारी मैत्री जोडत नाहीत
** ९|७३|६ 'ऋतस्य पन्थां न तरन्ति दुष्कृत' याचा (जोशींनी दिलेल्या अनुवादाबद्दल साशंकता वाटते) अर्थ करुन पाहीजे आहे.
** १०|३४|१३ 'अक्षै: मा दीव्यः कृषिमित कृषस्व' - जुगार खेळू नको शेती कर
** १०|८५|४६ ऋचेत 'सम्राज्ञी श्वशुरे भव सम्राज्ञी श्वश्वां भव| ननान्दरी सम्राज्ञी अधि देवृषु '- (हे नववधू) तू सासरा, सासू, नणंद, दिर यांचा आदर प्राप्ती करणारी हो

.
.
.
.
.

* सतसंगधाराडॉटनेट नावाच्या वेबसाटवर ऋग्वेदाचा मराठी अनुवाद उपलब्ध असल्याचे दिसते.
* या धागा लेखाचा उद्देश ऋग्वेदातील निव्वळ सुविचार संकलन एवढाच मर्यादीत आहे. धागालेखाच्या मर्यादीत परिघात बसू शकतील असे सुविचार नमुद केल्यास आभारी असेन. अनुवाद दुसरीकडून आयात असल्यामुळे त्यात त्रुटी असल्यास अथवा अनुवाद वेगळ्या पद्धतीने करणे शक्य असल्यास आवर्जून नमुद करावे.
* अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

29 May 2017 - 12:04 pm | दीपक११७७

छान धागा आहे. चांगली चर्चा व्हावी.

वाचतोय..चांगले संकलन होईल अशी अपेक्षा.

टिकाकाराने सकारात्मक दखल घेणे ही उल्लेखनीय बाजू

'टीकाकार' नकारात्मकच असतो असे अजिबात नाही. जुन्या ग्रंथांवर 'टीकांसहित' असे वाचल्याचे आठवते.
ते भाष्यकार किंवा इंटरप्रिटर या अर्थाने घ्यायला हवे. मराठीत समीक्षकही असेच बदनाम आहेत.

माहितगार's picture

1 Jun 2017 - 10:54 am | माहितगार

दीपक११७७ आणि खेडूत प्रतिसादांसाठी आभारी आहे.

मारवा's picture

29 May 2017 - 8:44 pm | मारवा
माझ्या मते सुविचार म्हणावे का माहीत नाही मात्र आत्यंतिक सुंदर अत्यंत लोभस काव्यात्मक असे जे मी ऋग्वेदाच्या अनुवादात सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी केलेल्या अप्रतिम मराठी अनुवादात वाचलेले ते म्हणजे उषे ची उषादेवी च्या स्तुतीत तिच्या आगमना ची इ ची वर्णन करणार्या ऋचा निव्वळ अप्रतिम काव्य आहेत. त्या काळातील निसर्गा बरोबर श्वास घेत जगणारा आदीम माणुस व त्च्या निरागस आनंदी माणसाचे कविचे उषे च्या आगमनाने हरखुन जाणे फार छान आहे. तुम्ही लिंकेत दिलेल्या अनुवाद कसा हे माहीत नाही पण उषे ला पुन्हा शोधण्यात मजा येणार नक्कीच
माहितगार's picture

1 Jun 2017 - 10:53 am | माहितगार

त्यावर स्वंतत्र सुंदर धागा होऊ शकेल. ह्या धाग्याचा परीघ मर्यादीत ठेवलेला आहे. प्रतिसादासाठी आभारी आहे.

dhananjay.khadilkar's picture

30 May 2017 - 7:12 pm | dhananjay.khadilkar

छान

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 8:04 pm | संजय क्षीरसागर

आजच्या टिवी सिरियल्समधे दिसणार्‍या प्रापंचिक विवंचना पार ऋषीमुनींच्या काळीही चालू होत्या !

१०|८५|४६'- (हे नववधू) तू सासरा, सासू, नणंद, दिर यांचा आदर प्राप्ती करणारी हो :)

ऋग्वेदाचा व्यवस्थित मराठी अर्थ समजून घ्यायचा असेल तर कृपया धार्मिक अर्थ काढणार्‍यांपासून लांब रहावे असे माझे मत आहे. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी केलेला मराठी अनुवाद पहावा. तो जास्त विश्वासार्ह आहे.

सतिश गावडे's picture

31 May 2017 - 11:05 pm | सतिश गावडे

"ऋग्वेदातील विज्ञान" बद्दल काय मत आहे आपलं? :)

अवांतर टाळण्यासाठी आभारी आहे.

माहितगार's picture

1 Jun 2017 - 11:29 am | माहितगार

धागा लेखा शेवटी दिलेल्या दुव्यावरील अनुवादाचे अनुवादक कोण माहित नाही पण तो मुख्यत्वे स्वैर अनुवाद वाटतो. आंतरजालावर दुसरा मराठी पर्याय दिसला नाही त्यामुळे आहे तो दुवा नमुदकारावा लागला.

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा अनुवाद माझ्या प्रत्यक्ष वाचनात नाही- बहुधा कॉपीराईटेड असावेत-, रघुनाथ दत्तात्रेय जोशी यांचा भाष्यग्रंथ वाचनात आला (आंजावरील काही इंग्रजी हिंदी अनुवादांचे अल्पांश प्रसंगोप्पात वाचले आहेत), रघुनाथ दत्तात्रेय जोशी यांनी भाष्य करताना मुख्यत्वे सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा अनुवाद आधार मानलेला दिसतो म्हणून जी काही ओळख झाली ती टिकाकार समिक्षकाच्या गाळणीतून आणि तुम्ही म्हणता तसे अंधश्रद्धेचे पांघरुण टाळून. रघुनाथ दत्तात्रेय जोशींना घरातील परंपरेमुळे ऋग्वेदाचा काही अंश मुखोद्गत होता पण अर्थ माहित नव्हते म्हणून सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा अनुवाद आधारास घेऊन प्रत्येक ऋचेबद्दल नोंदी करुन अर्थ लावण्याचा प्रय्त्न त्यांनी केला सर्वच ऋचांचे त्यांना अर्थ लावता आले नाहीत असेही ते कबूल करतात. एकीकडे घरातील संस्कृतभाषेचा वारसा दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टीकोण यातून त्यांनी भाष्य केलेले दिसते. त्यांच्या भाष्यात आणि आंजावरही स्पेसिफीकली सुविचारांची संख्या तशी कमी दिसते, मग सुविचारांच्या फ्रंटवर काही सुटून तर जात नाही आहेना हे पहाण्याचा ह्या धाग्याचा उद्देश.

जे निव्वळ सुविचार आहेत त्यात तुम्ही धार्मीकता क्लेम करा अथवा नका करु फारसा फरक पडत नसावा. अर्थात मी धागालेखात म्हटल्या प्रमाणे माझी अपेक्षा पारदर्शक अनुवादाची असते. पारदर्शकता म्हणजे तुम्ही कोणत्या शब्दाचा काय अर्थ घेतला आहे हे प्रत्येक शब्दा बाबत नमुद करावे -त्या शब्दांचे इतर मान्यवर अनुवादकांनी काय अर्थ घेतले आहेत आणि तुमचा अर्थ वेगळा असल्यास तसे का हे विशीष्टपणे नमुद असावे, जिथे काँटॅक्स्स्च्युअल अर्थ घेतला आहे त्या बाबत ओळीत स्पेसीफीक टिपा असाव्यात. व्याकरणाबद्दलही टिपा असाव्यात. आणि असे पारदर्शक अनुवाद वाचनासाठी आंतरजालावर सुलभतेने उपलब्ध असावेत. आणि सोबतील समिक्षकांचे साक्षेपी समिक्षण वाचनास उपलब्ध असावे.

अर्थात अशा अपेक्षा ऋग्वेदाबाबत तरी मराठीसाठी प्रत्यक्षात कितपत फलीभूत होऊ शकतात याची शंका वाटते. बेसिकली गीतेस(आणि पुर्वी रामायण आणि भागवतास) प्राधान्य मिळत असे तेवढे अनुवादांसाठी आणि भाष्यांसाठी इतर वैदीक आणि वेदांग साहित्यास मराठीत कितपत स्थान मिळाले असावे या बाबत व्यक्तिगत शंका वाटते. (चुभूदेघे)

मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार